जन्म: श्रावण शुद्ध चतुर्दशी शके १८४७ – दि.३ ऑगस्ट १९२५
महानिर्वाण: मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ – दि. २ डिसेंबर १९७१
संतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र
✦ ✦ ✦
श्रीबाबामहाराजांनी त्यांच्या कुठल्याही ग्रंथात त्यांचे चरित्र देण्यास मनाई केली होती. तसेच त्यांचे स्वत:चे वाङ्मय जरी सद्गुरुभक्तीने ओतप्रोत ओथंबलेले असले तरीही आपल्या सद्गुरुंबद्दलसुद्धा त्यांनी कधी वाच्यता केली नाही. तरीही बाबांचे शिष्य श्री. रंगनाथ स. उर्फ काका गोडबोले यांनी श्रीबाबांच्या दिव्यामृतधाराग्रंथात दिलेला परिचय पुढीलप्रमाणे आहे:
वर्धा जिल्हयातील आर्वी गावच्या एका धर्मशील व प्रतिष्ठित जोशी घराण्यात श्रीबाबांचा जन्म झाला. अत्यंत निस्पृह, सात्विक व निस्सीम दत्तभक्त प्रभाकरपंत हे श्रीबाबांचे वडील आर्वीला शिक्षक होते. श्रीबाबांच्या आध्यात्मिक जीवनास सुरुवात त्यांच्या वडिलांमुळेच झाली होती. श्रीबाबांच्या वडिलांनी त्यांच्याकडून अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून घेतला होता व त्यामुळे श्रीबाबांची आध्यात्मिक जडणघडण वडिलांद्वारे झाली होती. श्रीबाबांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी प्रभाकरपंतांना देवाज्ञा झाली. नंतर केवळ दोनच वर्षांनी श्रीबाबांनी गृहत्याग केला व गावातील दत्तमंदीरात वास्तव्य केले. त्याकाळात ते भिक्षान्नावर रहात असत. त्यानंतर काही महिन्यातच श्रीबाबांनी आर्वी सोडले व भ्रमंती सुरु केली. नाशिक श्रीक्षेत्री श्रीशंकराचार्यांच्या मठात वास्तव्य केले. त्याकाळात गोदातीरी स्नानानिमित्त येणार्या विविध पंथाच्या व आखाड्याच्या अनेक साधुसंतांचे दर्शन श्रीबाबांस झाले. तेथून श्रीबाबा पंढरपूरास गेले. तेथील काही काळ वास्तव्यानंतर त्यांनी उत्तरेस नर्मदाकिनारी ओंकारेश्वर गाठले. तेथे श्रीबाबांची भेट श्रीसद्गुरुंशी झाली असे त्यांच्या साधनासंहिता ग्रंथावरून दिसते. त्यानंतर श्रीबाबांनी वृंदावन गाठले व तेथे सुमारे अडीच वर्षांचा दीर्घ काळ व्यतीत केला. वृंदावन-मथुरा येथील वास्तव्यानंतर श्रीबाबा गंगाकिनारी हृषीकेशला गेले. तेथे स्वर्गाश्रमासमोरील एका कुटीत वर्ष दीडवर्ष राहिले. त्यानंतर काही काळ उत्तरकाशीस राहिले. हरिद्वार, हृषिकेश, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बद्रिनाथ, केदारनाथ अशी स्थाने पहात त्यानंतर श्रीबाबा नेपाळला गेले. तेथून पश्चिम बंगाल येथील श्रीरामकृष्ण परमहंसांचे दक्षिणेश्वर, कालीका माता या ठिकाणी निवास करून श्रीबाबा जगन्नाथपुरीस गेले. अशी अनेक तीर्थक्षेत्रे करीत नंतर श्रीबाबा महाराष्ट्रात परत आले. सप्टेंबर १९५४ साली साली श्रीअक्कलकोट स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात श्रीबाबांचे प्रथम प्रवचन झाले आणि त्यांची प्रसिद्धी अक्कलकोटला झाली. पुढे त्यांच्या प्रवचनामुळे सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढे आदि भागातील मंडळी श्रीबाबांना जोशीमहाराज म्हणून ओळखू लागली. त्यानंतर श्रीबाबा श्रीक्षेत्र माचणूर येथील सिद्धेश्वर मंदीराच्या जवळील श्री काशिनाथ महाराजांच्या समाधीजवळील पडक्या जुनाट ओवरीत रहात असत. नोव्हेंबर १९५५ च्या श्रीक्षेत्र माचणूर येथील चातुर्मास्यसमाप्ति महोत्सवाने त्यांची कीर्ति संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पसरली, इतका तो महोत्सव भव्योदात्त झाला. १९५६ साली श्रीबाबांचा चातुर्मास श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला. तेथेच वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी त्यांनी ‘साधनासंहिता’ हा आत्मानुभवाचा अमोल ग्रंथ लिहिला. १९५७ साली मुंबईतील लक्ष्मीनारायण बागेत साधनासप्ताह महोत्सवाने मुंबईतील लोकांना श्रीबाबांचा परिचय झाला. मुंबईत असताना दादर भागातील भिकोबा निवास येथील श्रीमती पुरोहित यांचे घरी श्रीबाबांचा निवास असे. सौ. पुरोहित काकूंस श्रीबाबांनी मातेप्रमाणे मानले होते व त्यांना ते काकू मॉं असे संबोधित असत. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर श्रीबाबांनी दिव्यामृतधारा हा बृहत्ग्रंथ लिहिला. श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले भक्ति, ज्ञान व योगाचे स्वानुभवान्त:स्फुर्त अपूर्व असे अंतरंग दर्शन या ग्रंथात आहे. साधकांना अत्यंत मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाखेरीज श्रीबाबांचे बरेच अन्य वाङ्मय आहे व त्याची सूची पुढे दिलेली आहे. देहत्याग करेपर्यंत श्रीबाबांचे वास्तव्य श्रीक्षेत्र माचणूर येथेच होते. मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ (दि. २ डिसेंबर १९७१) रोजी श्रीबाबांनी माचणूर येथे देहत्याग केला.
श्रीबाबांनी स्वत: लौकिकार्थाने शिष्यपरंपरा निर्माण केली नाही परंतु त्यांची श्रीगुरुदेवांची कल्पना फार भव्य होती. आपल्या प्रार्थनेत श्रीगुरुदेवांस नमन करताना श्रीबाबा म्हणतात,
॥ ॐ स्वानंदस्वरूपस्थिताय, परब्रह्मणे, सर्वात्मक गुरुदेवाय नमो नम: ॥
॥ जगन्मूर्तिने, निजात्मने, प्राणधारिणे, व्यक्ताव्यक्तस्थिताय गुरुदेवाय नमोऽस्तु ते ॥
श्रीबाबांची प्रवचने व वाङ्मय हे त्यांचे साधकांस मार्गदर्शन आहे. श्रीबाबा सांगत की एकवेळ मला विसरलात तरी हरकत नाही परंतु माचणूरला विसरू नका. येथे राहून साधकांनी उपासना करावी व त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, मग तो साधक कुठल्याही संप्रदायाचा असो, येथून मिळेल. हा सर्वच परिसर इतका निवांत व रमणीय आहे की इथे कुठेही बसल्यास साधकाची वृत्ति सहजीच अंतर्मुख होऊन जाते व भान कूटस्थाकडे केंद्रित होते.
✦ ✦ ✦
श्रीबाबा महाराजांनी स्वत: लिहिलेले त्यांचे जीवन त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे आहे.
श्रीबाबांचे वाङ्मय:
*** ग्रंथसंपदा मिळण्याचे स्थळ ***
भैरवी श्रोत्री
902 शौनक को ऑप हौसिंग सोसायटी, लेन नंबर 15,
प्रभात रोड, पुणे 411004
फोन : 9930864712
संतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र
श्रीबाबामहाराजांची काही छायाचित्रे
॥ सच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆