(पावसनिवासी परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘अमृतधारा’ भावविलासावरील संपादन)
॥ श्री स्वामी स्वरूपानंदाय नम: ॥
अमृताचिया सागरीं | जे लाभे सामर्थ्याची थोरी | ते चि दे अमृत लहरी | चुळी घेतलेया ॥ (ज्ञा.अ. १२/२६)
श्रीस्वामींच्या अमृतमय अंत:करणरूपी परमगहन संतृप्त सागरात भावांदोलन झाल्यावर पृष्ठभागावर जे दृश्य स्वरूपात तरंग उमटले व त्यामुळे जे अमृतबिन्दू ओसंडले त्यांनी धारण केलेले शब्द वा काव्य स्वरूप म्हणजे या अमृतधारा होत. या अमृतधारेचा बारकाईने अभ्यास केला तर ‘मुमुक्षु’ ते ‘मुक्त’ या संपूर्ण साधकीय जीवनप्रवासाचे वर्णन त्यांत आढळेल. त्या अनुषंगाने अमृतधारेतील एकूण १६२ साक्यांपैकी या केवळ ८४ साक्या मूळ क्रम बदलून गुंफल्या आहेत. दुर्बोध भाषेतील कुठलेही संदर्भ वा पाल्हाळ न लावता परमार्थसाधनेतील साररूप चिंतन या साकीसूत्रांत आढळते. अमृतधारेतील साक्यांवर आपल्या मतीने भाष्य करण्यापेक्षा वाचक-साधकाच्या भावानुसार,त्याच्या साधनेतील अवस्थेनुसार त्याची गहनता, महत्त्व साधकांस जाणवेल आणि त्याच्या अंतस्थास स्पर्शांन्दोलित करून पुढील मार्गक्रमणास दिशा अन् बळ देईल व अंती अमृतत्त्वाचा अनुभव देईल. अमृत हे स्वयंसिद्ध आहे,ते कुठलेही मिश्रणाने तयार करता येत नाही तसेच त्याच्या प्रत्येक बिन्दूत तेच संपूर्ण सामर्थ्य बाळगून असते. अमृतधारेच्या उगमात, धारेत व त्या धारेचा शेवटचा बिन्दू हे प्रत्येक शुद्ध अमृतच नव्हे काय! श्रीसद्गुरु कृपांकितांस याच्या भावपूर्ण मननात अमृत-तरंगांवर क्रीडा केल्याचा आनंद खचितच मिळेल!
— सुदेश (१६ एप्रिल २०१६)
✦ ✦ ✦
संतसाहित्य म्हणजे प्रतिभेच्या स्त्रोतातून प्रकट झालेला स्वानुभव! त्याच्या वाचनाचे अंतिम पर्यवसान वाचकांस अनुभूति होण्यात जर झाले तर ते साहित्य वा ते वाचन-मनन यशस्वी ठरेल अन् तशी ताकद त्यात निश्चितच असते.
अनुभव —> भावावस्था + प्रतिभा —> शब्द वा काव्य —> वाचन + मनन —> भावनिर्मिती —> अनुभव
म्हणजेच भावाची अभिव्यक्ति शब्दरूपाने काव्यात होते आणि त्यामुळे ते काव्य त्या भावविश्वात प्रवेश करण्याचे द्वार आहे. संजीवनी गाथेत श्रीस्वामीजी एका अभंगात म्हणतात “भाव-बळे आम्हां हरिचें दर्शन”. भाव हे भक्ताचे बळ आहे किंवा भाव हा इतका बलशाली आहे की तो हरीचे दर्शन करून देऊ शकतो.
याच अनुषंगाने आपण श्रीस्वामीजींच्या “अमृतधारा” या स्फुट काव्यरचनेचा भावाधारे मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपण श्रीस्वामीजींच्या त्या काळातील भावावास्थेशी अल्पसे तरी तादात्म्य पावू शकू व त्या अनुभवाचा अल्पांश तरी प्राप्त करू शकू.
श्रीस्वामींसारखे मितभाषी संत जेव्हा लिहितात तेव्हा त्याचा अर्थगाभा अत्यंत सखोल व विशाल असतो. अमृतधारेचे वैशिष्ट्य म्हणजे
१. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना काव्यस्फूर्ति होणे अशी उदाहरणे विरळाच असावीत.
२. स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्याचे वर्णन जरी अमृतधारेत असले तरीही त्याबद्दल तक्रार मात्र नाही. यातून शरणागति प्रतित होते.
अमृतधारेच्या सुरवातीच्या काही साक्या वाचल्या तर त्या प्रत्येकात स्वानुभव व अनुभव हा शब्द आलेला दिसतो व स्वानुभव-सुधा म्हणजे स्वानुभवाचे अमृत शिंपून भूतलावरील सर्वांना स्वानुभवी बनवीन अशी श्रीस्वामीजींची सदिच्छा त्यांत दिसून येते.
श्रीस्वामीजींनी तरुणपणी जरी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संत साहित्याचा सखोल अभ्यास केलेला होता तरीही अमृतधारा पाहिल्यास या काळात केवळ सोहम् साधनेखेरीज दुसरा आधार त्यांनी घेतलेला नाही हे दिसून येते व केवळ तोच त्यांना आत्मदर्शन करवून देण्यास कारणीभूत झाला हेसुद्धा पुढील साक्यांत सिद्ध होते. पुस्तकी विद्या वा पोपटपंची दूर सारून त्या अनंताच्या प्रांतात श्रीस्वामीजींनी सोहम् साधनेद्वारा अक्षरश: उडी घेतली. शेवटच्या साक्यात अद्वैत तत्वज्ञानाच्या सर्वोच्च अनुभूतीचे वर्णन आढळते, ज्यामुळे श्रीस्वामीजी आत्मतृप्त झाले व पुढील काळात ते आपल्या पत्रव्यवहारात “आत्मतृप्त स्वरूपानंद” असे लिहित असत. यावरून अध्यात्मसाधनेत गुरुप्रणित साधनेचे महत्त्व विशद होते. पण हे लक्षात न घेता सर्वसाधारणपणे बहुतांश साधक आध्यात्मिक वाचनाच्याच जास्त आहारी जातात व त्यातच साधनेपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात व त्यामुळे अनुभूतीस मुकतात असे दिसून येते. दुसरे असे की प्रकृती अस्वास्थ्य असताना पुस्तकी विद्येचा विशेष आठव होत नाही वा ती विशेष उपयोगीसुद्धा पडत नाही तर अंतरंग साधनाच सहायक ठरते असे कळून येईल.
अमृतधारेतील साधकांस उपयुक्त ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:-
श्रीस्वामीजीच्या संजीवनी गाथेतील अभंगांचा अभ्यास करताना शेवटचा चरण आधी वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे कळते व मग सुरवातीपासूनचे चरण वाचल्यावर ते त्या पुष्ट्यर्थ आहेत हे ध्यानात येते. अमृतधारेतसुद्धा याप्रमाणे शेवटच्या काही साक्या वाचल्या तर हे लागू पडते असे ध्यानात येईल.
श्रीस्वामीजीनी भगवतीची उपासना केलेली नसताना अमृतधारेत असलेले जगदंबा, जगन्माता, माताजी असे उल्लेख मात्र प्रज्ञ अभ्यासकांस निश्चितच विचारप्रवृत्त करतील!!
श्रीस्वामीजी अन् जगन्माता जगदंबा:-
श्री बाबूराव पंचविशे (मास्तर), मालाड – मुंबई, ज्यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य पूज्य बाबा बेलसरे यांची श्रीज्ञानेश्वरीवरील निरुपणे लिहून काढली व आज ती आपणांस पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहेत, ते पंचविशे मास्तर, श्रीस्वामीजींचे अनुग्रहित शिष्य आहेत. चित्रकार कै. अनंत सालकर व मास्तर हे घनिष्ठ मित्र. सालकर हे श्रीस्वामींचे अनुग्रहित त्यामुळे त्यांना वाटायचे की आपल्या परममित्राने म्हणजेच बाबूरावांनीसुद्धा श्रीस्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. त्यानुसार मास्तरांना घेऊन ते पावसला गेले. कै. मधुभाऊ पटवर्धन व सालकर हे पण मित्र. मधुभाऊसुद्धा सोबत होते. मधुभाऊंनी श्रीस्वामीजींस विनंती केली की आपण बाबुरावांना अनुग्रह देऊन आपले कृपांकित करावे.
त्यानुसार मास्तर श्रीस्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेले असता श्रीस्वामीजींनी मास्तरांना श्रीरामकृष्ण परमहंसांचे एक पुस्तक हाती दिले व कुठलेही पान काढून वाचा असे सांगितले. ते उघडल्यावर अध्याय ४२(?) मधील राखाल, राम, केदार, तारक, एम. इत्यादी ठाकुरांच्या दर्शनाला जातात त्या प्रसंगाचे वर्णन आले. केदार ठाकुरांची कृपा प्राप्त होण्यासाठी ठाकुरांचे अंगठे धरून बसत असे. ठाकूर आईला (कालीमातेला) सांगत आहेत की याचे (केदारचे) पैशावरील प्रेम नष्ट होत नाही, बाईवरील प्रेम नष्ट होत नाही, आई याला माझ्यापासून दूर कर. मास्तर तर अनुग्रहाच्या इच्छेने श्रीस्वामीजींपाशी आले होते आणि आली तर ही अशी गोष्ट! मास्तरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रूधारा वाहू लागल्या. तितक्यात श्रीस्वामीजी म्हणाले, “असू दे, असू दे, या आपल्या त्या काळच्या आठवणी”. दोनदा हेच म्हणाले. त्यानंतर आपणास दुपारी बोलावितो असे सांगून निरोप दिला. दुपारी मग मास्तरांना श्रीस्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला.
या घटनेमुळे मास्तराचे असे मत आहे की गेल्या जन्मी श्रीस्वामीजी व आपण स्वत: बंगालमध्ये होतो व श्रीस्वामीजींची जगन्मातेची उपासना असावी. तोच धागा पुढे आल्यामुळे जगन्मातेचा उल्ल्लेख अमृतधारेत आला असावा. तसेच श्री स्वामीजींच्या पत्रव्यवहारात सुरवातीस “जय माताजी” असे लिहिलेले असे.
‘जगन्माता म्हणजे ब्रह्म’ असाही उल्लेख श्रीठाकुरांच्या मुखातून आलेला आहे.
याबाबत कै. श्री. म. दा. भट यांनी श्रीस्वामीजींस एकदा प्रश्न केला होता की, स्वामीजी आपण पत्राच्या सुरवातीस “जय माताजी” असे कां लिहिता?.
तेव्हा श्री स्वामीजींनी उत्तर दिले की भिलवडीजवळील भुवनेश्वरी देवी ही श्रीदत्तगुरुंची (श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची) देवी होय. पण आणखी काही खुलासा केला नाही. सर्वांस माहीत आहेच की श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादानेच श्रीस्वामींचा जन्म झालेला आहे!
— सुदेश (१६ एप्रिल २०१६)
॥ गूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆