॥ ईश्वरीय प्रेमाचा उदय - प्रक्रिया व साध्य ॥

ईश्वरीय प्रेमाचा उदय - प्रक्रिया व साध्य

॥ श्री सद्गुरुनाथाय नम: ॥


ईश्वर हा प्रेमभक्तीस सहजसाध्य आहे. पण या प्रेमाचे स्वरूप काय आहे व ते अंत:करणात कशा प्रकारे जागृत होईल, त्यासाठी साधना काय इत्यादी गोष्टींचा हा विचार - 


आपण ज्या विश्वात रहातो, जगात जगतो त्यावर लौकिकाचा संपूर्णत: पगडा आहे. मानवी जीवनास स्थूलाचे आकर्षण आहे कारण जन्मोजन्मींच्या संस्कारांचा, वासनांचा थर त्यावर साठलेला आहे. देहबुद्धीमुळे देहाद्वारा आनंद मिळविण्याची सवय व त्यासाठी लौकिकातील विविध सुखोपभोगी साधनांचा हव्यास यात मानव गुंतून पडला आहे. माझा देह, नव्हे नव्हे तर मीच देह आहे अशा ठाम कल्पनेने सर्वप्रथम मी, माझा, माझ्यासाठी व माझ्यापुरते अशी दृष्टी मानवात दिसते. परिणाम - स्वार्थ, कलह, व वस्तूच्या ह्व्यासामुळे वा अनुपलब्धतेमुळे असंतोष व दु:ख! आपणास आनंद देणाऱ्या गोष्टींवर सहजीच प्रेम जडते व त्यामुळे लौकिकातील साधनांवर मानवी प्रेम जडलेले आहे. परस्परांतील प्रेमही केवळ ती ती व्यक्ती आपणास शारीरिक, मानसिक सौख्य, आनंद पुरविते याचमुळे केवळ आहे. अशा परिस्थितीत ईश्वरीय प्रेमाचे स्वरुप मानवास कसे कळणार हा मोठा प्रश्न आहे. या प्रकारचे एखादे उदात्त प्रेम असू शकते याबाबत विचार येणे व त्यादृष्टीने पावले वळणे फारच अशक्यप्राय वाटते. हे कसे घडणार? आपणासकट सभोवतालच्या विश्वातील यच्चयावत जीवनाची अनिश्चितता, क्षणभंगुरत्व व मर्त्यपणा हे जर मानवाच्या ध्यानात येईल, तर मानवी बुद्धीत विचारशृंखला सुरु होते व त्यावरील खोल विचारमंथनाचे सरतेशेवटी या लौकिक जीवनातील सर्व धडपड व्यर्थ आहे हे त्याला उमजू लागते, त्याची खात्री पटू लागते. देहाद्वारा घेतलेल्या आनंदाच्या मर्यादा व तीच आनंददायी साधने वारंवार सेवन केल्याने आनंदाऐवजी दु:खातच परिणत हेोतात याचा अनुभव मानवास जाणवतो. हा आनंद स्थल, काल व प्रकृती सापेक्ष आहे याची पूर्ण खात्री अनुभवांती पटते. जर आनंद देणारे साधन नेहमी, पूर्ण काळ, अखंड आनंद देऊ शकत नाही, तर आनंद त्या साधनामुळे मिळत नसून त्याचे उगमस्थान काहीतरी वेगळेच असले पाहिजे हे ध्यानात येते व त्याच्या शोधास सुरवात होते. त्याची सुरवात म्हणजे लौकिकातील, दृश्यातीला प्रेम हळुहळू कमी कमी होऊ लागते. देहास आनंद देणाऱ्या साधनांवरील प्रेम आटू लागते. आजवर दृष्टी जी बहि:र्मुख झालेली होती ती अंत:र्मुख होऊ लागते. देह्च मी म्हणणारा, मी व देह यांचा वेगळेपणा मानवास जाणवू लागतो. पण त्या ‘मी' ला कसे जाणायचे? या ‘मी' चे स्थान कोणते? अशी जिज्ञासा निर्माण होते. 

 

दृश्यातील साधनांवर आनंद अवलंबून नाही याची जाणीव, खात्री झाल्याने दृश्याचे प्रेम आटते व त्यातील साधनांवरील प्रेम आटल्याने त्यांच्या अभावापायी मनात जी अशांति, दु:ख या भावनांचा उदय होतो तो लोप पावू लागतो व एक प्रकारची समाधानी वृत्ती खेळू लागते. मनाच्या संकुचित वृत्तीचा लोप होऊन त्याला विशालता येऊ लागते. ईर्षा, मत्सर, स्वार्थ कमी कमी होऊन करुणेचा उदय होतो. मला नाही तरी चालेल पण दुसऱ्याला आधी मिळू दे ही भावना उदित होऊ लागते. आधी मी, मला, माझ्यासाठी याऐवजी माझ्याआधी त्याला, त्याच्यासाठी या वृत्तीचा उदय होऊ लागतो. हाच ईश्वरी प्रेमाचा उदय होय. उदाहरणार्थ, बाळाला भरवल्यावर मातेला स्वत: उपाशी असूनही कसा आनंद, तृप्ती याचा लाभ होतो ना, तशी ही वृत्ती, दिल्याने आनंद देऊन जाते.स्वार्थकेंद्रित मी, विश्वकेंद्रित होऊ लागतो. प्रेमाच्या कक्षा हळुहळू रुंदावत जातात. देहव्यापक मी च्या कक्षा विश्वव्यापक मी त विस्तारु लागतात. हेे लौकिक विश्व क्षुद्र वाटू लागते व मन त्या अलौकिकात झेप घेण्यास तयार होते. 

 

या क्रियेत मनाचे शुद्धीकरण होऊ लागते व जसजसे ते शुद्ध होईल तसतसे त्याच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावत जातात, विश्वव्यापक होत जातात. अहम्‌म्हणून उठणारा श्वास सोहम्‌म्हणून उठू लागतो. मी देहच आहे म्हणणारा जीव, मी देह नाही व मी कोण आहे, तर मी ‘तो'च आहे या अनुभवास स्पर्शू लागतो. मीच सर्वत्र व्यापून आहे व त्यामुळे मी सर्वांवर प्रेम करतो कारण मी माझ्यावर प्रेम करतो. म्हणजेच मी त्याच्यावर, त्या सर्वव्यापी ईश्वरावर प्रेम करतो. 

 

या अवस्थेप्रत प्रगत परिणत झालेले हे प्रेम हे ईश्वरी प्रेम व याच प्रेमात ईश्वराचे दर्शन आहे. पण... त्याचे अधिष्ठान वा सुरवात आहे - त्याग! लौकिकाचा, मी पणाचा, मी चा. आहे तयारी?  

कृष्णदास (१३.१०.२०११)


॥ मौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
WhatsApp वर शेअर करा

हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा