१
- अक्कलकोटी स्वामी समर्थ, देखिला ना दुजा समर्थ
- दत्ताचा तो अवतारचि केवळ, योगिराज श्री स्वामी समर्थ
- गाणगापुरीचा नृसिंहमुनी, म्हणुनि नाव नृसिंहभान
- कधीही ना कुणी पाहिले, असता यांना देहभान
- वटवृक्षातळी बैठक त्यांची, भक्त दर्शना जाती फार
- प्रत्येकासी दाखविती ते, वेगवेगळे चमत्कार
- बाह्य कठोर वर्तन दर्शविती, परि अंतर त्यांचे प्रेमळ फार
- भक्तां उद्धरण्या सदैव लक्षिती, हित हो त्यांचे वारंवार
- कृपाशीर्वाद लाभता होते, जीवन नौका सहजी पार
- पवित्र चरणांवर त्यां मी नमितो, करुनी शिरसाष्टांग नमस्कार
✦ ✦ ✦
२
- स्वामी समर्था तुझे लेकरु, मग मी कां ती फिकीर करु
- समर्थ नामी तव या रमता, संसाराची काळजी करु
- तव कृपेचा वारा सुटता, भयचिंतादी वार्ता दुरु
- कृपेच्या तव अमृत प्राशनी, आत्मरुपी या अमर रमू
- आत्मरुपाच्या आनंदात, कृष्णदास निजे लेकरु
✦ ✦ ✦
३
- प्रज्ञापूर निवासी, नमन भावे स्वामींसी
- बैसलासे अखंड, वटवृक्षातळीसी
- दर्शनार्थी भक्तांचे, मनोगत जाणिसी
- कृपाळूपणे तू, हेत त्यांचे पुरविसी
- अखंड स्वानंद, स्थितिते तू रमसी
- सत्शिष्या कृपे ते, दान तेचि देसी
- दु:खी जीवांसी, कृपादृष्टी पाहसी
- दयाळूपणे तू, दु:खे त्यांची हरसी
- कृष्णदास स्वामींच्या, जाता दर्शनासी
- कमंडलूसी त्या, दान ते मागसी
- मीपण त्यात,समर्पिले सत्वरसी
- समर्थे तोषोनि, ओपिले कृपेसी
- स्वानंद भान, करि झेलितासी
- नमन करुनी, स्वामी चरणांसी
- नमनी अमनी, स्वानंदी कृष्णदासी
✦ ✦ ✦
४
- स्वामी समर्थ स्वामी समर्थ, चला रमूया नामी समर्थ
- गाता ध्याता नामी रमता, प्रगटतील श्री स्वामी समर्थ
- माता पिता सखा भ्राता, सर्वची मजसी स्वामी समर्थ
- एक्या भावे त्यांसी भजता, उद्धरतील श्री स्वामी समर्थ
- रात्रंदिन या नामी रमला, कृष्णदास श्री स्वामी समर्थ
✦ ✦ ✦
५
- वटवृक्षातळी, बैसले स्वामी
- भक्त सामोरी, गर्जती नामी
- स्वामी समर्थ, समर्थ स्वामी
- दर्शना आलो, मायबाप तुम्ही
- कनवाळूपण, जाणोनी मनी
- पापताप आमुचे, शमवी या क्षणी
- कोमल पाडसा, धेनु तू स्वामी
- अंत न पाहता, येई पान्हावुनी
- प्रार्थुनि ऐसी, करी विनवणी
- सद्गदित अंतरी, अश्रु ते नयनी
- भाव हो जागृत, हृदय हेलावुनी
- करुणेचा पाझर, फुटलासे स्वामी
- कृष्णदास चरणी, जाई लोटांगणी
- कृपामृत प्राशनी, स्वानंद भानी
- शरण स्वामींसी, नमितो चरणी
✦ ✦ ✦
६
- ध्यानी मनी श्री स्वामी, गुरुराय समर्थ स्वामी
- नित्य त्यांसी मी नमी, आजानुबाहू श्री स्वामी
- मूर्ती अत्यंत साजिरी, दृष्टी वेधक अंतरी
- कृपामृत वर्षा करी, कृष्णदास चरणी शरणी
✦ ✦ ✦
७
- स्वामी समर्था ध्यानी कल्पिले, अवचित समोर उभे राहिले
- प्रेमळ स्वामी मूर्ति पाहता, नयनातुनी मम अश्रू वाहिले
- स्मरणेचि ते प्रगट होता, स्मर्तृगामी हे दत्तचि गमले
- स्वामी समर्थ स्वामी समर्थ, कृष्णदास त्या नामी रमले
✦ ✦ ✦
८
- स्वामी आले, मन हे धाले, दर्शन करता, तृप्त निवाले
- बाहु जानूसम, सुवर्ण कांति, कमल नयनांतून प्रेम वर्षिले
- शिरसाष्टांगी नमस्कारिता, कृपा स्पर्शे मी पुनित जाहले
- आशीर्वाद त्या मंजुळ वाणी, ऐकुनी कर्णी तृप्त जाहले
- स्वामी समर्थे दर्शन देता, कृष्णदास धन्य जाहले
✦ ✦ ✦
९
- भावबळे मी तुम्हा आळवितो, स्वामी समर्था तुम्हां ध्यातो
- कृपाछाया तुमची मिळण्या, कुशीत शिरण्या मी धडपडतो
- अज्ञ लेकरु तुझे वासरु, कामधेनूपरी तुम्हां पाहतो
- कृपामृत पय पान्हा सोडण्या, वारंवार मी तुम्हां प्रार्थितो
- अमृतासम ते पय हो पिऊनि, कृष्णदास स्वानंदी रमतो
✦ ✦ ✦
१०
- भाव नाही अंतरी, कोरडा पाषाणापरी
- स्वामी समर्था तुजसी, प्रार्थू कैशापरी
- तव नामाचे प्रेम, नाही मम अंतरी
- काम क्रोध मोहे, मी विटाळल्यापरी
- रुप तुझे पाहू ऐसी, न निर्मलता दृष्टीपरी
- कृपा तुझी पावू, नाही सद्गुण एकही परी
- मग कैशा परी आळवू, तुम्हां समर्था तरी
- स्वामी कथितो तुम्हां परी, दयाळू तव कृपेची ना सरी
- कृष्णदास शरणी जाण, स्वामी उभवी कृपाकरी
✦ ✦ ✦
११
- प्रज्ञापूरीचे, स्वामी समर्थ
- वर्णाया सामर्थ्य, मति असमर्थ
- भाव मनींचा, अन् शुद्ध हेत
- उमटतसे थेट, स्वामी हृदयात
- कारण तो होई, कृपामृता स्त्रोत
- प्रचंड अपार, त्याचा असे लोट
- वाहुनी जाई माया, जीवभाव थेट
- जीवाची करतसे, आत्म्याशी भेट
- शरणागतासी, उद्धरी त्वरित
- कृष्णदास शरणी, उद्धरला तेथ
✦ ✦ ✦
१२
- स्वामी समर्थ, जपे नाम नित्य, कळिकाळा ठाव, नुरतसे तेथ
- स्वये स्वामीराय, रक्षितो भक्तांस, वारितो कृपेने, भक्त संकटास
- कृष्णदास जपे, स्वामी नाम नित्य, तोषोनि झाला, स्वामी कृपावंत
✦ ✦ ✦
१३
- कृपाळू स्वामीनाथ, दे साधकांसी हात
- काम क्रोध गर्तेत, बुडता त्वरित देई हात
- मोहमाया गुंत्यात, फसता सोडवी त्वरित
- नाम तुझे राहो, अखंड मम जिव्हेत
- रुप तुझे राहो, अविरत मम हृदयात
- स्फुरण तुझे राहो, अखंड मम हृदयात
- कृपाछत्र राहो, अखंड शिरी ठेवी हात
- देहभाव जावो, राहो अखंड आत्मरुपात
- तव पुण्यतिथीसी उठे, प्रार्थना ही हृदयात
- कृष्णदास प्रार्थी तात, स्वामी आशीर्वादाचा हात
✦ ✦ ✦
१४
- श्री समर्थ स्वामीराया, प्रगटलासी वारुळी का या?
- निर्विकल्प समाधीसी, त्यागिलेसी कर्दळीवनासी
- कारण ते जाणितो मी, भक्तांची कणव तुजसी
- परतलासे तू अनंत, भोळे भक्त उद्धरण्यासी
- प्रार्थिता बाळ तुजसी, आता कां रे लपतोसी
- कृष्णदास विनवितो, प्रगट हो हृदयासी
- वास तेथ करी अखंड, निर्विकल्प समाधीसी
✦ ✦ ✦
१५
- अक्कलकोटी स्वामीराया, नमन माझे तुझिया पाया
- अवधूत दिगंबर, अवतार रुपे तुझिया
- कामक्रोध अनिवार, दवडिसी निमिषभराया
- रुप तुझे मनोहर, पुष्प वर्ण गौर काया
- दर्शन दे त्वरित, निववी नेत्र लवकरी या
- कर्ण आसुसले आता, वाणी मंजुळ ऐकावया
- आजानुबाहू देह, उभवी थोर कृपा कराया
- पुरवि माझी आस त्वरित, दर्शना ये धावुनिया
- शब्द मुखासी न उमटे, गळा येता दाटुनिया
- कृष्णदास विनवितो, देहभान विसरुनिया
- कृपा करा कृपा करा, श्री समर्थ स्वामीराया
- नको पाहु अंत असा, जाण भावा मनाचिया
- येरे येरे धावुनिया, श्री समर्थ स्वामीराया!
- येरे येरे धावुनिया, श्री समर्थ स्वामीराया!!
✦ ✦ ✦
१६
- कृपाळू स्वामीराया, दयाळू स्वामीराया
- कामधेनु होऊनि तू, पोशितसे भक्तां या
- भक्ततृषा हरवितसे, सत्रावीच्या देऊनी पया
- निजानंदी निजविसी, स्वानंदभान देवोनिया
- कृष्णदास स्वामी कुशी, बाळ माथा स्वामी अंकी
- पहुडलासे निजानंदी, निजतसे स्वानंदी
✦ ✦ ✦
१७
- चला चला अक्कलकोटासी, स्वामीराय दर्शनासी
- दर्शन घेऊ चला, वटवृक्षातळीसी
- विशाल वटवृक्ष, शीतळ छायेसी
- त्रिविधताप भानूचे, भय न छायेसी
- होऊ श्रांत मनी तेथ, विसावा घेताचि
- दु:ख आपुले कथुनि होऊ, मोकळे मानसी
- चरणांवरी शरण जाऊनी, वाहू भार स्वामींसी
- कृष्णदास होई शरण, वटवृक्षस्वामींसी
- स्वामी समर्थ स्वामी समर्थ, नाम त्याचे मुखासी
✦ ✦ ✦
१८
- श्री समर्थ स्वामीराया, पाचारितो तुजसी या या
- हृदयसिंहानावरी, विराजित सत्वरी व्हा या
- आसन मम हृदयाचे, सुशोभित सुंदरसे
- मखमली गादीवरी, भाव फुली सजविलीसे
- तुमच्याची नामाचा, शीतल वारा अखंड
- घालिता कृष्णदास, हृदयी शीतल प्रचंड
✦ ✦ ✦
१९
- श्री समर्थ स्वामीराया, योगिराज गुरुराया
- निर्विकल्प समाधीसी, शिष्या देसी अनुभवाया
- काही न मागतोसी, शुद्ध भाव पाहतोसी
- कृपाकरे स्पर्श करोनि, निर्विकल्पी बुडवतोसी
- सर्वज्ञ तू जाणतोसी, शुद्ध भाव अंतरीसी
- कृष्णदास इच्छा करी, स्वामी भेटी निर्विकल्पीसी
✦ ✦ ✦
२०
- श्री समर्थ स्वामीराया, नामघोष करु या या
- वटवृक्षातळी जमुनि, चला नाचू गाऊ या या
- शुद्ध भावे स्वामींसी, आणू देहभानी या या
- कमलनयन उघडताचि, कृपादृष्टी न्हाऊ या या
- अमृतकिरणी न्हाताची, पवित्र होई काया या
- पवित्र ते देह सुमन, स्वामी चरणी वाहू या या
- कृष्णदास पवित्र सुमन, स्वामी चरणी पडता या
- तोषोनि प्रसन्नचित्त, कृपाकरे स्पर्शिता काया
- विकल गात्र सद्गदित, देहभान विसरुनिया
- अंग अंग रोमांचित, गाती अखंड स्वामीराया
✦ ✦ ✦
२१
- श्री समर्थ स्वामीराया, लपविलीसे तू काया
- बोल परी एक माझे, लावीन तुजसी प्रगट व्हाया
- नामघोष भावबळे, गमशील निरुपाया
- स्वामी दर्शनी कृष्णदास, स्वामी समर्थ ठाया ठाया
✦ ✦ ✦
२२
- श्री समर्थ स्वामीराया, श्री समर्थ स्वामीराया
- कृपा असो मजवरी, नाम अखंड तुझे गाया
- नाम घोषी अखंड तुजसी, पाहीन निज हृदया या
- कृष्णदास हृदयीच, वास अखंड स्वामीराया
✦ ✦ ✦
२३
- श्री समर्थ स्वामीराया, नृसिंहभान स्वामीराया
- करवीरी धाडिले तू, कृष्ण सरस्वती गुरुराया
- प्रज्ञापूरी उग्र रुप, करवीरी बाल भावा
- कृष्णदास प्रर्थितो, रुपे दोन्ही मजसी दावा
✦ ✦ ✦
२४
- तू स्वामी मी दास, स्वामी समर्थांचा मी दास
- दास नव्हे हा ऐसा तैसा, असे मी कृष्णदास
- ज्याच्या हृदयी असे नित्य, स्वामींचाची वास!
✦ ✦ ✦
२५
- श्री समर्थ स्वामीराया, प्रगटलासी भूलोका या
- त्रिविधताप वैशाख वणवा, पोळील भक्त जन आघवा
- तापातुनी रक्षायासी, चैत्र शुद्ध द्वितियेसी
- अवतार दिगंबर, नृसिंहभान नामासी
- युगायुगी अवतरसी, कृष्णदासा उद्धरसी
- कलियुगी भक्तांसी, दर्शन वटवृक्षातळीसी
✦ ✦ ✦
२६
- स्वामीराया स्वामीराया, श्री स्वामी समर्थ
- भवसागर तरण्यासी, नौका नामी समर्थ
- बुडण्याचे भय तिजसी, असे ना किंचित
- सुकर्णधार तूचि असता, भरकटण्याची काय बात
- वादळी तुफानीही, समर्थ अविचल हात
- नामगानी तल्लीन होता, काळाचेही भान न उरत
- नाम घोषी आनंद होता, प्रवासही होई मजेत
- कृष्णदास पोहोचला, नौकेतुनि परतीरात!
✦ ✦ ✦
२७
- श्री समर्थ स्वामीराया, पंढरीच्या विठूराया
- सव्य हस्त सोडिलासी, निज भक्तां कृपा कराया
- समचरण पादुकांवरी, जो शोभिती विटेवरी
- रुद्राक्षांची माळ गळा, शोभितसे वैजयंती परी
- शिरावरील टोपी सुंदर, जणू की त्या मुकुटापरी
- गौरवर्णी तनू सुंदर, कृष्णवर्णी सावळा सुंदर
- दर्शनी निवती नेत्र, जसे की विठूराया
- कृष्णदास हरपे भान, दर्शनी दोन्ही मूर्ति सुंदर
- प्रज्ञापुरी पंढरपुर, पंढरपुरी प्रज्ञापुर
- स्वामीराय विठूराय, अभेद ते अवतार!!
✦ ✦ ✦
२८
- श्री समर्थ स्वामीराया, देई दर्शन त्वरित बाळा या
- त्रिविधताप पोळीतसे, होई दाह मज काया
- दृश्यातील नश्य सारे, नेत्रा शीण पाहता या
- दर्शनी शमतील नेत्र, स्पर्शनी हो शीतल काया
- कृष्णदास भाकितसे, स्वामींसी करुणा या
- या या हो सत्वर या, दर्शन द्या स्वामीराया
- श्री समर्थ स्वामीराया, श्री समर्थ स्वामीराया
✦ ✦ ✦
२९
- श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
- स्वामी समर्थांचा असे, महान हा मंत्र
- दशेंद्रिये अन् चंचल अकरावे ते मन
- लगाम त्यांना घालण्यासी, सुगम याचे तंत्र
- मनोजय साधण्यासी, जपा अहोरात्र
- कृष्णदास अखंड अविरत, जपतो दिव्य मंत्र
✦ ✦ ✦
३०
- शुद्ध भाव विडा स्वामींसी अर्पिला
- चघळीता तोषे रंग मुखासी आला
- तोषोनिया स्वामींनी आशीर्वाद दिधला
- कृपाआशीर्वादे कृष्णदास आत्मरंगी रंगला
✦ ✦ ✦
३१
- विडयानंतर स्वामी मागताती दान
- दासासी न कळे कैसे ठेवावा तो मान
- स्वामींसी ना देहभान, दासा न कळे काय द्यावे दान
- देहभावाचे ते अंती देता दान, कृष्णदासापाशी उरे आत्मभान
✦ ✦ ✦
३२
- स्वामींसी गाऊ शेजारती, सुखे स्वामी निद्रा करती
- निद्रा कैसी अखंड जागृति, शेजारती ही उपचार रिती
- मिटल्या नेत्री स्वामी अंतरी लक्षिती
- कृष्णदासा अर्पिती आत्मभान जागृति
✦ ✦ ✦
३३
- आरती करितो स्वामी समर्था
- नमितो तव अगणित सामर्थ्या
- करुनी जीवपणाचा अंत
- रमवी आत्मस्वरूपी आर्ता
- संसाराच्या टाळी अनर्था
- आत्मरुपाच्या जाणवी अर्था
- पावन नाम तव मधुर पदार्था
- रसना अविरत सेवी अधीरता
- नामाची तव चवी चाखता
- भान विसरवी स्वामी सत्ता
- दासा तारक समर्थ सत्ता
- कृष्णदास नमितो तव दत्ता
✦ ✦ ✦
३४
- स्वामी समर्था तुला प्रार्थितो मी,
- कुठे येऊ घ्याया तुझ्या दर्शना मी
- ना येथे ना तेथे ना दिसे तू कुठे ते,
- धावधाव करिता अति शीण होतो
- इच्छा मनीची तू न का रे जाणतो,
- तरी दर्शना विलंब कशासी तू करितो
- विडा तू मजसी कशाकारणे मागतो,
- मनीचा तव हेतू मजसी ना कळतो
- कृष्णदास बाळ समर्था तुला रे प्रार्थितो,
- विडा देऊनि दर्शनासी इच्छितो
✦ ✦ ✦
३५
- स्वीकारुनि विडा स्वामी टाळा इडापिडा,
- षड्रिपु असुरांसी धरुनिया ताडा
- कृपे सारा सत्वरी देहभावाची पिडा,
- कृष्णदास रंगी रंगे चघळिता आत्मरुपी विडा
✦ ✦ ✦
३६
- चला चला करण्या स्वामींचा धावा
- विनवुया स्वामी लवकरी पावा
- प्रेमळ वेधक मूर्ति प्रत्यक्ष मजसी दावा
- कृपाहस्त मस्तकी लवकरी तव ठेवा
- अनुभवीन मग अनुहाती ध्वनी कृष्णपावा
- रमवी त्यात मजसी मग मी वारीन देहभावा
- मी तू पण त्वरित तेणे मिटे तो दुरावा
- कृष्णदास इच्छितो दास, तुजसी एकरुप व्हावा
✦ ✦ ✦
३७
- स्वामी तूचि एक आधार, जगता तूचि एक आधार
- वटवृक्षातळी बैससी परि, जगा सूत्रधार, तूचि जगा सूत्रधार
- शरणागतासी अखंड वर्षे, तव कृपेची नितधार, स्वामी तव कृपेची नितधार
- कृष्णदास प्रार्थितो तुजसी करु नको, दर्शना विलंब फार, स्वामी दर्शना विलंब फार
✦ ✦ ✦
३८
- स्वामी गातो तव गाणे, ऐकवितो मनीचे तराणे
- पवित्र सुमधुर तव नामी त्या अखंड इच्छितो रमणे
- रमता नामी रमता ध्यानी, स्वामी त्वरित दर्शन मज देणे,
- कृष्णदासा त्वरित दर्शन देणे
✦ ✦ ✦
३९
- स्वामी कृपावंत, बाळ भाग्यवंत
- लेकरु असमर्थ, परि माता समर्थ
- अज्ञानी दास, परि ज्ञानी समर्थ
- श्री स्वामी कृपांकित, कृष्णदास समर्थ
✦ ✦ ✦
४०
- देवगुरु मातापिता प्रेम एकी सामावले
- श्री स्वामी समर्थ रुपे आकारले
- शरणागती कृपेचे कवच उभारिले
- कृपेने त्या लक्षावधी उद्धरिले
- कृष्णदासही त्यात उद्धरुनि गेले!
✦ ✦ ✦
४१
- स्वामी समर्था तुला आदरे स्मरु,
- आम्ही सर्व बाळे तुझे लेकरु
- संसारचिंतेने हा जीव घाबरु,
- मोहव्याळी डसता अति कळवळू
- तुजविण दुजा कुणा हाक मारु,
- टाहो फोडिते हे ऐक लेकरु
- कृष्णदास विनवितो धाव लवकरु,
- कडे उचलुनि पाववी परतीरु
✦ ✦ ✦
४२
- भिऊ नको षड्रिपुंसी, मी आहे तुझ्या पाठीशी
- अक्कलकोटीचा समर्थ गुरु हा साधकांसी उपदेशी
- बलाढ्य शत्रू नामोहरम ते क्षणात मज कृपादृष्टीसी
- कृपादृष्टी लाभे तुजसी, शरण जेव्हा तू मजसी
- श्री स्वामी समर्थांच्या ऐकुनिया अभिवचनासी
- कृष्णदास चरणी शरणी जाऊनिया रत साधनेसी
✦ ✦ ✦
४३
- चैत्र शुद्ध द्वितियेसी कर्दळीवनी प्रकटले
- निर्विकल्प स्थिति त्यागुनि भक्तोद्धारा खाली आले
- बहुत क्षेत्रे संचारुनि प्रज्ञापुरी निवसले
- अनंत भक्तजन वटवृक्षातळी आले
- आशीर्वादे समर्थांच्या जीवनी धन्य झाले
- समर्थ स्वामी म्हणुनि जगी जे नावाजले
- समर्थ स्वामींसी या कृष्णदासे भावे नमिले
✦ ✦ ✦
४४
- घेई धाव स्वामीराया, बाळ तव करितो धावा
- पाणावल्या नेत्रां दोही, रूप तव दाखवि राया
- सर्वज्ञ तू स्मर्तृगामी त्रिभुवनी संचारसी
- धाव धाव आळविता आता कां न त्वरे येसी
- भाव मनींचा हा माझ्या, जरी असे उणापुरा
- भक्तवत्सल नामे तुझा गवगवा प्रज्ञापुरा
- भक्त तुझा कृष्णदास, झाला पहा आज उदास
- चैत्र शुद्ध द्वितीयेस, आळवितो समर्थास
- स्वामी स्वामी स्वामी स्वामी नामजपे हृदयास
- प्रकटदिनी तव या प्रकट व्हावे हाचि ध्यास
✦ ✦ ✦
४५
- नाम गाऊ नाम गाऊ स्वामी समर्थांसी ध्याऊ
- कृपा आशीर्वाद पावू तेणे जगी धन्य होऊ
- स्वामी माता बाळ आम्ही स्वानंदाचा खाऊ खाऊ
- कृष्णदास म्हणे त्वरे, चला प्रज्ञापुरी जाऊ
- स्वामी स्वामी स्वामी स्वामी, वाटे त्यांचे नामगाऊ
✦ ✦ ✦
४६
- चला लगबग करा लगबग
- वटवृक्षातळी माय स्वामी ते बघ, माझे स्वामी ते बघ
- दर्शनासी त्यांच्या माझी होई तगमग, जीवा होई तगमग
- धीर किती धरु मज कळेना बघ, मज कळेना बघ
- माता असे दूर देशी, बाळ झाले परदेशी
- बाळाची ती विरहव्यथा, जाणवे ना का मातेसी
- माय स्वामी समर्थासी, कृष्णदास परदेशी
- धावे धावे भेटण्यासी, लगबग लगबग…
✦ ✦ ✦
४७
- वटवृक्षातळी स्वामी माझे, वटवृक्षातळी स्वामी माझे
- दत्त दिगंबर रुप साजे, दत्त दिगंबर रुप साजे
- चैतन्याची मूर्ती, भानावरी ना जे,
- देहाकार जरी दिसे विश्वाकार परि जे
- कंठी तुळसी माळ कर्णी कुंडले, भाळी गंध असे रेखिले जे
- आजानुबाहू अन् लंबोदर, उग्र दृष्टी परि करुणाकर जे
- चला चला प्रज्ञापुरी, शुद्ध भाव घ्या सवे
- भक्तिभावा भुकेला जो, दत्तदेव नाही दुजे
- कृपेचे धन पावू, शरणागता उद्धरी जे
- कृष्णदास म्हणे भावे, नमू चरण पावन जे
✦ ✦ ✦
४८
- चला नमूया स्वामी समर्था, संसाराच्या टाळू अनर्था
- परमार्थाच्या साधू अर्था, आत्महिताच्या साधू स्वार्था
- सर्व दु:खांचा तोचि हर्ता, सर्व सुखाचा तोचि कर्ता
- सांडुनि साऱ्या तर्कवितर्का, भजा भजा हो स्वामी समर्था
- हृदयी भाव पुलकित आर्ता, स्मरणे नेत्रा अश्रूपूरिता
- कृष्णदास हा सद्गद भावे, नमितो योगी स्वामी समर्था
✦ ✦ ✦
४९
- निशिदिनी रमतो स्वामी नामी, प्रज्ञापूर धामी
- समर्थ सद्गुरु स्मरतो प्रेमे, अक्कलकोट स्वामी
- आनंदात विसरतो नित्य, स्वामी मूर्ती ध्यानी मनी
- वटवृक्षातळी मूर्ती बैसली अखंड, स्थितित ही अमनी
- दत्तात्रयगुरु श्रीपादश्रीवल्लभ पुढे रुप श्री नृसिंहमुनि
- तेचि श्रृंखला अवतरली रुपे अक्कलकोट स्वामी
- चैत्र शुद्ध द्वितियेसी प्रगटली जी जगदुद्धारालागुनि
- कृष्णदास नमितो नित्य ती भावे हृदयातुनि
✦ ✦ ✦
॥ समर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆