॥ चित्-स्फूर्ति ॥

श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य

श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज

  • हे तो कृपेचे देणे, का वृथाचि अभिमान घेणे?
  • उधळिता स्तुतिसुमने, नको स्वत:वरी भाळणे ॥
  • सद्गुरुंचे बियाणे, पोसिलेही कृपे तेणे |
  • बहरता फळे फुले, ‘कां माझे असे’ सांगणे? ॥
  • श्रीगुरु कृष्णसरस्वती दत्त, गुरुंचे करवीरी वसणे |
  • गुप्त सोंग दावुनि, जनी बालकापरी वर्तणे ॥
  • मज सद्गुरु असे अबोल, त्याचे मजकरवी लिहिणे |
  • वाचुनि उकलुनि मर्म, माझे मजसीच बोध घेणे ॥
  • तोषता तुम्ही संत जन, मनी कृतज्ञता येणे |
  • कृपा थोरवीते जाणवुनि, घडे आनंदणे ॥
  • नको अहंकाराचा घाला, वाराही लागू न देणे |
  • चाललो वाट गुप्त, पुढेही सांभाळणे ॥
  • प्रार्थुनिया मनी भाव, ऐसेचि चरणी ठेविणे |
  • विनवितो कृष्णदास, श्रीसद्गुरुंसी नम्रपणे ॥
✦ ✦ ✦

  • श्री गणेश वंदना
  • नमन माझे लंबोदरा, शिवगौरीपुत्र मनमोदकरा
  • वास तुझा मूलाधारा, तूचि अखिल जगदाधारा
  • रक्तवर्ण तुंदिल तना, गजमुखा एकदंता
  • सूक्ष्मदृष्टी विशाल कर्णा, नमन तुजसी प्रणवस्वरूपा
  • चर्तुभुज फरशांकुशधरा, गणाधिपा शत्रुनाशकरा
  • कटि मेखला नागरुपा, नमन तुजसी विघ्नहरणा
  • मूषकवाहना मोदकप्रियकरा, रक्तवर्णपुष्प प्रियकरा
  • प्रिय ज्यासी दुर्वांकुरा, नमन कार्तिकेय बंधुवरा
  • कृष्णदास ध्यातो हृदयी, तुज आत्मरुप प्रकाशकरा
✦ ✦ ✦

  • श्री सरस्वती वंदना
  • ब्रह्मानंदिनी सरस्वती भगवती शारदे वीणा पुस्तकधारिणी
  • शुभ्र वस्त्र लेवुनि बैसली शुभ्र पद्मासनी
  • मयुरवाहनी देवी सकल विद्या प्रदायिनी
  • मंदस्मितमुखशोभनी उभवितसे करा वरालागुनि
  • दे वर दे करी प्रार्थना कृष्णदास दोही करा जोडुनि
  • दे शुद्ध मति दे मजसी जाणील जी शुद्ध ज्ञानालागुनि
✦ ✦ ✦

  • श्री सप्तशृंगी माता
  • सप्तशृंगनिवासी माते जगदंबे
  • मार्कंडेये स्थापिले मध्ये सप्तशृंगे ॥
  • विशाल नेत्र हास्यविलसित मुखबिंबे
  • अठरा हातीं शोभिती आयुधे विविधांगे ॥
  • शेंदुर चर्चित मूर्ति शोभित दिव्यांगे
  • सुरवर प्रार्थिती निज संकटी तुज अंबे ॥
  • मर्दिनी तू महिषासुर शुंभ निशुंभे
  • नवनाथांची सिद्धिदात्री तू अंबे ॥
  • कृष्णदास जाता मोहित मन भृंगे
  • आरती अंती तांबुल प्रसादे मुख त्याचे रंगे ॥
✦ ✦ ✦

  • श्री सद्गुरु स्तवन
  • सद्गुरू सूर्य ज्ञान राशी, प्रकटलासे सिंहासनासी ।
  • चला चला करवीरासी, कृष्ण सरस्वती दर्शनासी ।
  • बटूमूर्ति हास्य मुखासी, मौक्तिकमाळी गळा शोभसी ।
  • भक्त भावा भुलला पाहसी, तेज अमित मुखा दाविसी ।
  • चमत्कार नित्य करिसी, सोंग दावुनि गुप्त वर्तसी ।
  • पीठापूराहुनी गाणगापुरासी, तेथोनि आलासी करवीरासी ।
  • नृसिंहभान गुरु तुजसी, शिष्य अंगिकारिला कृष्णदासासी ।
  • पहा पहा अवधूतासी, कृष्ण सरस्वती दत्तावतारासी ।
  • दत्त दत्त नामे मुखासी, जपे तोषवि दत्त यतीसी ।
  • चरणी पडुनि शिरसाष्टांगेसी, लाधू आशीर्वाद कृपामृतासी ।
  • आशीर्वादरुपी कृपाबळासी, जाणू चला आत्मरुपासी ।
  • रमुनिया त्या आत्मरुपासी, अनुभवू सर्वात्मक दत्तरुपासी ।
  • अनुभवे त्या साक्षात्कारासी, एकरुप होऊ गुरुरुपासी ।
  • कृपे साधुनि एकरुपतेसी, जाणू जीवनमुक्त स्थितीसी ।
  • मुक्तिवरील रमू भक्तिसी, गाऊनि दत्त नाम मुखासी ।
  • प्रेमे आळवू दत्त यतीसी, प्रेमे रमू दत्त भक्तिसी ।
  • रमुनि नित्य प्रेमरुपासी, होऊ आपण प्रेमरुपचि ।
  • प्रेमभक्तिचा प्रसार करुनि, प्रेमविश्वातचि राहू रमुनि ।
  • कृष्णदास रमे नित्य, कृष्णसरस्वती ध्यास घेउनि ।।
✦ ✦ ✦

  • पाळणा
  • जन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज
  • नांदणीग्रामी करवीरक्षेत्री, चला दर्शना आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
  • माघ वद्य पंचमी दिन हा, अवतरला हनुमंतचि हो आज
  • भावाचा जो अति भुकेला, निराकार सगुण झाला आज
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त अवधूत प्रकटला आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
  • कौमुदिनीसम सुवर्णकांती, रूप पाहुया आज
  • हास्यभरित मुखकमल पाहुनि, धन्य होऊया आज,
  • जन्मला दत्तराज गुरुराज ॥
  • बालक जरी ते आम्ही हो त्याचे, घेऊया कडेवरी त्या आज
  • क्षुधा वारितो जरी सर्वांची, प्रेमे त्या घास भरवुया आज
  • भावभक्तिच्या लेण्यांचा तो, लेववु त्यासी साज,
  • जन्मला दत्तराज गुरुराज ॥
  • सोऽहं बोध नित जो गाई, गाऊया अंगाई त्यासी हो आज
  • जागृत करी जो सर्व जीवांसी, पाळण्या चला निजवुया आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
  • वैराग्य असे रे मूळ निजबोधाचे, घ्या जाणुनि आज,
  • वैराग्याचे, निजबोधाचे दान मागूया आज, जन्मला दत्तराज गुरुराज॥
  • कृष्णदास म्हणे चिदानंद गुरु, नमुनि शरण जाऊया आज,
  • जन्माचे सफल करी जो काज, जन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज॥
✦ ✦ ✦

  • आरती
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।धृ.।।
  • बटूमूर्ति तू भाव ही बालक, आम्ही तुझे रे सर्वही बालक
  • तूचि असे रे अमुचा पालक, धरी करि सत्वरि उद्धरी ताता
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।१।।
  • कुरवपुरीचा श्रीपादचि तू, गाणगापुरीचा नृसिंह यति तू
  • तोचि प्रकटला करवीरी, उद्धरिण्या हो आम्हा भक्ता
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।२।।
  • सुहास्य मूर्ति तुझी गोजिरी, सुवर्णकांती तेजे आगळी
  • भाळी टिळा अन् टोपी मखमली, रुप पाहता तत्क्षणी पडली, भूल आम्हा चित्ता
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।३।।
  • सर्व जगाचा तू रे चालक, तुला प्रार्थितो आम्ही बालक
  • तुचि केवळ आमुचा तारक, पटली खूण आम्हा चित्ता
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।४।।
  • जाणुनिया आम्ही तुलाचि शरण, सत्वर करी आमुचे उद्धरण
  • निशिदिनी तुजला गातो ध्यातो, अखंड या चित्ता
  • आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।५।।
✦ ✦ ✦

  • स्तुति
  • दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • ब्रह्मसनातन सद्गुरुमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • हनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • समर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • ब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • कस्तुरीतिलक सुशोभित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • मौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • गूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • वैराग्यमठी संजीवनस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • निजबोधमठी गुंजारव गीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • षडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • सच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • भक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • स्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • कृपावंत अति अगाध किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • कृष्णदास शरण आर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
  • निशिदिनी गातो तव गुणकिर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦

  • प्रार्थना
  • नांदणीग्रामी जोशीवंशी अवतरलासी तू देवा
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नाम तुज गुरुदेवा ॥
  • अप्पा अन्नपूर्णा सुत हा झालासी तू देवा
  • अजन्मा ऐसा भक्त काजा अवतरलासी देवा ॥
  • बालवयातचि गुरुदर्शना त्यागिलेसी गृह विभवा
  • अक्कलकोट स्वामीराये तुजसी, अंगिकारिले देवा ॥
  • करवीरक्षेत्र अवधूतक्षेत्र, वसलासी तेथ देवा
  • श्रीपादयति तू नृसिंहयति तू अवधूतचि तू बरवा ॥
  • सुरवरा वंद्य गुरुराज दत्त तू आला करवीर गावा
  • शिर्केभुवनी निवास केला देखुनि ताराईच्या भावा ॥
  • शुभ्र अंगरखा हिरवी टोपी उपरण्याचा रंग भगवा
  • कस्तुरी टिळा शोभे माथा हास्य लोभवी जीवा ॥
  • बालभाव सोंग घेवुनि दाविले अगणित लीला विभवा
  • कुंभार आळी वसुनि धरिसी कुंभार स्वामी उपनावा ॥
  • वैराग्यमठी अन् निजबोधमठी भक्तजन करिती तुझाचि धावा
  • दर्शना येती भक्त त्यांसी अर्पिले वैराग्य विभवा ॥
  • वासनांचा कोष सभोवती करी जीवा शिवा दुरावा
  • नाश करण्या समर्थ तुजविण ना दुजा कुणी गुरुदेवा ॥
  • षड्‌रिपुंचा नाश करुनिया निर्मळ केले जीवा
  • माया मोह नाश करुनिया फास तोडिला देवा ॥
  • जीवासी ज्या अंगिकारिले, भेटविले तू शिवा
  • बद्ध जीवांसी मुक्त करुनिया दाविलेसी निजठावा ॥
  • मर्त्य जीवांसी निजबोधुनिया अमर केलेसी देवा
  • नामाची तव अखंड वीणा मठी करी गुंजारवा ॥
  • भक्तकाजा धावलासी तू देखुनि शुद्ध भावा
  • उद्धरिलेसी अनंत अगणित भक्तजन गुरुदेवा ॥
  • शुद्ध मति दे मजसी गावया तव अगणित किर्ती विभवा
  • नाम गानी अन् ध्यानी रमता होवो ब्रह्मानंद जीवा ॥
  • विश्‍वी जे जे रुप दिसे ते भास तुझाचि व्हावा
  • द्वेष मत्सरा थारा न मिळो अशा रिती मज ठावा ॥
  • कायावाणी मनासहित मज पवित्र करा हो देवा
  • विकल्प दवडुनि अज्ञ मनाचे दृढ करी गा भावा ॥
  • चंचलता सारुनि दूर आघवी स्थिर करा हो देवा
  • भावभक्ति अन् विवेकवैराग्य लेणे मज लेववा ॥
  • पावन सुमंगल तव नामाची ललकार अंतरी उठवा
  • भावभक्तीच्या आनंदाच्या डोही मज त्या रमवा ॥
  • स्मरणी चिंतनी रमता तव या काळाचेही भान नुरवा
  • दिक्कालातीत सच्चिदानंद स्वरूप मजसी दावा ॥
  • कृपादृष्टी अन कृपाहस्त तव मजवरी सत्वरी उभवा
  • मानवत्व ते देवत्वाचा प्रवास मजसी घडवा ॥
  • जन्मोजन्मी दास तुझाचि परि कदापि विसर न व्हावा
  • विश्‍वव्यापक तू भरला अणूअणू प्रचित मजसी दावा ॥
  • दास दास मी तव अखंड गाता संसाराचे भान नुरवा
  • मी तू पण लोप करुनिया द्या एकत्वाचा अनुभव बरवा ॥
  • काय काय अन् किती ते मागू अंतरीची आस मिटवा
  • स्वामी तू मी दास तुझाचि मज दासभावे विनटवा ॥
  • समर्थ स्वामी शरणागत या दासावरी करी तव किमया
  • साच दासभाव हा येण्या निभण्या दे सामर्थ्य जीवा ॥
  • शरीर त्यागिलेसी जरि तू विश्‍वाकार देवा
  • भक्त हृदयी निवास अखंडित कार्या तव न विसावा ॥
  • कृपाळू तू स्वामी जाणुनि दास मागतो मी जोगवा
  • करी बा जैसे मनी तव तैसे दासा काही न ठावा ॥
  • कृष्णदास हा करी विनवणी, अंगिकारा गुरुदेवा
  • ध्यास तुझा मज लागो निशिदिनी, द्या अंती चरणी विसावा ॥
✦ ✦ ✦
१०
  • भजूनिया अवधूतासी, जाणूया अवधूताला
  • कृपाशीर्वादे त्याच्या, जाणू अवधूत स्थितीला
  • लाधू तीव्र वैराग्याला, अंतरीच्या अवधूत स्थितीला
  • अनुभव त्याचा कृपे घेऊ, जाणू आत्मस्थितीला
  • कृपाळू तो दत्त अवधूत, वसतसे करवीराला
  • कृष्ण सरस्वती नामे, जाणती त्या दत्त यतीला
  • शरण जाउनि भजता भावे, उपदेश करी कृष्णदासाला ॥
✦ ✦ ✦
११
  • कृष्ण सरस्वती कृष्ण सरस्वती घोष नामी अति
  • जपता निशिदिन प्रसन्न होतो अवधूत दत्त यति
  • होता ऐसे उरे न त्याच्या भाग्या काही मिति
  • कल्पवृक्षातळी बैसता मग काय चिंता भीती
  • जपता नाम रुप कसे ते दडेल कुठे क्षिति
  • खचितची होती प्रकट सामोरी तत्क्षणी दत्त यति
  • रुप मनोहर दर्शन होता भूल पडे चित्ती
  • अंतर्बाह्य तन मन बुद्धि व्यापुनि राही दत्त यति
  • दत्ताचा अवतार करवीरी श्रीकृष्ण सरस्वती यति
  • कृष्णदास हा हृदयी वास त्या करतो दत्त यति ॥
✦ ✦ ✦
१२
  • नित्यसाक्षी असे जो का, नमन माझे तयाला
  • तिमिरनाशक ज्ञानप्रकाशक, त्या सद्गुरू स्वरूपाला
  • गुरुरुपे उपदेशितो जो, शिष्यरुपे क्रीडतसे जो
  • अद्वैतात राहुनिया करितसे, द्वैतातल्या लीलेला
  • ‘मी’पणा उठताचि लपतो, लोपता ‘मी’ प्रकटतो जो
  • नेति नेति शब्द उठती, वर्णिता ज्या रुपाला
  • दर्शन होता स्वरूपाचे त्या, काय येई अनुभवाला
  • ‘द्रष्टा दृश्य दर्शन’ त्रिपुटी, लोपतसे त्या क्षणाला
  • जगत् केवळ भास जेथे, काळही ना उरे तेथे
  • नित्य सत्य शिव सुंदर, केवलानंद विभु रुपाला
  • अवस्था ही काय आहे, द्यावी मजसी अनुभवाला
  • कृष्णदास प्रार्थितो आज, श्री कृष्ण सरस्वती गुरुरायाला ॥
✦ ✦ ✦
१३
  • स्वामी माझा करवीरीचा, अति सुंदर सुंदर, अति सुंदर सुंदर
  • गळा माळ रत्नहार, शिरी टोपी ती सुंदर ॥
  • शुभ्र वस्त्र अंगरखा, घेई टोपी त्यावरीता
  • असा शोभे हा माझा, अवधूत दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥
  • हास्य सुहास्य मधुर, जेणे भुलले नारीनर
  • असा हा जो यतिवर, गुरुराज दिगंबर, स्वामीराज दिगंबर ॥
  • बालवत् क्रीडा करी, सोंगे घेई नाना परी, प्रकटला परि खास
  • अवधूत दिगंबर, अवधूत दिगंबर ॥
  • भक्त रक्षायासी खास, हनुमंताचा अवतार
  • ताराआईच्या गृहासी, राहिला हा जीवनभर
  • तो हा दत्त दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥
  • वाचे गाऊ नाम त्याचे, ध्याऊ चरण हृदयात
  • कृपा होता त्याची साची, सांभाळेल निरंतर, सांभाळेल निरंतर
  • स्वामी दत्त दिगंबर, स्वामी दत्त दिगंबर ॥
✦ ✦ ✦
१४
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्ता, ध्यातो तुजला निशिदिनी चित्ता ॥
  • शरणागत या दीन आर्ता, का रे बा नुद्धरीसी त्वरिता ॥
  • बटूमर्ती परी अगाध सत्ता, जननीहुनि तू तारक भक्ता ॥
  • अल्पही न धरी मी चित्ती चिंता, त्रयमूर्ती तू तारक दत्ता ॥
  • विश्वी एक तुझीच सत्ता, जाणुनि हा तुज शरण मी दत्ता ॥
  • भावभक्तियुत होऊनि आर्ता, तरलो संसाराची गर्ता ॥
  • काम क्रोधे व्यापियेलि सत्ता, निजदासा तू तारक दत्ता ॥
  • निशिदिनी आठव देई चित्ता, स्मरणचि मोडी भवभय वार्ता ॥
  • कार्यकारणाचा तुचि एक ज्ञाता, शरण तुज जाता न दुख:वार्ता ॥
  • मोक्षपदाचा करी अधिकारी, दत्ता तुज हे नच नवलाई ॥
  • हास्य मधुर तव लोभवी चित्त, भुलुनि जाहलो तव पद भृत्य ॥
  • करवीर क्षेत्री अप्रकटचि राही, निजभक्ता परी जवळची घेई ॥
  • नमन करीत अमन मी होई, कोण मी कोठील सरली वार्ता ॥
  • सहजचि सुखद अवस्था येई, दत्त ही बाप अन् दत्त ही आई ॥
  • सोऽहं सोऽहं गाई अंगाई, ऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥
  • ऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥
✦ ✦ ✦
१५
  • गुरुराज माझा कृष्ण सरस्वती, सिंहासनीस्थित शिष्य सभोवती
  • कृष्णा लाड वासुदेव द्वाड, म्हादबासी ना देहाची चाड
  • गाणगग्रामीचा बोवा रामदास, दत्ताने त्यास पाठविले खास
  • वेणीमाधवा दुजा न ध्यास, निजबोधमठीचा कर्ता व्यास
  • तात्यांनी पाठविले महादेव भटास, विष्णुअण्णा लिहिती स्वामी इतिहास
  • नामदेव हा आगळाची दास, प्रपंची असे सर्वदा उदास
  • हरीभाऊ, रामभाऊ, गणपती, बाळकू, अनंत, करवीरी गणती न त्यास
  • मुजुमदारांच्या चरित्रास आशीर्वच हे खास, वाचिता होई मायेचा निरास
  • ताराआईच्या पुण्या न गणती, बांधीला हनुमंत वैराग्यमठी
  • मनोभावे माझा नमस्कार खास, अवधूतास आणले करवीरक्षेत्रास
✦ ✦ ✦
१६
  • गोकुळी कृष्ण गोपाळ, करवीरी कृष्ण दयाळ
  • गळा मौक्तिक माळ, दोहोंच्याही
  • एक पांडवा रक्षित, दुजा भक्त हित लक्षित
  • वेणू वाजवोनि मोही, दुजा सोऽहं ध्वनि गाई
  • एक प्रेमाची नवाई, दुजी भक्तांसाठी आई
  • एक द्वारकेचा राजा, दुजा भक्तांचिया काजा
  • मारी कंस नी कौरव, दुजा मारी षड्रिपु थोर
  • वर्ते आनंद हा थोर, नाही त्याला अंतपार
  • म्हणुनि भजा हो तत्पर, दत्ताचा हा अवतार
  • गर्जा वारंवार, नाम त्याचे हळुवार
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
✦ ✦ ✦
१७
  • गुरु लाभले यति कृष्ण सरस्वती
  • भेटताची निर्मल मति अति
  • वाटे मज दत्त संगति
  • चुकली प्रारब्धाची गति
  • रोमरंध्रेही नाम ते गाती
  • कृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
१८
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर, लाभे आम्हा थोर गुरुवर
  • चरण मी नमितो वारंवार, सर्व सुखाचे जे का आगर
  • अवधूताचा हा बाजार, खेळणी सर्वां विविधचि फार
  • सोऽहं डमरु वाजे थोर, अनुहताचा करीत गजर
  • ऐकोनि माया होई पसार, मग वर्तले सुख हे अपार
  • चरण मी नमितो वारंवार, चरण मी नमितो वारंवार ॥
✦ ✦ ✦
१९
  • एकनाथांचा जो का नाथ, करवीरी हा तोचि नाथ
  • जेणे केले आम्हा सनाथ, नवनाथांचाही तो हा नाथ
  • त्याची असता आम्हा साथ, का हो समजू आम्ही अनाथ
  • अवधूतवेशे तो हा सजला, उपदेशिले त्याने मजला
  • सोऽहं शब्दे तोचि गर्जला, जीवभाव तत्क्षणीच हरपला!
✦ ✦ ✦
२०
  • स्वामींचा मी बाळ, अति लडिवाळ, कापे आम्हा पुढे काळ, मी निश्‍चिंत सर्वकाळ ॥
  • स्वामी अति प्रेमळ, असे की कृपाळ, जणू तो गोपाळ, रक्षाया गोपगोपी, जाणुनिया सद्भाव, करवीरी अवतरला ॥
  • जरी असे दत्त साक्षात, ज्यासी काळही तो भीत, लोकामाजी वेडापिसा, तो हा गमला ॥
  • जे भक्त, चरण त्याचे ध्यात, मनी दिन रात, त्यासी कल्पवृक्ष तो गमला ॥
  • म्हणुनि मी नित्य, रमवी वाचा हे सत्य, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
  • मार्ग सुखाचा हो सत्य, भावे नमू चरण हे नित्य, तेणे तुष्टतो अत्यंत, होईल कृपावंत, भाग्या नाही अंत, करु नका हो खंत ॥
  • म्हणुनि सुजन हो ऐका, विनवितो, कळवळुनि अत्यंत, गा हो गा हो, ध्या हो ध्या हो
  • श्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
  • तेणे सत्वर तुष्टत, त्वरे हृदयी प्रकटत, सोऽहं भाव थाट, प्रबळ अति अचाट, अवधूताची ही वाट, जरी अति बिकट, कृपा होता त्याची खास, मार्गामधे नीट, सांभाळी तो नीट ॥
  • असा गुरु दत्त, असता जो साक्षात, का हो तुम्ही भीत? ॥
  • मायेचा थयथयाट?
  • चला घेऊ तिचा घोट, तेणे स्वामी तो तुष्टत, नेई अवधूत मळ्यात, सोऽहं भाव तळ्यात, सवे हो क्रीडत, हीच परमार्थाची वाट, सुजन हो ऐका, मनामध्ये नीट ॥
  • बसा आसनी हो ताठ, डोळे मिटा हो ते घट्ट, हृदयी ठेवा ही गोठ, मनी बांधा खूण गाठ, दत्त हा साक्षात, उभा समोर तिष्ठत,
  • आशीर्वाद द्याया, आशीर्वाद द्याया ॥
  • कृपा आशीर्वाद होता, फिटे संसाराची व्यथा, सोऽहं भाव संगीता,
  • रमाल हो नित्य, रमाल हो नित्य ॥
  • या कारणे हो सत्य, सांगतो अमित, ध्यावे चरण नित्य,
  • श्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
✦ ✦ ✦
२१
  • करुणाकर श्री कृष्ण यतिवर, अक्कलकोटीचा तू गुरुवर,
  • निवासक्षेत्र हो करवीर, अवधूताचा तू अवतार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
  • कामक्रोधे छळियेले फार, न दिसे काही उपाव सत्वर,
  • ऐकोनि कीर्ति तू करुणाकर, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
  • चित्त ही ना स्थिर निमिषभर, नाम ही न ये तुझे मुखावर,
  • संसारी या गांजियेले फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
  • ध्यानी बैसता विविध विचार, मना गांजिति वारंवार,
  • आयु: ही सरते अति भरभर, जाणुनि मना बेचैनि फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
  • परमार्थ करता शीणलो फार, मनी अखंड हाचि विचार, कधी दिसती मज चरण सुकुमार, घेउनिया त्यांचा आधार, तरीन मी हा दुर्घट संसार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
✦ ✦ ✦
२२
  • ॥ गुढीपाडवा नमन ॥
  • चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, नववर्षाच्या प्रथमदिनी
  • श्री सद्गुरूंसी नमन भावे, मज अंतकरणातुनी
  • पोषितो रक्षितो जो मजसी, प्रेमे निजकृपेनी
  • आत्मशोधाच्या मार्गा मजसी सहाय होण्या, प्रार्थितो आज हृदयातुनी
  • चालता धडपडता जो अखंड, न्याहाळीतो कृपादृष्टीनी
  • पडता रडता विनविता, हात दे सबळ कृपाकरांनी
  • दासभावे शरण जाता, चालवितो कृपाछत्र उभावुनी
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, घोष उमटे हृदयातुनी
  • घोष तो ऐकता अखंड, नादे त्याच्या तोषुनी
  • वाटे या वर्षी मजसी, घेईल कडेवरी उचलुनी
  • विश्वासे त्या काळजी सर्व, गेली मज मनातुनी
  • आशीर्वादे सहज ध्येय, होईन कृतार्थ मम जीवनी
✦ ✦ ✦
२३
  • ॥ विजयादशमी ॥
  • आज विजयादशमी, सिमोल्लंघनाचा दिवस
  • विवेक वैराग्य शस्त्रे परजुनिया, होऊया सज्ज आत्मसाधनेस
  • ओलांडुया सीमा जीवभावाची, अन् करुया पदार्पण ब्रह्मभावास
  • ब्रह्मआपटा सोने लुटुनी, भान त्याचे घेऊ अंतरास
  • श्री कृष्ण सरस्वतींसी करुनी प्रार्थना, करे साजरी विजयादशमी कृष्णदास
✦ ✦ ✦
२४
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त
  • अवतार ताराया जन जे भ्रमित
  • करवीरी केल्या लीला अमित
  • वेश बावळा दावुनी लपला नित्य
  • शरण भावे जाता उद्धरिले त्वरित
  • कृपाळूपणे जन हे अनंत
  • आजही अदृश्य कार्या नाही अंत
  • दासभावे मी प्रार्थितो नित्य
  • स्वीकारले मजसी उद्धराया त्वरित
  • प्रेमात भान विसरतो मी नित्य
  • असा गुरु माझा कृपाळू दत्त , श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
✦ ✦ ✦
२५
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृष्णासम वेधितो चित्त
  • ठाव न उरतो चित्ता अनित्य, स्वरूप दर्शनी गुंतवी नित्य
  • माया हतबल पहातसेे फक्त, कृष्णदासा स्पर्शावया न धजत
  • स्वामींच्या या सामर्थ्या अमित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥
✦ ✦ ✦
२६
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा मज घोष हा नित्य
  • नाद ऐकता माया पळत, स्वरूप अनुभवी मी नाचतसे नित्य
  • भाग्य वर्णाया शब्दही थकत, उचंबळतसे प्रेमभाव हृदयात
  • कंठ सद्गदित, नेत्र जलभरित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥
✦ ✦ ✦
२७
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हनुमंतचि हा करवीरी वसत
  • पुच्छ दावुनी खूण पटवत, हनुमंतासम औदुंबरी उडत
  • रामायणीच्या लीला अमित, सप्तसागर सामर्थ्ये लंघित
  • भवसागर मग तुच्छ तो गमत, कृष्णदास सहजी तो तरत ॥
✦ ✦ ✦
२८
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अभिनव त्या दीक्षेची रीत
  • अप्रकटरित्या चालवी मार्गात, तेणे न उठे दंभ किंचित
  • अहंकारापासून रक्षितो नित्य, पतनाचे जेणे भय न किंचित
  • साधनापथ हा सहज चालत, कृष्णदासाचा स्वामी हा दत्त ॥
✦ ✦ ✦
२९
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरण उमटले हृद्पद्मात
  • ध्याता गणी न दिन अन् रात, गुंतविले अवघे मतिसहित
  • उमलले हृद्पद्म अमित, मधुर संवेदन जाणवे तेथ
  • दर्शनी लुब्ध अखंड मनात, कृष्णदास गुंजारवी नित्य ॥
✦ ✦ ✦
३०
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हास्य मुखासी रमे बालभावात
  • तेज अमित परि सारे लपवत, शरणागतासी कृपा अमित
  • काही न मागे, मीपणा परि न खपत, कृष्णदास ‘मी’पण अर्पित ॥
✦ ✦ ✦
३१
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, धरले मजसी निजकृपाकरात
  • गोंजारितो मज बाळ मी खेळतो करांत, मातेपरी सांभाळितो अखंडित
  • तोचि लक्षितो साधनी हित, कृष्णदास बाळ लडिवाळपणे खेळत ॥
✦ ✦ ✦
३२
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, आठव मनी क्षणाक्षणात
  • विसर क्षणभरीही न होत, वाटे लाधलो कृपा अनंत
  • कृपाळू दत्त नच विसंबत, कृष्णदासा स्मरण त्याचे नित्य ॥
✦ ✦ ✦
३३
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड लक्षितो मम हित
  • साधनी मज नित्य जागवत, बेसावध क्षणी सावध करी नित्य
  • साधनेची वाही काळजी अशी नित्य, कृष्णदास होई निर्भर चित्त ॥
✦ ✦ ✦
३४
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पतितपावन सद्गुरू दत्त
  • कृपा लाधता पावन त्वरित, कृष्णदास कृपे पावन सत्य ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचे सामर्थ्य अमित
  • उद्धरिले अखंड अगणित, शरण जाता कृपा त्वरित
  • कृपाळू दत्त लक्षितो हित, कृष्णदास शरणी त्वरित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हृदयभावा बहर अमित
  • भावतीर्थी डुंबतसे नित्य, स्नान करता काया पुनित
  • ध्यान करता अंतरी पुनित, कृष्णदास सर्वांगे पुनित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, मोतियांची माळ गळयात
  • मुखी हास्य तेज गगनात, मूर्ति बटू परि व्यापुनि ब्रह्मांडात
  • चरण धरुनी कोंडिली हृदयात, कृष्णदास पुलकित हृदयात ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, गुरु मज हा जन्मजन्मांतरित
  • अखंड सोबत हृदयांतरित, विस्मृतीची कशास बात
  • निशिदिनी मजसी जागृति नित्य, कृष्णदास चरणीचा भृत्य ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिरी शोभे टोपी हरित
  • पापताप जो अखंड हरीत, जन्म मृत्यूचा पाश हरीत
  • आत्मभावाचा बोध करीत, कृष्णदास आत्मभावे नमित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कौपीनधारी जणू हनुमंत
  • अंशावतारी करवीरी प्रगट, कामापासुनी दासा रक्षित
  • दासभावे श्रीरामा नमित, कृष्णदासही त्यासी नमित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, दास नेई हळुहळु उन्मनीत
  • मनाचा करितसे अंत, जीवभावाचा हो अंत
  • कृपा करितसे अशी अनंत, कृष्णदासा चित्ती अनंत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अक्कलकोटे धाडिला करवीरात
  • त्यासी ध्यातो मी मनात, व्यापुनि बैसला मम चित्तात
  • तेणे अखंड ध्यान मनात, कृष्णदासा निज कृपा वर्षित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अहंकाराचा वारा न खपत
  • ताडण्याची अभिनव पद्धत, अंतरीच दासा जाणवत
  • कृपेनेच असे खूण कळवत, कृष्णदास निजमनी जाणत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा उगम हृदयात
  • अखंड झरा असे स्फुरत, प्रेमलहरी सर्वांगी पुलकित
  • स्मरणी शरीर रोमांचित, कृष्णदास नित्य अनुभवत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, वसतसे अवधूत करवीरात
  • फेरी करी त्रिभुवनात, भक्त रक्षिण्या त्रिजगतात
  • विविधरुपे दर्शन देत, कृष्णदास दर्शना इच्छित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सिंहासनी बैसती शिष्यांसहित
  • छत्र धरिती अन् चवर्‍या ढाळीत, स्वामींच्या त्या लीला पहात
  • दर्शना समोर भक्त अनंत, कृष्णदास चरण चुरीत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, प्रभाती उठताचि नमन नित्य
  • तेणे जागवितो विवेक मनात, विचार सारासार नित्य अनित्य
  • अनित्य टाकोनी लक्षितो नित्य, कृष्णदासा न अहित दिनभरात ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, जेंव्हा कधीही आठव करीत
  • उठे अंतरातुनी प्रतिध्वनि त्वरित, काळजी नको मी आहे जागृत
  • विवेकरुपे तोचि लक्षित, कृष्णदासाचे हित नित्य ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सद्गुरूंचा मी कृपांकित
  • आठव पूर्वी भेट करवीरात, ते वेळी मज केले सनाथ
  • सांभाळितो तैपासुनि नित्य, कृष्णदास शरणी नित्य ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, स्वामी असता दास कां भीत
  • पाठी उभा त्रैलोक्याचा नाथ, स्पर्शवाया काळही तो भीत
  • मायेचा न लागे पाडाव तेथ, कृष्णदास गमतो सनाथ ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पालखी निघाली चला त्वरित
  • स्वामी झुलती आनंदात, भक्तही डोलती आनंदात
  • ताल मृदुंग चिपळया गर्जत, दत्त नामाचा गजर होत
  • आनंदाला उधाण येत, कृष्णदास भोई तेथ! ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चला दर्शना कृष्णतारा गृहात
  • समाधी बैसला दत्त, जागृत प्राण सहस्त्रारात
  • माथा टेकिता अनुभव येत, कृष्णदास होई रोमांचित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिष्ये स्थापिला निजबोध मठीत
  • दर्शना मूर्ति संगमरवरीत, दिसतो सिंहासनी स्थित
  • दर्शन करुनी भावे नमिता, कृष्णदास निजबोधी सद्गदित ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, बीज रोविले अंतरात
  • वाढत वाढत असे देखत, रुपांतरले वटवृक्षात
  • वटवृक्ष स्वामींची परंपरा, कृष्णदास हा असे अनुभवत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृपा केली मजवरी अमित
  • न अनुभवता जव खिन्न मनात, स्वामी येउनी मजसी पुसत
  • कार्य माझे न कां मी जाणत, कृष्णदास ऐकता निश्‍चिंत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड वास वैराग्यमठीत
  • विवेक वैराग्य प्रसाद तेथ, जाता नमिता लाभे त्वरित
  • कृपा दर्शनी होई अनंत, कृष्णदास ही भाग्यवंत ॥

  • हा कृष्णदास संसारी उदास, जे जे घडते ते पाहतो सावकाश
  • प्रतिक्रिया उठते परि सावध मनास, अखंड त्यासी श्री कृष्ण सरस्वतींचाची ध्यास
  • दत्तगुरुंचा कृपाशीर्वाद लाधलासे खास, तनमनधन अर्पुनि शोभितसे कृष्णदास ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अंतरात ज्योत उदित
  • नामघोष चाले सतत, रमतो तेथ नित्य
  • मार्ग क्रमितो प्रकाशात, चालता देई हात
  • कृष्णदास चरणी त्या, शरणी तो सांभाळत ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरणी जडली मज मति
  • भवसागराची मजप्रति, उरलीसेे ना ती भीती
  • केली असे अखंड वसति, गुरुराये हृदयाप्रति
  • कृष्णदास शरण यति, श्री गुरु कृष्ण सरस्वती ॥

  • श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाच्या लहरी उठत
  • हृदय समुद्र उचंबळत, सत्रावी कलंडवत
  • अमृते होई काया पुनित, कृष्णदास कृपे पुनित ॥
✦ ✦ ✦
३५
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • देई निर्मल दृष्टी मम कार्या
  • होई नश्वरतेचा बोध जगती या
  • दिसेल दृष्टी ईश्वर जगती या
  • अज्ञानांधकारी ज्ञानप्रकाश पहाया
  • मृत्यूकडूनी अमरत्वा न्याया या
  • अज्ञानाने दूषित मम दृष्टी या
  • कृष्णदास प्रार्थितो निर्मळ कराया
  • दिसेल दृष्टी मग तू अखंड गुरुराया ॥
✦ ✦ ✦
३६
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • जाऊ चला वैराग्यमठीसी दर्शन घेऊया
  • सावळी सुंदर बटूमूर्ती गुरुराया
  • दर्शन करुनि नयनांचे पारणे फेडूया
  • चरणांवर पावन त्या माथा टेकुया
  • हस्तस्पर्शे पावन काया निववुया
  • आशीर्वादे करु धन्य जीवना या
  • कृष्णदास प्रार्थितो सकला दर्शना एकदा तरी या
  • अवधूत दिगंबर तेथे सिंहासनी गुरुराया ॥
✦ ✦ ✦
३७
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • शोभसी सिंहासनी नृपवर्या
  • मौक्तिकमाळा शोभिती गळा या
  • हास्य अनुपम विलसे मुखा या
  • कृपादृष्टी ओसंडे प्रेमळ नयना या
  • दिव्यत्वाचा भास पाहता सुवर्णकांती या
  • कृष्णदासे अनुभवले दर्शनि या
  • भाव एकवट अविचल दृष्टी स्थिती या
  • वर्णू काय औदार्या नृपवर्या, वर्णू काय औदार्या गुरुवर्या
  • हरुनि मीपण घेतले गुरुवर्या
  • निजहृदय सिंहासनी बैसविले मज या
  • स्वानंद राज्य सिंहासनी अधिपती केले या
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • कृष्णदासे वर्णिली निजस्थिती दर्शनि या ॥
✦ ✦ ✦
३८
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • राहो अबाधित समता चित्ता या
  • राहो अखंड विवेक जागृत अंतरी या
  • जेणे उठे न क्षोभ मम चित्ता या
  • कृष्णदास प्रार्थितो यतिवर्या
  • राहो अखंड अविचल मनाची स्थिती या
  • जेणे अखंड राहील स्मरण तुझे गुरुराया
  • आशीर्वाद हा देई नमिता तव पाया
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • कथिती शात्रपुराणे ग्रंथी या
  • आत्मा एकचि सर्वाभूती असे या
  • कारण काय मग होते द्वेषमत्सरा या
  • उगम असे कोठे तो सर्वा या
  • नाश कसा अन् होई सांगा या
  • कृष्णदास प्रार्थितो यतिवर्या
  • सर्वाभूती आत्मा मज दावाया ॥
✦ ✦ ✦
३९
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • कळेना मजसी करावे काय कलियुगी या
  • कलहरुपे शिरला कली प्रत्येका हृदया या
  • विसंवाद दावी प्रत्येका मता या
  • बिघडवितो हा शांति समाजी अन् गृही या
  • कृष्णदास विनवितो गुरुराया
  • स्थापी सुसंवाद प्रत्येकी हृदयी या
  • प्रगटे जेणे शांति अखंड समाजी या
  • विश्वप्रेमा होय उदय जेणे समाजी या
  • तेणे रमेल अखंड जीव भगवत्प्रेमी या ॥
✦ ✦ ✦
४०
  • गुण अवगुण ज्याचे त्याचे, राहो त्यांच्यापाशी
  • स्पर्श न होऊ देऊ देवा, त्यांचा तो मजसी
  • सुमति दुर्मति ज्याची त्याची, राहो त्यांच्या पाशी
  • मति मज ही कधि न बिघडो, जाता त्यांच्या संगतीसी
  • मतमतांतरे प्रवाह नाना, असती या जगतासी
  • कधी मजसी पडू न देई, त्या प्रवाहांसी
  • अहंकाराच्या ठासुनी भरल्या दिसती, मूर्ति जगतासी
  • लेशमात्रही स्पर्श न व्हावा, त्यांचा कधि मजसी
  • आत्मरुपी मी आत्मरुपी जग, दाखवी गा मजसी
  • कृष्णदास ही करी प्रार्थना, श्री कृष्णसरस्वती गुरुंसी ॥
✦ ✦ ✦
४१
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
  • दु:खी दीन असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी दु:ख त्यांचे हराया
  • असहाय असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी त्यांसी सहाय कराया
  • उपेक्षित असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी त्यांसी प्रेम अर्पाया
  • निराधार असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी त्यांसी आधार द्याया
  • तळमळत असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी त्यांसी त्यांची तळमळ हराया
  • पीडित असती जीव जगी या
  • दे सामर्थ्य मजसी त्यांची पीडा हराया
  • कृष्णदास म्हणे अज्ञानी असती जीव जगी या
  • दे ज्ञान मजसी त्यांचे अज्ञान हराया ॥
✦ ✦ ✦
४२
  • श्री गुरु कृष्ण सरस्वती, दान मागतो सर्वांप्रति
  • देई सर्वां निर्मळ मति, द्वेष मत्सरा सुटका करी ती
  • दे मधुर वाचा अति, हास्य फुलू दे मुखावरती
  • प्रसन्नता अखंड चित्ती, कपटा न द्या थारा चित्ती
  • आलस्य न हो देहाप्रति, मोह वासना न उठो चित्ती
  • करुनिया बुद्धीची चंचलता परती, करी सर्वां स्थिर मति
  • नाम जडो जिव्हेप्रति, ध्यानी जडो स्थिर मति
  • दिसेल त्या त्या दृश्याप्रति, दर्शन होवो कृष्ण सरस्वती
  • हेतु मनींचा कळविता तुजप्रति, कृष्णदास झाला निश्‍चिंत अति
✦ ✦ ✦
४३
  • संगात राहुनिया नि:संग राहण्यासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • दशेंद्रिया विषय तो श्रीगुरुचि सर्व होण्यासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • अतूट तैलधारेवत् होण्या स्मरण अंतरासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • नित्य कर्मे करुनियाही येण्या अलिप्ततेसी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • षड्‌रिपु सकलही ते निर्मूल होण्यासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • द्वैत सांडुनिया अद्वैती रमण्यासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • मुक्तिवरील भक्ति सहजी साधण्यासी
  • या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
  • या चला जाऊया सारे श्री क्षेत्र करवीरासी
  • कृष्णदास म्हणे प्रार्थुया श्री कृष्ण सरस्वती गुरुंसी ॥
  • ✦ ✦ ✦
॥ करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा