🏠 स्वगृह
›
संत दालन
›
योगीराज श्री चांगदेव
ॐ
॥ योगीराज श्री चांगदेव ॥
योगीराज श्री चांगदेव
ॐ
- चांगदेव योगी चौदाशे वर्षांचे, आले व्याघ्रावरी बैसोनिया
- जटाभार शिरी, माळा गळा करी, चाबूक तो सर्प धरोनिया
- सवे शंख भेरी, शिष्य ही अपारी, योग्याचे वैभव, दावितसे
- आले आले आले, आले वेशीवरी, निरोप तो गेला, अलंकापुरी
- निवृत्ती ज्ञानाई, सोपान मुक्ताई, आले आले भेटण्या योगिराज
- मुक्ता म्हणे दादा, चांगा थोर योगिराज, आलासे भेटण्या आपणासी
- थोरा मोठ्या साजेसे, स्वागत जरूर, केले पाहिजे, आपण ते
- कैसे ते करावे, काही ना साधन, विचार अंतरी करीताती
- बैसली होती ती एका भिंतीवर, ज्ञानाई म्हणाली, काळजी नको
- बोले भिंती ना तू जड, चैतन्य परिपूर्ण, चल उड नेई आम्हा, चांग्यापाशी
- नवल ते वर्तले, उडाली हो भिंत, वायुवेगे आली चांगदेवापाशी
- चांग्या पाही आकाशी, भिंत दिसे उडत, वरी बैसले ते चारीजण
- क्षणार्धात आले, चांगदेवापाशी, उतरोनि आली, भिंत धरतीसी
- उतरले चौघे, गेले ते सामोरी, नमुनि आदरे, योगिराजा
- निर्जीव भिंत चालता पाहोनि, वरमला योगी, चांगदेव
- उतरोनि व्याघ्रावरुनि, धरिले चरण, आला ज्ञानाईसी, तात्काळ शरण
- कृपा करी देवा, घेई माझी सेवा, शरण मी आज, तुज जीवाभावा
- सजीव भूतांवर, माझी चाले सत्ता, परि निर्जीवही तुझे अंकित
- ज्ञाना म्हणे त्यासी, जाण चांगदेवा, सोड देहभावा, कळेल खूण
- आत्मसत्ता असे, चराचरी व्यापक, चैतन्य ते ओतप्रोत, अणूरेणू
- देह नव्हे नव्हे तू, आत्मरुप होसी, नाश होई देहा, परि आत्मा अविनाशी
- जेव्हा तू जाणसी, देह ना राखसी, आत्मरुपे अनुभवसी, विश्वाकार
- बोले मुक्ताईसी, शिष्य करी चांगदेवा, ज्ञान देउनिया, हरी जीवभावा
- मुक्ताईने चांगदेवा, केला उपदेश, पटविली खूण, आत्मज्ञाने
- ज्ञान होता पुणतांब्या, घेतली समाधी, अल्पकाळे योगिराज, चांगदेवे
- कथा ही सुरस, येता आठवणीत, वर्णिली ज्ञानाईच्या कृष्णदासे
✦ ✦ ✦
॥ दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆