॥ भगवान श्रीकृष्ण ॥

भगवान श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्ण

आबालवृद्धांना आवडणारा भगवंताचा एकमेव अवतार!! बालपणी आपल्या वेधक बाललीलेद्वारा, हव्याहव्याशा वाटणाऱ्या खोड्यांद्वारा गोकुळातल्या तरुण, वृद्ध नारींना आकृष्ट करणारा, तारुण्यात गोधने चारत असता कदंबवृक्षाच्या बुंध्याशी निवांतपणे पहुडून मुरलीच्या मोहक स्वरांनी गोपिकांचे मन मोहित करणारा, राज्यकाळात आपला मुत्सद्देपणा, चातुर्य, नीतिशास्त्र यांचेद्वारा व्यावहारिक जीवनात मार्गदर्शनपर वाटणारा, वा आपल्या गीता तत्त्वज्ञानाने साधकांचे साधकीय जीवन उन्नयन करणारा हा श्रीकृष्ण. भक्ताची भक्ति श्रीकृष्ण, योग्यांचे ध्यान श्रीकृष्ण. हे श्रीकृष्णप्रेम आपल्या भारतीय जीवनात इतका भिनले आहे की कोणत्याही मातेस आपल्या बाळास बाळकृष्ण रुपात सजविल्याखेरीज चैन पडत नाही, तरुणांना गोकुळाष्टमीस दहीहंडी वा होळीस रंगपंचमी वा नवरात्रीत रास साजरा केल्याखेरीज चैन पडत नाही, व तरूण मध्यमवयीन वा वृद्ध साधकांस भगवद्गीता अभ्यासल्याखेरीज मार्ग मिळत नाही.

सूरदास, मीराबाई या सारख्या अनेक संतांच्या भक्तिसाम्राज्यात निर्गुण ब्रह्माचा सगुण अविष्कार म्हणून बालकृष्णाचे तथा तरुण मदनमोहन श्रीकृष्णाचे रुपवर्णन त्यांच्या अभंगात ठिकठिकाणी दिसून येते. श्रीकृष्णाचे रुप, त्याचे स्वर्गीय सौंदर्य, त्याच्या शरीराचा स्वर्गीय गंध, त्याच्या मनमोहक मुरलीचा स्वर्गीय स्वर साधकांचे देहभान हरपून टाकतो यांत नवल ते काय. ध्यानावस्थेत वा प्रत्यक्ष असे दर्शन झाल्याची अनंत ज्ञात अज्ञात उदाहरणे आहेत. अन्‌‍ ते दर्शन नाहीसे झाल्यावर त्यानंतर उत्पन्न होणारा असह्य पण हवाहवासा वाटणारा विरह... त्यातून उत्पन्न होणारी व्याकुळता... तिच्या परमोच्च स्थितीनंतर अवचित होणारे त्याचे दर्शन... परत विरह... परत दर्शन... असा हा भक्तभगवंताचा खेळ कितीकांनी अनुभवला, काहींनी आपल्या अभंग रचनांत लिहूनही ठेवला. ते स्वर्गीय लावण्य एकदा पाहिल्यावर ते रूप कायम रहाण्यासाठी भक्त सूरदासांनी मला दृष्टीहीनच राहू देत अशी प्रार्थना केली वा त्या राजकन्या मीरेने ‌‘मेरे तो गिरिधर गोपाल दुसरा ना कोई' असे म्हणत श्रीकृष्णप्रेमात मत्त होऊन त्याचे गुणगान करीत गल्लोगल्ली भटकत राहिली यांत नवल कायसे. कुठल्याही वयाच्या साधकास नवविधा भक्तीतील कुठल्याही भक्तीप्रकाराने उपासना करता येईल असा हा अवतार भगवान श्रीकृष्ण. रांगणारे बाळ वा मोरपीस पाहिल्यावर श्रीकृष्णाची आठवण न येईल तर नवलच! गाई चारताना गोपाळांसंगे रानात क्रीडा करणारा, गोकुळातील गृहांमध्ये स्त्रियांची नजर चुकवून गोपाळांचा एकावर एक थर करुन वर टांगलेली हंडी फोडून सर्व गेोपाळांसमवेत लोणी फस्त करणारा, कालियामर्दन करुन कालिंदी मुक्त करणारा, आपल्या करांगुलीवर गोवर्धन उचलून इंद्रास लज्जित करणारा, आपल्या खोड्यांनी व पाव्याच्या स्वराने गोपिकांना मोहित करणारा, बालमित्र सुदाम्यास मूठभर पोहयांच्या बदल्यात सुवर्णनगरी भेट करणारा, कंस-शिशुपाल वध करणारा, नरकासुराचा वध करुन त्याच्या बंदीवासातून सोळा सहस्र नारींची मुक्तता करणारा, भरसभेत द्रौपदीचे रक्षण करणारा, महाभारतात अर्जुनाचे सारथ्य पत्करून पांडवांचा कैवारी होणारा, उद्धवाचा मार्गदर्शक सखा श्रीहरी अशी याची किती रुपे वर्णावी! याने चोरुन लोणी खाल्ले अशी गोकुळवासीयांनी तक्रार केल्यावर अश्रू भरल्या नयनांनी मुसमुसत त्या कोमल परब्रह्मास दाव्याने उखळीस बांधूणारी यशोदा व त्याचवेळी मी लोणी नाही खाल्ले गं आई असे नाटकी आर्जव करणारा बाळकृष्ण हे भावविश्व शब्दांत कसे बरं वर्णन करायचे!! तरुण गोपिकांचे लोकलज्जा सोडून निष्काम प्रेमाने त्याच्याकडे धावणे, त्यांची ती आतुरता, कुंजवनातील रचलेली रासक्रीडा शब्दबद्ध कशी बरं करायची. या सर्व भावविश्वाची खोली, गूढ जाणू शकेल तो भाग्यवानच म्हणायचा!

भगवान श्रीकृष्ण

भगवान श्रीकृष्ण


भगवान श्रीकृष्ण

श्रीकृष्णाच्या जीवनात श्रीराधेला अनन्यसाधारण महत्व आहे म्हणूनच ‌‘राधाकृष्ण' असे राधेचे नाव प्रथम घेतले जाते. अक्रिय ब्रह्म व त्याची सक्रिय शक्ति वा माया असे श्रीकृष्ण व श्रीराधाराणी स्वरूप प्रसिद्धच आहे. मथुरा, वृंदावन, गोकुळ, गोवर्धन, राधेचे बरसाना ही कृष्णभक्तांची प्रिय स्थाने. तिथे प्रत्यक्ष परब्रह्म नांदले, वावरले. श्रीकृष्ण परमात्म्याच्या पदस्पर्शाने पुनित झालेली वृंदावनची माती श्रीरामकृष्ण परमहंसांनी आपल्या पंचवटीत या साधनास्थलीत आणून पसरून दिली होती. श्रीकृष्णाचे पुढील जीवन फारच धकाधकीचे व्यतीत झाले असे म्हणावे लागेल. पण द्वारकेजवळ प्रभासतीर्थी असलेली निजधामास जातानाची पदकमलास बाण लागलेली वृक्षाखाली मुरली वाजवीत निवांत बसलेली श्रीकृष्णाची मूर्ति त्याच्या अलिप्ततेची जाणीव करून देते.

सर्वांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की या श्रीकृष्णप्रेमाची माधुरी अनुभवायला श्रीसद्गुरुंची कृपा मात्र हवीच हवी. या शामसुंदराचा कृष्णरंग, भक्तिरंग चढावयास संतसंग हवाच!!


My Website
॥ सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा