🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री गोंदवलेकर महाराज
१
- येहेळगावींच्या तुकाईंचा दूत आला गोंदवले ग्रामी
- त्रयोदशाक्षरी संदेश त्यासवे धाडिला नामी
- कलियुगी वाढलासे उन्माद बलाढय षड्रिपुंचा हरामी
- नामापरता उपाय ना सुलभ सज्जना तारील या कामी
- नाम नसे हो शब्दचि केवळ भरलेसे चैतन्य अनामी
- सगुण निर्गुण दोन्ही असे हो दडले या नामी
- परावाणी ध्वनी श्रवण करा मग होईल अति नामी
- नामे नामी तल्लीन होता नुरे काहीच विरामी
- नाम नामी हो एकरुपता हा अभ्यास असे नामी
- नामाच्या नौके या बैसता पैलतीर सुखे आरामी
- संदेश गुरुंचा देउनि ब्रह्मचैतन्य जरी आज गेले निजधामी
- आकार विरता निराकार ते भरले ओतप्रोत नामी
- सृष्टीचे जे मूळ दुजे ना असे एक नामी
- अखंड अविरत जपा सर्वहो मनी धरा संदेश हा नामी
- ब्रह्मचैतन्य स्वामींच्या पुण्यतिथिदिनी आज स्मरण होय नामी
- कृष्णदास नत स्वामीचरणी सहाय प्रार्थितो या नामी
✦ ✦ ✦
२
- ब्रह्मातील चैतन्य साकारले, अवतरले ग्रामी गोंदवले
- रामनाम रोमरोमी भिनले, अजपाजपी रमले
- तुकाईंचा आशीर्वाद लाधले, पूर्णब्रह्म साक्षात्कारी जाहले
- रामनामजप जना बोधिले, नामजपे जना तारियेले
- कृष्णदासे स्वामींसी नमिले, नामप्रेम येण्या प्रार्थियेले
✦ ✦ ✦
३
- गोंदवल्यासी ब्रह्मचैतन्य, असेचि तो नामावतार केवळ
- येहेळगावच्या तुकाईंचा, असे तो परमशिष्य केवळ
- हनुमंताचा अंशावतार, समर्थांचा तो अवतार
- रामनामाचे महत्व पटविण्या, जन्मलासे तो या भूवर
- मूर्ती चपळ बलदंड शरीर, प्रवास केला भारतभर
- तुकाई गुरु भेटल्यावर, गोंदवल्यासी झाले स्थिर
- मुखी नाम हाती काम, हा सर्वां उपदेश सुंदर
- प्रापंचिक शिष्य त्यामुळे, झाले असती त्यांचे अपार
- अन्नदानाची आवड फार, नाम मुखी वारंवार
- सद्भक्त असा भगवंतासी, सांगती ते आवडे फार
- हृदयी रामरायाचे प्रेम अपार, सोडुनी जाता अश्रूंची धार
- निर्गुण नामाचा सगुण चमत्कार, गोंदवल्यासी भक्त पाहती अपार
- श्रीराम जय राम जय जय राम, गोंदवल्यासी भरला बाजार
- या बाजारी मी तो जाता, नाम मुखावर सहजी स्फुरता
- गेलो जरी मी शरीर टाकुनी, नामाकारे जग मी व्यापुनी
- महाराजांच्या या बोलाचा, येतो भक्तां अनुभव फार
- म्हणुनी कृष्णदास सांगे, जाऊया, बसू मंदिरी, करु गजर
- श्रीराम जय राम जय जय राम!
- श्रीराम जय राम जय जय राम!!
✦ ✦ ✦
४
- ब्रह्म आकारले स्थिति, चैतन्याची ही मूर्ती
- देखिली गोंदवल्यासी, ब्रह्मचैतन्य मूर्ती
- रामनामाची महती, पटविली सारे जगती
- मारुतीचाची होय, अवतार हा क्षिति
- सांगायाचे जे होय, म्हणती सांगा मारुतीचे कानाप्रति
- कृष्णदास सांगे कानी, मज दिसो ती ही मूर्ती
- आशीर्वादे त्यांच्या येवो, मज प्रेम नामाप्रती
✦ ✦ ✦
५
- निर्गुण नामातील गुप्त चैतन्य, प्रगटले नामी ब्रह्मचैतन्य
- निर्गुण नाम कारण सगुण, तेणेचि सगुण ब्रह्मचैतन्य
- विश्वी भरले जे अणूरेणूतून, तेचि साकार हे ब्रह्मचैतन्य
- चैतन्याचा त्या होण्या साक्षात्कार, कृष्णदास प्रार्थी ब्रह्मचैतन्य
✦ ✦ ✦
६
- ब्रह्मचैतन्यांनी केला उपदेश नामी, गुंतवा अखंड जिव्हा या नामी
- जरी असा व्यग्र अखंड कामी, चालू द्या अविरत धारा या नामी
- धारेत त्या रमता नामी, वाढे हळुहळु प्रवाह नामी
- होय तेव्हा तो अमनी नामी, कृष्णदासा गमला उपदेश नामी
- रमतो अखंड ब्रह्मचैतन्य नामी
✦ ✦ ✦
७
- गोंदवले ग्रामी ब्रह्मचैतन्य स्वामी,
- रंगले जे नामी निवसती विश्रामी
- उपदेश तुकाईंचा घेऊनिया मनी,
- उपदेश भक्तांसी करीताती नामी
- नाम आणि नामी एकवटले नामी,
- जपता नामी व्हाल उन्मनी
- उन्मनीत देखाल ब्रह्मचैतन्य स्वामी,
- स्वत: तुम्ही स्वामी अन् जगही स्वामी
- येणे रिती होता होईल नामी,
- कृष्णदासे धरिला उपदेश नामी
✦ ✦ ✦
८
- राम राम राम, श्री राम राम राम
- उपदेश अति सुलभ सुंदर धरा मनी, करता करता काम
- नित्य निरंतर मुखी गाता होईल, सुलभ सर्वही काम
- भवदु:खाची वार्ता सरुनि कराल, आत्मरुपी विश्राम
- कृष्णदास जन्माचे सार्थक, गाता मनी श्रीराम
- नामे हृदयी तोषोनिया ब्रह्मचैतन्य, करताती विश्राम
✦ ✦ ✦
९
- स्वामी तुकाईंचा संदेश देती जनी ब्रह्मचैतन्य नामी
- लोकहो रमा त्या अखंड नामी श्रीरामी
- कळवळुनिया मम गुरुंचा संदेश सांगतो निशिदिनी
- नका हो करु या कुचराई कामी
- परब्रह्म तो गुरु हा माझा जरी दिसतो वेड्यावाणी
- संदेश त्यांचा अतिअनमोल अंती पडेल तो कामी
- कृष्णदास उपदेश धरिता कृपे रमला त्या नामी
✦ ✦ ✦
१०
- ब्रम्हचैतन्य, ब्रम्हचैतन्य, स्वामींसी शरण जाऊया
- रामनाम, रामनाम, अखंड गाऊया
- रामा पायी, रामा पायी, काळजी वाहुया
- रामनामे, रामनामे, आनंदी राहुया
- स्वामी तोचि, स्वामी तोचि, दास ते होऊया
- कृष्णदास म्हणे, कृष्णदास म्हणे, सार्थक करूया
✦ ✦ ✦
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆