॥ शरणागति - प्रक्रिया, स्वरूप व फलित ॥

शरणागति - प्रक्रिया, स्वरूप व फलित

॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥


'मला जो शरण येतो त्याचा मी उद्धार करतो' हे भगवंताचे वचन आहे. ही शरणागति म्हणजे काय त्याबद्दल हा विचार -- 

 

 नवजात बालक रडू लागते, त्याला माता कुशीत घेते व तत्क्षणी त्याचे रडणे थांबते. रडण्याआधी त्याचे डोळे मिटलेलेच असतात, बाह्य जगाशी त्याचा संबंध आलेला नसतो, तरी ते कां रडते? कारण मातेशी वियोगाची भावना व मिलनाची आस उदित झाली. मातेचा अंश मातेपासून विलग झाला व त्याला परत मातेचा स्पर्श होताच समरसतेची भावना होऊन तो शांत झाला. त्याचवेळी मातेच्या भावविश्वात काय घडले? माझा अंश माझ्या कुशीत आहे या भावनेत मातेच्या मनातही समरसता निर्माण झाली व दोघांच्यातही भाव निर्माण झाला - सामरस्य. पूर्णाचा अंश विलग झाला व परत त्यात मिळाला. मग काय घडले तर पूर्णत्व. पूर्णत्वाची भावना निर्माण झाली. हीच भावना मातेने जर दुसऱ्या कुणाच्या नवजात बालकाला कुशीत घेतले तर येणार नाही. म्हणजेच पूर्णाला अंशाचे ज्ञान आहे. वियोग व संयोग सजातीयत्वातच शक्य आहे. पाणी व तेल या विजातीय द्रव्यांच्या एकत्रीकरणातही वियोग आहे, ते एकजीव होऊ शकत नाहीत, जसे सजातीय द्रव्य - पाणी पाण्यात किंवा तेल तेलात होईल. वियोगात जसे अंशाला पूर्णाचे भान आहे म्हणून वियोगाची भावना आहे व संयोगाची इच्छा आहे. अगदी हाच प्रकार जीवात्मा व परमात्मा यांच्या बाबतीत घडतो.


नवजात बालकात कालपरत्वे जसजसे परिवर्तन होऊन ते मोठे होते, तसतसा मी कुणाचातरी अंश आहे ही विस्मृती होऊन मी पूर्णच आहे असे वाटते. हीच माया! त्याचा पगडा जर कमी होईल तर मी कुणाचातरी अंश आहे ही जाणीव जीवाला होऊ लागते. मग येते वियोगाची जाणीव... मिलनाची आस... तळमळ. जीवात्मा व परमात्मा हे सजातीयच आहेत पण जीवात्म्याभोवती विजातीय आवरण निर्माण झाले आहे, त्यामुळे तो विलगच रहात आहे. मिलन शक्य नाही. वस्त्रात लपेटलेल्या बाळाला कुशीत घेतल्यावरही मातेला पूर्ण समाधान होत नाही जोवर ती त्याच्या शरीरास स्पर्श करत नाही. ज्यावेळी बाळाच्या शरीराचा स्पर्श मातेच्या शरीरास होतो त्यावेळी तिचे डोळे आपोआप मिटले जातात, सर्व जाणीव एकवटते व अगदी हीच क्रिया बाळातही घडते. वियोगातून संयोग झाला, त्याची जाणीव झाली व त्या जाणीवेचे भानही हरपले. परंतु वस्त्राचा अडसर असताना हे जसे शक्य नाही तसेच जीवात्मा व परमात्म्याचे मिलन जीवावरील आवरणामुळे शक्य नाही. संस्कारांनी आलेली बहिर्मुखता यामुळे जाणीव केंद्रापासून ढळली व तिला केंद्राचा विसर पडला. सद्गुरुंच्या कृपाकटाक्षाने तिचा क्षणभर जरी केंद्राशी संबंध आला तर केंद्राचे भान जे लोपले आहे ते येईल व मग जीवाची केंद्राकडे जाण्याची धडपड सुरु होईल. हा शरणागतीचा आरंभ आहे. प्रत्यक्ष सद्गुरु, देव यांच्या समोर किंवा त्यांच्या मूर्तीसमोर किंवा मन:चक्षूपुढे त्यांची मूर्ती कल्पून त्यांना म्हणणे की ‘मी तुम्हास शरण आहे' ही शरणागति अजिबात नाही. त्याचमुळे त्याची प्रचिती अनुभवास येत नाही. जीवाला केंद्राचे भान देणे यापलिकडे सद्गुरु काही करु शकत नाहीत किंवा करत नाहीत. कारण तसे केले तर जीवाचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्यासारखे होईल. आपणास काय पाहिजे हे ठरविण्याचा अधिकार जीवाला आहे. पण आजपर्यंत ‘आपण पूर्ण नसून पूर्णाचे म्हणजे परमात्म्याचे अंश आहोत' हे भान लोपले होते ते परत करुन दिले ही सद्गुरु कृपा. त्यांचा कृपाकटाक्ष. मग प्रवास आपोआपच सुरु होतो. तसा निसर्गच आहे. मी तुझाच अंश आहे, नव्हे तर मी आणि तू एकच आहोत, मग हा वियोग का वाटतो? त्यात काय अडसर आहे? नवजात बालकाला वियोगाच्या भावनेखेरीज काहीच नाही व स्वत: ते मातेच्या कुशीत शिरण्याची धडपड करण्यासही अगदी असमर्थ आहे, पण त्याचे ते आक्रंदनच मातेच्या अंत:करणात कळवळा उत्पन्न करुन त्याला जवळ करते. अगदी हीच अवस्था जर जीवात्म्याच्या ठिकाणी निर्माण होईल तर ती शरणागतीची परिसीमा आहे व ते घडल्यावर परमात्मा तत्क्षणीच जीवात्म्यास कवटाळेल यात नवल ते काय?


विविध आकाराचे सजातीय अंश जर एकमेकांत मिसळले तर त्यात ते पृथ्थकरित्या दाखविता येत नाहीत कारण ते तसे उरत नाहीत, एकरुप झालेले असतात.


अंशाला पूर्णाकडून काही मिळवायचे नाही पण एकरुप व्हायचे आहे. हेच शुद्ध प्रेम आहे. एकरुप झाल्यावर अंश पूर्ण होतो, त्यामुळे त्याला काही मिळवायचे उरतच नाही!


अंश पूर्णात मिसळतो तेव्हा अंशरुपाची जाणीव लोपली व पूर्णत्व आले ही जाणीव घेणारा अंश अनुपस्थित असल्याने घडते केवळ ‘असणे'. हेच शरणागतीचे फलित!!

कृष्णदास (२३.१०.२०११)


॥ ब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा