ॐ
- डोळे मिटुनी बसायाचे, साधन वाटे सर्वां खोटे
- बोलणे हे वृथाचि ऐकुनि, मज मनी हा विस्मय दाटे
- थोर थोर ते सारे संत, गेले परि ते ह्याच वाटे
- जल दे सरिता जेवी सहजी, पय दे माता जेवी सहजी
- तेवि दासा लेववि रमवि, आत्मानंदी सहजासहजी
- आहे हे किती नेटके, सोपे, सरळ, सुलभ नि गोमटे
- नाही कोऽहं चा विचार, नाही सोऽहं अनिवार
- येथे काहीच ना करायाचे, नाही काही पाहायाचे
- अलक्षासी सुद्धा काही, नाही नाही लक्षायाचे
- मग बुवा कसे काय, पाहिजे ते साधायाचे?
- ऐका आता तुम्ही सर्व, बोलणे माझे जे गमतीचे
- स्वामींवरी भार घालुनि, दासा निश्चिंत राहायाचे
- साधनांचे नानाविध, सार ते मी सांगतो की
- बालकाचे जेवि कोड, माय पुरविते गोड
- तेवि रिती दासाचेही, गुरुमाई पुरवि कोड
- एकभावे शरणतेची, मात्र आधी द्यावी जोड
- शरणतेची मोठी खोडी, येत असे ही थोडी थोडी
- येता येता हळु हळु, जीवपणा मोडी मोडी
- देहातील शिवपण, हळु हळु थोडे उघडी
- जीवपण जैसे जाई, शिवपण उघडे होई
- जैसे ज्याचे जितुके उघडी, तितुके शरण तो तो गडी
- शरणतेची होता सीमा, स्वामी प्रकटे तत्कालसा
- साही चक्रांचे पदर फोडी, कैवल्या नेई तो गडी
- हे तो घडे अति तातडी, कारण की हीच प्राप्त घडी
- ज्या वेळी प्रकटे, दास्यत्वाची परम घडी
- पुरुषार्थाचे नाही काम, हे स्वामींचे कृपा दान
- आता समजले ना साधन महान
- डोळे मिटुनी बसायाचे, साधन आहे अति महान
- अवधूताचे हे तो दान, वाटे मीच भाग्यवान्, वाटे मीच भाग्यवान्!!
कृष्णदास
✦ ✦ ✦
॥ स्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆