॥ ॐ श्री चैतन्य योगीराज महावताराय नम: ॥
मानवी जीवन व्यतीत करताना, भगवत्कृपेने जीवास, जीव-जगत्-ईश्वर यांचे स्वरूप जाणण्याची इच्छा निर्माण होते. आपले शिवस्वरूप जाणण्याची इच्छा जीवात निर्माण होणे हेच कृपेचे पहिले लक्षण आहे. शाश्वत सुख व आनंद याबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन ते अनुभवण्याची धडपड जीव करु लागतो. त्यासाठी मार्ग कोणता, साधना काय, असे प्रश्न उत्पन्न होतात.
हिमालयनिवासी जगत्व्यापी स्मर्तृगामी शिवस्वरुप परमगुरु महावतार बाबाजी या जीवांना दिशा व मार्ग दाखविण्याचे कार्य अखंड अविरत करीत आहेत. या कार्याची त्यांची पद्धत मानवी बुद्धिस अनाकलनीय आहे परंतु प्रत्येक जीवास आवश्यक त्या साधनामार्गाचे मार्गदर्शन ते निरपेक्षपणे करीत असतात. ते काय पहातात? तर केवळ जीवाची तळमळ व अंतरीचा भाव!
सर्वसाक्षी असल्याने त्यांना अज्ञात असे या सृष्टीत काहीही नाही व स्मर्तृगामी असल्याने स्मरण करताच त्या त्या स्थळी ते तत्क्षणी अवतीर्ण होतात. जशी बाळाची हाक ऐकून माता त्वरित धाव घेते, तशी आपण सर्वजण बाबाजींना प्रेमाने साद घालूया. स्मर्तृगामी बाबाजी नक्कीच उपस्थित होतील व आपणास बाबाजींच्या कृपादृष्टीच्या अमृतसिंचनाचा लाभ होईलच होईल. चला, आपण सर्वजण अंतरीची आत्मज्योत उजळविण्याचा प्रयत्न करुया.
अज्ञान अंध:कारातून ज्ञानप्रकाशाकडे वाटचाल करु इच्छिणार्या सर्वांना शुभेच्छा!
॥ महावतार बाबाजी प्रेमोत्सव संकल्पना ॥
या विश्वातील समस्त अणूरेणूंना व्यापून असलेले जे चैतन्यस्वरुप आहे, जे नैसर्गिकरित्या सुसंवादी आहे, त्याच्याशी समरसता साधणे ही काळाची शाश्वत गरज राहिली आहे. वास्तविकरित्या तेच चैतन्य आपले मूळ स्वरूप आहे. सुसंवाद हाच निसर्ग-नैसर्गिकता व विसंवाद ही कृत्रिमता आहे. म्हणून जे नैसर्गिक ते शाश्वत व कृत्रिम ते अशाश्वत आहे. त्या शाश्वताशी आपल्याला संवाद साधावयाचा आहे. समान गुणधर्म असलेले अणूरेणू जसे प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या वस्तूत व्यापून/सामावून आहेत, त्याचप्रकारे त्यातील मूळ अस्तित्व, जे शुद्ध चैतन्य, तेच आपले स्वरूप आहे ही जाणीव घेणे हे मानव जन्माचे साध्य आहे. त्या जाणीवेचे भान घेऊन त्या अवस्थेत कायम रहाणे, स्थित होणे हे श्री महावतार बाबाजींच्या कृपेचे फलित आहे. त्या अवस्थेत विश्वातील यच्चयावत घटकांत साहजिकच सुसंवाद वा प्रेमभावना सहजस्थित आहे. अशा अवस्थेत जीवनाचा प्रत्येक क्षण हा प्रेमोत्सवाचा क्षण आहे व जीवांचा सकल विहार हा प्रेमविहारच ठरेल. हाच प्रेमयोग! त्याची जाणीव करुन देणे यासाठी या प्रेमोत्सवाची प्रेरणा श्री महावतार, प्रेमावतार बाबाजींनी दिलेली आहे. या जाणीवेचे भान आल्यावर जीवनाची दृष्टीच पूर्णपणे बदलून या सृष्टीतील सर्व विहार एक आनंदाचा विहार, आनंदाची क्रीडा ठरेल. परमेश्वराचे शाश्वत असलेले हे जे स्वरूप आहे, या शाश्वताकडे पोहोचण्यासाठी अथपासून इतिपर्यंत आवश्यक ती सर्व व्यवस्था श्री महावतार बाबाजी या प्रेमोत्सवात सहभाग घेणार्या सर्वांसाठी करतील व ते त्यांचे अभिवचन आहे.
— कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ कृपावंत अति अगाध किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆