🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री नृसिंह सरस्वती
१
- कृष्णातीरी वाडी सुंदर, वसतसे तेथे नृसिंह यतिवर
- श्री दत्तगुरुंचा केवळ हो, भक्तांसाठी तो अवतार
- काषायवस्त्र कांती शुभ्र, रुद्राक्ष माला हाती कमंडलु
- हाती दंड जणू तो धरिला, प्रेमळ भक्त नित्य रक्षिण्या
- द्वादश वर्षे वास केला, केल्या अगणित अनंत लीला
- पाहुनिया हो त्या सकला, गुरुदत्त घोष हा नभी दुमदुमला
- पलिकडले ते अमरेश्वर, भुवनेश्वरीचा निवास सुंदर
- तेथील यक्षिणी येती अपार, पूजन करण्या नित्य गुरुवर
- श्रीगुरुंच्या त्या दरबारी, सुंदर पादुका औदुंबर तळी
- भक्तांंची हो ये जा सारी, पादुका पूजनी आनंद हो भारी
- प्रदक्षिणांची सेवा न्यारी, पदी पदी भक्त दत्त नाम हो गाई
- पाहुनि भक्तांची मांदियाळी, हर्षे ती श्रीगुरुंची स्वारी
- वर्षति कृपा दान सत्वरी, धरुनि ओंजळी मी स्वीकारी!
✦ ✦ ✦
२
- गाणगापुरी पादुका निर्गुणी, भक्त ध्याती क्षणोक्षणी
- संतोषोनि नृसिंह मुनी, कृपेची उघडती खाणी
- हिरेमाणकाची ती खाणी, भक्ति ज्ञानाचे ते मणी
- अलंकार घालता ते गुणी, वैराग्य उपजे ते मनी
- लौकिक वाटे कवडीवाणी, त्वरितचि पोहोचते निर्गुणी
- ही पादुकांची कहाणी, म्हणुनि पूजा क्षणोक्षणी
✦ ✦ ✦
३
- निर्गुण मठी बसती श्रीगुरु, भक्त दर्शनासी अपारु
- विनविती आम्हा अंगिकारु, तेणे पावू भवपारु
- म्हणती धरा थोडा धीरु, तुम्हावरु असे नजरु
- नका काही घाबरु, ठेविता आमचा कृपाकरु
- ऐकता हर्षित अंतरु, चरणी त्या ठेविती ते शिरु
✦ ✦ ✦
४
- संगमी वृक्ष औदुंबर, गुरुंचे आवडते स्थान
- सांगती त्याचे महत्व अपार, भक्त दर्शनी अपार
- सेवा करिती प्रदक्षिणांची, मंद मंद गतीची
- मुखी दत्त नाम घोषाची, चित्ती श्रीगुरु धरिला असेचि
- पाऊल पुढे पुढे पडताचि, लागे देहभान विसरुचि
- शक्ति एकवटोनि चित्तीची, श्रीगुरु दिसती समोरचि
- वाटे धन्यता मनीचि, अशी ही कथा प्रदक्षिणांची
- संगमीच्या पवित्र औदुंबराची
✦ ✦ ✦
५
- गुरुंची पालखी निघाली, भक्त चालती दुडक्या चाली
- धरिती छत्र पताका वरी, वाजती नगारे नौबती
- बसले दत्त दिगंबर यति, गळा माळा रुद्राक्ष अति, सवे सुगंधित हार शोभिती
- दत्त दिगंबर दत्त दिगंबर, भक्त नाम घोष गर्जती
- दर्शना भक्त पुढे धावती, दर्शनि कुंठित होय मति
- श्रीगुरु मुखकमल पाहता, हर्षिती चित्ती अति
- संतोषोनि श्रीगुरुंचा, कृपाशीर्वाद लाधती
- वाटे धन्य धन्य त्यांसी अति, ध्याती श्रीगुरु अखंड चित्ती
- मनी हसे श्रीगुरुंची मूर्ती, श्री नृसिंह सरस्वती, श्री नृसिंह सरस्वती
✦ ✦ ✦
६
- अवधूत प्रकटला औदुंबर तळी, जनांची दर्शना धावपळी
- रुप ध्यान ते सुंदर, मस्तकी जटाभार, भस्म सर्वांगावर
- कर्णी कुंडले, रुद्राक्षमाळा गळ्यावर, छाटी अंगी, कौपीन कमरेवर
- पायी शोभती खडावा सुंदर, सभोवती स्वर्गीय सुगंध दरवळत अपार
- रुप लावण्य ते सुंदर, पाहता मौज अनिवार
- दृष्टी जाताच मजकडे, रोमांचित काया अन् नाम स्फुरे मुखावर
- जय अवधूत दिगंबर, जय अवधूत दिगंबर
✦ ✦ ✦
७
- वाडीग्रामी जाउनियाऽऽ, नमूया गुरूपदा
- कृपे हरतो जोऽऽ, नाना आपदा
- माथा टेकूयाऽऽ, नृसिंह स्वामीपदा
- निरखितसे जोऽऽ, कृपादृष्टी सदा
- सद्गद वाचे होऽऽ, त्याचे नामवदा
- रूप पाहुनियाऽऽ, हृदयी मोद सदा
- औदुंबर तळवटीऽऽ, ध्यानस्थ सदा
- भावे प्रदक्षिणाऽऽ, करुनि नमू पदा
- कृष्णदासऽऽ, हृदयी अधीर सदा
- दर्शन करण्यासीऽऽ. श्रीनृसिंहपदा ॥
✦ ✦ ✦
॥ करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆