॥ आदिशक्ति श्रीमुक्ताई ॥

आदिशक्ति श्रीमुक्ताई गौरव

श्रीमुक्ताई
आदिशक्ति श्रीमुक्ताई गौरव
  • सिद्धबेटी लावुनि ताटी, बैसली आत, आज ज्ञानाई उदास उदास
  • कळेना तिघा भावंडा इतर, कारण झाले काय त्यांस ॥१॥
  • झोळी लावुनि काखे, गेली असता भिक्षेस
  • ना घालुनि भिक्षे, खळे अवमानिले, कटू हीन शब्दे आज त्यांस ॥२॥
  • कोमले बाल हृदयास, साहवले ना तीक्ष्ण वाग्बाणांस
  • परतले कुटीत खिन्न मने, झोळी आज रिकामीच खांद्यास! &॥३॥
  • विटले मन अतिशय अन् जनसंबंध नकोसा झाला आज
  • लावुनि ताटी आत एकटे घेतले कोंडुनि, स्वत:सीच स्वत:स ॥४॥
  • ध्यानमग्न ते मिटले डोळे, जरी अन्नाचा कण नसे पोटास
  • वाटले असेल काय बालह्रदया, स्मरले असेल मायपित्यास ॥५॥
  • कां दु:ख हे पदरास, अन् दुष्ट बुद्धी ही खळांस
  • जळ भरले नयनांस, ना साहवे दु:खास ॥६॥
  • काय काय ते विचार उमटले असतील मन:पटलास
  • वेदनेतही परि विश्व करुणा उफाळलीसे हृदयास ॥७॥
  • कुटीत बंद झाला होता आज ज्ञानाचा प्रकाश अन्
  • बाहेर पसरला विश्वात, भर माध्यान्ही,
  • अज्ञानाचा काळकूट अंध:कार! ॥८॥
  • निरसण्या अज्ञान दु:ख जनांचे अवनीवरी
  • असे ना दुजा सक्षम जो आज पेलेल या शिवधनुष्यास ॥९॥
  • जनार्दने पाठविले असे ज्यांसी जन उध्दारास
  • कसे पाववावे बरे त्या दु:खी मना समाधानास? ॥१०॥
  • गुरुराय निवृत्तीने दिली अंत:प्रेरणा, लहानग्या बहीणीस
  • झाली मुक्ताई पुढे, पुसाया त्या ज्ञानदादाच्या आसवांस ॥११॥
  • बाळ ज्ञान मन सांत्वनास, बोले मुक्ताई ज्ञान बोलांस
  • ‘‘ज्ञानदादा तू रे ऐसा होऊ नकोसी उदास
  • तुजवीण ना कोणी जगी, या जना उद्धरण्यास’’ ॥१२॥
  • चिमुकल्या मुक्ताईचे बोल चिमुकले
  • शांती क्षमा दयेचे जणू ओतले ॥१३॥
  • काय अधिकार तिचा, मोजक्याच शब्दांत
  • साधना अन् बोधाचे मर्म उकलिले ॥१४॥
  • भावगर्भ शब्द जंव कानी ते पडले
  • दु:खी ज्ञानाईसी तत्काल भानासी आणिले ॥१५॥
  • ‘अरे आज कैसे मज माये व्यापियेले
  • ब्रह्मबोधावरुनि मन खाली रे हटविले ॥१६॥
  • क्षुद्रतेने मज बुद्धीसी व्यापुनिया
  • अद्वैतातुनि कैसे रे द्वैतात आणियेले ॥१७॥
  • मुक्ते तुवां मज डोळा आज अंजन घातले’
  • क्षमा करुणा वसंती पुन:, ज्ञान हृदय पालाविले ॥१८॥
  • खाडकन् ताटीचे द्वार ते उघडले
  • चिमुकल्या मुक्ताईसी ज्ञानदादे कडेवरी घेतले ॥१९॥
  • ज्ञानाचे तेज विश्वी लख्ख लख्ख फाकले
  • लहानग्या मुक्ताईचे मन आनंदे धाले ॥२०॥
  • आर्त मनीचे ज्ञानाईचे, उपदेशी प्रकटले
  • ज्ञानेश्वरी बोले, विश्वा ब्रह्मद्वार उघडिले ॥२१॥
  • ताटीचे अभंग ज्या मुखावाटे प्रसविले
  • गुणकीर्ती गाऊनिया आपण पाहिजे तिसी नमिले ॥२२॥
  • माऊलीच्या कुशी आज, सारे विश्व विसावले
  • कृष्णदास म्हणे श्रेय, पाहिजे मुक्ताईसी दिले ॥२३॥
  • ✦ ✦ ✦
॥ भक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा