ॐ
॥ श्री योगी अरविंद ॥
श्री योगी अरविंद
ॐ
- अरविंद घोष नव्या युगाचे, होती योगी अरविंद
- क्रांतिकारकातील क्रांतिमय बदल तो, कारण भेटला गोविंद
- मानसातुनी अतिमानसी, माणसातुनि दिव्यत्वी
- प्रवास त्यांचा कळतो, वाचिताची सावित्री
- उपनिषदावरी भाष्य अन् विविध लेखन उद्बोधक अति
- वाचकांसी न कळे ती तो, बुद्धीची त्या किती मिती
- लेल्यांसम हा गुरु भेटला अन् माताजी शिष्या गुणी भली
- पॉंडिचेरीच्या समाधिस्थ योग्या, नमस्कार माझा शतोगुणी
कृष्णदास
✦ ✦ ✦
मौन विसावले
- शब्दप्रभू योगी । श्रीअरविंद जगी । प्रज्ञा होय जागी । ‘अतिमानसी' ॥१॥
- जीवांची उत्क्रांति । दिव्यत्व प्रचिती । हेतू हाचि चित्ती । धरिलासे ॥२॥
- एकांती मौनात । साधना करीत । साधावया हित । विश्वाचे गा ॥३॥
- चेतनेचा स्तर । झेपावला वर । स्पर्शला सत्वर । ‘सुप्रा-मानसी' ॥४॥
- यत्न अविरत । सिद्धीस तो जात । ‘अवतरण' होत । कृष्णप्रभू ॥५॥
- ‘सिद्धि-दिन' ख्यात । भक्त आश्रमात । साजरा करीत । उत्साहात ॥६॥
- मौनातून आले । ‘सावित्री'ते ल्याले । दिव्य प्रकटले । शब्दब्रह्म ॥७॥
- दिव्य ईश्वरीय । हिरण्मय काय । होण्यासी उपाय । विशद तो ॥८॥
- दिव्य हो जीवन । ‘पूर्णयोगे' पूर्ण । जगत्-कल्याण । शुभेच्छा ती ॥९॥
- मौन शब्दावले । ज्यांनी अभ्यासिले । शब्द मौनावले । तयांचे गा ॥१०॥
- ऐसा क्रांतिसूर्य । थोर ऋषिवर्य । असे गुरुवर्य । साधकांसी ॥११॥
- कार्य ते जाहले । ‘मौन विसावले' । युग अस्तवले । कालातीत ॥१२॥
- नीरव प्रगाढ । विद्युन्मय काय । स्थिरावली माय । अंती ती गा ॥१३॥
- चिरंतन ध्यान । चिरंतन मौन । केले चिरस्थान । पाँडिचेरी ॥१४॥
- निगूढ गंभीर । असे परिसर । मन होय स्थिर । क्षणामाजी ॥१५॥
- स्पंद हो नि:स्पंद । उसळे आनंद । करीतसे धुंद । आगतांसी ॥१६॥
- ऐसें क्रियाशील । समाधीचे स्थल । अस्तित्व जाज्वल । भारती या ॥१७॥
- ऐसें श्रीअरविंद । स्मृति ती सुखद । महत्ता विशद । कैसी होय ॥१८॥
- होता ते स्मरण । स्थानी जाय मन । समीप आसन । निवांतलो ॥१९॥
- शब्द पांगुळले । मन ते विराले । मौनेचि वंदिले । योगीवरा ॥२०॥
- ‘मौन विसावले' । ‘मौन विसावले' । वंदितो पाऊले । कृष्णदास ॥२१।
✦ ✦ ✦
॥ निजबोधमठी गुंजारव गीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆