ॐ
॥ पंढरीची वारी ॥
श्री विठ्ठल!!
१
- हृदयी भाव अपार, हृदयी भाव अपार
- दाता सुखसागर, दाता सुखसागर
- वसे भीमातीर, वसे भीमातीर
- चला चला पंढरपूर, रूप देखण्या सत्वर
- उभा विटेवर, तो हा उभा विटेवर
- रखुमाईचा वर, रखुमाईचा वर
- कर दोन्ही कटिवर, गळा वैजयंती हार
- कानी कुंडले मकर, शिव शोभे शिरावर
- शांत भाव नेत्रांवर, मंद हास्य मुखावर
- तेज लावण्य सुंदर, प्रभा नील सभोवार
- राजस सावळे, ध्यान दिसे सुकुमार
- मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
- उठे भाव मनी अपार, लोटे नयनी अश्रूधार
- देहभान विसर, होतो देहभान विसर
- सुखराशी हो अपार, तो हा विठ्ठल सुंदर
- पताका खांदयावर, संगे वारकरी अपार
- कृष्णदास भरभर, चाले वाट पंढरपूर,
- चाले वारी पंढरपूर
- मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
- चाले वारी पंढरपूर, चाले वारी पंढरपूर
✦ ✦ ✦
१
- हृदयी भाव अपार, हृदयी भाव अपार
- दाता सुखसागर, दाता सुखसागर
- वसे भीमातीर, वसे भीमातीर
- चला चला पंढरपूर, रूप देखण्या सत्वर
- उभा विटेवर, तो हा उभा विटेवर
- रखुमाईचा वर, रखुमाईचा वर
- कर दोन्ही कटिवर, गळा वैजयंती हार
- कानी कुंडले मकर, शिव शोभे शिरावर
- शांत भाव नेत्रांवर, मंद हास्य मुखावर
- तेज लावण्य सुंदर, प्रभा नील सभोवार
- राजस सावळे, ध्यान दिसे सुकुमार
- मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
- उठे भाव मनी अपार, लोटे नयनी अश्रूधार
- देहभान विसर, होतो देहभान विसर
- सुखराशी हो अपार, तो हा विठ्ठल सुंदर
- पताका खांदयावर, संगे वारकरी अपार
- कृष्णदास भरभर, चाले वाट पंढरपूर,
- चाले वारी पंढरपूर
- मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
- चाले वारी पंढरपूर, चाले वारी पंढरपूर
✦ ✦ ✦
२
- पायी घेतलीसे वीट, म्हणे घ्या संसाराचा वीट
- कटिवर दोही हात, दावी अकर्त्याची खूणगाठ
- नेत्र मिटुनिया घट्ट, दावी लक्षा अंतरी निकट
- शिरी देवराणा, दावी सहस्त्रारी शिव भेट
- कृष्णदास म्हणे विठू, दावी परमार्थाची वाट
✦ ✦ ✦
३
- आषाढीची वर्षे धार, भक्तिभावा येई बहर
- आनंदाची उठे लहर, दिंडी चाले पंढरपुर
- भावभक्तिची हो धार, सोऽहं उर्ध्व अहं विसर
- रंध्री घेई ब्रह्म भान, सत्रावीचे उलटे नीर
- ब्रह्मांडी ती जलधार, पिंडी सत्रावीचे नीर
- आरंभ तो मूलाधार, विठू असे सहस्त्रार
- कृष्णदासा होय नित्य, वारी ही च अनावर
✦ ✦ ✦
३
- आली आषाढीची वारी, आली आषाढीची वारी
- विेठू उभा विटेवरी, विेठू उभा विटेवरी
- वाट पाहतो गाभारी, वाट पाहतो गाभारी
- पायी चाले वारकरी, पायी चाले वारकरी
- मुखे राम कृष्ण हरि, मुखे राम कृष्ण हरि
- दिंड्या पताका अंबरी, दिंड्या पताका अंबरी
- दिंडी चाले पंढरपुरी, दिंडी चाले पंढरपुरी
- होय आनंद अंतरी, होय आनंद अंतरी
- विठू अंतरी बाहेरी, विठू दिसे जगदाकारी
- मी पणा नासे त्वरी, देहभाना हो विसरी
- कृष्णदास म्हणे वारी, तुटे जन्ममरण फेरी
✦ ✦ ✦
५
- दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली
- मनी विठाई माऊली, मंद चालती पाऊली
- पुढे चाले वीणाधारी, मागे मागे वारकरी
- मुखी राम कृष्ण हरि, मुखी राम कृष्ण हरि
- टाळ मृदुंग तो करि, मुखे नामघोष करी
- लक्ष कळसाचे वरी, विठू लक्षितो अंतरी
- कृष्णदास पंढरपुरी, चाले आषाढीची वारी
✦ ✦ ✦
६
- ठेविले कर कटी, अचल भीमातटी
- अचल श्रद्धा वीटी, उभा असे जगजेठी
- कृष्णदासाची हाकाटी, धावा पंढरपुरी थेटी
✦ ✦ ✦
७
- धरिले कटिवरी हात, उभा विटेवरी ताठ
- झाला विठू प्रगट, चंद्रभागे तट
- पर्वणी एकादशीत, जाऊ आषाढात
- सोडी कटिवरील हात, भक्ता अलिंगन देत
- कृष्णदास जाता वारीत, झाला सर्वांगे पुनित
✦ ✦ ✦
८
- गाठा भीमातीर, गाठा हो सत्वर
- उभा विटेवर, हरि निरंतर
- संसाराचे तीर, जीव हा जर्जर
- प्रेमाचे दो शब्द, न ये कानांवर
- प्रेमासाठी जीव, आसुसला पार
- संसारी ना दिसे, कुठे कणभर
- जीवलग सारे, स्वार्थाचा बाजार
- लोभ मत्सराचे, झंझावात वार
- प्रेमाचा निर्झर, अमृत सागर
- सावळा हा हरि, असे विटेवर
- बोलेना जो तरी, सुखावतो फार
- नाटकी लाघवी, असे किमयागार
- अमृतदृष्टी, निरखिता करुणाकर
- घाव सारे येती, भरुनि सत्वर
- पाहताचि रुप, पाडितो विसर
- दर्शनाक्षणीच, नयनांसी नीर
- विठ्ठल विठ्ठल, वाचेसी उच्चार
- अंतरी उमाळा, येतसे बाहेर
- रोमांचित तनू, विगलित फार
- देहभाव तोही, होई तो विसर
- अंतरी येऊन, भाव गहिवर
- कृष्णदास माथा, टक विटेवर
✦ ✦ ✦
९
- विठ्ठल विठ्ठल गर्जती टाळ,
- वारकरी भक्त झाले घायाळ
- मनी दर्शनाची आस केवळ,
- फास तुटला विषयव्याळ
- आषाढाचे दाटले आभाळ,
- भाव नेत्री अश्रू घळघळ
- कृष्णदास म्हणे जाणती हे,
- विठूरायाचे भक्तचि केवळ
✦ ✦ ✦
१०
- भीमातीरी नाचे, भीमातीरी नाचे
- थवे वैष्णवांचे, थवे वैष्णवांचे
- बोल मृदुंगांचे, टाळ गर्जे साचे
- हरि हरि वाचे, भान ना देहाचे
- सावळया विठूचे, वेध सगुणाचे
- वेध या जीवांचे, विठू दर्शनाचे
- वेड हे भक्तिचे, वेड सावळयाचे
- कृष्णदास म्हणे, काय वर्णू वाचे
✦ ✦ ✦
११
- काय वर्णू वाचे, रुप सावळयाचे
- विठू माऊलीचे, सुंदर ते साचे
- भाव हे मनीचे, फुलती रोमांचे
- नीर नयनांचे, ओघळते साचे
- कल्लोळ टाळांचे, बोल मृदुंगाचे
- भक्तजन नाचे, दृश्य भीवरेचे
- दृश्य हे वारीचे, येता आषाढाचे
- कृष्णदास वाचे, वर्णितो हे साचे
✦ ✦ ✦
१२
- संत चालले पंढरी, मुखी राम कृष्ण हरि
- ध्वजा पताका अंबरी, विठू राहे हृदयांतरी
- टाळ कल्लोळ बाहेरी, भाव कल्लोळ अंतरी
- आली आषाढीची वारी, कृष्णदासा इच्छा भारी
✦ ✦ ✦
१३
- राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि
- दिंडी चालली पंढरी, दिंडी चालली पंढरी
- दिंड्या पताका हो करी, पुढे चाले वीणाधारी
- टाळ दुमदुमती अंबरी, मृदुंग नाद सभोवारी
- तुळसी डोईवरी, माता चालती भरभरी
- भाव ओसंडी अपारी, वेध पंढरी पंढरी
- आली पंढरीची वारी, कृष्णदास त्वरा करी
✦ ✦ ✦
१४
- चला जाऊ पंढरपुरी, पाहू सावळा श्रीहरि
- संगे घेऊ वारकरी, हर्ष अंतरी बाहेरी
- नाम गर्जे मुखावरी, चित्ता व्यापितो श्रीहरि
- करु पापासी बोहरी, पुण्य राशी हो अपारी
- चला वारीसी पंढरी, कृष्णदासा झेंडा करी
✦ ✦ ✦
१५
- चला चला भीमातीरी, वाट पाहतो श्रीहरि
- ज्याचे कर कटीवरी, उभा असे विटेवरी
- नाम येता मुखावरी, मूर्ती साक्षात सामोरी
- कृष्णदासा नयनांतरी, अश्रू ओघळताती सरी
✦ ✦ ✦
१६
- आली पंढरीची वारी, तिची कथा असे न्यारी
- देव दर्शनासी भक्त, शिणताती परोपरी
- परि पंढरीच्या वारी, वाट पाहतो श्रीहरि
- दर्शनासी कोण कोण, येते पाहू पंढरपुरी
- विठूराजा भक्त प्रजा, वारी प्रजा होते राजा
- कृष्णदास पाही मजा, विठू हृदयीचा राजा
✦ ✦ ✦
१७
- विठ्ठल विठ्ठल, टाळ गर्जती मृदुंग
- नाद येता कानावरी, पुलकित अंग अंग
- भक्त झाले पहा वारी, विठू नामात हे दंग
- कृष्णदास घेई संग, गाई विठ्ठल सर्वांग
✦ ✦ ✦
१८
- भक्त झाले नामी दंग, विठ्ठल नामाचा हा संग
- तन मन झाले धुंद, भक्ति चढे अंगा रंग
- होवोनिया भव भंग, भक्त झालासे नि:संग
- कृष्णदासावरी चढे, वारीचा हा भक्ति रंग
✦ ✦ ✦
१९
- भक्त दंग विठू नामी, विठू भक्तांच्या हो ध्यानी
- देवभक्ता मनोमनी, एकमेका धरती ध्यानी
- विठू रुप भक्ता मनी, भक्त रुप विठू मनी
- कृष्णदास वारीची ही, वर्णितो कहाणी
✦ ✦ ✦
२०
- चालती अनवाणी, विठ्ठल गर्जतसे वाणी
- पंढरीसी विठू उभा, पहा देव चक्रपाणी
- माता मुखी दंग, त्याच्या गुण कथा गानी
- कृष्णदासा वाटे नवल, देवा विसर रुक्मिणी!
✦ ✦ ✦
२१
- पुंडलिके भीमेतटी, आणिलासे चक्रपाणी
- मातापिता सेवे तोषे, देव झाला पहा ऋणी
- रुप सुंदर सावळे, विटे पहा हो नयनी
- दर्शन घेता भावे, पुरे नयनांची धणी
- दर्शनासी या विठूच्या, झाली वारीची आखणी
- पुण्य पदोपदी वाढे, कोण करील मोजणी
- संत मांदियाळी संगे, रंगे विठू नामरंगे
- चाले आषाढी वारीसी, कृष्णदास विटे दंगे
✦ ✦ ✦
२२
- विटे उभा चक्रपाणी, सवे नाही हो रुक्मिणी
- देव भक्ताचा तो ऋणी, काय सांगू ती कहाणी
- विसरले मायापाश, भक्त विठूच्या या ध्यानी
- परि विठू झाला दंग, भक्तांच्याही मनी ध्यानी
- विसरला भक्त सारे, विठ्ठलाच्या दंग ध्यानी
- कृष्णदासा भारी नवल, विठू विसरे रुक्मिणी
✦ ✦ ✦
२३
- विसरला वारी भक्त, संसाराच्या सार्या व्यथा
- चालताना गाती मुखी, विठूच्या रे गुण गाथा
- ‘विठ्ठल विठ्ठल हरि’,‘राम कृष्ण हरि’
- सवे ‘ज्ञानोबा माऊली’,‘ग्यानबा तुकाराम’ बोली
- टाळ मृदुंगाच्या संगे, भक्त भक्ति रंगी डोली
- कृष्णदास मुखी गातो, विठ्ठल विठ्ठल ही बोली
✦ ✦ ✦
२४
- विठ्ठल विठ्ठल ही बोली, काय असे त्याची खोली
- हृदयात उतरता, नाम रस गोडी सोडी
- सेविता सेविता रस, आवडी आवडी
- तोडी विषयरस गोडी, वाटे विठ्ठल नाम गोडी
- पदोपदी वाढी वाढी, विठू नामाची ही गोडी
- कृष्णदास विठू वारी, विठ्ठल नाम गोडी
✦ ✦ ✦
२५
- विठ्ठल नाम गोडी, छंद जीवासी आवडी
- सेविता त्याची गोडी, माया पाश सहजी तोडी
- भागवत धर्मे दिली, हाती पंढरपुर गुढी
- कृष्णदास हाती धरी, नेई पुढे ती आवडी
✦ ✦ ✦
२६
- आषाढीच्या विठू वारी, हाती पंढरपुर गुढी
- उभवुनि उंच वरी, नेती विठ्ठल सौंगडी
- गाती नाचती आनंदे, सवे घालिती फुगडी
- एकमेका हृदयाची, हृदयी बैसे सहजी घडी
- जातपात भेद सारे, कसे क्षणातची दवडी
- कृष्णदासा विठू वारी, जीवा भारी हो आवडी
✦ ✦ ✦
२७
- विठू नाम मुखावरी, विठू ध्यान हो अंतरी
- विठू नाम ध्यानी दंग, झाले वारकरी
- विठ्ठल विठ्ठल, नामऽऽ पावन गजरी
- टाळ मृदुंग ते करी, वाट चालती पंढरी
- दिंड्या पताका उंचवरी, स्पर्शो पाहती अंबरी
- कृष्णदास सांगे असे, भक्तिभावाची ती थोरी
✦ ✦ ✦
२८
- भावभक्तिची ती थोरी, पंढरीची असे वारी
- देवा भेटायासी भक्त, चाले पंढरीची वारी
- जप राम कृष्ण हरि, गर्जें उच्चार वैखरी
- सबाह्य अभ्यंतरी भक्त, व्यापुनिया राही हरि
- विसर होतो सहजी अन्य, देहभाव तोही हरी
- कृष्णदास सांगतसे, हीच वारीची हो थोरी
✦ ✦ ✦
२९
- वारीची हो थोरी, वर्णाया मति हो अपुरी
- भक्त धावती पंढरी, देव पहाया श्रीहरि
- पुंडलिके ऋणी करुनि, उभा केला भीमातीरी
- कटीवरी ठेले हात, रुप दिसे विटेवरी
- भक्तिभावा आसुसला मनी, देव तोषतो अंतरी
- दर्शनासी माझ्या पहा, भक्त चालताती वारी
- दर्शनासी येता द्वारी, देऊ काय चिंता भारी
- भक्त माझे भोळे भारी, ना भुलायाचे सहजी परि
- कृष्णदास सांगतसे, विठू देवाची हो थोरी
- मागतो जो ‘मी’पणा, त्यासीच विठू हरी!
- हीच वारीची हो थोरी, हीच वारीची हो थोरी
- अनुभवाया सत्वरी हो, चाला पंढरीची वारी,
- चाला पंढरीची वारी
✦ ✦ ✦
३०
- विठ्ठलाच्या ध्यानी, झाले जन दंग
- विटेवरी उभा, दिसे पाडुरंग
- सावळया विठूचा, निळा निळा रंग
- भुलवितो जना, घडताचि संग
- चढवितो मना, कैसा भक्तिरंग
- कृष्णदास रंगुनिया गातो, विठूचे अभंग
✦ ✦ ✦
३१
- मनी विठू भक्तिचा, चढलासे रंग
- जनसागर वारीसी, दिसे हा अथांग
- संगे गर्जे टाळ, बोलतो मृदुंग
- नाद रमवितो, करी जना धुंद
- अचल विटेसी कटी, हस्त अभंग
- नाचवितो भक्तां, कैसा पाडुरंग
- मनी झाले सर्व, विठू ध्यानी दंग
- कृष्णदासा चढे, विठू भक्ति रंग
✦ ✦ ✦
३२
- विठ्ठल विठ्ठल, गर्जती टाळ
- विटेवरी विठू मनी, हसतो खट्याळ
- खट्याळ अति परी, असे लडिवाळ
- विठू स्मरणी भक्त, हृदयी घायाळ
- स्मरणी सहजी सुटती, विषयव्याळ
- कृष्णदास म्हणे घडे येता, वारीची वेळ
✦ ✦ ✦
३३
- वारीची वेळ झाली, चला उठा जन
- विठूसी लक्षिता, नाही थार्यावर मन
- टाळरंगे मन डोले, नाही देहभान
- मृदुंगाच्या थापे येई, आनंदा उधाण
- लगबग लगबग, चाले वारकरी जन
- कृष्णदास चालता, विठूकडे मन
✦ ✦ ✦
३४
- विठूकडे मन, चालता ना भान
- शुद्धीवर नाही तन, आनंदा उधाण
- भक्तिच्या वाटे, चालता बेभान
- कृष्णदास म्हणे जन, सहजी उन्मन
✦ ✦ ✦
३५
- सहजी उन्मन, गाई तन मन
- पंढरीची वाट चाले, वारकरी जन
- जप ध्यानी बैसता जे, नावरिते मन
- टाळ मृदुंगाच्या संगे, त्याचे विस्मरण
- विठूच्या भक्तिची, असे भक्ता देण
- कृष्णदास सांगे त्याचे, भक्ति हे कारण
✦ ✦ ✦
३६
- भक्ति हे कारण, वारी धावे जन
- विठूचे लक्षिती, विटेवरी चरण
- सावळया विठूचे, गाती गुणगान
- विठू ध्यानी दंग, तन अन् मन
- योगमार्ग प्राप्ति, सहजीच जाण
- कृष्णदास वारकरी, अनुभवी खूण
✦ ✦ ✦
३७
- अनुभवी खूण, नाही संशया कारण
- वीटेसी लक्षिता, मनासी उन्मन
- सावळया विठूचे, अचल चरण
- अचपल मनासी, घालिते वेसण
- भागवत धर्मे, दिली आम्हा देण
- कृष्णदास चाले वारी, संशया ना ठाण
✦ ✦ ✦
३८
- संशया ना ठाण, मनासी विश्राम
- सावळा विठूचि, असे सुखधाम
- पंढरीसी मांडिले असे, विटेवरी ठाण
- वारीसी ध्यानीमनी, तोचि प्रतिक्षण
- व्यापुनिया घेतो, नकळत तनमन
- कृष्णदास हृदय, झाले सुखधाम
✦ ✦ ✦
३९
- झाले सुखधाम, चित्तासी आराम
- वारकरी विठू ध्याता, रंगले ध्यान
- निश्चळ मन, निवांत तन
- संसाराची नुरे, काही आठवण
- भक्तिसुखाची, उघडली खाण
- कृष्णदास लुटतो, सर्वां पाचारण
✦ ✦ ✦
४०
- सर्वां पाचारण, विठूच्या पंढरी
- भक्ति नवनीत, आयतेच करी
- मंथनाचे कष्ट, निरविले हरी
- घ्या हो लुटुनिया, चव त्याची न्यारी
- चला चला चला, जन हो पंढरी
- कृष्णदास सार्या, जनांसी हाकारी
✦ ✦ ✦
४१
- जनांसी हाकारी, लुटा लुटा पेठ
- पंढरीसी विठूने, भरविला हाट
- भक्तिसुख पेठ, काय वर्णू थाट
- सेविता सेविता, अपुरेचि पोट
- दामाची तेथ, नाही कटकट
- शुद्ध भाव केवळ, मूल्य ते चोखट
- विटेवरील सावळयाचा, ना येई कधी वीट
- कृष्णदास पाचारितो, करितो बोभाट
✦ ✦ ✦
४२
- करितो बोभाट, धरा सावळयाची वाट
- भीवरेच्या तीरी, उभा जो निकट
- चरणांसी धरली, अचल ती वीट
- चालवितो भक्ता, परमार्थाची वाट
- श्रम ना चालण्याचे, शीण ना फुकट
- भक्तिसुख लोणी, आयतेच ताट
- सेवा मेवा नका दवडू, संधी ही फुकट
- कृष्णदास सांगे धरा, वारीची वाट
✦ ✦ ✦
४३
- वारीची वाट, सोपी पायवाट
- क्षणोक्षणी विठूचे, स्मरण दाट
- विसरवी भक्तां, संसाराचा रखरखाट
- वर्षितसे भक्तिधारा, प्रेमसुख ते अवीट
- प्रेमसुख गोडी, सेविता चोखट
- घडे पहा कैसे, नवल अचाट
- देहासह विश्वाचा, घेवुनिया घोट
- कृष्णदास म्हणे विठू, वीटेसी ताठ
✦ ✦ ✦
४४
- वीटेसी ताठ, विठू पंढरी निकट
- घेण्या त्याची गाठ नाही, कुणा हो अटक
- सावळयाची घेता, भक्तिभावे भेट
- मायापाश सारे, तुटती तटातट
- मुक्त होतो वारकरी, मग आनंद अवीट
- सावळयाची पंढरी, मुक्तिची पेठ
- या रे या रे पाचारितो, करुनि बोभाट
- सावळ्या विठूचा, कृष्णदास भाट
✦ ✦ ✦
४५
- सावळया विठूचा, संग किती बरा
- घेईल जो कुणी, विसरे घरदारा
- सावळ्या विठूचा, लागता भक्ति वारा
- उडवितो पाचोळयागत, मायेचा पसारा
- सावळ्या विठूचे, ध्यान करील जो खरा
- सहजीच जाईल, सुखे सहस्त्रारा
- कृष्णदास सावळया विठूचा भक्त खरा
- नित्य त्याच्या कृपे रमे सहस्त्रारा!
✦ ✦ ✦
४६
- सावळया विठूची, काय सांगू मात
- विश्वावरी त्याच्या, कृपेचा असे हात
- कृपा होता कोण अडके, मायापाशात
- भक्तजन घेती, अनुभव साक्षात्
- उभा असे पंढरी, विटे गाभार्यात
- व्यापुनिया राही, अखिल भक्त हृदयात
- असता कृपा हस्त, अन् निरंतर साथ
- कृष्णदास म्हणे काय, दु:खाची मात
✦ ✦ ✦
४७
- दु:खाची मात नुरे, जाता पंढरीत
- कृपाछत्र उभवुनि असे, पंढरीचा नाथ
- संसाराची नुरे वार्ता, भावाचे आर्त
- भक्त मनीचे पुरवितो, सारेचि अर्थ
- चला चला वारी वाटे, करा जीवनाचे सार्थ
- कृष्णदास म्हणे नातरी, जीवन हे व्यर्थ
✦ ✦ ✦
४८
- जीवन हे व्यर्थ, ना साधे परमार्थ
- विठूभेटी ना होई, जीव जरी आर्त
- भक्ताचे आर्त देव, प्रकटला पंढरीत
- दर्शनासी तेथ, काही नाही हो वेचत
- वत्साचे मिसे, दुभते घरात
- पुंडलिकाचे मिसे, परब्रह्म पंढरीत
- भक्तभेटीसी विटेवरी, सर्वकाळ तिष्ठत
- कृष्णदास सांगे भेटीसी, चला पंढरीत
✦ ✦ ✦
४९
- चला पंढरीत, देव असे हो तिष्ठत
- भेटीलागी जाता तेथ, असे सर्व हित
- डोळे मिटून विटे उभा, सोंगाडया अनंत
- लक्ष ठेवुनि सारे असे, नीट त्रिभुवनात
- दूर जरी फार तरी, हाकेच्या अंतरात
- कृष्णदास म्हणे भेटे, पोहोचता हाक हृदयात
✦ ✦ ✦
५०
- हाक हृदयात, अन् विठू हृदयात
- उठता घुमते, विठूच्या कानात
- विठू तोषतसे, मनातल्या मनात
- भक्तालागी माझे स्मरण, होते हृदयात
- तोषता विठू, तोष भक्त हृदयात
- कृष्णदासा शिरी असे, सावळयाचा हात
✦ ✦ ✦
५१
- सावळयाचा हात, असे कटीवरी
- समचरण ताठ, दिसे विटेवरी
- देवराणा शिव, असे शिरावरी
- रुप कैसे शोभे, शोभे विटेवरी
- रखुमाई नाही, नाही बरोबरी
- मिटल्या नेत्रांनी, पाहे अंतरी
- मूकपणे उभा, समाधान मुखावरी
- सांगतसे काय, ध्यानी घ्या हो परोपरी?
- राहुनिया अचल जो, माये पाठ करी
- उफराटी दृष्टी, जाय अंतरी
- वामसव्य वारा, समसमान जरी
- सुषुम्नेतुनि चाले, पंढरीची वारी
- पोहोचता मग, तुम्ही सहस्त्रारी
- मी-तू पणा तेथ, नाही तिळभरी
- डुंबाल तुम्ही, मग सुखसागरी
- हीच हीच हीच, पंढरीची वारी
- हेचि दाखवाया उभा, भीवरेच्या तीरी
- कृष्णदास सखा, सावळा श्रीहरी
✦ ✦ ✦
५२
- सावळा श्रीहरी, असे करुणाकरी
- भक्तिसी आसुसला, वाट पाहे भीवरेतीरी
- कृपावर्षावाची त्याच्या, वर्णू काय थोरी
- नेदी भक्ता बुडु, संसारसागरी
- वारीसी चालता मुखे, राम कृष्ण हरि
- कृष्णदास म्हणे डोले, विटेवरी हरी
✦ ✦ ✦
५३
- विटेवरी हरी, अन् मनामध्ये हरी
- दंग होता मनावरील, आघात निवारी
- दु:ख भार उतरता, येई शीतलता सारी
- कृष्णदास म्हणे सुख, देतसे वारी
✦ ✦ ✦
५४
- देतसे वारी, सुख परोपरी
- भक्तकाज पुरवितो, सावळा श्रीहरि
- हरि हरि म्हणता, भवदु:ख ते हरी
- कृष्णदास लक्षी त्यासी, चातकापरी
✦ ✦ ✦
५५
- चातकापरी, लक्षी मेघ अंबरी
- विठूभक्त वारकरी, चाले पंढरी
- भक्तिसुखा आसुसला, भक्त अंतरी
- भक्तिप्रेमा आसुसला, सावळा श्रीहरि
- हरि हरि हरि नाम, होतो गजरी
- आषाढीचे मेघ, दाटती अंबरी
- शीतल मन होता, वर्षताती सरी
- कृष्णदास चिंब होत, भावलहरी
✦ ✦ ✦
५६
- भावलहरी अन् सुखलहरी
- पायघड्या पंढरीच्या वाटेवरी
- विठू नाम शीतल, वारा सभोवरी
- विठू ध्यान मंद, सुगंध धुंद करी
- आवरिता नावरे भाव, हृदयकुहरी
- कृष्णदास पाऊले, चाले पंढरी
✦ ✦ ✦
५७
- चाले पंढरी, लक्षी सावळा श्रीहरि
- आषाढात वारकरी, विठू गजरी
- डोलते तन, थाप मृदुंगावरी
- डोलते मन, हरि नाम गजरी
- देवसुरगण दाटी, झाली अंबरी
- सुख स्वर्गी नाही त्यांना, जे हे भूवरी
- सावळा खट्याळ कसा, लबाड हरि
- अचल वीटे परी, बोलावी पंढरी
- मूकपणे खेचितो, लावुनि दोरी
- कृष्णदास म्हणे, भक्तां ओढी पंढरी
✦ ✦ ✦
५८
- ओढी पंढरी, जरी कर कटीवरी
- अकर्त्याची खूणगाठ, दावितो बरी
- आषाढाचा मास येता, चमत्कार घरोघरी
- हरि दिसे जनी मनी अन् सभोवारी
- नकळत चाले पाय, वाट पंढरी
- भक्ता ध्याय विठू राहुनि, उभा विटेवरी
- मी नाही मी नाही, बोलाविले पंढरी
- लबाड अति खट्याळ, सावळा श्रीहरि
- तान्हुल्याची माय, जैसी क्रीडा करी
- कृष्णदास माय, तान्हुला श्रीहरि
✦ ✦ ✦
५९
- तान्हुला श्रीहरि, नांदे नंदाघरी
- क्रीडा करी बाळ गोपाळ, घेऊनि बरोबरी
- द्वापारीच्या खेळा, लाचावला जो हरि
- कलियुगी आला पहा, भीवरेच्या तीरी
- बाळगोपाळ अवतरले सारे, झाले वारकरी
- कृष्णदास जुना, सखा श्रीहरि
✦ ✦ ✦
६०
- सखा श्रीहरि, झाली दु:खा बोहरी
- पंढरीच्या वाटे, उल्हास अंतरी
- मागण्यासी नाही नाही, आज तुझ्या दारी
- गर्जताती वैष्णवांचे, वीर भीमातीरी
- घेणे-देणे जरि असे, विठू तुझ्या करी
- भक्तिसुखे बांघला, वश केला प्रेमभरी
- हरि हरि हरि, कानी ऐकता गजरी
- प्रेममुग्ध पहा झाला, डोलतो हरि
- कृष्णदास म्हणे आश्चर्य, भक्तिची ती थोरी
- नकळत कटी कर, गेला पहा वरी!
✦ ✦ ✦
६१
- नकळत कटी कर, गेला पहा वर
- देव नव्हे देव नव्हे, भक्तचि थोर
- भीमातीरी विटेवरी, सावळा सुंदर
- तोचि विठू पूजा घेतो, पहा घरोघर
- भोळ्या भावा भुललासे रखुमाईचा वर
- विसरला भार्येसी रखुमाई जी सुंदर
- वैजयंती माळा गळा, जरी ती सुंदर
- भक्त भृगू लाथ, मिरवितो बरोबर
- शिव जपे हरि हरि, त्यासी वाही शिरावर
- दावितो भक्त माझा, मी वाही डोईवर
- कृष्णदास भक्त ठेवी, माथा विटेवर
- पहा पहा विठू राजा, घेई डोईवर
✦ ✦ ✦
६२
- चहूकडे गर्जे घोष राम कृष्ण हरि
- टाळ मृदुंग गजरात नाचती ते वारकरी
- देहाचे ना भान कुणासी रंगले अंतरी
- विठूरायाच्या दिंडीत कृष्णदासाची, पताका उंच वरी
✦ ✦ ✦
६३
- कटिवरी हात अन् पाय विटेवरी
- मिटले ते नेत्र परि हास्य मुखावरी
- कृष्णवर्णी कृष्ण तो उभा गाभारी
- नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवरी
- राम कृष्ण हरि म्हणता जीवभाव हरी
- कृष्णदास म्हणे विठू दर्शनाची कथा न्यारी
✦ ✦ ✦
६४
- विठूमय झाले सर्व वारकरी दिंडीत
- वैष्णवांचे भार आज उतरले पंढरीत
- राम कृष्ण हरि मंत्र सर्वामुखी गर्जत
- टाळ मृदुंगाने अवघी पंढरी दुमदुमत
- राउळात विठूराय हसतो खुशीत
- भक्त पहा आले माझे भेटण्यासी धावत
- भक्त हृदयी तडफड, विठू हृदयी धडधड
- दर्शनासी राउळात अतोनात गडबड
- गाभारी ते येता भक्त अंतरी ते सद्गदित
- देहभान विरुनिया आत्मभाव उचंबळत
- विठूपायी देता मिठी, जीवभावा होय तूटी
- कृष्णदास म्हणे ती चि, भक्तांसी विठूची भेटी
✦ ✦ ✦
६५
- लाल लाल अंगरखा, पितांबर भरजरी
- रेशमाचा मुलायम, शेला शोभे त्यावरी
- सुवर्ण मौक्तिक माळा, गळा भरल्या अपारी
- अनुपम वैजयंती, विलसे माळ त्यावरी
- कुंडले मकर, शोभती कानावरी
- कौस्तुभ मणी असे, विराजित कंठावरी
- चंदनाचा तिलक उर्ध्व, शोभतसे भाळावरी
- रत्नजडित सुवर्णमुगुट, झळाळतो शिरावरी
- पहा पहा कसा माझा, विठूराय नृपापरी
- कृष्णदास म्हणे पहा, शोभतसे विटेवरी
✦ ✦ ✦
६६
- विठूरायाच्या दिंडीत नामघोष गर्जतो
- टाळमृदुंगाच्या तालावरी वारकरी नाचतो
- दिंड्यापताका कळप अंबरी झेपावतो
- देवसमूह नभींचा जलधारा वर्षवितो
- भावभक्तिचा भक्तिचा कल्लोळ उसळतो
- विठू सावळा सावळा हृदयी सुखावतो
- मेळा भक्तांचा दर्शना राऊळी दाटतो
- विठूपायी तो प्रेमाने मिठी घालतो
- माथा टेकिता टेकिता भान हरपतो
- कृष्णदास हा दिंडीचा अनुभव वर्णितो
✦ ✦ ✦
६७
- सुंदर ते भीमातीर, चंद्रभागेची ती कोर
- तीरी वसे पंढरपुर, विटे विठाई सुंदर
- कर दोही कटिवर, समचरण विटेवर
- भावभक्तिचा आकार, झाला सगुण साकार
- कृष्णदास भेट घेता, अनुभव निराकार
✦ ✦ ✦
६८
- विठूराय पहा कसा हसतो डोळे मिटुनि
- अंत:करणाचा ठाव कसा घेतो सहजी वेधुनि
- भेटताचि टाकितो भान कसे हरपुनि
- कृष्णदास म्हणे घ्या अनुभव, वारीसी एकदा जाऊनि
✦ ✦ ✦
६९
- विठू उभा ताठ, कटि ठेवोनिया हात
- म्हणे भरलासे हाट, जेवा भरोनिया पोट
- विषयांचा घ्या हो वीट, मग आनंद अवीट
- कृष्णदास हा चोखट, सेवी अमृताचा घट
✦ ✦ ✦
७०
- पायाखाली धरली वीट, परि काय वर्णावा तो थाट
- धरी कटिवरी हात, परि कर्ता तो एकट
- गिळिले असे त्याने, सारे ब्रह्मांडासकट
- कृष्णदास हा फुकट, कर्ता विठूचि चोखट
✦ ✦ ✦
७१
- उघडी नेत्र विठूराया. जमले भक्त राऊळा या
- करु नको वारी वाया, भाव घेई जाणुनिया
- वाजविता सोऽहं टाळी, गेला पण तुझा वाया
- कृष्णदासे साधुनि संधी, विठूसी लाविले लक्षाया!
✦ ✦ ✦
७२
- ध्यान धरिती बसुनि सारे, परि विठू उभा भीमातीरे
- ध्यान धरिले उभ्या उभी, बैसोनिया राहू नका रे
- कृष्णदास उघडुनि कपाट, ब्रह्मरंध्री विठू अवीट!
✦ ✦ ✦
७३
- मी तो ठेविले हात कटि, माया चालवि जगरहाटी
- बोल नको माझ्यापाठी, मी तो उभा सुखे विटी
- कृष्णदासे पायी मिठी, संसारासी झाली तूटी
✦ ✦ ✦
७४
- पंढरीसी पांडुरंग, विटेवरी उभा दंग
- निर्गुण तो भावे केला, भक्ते सगुण श्रीरंग ॥
- एकादशी आषाढीची, वारी पोहोचली पंढरी
- दर्शनासी राउळासी, अतोनात आज रांग ॥
- विठ्ठलाच्या नामघोषा, टाळमृदुंगाचा संग
- सवे डोलता नाचता, भक्तिभावा चढे रंग ॥
- भाव मनी दाटुनिया, पुलकित अंग अंग
- दर्शनाने फिटे पांग, भवदु:खा होई भंग ॥
- सावळीच मूर्ती परि, नीलवर्ण दिसे रंग
- कृष्णदास मनी आज, विठ्ठलाच्या ध्यानी दंग ॥
✦ ✦ ✦
७५
- डोळे मिटून उभा ठेवून कटीवरी हात
- विटेवरी उभा दिसे पंढरीचा नाथ ॥
- छान वैजयंती माळा रुळते गळयात
- परि छातीवरी मिरवितो भृगूची लाथ ॥
- नाम घेतो भक्तांचे मिटल्या ओठात
- वाट पाही भक्तांची मिटल्या डोळ्यात ॥
- क्षेम द्याया उतावीळ परी कटीवरी हात
- विटेवरी उभा परी फिरे त्रिभुवनात ॥
- मिटले डोळे तरी हसे कसा गालातल्या गालात
- निर्गुण केला सगुण ही भक्तिची मात ॥
- लबाडाला ओळखितो पूरेपूर मनात
- कृष्णदास धरितो त्याचे चरण हृदयात ॥
✦ ✦ ✦
७६
- रुसलासी काय विठूराया रखुमाईवर
- रागावुनि ठेविले दोही हात कटिवर
- चालायाचे नाही म्हणुनि पाय विटेवर
- पाहायाचे नाही म्हणुनि नेत्र मिटुनिया वर
- परी फसलासी देवा, हास्य दिसे मुखावर
- कृष्णदास म्हणे हा राग, लटिकाचि तर!
✦ ✦ ✦
७७
- वेशीवरी आला, वारकरी मेळा
- विटेवरी सुखावला, विठ्ठल सावळा
- भक्ते ना केला कधी, वारीसी कंटाळा
- भाव विटेवरी, दाटला गोपाळा
- कृष्णदास म्हणे पहा, भक्तिची कळा
- विटेवरी विठू आज, रडे घळा घळा!
✦ ✦ ✦
७८
- हरि विठ्ठल हरि विठ्ठल, छंद घेई नामाचाऽऽ
- डोल येई, डोल येई, पहा हृदयाचाऽऽ
- सेविताऽऽ गोडीऽऽ, अनावर वाचाऽऽ
- छंद घेई मनऽऽ, विठू सावळयाचाऽऽ
- कृष्णदासा छंदऽऽ, लागला नामाचाऽऽ
- विटेवरी डोलतोऽऽ, विठू पंढरीचाऽऽ
✦ ✦ ✦
७९
- वेशीवरी आला, वारकरी मेळा
- भाव मनी फुलला, अता आगळा
- लवकरी पाहीन मी, विठू सावळा
- उमलवि हळू हळू, हृदय कमळा
- वार्यासवे गेला गाभारी, गंध परिमळा
- हुंगितो जो अखंड, भाव परिमळा
- भावलुब्ध भ्रमर, पहा तात्काळा
- कृष्णदास हृदय रुंजी, विठू सावळा!
✦ ✦ ✦
८०
- विठूचे विटेवरी का हो बंद डोळे?
- अंतरी निरखितो कुणा काय कळे?
- भक्ताचे रुपवेश त्यासी, कधी ना कळे
- आकळितो मी केवळ, केवळ भक्तिबळे
- हुंगितो नासिके भाव परिमळे
- ऐकितो श्रवणी नामघोष तळमळे
- कृष्णदास म्हणे जरी संदेश आकळे
- विठू विठू विठू भेटे, त्यासी तात्काळे
✦ ✦ ✦
८१
- विठूचेऽऽ हात, का हो कटीवरी?
- जाणवले कधी का, कोणा अंतरी?
- विठू पहा विटेवरी, देई ललकारी
- चला चला भक्तहो, या हो लवकरी
- म्हणतो पहा मी, पहा भीमातीरी
- जखडले हात भक्ता, येई लवकरी
- बद्ध झाला स्वये तो, ना उपेग भेटीवरी
- विचार करी जो असा, फसविलाचि खरी
- बालक गोजिरे सामोरी, ठेवुनि कर कटीवरी
- पाहताचि काय घडे तुम्हा अंतरी?
- धाव घेई उचलाया शिवताती ना करी?
- परि पहा काय घडे घडे भीमातीरी
- नाटकी नाटकी नाटकी श्रीहरि
- काय करी लीला पहा पहा विटेवरी
- कृष्णदास विठू भेटी शिरता गाभारी
- उचलले कर पहा घेई डोईवरी
✦ ✦ ✦
८२
- विठूने ठेविले कटीवरी करा
- विटेवरी उभा पहा उभा भीमातीरा
- तुम्हासाठी सगुण झालो रे साकारा
- भेटीसाठी ये रे ये रे, ये रे भीमातीरा
- करशील जे जे तू, पूजा उपचारा
- करीन ते ते मी, भावे स्वीकारा
- कृष्णदास उभा पुढे, भक्तिविभोरा
- नमितो विठ्ठला केवळ, जोडुनि दो करा
✦ ✦ ✦
८३
- विठूचे चरण का हो विटेवरी?
- नित्य जो पहुडे क्षीरसागरी
- भक्त जरी जाई बुडाया, भवसागरी
- धाव घेवुनिया पहा, आला विटेवरी
- कृष्णदास म्हणे ज्याचा, माथा विटेवरी
- तारी तारी तारी, त्यास स्वये श्रीहरी
✦ ✦ ✦
८४
- भक्त होउनि वारीकर, आला दर्शना भीमातीर
- ठेवुनि कटी कर, निरखितो रखुमाईवर
- विठू उभा विटेवर, पाहू काय करतो बरं
- भाव माझा जाणितो का, विटेवरील सावळा सुंदर
- भक्ता परिक्षितो नित्य, करुनि अंगा वारावार
- परीक्षीता आज भक्तवर, धडधडले विठू अंतर
- कृष्णदास म्हणे पहा आज, वीट करी थरथर!
✦ ✦ ✦
८५
- भक्त मेळा वेशीवर, आनंदला रखुमाईवर
- पाचारी रखुमाईसी, ये ग ये ग लवकर
- पहा माझा बडिवार, व्यापियेले भीमातीर
- पोहोचते ना नजर, आहे ना मी खराच थोर?
- रखुमाई बोले विठ्ठला, अससी तू लबाड चतुर
- पाय ठेवुनि विेटेवरी, राहिलासी तू स्थिर
- परि चालत चालत आले, वारकरी भीमातीर
- कृष्णदास म्हणे सांगे विठूसी, नव्हे नव्हे तू, भक्तचि थोर!
✦ ✦ ✦
८६
- लेकरूऽऽ थोर, मायेसीऽऽ, बडिवार
- भक्तऽऽ थोर, विठूसीऽऽ, बडिवार
- रखुमाई घेई भक्त कैवार, विठूसी झाला गर्व थोर
- उभा ताठ दिसे विटेसी, ठेवोनिया कर कटीसी
- भक्त आला दर्शनासी, बोलेना विठू त्यासी
- मिठी देण्या त्यासी भक्त, घाली हात कमरेसी
- विठू मनी गुदगुल्या, गुदगुल्या पोटासी
- कृष्णदास म्हणे हसे देव, खदखदा विटेसी
✦ ✦ ✦
८७
- विठू हसला, भक्त तोषला, लेकरा पाहता, तोष अंतरा
- लेकरु हासे, तोष मातेला, तेविचि आज, पंढरीला
- नवल पहा, भीमातीराला, विठू लेकरु, माय वारकरी
- कृष्णदासे पाहिले आज, विठूसी भक्ता कटीवरी!
✦ ✦ ✦
८८
- पाऊस आला, पाऊस आला,
- वारकरी, भक्तित न्हाला
- विटेवरी जो, दावी पाउला, मनी ध्याती, त्या विठ्ठला
- पितांबर भरजरी शेला, गळा वैजयंती माला
- पंढरपुरी, मेळा जमला, वाळवंटी, घोष गर्जला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
- विटेवरी, विठू तोषला, भक्तिभाव, प्रसाद दिला
- सेविता बहर, भक्तिभावाला, भजन उधाण, हृदयाला
- गाता गाता, हरि विठ्ठला, कृष्णदास, भक्तित न्हाला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
✦ ✦ ✦
८९
- हरि विठ्ठला, भजा विठ्ठला, सावळा सुंदर, उभा विटेला
- संगे घ्या, बाळ गोपाळा, पंढरी आज, वैष्णव मेळा
- पहा पहा, सुखसोहळा, हर्ष नाऽऽ, मावे आभाळा
- विकसित हृदयकमळा, भक्तिगंध सेवी परिमळा
- कृष्णदास, भक्तभ्रमरा, नयना अश्रू, घळा घळा
✦ ✦ ✦
९०
- घळा घळा, घळा घळा, अश्रू भक्ता, नेत्रकमळा
- विठू वास, हृदयकमळा, विकसित पूर्ण, एकादशीला
- भक्तभ्रमर, अधीर भक्तिला, हुंगितसे, भाव परिमला
- गुण गुण, हरि विठ्ठला, कृष्णदास रुंजी, पदकमला
✦ ✦ ✦
९१
- पदकमला, समचरणा, विटेवरी, भक्त राणा
- भावभक्तिच्या, दावितो खुणा, पाचारितो, मोक्ष राणा
- चला पंढरी, सत्वरी चला, सावळया सुंदरा, भेटायाला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, गजर घुमतो, अंबराला
- ऐकता गजर, हरि विठ्ठला, विठू लागला, डोलायाला
- दृष्य पहा, भीमातीराला, देव उधळी, भक्ति गुलाला
- डोलतो देव, डोलतो भक्त, उधाण पहा, दोही हृदयाला
- देव चिंब, भक्तही चिंब, शब्द ना, सोहळा वर्णायाला
- न्हाउनिया, विठू गुलाला, कृष्णदास चिंब, भीमातीराला
✦ ✦ ✦
९२
- भीमातीराला, चला चला, विठू सावळया, भेटायाला
- समचरण, विटेवरी, माथा त्यावरी, टेकायाला
- व्हा रे भ्रमर, पदकमला, भक्ति सुगंध, हुंगायाला
- अवसर हा, आषाढाला, नको नको पहा, चुकायाला
- भक्त येतो, विठू भेटीला, विठूही पाही, वाट विटेला
- ठेविले कर, जरी कटीला, उतावीळ तो, आलिंगनाला
- देवे क्षेम, देता पहा, भक्त नाही, देहभानाला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, देवभक्ता, मनी घुमला
- देव भान, भक्त भान, दोहीं पहा, विलयाला
- कृष्णदास, चमत्कार, पाहतसे, भीमातीराला
✦ ✦ ✦
९३
- भीमातीराला, गाभार्याला,
- पहा लावण्य, सावळया सुंदरा
- दर्शनासी, अधीरता, स्वर्गीच्याही, सुरवरा
- मिटुनिया, नेत्रकमला, लक्षितो परि, भक्तवरा
- टाळमृदुंग, गजरात, वारकरी चाले, पंढरपुरा
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, मनी लक्षिती, सावळयाला
- विसरले, घरादाराला, कोण विचारी, तहानभूकेला
- भक्ति पाहुनि, मनी नवल, वाटे पहा रखुमाईला
- भोळा भोळा, माझा दादुला, भुलेल यांच्या, भक्तिभावाला
- सोडील जरी वैकुंठाला, भय भारी रखुमाईला
- सामोरी येऊनि विचारी कुशला, मनी हवे ते देते तुजला
- परी सोडा, माझा दादुला, रखुमाई करी, विनवणीला
- भीती पाहुनि, मनी नवल, म्हणती काय सांगू तिजला
- कृष्णदास म्हणे ना माहीत, आधीच कोंडीला हृदयाला
✦ ✦ ✦
९४
- कोंडीला, हृदयाला, सावळया विठूला
- वाट ना बाहेर, उरली जायाला
- भाव भक्ति वीट पहा, अचल अढळ, हृदयाला
- उभा केला वरी नीट, सावळया विठूला
- पांडुरंग, विठ्ठला, गजर घुमला
- अचल विठूला, वाव ना नाचाला
- हृदय गाभारा, भाव त्यात, उफाळिता
- कृष्णदास भक्त आज, नाचे भीमातीराला!
✦ ✦ ✦
९५
- नाचे भीमातीराला, उधाण हृदयाला
- वैकुंठीचा देव आज, वाट पाहे, भीमातीराला
- चालत चालत, भक्त आले पंढरीला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
- वीणा बोले झंकारत, पांडुरंग हरि विठ्ठला
- मृदंगऽऽ, बोले बोला, पांडुरंग हरि विठ्ठला
- टाळ संगे खणखणे, पांडुरंग हरि विठ्ठला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
- वाळवंटी नामघोष, जिथे तिथे हरि विठ्ठला
- डुलला डुलला, विटे विठू डुलला
- भजनी ऽऽ, विठू गुंगला
- ध्यानी विठूच्या, भक्त गुंगला
- देखिला देखिला, कळस देखिला
- कळस देखिता, शीण भाग उतरला
- गाभारी ना जरी तो, भक्त आत शिरला
- कृष्णदासा अंतरी, सावळा प्रकटला!
✦ ✦ ✦
९६
- प्रकटला प्रकटला, सावळा प्रकटला
- विटेवरी पहा आज, विठू कसा नटला
- भरजरी पितांबर, शेला भरजरी
- सुवर्ण माळा, रुळती गळयावरी
- मकर कुंडले, शोभती कर्णावरी
- कौस्तुभ मणी पहा, विराजितो कंठावरी
- केशर चंदन, उटी दिसे भाळावरी
- रत्नजडित सुवर्णमुकुट, झळाळतो माथ्यावरी
- नटला नटला, विठू कसा नटला
- विटेवरी ताठ, नटुनि उभा ठेला
- आरसा ना पुढे त्याच्या, डोळेही मिटेले
- रुप कैसे न्याहाळितो, पहा कसे आगळे
- भक्तराजा पुढे उभा, विठूराजा दर्शना
- अंतरी निज रुप, न्याहाळी सावळा
- कृष्णदास आगळा, हृदयी त्या सावळा
- प्रकटला प्रकटला, सावळा प्रकटला
✦ ✦ ✦
९७
- भक्त हृदयी सावळा, सावळा प्रकटला
- पंढरीसी नामघोष, अंबरी दुमदुमला
- वारकरी दर्शना, वाळवंटी थडकला
- भक्त-महासागर पाहुनि, सावळा आनंदला
- परि भेटी कल्पनेने, विठू हृदयी धडधडला
- स्वागत ते कसे करु, विचार करी मनाला
- भक्तमेळा वाळवंटी, नामघोषा गुंगला
- थकला वारी चालता, क्षणभरी विसावला
- चंदन सुगंध मंद, अवचिता दरवळला
- कृष्णदास भेटीसी, विठू जवळी आला!
✦ ✦ ✦
९८
- विठू जवळी आला, भक्त मनी थरारला
- पहा पहा देव कसा, भक्तिसी लाचावला
- भक्त माझा दिवसरात्र, चालुनिया थकला
- शोध घेण्या भक्ता पहा, देव जवळी आला
- परिमळ सुगंध मंद, पितांबर सळसळला
- अनुभवी त्या कृष्णदासा, शीण भाग गेला
✦ ✦ ✦
९९
- शीणऽऽ, भाग गेला, भक्त पंढरी, पोहोचला
- विठू उभा विटेला, भक्त गाभारी भेटीला
- सावळया विठूसी, कडकडूनि भेटला
- विठूऽऽ, ना सोडी, हात कटीवरीचे
- अपुरे ना धाये मन, भक्त सुखभेटीचे
- भक्त करी विनवणी, सोडी रे अबोला
- वियोग तुझा, पहा पहा, किती मज जाहला
- युगायुगे चालतो परि, ना पोचलो पदाला
- चालुनिया तव भेटीसी, शीण पहा जाहला
- उघडी उघडी, अता नेत्रकमला
- कानी घेई, कानी घेई, घेई भक्त बोला
- हरि विठ्ठला हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
- भक्त आर्जवे ऐकुनि, विठू मनी सुखावला
- म्हणे हा मायेसी, आता खरा विटला
- मजसाठी याच्या हृदयी, भाव खरा दाटला
- उघडू चला चला, चला हृदयपटला
- हाचि मनी विचार, सावळया विठ्ठला
- उघडिता पटल, आत दिसे विठ्ठल
- सावळा सुंदर, उभा जो विटेवर
- दर्शन होता, निज हृदयी, भक्त धरी अबोला
- विठू करी विनवणी, का रे हा अबोला
- इच्छा मज दर्शनाची, पूर्ण अता झाली ना
- भक्त बोले सावळया, लबाडा गोपाला
- हृदयीच जरी का, असे तू लपला
- वारीसी व्यर्थ म्या, व्यर्थ मजसी श्रमविला
- विठू हसुनि गालात, सोडी कटीवरील हात
- प्रेमे जवळी घेवुनि, भक्ता कुरवाळीला
- बोलतसे काय बोला, ऐका रे ऐका या हो लोका
- पंढरीसी जो दिसे, विटे मी उभा असे
- तोचि मी असे रे, नित्य तव हृदया
- परी वाटे चला जरा, खेळ जरा खेळूया
- भक्तिसुख अनुभव, माझ्या भक्ता देऊया
- वारी नाऽऽ गेली तुझी, गेली नाऽऽ फुकट
- विटे असे सुख जे, पहा कसे अवीट
- निर्मिले माझ्या भक्ता, असे जो चोखट
- ऐकुनिया विठ्ठल बोला, भक्त मनी संतोषला
- भक्ताचे प्रेमापोटी, विठू असे लाचावला
- विठूचे प्रेमापोटी, भक्तही लाचावला
- विठू दिसे भक्त हृदया, भक्ता हृदयी विठू दिसला
- पंढरीच्या गाभार्यासी, खेळ हा दिसे विटेला
- कृष्णदास पाहुनिया, भजनरंगी गाई विठ्ठला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
✦ ✦ ✦
१००
- वारीचीऽऽ, इथे संपली, इथे संपली, भजनमाला
- भावपुष्पे, गुंफुनिया, केली सुंदर, पुष्पमाला
- अर्पिली, भक्तिभावे, विठू सावळया, सुंदराला
- शोभते, पहा कशी, मूर्ती साजिरी, विटेला
- चला चला, चला गाभारी, माथा टेकूया, विटेला
- तोष होईल, विठ्ठलाला, घेईल तुम्हा, कडेला
- तोष आज, कृष्णदासाला, वर्णिताऽऽ, पंढरी वारीला
- आषाढी, एकादशी आज, चला करु, गजराला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
- हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
✦ ✦ ✦
१०१
- आषाढी एकादशीचा आला सुदिन
- विठूने केले आज पहाटेच स्नान
- भरजरी पितांबर निळा अंगरखा
- शेला भरजरी दिसे अतिशय छान
- रत्नजडित अलंकार, डोईवरी मुगुट
- सजला अति तत्पर, दिसे लावण्यवान
- अत्तराचा घमघमाट, माथा गोपीचंदन
- उभा आज विटेवरी द्याया भक्ता दर्शन
- विठ्ठल विठ्ठल, गजर चहूकडे
- ऐकतो पहा कसा, देउनिया कान
- उभा राहे विटेवरी, मिटुनि नयन
- परि सारे केंद्रित, भक्तावर मन
- विठू सावळयासी देउनिया मान
- भावे घेता दर्शन, कृष्णदास विसरला भान!
✦ ✦ ✦
१०२
- भक्त भाव जाणुनि, घेतली पंढरीसी धाव
- विटेवरी घ्याया दर्शन आज, पंढरी धावाधाव
- नटला आज देव, जणू नवरदेव
- वेधितो भक्तजन, मनाचा ठाव
- ठेविता डोई विटेवरी, कृष्णदासा भाव
- विठू सावळया, भक्त प्रार्थनेसी पाव
✦ ✦ ✦
१०३
- गाभारी पुजार्यांची आज कूजबूज
- विठूच्या चरणांसी आली पहा सूज!
- विचार करती मानसी काय असे काज
- विठू पहा तयांसी बोले काय गूज
- काल झाली एकादशी, भक्तांची अतोनात, दाटी
- दर्शनासी
- दर्शन करता प्रत्येकी, माथा टेकिले चरणांसी
- कोमल माझे चरण, कल्पना ना तयांसी
- परि भाव पाहुनि मनीचा, बोलिलो ना तयांसी
- चालले पहा वारीसी, श्रमले दुखविले निजचरणांसी
- त्रास होता भक्तांसी, घेणे पडे देवासी
- ब्रीद माझे राखितो मी, आली पहा सूज मज चरणांसी
- परि सांगू नका रखुमाईसी, विनवितो तुम्हांसी
- भाव पाहुनि विठूचा, कृष्णदास मनी हासी!
✦ ✦ ✦
१०४
- विठूसी आज, ना जेवायाचे भान
- उभ्या उभ्या करी, मनी चिंतन
- भक्त वारीकर काल, घेउनि गेले दर्शन
- मजपासी प्रत्येकी उघडिले मन
- नानाविध भक्तांचे, नानाविध प्रश्न
- त्याची आज होते, मज आठवण
- प्रश्न आज मज, मनी गहन
- कसे करु त्यांचे, दु:ख मी हरण
- विठू अंतरीची करुणा जाणून
- कृष्णदासाचेही आज, मूक झाले मन!
✦ ✦ ✦
१०५
- वारीकर भक्त निघाले परतीच्या वाटे
- सुने सुने आज चंद्रभागे तटे
- वारी पूर्णतेचे अन् विठू दर्शनाचे
- अंतरी आज समाधान
- घेउनि भक्तिसुख द्विगुणित धन
- अंतरी वारीचे क्षण आठवण
- पाय ना उचलती जड झाले मन
- हरि विठ्ठल नाम कर्णी गुंजन
- दृष्टी माघारी जाय कळसाकडे
- जणू कन्या निघाली सासुराकडे
- कृष्णदास म्हणे विटेवरी, पहा काय स्थिती
- विठूच्या डोळयात आज आसवे ओघळती!
✦ ✦ ✦
- ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥
- ==================================
- ॥ पंढरीची वारी २०१३ ॥
✦ ✦ ✦
१०६
- टाळघोषासंगे भजनात दंग |
- वाळवंटी जनसागर अथांग |
- विठू भक्तिचे मनी अपार तरंग |
- विठ्ठल विठ्ठल टाळ बोलतो मृदंग |
- सावळ्याच्या भक्तिचा मनी चढलासे रंग |
- कृष्णदासा मनी आज सावळे तरंग ॥
✦ ✦ ✦
१०७
- आला आषाढीचा दिन | धावे पंढरीसी मन ॥
- सावळे चरण | जडले रे मन ॥
- विठू भेटीसीऽऽ, विठू भेटीसीऽऽ, कासावीस जन ॥
- व्याकुळले तन, व्याकुळले मन ॥
- कृष्णदासा मनी आज सावळे चरण ॥
✦ ✦ ✦
१०८
- अरे, लागले रे ध्यान | जाता, पंढरीसी मन ॥
- मनी सावळे चरण | एक ध्येय ध्याता ध्यान ॥
- झाले रे उन्मन | गेले गेले मनपण ॥
- कृष्णदासा दिन आज | आनंदाचा सण ॥
✦ ✦ ✦
१०९
- अरे हसतोसी रे पांडुरंगाऽऽ |
- जीवऽऽ जाहला व्याकुळ संगा ॥
- ठेविले कटीसी हस्त अभंगा |
- करी भक्ताच्या भवभय भंगा ॥
- पुंडलिके आणियेले श्रीरंगा |
- मन जाहले रे ध्यानी तव दंगा ॥
- कृष्णदास घडता या संगा |
- मन जडले रे सावळ्या या रंगा ॥
✦ ✦ ✦
११०
- सावळे चरण | आनंद निधान ॥
- सावळ्या विठूचे | विटेवरी ध्यान ॥
- मन धरी ध्यान | लाभले विश्राम ॥
- कृष्णदास म्हणे | हेचि सावळ्याचे दान ॥
✦ ✦ ✦
१११
- ध्याता सावळे चरण | लाचावले मन ॥
- मूर्ती लावण्याची खाण | पाहता आनंदा उधाण ॥
- हारपले भान | लोपले मी-पण ॥
- कृष्णदास म्हणे घडे | येता आषाढीचा सण ॥
✦ ✦ ✦
११२
- सावळे चरण | सावळेचि तन ॥
- मिटले नयन | परि हसे मन ॥
- सर्वांग सुंदर | चित्त घेतसे लोभून ॥
- कृष्णदास मनी आज | सावळ्याचे ध्यान ॥
✦ ✦ ✦
११३
- सावळे चरण | अचल विटेसी ॥
- पुंडलिके आणिले | भीवरे तीरासी ॥
- मनोहर ध्यान | सुखाचे निधान ॥
- कृष्णदास हृदयी | सावळे चरण ॥
✦ ✦ ✦
११४
- सावळे चरण | तेथे धावे मन ॥
- पंढरीसी स्थान | वैकुंठ भुवन ॥
- हरि जनार्दन | पतित पावन ॥
- मिटुनि नयन करी | भक्तांचे ध्यान ॥
- भक्तांलागी ओढीसी | तेचि गे कारण ॥
- कृष्णदासा निरंतर | सावळ्याचे ध्यान ॥
✦ ✦ ✦
११५
- सावळे चरण नमिता, उर्ध्व जाई भान |
- तेचि ते सावळ्या, विठूचे गे स्थान ॥
- अचल चरण भेटी अचल गे मन |
- अचल मन देई निर्विकल्प भान ॥
- सावळ्याच्या भेटी होते स्वरुपाचे ज्ञान |
- सावळ्या विटेवरी कृष्णदास मन ॥
✦ ✦ ✦
११६
- सावळे चरण, दावी योग खूण |
- विटेवरी तेणे, मांडिले गे ठाण ॥
- समत्व चित्ताचे, दावी समचरण |
- मिटले नयन, दावी नासाग्री भान ॥
- शिव शोभे माथ्यावरी, सहस्रार स्थान |
- ध्यानमग्न योगी, विठू सावळा जाण ॥
- प्रसन्न हास्यमूर्त, अमूर्ताची मूर्त |
- कृष्णदास हृदयासी, सावळ्याचे ठाण ॥
✦ ✦ ✦
११७
- निळा झाला सावळा | आला धावुनि भीमातळा ॥
- मिटुनिया दोहीं डोळा | दावी हास्य मुखकमळा ॥
- वीटे रोवुनि पदकमळा | भक्त लक्षितो आगळा ॥
- चित्तचोर निरंतर | कृष्णदास हृदयकमळा ॥
✦ ✦ ✦
११८
- मुख हे गोजिरे | साजिरे सुंदर ॥
- सावळे लोभस | रुप अनिवार ॥
- नीलप्रभा फाकली | दिसे सभोवार ॥
- कृष्णदास म्हणे झाले | परब्रह्म साकार ॥
✦ ✦ ✦
११९
- परब्रह्म आले | आले रे भूवर ॥
- चंद्रभागे तीर | क्षेत्र पंढरपूर ॥
- ध्यानी लक्षिती ज्यां | देव सुरवर ॥
- ते हे विटे सावळे | रुप मनोहर ॥
- कृष्णदासाचे तेणे | व्यापिले अंतर ॥
✦ ✦ ✦
१२०
- हरि रे, हरि हरि रे |
- आला भूवरी रे, आला भूवरी रे ॥
- पंढरपूरीऽऽ, भीवरे तीरीऽऽ |
- आलाऽऽ, मुरारी रे ॥
- रुप मनोहरी | सावळे सुंदरी | दिसे विटेवरी रे ॥
- चरण ध्याता, भक्तवर तो, गेला पैलतीरी रे ॥
- कृष्णदास मनी, निशिदिनी व्यापुनि,
- सावळा मुरारी रे ॥
✦ ✦ ✦
१२१
- महाद्वारी भक्त करिती गजर |
- पांडुरंग नामी गर्जले अंबर ॥
- गाभार्यात सावळे रुप विटेवर |
- भक्तमन व्यापुनि राही निरंतर ॥
- कटी कर चरण अचल विटेवर |
- मंदस्मित लोभस दिसे मुखावर ॥
- शरणांगताचाऽऽ, घेई जो कैवार |
- कृष्णदास लक्षी त्यासी विटेवर ॥
✦ ✦ ✦
१२२
- ॐकारचि मूळ असे या विटेचे |
- रुप ते सगुण निर्गुण ब्रह्माचे ॥
- उभे भीमातटीचे, रुप सावळ्याचे |
- वेधिते लावण्य, चित्त गे भक्तांचे ॥
- नामरुपातीत परब्रह्म अमूर्त |
- मनोहर सावळे गे जाहले ते मूर्त ॥
- निराकार ॐकार सावळा साकार |
- कृष्णदास म्हणे तो भक्तिचा आकार ॥
✦ ✦ ✦
१२३
- चरण सावळे, श्रीमुख सावळे |
- तनही सावळे, परि तेज आगळे ॥
- लावण्याची प्रभा, भोवती झळाळे |
- दिव्य ऐसे रुप, पंढरी केवळे ॥
- पुंडलिके उभविले, भावभक्ति बळे |
- भक्तआज्ञे तिष्ठत, मिटुनिया डोळे ॥
- ऐसे श्रीहरी रुप, गोजिरे सावळे |
- कृष्णदास लक्षितो. ध्यानाचिया बळे ॥
✦ ✦ ✦
१२४
- पांडुरंगा तुझे, करतो मी ध्यान |
- तुझे पायी माझे, जडले रे मन ॥
- मागणे ते तुजपाशी, नाही काही आन |
- रुपे तुझ्या माझे, वेधले गे मन ॥
- श्रीगुरुने दिली मज, तव प्रेम खूण |
- दिली तव रुपा, मज ओळखण ॥
- विटे जरी तू गे, मांडियेले ठाण |
- कृष्णदास हृदया तू, विटेसहित जाण ॥
✦ ✦ ✦
१२५
- सावळ्या चरणांचे सापडे ना वर्म |
- निश्चल त्या स्थितिचे काय असे मर्म ॥
- सावळ्या भक्तिचे कोण दावी वर्म |
- कोण त्यासी कैसा आचरावा धर्म ॥
- सम ना होय जरी पाप-पुण्य कर्म |
- कृष्णदास म्हणे हाती सापडेना वर्म ॥
✦ ✦ ✦
१२६
- सावळ्या चरणांची प्रीत |
- जडो मज मनी गे नीत ॥
- चरणी त्या असे सर्व हित |
- तेथे मन लागो मज हे नीट ॥
- भावभक्तिची पंढरीसी पेठ |
- तेथे उभा असे सावळा ताठ ॥
- होई वैराग्ये जो अति धीट |
- त्यासी लाभे ती गोडी गे अवीट ॥
- कृष्णदास लुटावया पेठ |
- चाले पंढरीची सत्वर गे वाट ॥
✦ ✦ ✦
१२७
- सावळ्याची पेठ, तेथे मोठा थाट |
- भक्तिचे वैकुंठ, भावाची गे वीट ॥
- जाता लाभे तेथ, आनंद अवीट |
- परि वैराग्याची गाठ, तरी घडे ॥
- परब्रह स्वरुपऽऽ, तेथ विटे उघडे |
- परि सद्गुरुंची गाठ, तरी घडे ॥
- कृष्णदास माथा, सद्गुरुंचा हात |
- लाभ गे जोडिला, पंढरी पेठेत ॥
✦ ✦ ✦
१२८
- पंढरी पेठेत, सावळा विटे ताठ |
- जाउनिया न्याहाळा, रुप ते नीट ॥
- विटे समचरण, कटीवरी हात |
- स्मितहास्य श्रीमुखी, भाव काय नयनांत ॥
- भेटी देता येतो, सावळा खुशीत |
- भक्त भाव प्रतिबिंब, सावळ्या मूर्तीत ॥
- कृष्णदासा होता, सावळ्याची भेटी |
- भान हारपविले, सावळ्या जगजेठी ॥
✦ ✦ ✦
१२९
- सावळ्या चरणांची, मजलागी प्रीत |
- समचरण जे, वीटे उभे नीट ॥
- वैकुंठीचा नाथ, पंढरी ग्रामात |
- लक्ष माझे एक, सावळ्या मूर्तीत ॥
- सावळ्या या रुपे, मन माझे मोहित |
- सावळ्या भक्तिरंगे, कृष्णदास रंगत ॥
✦ ✦ ✦
१३०
- भावाचिया बळे, पाहू रुप सावळे |
- पंढरीच्या विटेवरी, रुप आगळे ॥
- शामसुंदराचे रुप गे निळे |
- विटेवरी उभे मिटुनि नेत्रकमळे ॥
- सावळ्या विटेवरी, रुप सावळे |
- कृष्णदास हृदयी चरणकमळे ॥
✦ ✦ ✦
१३१
- साजिरे सावळे रुप विटेवरी |
- देखण्यासी आज भक्त हो पंढरी ॥
- शिरता गाभारी रुप देखिता सामोरी |
- खिळुनिया राही दृष्टी श्रीमुखावरी ॥
- प्रसन्न प्रफुल्लित होउनि अंतरी |
- भक्त समाधान पावतो अंतरी ॥
- डोळे मिटुनिया जाता मनोवेगे |
- मनापुढे उभा सावळा तत्परी ॥
- अंतर्दृष्टी निरखिता सावळ्या सत्वरी |
- कृष्णदास सफल पंढरीची वारी ॥
✦ ✦ ✦
१३२
- ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥
- (आषाढी एकादशी १९ जुलै २०१३)
- ॥ पंढरीची वारी २०१९ ॥
✦ ✦ ✦
१३३
- सावळयाचा घेई ध्यास |
- ध्यानी मनी त्याची आस ||१||
- कधी दिसेल नयनांस |
- जरी ना शिणलो वारीस ||२||
- बैसोनिया आसनास |
- शिरोनिया गाभाऱ्यास ||३||
- पाहोनिया सावळ्यास |
- डुल्लतसे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३४
- अधीर जै हो मानस |
- सावळ्याच्या दर्शनास ||१||
- लागोनिया त्याची आस |
- विसरे ते जगतास ||२||
- निरास ऐसा आसनास |
- निस्तब्ध त्या मानसास ||३||
- सावळ्याची मूर्ती खास |
- प्रकटे सांगे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३५
- गगनात विहरे श्वास |
- तेथ सावळ्याचा वास ||१||
- गाभारा तो सावळ्यास |
- चढा तेथ सावकाश ||२||
- विकल्पा ना द्या अवकाश |
- अधोमुखी जो राक्षस ||३||
- ध्यानी घ्या खूण खास |
- सांगतसे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३६
- सावळा गाभाऱ्यास |
- निश्चल उभा खास ||१||
- पाचारितो भक्तांस |
- येई येई दर्शनास ||२||
- गुरू दावितो मार्गास |
- ध्यानी घ्या वाट खास ||३||
- लाधुनिया गुरुकृपेस |
- मेख जाणे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३७
- सोहं सोहं सावकाश |
- वरी वरी चढे श्वास ||१||
- स्पर्शता गगनास |
- मानस ते विलयास ||२||
- चालेना तो अट्टाहास |
- गुरुची ही कृपा खास ||३||
- संगे सावळ्या गृहास |
- खेळ खेळे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३८
- आषाढाचा आला मास |
- सावळ्याचा लागे ध्यास ||१||
- चला जाऊ पंढरीस |
- भेटू तेथ सावळ्यास ||२||
- सर्वा मनी हीच आस |
- परी ठावे ना मार्गास ||३||
- जा हो शरण गुरूस |
- हासतसे कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१३९
- घनदाट घनदाट |
- चैतन्याचा दिसे थाट ||१||
- गाभाऱ्यासी विठू ताठ |
- लावण्याची जणू पेठ ||२||
- सावळा जरी वर्ण होत |
- नीलवर्ण झळाळत ||३||
- सावळ्याचा निळा होत |
- कृष्णदास ना चकित ||४||
✦ ✦ ✦
१४०
- विठूरंगी मन रंगे |
- तन धुंद टाळांसंगे ||१||
- सावळ्या या विठूसंगे |
- त्रितापाचे भय भंगे ||२||
- पांडुरंगे पांडुरंगे |
- वेड कैसे लाविले गे ||३||
- सावळ्याच्या प्रेमरंगे |
- चिंब कृष्णदास अंगे ||४||
✦ ✦ ✦
१४१
- सावळेची अंग विठ्ठल श्रीरंग |
- विटेचा हा संग विठ्ठला अभंग ||१||
- वारकरी भक्त भजनात दंग |
- टाळकरी संगे बोलतो मृदंग ||२||
- विश्वी दाटले गे सावळे तरंग |
- कळस दर्शनी मन झाले गुंग ||३||
- कृष्णदास आसनी स्मरणात दंग |
- वीट सोडोनिया धावला श्रीरंग ||४||
✦ ✦ ✦
१४२
- पंढरिये उभा कटीवर कर |
- अनादि श्रीधर तिष्ठतसे ||१||
- रंगले भक्तीसी जन पंढरपूर |
- पाहोनिया पूर हासतसे ||२||
- नामध्यानी दंग देहाचा विसर |
- आनंदासी पूर दाटलासे ||३||
- विठ्ठल विठ्ठल चहू तो गजर |
- कृष्णदास स्वर ऐकतसे ||४||
✦ ✦ ✦
१४३
- ॥ पंढरीची वारी कार्तिकी २०२0 ॥
- श्रीमुख सुंदर, सावळा सुंदर ।
- सर्वांगी सुंदर, विटेवर ॥१॥
- भावाचा भुकेला, विटेवरी ठेला ।
- मौनेचि गा भला, जाणी गा तो ॥२॥
- कस्तुरीचा टिळा, भाळी गा रेखिला ।
- अंगुष्ठे स्पर्शिला, भ्रूमध्यात ॥३॥
- सद्गुरूची मात, विठ्ठल हृदयात ।
- दर्शनी तोषत, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१४४
- का रे पांडुरंगा, बांधलें रे मुख ।
- दर्शनाचे सुख, हिरावले ॥१॥
- वाळवंटी दाटी, जाहलीसे तुटी ।
- वैष्णवांसी भेटी, कैंची घडे ॥२॥
- सावळ्या मुखासी, सावळ्या सुखासी ।
- पंढरी भक्तांसी, रीघ नाही ॥३॥
- सावळ्याचा सखा, मारितसे हाका ।
- कृष्णदास मुखा, हरि हरि ॥४॥
✦ ✦ ✦
१४५
- हरि हरि हरि, संकट निवारी ।
- भक्तांचा कैवारी, तूंचि होसी ॥१॥
- पंढरीचे सुख, नाही नाही देख ।
- त्रिभुवनी एक, सुखदायी ॥२॥
- वीटेच्या सुखासी, लालसा मानसी ।
- जाती पंढरीसी, वेळो वेळा ॥३॥
- विठूराये लळा, लाविला प्रेमळा ।
- कृष्णदास कळा, जाणतसे ॥४॥
✦ ✦ ✦
१४६
- जाणतसे कळा, भक्तचि आगळा ।
- वैष्णवांच्या डोळा, एक ध्यान ॥१॥
- नेत्रांतरी विठू, हृदयांतरी विठू ।
- विटेवरी विठू, सर्वव्यापी ॥२॥
- व्यापुनि सकळा, अलिप्त आगळा ।
- श्रीहरि सावळा, विटेवरी ॥३॥
- ऐसा हा सावळा, प्रेमळ आगळा ।
- कृष्णदासा लळा, सावळ्याचा ॥४॥
✦ ✦ ✦
१४७
- सावळ्याचा लळा, भक्त तो आगळा ।
- नाम वेळोवेळा, विठ्ठल हे ॥१॥
- विठ्ठल विठ्ठल, हाती गर्जे टाळ ।
- वीणा सर्वकाळ, विठ्ठल गे ॥२॥
- तन आणि मन, विठूमय जाण ।
- ध्येय ध्याता ध्यान, विठू एक ॥३॥
- बोध एकत्वाचा, अनुभव साचा ।
- कृष्णदास वाचा, विठ्ठल गा ॥४॥
✦ ✦ ✦
१४८
- गावा गा विठ्ठल, ध्यावा हा विठ्ठल ।
- छंद सर्वकाळ, विठ्ठलाचा ॥१॥
- विठ्ठलाचे नाम, मना दे आराम ।
- इंद्रिया विश्राम, स्व-स्वरूपी ॥२॥
- स्वरूपाचा गाभा, विटेवरी उभा ।
- नीलवर्ण प्रभा, राऊळासी ॥३॥
- नीलवर्ण डोही, बुडोनिया जाई ।
- कृष्णदास नाही, उरलासे ॥४॥
✦ ✦ ✦
१४९
- ॥ पंढरीची वारी आषाढी २०२१ ॥
- भिवरेचे ठाण, भक्तीसी उधाण ।
- ध्यानी मनी जाण, पांडुरंग ॥१॥
- भक्तीचे तरंग, आभाळी ते रंग ।
- सर्वत्र श्रीरंग, दाटोनिया ॥२॥
- विठ्ठलाचा संग, विस्मृत ते दंग ।
- गाताती अभंग, वारकरी ॥३॥
- पंढरीची वारी, मना दे उभारी ।
- पर्वणी ती न्यारी, कृष्णदासा ॥४॥
✦ ✦ ✦
१५०
- साजिरे गोजिरे, ब्रह्म ते वीटे रे ।
- भिवरेचे तीरे, निश्चल गा ॥१॥
- लावण्य पुतळा, जरी हो सावळा ।
- हृदयासी सकळा, व्यापितसे ॥२॥
- भक्तभावासी हा, आसुसला पहा ।
- देव पंढरी हा, विठ्ठल गा ॥३॥
- विठ्ठल विठ्ठल, मृदुंग नी टाळ ।
- मंद मंद चाल, भक्तमेळा ॥४॥
- सावळयासी हास्य, मंद ते मुखास ।
- चाले सावकाश, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१५१
- विठ्ठल विठ्ठल, गाऊया विठ्ठल
- नाचूया विठ्ठल, गर्जूया विठ्ठल ॥१॥
- गर्जतसे टाळ, विठ्ठल विठ्ठल ।
- संगे बोले बोल, वीणा ही विठ्ठल ॥२॥
- प्रेमाचे केवळ, बोल हे विठ्ठल ।
- विटेसी विठ्ठल, त्याला येई डोल ॥३॥
- भक्तीचा सखोल, होतसे हा खेळ ।
- वाजवीतो टाळ, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१५२
- अनादि अनंत, विटेवरी शांत ।
- पंढरी तिष्ठत, भक्तांलागी ॥१॥
- निर्गुण अक्रिय, दृग्गोचर होय ।
- उतावीळ हृदय, भक्तभेटी ॥२॥
- कटीवरी हात, विटेवरी ताठ ।
- अक्रिय दावित, असे मी गा ॥३॥
- ताराया आवडी, उडी घे तातडी ।
- ऐसी तया गोडी, भक्तकाजा ॥४॥
- द्वारकेचा राजा, करीतसे ये जा ।
- पंढरीसी मजा, कृष्णदासा ॥५॥
✦ ✦ ✦
१५३
- पंढरीचा लळा, भक्तांसी आगळा ।
- विठू हा सावळा, पहायासी ॥१॥
- पंढरीसी दाटी, जाहली अलोटी ।
- विठ्ठलाचे भेटी, भक्तमेळा ॥२॥
- राम कृष्ण हरी, जयजयकारी ।
- दुमली पंढरी, भिवरेसी ॥३॥
- सावळयाचे वर्म, भावभक्ति मर्म ।
- भागवत धर्म, महाराष्ट्री ॥४॥
- वाळवंटी गाता, उभवी पताका ।
- हर्ष होय निका, सावळयासी ॥५॥
- मेघ हे सावळे, रूप ते सावळे ।
- कृष्णदास डोळे, पाणावले ॥६॥
✦ ✦ ✦
१५४
- आला भक्तमेळा, हर्षला सावळा ।
- विटेवरी काळा, सद्गदित ॥१॥
- वर्षाकाठी नित्य, भेटीसी हा येत ।
- नाही चुकवीत, वारीसी या ॥२॥
- मागणे ते नाही, पाही रखुमाई ।
- उतावीळ बाही, क्षेम द्याया ॥३॥
- ऐसिया भक्तांसी, उभा मी विटेसी ।
- शीण ना मजसी, युगायुगी ॥४॥
- पहा गा तू उगी, राहुनिया जागी ।
- सोहळा हा जगी, अनुपम ॥५॥
- विटेवरी दिठी, देवभक्तां मिठी ।
- मावळली सृष्टी, कृष्णदासा ॥६॥
✦ ✦ ✦
१५५
- सद्गुरूची दृष्टि, कृपेची हो वृष्टि ।
- विठ्ठलाची भेटी, भाग्यवंता ॥१॥
- संतांचा हो संग, विठू नामी दंग ।
- मनी प्रेमरंग, दुणावत ॥२॥
- विठू खुणावत, यावे पंढरीत ।
- बाहू हे स्फुरत, क्षेमालागी ॥३॥
- विठूपायी मिठी, जीवभावा तुटी ।
- पावला संतुष्टी, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१५६
- सावळा ध्यानात, सावळा मनात ।
- सावळा चित्तात, व्यापोनिया ॥१॥
- सावळ्याची ओढ, प्रेम ते अजोड ।
- पंढरीचे वेड, भक्तांलागी ॥२॥
- सावळे श्रीमुख, पाहताचि सुख ।
- लगबग देख, राऊळासी ॥३॥
- सावळा कवेत, कवटाळी तेथ ।
- होय आनंदित, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१५७
- टाळघोष मंद, भक्तीचा सुगंध ।
- पंढरी हो धुंद, आज दिनी ॥१॥
- भक्ति चंद्रभागा, दुथडी वाहे गा ।
- भिजवी भक्तांगा, अंतर्बाह्य ॥२॥
- भावाचा तो गंध, दाटलासे मंद ।
- गाभारी हो धुंद, भक्तदेव ॥३॥
- विठू हासे मंद, कैसे केले धुंद ।
- लाविलासे छंद, कृष्णदासा ॥४॥
✦ ✦ ✦
१५८
- आनंद परीस, विठू पंढरीस ।
- स्पर्शिता तो खास, आनंद गा ॥१॥
- आनंदाची मूर्ती, असे ती गा क्षिती ।
- खूण ही निश्चिती, मनी धरी ॥२॥
- विठ्ठलाचा संग, आनंद अभंग ।
- आनंदी हो दंग, भक्त सारे ॥३॥
- ऐसा आनंदाचा, हाट भरे साचा ।
- दिन आषाढीचा, एकादशी ॥४॥
- वृष्टि आषाढीची, वृष्टि आनंदाची ।
- न्हातसे नित्यचि, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१५९
- अदृश्य हा भाव, दृश्य करी देव ।
- विटेवरी ठेव, भक्तांची ती ॥१॥
- निर्गुण सगुण, साकार होऊन ।
- पंढरीये जाण, उभा ठेला ॥२॥
- दर्शनी विव्हळ, हृदयकमळ ।
- विरह प्रबळ, टाहो फोडी ॥३॥
- आसवांच्या धारा, विटेच्या गाभारा ।
- रुक्मिणीच्या वरा, पाहताचि ॥४॥
- देव भक्त लोप, झाले एकरूप ।
- पांडुरंग बाप, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१६०
- दिसे घनीभूत, रूप गाभाऱ्यात |
- सावळा अनंत, नीलवर्ण ||१||
- ब्रह्मकाय घन, चैतन्य ते घन |
- थबके तत्क्षण, तन मन ||२||
- स्वानंद पाझरे, देखिता गोजिरे |
- लावण्य न सरे, दृष्टीपुढे ||३||
- देव उभा मूक, भक्त झाला मूक |
- कृपेची ती फेक, कृष्णदासा ||४||
✦ ✦ ✦
१६१
- ॥ पंढरीची वारी कार्तिकी २०२१ ॥
- नमो स्वामीराजा, नमो भक्तराजा |
- पंढरीच्या राजा, विठूराया ||१||
- तूंचि मायबाप, हरतोसी ताप |
- बोळवोनि पाप, शुद्ध करी ||२||
- शुद्ध करी मन, शुद्ध करी तन |
- भावभक्ती धन, समृद्ध ते ||३||
- असीम उदार, विठ्ठल उद्गार |
- जपे नाम सार, कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१६२
- विठ्ठल उद्गार, वाचे निरंतर |
- तयासी विसर, देहभाव ||१||
- पंढरीये पुरी, देहभाव नुरी |
- कृपेची त्या सरी, कुणा न ये ||२||
- विठ्ठल गजरी, झंकार अंबरी |
- एकादशी वारी, पातलीसे ||३||
- विठूराज द्वारी, आनंदाची वारी |
- ध्वज उंच करी, कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१६३
- आनंदाची वारी, असे या भूवरी |
- पंढरीये पुरी, भूवैकुंठ ||१||
- श्रीधर सुंदर, उभा विटेवर |
- स्वर्गसुख द्वार, पंढरी ही ||२||
- नको नामजप, नको ध्यानतप |
- सौख्य हे अमूप, दर्शनाचे ||३||
- दर्शन ते होता, विटेवरी माथा |
- होय रोमांचिता, कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१६४
- विटेवरी माथा, नुरे भवचिंता |
- सर्वसुख दाता, विठ्ठल गा ||१||
- पंढरीसी जावे, विठ्ठला भेटावे |
- चरण नमावे, एकभावें ||२||
- चैतन्य सघन, गाभारा भरून |
- भक्तांसी व्यापून, टाकीतसे ||३||
- ब्रह्म अनुनाद, विठ्ठल वरद |
- घेतसे तो स्वाद, कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१६५
- विठ्ठल वरद, विटेवरी पद |
- रूप ते सुखद, पंढरीये ||१||
- ये रे पंढरीसी, पाचारी भक्तांसी |
- सौख्य आनंदासी, पावसील ||२||
- कटीवरी हात, देखसील तेथ |
- परी मी निश्चित, चतुर्भुज ||३||
- उतावीळ बाह्या, क्षेम तुज द्याया |
- निववी गा काया, आलिंगनी ||४||
- ऐक्य देवभक्त, नुरे कुणी तेथ |
- ऐसें पंढरीत, नवल ते ||५||
- ऐसा हो महिमा, शब्द न ये कामा |
- पावला विश्रामा, कृष्णदास ||६||
✦ ✦ ✦
१६६
- शब्द न ये कामा, महिमा या धामा |
- पंढरीच्या श्यामा, भुले जन ||१||
- चालताचि वाट, देह हो विस्मृत |
- भवबंध गाठ, सैल होय ||२||
- शीतल आपाप, मन घेई झेप |
- पदोपदी रूप, खुणावते ||३||
- चढे श्यामरंग, भक्त होई दंग |
- धुंदीचे तरंग, कृष्णदासा ||४||
✦ ✦ ✦
१६७
- भक्त होई दंग, मनी श्याम संग |
- गातसे अभंग, सावळ्याचे ||१||
- रूप वर्णनाचे, विठू महिम्याचे |
- चालताना वाचे, स्फुरण ये ||२||
- ऐसें चिंतनाचे, क्षण ते मोलाचे |
- क्षण आनंदाचे, अविरत ||३||
- विरत मीपण, कृपेची ती खूण |
- धन्यतेचा क्षण, कृष्णदासा ||४||
✦ ✦ ✦
१६८
- ॥ पंढरीची वारी आषाढी २०२३ ॥
- दाटले आभाळ, चालले गोपाळ |
- पंढरीची वाट, दाटलीसे ||१||
- मेघ ते संतृप्त, भाव ही संतृप्त |
- बरसण्या मुक्त, वेळा आली ||२||
- पंढरीची वारी, विश्वात ती न्यारी |
- पर्वणीच न्यारी, देव-भक्तां ||३||
- नयनरम्य तो, सोहळा पाहतो |
- मनेचि लक्षितो, कृष्णदास ||४||
✦ ✦ ✦
१६९
- तन आंदोलित, मन आंदोलित |
- वीट आंदोलित, पंढरीसी ||१||
- भाव तो अपार, ओसंडितो फार |
- विटेसी थरार, कंप आला ||२||
- उत्कंठीत मन, लगबग तन |
- लक्षिती नयन, वधू वर ||३||
- वियोग अपार, धरवेना धीर |
- पदी वीटेवर, चुळबुळ ||४||
- देवभक्त दोहीं, वरितील पाही |
- घटिका ही येई, समीप ती ||५||
- पाहण्या नवाई, सर्वांसी हो घाई |
- गाभाऱ्यासी जाई, कृष्णदास ||६||
✦ ✦ ✦
१७०
- ॥ पंढरीची वारी आषाढी २०२५ ॥
- राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी |
- ज्ञानियाच्या द्वारी, आले वारकरी ॥१॥
- पंढरीच्या तीरी, उभा विटेवरी |
- पहाया ती स्वारी, निघेल हो वारी ॥२॥
- आषाढाच्या सरी, वर्षती अंबरी |
- घोष हृदंतरी, राम कृष्ण हरी ॥३॥
- हृदयाच्या लकेरी, गुंजताती भारी |
- माऊली विवरी, येई भानावरी ॥४॥
- वारकरी द्वारी, डोले तालावरी |
- माऊली संचारी, भक्तांच्या अंतरी ॥५॥
- मृदुंग वैखरी, टाळ सर्वां करी |
- विठ्ठल विठ्ठल, करीत गजरी ॥६॥
- बेभान पताका, स्पर्शती अंबरी |
- स्वर्गाहुनि सुर, पातले भूवरी ॥७॥
- पालखीत स्वारी, हृदयात स्वारी |
- भक्तांच्या सागरी, नटलासे हरी ॥८॥
- उधाण सागरी, नाद दिगंतरी |
- आली आली पाहा, आषाढीची वारी ॥९॥
- भक्तीचा हा खेळ, खेळतसे हरी |
- युगेयुगे चाले, पंढरीची वारी ॥१०॥
- सुख हो अंतरी, अश्रू नेत्रांतरी |
- कृष्णदास द्वारी, पाहे मौज भारी ॥११॥
✦ ✦ ✦
१७१
- भक्त आला आळंदीला, शीणभाग गेला |
- माथा टेकी शिळेवर, साद ज्ञानाईला ॥१॥
- लगबग करा चला, चला पंढरीला |
- विटेवरी उभ्या सख्या, पाहू सावळ्याला ॥२॥
- मुखी नाम गाऊ, ध्याऊ त्या रुपाला |
- लगबग लगबग चालू, पंढरी वारीला ॥३॥
- ज्ञानाईच्या संगे, चालता वारीला |
- कृष्णदासा उरी हर्ष, ना मावे गगनाला ॥४॥
✦ ✦ ✦
१७२
- ज्ञानाई आम्हांसी, न विसंबे कदाकाळी |
- प्रेमाची तियेची, रीत ही आगळी ॥१॥
- समाधिस्थ आळंदीसी, वाटतसे इये काळी |
- व्यापोनिया राहतसे, सर्व काळी सर्व स्थळी ॥२॥
- माय जैसी तान्हुल्यासी, तैसी ज्ञानाई आम्हांसी |
- कृष्णदास तान्हुला, अंगाखांद्यावरी खेळी ॥३॥
✦ ✦ ✦
१७३
- चला चला जाऊ चला, ज्ञानाईच्या संगे |
- चला मनी रंगू चला, सावळ्याच्या रंगे ॥१॥
- आषाढीचा मास आला, मेघ अंबरी रंगला |
- संगे ज्ञानाई चालता, भक्त भान विसरला ॥२॥
- सुकुमार पद कैसे, चालती वारीला |
- लक्ष हटेना त्यावरी, स्पर्श ना भूमीला ॥३॥
- चालताती अधांतरी, भक्त भावात विहरी |
- कृष्णदास मनी चाले, ऐसी पंढरीची वारी ॥४॥
✦ ✦ ✦
१७४
- ज्ञानाचे आगर, भक्तीचा सागर |
- स्पर्शिता शिळेसी, येई गहिवर ॥१॥
- रोमांचित शरीर, भावासी बहर |
- चैतन्याची शिळा, असे ती भूवर ॥२॥
- थराथरा थराथरा, कापते अंतर |
- नेत्राद्वया अपार, लोटतसे नीर ॥३॥
- ज्ञानाईs ज्ञानाईs, टाहो फोडी अंतर |
- कृष्णदास विगलित, कोसळला शिळेवर ॥४॥
✦ ✦ ✦
१७५
- स्पर्श त्या शिळेचा, स्पर्श ज्ञानाईचा |
- पुलकित तन मन, करीतसे साचा ॥१॥
- ज्ञानराज माऊलीचा, जप करी वाचा |
- व्यर्थ बडिवार, साधना तपाचा ॥२॥
- योगाचे ते सार, सुषुम्नेचा स्वर |
- चाले तो सत्वर, सामर्थ्य अपार ॥३॥
- समर्थाचा बाळ, नाही त्या आबाळ |
- कृष्णदास निश्चिंत, खेळतसे खेळ ॥४॥
✦ ✦ ✦
१७६
- पांडुरंग पांडुरंग | वारकरी झाले दंग ॥१॥
- टाळ चिपळ्यांचा संग | मुखी रसाळ अभंग ॥२॥
- चढे भाव भक्ति रंग | मनी सावळे तरंग ॥३॥
- हरी रंग हरी अंग | हरी व्यापिले सर्वांग ॥४॥
- जनसागर अथांग | मनी गात पांडुरंग ॥५॥
- पांडुरंग पांडुरंग | कृष्णदास ध्यानी दंग ॥६॥
✦ ✦ ✦
१७७
- करू पंढरीची वारी, करू देहभाव दूरी |
- हरी अहंभाव हरी, होता भावे वारकरी ॥१॥
- लक्ष चरणांचे वरी, ध्यान श्रींचे मुखावरी |
- पदोपदी वाटेवरी, आतुरता वाढे भारी ॥२॥
- विठ्ठलाचे हाती दोरी, खेचितो पंढरपुरी |
- जरी आसनाचे वरी, ध्यानी एकचि श्रीहरी ॥३॥
- मूलाधारी सहस्रारी, श्वास चाले खाली वरी |
- कृष्णदास वारकरी, करी पंढरीची वारी ॥४॥
✦ ✦ ✦
१७८
- करी पंढरीची वारी, करी पंढरीची वारी |
- श्वास जाता वरी वरी, विठू भेटे सहस्रारी ॥१॥
- मूलाधार हा संसार, सहस्रार तो श्रीधर |
- गुरू उघडिता द्वार, शिष्य वारीवरी स्वार ॥२॥
- कर्म करितो साचार, वारी करीते अंतर |
- गुह्य भक्तिचे हे थोर, गुरू असे कर्णधार ॥३॥
- नाव कृपेचि ही थोर, सहजीच पैलतीर |
- गुरुकृपाचि अपार, कृष्णदास झाला स्थिर ॥४॥
✦ ✦ ✦
१७९
- चाला पंढरीची वारी, मुखे बोला हरी हरी |
- थाप मृदुंगाचे वरी, टाळ चिपळ्या घ्या करी ॥१॥
- रोवा पताका अंबरी, हर्ष मावेना हो उरी |
- उड्या स्पर्शिती अंबरी, मना मना मोद भारी ॥२॥
- वारकरी मौज करी, चाले पंढरीची वारी |
- कृष्णदास हा गाभारी, विठूराज स्मित करी ॥३॥
✦ ✦ ✦
१८०
- विठू स्थिर विटेवरी, मन स्थिर विटेवरी |
- पंढरीची होता वारी, फल हेचि ते अंतरी ॥१॥
- बैसा आसनाचे वरी, ध्यावे सद्गुरू अंतरी |
- कृपावर्षावाची थोरी, घडे पंढरीची वारी ॥२॥
- हरी हरी हरी हरी, श्वास जाय वरी वरी |
- होय स्थिर सहस्रारी, विठू राऊळा अंतरी ॥३॥
- कृपा सद्गुरूंची खरी, चाले सुषुम्नेची वारी |
- कृष्णदास जाई तीरी, गाठे माहेर पंढरी ॥४॥
✦ ✦ ✦
१८१
- खुणावतो हरी, उभा विटेवरी |
- दर्शना सत्वरी, त्वरा करा ॥१॥
- पंढरीची वारी, नित्यनेमे करी |
- वाट दावी खरी, सद्गुरूचि ॥२॥
- आसनाचे वरी, ध्यानमुद्रा धरी |
- कृपाछत्र वरी, सद्गुरुंचे ॥३॥
- पंढरीची वारी, सर्व जन करी |
- मेख जाणे परी, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१८२
- मेरुदंड ताठ, उकलली गाठ |
- शिष्याचा तो थाट, वर्णवेना ॥१॥
- कृपेचा तो हाट, पंढरीचा घाट |
- चढे सटासट, शिष्यराज ॥२॥
- आसन ते वीट, उभा विठू ताठ |
- भासे तो निकट, शिष्यवरा ॥३॥
- कृपा ती अचाट, देहभाव घोट |
- भान ते लोपत, स्थलकाल ॥४॥
- आघवे जगत, विठूमय होत |
- अभंग हा गात, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१८३
- हरी हरी हरी, अंतरी बाहेरी |
- पाहे सभोवारी, हरी हरी ॥१॥
- ऐसी दृष्टी खरी, जो का अंगिकारी |
- तोचि वारकरी, भक्तराज ॥२॥
- अहं परिघाचा, भेद जो का करी |
- त्यासी भेटे हरी, तात्काळचि ॥३॥
- बळ सद्गुरूचे, सामर्थ्य कृपेचे |
- शिष्यराज नाचे, हरिपदी ॥४॥
- सद्गुरु श्रीहरी, शिष्यही श्रीहरी
- वदे कृपाथोरी, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१८४
- हस्त कटिवरी, पद विटेवरी |
- हास्य मुखावरी, श्रीहरीचे ॥१॥
- नेत्र मिटल्याचे, सोंग करी साचे |
- परी सत्य त्याचे, भक्त जाणे ॥२॥
- लबाड चतुर, जरी तो श्रीधर |
- असे सव्वाशेर, भक्तराज ॥३॥
- दोघां नाही धीर, भेटीसी तत्पर |
- आठव हो फार, एकमेका ॥४॥
- आषाढीची वारी, एका अवसरी |
- चाले वारकरी, पंढरीसी ॥५॥
- सगुणाची भेटी, एकमेका मिठी |
- क्षणाची त्या दिठी, कृष्णदास ॥६॥
✦ ✦ ✦
१८५
- पंढरीचे लक्ष, सावळ्याचे लक्ष |
- वारकरी दक्ष, नाम गानी ॥१॥
- नामाचा गजर, स्वानंदासी भर |
- चोहीकडे स्वर, हरी हरी ॥२॥
- भाव तेथ देव, भक्त तेथ देव |
- देवाचा स्वभाव, ऐसा असे ॥३॥
- वारीत येतसे, केशव समक्ष |
- प्रसंगासी साक्ष, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१८६
- भक्ताचा तो एक, देवासीच भार |
- संपूर्ण निर्भर, भक्तराज ॥१॥
- ऐशा भक्तराजा, विसंबेना हरी |
- कृपा थोर करी, वारंवार ॥२॥
- चाले वारकरी, पंढरीची वाट |
- सांभाळीतो नीट, पदोपदी ॥३॥
- सोपवा हो भार, त्यासी एकवार |
- पहा पुरेपूर, प्रचित ती ॥४॥
- क्षणोक्षणी घडे, नित्य चमत्कार |
- माहात्म्य अपार, हरिकृपा ॥५॥
- संसारी चालता, श्रीहरीची वाट |
- सांभाळीले नीट, कृष्णदासा ॥६॥
✦ ✦ ✦
१८७
- पांडुरंग हरी, पांडुरंग हरी |
- नामघोष करी, अंतरंग ॥१॥
- नामाचा तो रंग, भुलवी श्रीरंग |
- सावळ्याचा संग, सुखवितो ॥२॥
- विटेवरी उभा, चैतन्याचा गाभा |
- प्रकाशते प्रभा, मनामाजी ॥३॥
- सावळा विठ्ठल, प्रभा वर्ण नील |
- नयन शीतल, करितसे ॥४॥
- मन ते शीतल, तन ही शीतल |
- सर्वांगे शीतल, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१८८
- राऊळ शीतल, गाभारा शीतल |
- विठ्ठल शीतल, तयेमाजी ॥१॥
- रूप ही शीतल, नाम ही शीतल |
- वीट ही शीतल, विठ्ठलाची ॥२॥
- वाट ही शीतल, पंढरी शीतल |
- कृपा ही शीतल, अखिलांसी ॥३॥
- मेघ ही शीतल, पर्जन्य शीतल |
- धरती शीतल, जाहलीसे ॥४॥
- अंबर शीतल | विश्व ही शीतल |
- संत ही शीतल, मांदियाळी ॥५॥
- शीतल शीतल, वारी ही शीतल |
- विठ्ठल विठ्ठल, कृष्णदास ॥६॥
✦ ✦ ✦
१८९
- विठ्ठलाचे नाम, गर्जे दिगंतरी |
- झाले वारकरी, बेभान ते ॥१॥
- चालता चालता, वाजताती टाळ |
- विठ्ठल विठ्ठल, नाद त्यांचा ॥२॥
- तेचि नादावरी, पद नृत्य करी |
- मन लय धरी, विठ्ठलाची ॥३॥
- स्वर ही विठ्ठल, नाद ही विठ्ठल |
- हृदय ही विठ्ठल, तेणे योगे ॥४॥
- सर्व विठूमय, पंढरीची माय |
- भक्तीची ही सोय, आषाढीसी ॥५॥
- विठ्ठलाचे वारी, किमया ही न्यारी |
- देहभान नुरी, कृष्णदासा ॥६॥
✦ ✦ ✦
१९०
- ओघळली सर, आषाढ मासीची |
- बहर भक्तीसी, भक्तवरा ॥१॥
- तन ओलेचिंब, मना भक्तिरंग |
- वारकरी दंग, भजनात ॥२॥
- विठ्ठल विठ्ठल, नाद अंग अंग |
- देव भक्त संग, सोहळा तो ॥३॥
- स्वर्गीय सोहळा, नाही ऐसा कोठे |
- नयनांसी लोटे, अश्रूपूर ॥४॥
- वहावला देव, वहावला भक्त |
- नुरे देवभक्त, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१९१
- सगुणाची कीर्ति, विठ्ठलाची मूर्ति |
- भेटाया आस ती, भक्तजना ॥१॥
- उराउरी भेटी, तना सुखावी ती |
- हुंगता मुग्धती, परिमळ ॥२॥
- सघन गाभारा, लावण्य पसारा |
- देहभाना थारा, नुरेचि तो ॥३॥
- वीटे देता मिठी, ओघळली दिठी |
- अभिषेक होती, पदयुग्म ॥४॥
- गाभारी सोहळा, लावण्याने मग्न |
- देहभाव भग्न, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
१९२
- मृदंगाची थाप, हृदयी आदळते |
- पहा कालवते, श्रीहरीसी ॥१॥
- भक्तराज माझे, सर्वचि वारीत |
- येथ माझा थाट, कुणासाठी ॥२॥
- राऊळासी ऐटी, दावू मी कुणासी |
- विचार मानसी, केशवाचे ॥३॥
- कैसा उभा राहे, वीटे जगजेठी |
- करिती हाकाटी, वारकरी ॥४॥
- परी पुंडलिका, दिलेसे वचन |
- वीट ती सोडोन, जाववेना ॥५॥
- ऐसे कैसे द्विधा, जाहले केशवा |
- पाहता देखावा, स्मित मनी ॥६॥
- भक्तांची तो देव, पाहतो परीक्षा |
- देवासीही शिक्षा, ऐसीचि हो ॥७॥
- बरें झाले बरें, आता काय करें |
- शरण जाता बरे, कृष्णदास ॥८॥
✦ ✦ ✦
१९३
- घोष पांडुरंग, गर्जे अंतरंग |
- रोम रोम दंग, भजनात ॥१॥
- वारकरी ऐसा, चालला वारीत |
- वीणाही गुंजत, पांडुरंग ॥२॥
- तिथे विटेवरी, अचल श्रीहरी |
- राहावेना परी, गलबले ॥३॥
- वीट सोडोनिया, धावतसे थेट |
- आलासे वारीत, भक्तहृदयी ॥४॥
- देव भक्तमय, भक्त देवमय |
- जाहला विलय, एकमेकां ॥५॥
- नाचताती भक्त, परी तेचि देव |
- दाटलासे देव, सर्वत्रचि ॥६॥
- ऐसा विलक्षण, वारीचा सोहळा |
- धन्य झाला डोळा, कृष्णदास ॥७॥
✦ ✦ ✦
१९४
- वारीचे रिंगण, हरीचे प्रांगण |
- भक्तीचे अंगण, भूतळी या ॥१॥
- डोले वारकरी, डोले तेथे हरी |
- या जनसागरी, हरी हरी ॥२॥
- हरी पाचारितो, येतो वारकरी |
- तोही हरी हरी, पाचारितो ॥३॥
- जीवभावा हरी, हरी वारकरी |
- करीतसे वारी, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१९५
- मिटले नयन, दाटले नयन |
- हरीभेट क्षण, साक्ष करा ॥१॥
- भक्त नेत्र मिटी, हरी दाटे वीटी |
- उराउरी भेटी, अलौकिक ॥२॥
- लौकिकाची मात, मारी वरी लाथ |
- त्यासीच भेटत, सौख्य पहा ॥३॥
- पहा पंढरीसी, जाऊनी वारीसी |
- भेट दे वीटेसी, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१९६
- सण आला आषाढीचा, देव तोषे पंढरीचा ॥१॥
- घोष टाळ मृदंगाचा, नाचे वारकरी साचा ॥२॥
- वदे विठ्ठल ती वाचा, उठे तरंग नामाचा ॥३॥
- अंतरंगी भाव साचा, येई बहर प्रेमाचा ॥४॥
- आला आला नाचा नाचा, आला सण आषाढीचा ॥५॥
- कृष्णदास भक्त साचा, त्यासी सण पर्वणीचा ॥६॥
✦ ✦ ✦
१९७
- आला आषाढीचा मास, फुले अंतरी उल्हास ॥१॥
- भक्तांमनी लागे आस, जाण्या पंढरी वारीस ॥२॥
- उभा श्रीहरी वीटेस, आस त्याचे नयनांस ॥३॥
- भक्त येती आता खास, भेटण्यासी पंढरीस ॥४॥
- पदी मिठी द्यावयास, भक्तमेळा राऊळास ॥५॥
- महाद्वारी कृष्णदास, देवभक्त मिठी खास ॥६॥
✦ ✦ ✦
१९८
- वद वद वाचे, नाम विठ्ठलाचे |
- तन हे रोमांचे, नाम घेता ॥१॥
- विठू सावळ्याचा, ठसा अंतरंगी |
- रंगे नामरंगी, भक्तराय ॥२॥
- हृदय ते राऊळ, अनाहत टाळ |
- भान काळ वेळ, लोपतसे ॥३॥
- विठ्ठलाचा ठसा, उमटला खासा |
- विठूहृदयी ठसा, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
१९९
- वीटेवरी देव, बहरला भाव |
- पंढरीचा देव, साक्षात तो ॥१॥
- भाव परिसीमा, अश्रूंसी ना सीमा |
- उचंबळे प्रेमा, भक्ता मनी ॥२॥
- ध्यानी धरियेला, तोचि पाहियेला |
- तेणे निवांतला, भक्तराज ॥३॥
- भाव मनी दाटी, पदी घाली मिठी |
- तेणे हो संतुष्टी, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
२००
- संग विठोबाचा, संग तो नामाचा |
- संग हा भक्तांचा, पंढरीत ॥१॥
- गाती ते नाचती, टाळ दोहीं हाती |
- आनंदें गर्जती, विठू नाम ॥२॥
- पहा विठ्ठलाचा, भक्त झाला धीट |
- विठूपायी वीट, संसाराचा ॥३॥
- पहा वीटे थेट, मिठी घाली तेथ |
- मंद तो स्फुंदत, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
२०१
- अंतरी जिव्हाळा, भावाचा उमाळा |
- तो विठू सावळा, वीटेवरी ॥१॥
- जरी तो सावळा, लावण्य पुतळा |
- वेधी भक्तमेळा, भीमातीरी ॥२॥
- वैजयंती माळा, रुळतसे गळा |
- पितांबर पिवळा, शोभतसे ॥३॥
- मिटुनिया डोळा, हासतसे भोळा |
- मिरवीत टिळा, कस्तुरीचा ॥४॥
- सावळ्याचा लळा, प्रेमाश्रू डोळा |
- भक्त हा आगळा, कृष्णदास ॥५॥
✦ ✦ ✦
२०२
- वीटे दिसे रूप, व्हावे एकरूप |
- तेंचि ते स्वरूप, आत्मयाचे ॥१॥
- भान लोपे मीचे, तैसे जगताचे |
- सत्य हेचि साचे, विठू भेट ॥२॥
- भेट सगुणाची, भेट निर्गुणाची |
- मेख विठोबाची, दर्शनी या ॥३॥
- ब्रह्मांडाचा घोट, घेतसे ही वीट |
- पदी एकटक, कृष्णदास ॥४॥
✦ ✦ ✦
२०३
- विठ्ठल दर्शनी, पुरलीसे धणी |
- संपूर्ण जाहली, वारीची पर्वणी ॥१॥
- धुंदीत चाललो, अनवाणी आलो |
- भक्तीत न्हालो, मार्गामाजी ॥२॥
- जरी वारकरी, संगे ते अपारी |
- मनी तो श्रीहरी, एकमेव ॥३॥
- हरी हरी हरी, मंद एकतारी |
- गर्जे हरी हरी, टाळ सर्व ॥४॥
- नाद हरिमय, तन हरिमय |
- मन हरिमय, विश्व सारे ॥५॥
- विश्वाचा पसारा, वीटे मावळला |
- मीपणे गळाला, कृष्णदास ॥६॥
✦ ✦ ✦
२०४
- सावळ्याच्या आत, अति सावळा |
- रिघ स्थळ काळा, नाही तेथ ||१||
- जाता आत आत, किती ते खोलात |
- नाही त्यास अंत, डुबी देता ||२||
- विश्वोद्गम स्थान, जे अति गहन |
- तेथ जाई मन, ध्यान देता ||३||
- विश्वाचा जनिता, ध्यास त्याचा घेता |
- जाहला ग्रासिता, कृष्णदासा ||४||
✦ ✦ ✦
॥ हनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆