🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री साईबाबा, शिर्डी
ॐ
॥ श्री साईबाबा ॥
श्री साईबाबा
१
- द्वारकामाई बैसला साई, ती तो भक्तांची हो आई
- वर्णन त्यांचे करु मी काई, भरुनि राहिला ठाई ठाई
- फकीराचा तो वेश आगळा, नाहीच अन्य परि दत्त सावळा
- ‘श्रद्धा सबुरी’ मंत्र आगळा, जीवन करी हा सुखमय सगळा
- समोरची ती अखंड धुनी, येणार्यांची कर्मे जाळुनि
- वैराग्याचे भस्म लावुनि, पाठवी भक्ता करुनि मोकळा
- शुभ्र कफनी, वरी मुंडासे, हाती असे तो चिमटा सटका
- एकचि त्याचा खाता फटका, षड्रिपु म्हणती सटका सटका
- लक्ष्मी पायी अखंड दासी, असुनि मागतो भिक्षा साची
- जणू दर्शवतो जगा सगळ्या, अल्ला मालिक असे केवळा
- लेंडी बागे नंदनवन फुलवी, घालुनि नित्य स्वहस्ते पाणी
- कष्टाचे महत्व सर्वा जाणवि, थोर सुखाचा मंत्र तो जाणी
- प्रेमळ हो त्यांची किती ते वाणी, वेधे ठाव अंत:करणी
- करुणाई अन् प्रेम ते पाहुनि, चट्दिशी डोळ्या आणी पाणी
- हंडीची त्या काय कहाणी, स्वये साई हात घालुनी
- शिजविती पदार्थ रुचकर झणी, प्रसाद देवही वांच्छिती मनी
- चावडीवरची नित्य ती वारी, भक्त बरोबरी छत्र वरी धरी
- जाऊनि तेथे ती स्वारी, आत्मानंदी रमते न्यारी
- वर्णू मी काय फळीचे त्या भाग्य, ज्या वरी साई निजती नित्य
- उशाखालची वीट हो सत्य, वाटे पुंडलिकाची भेट
- श्रीरामाचे प्रेम अन् लळा, म्हणुनी करिती रामनवमी सोहळा
- गुरुस्थानीचा भाव आगळा, शिकविती सर्वा गुरुचि केवळा
- नवविध भक्तिची नव नाणी, अखेर भक्ता जाती देऊनि
- लौकिकदृष्टया जरी तो लुप्त, ठाई ठाई असे तो गुप्त
- वर्णुनि त्याचे धन्य चरित मी, त्याचे पायी शरण मी नित्य,
- त्याचे पायी शरण मी नित्य!
✦ ✦ ✦
२
- बोला ॐ साई
- करा घाई घाई बोला ॐ साई
- शिरडीस जाऊनि सत्वरी ठेवा पायी डोई
- शिरडीची ती विठाई संतोषोनि बाई
- गाईल प्रेमे तुजसी सोऽहं अंगाई
- नाथाघरची उलटी खूण की ही बाई
- नीज त्याने जाई अन् जाग त्याने येई
- अन् भेटेल दिवसराती, अखंड ती विठाई, तुझ्याचि हृदयी
- अखंड आत्मरुप ती बाई
- पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
३
- पहा आली साईंची स्वारी, भिक्षा मागण्या आपुल्या दारी
- उभे असती द्वारी, म्हणती भिक्षा वाढ माई
- चला उघडा मनाचे द्वार, त्यासी करुनिया पार
- अमनाच्या उंबरठयावरुनि, अहं भिक्षा अर्पू त्यांसी
- त्याने भरेल त्यांची झोळी, साई संतोषेल सत्वरी
- मग तो त्रैलोक्याचा हरि, जीवभाव सत्वर हरी
- आशीर्वाद अर्पी सत्वरी, अन् आत्मभाव पूर्ण भरी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
४
- साईंना चिलीम अति प्यारी, पिण्या आली त्यांना लहरी
- चला करु त्वरा सारी, भरु चिलीम ती न्यारी
- भरा जीवभाव तमाखू, ठेवा गुरुबोध ठिणगी वरी
- फुंका सोऽहंभावे त्यावरी, दिसता धूर जीवभावा
- द्यावी साईसी सत्वरी, एका दमातचि करिती पहा, जीवभावाची राख सारी
- पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
५
- साई चालले लेंडी बागे, फुलविण्या आत्मफुले
- कष्टती मेहनत घेती करे, दर्शविती साधनेचे कष्ट घ्या रे, त्याविना उद्धार ना रे
- रोविती रोपे नित्य नवी, जणू गुरुकृपाबीज रोवी
- त्यांसी सिंचन आत्मभावी, बोधामृत पाणी पाजी
- मग भक्ति योग बहरु, त्यांसी येई वरचेवरु
- पूर्ण वाढ होता त्यांसी, आत्मरुप ती फळे धरु
- त्याचे सेवन आपण करु, आत्मतृप्त आपण होऊ
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
६
- पहा साईची ती हंडी, टाकिती भक्तांलागी
- आत, पोळिती त्रिविधतापे अमाप
- आधार घालुनि देती हात, दाबुनि पाहती किती जीवभावात
- जीवभाव तो पूर्ण जाता, आत्मभाव केवळ रहाता
- स्वाद मधुर ब्रह्मानंदाचा, अन् सुगंध आत्मरुपाचा, येता हंडी पहा तयारी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
७
- आली महाशिवरात्र पर्वणी, अज्ञानाच्या या मध्यरात्री
- चला साईच्या दर्शनी, शिरडीस्थित शिवाच्या पूजनी
- स्नान करु शुद्ध भावानी, वैराग्य पितांबर लेवुनि
- पदीपदी नाम गाऊनी, प्रवेशु साईच्या मंदिरी, आपुल्या हृदयाच्या मंदिरी
- भक्ति ज्ञान वैराग्य त्रिदल, वाहू साईच्या शिरकमली
- प्रेमळ पाहुनि साई मूर्ती, अश्रू धार लागे नयनी
- अभिषेका हेचि जल घेऊनि, अभिषेक करा हो त्याचे शिरी
- संतोषोनि शिवस्वरूप साई, ठेवी कृपाकर मस्तकी
- फिटुनि अध:कार अज्ञानी, उजळे पहाट ज्ञान अंत:करणी
- मग ही साधली की पर्वणी, वाटे धन्यता किती मज मनी,
- अंत:करण येई तो हे भरुनि
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
८
- साई साई साई, नित्य मुखी जो गाई
- साई आशीर्वाद लाभुनि, धन्य तिही लोकी होई
- नामाची महति त्या तो, वर्णू कशी मी बाई
- ऐकताचि साई आई, उचलुनि कडे घेई
- ते देखताचि भिऊनि, माया पळुनि जाई
- मग ऐकत साई अंगाई, आत्मरुपी निज ही येई
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
९
- ॐ साई ॐ साई, काम करता मुखी गाई
- साई नाम ऐकताचि, काम त्याचे होऊनि जाई
- जन्मोजन्मी अपुरे असे जे, देहबुद्धीचे ठाण असे जे
- वासनांचे जाळे असे जे, तोडुनि फाडुनि त्वरितचि जाई
- अशी ही अपुली साई आई, नाथपंथी गुरुमाई
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१०
- प्रवेशिताचि त्या पवित्र शिरडी, धाय मोकलुनि माया रडी
- पळता भुई तिज होई थोडी, मारुनि बसे तत्क्षणी ती दडी
- बैसला तेथे साई गारुडी, उघडुनि अपुली नाथ पोतडी
- सोऽहं पुंगी वाजवी हरघडी, माया भुलवुनि हाती पकडी
- पकडुनि तिसी घाली पोतडी, तिच्या तडाख्या जीवा सोडवी
- मग ब्रह्मरस अनुभव घडीघडी, जो जीवा भारी आवडी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
११
- शिरडीस आहे द्वारकमाई, कृष्ण द्वारकेचा बैसला तेथे
- भक्तांची होऊनिया आई, दर्शना करा घाई
- त्रिभुवनाचा राजा बाई, मागता त्या लाजू नका काही
- झोळीत हात घालुनि साई, इच्छिले जे तो वाटीतसे बाई
- गोष्ट त्याची अति हो न्यारी, जे जे मागे ते ते देई
- पण काहीच न मागे जो त्यासी तो, आपुलिये सर्वस्व देई
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१२
- चित्ती धरा साईनाथ, नवविध भक्तिचा हा नाथ
- प्रसन्न होता त्वरितचि देई, नवविधा भक्ति करी सनाथ
- अंतरी फुलता भक्तिकमळ ते, शक्तिचे हो उर्ध्वगमन ते
- रोमांचित अन् अश्रू नयन ते, भक्तिसुखाचा अनुभव देते
- मन त्वरितचि हे उन्मन होते, अन् देहभान त्वरितचि जाते
- कृपा केलिया साईनाथे, भक्ता अशी प्रचित येते
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१३
- साई बैसला सिंहासनी, भक्त हृदयाच्या आसनी
- तेणे भक्त होय तो गुणी, दुर्गुणा न जागा झणी
- जगी वर्ते पवित्र गुणी, धरी कर्म ते दिव्यगुणी
- होय पवित्र अंत:करणी, अंती साक्षात्कार निर्गुणी
- वाटे शांति साकार गुणी, ही तो साईची त्या करणी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१४
- साईराम साईराम, गाता मुखी भक्तां आराम
- त्वरितचि शमे त्यांचा काम, गाठी शांतिचे निजधाम
- ब्रह्मानंदी करी विश्राम, हे तो साईचे त्या काम
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१५
- दर्शना जाता भक्त, साई भडकला तापला
- कठोर शब्द अन् शिव्यांचा, भडिमार तो त्या केला
- पाहुनिया ते दृष्य, भक्त गर्भगळित मनी झाला
- क्षमायाचना करिता, साईचा पारा अधिकचि चढला
- देखोनिया भक्त, केविलवाणा तो हा झाला
- काही न सुचे त्याला, अन् आधार न तो उरला
- लोटांगण घालुनि, चरणी शरण त्वरितचि आला
- देखोनि साई हसला, उचलोनि त्यासी घट्ट पोटाशी धरिला
- अहंभाव गेल्यावरी, साई कृपास्पर्श तो होता,
- त्वरितचि समरस तो झाला, केवळ साईरुप तो उरला
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१६
- घेऊ साईची पालखी, नाचू गाऊ नाम मुखी
- हर्ष मनी झाला अति, पायी चालती मंदगती
- सवे वादये अति गर्जति, बेभान भक्त संगति
- नरनारी पुढे येती, ओवाळीती साईसी आरती
- डोई चरणी ते ठेविती, साईचा कृपार्शिवाद लाभती
- देहभाव पूर्ण विसरती, अन् आत्मानंदी रमती
- ही तो साईची त्या कृति
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१७
- साई किमयागार, करितो किमया अतिशय न्यारी
- येता भक्त त्या गाभारी, दृष्टी रोखतो त्यावरी
- निरखुनि पाहतो अंतरी, भक्तांच्या हृदयांतरी
- दुर्गुण षड्रिपु तेथोनि, हाकलोनि प्रवेशितो अंतरी
- बैसतो ठाण तिथे मांडुनि, अनुभव त्याचा भक्तां येता
- जाई साईरुप होवोनि, स्वये साईरुप होवोनि, दिसे ब्रह्मांडा व्यापुनि
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१८
- पहा धुनी अखंड, वसे द्वारकामाई
- वाट पाहे तेथे साई, अर्पी कोण त्या काई
- जाता भक्त दर्शनी, ज्वाळा उठतसे अंबरी
- अहंकार ज्याचा जितुका थोर, वाढे ज्वाळा तितुकी थोर
- अहंकार राक्षस थोर, लागता जीवाला घोर
- धावा तुम्ही द्वारकामाई, टाका त्यासी त्वरित धुनीत
- त्याने सत्वर तुम्ही पुनित, साई दिसे अतिशय खुशीत
- मग घेऊनि त्याला कुशीत, गोंजारितो बाळही खुशीत
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
१९
- साई माझा मस्त फकीर, नाही त्याला स्वत:ची फिकीर
- भक्तां करिता अंगिकार, करी त्याची अखंड फिकीर
- मग कशासाठी किरकिर, थांबवा सत्वर तुमची पिरपिर
- नका करु काही कुरबुर, धरा श्रद्धा अन् सबूर
- मिळता त्याचे ते हो फळ, होई आशा अति निर्बळ
- फकीराचे जाणता बाळ, पळे दूर अति तो काळ
- पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
२०
- चला साईसी नमुया सत्वरी, जोडोनिया दोन्ही करी
- लक्ष श्रीमुखावरी, जो हासतसे अंतरी
- देखताचि उर माझा भरी, नि:शब्द अंतरी
- रोमांच अंगावरी, गलबले हृदयांतरी
- भान विसरुनिया मी, कोसळलो चरणांवरी
- साई दर्शनाची कथा सारी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
२१
- या साईचि ती माया, न तुळे आईच्या त्या माया
- प्रेम अन् शिकवणी त्या या, करिती धन्य जीवा या
- सारुनि दुर्घट माया, भेटवी देव ठाया ठाया,
- साईकृपेची गत ही सारी
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
२२
- आले जसे ते लिहीले, जणू साईचि सर्व ते वदले
- उणे ते माझे गमले, विनवितो वाचा तुम्ही सर्व हो भले
- वाचिता भाव अंतरी, प्रेम वाढे साईचरणी
- तेणे प्रसन्न साई सगुणी, हे आशीर्वच हो साईचे
- द्वारकेतल्या त्या माईचे
- वाचोनिया सत्वर अनुभवा, बोल हे त्या साईचे
- पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
✦ ✦ ✦
२३
- साई साई साई, आरती मी गाई
- उभा द्वारकामाई, दिसे सामोरी साई
- सुवर्णतबक हाती, त्यात निरांजन ज्योती
- भृकुटी प्रकट ज्योती, नाद कर्णी घणघणती
- रोमांचित काया थरथरती, वायू चिदाकाशी स्पर्शिती
- ओवाळीता आरती, मी तू पण लोपती
- वाटे धन्य मी किती किती, ओवाळीली श्री साईसी आरती
- मज भाग्या नाही मिती, शरण साई चरणी मिठी
✦ ✦ ✦
२४
- शिरडीच्या साईनाथा मी नित्य पूजितो
- प्रेमळ बोल अन् करुणा त्यांची नित आठवतो
- तो साई मजसी अंतरी नित्य जागवितो
- कृष्णदास मनोभावे साईचे दर्शन नित्य घेतो
✦ ✦ ✦
२५
- शिरडीचा हा फकीर, हरतो सर्वांची फिकीर
- दिसता तयारी फकीरीची, त्यासी करतो फकीर
- सर्वस्व त्याला अर्पुनि, कृष्णदास झाला फकीर
✦ ✦ ✦
२६
- शिरडीच्या साईसी मी ढाळीतो हळुवार चवरी
- तेणे तो घालितो हळुवार फूंक मनावरी
- तेणे होय शीतलता मनाची सत्वरी
- सांभाळण्या ती अखंड, कृष्णदास ढाळीतो अखंड चवरी
✦ ✦ ✦
२७
- ॐ साई ॐ साई ॐ साईराम,
- जपा मंत्र नित्य निशिदिनी करता कामधाम
- पुरेल तेणे मनीचा तो सर्व काही काम
- गाठाल मग त्वरितचि तुम्ही शांतीचे निजधाम
- शांती लाभता अनुभवाल मग जो म्हणती आत्माराम
- कृष्णदास म्हणे रमता त्यात झाले तुमचे काम
✦ ✦ ✦
२८
- नित्य निशिदिनी वसती बाबा द्वारकामाई, बाबा द्वारकामाई
- चरणांवरती भावे, चरणांवरती भावे ठेवा जाऊनिया डोई
- भयचिंतादि काळजी सारी मनातुनि जाई सारी मनातुनि जाई
- सर्वतोपरी वाही काळजी साईनाथ आई, अपुलि साईनाथ आई
- शिळेवरी त्या बसुनि सांगती धरा श्रध्दा अन् सबूर
- मिळे तुम्हा जे मनी इच्छिले धरा अल्प धीर
- चरणी त्याच्या करा करा हो करा मन स्थिर
- इच्छा शमवुनि नेईल तुम्हा सुखे पैलतीर
- चला जाऊया शिर्डीग्रामी द्वारकामाईसी सत्वर
- कृष्णदास म्हणे भावे नमुया साईनाथ फकीर
✦ ✦ ✦
२९
- साईनाथ गुरु माझेऽऽ, साईनाथ गुरु माझेऽऽ
- शिर्डीसी फकीर रुप साजेऽऽ, शिर्डीसी फकीर रुप साजेऽऽ
- निंबातळी विराजत सद्गुरुराजे, शिळेवरी साईनाथ विराजेऽऽ
- नित्यजयाच्या मुखी अविरत, ‘अल्ला मालिक’ घोष गाजे
- द्वारकामाई वसतिस्थान भक्तांचे जणू माहेरचि साजे
- अखंड धुनीची उदी येतसे भक्तांच्या काजे
- कृष्णदासा लळा लाविला या नाथपंथी योगिराजे
✦ ✦ ✦
॥ हनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆