🏠 स्वगृह
›
संत दालन
›
श्री दत्त चिले महाराज
१
- दत्तगुरुंची वाडी पैजार, चिले महाराज तेथ अवलिया थोर
- शिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर
- कूर्मपृष्ठाचे तेथ अंबर, कृपाछत्र असे उभविले थोर
- कवच टणक अति अपार, प्रारब्धाचा त्यावरी न चले जोर
- घ्या आसरा अन आधार, कापेल काळही जणू थरथर
- पोशितसे कासवाची नजर, जाता शरण पदकमलांवर
- चला चला हो वाडीसी सत्वर, घ्या हो घ्या हो दर्शन सत्वर
- कोट टोपी पायी विजार, अवधूतचि हा झाला साकार
- दत्तगुरुंची असे किमया थोर, आशीर्वाद तुम्हा त्वरित अपार
- कृष्णदास गाठी वाडी पैजार, प्रारब्धा ना उरला थार
- महाराजांची कृपा अपार, आनंदा ना पारावार!!
✦ ✦ ✦
२
- आले आले महाराज चिले, पैजारवाडीसी दर्शन दिले
- कोट टोपी पायजमा शोभले, चरणांगुष्ठांसी मी स्पर्शिले
- ‘असू दे, असू दे’ मृदु बोलिले, मागील द्वारी निघुनि गेले
- अस्तित्वाची प्रचित दाविले, घडता आनंदे मन भरले
- कृष्णदासे महाराजा प्रार्थिले, तात्काळ दर्शन असे घडले
✦ ✦ ✦
३
- ॐ दत्त चिले, ॐ दत्त चिले,
- मंत्र हा अखंड, जपा तुम्ही भले
- नामात प्रेम, वाढेल कले कले,
- स्मरणेचि भरतील, नेत्र अश्रुजले
- सद्गदित कंठे त्या, स्मरता श्री चिले,
- प्रसन्न होऊनी प्रगटतील तुम्हा, सामोरी ते भले
- अनन्य भावासी केवळ, असती भुकेले,
- सेवाया तोचि घेतला, अवतार धरातले
- नयनी ही मूर्ती, ध्या तुम्ही भले,
- मुखी हास्य हृदय नेत्र, करुणे ओथंबले
- जे जे जीव हृदयी हा, मंत्र गर्जले,
- मंत्र न केवळ ठरली ती, कवच कुंडले
- इहपर सौख्य सर्व, त्यासी लाधले,
- प्रसन्न झाले त्यावरी, महाराज श्री चिले
- कृष्णदास जपतो नित्य, ॐ दत्त चिले,
- तोषोनि अनंत आशीर्वाद देती, महाराज श्री चिले
✦ ✦ ✦
४
- ॐ दत्त चिले मंत्र पंचाक्षरी
- दुजा कुणा मंत्रा नाही याची सरी
- सामर्थ्ये भरला असे अपारी
- अनुभव त्याचा घ्या आपुल्या अंतरी
- म्हणा मंत्र हा तुम्ही वैखरी
- इडा पिडा टळती सर्व क्षणाभीतरी
- ॐ असे आदि बीज, दत्त तो मोक्षकारी
- प्रगटला श्री चिले रुपे, अंबेच्या कोल्हापुरी
- जपा नाम जववरि न, उठे रोमरोमावरी
- होता ऐसे पहाल मूर्ती, उभी सामोरी
- कृपा असे महाराजांची, कल्पवृक्षापरी
- लाभेल ज्या, भाग्या त्याच्या, नाही हो सरी
- कृष्णदास जपे नाम, नित्य हृदयांतरी
- प्रगटले महाराज अन् कृपा, केली अपारी
✦ ✦ ✦
५
- म्हणा ॐ दत्त चिले, एकभावे भले
- महाराज करतील तुमचे, सर्वचि भले
- नाम घेता अंतरी, जे का कळवळले
- प्रारब्ध भोग त्यांचे, सर्वचि टळले
- नाम मुखी ज्यांच्या, सदा हे रंगले
- वाटे जणू त्यांचे, पुण्यचि फळले
- महाराज त्यावरी अपार, कृपा हो वर्षले
- आत्मानंदे त्यांचे, हृदय हो भरले
- कृष्णदास जपतो नित्य ॐ दत्त चिले
- म्हणा सवे तुम्ही सर्व ॐ दत्त चिले
✦ ✦ ✦
६
- भक्तजना अंतरी, दत्तप्रेम दाटले
- करवीरी तेचि, प्रेमरुपे प्रगटले
- अवतारे अवलिया, रुप घेतले
- अवधूत प्रगटले, नामे श्री चिले
- उन्मनीत जे, अखंडचि हो रमले
- अकल्पित कृपा त्यांची, किती हो लाधले
- बाह्यांगे जमदग्नि, रुप जरी धरिले
- करुणा अन् प्रेम, अंतरी असे भरले
- करुणेने हृदय, जेव्हा जेव्हा ते द्रवले
- कृपे त्या अनंत, संकटी हो तरले
- ॐ दत्त चिले म्हणता, क्षणातचि तुष्टले
- स्मर्तुगामी दत्तासी, कृष्णदासे पाहिले!
✦ ✦ ✦
७
- आरती
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
- रुप अवधूत दत्त चिले, करवीरी दत्तचि अवतरले ॥१॥
- प्रेम अंतरी स्मरता रुप, पुढे उभे ठाकले
- भाव भक्तिची प्रेमळ मूर्ती, हास्य मुखी शोभले ॥२॥
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
- नाम कृपाळू स्मरता दत्ताचे, अंतरी प्रेम उदित झाले
- रुप पावन दर्शन घडता, देहभान हरपले ॥३॥
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
- दत्ताची ही किमया न्यारी, मी तू पण नेले
- एकभावे प्रणाम करता, एकरुप केले ॥४॥
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
- गाता भक्त, दाता दत्त, मज चरणी ठेवा प्रार्थिले
- कृपेसी उणे नच गमले, त्वरितचि आशीर्वच दिधले ॥५॥
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
- कृष्णदास प्रार्थिता बालके, प्रसन्न, झाले दत्त चिले
- सदेह अवधूत दर्शन घडता, चरणकमल नमिले ॥६॥
- करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
✦ ✦ ✦
८
- ॐ दत्त चिले जय दत्त चिले,
- भजनी मनुजा रमा भले
- दत्तगुरु अवतार चिले,
- शरण जाता त्यांसी भले
- धरिले जरी तुज विषयव्याळे,
- क्षणात सुटका करिती चिले
- बद्ध जिवाला मोक्ष अर्पिण्या,
- अवतरले श्री दत्त चिले
- नित स्वानंदी उन्मनी रमले,
- रमवितील ही तुम्हा भले
- आनंदा त्या नित्य रंगुनि,
- करा भजन हे तुम्ही भले
- ॐ दत्त चिले जय दत्त चिले,
- कृष्णदास भजनी रमले
✦ ✦ ✦
९
- गुरुंच्या नामात व्हा धुंद, चिलेंच्या नामात व्हा धुंद
- मिळेल तुम्हा अपार आनंद, मिळेल अखंड स्वानंद
- चाखा की हो नित्य तो मकरंद, विरेल मग वासनाकंद
- घेता तुम्ही हाचि एक छंद, अंती तुम्हा भेटेल गोविंद
- कृष्णदासा लागला हा छंद, झाला चिले नामी धुंद!
✦ ✦ ✦
१०
- चला जाऊ पैजारवाडी, चला जाऊ पैजारवाडी
- चला चला करा तुम्ही तातडी, घ्या सवे सारे सवंगडी
- भवसागर जरी दुस्तर गमला, सहजी पावाल पैलथडी
- सागर खोली पाहुनी भ्या ना, घ्या तुम्ही निश्चिंतपणे उडी
- सद्गुरू सोइरा बैसला तेथे, महाराज श्री दत्त चिले नावाडी
- नाव गुरुंची अतिशय तगडी, छत्र कृपेचे त्यावरी उघडी
- अनंत संकटे वादळे घडीघडी, तरी काहीच ना ते बिघडी
- दयाळू प्रेमळ कुशल नावाडी, सर्वचि चिंता तुमची दवडी
- योगक्षेम काळजी तुम्हा, ना स्पर्शेल कदापि घडी
- दत्त चिले पावन नामाची, चाखा तुम्ही ही गोडी
- नामाच्या स्वानंदी रमता, सरेल आनंदे प्रत्येक घडी
- नामाचा त्या करिता धावा, अंगिकार करील तेचि घडी
- अंगिकार दत्ताने करिता, प्रवास सुखमय जीवन घडी
- कृष्णदास गडी श्रीदत्ताचा, म्हणे चुकवू नका ही घडी
✦ ✦ ✦
११
- आली श्री दत्त चिलेंची स्वारी, आली श्री दत्त चिलेंची स्वारी
- कोट पायजमा टोपी शिरी, महाराज अखंड उन्मनीवरी
- दृष्टी कृपाळु अति भारी, शोभले हास्य श्रीमुखावरी
- नमिता पावन चरणांवरी, अर्पिती आशीर्वाद सत्वरी
- वाचा प्रेमळ मधुर अपारी, हर्ष फुलला अति अंतरी
- पैजारवाडीची, झाली सफल ती वारी, कृष्णदासे देखिली श्रींची स्वारी
✦ ✦ ✦
१२
- भजा अवधूत अवधूत, चिले महाराज दत्त
- कृपा त्यांची हो अमित, कृपाळू साक्षात दत्त
- हृदयी ध्याती जे भक्त, भाग्या नाही त्या अंत
- कृष्णदास भजे श्रीचिले संत, लाभला कृपा अनंत
✦ ✦ ✦
१३
- वाडी पैजार कृपा अपार, बैसले तेथे चिले गुरुवर
- कोट पायजमा टोपी शिरावर, अवधूताचा सुंदर अवतार
- ब्रह्मांडनायक शक्ति अपार, सत्ता गाजते त्रिभुवनावर
- अनंत जन्मींचा सखा गुरुवर, करील तुमचा अंगिकार
- भाव एकचि पूजेचा आधार, अन्य ना तेथे काहीच प्रकार
- धावा धावा तुम्ही वाडी पैजार, शरण झडकरी जा चरणांवर
- कृष्णदास म्हणे ऐका एक वार, जन्ममरणाचा चुकेल फेर
✦ ✦ ✦
१४
- गाठा वाडी पैजार, करा नामाचा गजर
- ॐ दत्त चिले जय दत्त चिले, ॐ दत्त चिले जय दत्त चिले
- अवधूताचा अवतार, वसे तेथे श्री शंकर
- कासवाची त्यांची नजर, पोशेल तुम्हा जन्मभर
- जन्माअंती गुरुवर, देईल मोक्ष सत्वर
- नाही चिंता तिळभर, जाता वाडी पैजार
- कृष्णदासाची हाक अपार, ऐकोनिया तुम्ही घ्या सत्वर
✦ ✦ ✦
१५
- दत्त चिले नामाची, काय वर्णू मी गोडी त्याची
- रसना थकेचि ना घेताचि, पुलकित स्थिति होते हृदयाची
- लोपली जाणीव निशिदिनीची, अखंड माळ फिरे जपाची
- ही कृपाच दत्त चिलेंची, माधुरी दाविली मज नामाची
- कृष्णदासे चाखिली साची, असे अनुपम चवी हो त्याची
- म्हणे घ्या अनुभव एकदाचि, मग रमाल त्यात नित्यचि
✦ ✦ ✦
१६
- करा करा नामाचा घोष, होइल श्री दत्तांसी तोष
- धरिला त्याने मनुष्यवेष, राहिला पैजारवाडीस
- स्वानंद भान नित्य ज्यास, ना कधी देहभानास
- नामे त्वरित तुष्टतो खास, नामजपे तोषवा तुम्ही त्यास
- ॐ दत्त चिले खास, मंत्र जपतो कृष्णदास
✦ ✦ ✦
१७
- घडता स्मरण श्री दत्त चिले, होती नयन मम हे ओले
- प्रेमस्वरूप श्री दत्त चिले, माता हृदयचि जणू कोमले
- दु:खिता पाहुनी कळवळले, अमाप करुणे जे भरले
- निजकृपा अखंड वर्षले, जरी ते उन्मनीत रमले
- आज कुठे असे ते लपले, नयन शोधुनिया हो थकले
- आम्हासी जरी अंगिकारिले, प्रेम अवचित कां आटले
- सांगा अमुचे काय चुकले, रुप सगुण तुम्ही लपविले
- बाळ अपराधी चुकले, माता हृदय कधी कोपले
- जगणे उदासवाणे झाले, न दिसता तव पाऊले
- मृतींचे मेघ मनी दाटले, मनीचे भाव अनावर झाले
- कृष्णदास हृदय आक्रंदले, चरणी वाहिली अश्रूफुले
✦ ✦ ✦
१८
- गुरुराया मज दावा तव पाऊले, गुरुराया मज दावा तव पाऊले
- स्वर्गलोकींच्या सुरवरा वंद्य जी, पावन चरणकमले
- हरिद्राकुंकुम वाहुनिया वरी, अगणित भक्ते जे पुजिले
- मस्तक ठेवुनी नमिता त्यावरी, कितिक ते उद्धरिले
- भक्तांसाठी फिरता निशिदिनी, ना थकली जी पाऊले
- कृष्णदास तुज करी प्रार्थना, ऐका देवा, महाराज श्री दत्त चिले
✦ ✦ ✦
१९
- कोण जाणे करुणा गुरुरायाची, येते मज आठवण चिले महाराजांची
- अवतार मूर्ति अवधूताची, कधी कधी दाविली नृसिंहाची
- हरिद्राकुंकुम चर्चित चरणांची, फुले सजविल्या कर्णांची
- हास्यभरित मुखकमलाची, अन् क्षमापूरित नयनांची
- दर्शना सामोरी जाताचि, वदति वाणी आशीर्वादाची
- कोमल प्रेमळ मधु शब्दांची, कर्णी गुंजते वाणी त्यांची
- स्मृतीत मूर्ति ही गुरुंची, निशिदिनी देते आठवण साची
- पैजारवाडी रमले निवांतचि, कृष्णदास आठव नित्यचि
✦ ✦ ✦
२०
- चिले माझा दत्ताचा अवतार, चिले माझा दत्ताचा अवतार
- मजवरी त्यांची कृपा अपार, मजवरी त्यांची कृपा अपार
- भावाचा भुकेला गुरुवर, नलगे अन्य तो उपचार
- ॐ दत्त चिले नाम, त्याचा करा तुम्ही गजर
- दु:खी दीनांचा ऐकुनि धावा, संकटी घेई उडी सत्वर
- करवीरी केल्या लीला अपार, अंती रमला वाडी पैजार
- अवधूत दयाळु कृपाळु अपार, कृष्णदासा लाभली कृपा अपार
✦ ✦ ✦
२१
- ॐ दत्त चिले सोंऽहं, नाम जपना तुम ये हरदम
- कृपा उसकी पाओगे जब, भूल जाओगे अपना अहम्
- अवधूत का अवतार वो, आपके खातिर लिया जनम
- नाम जपे जो उसका निशिदिन, चलेंगे साथ कदम कदम
- जीवन की सब दु:खमय घडी, मिटा देंगे तुम्हारी सनम
- खुशियोंं की बौछार होगी, शरण जाओगे जब सनम
- असीम कृपा बरसाएंगे, साथ न छोडेंगे जनम जनम
- ॐ दत्त चिले सोऽहं, कृष्णदास जपे हरदम
✦ ✦ ✦
२२
- निशिदिनी उन्मनीत रमले, महाराज चिलेंसी मी नमिले
- दयेची मूर्ति जे शोभले, महाराज चिलेंसी मी नमिले
- भक्त संकटी जे धावले, महाराज चिलेंसी मी नमिले
- भक्त कल्याणा निशिदिनी जे फिरले, महाराज चिलेंसी मी नमिले
- कृपा आशीर्वाद नित वर्षले, महाराज चिलेंसी मी नमिले
- भक्तां प्रेमरुपचि गमले, महाराज चिलेंसी मी नमिले
- दर्शनी भक्त हृदय वेधले, महाराज चिलेंसी मी नमिले
- अवतार दत्तचि कि हो भले, महाराज चिलेंसी मी नमिले
- पावन चरणकमल नमिले, जीवन धन्यचि हो गमले
✦ ✦ ✦
२३
- ॐ दत्त चिले सोऽहं, अंतरात उठे नाम
- घेता त्याचे नित्य भान, अन्य विचारा त्वरित विश्राम
- दशेंद्रिया विषय ना आन, दत्तपिसे लागेल जाण
- सगुणात अखंड रमाल जाण, अंती गाठाल निर्गुण धाम
- अतिसुलभ उपाय अन्य ना आन, कृष्णदास वाहतो आण
✦ ✦ ✦
२४
- गुरुदेव दत्तपायी, माझे मन रमले
- येवोनिया सामोरी, श्री दत्त चिले ठाकले
- समाधिस्थ जरी झाले, सदेह ते दिसले
- अहो भाग्य माझे, मी चरणांवरी नमिले
- आशीर्वाद मजसी, न कळे काय दिधले
- आनंदे त्या माझे, मन की हो भरले
- अकल्पितचि हे, पहा कसे घडले
- जाता पैजार वाडी, दर्शन असे घडले
- अवधूतासी काही, अशक्य ना कळले
- कृष्णदासे तुम्हांसी, वृत्त असे कथिले
✦ ✦ ✦
२५
- ध्या रे दत्तासी ध्या रे, त्याचे कृपादान घ्या रे
- अनित्य नश्वर जगती या, नच इतर मागा रे
- भुलवेल तुम्ही अनित्य विभवा, सावधान व्हा रे
- वैराग्याची खरी शिदोरी, प्राप्त करुनी घ्या रे
- ज्ञानभक्तिचा अमोल ठेवा, कृपे सहजी मिळे रे
- वाट पाहतो तुमची जा जा, पैजारवाडीसी रे
- दत्त चिले महाराज तुमची, वाट पाहती रे
- जाऊनिया तेथे एकवार तरी, अनुभव तुम्ही घ्या रे
- मायदत्ताच्या कुशीत शिरुनि, निश्चिंत व्हा रे
- कृष्णदास तेथ अनुभव लाभुनि, निश्चिंत झाला रे!
✦ ✦ ✦
२६
- ॐ दत्त चिलेंसी या, कधिचि ना देहभान
- सदासर्वदा राहिला, उन्मनीत रममाण
- खाणेपिणे सभोवतीची, कधिचि ना शुद्ध जाण
- परमात्माचि देहात त्या, वस्ती करुनी राहिला जाण
- दृष्टी त्याची पडताचि, जन्म सफल झाला जाण
- चिले रुपे भगवंताने, धाडिली गे तुम्हा खाण
- श्री क्षेत्र पैजारवाडीसी, मांडिलेसे त्याने ठाण
- कृष्णदास सांगे धावा उठा, जाऊनिया व्हा शरण
✦ ✦ ✦
२७
- चिले माझा दयाळू राणा, न दुजा परि अवधूताची जाणा
- विनवा त्यासी वैराग्य अर्पिण्या, व्हाल लायक मग ज्ञान भक्ति चाखण्या
- मागा त्यासी त्या ज्ञानभक्तिच्या खुणा, कृपेसी नाहीच तो की उणा
- साधनेच्या तुम्हा दाविल खाणाखुणा, पार करेल तुम्हा त्रिगुणा
- ॐ दत्त चिले सोऽहं, जपा तुम्ही कृपा त्यांची लाभण्या
- मंत्र जरी दिसे सगुणा, अंती भेटविल निर्गुणा
- सगुण भक्ति आनंद लुटण्या, निर्गुण आत्मानंद लुटण्या
- करा त्वरा श्री दत्त चिले तोषविण्या, जा तुम्ही पावन चरणी शरणा
- कृष्णदासे उघड केलिया खुणा, आनंदे हसतो मोक्षराणा
✦ ✦ ✦
२८
- ॐ दत्त चिलें सोऽहं, नामाची शक्ति अपार
- जाऊनिया अहम् भान, सोऽहं भान नित्य अपार
- दीक्षा त्याची होतसे, श्री क्षेत्र वाडी पैजार
- उगमी त्या जा एकवार, भावे करा नमस्कार
- कृपादृष्टी पाहता गुरुवर, उठेल अंतरी नामाची धार
- कृष्णदास म्हणे न्हाता धारेत, आत्मानंदी रमाल अपार
✦ ✦ ✦
२९
- श्रद्धा भक्ति धन अमोलिक, घेऊनिया अंतरातऽऽ,
- भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
- श्रद्धेने त्या भक्तिचे फल, कृपादृष्टी दिनरातऽऽ,
- भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
- भक्तिने त्या अवधूत दत्त, होईल हो साक्षातऽऽ,
- भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
- अंतरी दत्त समोर दत्त,ध्यानी मनी निशिदिनी दत्त,
- कृपा वर्षत अखंड अविरत
- पूजन करुनि दत्त कृपेचा, घ्या अनुभव दिनरातऽऽ,
- भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
- कृष्णदास म्हणे दत्त कृपेने, जीवन आनंदातऽऽ,
- भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
✦ ✦ ✦
॥ ब्रह्मसनातन सद्गुरुमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
✦ ✦ ✦
हे पृष्ठ आपल्या मित्र-परिवारांसोबत शेअर करा
⬆