नामाचे प्रेम
॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥
जी व्यक्ति किंवा वस्तू आपणांस ज्ञात आहे त्यावरच आपण प्रेम करु शकतो. न पाहिलेल्या, अज्ञात वस्तू अथवा व्यक्तिवर प्रेम जडणे सर्वथैव अशक्य आहे. असे असता परमेश्वर जो आज आपणास अज्ञात आहे त्यावर किंवा त्याच्या नामावर प्रेम कसे जडेल? म्हणजेच त्यासाठी त्याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. हा परमेश्वर आहे तरी कसा? तर तो आहे नामरुपातीत, निर्गुण निराकार! मग आताची आपली अवस्था, जेथे सर्व ज्ञान हे पंचज्ञानेंद्रियांद्वाराच आकळले जाते, तेथे त्यापलिकडे असलेल्या नामरुपातीताचे आकलन अथवा ज्ञान आपणांस कसे व्हावे? म्हणजेच आपल्या ज्ञानेंद्रियांना सूक्ष्मता आली पाहिजे. स्थूल जगतातला आपला अनुभव सांगतो की एकाग्रता वाढली तर आकलन सोपे जाते. पण त्याहीपेक्षा बुद्धिची गति त्या विषयात जर नसेल तर एकाग्रता होऊनही काही उपयोग नाही. भगवंत किंवा परमेश्वराचे स्वरुप शुद्ध आहे म्हणून त्याचे आकलनास लौकिकातील ज्ञानास ज्या प्रकारची बुद्धिमत्ता लागते तशी आवश्यकता नसून शुद्ध बुद्धिची जरुरी आहे. ही प्रथम आवश्यकता झाली. परमेश्वराच्या अस्तित्त्वाविषयी विकल्प ही बुद्धिची अशुद्धता आहे. विषयबुद्धि हीसुद्धा अशुद्धता आहे कारण ती जीवास स्थूलात रमवून जीवाची स्थूलापलिकडे पहाण्याची क्षमता काढून घेते. म्हणून बुद्धि विषयरहित करणे हा प्रारंभ आहे. त्याचा पाया म्हणजे, विषय हे आनंदाचा स्त्रोत नाही ही खात्री, हा विश्वास मनात बाळगणे व त्यांच्या कचाट्यातून स्वत:ला सोडविणे. हा धैर्याचा, निश्चयाचा भाग झाला. त्यासाठी आवश्यक आहे विवेक व त्यावर आधारित वैराग्य. विषय हवेसे वाटणे जसे वाईट, तसेच विषयांचे नकारत्वाने घडणारे चिंतनही तितकेच वाईट, कारण त्यात विषयाचेच चिंतन आहे. म्हणूनच संतांनी नामाचा उपाय सांगितला. मग मन स्थूलातून हळुहळू बाहेर पडू लागते व इंद्रियांना सूक्ष्मता येऊ लागते. म्हणजेच चित्ताची हवे-नकोपणाची व त्यावर आधारित विचारांची आंदोलने कमी कमी होऊ लागतात. ही कंपनरहित अवस्था म्हणजेच साम्यावस्था. वैराग्यामुळे बाह्य परिस्थितितील बदलांमुळे मनात होणारी कंपनेही थांबतात व अशा वेळी जे नाम चालते त्याच्या लयीत मन रंगू लागते. एकतानता येते. ते नाम घेताना नाम ऐकण्याचाही अनुभव येतो. विशेष म्हणजे प्रारंभी जे नाम रुपाच्या कल्पनेवर आधारित होते ते रुपाचा आधार सोडून त्यापलिकडे जाते. म्हणजेच नाम घेताना रुपाचा कल्पित परिघ ओलांडून ते पलिकडे जाते. नामीचे सगुण दर्शन व्हावे ही इच्छासुद्धा नाम घेताना उरत नाही. म्हणजेच केवळ नामासाठी नाम! नामीच्या दर्शनाची अपेक्षा नाही, इतर कोणत्याही इच्छापूर्तीची अपेक्षा नाही. यालाच आपण प्रेमाने नाम घेणे किंवा नामात प्रेम येणे म्हणू. या अवस्थेपुढे नामधारकाचा ताबा नाम घेते. अशा प्रेममय नामाच्या अखंड चिंतन स्मरणातल्या नामधारकाचे स्वत:चे स्वरुपही कीटक-भृंग न्यायाने कालांतराने प्रेममयच होईल यात कसला संशय?
त्यापुढील अनुभव ज्याचा त्याला!!
— कृष्णदास (२०.१२.२०११)
॥ कस्तुरीतिलक सुशोभित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆