देवदर्शन, तीर्थयात्रा, स्थान माहात्म्य
॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥
देव चराचर व्यापून आहे असा संतांचा अनुभव आहे. देवावीण रिता ठाव नाही तर देवदर्शनाचा, तीर्थयात्रा करण्याला काही अर्थ आहे काय? तदनुषंगिक शास्त्रीय मीमांसेचा हा प्रयत्न!
१. एकट्याला करमेना म्हणून या विश्वाची निर्मिती आहे. या मूल कारणाने या निर्मितीतील प्रत्येक जीवास ‘एकाकी न रमन्ते' हा स्वाभाविक स्वभाव लाभला. त्यामुळे तोच-तोच पणाचा कंटाळा. अखंड काहीतरी नवीन पाहिजे.
२. ईश्वराच्या सर्वव्यापित्वाची कल्पना नसणे, वा कल्पना असूनही त्यावर अनुभवाअभावी विश्वास वाटणे वा ती धारणा पेलण्यास मनाची दुर्बलता. त्या कारणाने बैसल्या ठायीच त्या भावाचा उगम व अनुभव करण्याप्रत त्या भावाचे सघनीकरण व त्याद्वारे प्रकटीकरण करण्याप्रत जाण्याची क्षमता जीवात नसते.
३. सहजप्राप्त वस्तूचे मोल नसल्याने काहीतरी अवघड, कष्टप्रद केल्याने ईश्वरप्राप्ती, ईश्वरदर्शन होते हा भ्रम!
४. वेगवेगळ्या स्थानांबद्दल वाचिक, ऐकीव कथेमुळे वा इतिहासामुळे त्या स्थानांबद्दल, त्या स्थानाच्या शक्ति जागृततेबद्दल, पवित्रतेबद्दल एक कल्पना मनात निर्माण झालेली असते जी जीवास अनुभवास सहाय्यकारी ठरते.
पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेताना मनात जे भाव, पूज्यता, एकाग्रता निर्माण होईल तितकी घराजवळील मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन घेताना होत नाही! निर्गुण निराकाराचा सगुण झाला, पण त्याचा सजीव होतो भक्तांच्या भावाने. स्थान महिमा आहेच कारण ती वास्तू, स्थान संतांच्या सहवासाने पावन झालेली असते. त्यांची कल्याणप्रद शक्ति तेथे अखंड कार्यरत असते. देवाच्या बाबतीत असंख्य लोक तेथे श्रद्धेने भक्तिने पाचारत असल्याने त्या मूर्तीत चैतन्य विशेषरुपाने जागृत असते. त्याचा लाभ, त्या वातावरणातील शुभ स्पंदने, विचार यांचा लाभ त्या क्षेत्री जाणाऱ्यास सहजी व विशेषत्वे मिळतो. पण तो स्थिर व कायम होणे हे अत्यंत अवघड आहे. एकाग्रता, चित्ताचे स्थिरत्व, इतर जगाची विस्मृती, स्वत:ची विस्मृती या गोष्टी जर साधल्या गेल्या तर त्या दर्शनाचे सुख जीवास मिळाले असे म्हणता येईल. सगुण दर्शनाची परिणती अष्टसात्त्विक भावजागृती व त्याचे अंतिम पर्यवसान देहभान विस्मृति की जे निर्गुण दर्शन, जेथे द्रष्टा, दृश्य, दर्शन त्रिपुटीचा लय आहे. मनात काही हेतू ठेवून परमेवरासमोर उभे राहिल्यास त्या दर्शनाच्या क्षणी त्या विचारांची शृंखला मनात चालू राहील व जीवास त्यापलिकडे जाता येणार नाही व दर्शनाच्या आनंदास तो मुकेल. जर निरिच्छ भावनेने, प्रेमाने जर ईश्वरापुढे उभा राहील तर जीव ईश्वराचे स्वरुप न्याहाळील व त्यातील सौंदर्याचा अनुभव घेताना जीवाचे अष्टसात्विक भाव उमलू लागतील. जर जीव निर्गुणाचा अधिकारी असेल तर दर्शनाअंती तो स्वत:चे नेत्र मिटून अंतरात्म्यात ईश्वराचा अनुभव करण्याचा प्रयत्न करेल व असे काही क्षणांकरता जरी घडले तरी त्याची यात्रा वा देवदर्शन सफल झाले असे म्हणता येईल.
— कृष्णदास (१३.०३.२०१२)
॥ करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆