योगीराज श्री चांगदेव

चांगदेव योगी चौदाशे वर्षांचे, आले व्याघ्रावरी बैसोनिया
जटाभार शिरी, माळा गळा करी, चाबूक तो सर्प धरोनिया
सवे शंख भेरी, शिष्य ही अपारी, योग्याचे वैभव, दावितसे
आले आले आले, आले वेशीवरी, निरोप तो गेला, अलंकापुरी
निवृत्ती ज्ञानाई, सोपान मुक्ताई, आले आले भेटण्या योगिराज
मुक्ता म्हणे दादा, चांगा थोर योगिराज, आलासे भेटण्या आपणासी
थोरा मोठ्या साजेसे, स्वागत जरूर, केले पाहिजे, आपण ते
कैसे ते करावे, काही ना साधन, विचार अंतरी करीताती
बैसली होती ती एका भिंतीवर, ज्ञानाई म्हणाली, काळजी नको
बोले भिंती ना तू जड, चैतन्य परिपूर्ण, चल उड नेई आम्हा, चांग्यापाशी
नवल ते वर्तले, उडाली हो भिंत, वायुवेगे आली चांगदेवापाशी
चांग्या पाही आकाशी, भिंत दिसे उडत, वरी बैसले ते चारीजण
क्षणार्धात आले, चांगदेवापाशी, उतरोनि आली, भिंत धरतीसी
उतरले चौघे, गेले ते सामोरी, नमुनि आदरे, योगिराजा
निर्जीव भिंत चालता पाहोनि, वरमला योगी, चांगदेव
उतरोनि व्याघ्रावरुनि, धरिले चरण, आला ज्ञानाईसी, तात्काळ शरण
कृपा करी देवा, घेई माझी सेवा, शरण मी आज, तुज जीवाभावा
सजीव भूतांवर, माझी चाले सत्ता, परि निर्जीवही तुझे अंकित
ज्ञाना म्हणे त्यासी, जाण चांगदेवा, सोड देहभावा, कळेल खूण
आत्मसत्ता असे, चराचरी व्यापक, चैतन्य ते ओतप्रोत, अणूरेणू
देह नव्हे नव्हे तू, आत्मरुप होसी, नाश होई देहा, परि आत्मा अविनाशी
जेव्हा तू जाणसी, देह ना राखसी, आत्मरुपे अनुभवसी, विश्‍वाकार
बोले मुक्ताईसी, शिष्य करी चांगदेवा, ज्ञान देउनिया, हरी जीवभावा
मुक्ताईने चांगदेवा, केला उपदेश, पटविली खूण, आत्मज्ञाने
ज्ञान होता पुणतांब्या, घेतली समाधी, अल्पकाळे योगिराज, चांगदेवे
कथा ही सुरस, येता आठवणीत, वर्णिली ज्ञानाईच्या कृष्णदासे
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *