॥ श्रद्धा, विश्वास व निष्ठा - स्वरुप व फलित ॥

श्रद्धा, विश्वास व निष्ठा - स्वरुप व फलित

॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥


या विश्वातील प्रत्येक मानव हा अध्यात्माची प्रयोगशाळा आहे. नास्तिक वा आस्तिक या दोन्ही प्रकारच्या जीवात श्रद्धा, विश्वास व निष्ठा आहेतच आहेत. मी एखादी गोष्ट मानतो किंवा नाही यात माझी माझ्या स्वत:वर श्रद्धा, माझ्या निर्णयावर विश्वास व बुद्धीवर, कर्तृत्वावर निष्ठा आहे. म्हणजेच अश्रद्धा व अविश्वास या श्रद्धा व विश्वास यांचे नकारात्मक असलेले अस्तित्व व त्यावर निष्ठा आहे. श्रद्धा व विश्वास या बुद्धीवर आधारित आहेत व निष्ठा हे त्यांचे अनुभवाने झालेले परिणत स्वरुप आहे. बुद्धीचे आकलन क्षेत्र त्याच्या प्रगत अवस्थेवर अवलंबून आहे व त्यानुसार त्याच्या श्रद्धा व विश्वास यांचा दर्जा ठरतो. बुद्धी जर स्थूल असेल, तर बाह्य वा दृश्य जगतातील वस्तूंपलिकडे पाहण्याची तिची क्षमता नाही व त्याच अनुषंगाने तिची विचारकेंद्रे ठरतात आणि त्यांच्या प्राप्तीसाठी त्याच धर्तीची श्रद्धा व विश्वास यांच्यावर जीवनप्रवास घडतो. पण तीच बुद्धी जर सूक्ष्म झाली तर बाह्य जगताबरोवरच मूलभूत विचार करण्याची त्याची क्षमता तिला येते. सूक्ष्मात स्थूल अंतर्भूत आहे. विविध वैज्ञानिक शोधांच्या परिणती त्यामुळेच आहेत. पण त्या शोधांची परिणत उपकरणे ही उपभोक्त्याच्या बुद्धीला स्थूलात रमविण्याचेच कार्य करतात. शास्त्राज्ञांची बुद्धी जरी सूक्ष्म असली तरीही तिचे विचारकेंद्र स्थूलाशी निगडित असल्याने ती ईश्वरदर्शनास उपयोगी पडत नाही, तिचे ते प्रगत स्वरुप ईश्वरदर्शनास सक्षम नाही व त्याचमुळे शास्त्रज्ञ आत्मज्ञानी झालेली उदाहरणे बहुतेक नाहीत.


आता ईश्वरदर्शनास आवश्यक अशा श्रद्धा, विश्वास व निष्ठा यांचे स्वरुप पाहू. ईश्वरदर्शनासाठी प्रयत्न करणारा साधक हा सुद्धा एक शास्त्रज्ञच आहे जेो स्वत:च्या अंतर्यामीच्या प्रयोगशाळेत काम करतो. त्याची बुद्धीही सूक्ष्म आहे पण त्याला शुद्धतेची जोड आहे, पवित्रतेची जोड आहे. सुख, शांति, समाधान व आनंद यांचा अष्टौप्रहर ध्यास आहे. बाह्य जगतापेक्षा स्वत:चे स्वरुप जाणण्याची त्याची धडपड आहे. बाह्य जगाच्या स्वरुपाच्या अनुभवाअंती त्याच्या मायिक व भ्रामिक स्वरुपाचा, अशाश्वतेतेचा त्याला पुरेपूर अनुभव आल्याने अंतर्मुख झालेली बुद्धी शाश्वताचा शोध करण्यास उत्सुक आहे. ही ध्येयनिश्चिती करुन त्याच्या जीवनाची वाटचाल सुरु होते. इथे श्रद्धेचा आरंभ आहे. ध्येय शक्य आहे ही भावना म्हणजेच श्रद्धा! यात तीन प्रकार संभवतात.


१) स्थूल जगताच्या अनुभवाअंती अपूर्णतेची खात्री पटून शाश्वताच्या शोधास लागलेला जीव 

२) आत्मज्ञानी, ईश्वरभक्त, संत, सिद्ध यांच्या जीवनावरुन प्रेरणा घेऊन त्यांची स्थिति अनुभवण्याच्या उद्देशाने मार्गारुढ झालेले.

३) ईश्वराच्या किंवा संत सिद्धांच्या अकल्पितपणे कृपेद्वारे आलेल्या काही अनुभूतीने मार्गारुढ झालेले.


तिसऱ्या प्रकारात श्रद्धेला विश्वासाची जोड आरंभीच आहे. पण तो विश्वास स्थायी नाही. श्रद्धेच्या आधारे मार्गक्रमण करताना जीवास शाश्वताचे भान जसजसे येऊ लागते, तसतसा एक विश्वास निर्माण होऊ लागतो. हा विश्वास अनुभवातून, आतून आलेला असल्याने त्याची प्रत ही उच्च दर्जाची असून त्याला चढत्या-वाढत्या दृढतेची जोड आहे. मात्र ही प्रक्रिया अत्यंत हळू, धीम्या गतीने घडणारी आहे. हा प्रवास एकट्याचा आहे, त्यात चढ-उताराचे क्षण आहेत, आनंदाच्या लाटेवर व निराशेच्या गर्तेत नेणारे क्षण आहेत. पण हा प्रत्येक अनुभव, हा प्रत्येक क्षण, विश्वास दृढ करण्यास कारणीभूत आहे. या प्रवासात बुद्धी स्थूलातून पूर्णपणे निवृत्त न झाल्याने, त्याला स्थूलातील अनुभवांना ताडून पहाण्याची व त्यावर विश्वासाची उभारणी होण्याची क्रिया घडते. पण विश्वासाचा तो डोलारा डळमळीत असतो कारण स्थूलातील अनुभव हे जीवाने इच्छिलेल्या अनुकूल व सुखदायी स्वरुपापेक्षा पूर्णपणे विरुद्ध म्हणजेच प्रतिकूल, दु:खदायी असू शकतात व त्यावेळी श्रद्धा, विश्वासाला केवळ तडा जाणे नव्हे तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्रिया तेे विरुद्ध अनुभव करतात. पण हीच, श्रद्धा विश्वासाला दृढ करुन निष्ठेत परिवर्तित करण्याची निसर्गयोजना आहे. म्हणजेच आजवर जी श्रद्धा व विश्वास हा स्थूलातील अनुभवांना धरुन, निगडित करुन आहे, त्यांचा स्थूलाशी असलेला संबंध संपूर्णपणे तोडण्याची क्रिया यात घडते. मग त्यापुढील प्रवास सुरु होतो तो कृपेचा! येथपर्यंतच्या प्रवासातही कृपा होतीच पण यापुढील प्रवासात कृपेची पखरण सुरु होते. जीवाचा, त्याच्या जीवनाचा पूर्ण ताबा ईश्वर घेतो. लौकिक जगातील अनुभवांशी जीव विलग झाल्याने मागण्या संपल्या व आता सुरु होते ईश्वराच्या राज्यात विहरणे. इथे निष्ठेचा प्रांत सुरु झाला. श्रद्धा विश्वासाचा पाया जो आधी लौकिकातील अनुभवांवर उभारलेला होता, तो निरालंब झाल्याने स्थिर, पक्का, दृढ झाला. केवळ ईश्वरासाठी वा शाश्वतासाठी जगणे. हाच यापुढील प्रवास आहे. मग काहीही प्रसंग येवो, श्रद्धा-विश्वासात कमतरता वा निष्ठा भंग नाही. हीच भक्ति, हेच प्रेम व हीच शरणागति! यातच ज्ञानाचा उदय, स्वरुपस्थितिचा अनुभव व मागणे नाही, मागणारा नाही व फलस्वरुप मीच नाही तर तोच, ईश्वरच आहे हा अद्वैताचा अंतिम अनुभव!!


प्रवास कळला... आता चालायचे का?...

कृष्णदास (२६.११.२०११)


॥ हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा