स्वामी विवेकानंद
आज ४ जुलै. ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ या कठोपनिषदातील श्लोकाची पुनर्गर्जना करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा आज ११३ वा निर्वाणदिन. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेल्या या महापुरुषाचे संपूर्ण जीवन म्हणजे या भूतलावरील सर्वांसाठी अतिशय आदर्श आहे. प्रखर विद्वत्ता, धगधगीत वैराग्य, अजोड गुरुभक्ति, अत्यंत प्रबल आत्मविश्वास, मातृभूमीबद्दल अपार प्रेम, दीनदु:खी जीवांबद्दल अपार करुणा या सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे स्वामी विवेकानंद. वयाच्या अठराव्या वर्षी स्वामीजींची श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. दक्षिणेश्वर येथील कालीमंदिरातील या साधारणशा दिसणाऱ्या पुजाऱ्याने प्रथम भेटीतच परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या तरुण नरेंद्रचे मन वेधून घेतले ते कायमचेच. नरेंद्रनाथास १८८१ ते १८८६ अशी अवघी साडेपाच वर्षे सद्गुरुंचा सहवास लाभला पण या गुरुशिष्यांतील नाते, प्रेमबंध अपूर्व ठरला. अत्यंत चिकित्सक असलेल्या नरेन्द्रनाथांच्या परमार्थातील शंकांचे श्रीरामकृष्णांनी आपल्या ईश्वरीय अनुभूतिमुळे लाधलेल्या बुद्धीद्वारे अत्यंत सोप्या शब्दांत निराकरण केले. त्या अनुभूतिची झलकही त्यांनी नरेंद्रास दिली व सांगितले की आता चावी माझ्याकडे आहे. तुझे कार्य पूर्ण होईस्तोवर ती अनुभूति परत येणार नाही. पितृनिधनाच्या आकस्मिक दु:खाने कोसळलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीतही नरेंद्राने कालीमातेकडे भक्ति, ज्ञान व वैराग्य याखेरीज काही मागितले नाही हे विशेष होय. श्रीरामकृष्णांच्या देहत्यागानंतर त्यांच्या सर्व शिष्यांचे नेतृत्त्व नरेंद्राने केले. १८८६ ते १८९२ अशी सहा वर्षे स्वामीजी परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारतभर हिंडले. १८९० च्या सुमारास गाझीपूर येथे स्वामीजींचा परिचय पवहारी बाबा या योग्याशी झाला. पवहारी बाबा एक सिद्ध योगी असून वायूभक्षण करून जमिनीखाली एका भुयारात रहात असत. परमहंसांनी दिलेली अनुभूति परत मिळावी व त्यातच मग्न रहावे अशी मनिषा बाळगणाऱ्या स्वामीजींनी पवहारी बाबांकडे जाण्याचा निश्चय केला. पण त्या रात्री त्यांच्याकडे जाण्यासाठी निघताना श्रीरामकृष्णांची असीम कृपा, त्यांचे अगाध प्रेम आठवून स्वामीजींचे हृदय व्याकुळ झाले, नेत्र भरून आले. तितक्यात श्रीरामकृष्णांची दिव्य मूर्ति त्यांच्यापुढे प्रकट झाली. नेत्रांत स्नेह, करुणा, व्यथा अन निर्भत्सना मिश्रित भाव असलेली ती मूर्ति बराच काळ स्वामीजींच्या पुढे उभी होती. जणू काही ते स्वामीजींना दर्शवित होते कि त्या क्षुद्र समाधिसुखाच्या पायी तू इतक्या स्वार्थी क्षुद्र बुद्धीचा कसा बनतोस. स्वामीजी संपूर्ण प्रहर तसेच निश्चल बसून राहिले. दुसऱ्या दिवशी आपल्याला झालेले दर्शन मनाचा खेळ असेल असे ठरवून स्वामीजींनी त्या रात्री परत पवहारी बाबांकडे जाण्याचा निश्चय केला. तो काय! त्या रात्रीही श्रीरामकृष्ण परत त्यांच्यासमोर अविर्भूत झाले. सतत एकवीस दिवस याच प्रकारे पुनरावृत्ति झाली. अंती स्वामीजींनी श्रीरामकृष्णांची मनोमन क्षमा मागितली व म्हणाले की ‘प्रभो, तुम्हीच माझे एकमेव आराध्य. मी आता यापुढे इतर कुणाकडेही जाणार नाही. मला या अपराधाची क्षमा करावी’. त्यानंतर स्वामीजींनी जे अफाट, अजोड कार्य केले ते सर्वांस ठाऊक आहेच. सद्गुरूंची दिव्यदृष्टी व दूरदृष्टी अशी असते! असो. १८९३ साली स्वामीजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेस गेले. ११ सप्टेंबर रोजी त्यांचे ते जगप्रसिद्ध व्याख्यान झाले. १८९६ पर्यंत ते आचार्य भूमिकेत वावरले व या काळात त्यांनी परदेशात विविध ठिकाणी विविध विषयावर व्याख्याने दिली. ती आज पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. १८९७ साली भारतात परत आल्यावर त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली. या लहानश्या रोपाचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर झालॆले दिसत आहे. आज ‘रामकृष्ण मिशन’च्या शाखा सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत. श्रीरामकृष्णांच्या उपदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक बंगाली नियतकालिक सुरु करावे या हेतूने स्वामीजींनी पुढाकार घेऊन १४ जानेवारी १८९७ रोजी ‘उद्बोधन’ हा अंक सुरु केला. परिव्राजक काळातील हालअपेष्टांनी व त्यानंतरच्या अविरत कष्टांनी स्वामीजींचा देह अतिशय थकला व मायदेशी परतल्यावर त्याना मधुमेह, दमा इत्यादि विविध व्याधींनी घेरले. त्यातही त्यांचे कार्य चालूच होते. अखेरीस ४ जुलै १९०२ रोजी रात्रौ ९ वाजता त्यांनी बेलूर मठात देह ठेवला.
अद्भुत स्मरणशक्ति हा स्वामीजींचा गुण विशेष होता. कोणत्याही विषयावरील कितीही मोठे पुस्तक ते काही तासातच वाचून काढीत व त्यातील कुठल्याही पानावरील मजकूर ते शब्दश: सांगू शकत! स्वामीजी सांगत की वाचताना संपूर्ण पान ते एका दृष्टीक्षेपात वाचू शकत असत. स्वामीजींना गायन-वादन कलाही चांगलीच अवगत होती. या गायनकलॆपायीच सुरेंद्रनाथ मिश्रांच्या घरी स्वामीजींची श्रीरामकृष्णांशी प्रथम भेट झाली होती.
अशा या महापुरुषाचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे प्रत्येकास वाटावे यात नवल ते काय!!
— कृष्णदास (४ जुलै २०१५)
॥ सच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆