स्वरूप-लहरी

परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या पावन स्मरणाने अंत:करणात उसळलेला प्रेमलहरींचा कल्लोळ

PDF फाईल डाऊनलोड करायला इथे क्लिक करा 

स्वरूप-लहरी, सबाह्याभ्यंतरी |
सर्व विश्‍वांतरी, व्यापुनिया ||१||
पावसी मानसी, अणुरेणुयासी |
झंकार नित्यासी, सोऽहं सोऽहं ||२||
नेक सोऽहं भावे, एकरूप व्हावे |
स्वरूपी त्या जावे, विश्रांतीसी ||३||
ज्ञानियाची भक्ति, ज्ञानियाची युक्ति |
कृष्णदास चित्ती, ठसलीसे ||४||

नित्य निर्विकार, राही गा तू मना |
स्व-स्वरूप ध्याना, सोडू नको ||१||
कोरोना कोरोना, नको जप मना |
स्वामी आशीर्वचना, विसरू नको ||२||
भय मनी नाणा, कर्तव्या ना उणा |
दास श्रेष्ठ जाणा, सद्गुरूंचा ||३||
कृपेच्या त्या खुणा, दावितसे राणा |
पावसी शरणा, कृष्णदास ||४||

स्मृति पावसेची, नित्य आम्हां साची |
वार्ता विरहाची, न बाधेचि ||१||
स्वामी स्मर्तृगामी, क्षणे येतो जातो |
ठायीच स्मरतो, आम्हीं त्यासी ||२||
ध्यानी मनी स्वामी, सोsहं सोsहं स्मरणी |
साधनेची खुणी, हीच असे ||३||
विश्वाकार स्वामी, दास आम्ही नामी |
आनंदा ना कमी, कृष्णदास ||४||

ध्यास तो पावस, आस मनी पावस |
वास व्हावा पावस, नित्य आम्हां ॥१॥
मनी हीच आस, असे गा भक्तांस |
क्षणोक्षणी मानस, पावस लक्षे ॥२॥
सुमुख सुंदर, स्मित-हास्य मुखावर |
प्रेमळ स्वामीवर, आम्हां हृदयी॥३॥
स्वामी कृपाळुवा, लाविलासे लळा |
कृष्णदास बाळा, सांभाळितो ॥४॥

पावसीचे बाळ आम्ही, कापे कळीकाळ |
गर्जे सदाकाळ, सोऽहं हृदयी ॥१॥
नाथपंथी स्वामी माझा, आम्ही हो सनाथ |
माथ्यावरी कृपाहस्त, जाहलो निश्चिंत ॥२॥
चालतो हळुहळू, निर्गुणाचा पंथ |
स्वामी सगुणात, लीला करी ॥३॥
अनंतात स्वामी, प्रत्यक्ष अनंत |
कृपेचा ना लागे अंत, कृष्णदासा ॥४॥

कुणी देखियेले, ब्रह्म ते रे सांगा |
निर्गुणाच्या अंगा, सगुणी गा ॥१॥
निर्गुणाचे गुण, सगुणी आले |
पावसी देखिले, स्वरूप-ब्रह्म ॥२॥
कोण क्रीडा करू शके, निर्गुणासंगे |
स्वामीसंगे, आम्ही क्रीडा केली ॥३॥
प्रेमे नाचू गाऊ, सारे आनंदात |
क्षेत्र पावसेत, कृष्णदास ॥४॥

आता कैसे काय, सद्गुरुंसी ध्याऊ |
मना नाही ठावू, उरलासे ॥१॥
मन माझे नेले, सद्गुरूने विलया |
चरणांसी ध्याया, उरले काय ॥२॥
पावसीचा स्वामी, काम करी नामी |
हृदयीच विश्रामी, कृष्णदास ॥३॥

नाच नाच सखया, पावसेच्या अंगणात |
अनंत अनंतात, बैसलासे ॥१॥
द्वारी राहू तिष्ठत, वाचे नाम गात गात |
भक्तिने गा डोलत, स्वरूपनाथ ॥२॥
स्वामी रंगे सोऽहं संगे, भक्त रंगे स्वामी संगे |
कृष्णदास गात अभंगे, रंगलासे ॥३॥

भक्त आले सारे नामी, पलंगासी हासे स्वामी |
दिसतसे दिवस नामी, भक्तिभावे नाचू आम्ही ॥१॥
ॐ राम कृष्ण हरी, नाम गर्जते वैखरी |
तोचि हरी पलंगावरी, कवतुक डोळेभरी ॥२॥
हास्य स्वामी मुखावरी, मोद भक्तांसी अंतरी |
कृष्णदास नाचे डोले, स्वरूपानंद हृदयांतरी ॥३॥

स्वामी कां गां मौनावला, देहभान विसरला |
सोऽहं जपता नामावळी, सोऽहं तो ही अस्तवला ॥१॥
भक्त तिष्ठे दर्शनाला, करीतसे प्रार्थनेला |
उगी उगी जागा होई, देई देई दर्शनाला ॥२॥
जागृत अंंतराला, स्वामी कधी अंतरला |
कृष्णदासासकट, गिळियेले ब्रह्मांडाला ॥३॥

ब्रह्मांडाची काय मात, स्वामी नित्य हृदयात |
सोऽहं सोय या पिंडात, दावुनिया उघडे गाठ ॥१॥
खूण घ्यावी ध्यानी नीट, मार्ग असे जरी बिकट |
कृपा स्वामींची अचाट, लंघू सहजी सर्व घाट ॥२॥
माया करी थयथयाट, परि कृपेचा त्या काय थाट |
घेऊनिया सहजी घोट, कृष्णदास ब्रह्मांडात ॥३॥

स्वामी स्वामी गात गात, चला जाऊ पावसेत |
आनंदाने डोलतसे, स्वामी माझा स्वरूपनाथ ॥१॥
कैसा आलो पावसेत, भक्ता आश्चर्य निश्चित |
स्वामी झाला कृपावंत, आणितसे नकळत ॥२॥
नकळत आलो परि, कळे खूण लई भारी |
जपा सोऽहं श्‍वासावरी, पोहोचाल पैलतीरी ॥३॥
ऐलतीरी भक्त सारे, स्वामी असे पैलतीरी |
पावसची नाव भारी, कृष्णदास पैलतीरी ॥४॥

ऐलथडी पैलथडी, खेळू खेळ दो घडी |
वाटाड्या स्वरूपनाथ, लाभलासे सवंगडी ॥१॥
मार्गामार्गाची ना वेडी, उरली ती काही कोडी |
लाभलीसे स्वामीसाथ, साथ कित्ती भली तगडी ॥२॥
लागता सोऽहं गोडी, नित्य जडे ती आवडी |
विषयाची सुटे खोडी, कार्यकारण तुटे बेडी ॥३॥
पावसची भेट जोडी, परमार्थाची बैसे घडी |
भक्त कृष्णदासा नित्य, स्वामीदर्शनाची ओढी ॥४॥

दान काय मागो आम्हीं, स्वामींचे हो दास |
स्वामी हृदयी नित्य खास, करीतसे वास ||१||
स्वामीप्रेमसुख गोडी, लागली जीवास |
नाही आता नाही आस, स्वरूपाचा ध्यास ||२||
सोsहं तंतू ऊर्ध्व ऊर्ध्व, खेचे सावकाश |
स्वामी अलगद श्वास, नेई आकाशास ||३||
आकाशात विहरे स्वामी, भक्ता घेई बरोबरी |
कृष्णदास वर्णी थोरी, पावसेची तऱ्हा न्यारी ||४||

स्वरूपनाथ महासिद्ध, दास आम्ही त्याचे |
श्रीमंत जणू नृपाचे, प्रजाजन साचे ॥१॥
अष्टमहासिद्धि, लोळती चरणी |
दास-मनोरथ धणी, पुरवितो सहजी ॥२॥
काय मागू त्यासी वाचे, दास हो फुकाचे |
कृष्णदास खास त्याचे, लळे पुरवी साचे ॥३॥

स्वरूपनाथ महासिद्ध, नाथपंथी थोर |
पावसग्रामी भरे नित्य, त्याचा दरबार ॥१॥
दर्शनासी आलो, चरणांवरी ठेवू शिर |
स्वामीमूर्ती देखोनिया, हर्षे भरे उर ॥२॥
शांत निवांत नीरव, ठाव घेतसे अंतर |
मन होय निर्विकार, ऐसा असे दरबार ॥३॥
सोऽहं सोऽहं वारंवार, श्वास चाले खालीवर |
त्याचा घेवोनि आधार, पद पाव निराकार ॥४॥
स्वामी उपदेशी सार, धरोनिया वर्ते धीर |
केला आहे अंगिकार, तुटेल की येरझार ॥५॥
नको होऊ उतावीळ, सोऽहंनेच लाभे बळ |
कृष्णदास बाळा कवळ, माय स्वामी दे तात्काळ ॥६॥

अलख अलख गर्जे नाथ, सोsहं सोsहं घ्यावी साथ |
तोचि असे परम स्वार्थ, साधा आपुलाले हित ॥१॥
नाथपंथ उपदेशत, निवृत्तीसी गुह्य कथित |
ज्ञानोबाने महाराष्ट्रात, उघडली मुक्ति पेठ ॥२॥
तोचि आला स्वरूपनाथ, रत्नागिरी पावसेत |
सोsहं सोsहं घोष करीत, वसतसे अनंतात ॥३॥
माथा ठेविताचि हस्त, सोsहं ह्रदयी प्रकटे खचित |
पावसी जाता भक्त, अनुभव होई त्वरित ॥४॥
जा रे जा रे धावा तेथ, पेठ असे पावसेत |
कृष्णदास ह्रदयी ध्यात, पावसीचा स्वरूपनाथ ॥५॥

उठ उठ जागा होई, पावसेची माय पाही |
पुकारते तुज बाही, पावसेत येई येई ॥१॥
सोsहं सोsहं मृदुल कवळ, ये ग बाळा तुज देई |
गोड गाईल अंगाई, तेणे “जाग” तुज येई ॥२॥
विषयांचे भय नाही, स्वरूपीच “नीज” ठायी |
जन्म ऐसा सफळ होई, आत्मरूप ठाई ठाई ॥३॥
जन्मोजन्मींची पुण्याई, येणे रिती फळा येई |
धाव धाव कर घाई, खुणाविते स्वरूपाई ॥४॥
कृपाळू प्रेमळाई, लेकुरांसी गूज देई |
कृष्णदास बाळ गाई, स्वरूपाची नवलाई ॥५॥

गुलाबी कांतीचा, स्वामीराज माझा |
कैवल्याचा राजा, पावसेत ||१||
ज्ञानमुद्रा हस्त, असे उभावत |
भक्तांलागीं देत, आशीर्वच ||२||
मंद-स्मित मुख, मोहक वेधक |
पहावया भूक, नित्य आम्हां ||३||
स्वामीसंगे नित्य, क्रीडा करू आम्हीं |
पावसेच्या धामी, कृष्णदास ||४||

खुणावतो या रे, स्वामीराज माझा |
हितार्थ साधाया, जीवनाचा ||१||
सोsहं-गूज गोष्टी, अध्यात्माची सृष्टी |
पाववितो तुष्टी, भक्तराजा ||२||
नको तो विलंब, त्वरित धावा या |
पावसेची माया, दुर्लभ ती ||३||
सुलभ ते आम्हां, झाले भक्तियोगे |
स्वरूपानंद भोगे, कृष्णदास ||४||

पावस आमुचे, पराशांति ठाणे |
ईश्वराचे देणे, भक्तांलागी ||१||
शांतीची पै शांति, करीते विश्रांती |
नाही काही भ्रांती, पावसेत ||२||
शरण चरणी, नाही रे विनवणी |
आपंगितो धनी, तात्काळचि ||३||
उघडेल जरी, पुण्याची हो खाणी |
कृष्णदास वाणी, प्रचितीची ||४||

स्वरूपाच्या रूपे, आनंद तो नांदे |
लावील तो छंदे, सर्वकाळ ||१||
आनंदाच्या छंदी, भक्तांची हो मांदी |
पावसेत नांदी, सर्वकाळ ||२||
अखंडचि जागा, भक्तहित काजा |
तो स्वरूपराजा, तिष्ठतसे ||३||
नश्वर दुःखाचा, काय तेथें पाड |
पावस ते गोड, कृष्णदासा ||४||

भ्रमर तो देख, करी गुंजारव |
मौनाचा अभाव, असे तेथ ||१||
तैसे नव्हे देख, स्वरूपाचे सुख |
मौन वेद देख, काय सांगो ||२||
घ्यावया प्रचित, जावे पावसेत |
स्वरूप सेवित, असे राणा ||३||
जाताचि शरणा, दाविल तो खुणा |
तेथ मौन जाणा, कृष्णदास ||४||

पावसची भक्ति, देईल हो मुक्ति |
स्वरूपाची शक्ति, वसे तेथ ||१||
अनंती अनंत, शक्ति ती अनंत |
न लागेचि अंत, कुणालाही ||२||
भजता निवांत, स्वरूपाचा प्रांत |
प्रवेश तो होत, अलगद ||३||
स्वामीकृपे तेथ, प्रवेशिता आत |
सद्गद तो होत, कृष्णदास ||४||

गुरू स्वरूपानंद, घेऊ त्याचा छंद |
सेवू मकरंद, स्व-स्वरूप ||१||
आपणां आपण, पाहातसें तेथ |
वाचा दिठी तेथ, मौनावते ||२||
गुरू नाही शिष्य, ईश्वर तो साक्ष |
अलक्ष्यात लक्ष, लागतसे ||३||
दावितसे खूण, हवी त्याची जाण |
मूक ओळखून, कृष्णदास ||४||

नाथपंथी हेत, दावावे स्वहित |
कृपे सुषुम्नेत, प्रवेशवी ||१||
मग तो आरोह, अन् अवरोह
अभ्यासाचा मोह, आवरे ना ||२||
कृपेने प्रवेश, कृपे अवकाश |
दीर्घ होय खास, कृपाचि ती ||३||
मति गति होय, कृपे निर्विशेष |
दासाचा तो दास, कृष्णदास ||४||

नमन अमन, करील ते जाणा |
पावसचा राणा, मनीं ध्या रे ||१||
पाहे शुद्ध भाव, इतर ते वाव |
कृपेचा वर्षाव, सदा करी ||२||
धरोनिया करी, विहरतो वरी |
सोsहं वारी करी, भक्तांसवे ||३||
पावसची वारी, मुक्ति त्यासी वरी |
चिदाकाशावरी, कृष्णदास ||४||

आळंदी ज्ञानाई, तीच स्वरूपाई |
दावी नवलाई, पावसेत ||१||
नाथपंथी दोहीं, सोsहं सोsहं गाई |
नवनीत दोही, जीवदेही ||२||
परमहंस ते, पद ते लाभते |
गूज आकळते, अध्यात्माचे ||३||
सोsहं साधनेची, दाविलीसे थोरी |
कृष्णदासा वारी, पावसेची ||४||

सोsहं सुदर्शन, चक्र नवनाथ |
साधका रक्षित, सर्वकाळ ||१||
विषयांचे भय, मनाचा हो लय |
स्वरूपाची सोय, दावितसे ||२||
ज्ञानोबाने दिले, स्वरूपाते आले |
पावसी स्थापिले, तेचि पहा ||३||
शिरता चक्रात, खेचितो केंद्रात |
महाशून्याआत, कृष्णदास ||४||

सोsहं सोsहं गूढ, वाटे अवघड |
बिकट तो चढ, साधकांसी ||१||
ऐसें नव्हे काही, कल्पना ती पाही |
तीच आड येई, प्रगतीच्या ||२||
स्वस्थ बैसोनिया, सद्गुरू स्मरावा |
श्वास निरखावा, कैसा वर्ते ||३||
तयाचेंचि ध्यान, करता अमन |
कृपेचि ती खूण, सद्गुरुंच्या ||४||
श्वासाचा तो लय, मनाचा विलय |
ब्रह्मरंध्री जाय, प्राण पाही ||५||
ऐसा लागे छंद, नित्य मकरंद |
चाखितसे मंद, कृष्णदास ||६||

अंतरीची शांति, ढळेचि ना संती |
न पडेचि भ्रांति, पावसेत ||१||
शांतिब्रह्म तेथ, वसे अनंतात |
दर्शने हो शांत, मन तुझे ||२||
तेथ प्रवेशता, विचारांचा गुंता |
लोपतो सर्वथा, प्रचित ये ||३||
संत दर्शनाची, वर्णितो महति |
स्वरूपाची शांति, कृष्णदास ||४||

ज्ञानमुद्रा धरी, ज्ञानदान करी |
उभावुनि करी, स्वामीराय ||१||
नेत्रांचिये द्वारी, स्पर्शितो आधारी |
खेचितसे वरी, प्राण तो गा ||२||
सुषुम्नेची वारी, कृपे सुरू करी |
नेई सहस्रारी, अविलंबे ||३||
घेऊनि दर्शना, नमुनि चरणा |
स्वरूपाच्या स्थाना, कृष्णदास ||४||

आनंद आनंद, स्वरूपात धुंद |
आनंदाचा कंद, पावसेत ||१||
नाचो बागडतो, स्वरूप अंगणी |
स्वरूपाची वाणी, सेवित गा ||२||
स्वामींचे बालक, आम्ही खास नेक |
कृपेची त्या फेक, आम्हांवरी ||३||
स्वामी हासे मंद, भक्तांसी आनंद |
स्वरूपाचा नंद, कृष्णदास ||४||

स्वामी सोsहं राजा, भक्तांचिया काजा |
करीतसे ये जा, ब्रह्मांडात ||१||
पावसच्या ठाणी, निर्विकल्प ध्यानी |
भक्त लक्षी मनी, सर्वकाळ ||२||
भक्तांच्या स्मरणी, वायुवेगे धनी |
त्वरित धावोनि, रक्षितसे ||३||
आम्हां चिंतामणी, पावसचा दानी |
नुरे चिंता मनी, कृष्णदासा ||४||

संत झाले मुक्त, मुक्त झाले भक्त |
परि पावसेत, स्वामी वसे ||१||
वसे समाधीत, संजीवन त्यात |
भक्तांच्या हृदयात, स्वामी माझा ||२||
करुणा सागर, नित्य निरंतर |
कृपेची पाखर, भक्तांलागी ||३||
कृपाछत्र भव्य, अनुभव दिव्य |
स्वामी सदा सेव्य, कृष्णदासा ||४||

देह न आम्ही, चैतन्य स्वरूप |
पावसीचा तात, गर्जतसे ||१||
बैसावे निवांत, सोsहं सोsहं ध्यात |
पवनाचा हात, धरोनिया ||२||
देह मन सारे, विलय पावे रे |
आत्मरूप सारे, दर्शन ते ||३||
चराचर व्याप्त, चैतन्य सर्वत्र |
दान ते इच्छित, कृष्णदास ||४||

आत्मा शुद्ध घन, चैतन्य निर्गुण |
आपणा आपण,पाहतसें ||१||
स्व-संवेद्य खूण, दाविल ती कोण |
पावस ते स्थान, मनी आणा ||२||
स्वरूपाचा राणा, वसे तेथ जाणा |
मार्गाच्या त्या खुणा, निरोपिल ||३||
स्वरूप सदया, स्वार्थ हा साधाया |
लागतसे पाया, कृष्णदास ||४||

बाळ माते लक्षी, माता बाळ लक्षी |
दोहोंचे अलक्षी, लक्ष लागे ||१||
ऐसा परमार्थ, परम तो स्वार्थ |
दावाया समर्थ, स्वरूपराज ||२||
दावितसे खुणा, संपूर्ण लक्षणा |
लक्ष ज्याचे उणा, ठकलासे ||३||
अहंभाव पिसे, गुरूंसी नकोसे |
सांगे तुम्हां ऐसें, कृष्णदास ||४||

निर्मळ जे मन, लक्षी ना जो मान |
नसे अहं भान, शिष्योत्तम ||१||
कुटील मत्सरी, व्यर्थ ताठा करी |
बरोबरी करी, सद्गुरूंसी ||२||
दंभ मनी परी, नम्र दावी वरी |
सर्वज्ञ तो हरी, काय नेणें ||३||
आपणचि श्रेष्ठ, इतर कनिष्ठ |
त्याची बुद्धि भ्रष्ट, स्पष्ट जाणा ||४||
गुरूंसी विनम्र, वर्ते विनयेसी |
पात्र तो कृपेसी, सद्गुरुंच्या ||५||
वाटे सोपे परी, मृत्यू जैसे वरी |
वर्णी शिष्य थोरी, कृष्णदास ||६||

पावसचा प्रांत, स्वरूपाचा प्रांत |
बैसला अनंत, अनंत-निवासी ||१||
तोचि स्वामी मनी, आणिक तो ध्यानी |
एकल्याही क्षणी, विसंबेना ||२||
मज नाही स्मृति, आठव तो देती |
धारियेलें हाती, त्याने मज ||३||
काय चिंता भीती, समर्थ तो पाठी |
पावला निश्चिन्ति, कृष्णदास ||४||

पावसी पंतोजी, प्रेमळ अति जी |
छडी न हाती जी, स्वरूपाच्या ||१||
मग काय भीती, बालके नाचती |
खाऊ ती मागती, वारंवार ||२||
अभ्यासाच्या कथा, दूर त्या सारता |
राग नाही नाथा, कदाकाळी ||३||
स्वरूप साजिरे, ब्रह्म ते गोजिरे |
असे ते गोचरे, बालकांसी ||४||
ऐसीं स्वरूपाची, शाळा पावसची |
पूर्वपुण्याईची, कृष्णदासा ||५||

ज्ञानोबांचे ज्ञान, भावार्थ-दीपिका |
आंगविले देखा, ऐसा कोण ||१||
येरा गबाळ्याचे, नाही आवाक्याचे |
शब्द-पंडितांचे, खेळणे ते ||२||
नाही आंगवणे, व्यर्थ मिरविणे |
दुज्या प्रवचने, झोडणे ते ||३||
निश्चयाचा मेरू, कमालीचा धीरू |
तोचि तो स्वीकारू, आव्हान हे ||४||
एक पावसीचा, रामचंद्र साचा |
परिपक्वतेचा, याच युगी ||५||
इतरांनी मौन, उगी ते धरावे |
नाथ ते स्मरावे, स्वरूपनाथ ||६||
अलौकिक होई, अप्रकट राही |
पाही नवलाई, कृष्णदास ||७||

पावसी ईश्वर, स्वरूप साकार |
नमू वारंवार, तयासी गा ||१||
त्याचाचि आधार, साधका अपार |
कृपे निराकार, पाववितो ||२||
बैसोनी आसनी, स्थिर सुखासनी |
सोsहं ध्यावा मनी, कैसा काय ||३||
विशद करीतो, खूण ती दावितो |
अलिप्त राहतो, राजीव तो ||४||
कृपा आशीर्वाद, भक्तांसी वरद |
स्मरोन सद्गद, कृष्णदास ||५||

स्वरूप स्वरूप, सोsहं स्वरूप |
पावसी ते रूप, दिसतसे ||१||
सोsहं चा तो ध्वनि, अणुरेणूतुनि |
गुंजतसे स्थानी, पावसच्या ||२||
होता तो संवाद, तोचि अनुनाद |
प्रत्यय सुखद, हृदयामाजी ||३||
स्वामी तो सुखद, चरण सुखद |
घालीतसे साद, कृष्णदास ||४||

भक्तीच्या शक्तीनी, निर्गुण सगुणी |
घ्यावे समजोनी, साधकांनी ||१||
आळवी गा हरी, नित्य निरंतरी |
तो करुणाकरी, पान्हावेल ||२||
पाजी कृपास्तन्य, असे जो अनन्य |
होई धन्य धन्य, भक्तराव ||३||
भक्तिभावे स्वामी, आळवितो नामी |
पावसच्या ग्रामी, कृष्णदास ||४||

पावसी देखिली, स्वरूपाई मूर्ति |
गातसो ती कीर्ति, आम्ही बाळे ||१||
सोsहं ची अंगाई, बाळा जरी गाई |
जाग तेणें येई, नवलाई ||२||
करी उपदेश, कोमल शब्दांत |
मृदू नवनीत, जणू ते गा ||३||
स्वामी घेई कष्ट, गूढ करी स्पष्ट |
बाळ धष्टपुष्ट, कृष्णदास ||४||

सहज सोपारे, मार्ग अध्यात्माचा |
आड वळणाचा, नाही मुळी ||१||
वेढ्यात निजली, जागृत ती केली |
सहस्रारी नेली, ऊर्ध्व पंथे ||२||
आधी होता शून्य, अंती झाला शून्य |
शून्या उणे शून्य, शून्यचि गा ||३||
स्वरूपाने पावसी, किमया दाविली |
ती अनुभविली, कृष्णदासे ||४||

पावस पंढरी, विठ्ठल तो स्वामी |
ज्ञानमुद्रा नामी, हस्त करी ||१||
क्षेत्र पावसेत, बैसे तेथ हरी |
उभावुनि करी, कृपा दान ||२||
भक्तिभाव वीट, कृपा करी थेट |
निवारी संकट, भक्तांचे गा ||३||
साधके स्मरता, घालता साकडे |
अध्यात्माचे कोडे, उकलील ||४||
जोडे स्वात्मसुख, पाहता श्रीमुख |
कृष्णदासा सुख, पावसेत ||५||
ध्वनिमुद्रण
(संगीत: श्री प्रसाद गुळवणी, गायन: सौ पूजा देसाई-चाफळकर)

सांगतो मी गोष्ट, कां गा घ्यावे कष्ट |
श्रीहरीच स्पष्ट, पावसेत ||१||
होता तो गा तुष्ट, पावाल संतुष्ट |
आत्मराज स्पष्ट, हृदयांतरी ||२||
भक्तिभाव श्रेष्ठ, तेणे स्वामी तुष्ट |
नको तुम्हा कष्ट, साधनेचे ||३||
क्षेत्र पावसेत, जाण्या घ्यावे कष्ट |
जाहला संतुष्ट, कृष्णदास ||४||

हृदयाचा ठाव, घेती सुनयन |
भक्तांसी ते ध्यान, श्रीमुख गा ||१||
सुहास्य वदन, प्रेमळ वचन |
आपुलकी पूर्ण, स्वागत ते ||२||
मायपित्याहुनि, कैसा तो लळा |
स्वामी हा आगळा, पावसीचा ||३||
कृपेचा सगळा, सोहळा आगळा |
अश्रू घळाघळा, कृष्णदासा ||४||

वीटे विठूराणा, मौन स्वतः जाणा |
नाही खाणाखुणा, निश्चल तो ||१||
पावसेचा राणा, तैसा नव्हे जाणा |
दावोनिया खुणा, मौनावितो ||२||
उपदेशामृत, पाजुनि सत्वर |
आसनासी स्थिर, करितसे ||३||
सोsहं अनिवार, प्राण वर वर |
विठू जैसा स्थिर, करितो गा ||४||
कृष्णदास पहा, करितो हाकाटी |
घ्यावी थेट भेटी, पावसेची ||५||

संजीवन आत, वसे समाधीत |
पावसी वसत, योगिराणा ||१||
भोगितो स्वानंद, स्वरूप आनंद |
लावेल तो छंद, तुम्हांसी गा ||२||
पावन तो संग, भवभय भंग |
आनंद तरंग, साधकांसी ||३||
पावसीचा नंद, पावसी हो दंग |
गातसे अभंग, कृष्णदास ||४||
ध्वनिमुद्रण
(संगीत: श्री प्रसाद गुळवणी, गायन: सौ पूजा देसाई-चाफळकर)

जोडोनिया कर, नमू गुरूवर |
पावूया सत्वर, आशीर्वच ||१||
तोचि दानी एक, दावी मार्ग नेक |
न जावे आणिक, पंथा लागे ||२||
नाथपंथी नंद, हे स्वरूपानंद |
स्वरूप स्वानंद, अर्पितील ||३||
पावसीच्या घरा, जा हो जा सत्वरा |
मार्ग मिळे खरा, उद्धाराचा ||४||
ज्ञानोबांचा ध्वज, लहरतो आज |
प्रचित सहज, कृष्णदासा ||५||

स्वरूप-सावली, शीतल आम्हांसी |
जाताचि पावसी, लाभतसें ||१||
संसाराने श्रांत, जाहले संत्रस्त |
विसावा त्वरित, भक्तांलागीं ||२||
जैसे कन्येलागी, माहेराचे सुख |
पाहता श्रीमुख, जोडतसे ||३||
पावसची माया, पावसची छाया |
पापताप विलया, पावतसे ||४||
पावस माहेर, सत्य हे उद्गार |
जाय वारंवार, कृष्णदास ||५||

सद्गुरू तरंग, सद्गुरूंचा संग |
भक्त त्यात दंग, सर्वकाळ ||१||
सद्गुरू स्वरूप, आवडे अमाप |
पाहता गा ताप, शमतसे ||२||
सद्गुरू चिंतन, बोधाचे मनन |
अमृताचे पान, साधकांसी ||३||
सद्गुरू सुस्थान, विश्रांतीचे ठाण |
सांगतो ही खूण, कृष्णदास ||४||

सद्गुरूंचे दान, लाभतो तो धन्य |
सद्गुरू महान, दाता तो गा ||१||
धन्य ते जीवन, अध्यात्माची जाण |
अध्यात्माचे ज्ञान, जया होय ||२||
गुरूपायी लीन, जो का नम्र दीन |
लाभे त्या सुदिन, यथाकाळी ||३||
अहंपणा बळी, देवोनि तात्काळी |
ब्रह्मानंदी टाळी, लावावी गा ||४||
गुरुकृपा सत्य, आहे सर्वकाळी |
द्यावी की हो टाळी, कृष्णदासा ||५||

करू गुज गोष्टी, ऐसा कोण सृष्टी |
पाववील तुष्टी, गुरूराज ||१||
मनीचे जनीचे, भार ते फुकाचे |
ओझे सहजीचे, उतरेल ||२||
माया जरी सारी, तापचि हो भारी |
एक तो निवारी, सद्गुरूचि ||३||
सद्गुरू चरणी, करी विनवणी |
सुटे भवातुनी, कृष्णदास ||४||

सोsहं तंतुकार, विणतो गे शेले |
पावसी जे गेले, लाभले त्यां ||१||
मऊ मृदुल गे, अति सुखदायी |
पाही लवलाही, पांघरवी ||२||
ऊब ती मायेची, सोडवेना साची |
भेट स्वरूपाची, अमूल्यचि ||३||
पाखर कृपेची, देई स्वरूपाई |
जपतसे हृदयी, कृष्णदास ||४||

करू गुज गोष्टी, ऐसा कोण सृष्टी |
पाववील तुष्टी, गुरूराज ||१||
मनीचे जनीचे, भार ते फुकाचे |
ओझे सहजीचे, उतरेल ||२||
माया जरी सारी, तापचि हो भारी |
एक तो निवारी, सद्गुरूचि ||३||
सद्गुरू चरणी, करी विनवणी |
सुटे भवातुनी, कृष्णदास ||४||

सोsहं तंतुकार, विणतो गे शेले |
पावसी जे गेले, लाभले त्यां ||१||
मऊ मृदुल गे, अति सुखदायी |
पाही लवलाही, पांघरवी ||२||
ऊब ती मायेची, सोडवेना साची |
भेट स्वरूपाची, अमूल्यचि ||३||
पाखर कृपेची, देई स्वरूपाई |
जपतसे हृदयी, कृष्णदास ||४||

चला आळंदीसी, भेटू माऊलीसी |
आली आळंदीसी, परतून ||१||
मंदियाळी संगे, रमली वारीत |
विठोबाची भेट, घडली गा ||२||
भीमातीरी झाला, भक्तीचा सोहळा |
भेटला सावळा, पंढरपुरी ||३||
झाल्या गुजगोष्टी, झाल्या कानगोष्टी |
पावले संतुष्टी, उभय गा ||४||
करुनिया वारी, परतली आज |
स्वागतासी सज्ज, कृष्णदास ||५||
(१५.७.२०२०)

वर्षती गा धारा, तृप्त झाली धरा |
शीतल हा वारा, सुखदायी ||१||
विठोबाचे मुख, पाहोनिया सुख |
सरले ते दुःख, भवाचे गा ||२||
विठोबाची भेट, घडविली थेट |
सद्गुरू अचाट, वर्णवेना ||३||
पंढरीची वीट, सुख ते अवीट |
झाली गाठभेट, कृष्णदासा ||४||

माय बालकासी, सांभाळीते जैसी |
गुरूमाय तैसी, भक्तांलागीं ||१||
कूर्मदृष्टी परी, नाही मायेपासी |
पोशिते भक्तांसी, गुरूमाय ||२||
सन्निध वा दूर, कृपे ना अंतर |
वाही निरंतर, चिंता त्याची ||३||
योगक्षेम भार, वहाया तत्पर |
एकला आधार, कृष्णदासा ||४||

आता कोठें मन माझे, धावे रे गोपाळा ||धृ.||
सद्गुरूने भाळी, लाविला जो टिळा
करुणा करोनिया, आपंगिले बाळा
आता कोठें मन माझे, धावे रे गोपाळा ||१||
प्रेमळ कृपाहस्त, थापटी तो भाळा
कुशीमध्ये घेवोनिया, सांभाळीतो बाळा
आता कोठें मन माझे, धावे रे गोपाळा ||२||
अडखळ धडपड, दया त्या दयाळा
चटदिशी पटदिशी, सावरीतो बाळा
आता कोठें मन माझे, धावे रे गोपाळा ||३||
स्मरणेचि उभा, सामोरी तात्काळा
कृष्णदास नयनी अश्रू, वाहे घळाघळा
आता कोठें मन त्याचे, धावे रे दयाळा
आता कोठें मन त्याचे, धावे रे गोपाळा ||४||

अनुभूति येता उघडे नित्य, प्रसन्नतेची खाण |
परमशांति नित दिव्य अखंडित, सिद्धांचे भूषण ||१||
कृतज्ञतेने नित्य मनी ते, सद्गुरूंचे स्मरण |
निज क्षुद्रत्व ओळखुनिया, नितांत राही शरण ||२||
मर्यादेसी लंघी न कदा, जैसी पायी वहाण |
ज्ञाना तुका, शिष्यवराची, सांगे निश्चित खूण ||३||
पहा पहा हो साधक जनहो, स्वतःसीच ताडून |
हस्त-कांकणा आरसा कशा, अंतरातचि ये जाण ||४||
सांप्रत ऐसा दुर्लभचि तो, कलियुग हे कारण |
कृष्णदास उत्सुक दर्शना, अन् स्पर्शाया चरण ||५||

निळ्या नभात दिसतो स्वामी, जनावनातही तोचि दिसे ||१||
तन मन व्यापुनि टाकीतसे अन् नेत्रांतही तोचि वसे ||२||
अहं जाळुनी सोsहं पिसे, भक्तांलागी लावितसे ||३||
पावसीचा नाथ स्वरूप हा, कृष्णदास नित ध्यात असे ||४||

मज वेध लागले पावसीचे, मज वेध लागले पावसीचे ||धृ.||
मम स्वामींच्या भेटीचे, दर्शन घ्याया स्वामींचे ||१||
कल्लोळ पावन स्मृतींचे, भाव उमलविती हृदयाचे ||२||
स्वरूपनाथ नाथ आमुचे, भक्तगण आम्ही साचे ||३||
कृष्णदास मनोमनी नाचे, येई भरते प्रेमाचे ||४||
मज वेड लागले पावसीचे, मज वेड लागले पावसीचे ||धृ.||

आगळे वेगळे स्वामी प्रेमळे, भक्तांचे सारे पुरविती लळे ||१||
मनीचे त्यांच्या जाणिती सगळे, इच्छा मनीच्या पुरवि तात्काळें ||२||
भक्त भावाचा मनी निर्मळें, कृपाछत्र तया लाभे आगळे ||३||
भोगविती त्यासी स्वानंद सोहळे, प्रेमाचा उत्सव पावसी आढळें ||४||
कृष्णदास श्रीस्वामी कृपाबळे, पावसी नित्य आनंदसोहळे ||५||

पहावे आपणा आपण, अध्यात्माचा उद्देश जाण ||१||
कशास शास्त्रांचे चर्वण , निश्चये मांड ठाण ||२||
अहं विसर जाण सोहम मनी आण ||३||
नको दुजा कोण, हेचि वैराग्य लक्षणा ||४||
स्वये लक्षी खूण, करी स्व निरीक्षण ||५||
अनुसंधान क्षणोक्षण वृद्धि शांति समाधान ||६||
हृदयी सद्गुरू चरण, कृष्णदासे मांडिले ठाण  ||७||

उसळितो स्वानंद, हृदयी फुलतो आनंद ||धृ.||
उमलला स्वरूप कंद, करितसे अहा धुंद ||१||
वाचे वदा श्रीगोविंद, वा लुटा मौनानंद ||२||
हो श्वास मंद मंद, विरे काल मापदंड ||३||
कृपा गुरूंची प्रचंड, आनंदासी नाही खंड ||४||
होऊनिया गुरूनंद, कृष्णदास घेई छंद ||५||

शांत शांत प्रशांत रे, जाणिवेचा प्रांत रे |
नाही नाही भ्रांत रे, जाहलो निवांत रे ||१||
श्रांतले शांत रे, विचारांचा अंत रे |
भाग्य हे उदित रे, भेटले संत रे ||२||
पावसी अनंत रे, भेटला श्रीकांत रे |
करवीरी दत्त रे, माथा कृपाहस्त रे ||३||
गुरुकृपा वसंत रे, अहाहा! फुलत रे |
कृष्णदास शांत रे, गातसे हे गीत रे ||४||
ध्वनिमुद्रण
(संगीत: श्री प्रसाद गुळवणी, गायन: सौ पूजा देसाई-चाफळकर)

अभेद-भजन, देई समाधान |
स्वामी संजीवन, गाथे सांगे ||१||
भेद कैसा कोण, कैसे ते भेदन |
एकरूप कोण, कोणासी ते ||२||
वृत्ति उद्गमन, तेचि व्यवधान |
जे उगमस्थान, तेथ जावे ||३||
निर्गुणाचे स्थान, एकरूप खूण |
पावसेची जाण, कृष्णदासा ||४||

सोड हा विचार, सोड तो विचार |
नित्य निर्विचार ,राहे उगा ||१||
सोडिता विचार, प्रचित अंतर |
तेथ निरंतर, जडे नां कां ||२||
सोडिता व्यापार, साक्षित्व साचार |
तेचि निराकार ,स्थान की गा ||३||
तेथ एकाकार, साधना प्रकार |
सद्गुरू आधार, कृष्णदासा ||४||

निर्गुण निर्गुण, कैसी ओळखण |
हाचि एक प्रश्न, साधकांसी ||१||
व्हावे विस्मरण, आपुलाले गुण |
उरेल ती जाण, निर्गुणाची ||२||
विस्ताराची खूण, मनोदय जाण |
निमता ते मन, निर्गुण रे ||३||
स्वसंवेद्य भान, गुरुकृपा खूण |
निर्गुणात लीन, कृष्णदास ||४||

भक्त आणि भक्ति, बोलबाला किती |
खूण आकळीती, ऐसें किती ||१||
द्वैताची ती भक्ति, सत्य काय गा ती |
की एकरूप स्थिती, अद्वय ती ||२||
सुखरुप स्थिति, सुखमय स्थिति |
घ्यावा भेद चित्ती, सूक्ष्म गा हा ||३||
स्वामी पावसेती, भेद गा कथिती |
संजीवनीच ती, कृष्णदासा ||४||

सोsहं सोsहं पावसेसी, लक्षिसी ना कां ध्वनीसी ||१||
तोचि गर्जे अंतरासी, भान त्याचे कां न घेसी ||२||
तोचि साक्षी जगतासी, तोचि तो तू स्वयें होसी ||३||
स्वरूप-स्वामी उपदेशी, धरी कां ना पवनासी ||४||
उलटवोनि पवनासी, कृष्णदास मनी हासी ||५||

बोल मौनावले, ध्यान मौनावले |
मन मौनावले, पावसेत ||१||
तन विसावले, मन विसावले |
नेत्र विसावले, पावसेत ||२||
थकले भागले, स्वामींपासी आले |
निवांत जाहले, क्षणार्धात ||३||
भरुनिया आले, नेत्र झाले ओले |
लक्षितो पाऊले, कृष्णदास ||४||

चला जाऊ पावसेला, चला जाऊ पावसेला |
चला चला उत्सवाला, चला जाऊ पावसेला ||१||
स्वरूपनाथ बैसलेला, अनंत-निवासाला |
जाऊ चला दर्शनाला, नमू पदकमलाला ||२||
घेऊ सेवू प्रसादाला, गोड गोड शर्करेला |
स्वामी देई वर चला, चला घेऊ आशिषाला ||३||
चला नाचू गाऊ चला, आनंदाचा उत्सव आला |
सोsहं ध्वज फडकला, कृष्णदास मनी धाला ||४||

चला चला लवलाही, करू पावसेची घाई ||१||
वाट पाहें स्वरूप-आई, तिज पहा करमत नाही ||२||
विरहाची सीमा होई, त्वरा करा धावत जाई ||३||
चरणी ठेवोनिया डोई, होऊ पालखीचे भोई ||४||
ॐ राम कृष्ण हरी, भक्तगण हर्षे गाई ||५||
गाऊ नाचू डोलू देही, आनंदासी उधाण येई ||६||
रोमांचित तनू होई, देहभान हरपत जाई ||७||
भक्त-भावाची पुण्याई, स्वामी दिसे ठाई ठाई ||८||
उत्सवाच्या पावन वेळी, ब्रह्मानंदी लागे टाळी ||९||
साधुनिया मंगल वेळी, कृष्णदास देई टाळी ||१०||

पावस पंढरी, आम्ही वारकरी |
सोsहं एकतारी, असे आम्हां करी ||१||
छेडितसे तार, स्वामी हृद्यंतरी |
करी गुंजारवी, नित्यचि अंतरी ||२||
अनंताच्या द्वारी, भाव तो झंकारी |
देखता श्रीहरी, सफळ हो वारी ||३||
देहभान त्वरी, गेले दिगंतरी |
भक्त कृष्णदास, स्तब्ध विठूपरी ||४||

आला आला हो द्वारी, भक्त, आला हो द्वारी |
गात गर्जत मुखे ,राम कृष्ण हरी |
गात गर्जत मुखे ,राम कृष्ण हरी |
आला आला हो द्वारी, भक्त ,आला हो द्वारी ||धृ.||
टाळ पताका संगे, वीणा खांद्यावरी |
तन मन सारे धुंद, धुंद अभ्यंतरी |
आला आला हो द्वारी, भक्त आला हो द्वारी ||१||
उत्सवाचा दिन आज, हर्ष अंतरी |
पहा पहा दिसे हास्य, श्रीमुखावरी |
आला आला हो द्वारी, भक्त आला हो द्वारी ||२||
उधळीतो भाव गुलाल, गेला अंबरी |
कृष्णदास भक्त, स्वरूपा, कवतुक भारी |
आला आला हो द्वारी, भक्त आला हो द्वारी ||३||

स्वामी आत्मरंगी, रंगुनिया ठेले |
पावसी जे गेले, रंगले ते ||१||
होता स्वामीसंग, भव झाला भंग |
शांति ती अभंग, सहजचि ||२||
मनाचा या संग, पावलासे भंग ||
स्थिति ती अभंग, निर्विचार ||३||
साधनेचे सार, क्षणेचि अपार |
तो किमयागार, पावसेत ||४||
नाथ स्वरूप हा, पावसी जा पहा |
दर्शनी अहाहा! कृष्णदास ||५||

संग पावसचा, छंद पावसचा |
रंग पावसचा, आम्हां सदा ||१||
स्वामी रूप ध्यान, स्वामी गुणगान |
स्वामींचे चिंतन, सर्वकाळ ||२||
स्वामी उपदेश, अमोलिक खास |
तोचि तो अभ्यास, आम्हीं करु ||३||
पावसीचा गुरू, तोषता सत्वरु |
देईल गा वरु, तुम्हांसी गा ||४||
पावसीच्या संगे, आत्मरंगी रंगे |
कृष्णदास सांगे, लाभ जोडा ||५||

नको ती वैखरी, सांगू गोष्ट खरी |
संतसंग करी, सर्वकाळ ||१||
संतांची ती स्थिति, लाभते आयती |
चालवा ना मति, मौन धरी ||२||
संतापाशी जावे, चरण नमावे |
उगी ते पहावे, चमत्कार ||३||
देहात दिसती, निराकार स्थिति |
परेसी स्पर्शिती, तात्काळचि ||४||
गाभ्यासि स्पर्शणे, जागृतीचे देणे |
पराशांति लेणे, लेवविती ||५||
सांगितली खूण, घ्यावी हो जाणून |
कृष्णदासा जाण, गुरुकृपे ||६||

कष्ट साधनेचे, कशासी फुकाचे |
क्षेत्र पावसचे, गाठावे गा ||१||
चंचल मनाचे, बडिवार साचे |
स्थिरावण्या वेचे, नच काही ||२||
स्वरूपा सामोरी, बैसा बाकावरी |
लक्ष ते अंतरी, सहजीच ||३||
तन आणि मन, दोन्ही निवांतणं |
पावसचं देणं, सांगू काय ||४||
स्वरूप दर्शनी, स्वरूपाची खूणी |
सार्थकता मनी, कृष्णदासा ||५||

सोsहं प्रभावित, क्षेत्र पावसेत |
अणूरेणू घोष, सोsहं सोsहं ||१||
जावे अनंतात, बैसावे निवांत |
स्वामी तिथे गात, सोsहं सोsहं ||२||
ऐकता संगीत, विचारांचा अंत |
रमती निवांत, भक्तगण ||३||
ऐकताचि सोsहं, विस्मृत हो अहम् |
अनुभव सोsहं, कृष्णदासा ||४||

बैसतो पावसी, नित्यचि मानसी |
स्वरूप स्वामींसी, ध्यातो आम्हीं ||१||
स्वामी पलंगासी, पाहता भक्तासी |
मुखकमलासी, हास्य भरे ||२||
मनोरथ पुरे, मनपण विरे |
स्वरूपाचे वारे, स्पर्शिताचि ||३||
सारोनिया सारे, पावस स्मरा रे |
सांगतो ऐका रे, कृष्णदास ||४||

नाचत नाचत जाऊयाss, पावसीss पावसीss||
पहा पहा हर्ष किती, मानसीss मानसीss||
पोहोचलो पोहोचलो, अनंतss निवासीss||
देखिलेss देखिलेss, पावसीच्या राजासीss||
बैसलाss बैसलाss, पद्मासनी खोलीसी ||
रमलाss रमलाss जो, सोsहं सोsहं ध्यानासीss||
भुकेलाss भुकेलाss, भक्तिभाव  प्रेमासी ||
लक्षितोss लक्षितोss जो, स्मरतो तयासी ||
तोषलाss तोषलाss, पाहुनिया भक्तासी ||
आनंदss आनंदss, दर्शनी भक्तासी ||
शर्कराss वचनss, आशिष तयासी ||
आनंदाचा उत्सव, नित्यचि पावसी ||
कृष्णदास धन्य धन्य , कृतार्थ मानसी  ||

पावसी अंगणी, बैसू स्वामीसंगे |
स्वरूपाच्या रंगे, रंगोनिया ||१||
अंगणी झोपाळा, स्वामी वेळोवेळा |
झुलवितो बाळा, अळुमाळू ||२||
स्वरूप-समीर, मंद हळुवार |
शीतल अपार, सुखदायी ||३||
स्वरूपाच्या छंदी, आली पहा धुंदी |
बाळ हा आनंदी, कृष्णदास ||४||

स्वामी कुरवाळी, बाळा लडिवाळी |
थापटितो भाळी, मृदू-हस्ते ||१||
बाळ अवखळ, खेळी नाना खेळ |
माया ती सकळ, विस्तारली ||२||
पडे धडपडे, बाळ हासे रडे |
कौतुक केव्हढे, स्वामीराया ||३||
जपे जीवापाड, मायेचा बिमोड |
बाळा नाही चाड, काळाचीही ||४||
निजला खुशीत, बाळ तो कुशीत |
स्वामीही निवांत, कृष्णदास ||५||

नको ज्ञान, नको मुक्ति,
स्वामींची करू भक्ति ||१||
नको युक्ति नको शक्ति,
स्वामींची करू भक्ति ||२||
नको आस, नको प्राप्ति
स्वामींची करू भक्ति ||३||
निरास त्या सर्वप्राप्ति
स्वामींची असे शक्ति ||४||
कृष्णदास सांगतसे,
जाणुनिया घ्यावी युक्ति ||५||

आहे आहे नामी, स्वरूपाचा स्वामी |
पावस या ग्रामी, राहतसे ||१||
स्वरूपाचा ध्यास, लावितसे खास |
विषयांचा फास, सैलावतो ||२||
सोsहं सोsहं ऐसा, अभ्यास हा खासा |
ज्ञानोबा वारसा, चालवितो ||३||
आळंदीची पेठ, पावसेत थेट |
चालतसे वाट, कृष्णदास ||४||

आत्मा सर्वांतरी, सर्वव्यापी परी |
खूण कैशापरी, आकळेल ||१||
ज्ञानदेवे जरी, वर्णिली ती खरी |
लोटला त्यावरी, बहुकाल ||२||
शाश्वत ती नित्य, आहे आहे सत्य |
दावाया तों प्रत्य, प्रकटला ||३||
पावसी स्वरूप, ज्ञानेशाचे रूप |
आनंद अमूप, कृष्णदासा ||४||

ज्ञानोबाने गीता, दोहुनि अमृता |
शांतविले चित्ता, बहु जन ||१||
वेदोपनिषदे, मतितार्थ वदे |
अभ्यासिता साधे, परमार्थ ||२||
साधनेचे गुह्य, साधकांसी साह्य |
बदल सबाह्य, अमृते या ||३||
भाषा कालबाह्य, करावया साह्य |
सुलभ ते गेय, रूपांतर ||४||
हो हो वेषांतर, करोनि श्रीधर |
घेई अवतार, स्वरूप गा ||५||
ज्ञानोबा स्वरूप, दोहीं एकरूप |
प्रचिती अमूप, कृष्णदासा ||६||

ज्ञानेशाची माया, जना उद्धराया |
अखंडित कार्या, उतावीळ ||१||
दीपिका तेवत, असे आळंदीत |
नित्य प्रज्वलित, ज्ञानदीप ||२||
लावलीसे ज्योत, आली पावसेत |
दोहीं प्रकाशात, भेद नाही ||३||
जो का ज्ञाननाथ, तो स्वरूपनाथ |
केलेसे सनाथ, कृष्णदासा ||४||

ज्ञानदेवे गूज, लेववुनि साज |
दिधलें सहज, जनांलागीं ||१||
तये अभ्यासत, जीव असंख्यात |
मुक्त ते निश्चित, जाहले गा ||२||
स्वयें ते स्वरूप, जाणे आपोआप |
येई ज्ञानरूप, अनुभव ||३||
ऐसीं ईशकृपा, चुकवील खेपा |
मार्ग करीं सोपा, परमार्थ ||४||
अभंगात सार्थ, आणिले समस्त |
तो स्वरूपनाथ, पावसेत ||५||
जेवी असे वंद्य, ज्ञाननाथ आद्य |
स्वरूप सदय, कृष्णदासा ||६||

मन पावसेत, पावस मनात |
स्वामी अंतरात, व्यापुनिया ||१||
स्वामी नयनांत, “नयन” लक्षित |
नाही विसंबत, क्षणमात्र ||२||
स्वामी-नाम जप, स्वामी-बोध तप |
ध्यान स्वामी-रूप, भक्तांलागीं ||३||
ऐसा पहा स्वामी, भेटतसे नामी |
पावसच्या ग्रामी, कृष्णदासा ||४||

स्वामींचे स्मरण, भाव आंदोलन |
खूण हृदयस्थान, भक्ताचे ते ||१||
देतसे स्मरण, भक्ता स्वतःहून |
कैसे विस्मरण, घडेल गा ||२||
होता विस्मरण, भाव आंदोलन |
स्वामी हृदयस्थान, तेथे होय ||३||
ऐसें आंदोलन, चाले क्षणोक्षण |
जाणे त्याची खूण, कृष्णदास ||४||

प्रेमाची उबळ, भक्तासी केवळ! |
अरेरे निर्फळ, भक्ति ऐसी!! ||१||
भक्तीचे ते बळ, स्वामींसी उबळ |
भेटी तळमळ, भक्ताचिये ||२||
ऐसी सिद्ध भक्ति, तीच असे शक्ति |
स्वामींची ती प्राप्ति, तयासीच ||३||
निरास जो चित्ती, जगाची विस्मृति |
एकनिष्ठ रिती, स्वामी भजे ||४||
ऐसाचि भजावा, स्वामी मिळवावा |
कृष्णदास दावा, करीतसे ||५||

वंद्य आम्हां गुरुराज, पावसी |
वंद्य आम्हां गुरुराज, पावसी ||
आssनंद आम्हांसी नित्य, मानसी |
आssनंद आम्हांसी नित्य, पावसी ||
स्वामी लक्षितोss, बाळ हितासी |
बाळ क्रीडतो, निश्चिंतेसी |
बाळ क्रीडतो, आनंदेसी ||
स्वामी दाविती, निज लीलेसी |
पाहुनि बाळा, हर्ष मानसी ||
बाळ नमिता, स्वामी पदांसी |
स्वामी आशिष, दे बाळासी ||
सेवन करूनि, स्वरूप खाऊसी |
कृष्णदास हा, तृप्त मानसी ||

स्वरूपानंदss स्वरूपानंदss, गाऊ ध्याऊ करू आनंदss ||
चला चालू पदी मंदss, मनी ध्याऊ स्वरूपानंदss ||
भेटू नमू स्वरूपानंदss, देईल तो स्वरूपानंदss ||
तुटेल हा भवबंधss, नासेल विषयकंदss ||
आssनंद हो आनंदss, होऊ भक्त आम्ही धुंदss ||
मनी ध्यात स्वरूपानंदss, चालतसे वाट मंदss ||
कृष्णदास स्वरूप-नंदss, लक्षितसे स्वरूपानंदss ||

शास्त्र ते कीचाट, दुर्बोध अचाट |
गुंतती फुकट, परमार्थी ||१||
पारायणे घाट, करिती ते पाठ |
प्रवचन थाट, मांडिती गा ||२||
मुखे फटाफट, दृष्टांत उद्धृत |
समाधान त्यात, तयांलागीं ||३||
परि ते विकट, अहं करी पुष्ट |
देव तयां स्पष्ट, नाकारितो ||४||
श्रवण वाचन, कुणा समाधान |
गोडी गुळावीण, कैसी कळे ||५||
घ्यावी संतभेट, वगळोनी क्लिष्ट |
करिती ते स्पष्ट, उपदेश ||६||
धरोनिया हात, खूण ते दावित |
नेती अंतरात, सहजचि ||७||
क्रमिली जी वाट, दाखविती थेट |
आचरिता पाठ, मुक्काम गा ||८||
पावस मुक्कामी, करिता मुक्कामी |
स्वामी तो मुक्कामी, नेतसे गा ||९||
साधा संधी नामी, जा पावसग्रामी |
स्वामी तेथ नामी, बैसलासे ||१०||
जाऊनिया तेथ, असे जो नमित |
कार्य हो खचित, तयाचें गा ||११||
बोल ना फुकट, घ्यावी हो प्रचित |
कृष्णदास स्पष्ट, सांगतसे ||१२||

श्रीगुरु महति, ज्ञानोबा कथिती |
करिती विनती, पदोपदी ||१||
तया नमस्कार, करी वारंवार |
तेचि असे सार, साधनेचे ||२||
व्यर्थ अहंकार, नको बडिवार |
शरण साचार, जावे गा ||३||
ही शरणागति, गुरुकिल्लीच ती |
खूण बांधा चित्ती, उद्धाराची ||४||
श्रीगुरू महाराज, पावसीचा मज |
असे चरणरज, कृष्णदास ||५||

सुखदायी सार रे, सुखदायी फार रे |
कृपादृष्टी सार रे, गुरूदेवांची ||१||
गुरूदेव तारू रे, सकलाधारू रे |
ती कृपाधारू रे, अपरंपारू ||२||
तेणे घेतलासे रे, सारा तंव भार रे |
आता तरी वावर रे, निर्भय गा ||३||
सोड “तव” सारे रे, होई “एकरूप” रे |
आनंदाचे वारे रे, सुसाट गा ||४||
आनंदी आनंद रे, स्वरूपानंद रे |
बाळ पुरवि लळे रे, कृष्णदास ||५||

संतसंग होता, घडे आत्मस्पर्श |
न लागे सायास, काही एक ||१||
दृष्टीक्षेप एक, कृपेचि हो फेक |
अनायासे देख, भेट होता ||२||
पाप वा पुण्याची, गणना नाहीचि |
कृपा ती संतांची, निरपेक्ष ||३||
स्वरूपाचा स्वामी, स्वरूपी विश्रामी |
स्वरूपाच्या धामी, कृष्णदास ||४||

संतांचा संकल्प, ना व्यर्थ कदाप |
सामर्थ्य अमाप, कैसे वर्णू ||१||
नसेचि सामान्य, ईश्वरासी मान्य |
भक्ता करी धन्य, यथाकाळी ||२||
परि एक मेख, मायेची हो फेक |
सुटे कोणी एक, भाग्यवान ||३||
ऐसेचि मागणे, जेणे धन्य होणे |
ऐसें जे जाणणे, निज-रूप ||४||
स्व-रूप ओळख, मागणे हे नेक |
स्वरूपाची फेक, कृष्णदासा ||५||

शांति आनंदाची, मूर्ति पावसेची |
नाथ स्वरूपाची, ध्यानी मनी ||१||
शांति आनंदाचे, धाम पावसचे |
स्थान माहेरचे, भक्तांलागीं ||२||
संसार सासरी, स्वामी तो माहेरी |
स्मरण अंतरी, सर्वकाळ ||३||
सर्वकाळ संग, शांतीचे तरंग |
आनंद अभंग, कृष्णदासा ||४||

संसार सागरी, आधार श्रीहरी |
तो पावसपुरी, स्वरूपनाथ ||१||
हस्त तो भक्कम, आधार कायम |
गाऊ त्याचे नाम, निरंतर ||२||
नाम निरंतर, ध्यान निरंतर |
सौख्य निरंतर, स्वरूपाचे ||३||
ऐसा असे नामी, स्वरूपाचा स्वामी |
पावसी विश्रामी, कृष्णदास ||४||

सोऽहं सोऽहं करी, भेटविल हरि |
स्वरूप-लहरी, स्पर्शितील ||१||
विचारांची दुरी, तात्काळचि खरी |
सोऽहं ते अंतरी, स्मरताचि ||२||
तयासीच धरी, मना स्थिर करी |
अमन ते करी, अंती तुझे ||३||
स्वरूपाची न्यारी, चव तेथ खरी |
स्वरूपचि दावी, तुझे ठायी ||४||
ज्ञाता ज्ञान ज्ञेय, स्वरूपचि होय |
कृष्णदासा सोय, सोऽहं सोऽहं ||५||

इथे चाले सोऽहं, तिथे चाले सोऽहं |
सोऽहं सोऽहं सोऽहं, सर्वत्रचि ||१||
परी त्याचे ध्यान, विरळाचि जाण |
गुरुकृपा खूण, लाभे जया ||२||
स्वरूप-लहरी, येती वरचेवरी |
स्पर्शिति त्या जरी, अवधान ना गा ||३||
व्हावे सावधान, सोऽहं घेई भान |
अंतरीचा प्राण, लक्षी नीट ||४||
होवोनिया धीट, मना मारी फाट |
स्वरूप अवीट, सुधा चाखी ||५||
अभ्यासाचा प्रांत, निवांत निश्‍चिन्त |
क्रमितसे नित, कृष्णदास ||6||

आसनी गा ताठ, जालंदर नीट |
खेचा श्‍वास थेट, सहस्रारी ||१||
सोडोनिया द्यावा, सुखे जाऊ द्यावा |
परी तो लक्षावा, कैसा जाय ||२||
भान ऐसें घ्यावे, स्वस्थ ते बैसावे |
लक्षित्यासी घ्यावे, मनामाजी ||३||
घ्यावी “त्या“ची जाण, तोचि “तू“ गा जाण |
सांगतसे खूण, कृष्णदास ||४||

सोऽहंमय देही, स्व-रूपचि पाही |
स्वरूपाच्या देही, सोऽहं सोऽहं ||१||
ध्येय ध्याता ध्यान, सोऽहं सोऽहं जाण |
उगमाचे स्थान, सोऽहं सोऽहं ||२||
होता स्वामी ध्यान, तेचि सोऽहं ध्यान |
होतसे गा क्षीण, देहबुद्धि ||३||
स्वरूप-लहरी, आत्मबुद्धीवरी |
अलगद स्वारी, बैसविती ||४||
स्वामीसंगे वारी, हो वरचेवरी |
सोऽहं सोऽहं करी, कृष्णदास ||५||

स्वरूपाची प्रभा, संग होता उगा |
सोऽहं होय जागा, सहजचि ||१||
स्वामी करी सोऽहं, भक्ता ध्यान सोऽहं |
सोऽहं सोऽहं सोऽहं, गुरूशिष्य ||२||
नाद एकत्वाचा, देहादेही साचा |
खेळ चाले त्याचा, स्वरूप-लहरी ||३||
तयांवरी स्वार, स्वामी दरबार |
होतसे हजर, कृष्णदास ||४||

स्वामी करी स्मित, पाही भक्त हित |
जागृत साक्षात्‌, सोऽहं सोऽहं ||१||
स्वरूप-लहरी, पावसच्या पुरी |
गाठती सत्वरी, भक्तस्थान ||२||
तेणे भक्त हृदय, आंदोलित होय |
सोऽहं घोष होय, हृदयाहृदयी ||३||
तेणे निनादत, शब्द हे उठत |
करी जे लिखित, कृष्णदास ||४||

जीवाच्या भोवती, आवरणे होती |
लहरी उठती, भिन्न भिन्न ||१||
जीव तोचि शिव, तोचि सोऽहं रव |
तेथ नाही ठाव, भिन्नत्वासी ||२||
स्वरूप-लहरी, व्हावे एकाकारी |
तोचि साक्षात्कारी, म्हणितला ||३||
भेदी आवरणा, जाई केंद्रस्थाना |
स्वरूपाच्या खुणा, लाभतील ||४||
हेचि सांगे स्वामी, युक्ति हीच नामी |
घेतसे ती ध्यानी, कृष्णदास ||५||

स्वामीराया संगे, सोऽहं घोषा संगे |
स्वरूपाच्या रंगे, रंगू चला ||१||
रंग आनंदाचा, रंग तो शांतीचा |
रंग तो तृप्तीचा, लेवू चला ||२||
तेचि हो भूषण, अलंकार जाण |
बाळा लेववून, स्वामी तोषे ||३||
ऐसी स्वरूपाई, पावसी ती राही |
बाळ मनी ध्याई, कृष्णदास ||४||

स्वामी दयाघन, स्वानंदाचे दान ।
द्यावया बैसोन, पावसेत ॥१॥
लक्षावे चरण, तेचि रात्रंदिन ।
विलय ते मन, पावेल गा ॥२॥
मनाचा विलय, आनंदा उदय ।
स्थिति गा निर्भय, पावसील ॥३॥
स्वरूपासी लक्षी, स्वरूप पावसी ।
खूण सांगे खासी, कृष्णदास ॥४॥

पराशांति स्थान, पावस हे जाण ।
घेई गा तू जाण, मनामाजी ॥१॥
पावसेत मन, करी गा तल्लीन ।
लाभशील खूण, तयाचि तू ॥२॥
जाशील निवांती, शांति शांति शांति ।
स्वरूपी विश्रांति, पावसील ॥३॥
पावसच्या रंगी, स्वरूप तरंगी ।
विहरे नि:संगी, कृष्णदास ॥४॥

चित्त सुनिर्मळ, कृपेचेचि फळ ।
साधनेसी बळ, अपार दे ॥१॥
निर्मळ चित्तात, स्वरूप प्रकट ।
जैसे दर्पणात, प्रतिबिंब ॥२॥
चित्तची चैतन्य, नव्हेंचि गा अन्य ।
शास्त्रकारा मान्य, सिद्धांत हा ॥३॥
निर्मळ चिंतन, गुरू आलंबन ।
स्वरूपाचे ध्यान, करी ना कां ॥४॥
स्वरूपी अहम्‌, विरमे सोहम्‌ ।
मिटतो कोहम्‌, अनायासे ॥५॥
स्वरूपाचे पिसे, लागता हो ऐसें ।
ध्यानी घेई खासे, कृष्णदास ॥६॥

आनंदाची खाणी, पावसच्या स्थानी |
मांडुनि तो ठाणी, स्वरूपानंद ||१||
स्वरूप स्वानंद, चाखीत गा मंद |
अनंतात धुंद, स्वामीराय ||२||
परिस स्पर्शिता, परिसचि होय |
अट्टाहास काय, लागतसे ||३||
स्वरूप सानिध्य, लाभता सहज |
अन्य काय काज, उरे तेथें ||४||
स्वरूपाची धुंदी, करिते आनंदी |
विहरे स्वच्छंदी, कृष्णदास ||५||

नाही देखिला हो, आम्ही तो श्रीहरि |
स्वामीच श्रीहरि, आम्हांलागी ||१||
सोहं सोहं पावा, पावस या गावा |
भुलवितो जीवा, अनन्य जो ||२||
जीवभाव हरि, हरी तो लाघवी |
किमया तो दावी, भक्तांलागीं ||३||
अनंतात बैसे, लावितसे पिसे |
ध्यान ते आपैसे, कृष्णदासा ||४||

नमो स्वामीराया, स्वरूप सदया ।
जननीची माया, मूर्तिमंत ॥१ ॥
लेकराचे हित, नित्य तू लक्षित ।
तेणे गा निश्‍चिन्त, भक्तबाळे ॥२॥
सर्वशक्तिमान, सर्वज्ञ महान ।
कृपाळू ना आन, तुजविण ॥३॥
स्वरूप चरणी, करी विनवणी ।
आलासे शरणी, कृष्णदास ॥४॥

वृत्ति नित्य शांत, तोचि असे संत ।
करील निवांत, तुजलागी ॥१॥
साधक मनात, वृत्ति त्या अनंत ।
चैन नाही देत, क्षणभरी ॥२॥
संतांच्या संगती, साऱ्या त्या निवती ।
सत्संग महति, ऐसी असे ॥३॥
संत एक ऐसें, पावसी निवसे ।
नित्य स्मरतसे, कृष्णदास ॥४॥

स्वरूपाची भक्ति, करू या सारे ।
स्वरूपाची शक्ति, पावू या सारे ।
स्वरूपाची शांति, लाभू गा सारे ।
स्वरूपी विश्रांति, लाभू गा सारे ।
पावसीचा नाथ, नित्य तो स्मरा रे ।
अनंत अनंतातील, नित्य आळवा रे ।
सार्थक जन्माचे, करोनिया घ्या रे ।
पावसी आनंदात, रमू या सारे ।
यारे यारे सारे, भक्तजन यारे ।
भक्त कृष्णदास, पाचारितो या रे ॥

रंगू द्या गा मज, स्वरूपाच्या रंगे ।
संसाराच्या संगे, त्रासले गा ॥१॥
पूर्वसुकृताने, गुरू हे भेटले ।
मन निवांतले, कृपेने गे ॥२॥
स्वरूपाची खूण, दिली दाखवून ।
अभ्यासी त्या मग्न, राहू द्या की ॥३॥
कृतार्थ जीवन, करूया साधून ।
कृष्णदास मन, इच्छितसे ॥४॥

किती दूरवर, स्वरूपाचे घर ।
अंतरी ती तार, जोडलेली ॥१॥
सोहं टणत्कार, अखंड झंकार ।
घुमवी अंतर, स्वामीराय ॥२॥
होईल गा पहा, कैसा तो विसर ।
छेडितसे तार, स्वये स्वामी ॥३॥
भाग्य हे लाधले, स्वामी हे भेटले ।
निश्‍चिन्त जाहले, कृष्णदास ॥४॥

रम्य ते पावस, स्वरूपाचा वास ।
करिता निवास, मन रमे ।१॥
मृदुल तरंग, स्पर्शिती रे अंग ।
सुखद तो संग, भक्तांलागीं ॥२॥
स्वामी कुठे रे, तेथेचि आहे रे ।
प्रचित घ्यावी रे, भक्तिभावे ॥३॥
भक्तीचिये स्वरे, आळविता बरे ।
तोषतो सत्वरे, स्वामीराय ॥४॥
स्वरूपाच्या संगे, स्वरूप तरंगे ।
मत्त भक्तिरंगे, कृष्णदास ॥५॥

मंद मंद सखये चालू, जाऊ पावसेत ।
वाट पाहतो गा माझा, स्वामी स्वरूपनाथ ॥१॥
किती काळ लोटला गे, नाही स्वामी भेट ।
आतुरला स्वामी माझा, प्रिय स्वरुपनाथ ॥२॥
किती मऊ मुलायम, प्रेमळ तो हात ।
रेशमाचा स्पर्श आहे, आहे रे मनात ॥३॥
स्वामीरूप बिंबले हे, नित्य नयनांत ।
लोभस मुखकमल, मनी तरळत ॥४॥
बोल मितले मधुर, गुंजती कानात ।
आशीर्वाद हस्त उभविला, अखंड लक्षात ॥५॥
खोलीतील सुगंध मंद, मंद दरवळत ।
आठवण नित्यनूतन, ऐसी गे स्मृतीत ॥६॥
आठवता अधीर मन, शांतवू ना येत ।
कृष्णदास चाले मंद, सुखद स्मृतीत ॥७॥

!!! *** श्रीस्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव २०२१ *** !!!

आली मंगल पर्वणी, चला पावसच्या स्थानी |
वाट पाहताती धनी, रूप घेऊनि सगुणी ||१||
दिंड्या पताका घेऊनि, संगे टाळघोष ध्वनि |
हर्ष भक्तजन मनी, धुंद नृत्य नी गायनी ||२||

(गजर)
स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय जय स्वामी स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय जय स्वामी स्वरूपानंद !!
(गजर)

आज जयंतीच्या दिनी, भक्त आतुर हो मनी |
स्वामी पाहू गा नयनी, धन्य होऊया जीवनी ||३||
मग्न कशासाठी ध्यानी, वाया आटाटी साधनी |
ब्रह्म साठवा नयनी, साधा साधा हो पर्वणी ||४||
झेंडा रोविला गगनी, सोहं गुंजतसे ध्वनि |
स्वामी, स्वामीहो, गर्जुनि, कृष्णदास लोटांगणी ||५||

*************
(गजर)
स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय जय स्वामी स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय जय स्वामी स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीगुरू स्वामी स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीगुरू स्वामी स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | परमहंस श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | परमहंस श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | स्वामीराज श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | स्वामीराज श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | दत्तराज श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | दत्तराज श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीपादगुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीपादगुरू स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | नृसिंहगुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | नृसिंहगुरू स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | स्वामी समर्थ स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | स्वामी समर्थ स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | रामकृष्ण श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | रामकृष्ण श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | ज्ञानदेव श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | ज्ञाननाथ श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीगुरूनाथ स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | श्रीगुरूनाथ स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | सद्गुरुनाथ स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | सद्गुरुनाथ स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | सोहं हंस गुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | सोहं हंस गुरू स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | आनंदकंद स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | आनंदकंद स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | प्रेमरूप गुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | प्रेमरूप गुरू स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | भक्तवत्सल स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | भक्तवत्सल स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | वरदायक गुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | वरदायक गुरू स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | पावसनिवासी स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | पावसनिवासी स्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | हृदयस्थ श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | हृदयस्थ श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | गुरुराज श्रीस्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | गुरुराज श्रीस्वरूपानंद !!

स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय हो श्रीगुरू स्वरूपानंद !!
स्वरूपानंद, स्वरूपानंद | जय हो श्रीगुरू स्वरूपानंद !!
*************

PDF फाईल डाऊनलोड करायला इथे क्लिक करा 

जुलै २०२०


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *