श्री कृष्ण सरस्वती दत्त स्वामी महाराज यांच्यावरील काव्य
हे तो कृपेचे देणे, का वृथाचि अभिमान घेणे?
उधळिता स्तुतिसुमने, नको स्वत:वरी भाळणे ॥
सद्गुरुंचे बियाणे, पोसिलेही कृपे तेणे |
बहरता फळे फुले, ‘कां माझे असे’ सांगणे? ॥
श्रीगुरु कृष्णसरस्वती दत्त, गुरुंचे करवीरी वसणे |
गुप्त सोंग दावुनि, जनी बालकापरी वर्तणे ॥
मज सद्गुरु असे अबोल, त्याचे मजकरवी लिहिणे |
वाचुनि उकलुनि मर्म, माझे मजसीच बोध घेणे ॥
तोषता तुम्ही संत जन, मनी कृतज्ञता येणे |
कृपा थोरवीते जाणवुनि, घडे आनंदणे ॥
नको अहंकाराचा घाला, वाराही लागू न देणे |
चाललो वाट गुप्त, पुढेही सांभाळणे ॥
प्रार्थुनिया मनी भाव, ऐसेचि चरणी ठेविणे |
विनवितो कृष्णदास, श्रीसद्गुरुंसी नम्रपणे ॥
******
श्री गणेश वंदना
नमन माझे लंबोदरा, शिवगौरीपुत्र मनमोदकरा
वास तुझा मूलाधारा, तूचि अखिल जगदाधारा
रक्तवर्ण तुंदिल तना, गजमुखा एकदंता
सूक्ष्मदृष्टी विशाल कर्णा, नमन तुजसी प्रणवस्वरूपा
चर्तुभुज फरशांकुशधरा, गणाधिपा शत्रुनाशकरा
कटि मेखला नागरुपा, नमन तुजसी विघ्नहरणा
मूषकवाहना मोदकप्रियकरा, रक्तवर्णपुष्प प्रियकरा
प्रिय ज्यासी दुर्वांकुरा, नमन कार्तिकेय बंधुवरा
कृष्णदास ध्यातो हृदयी, तुज आत्मरुप प्रकाशकरा
******
श्री सरस्वती वंदना
ब्रह्मानंदिनी सरस्वती भगवती शारदे वीणा पुस्तकधारिणी
शुभ्र वस्त्र लेवुनि बैसली शुभ्र पद्मासनी
मयुरवाहनी देवी सकल विद्या प्रदायिनी
मंदस्मितमुखशोभनी उभवितसे करा वरालागुनि
दे वर दे करी प्रार्थना कृष्णदास दोही करा जोडुनि
दे शुद्ध मति दे मजसी जाणील जी शुद्ध ज्ञानालागुनि
******
श्री सप्तशृंगी माता
सप्तशृंगनिवासी माते जगदंबे
मार्कंडेये स्थापिले मध्ये सप्तशृंगे ॥
विशाल नेत्र हास्यविलसित मुखबिंबे
अठरा हातीं शोभिती आयुधे विविधांगे ॥
शेंदुर चर्चित मूर्ति शोभित दिव्यांगे
सुरवर प्रार्थिती निज संकटी तुज अंबे ॥
मर्दिनी तू महिषासुर शुंभ निशुंभे
नवनाथांची सिद्धिदात्री तू अंबे ॥
कृष्णदास जाता मोहित मन भृंगे
आरती अंती तांबुल प्रसादे मुख त्याचे रंगे ॥
******
श्री सद्गुरु स्तवन
सद्गुरू सूर्य ज्ञान राशी, प्रकटलासे सिंहासनासी ।
चला चला करवीरासी, कृष्ण सरस्वती दर्शनासी ।
बटूमूर्ति हास्य मुखासी, मौक्तिकमाळी गळा शोभसी ।
भक्त भावा भुलला पाहसी, तेज अमित मुखा दाविसी ।
चमत्कार नित्य करिसी, सोंग दावुनि गुप्त वर्तसी ।
पीठापूराहुनी गाणगापुरासी, तेथोनि आलासी करवीरासी ।
नृसिंहभान गुरु तुजसी, शिष्य अंगिकारिला कृष्णदासासी ।
पहा पहा अवधूतासी, कृष्ण सरस्वती दत्तावतारासी ।
दत्त दत्त नामे मुखासी, जपे तोषवि दत्त यतीसी ।
चरणी पडुनि शिरसाष्टांगेसी, लाधू आशीर्वाद कृपामृतासी ।
आशीर्वादरुपी कृपाबळासी, जाणू चला आत्मरुपासी ।
रमुनिया त्या आत्मरुपासी, अनुभवू सर्वात्मक दत्तरुपासी ।
अनुभवे त्या साक्षात्कारासी, एकरुप होऊ गुरुरुपासी ।
कृपे साधुनि एकरुपतेसी, जाणू जीवनमुक्त स्थितीसी ।
मुक्तिवरील रमू भक्तिसी, गाऊनि दत्त नाम मुखासी ।
प्रेमे आळवू दत्त यतीसी, प्रेमे रमू दत्त भक्तिसी ।
रमुनि नित्य प्रेमरुपासी, होऊ आपण प्रेमरुपचि ।
प्रेमभक्तिचा प्रसार करुनि, प्रेमविश्वातचि राहू रमुनि ।
कृष्णदास रमे नित्य, कृष्णसरस्वती ध्यास घेउनि ।।
******
पाळणा:
जन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज
नांदणीग्रामी करवीरक्षेत्री, चला दर्शना आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
माघ वद्य पंचमी दिन हा, अवतरला हनुमंतचि हो आज
भावाचा जो अति भुकेला, निराकार सगुण झाला आज
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त अवधूत प्रकटला आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
कौमुदिनीसम सुवर्णकांती, रूप पाहुया आज
हास्यभरित मुखकमल पाहुनि, धन्य होऊया आज,
जन्मला दत्तराज गुरुराज ॥
बालक जरी ते आम्ही हो त्याचे, घेऊया कडेवरी त्या आज
क्षुधा वारितो जरी सर्वांची, प्रेमे त्या घास भरवुया आज
भावभक्तिच्या लेण्यांचा तो, लेववु त्यासी साज,
जन्मला दत्तराज गुरुराज ॥
सोऽहं बोध नित जो गाई, गाऊया अंगाई त्यासी हो आज
जागृत करी जो सर्व जीवांसी, पाळण्या चला निजवुया आज, जन्मला दत्तराज गुरुराज ॥
वैराग्य असे रे मूळ निजबोधाचे, घ्या जाणुनि आज,
वैराग्याचे, निजबोधाचे दान मागूया आज, जन्मला दत्तराज गुरुराज॥
कृष्णदास म्हणे चिदानंद गुरु, नमुनि शरण जाऊया आज,
जन्माचे सफल करी जो काज, जन्मला दत्तराज गुरुराज, जन्मला दत्तराज गुरुराज॥
******
आरती:
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।धृ.।।
बटूमूर्ति तू भाव ही बालक, आम्ही तुझे रे सर्वही बालक
तूचि असे रे अमुचा पालक, धरी करि सत्वरि उद्धरी ताता
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।१।।
कुरवपुरीचा श्रीपादचि तू, गाणगापुरीचा नृसिंह यति तू
तोचि प्रकटला करवीरी, उद्धरिण्या हो आम्हा भक्ता
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।२।।
सुहास्य मूर्ति तुझी गोजिरी, सुवर्णकांती तेजे आगळी
भाळी टिळा अन् टोपी मखमली, रुप पाहता तत्क्षणी पडली, भूल आम्हा चित्ता
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।३।।
सर्व जगाचा तू रे चालक, तुला प्रार्थितो आम्ही बालक
तुचि केवळ आमुचा तारक, पटली खूण आम्हा चित्ता
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।४।।
जाणुनिया आम्ही तुलाचि शरण, सत्वर करी आमुचे उद्धरण
निशिदिनी तुजला गातो ध्यातो, अखंड या चित्ता
आरती कृष्ण सरस्वती दत्ता, करुणाकर दीनवत्सल दत्ता ।।५।।
******
स्तुति:
दत्तात्रेयगुरु यति त्रिमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
श्रीपादवल्लभ नृसिंह सरस्वती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
ब्रह्मसनातन सद्गुरुमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
करवीरग्रामी अवतरले यति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हनुमत्स्वरुप अवधूत मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
समर्थस्वामीगुरु अभेदमूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
सिंहासनीस्थित वामन मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
ब्रह्मानंदीनित बालवृत्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
हास्य लोभस चिद्घन कांती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
कस्तुरीतिलक सुशोभित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
मौक्तिक माला विलसित मूर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
गूढ मितबोली चाल चपळ गति, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
वैराग्यमठी संजीवनस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
निजबोधमठी गुंजारव गीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
षडरिपुनाशक हारक भवभीती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
सच्चिदानंददायक किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
भक्तपालक दायक मुक्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
स्मरणे अर्पित सहजी निजस्थिती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
कृपावंत अति अगाध किर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
कृष्णदास शरण आर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
निशिदिनी गातो तव गुणकिर्ती, श्री गुरुदत्त कृष्ण सरस्वती ॥
******
प्रार्थना:
नांदणीग्रामी जोशीवंशी अवतरलासी तू देवा
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नाम तुज गुरुदेवा ॥
अप्पा अन्नपूर्णा सुत हा झालासी तू देवा
अजन्मा ऐसा भक्त काजा अवतरलासी देवा ॥
बालवयातचि गुरुदर्शना त्यागिलेसी गृह विभवा
अक्कलकोट स्वामीराये तुजसी, अंगिकारिले देवा ॥
करवीरक्षेत्र अवधूतक्षेत्र, वसलासी तेथ देवा
श्रीपादयति तू नृसिंहयति तू अवधूतचि तू बरवा ॥
सुरवरा वंद्य गुरुराज दत्त तू आला करवीर गावा
शिर्केभुवनी निवास केला देखुनि ताराईच्या भावा ॥
शुभ्र अंगरखा हिरवी टोपी उपरण्याचा रंग भगवा
कस्तुरी टिळा शोभे माथा हास्य लोभवी जीवा ॥
बालभाव सोंग घेवुनि दाविले अगणित लीला विभवा
कुंभार आळी वसुनि धरिसी कुंभार स्वामी उपनावा ॥
वैराग्यमठी अन् निजबोधमठी भक्तजन करिती तुझाचि धावा
दर्शना येती भक्त त्यांसी अर्पिले वैराग्य विभवा ॥
वासनांचा कोष सभोवती करी जीवा शिवा दुरावा
नाश करण्या समर्थ तुजविण ना दुजा कुणी गुरुदेवा ॥
षड्रिपुंचा नाश करुनिया निर्मळ केले जीवा
माया मोह नाश करुनिया फास तोडिला देवा ॥
जीवासी ज्या अंगिकारिले, भेटविले तू शिवा
बद्ध जीवांसी मुक्त करुनिया दाविलेसी निजठावा ॥
मर्त्य जीवांसी निजबोधुनिया अमर केलेसी देवा
नामाची तव अखंड वीणा मठी करी गुंजारवा ॥
भक्तकाजा धावलासी तू देखुनि शुद्ध भावा
उद्धरिलेसी अनंत अगणित भक्तजन गुरुदेवा ॥
शुद्ध मति दे मजसी गावया तव अगणित किर्ती विभवा
नाम गानी अन् ध्यानी रमता होवो ब्रह्मानंद जीवा ॥
विश्वी जे जे रुप दिसे ते भास तुझाचि व्हावा
द्वेष मत्सरा थारा न मिळो अशा रिती मज ठावा ॥
कायावाणी मनासहित मज पवित्र करा हो देवा
विकल्प दवडुनि अज्ञ मनाचे दृढ करी गा भावा ॥
चंचलता सारुनि दूर आघवी स्थिर करा हो देवा
भावभक्ति अन् विवेकवैराग्य लेणे मज लेववा ॥
पावन सुमंगल तव नामाची ललकार अंतरी उठवा
भावभक्तीच्या आनंदाच्या डोही मज त्या रमवा ॥
स्मरणी चिंतनी रमता तव या काळाचेही भान नुरवा
दिक्कालातीत सच्चिदानंद स्वरूप मजसी दावा ॥
कृपादृष्टी अन कृपाहस्त तव मजवरी सत्वरी उभवा
मानवत्व ते देवत्वाचा प्रवास मजसी घडवा ॥
जन्मोजन्मी दास तुझाचि परि कदापि विसर न व्हावा
विश्वव्यापक तू भरला अणूअणू प्रचित मजसी दावा ॥
दास दास मी तव अखंड गाता संसाराचे भान नुरवा
मी तू पण लोप करुनिया द्या एकत्वाचा अनुभव बरवा ॥
काय काय अन् किती ते मागू अंतरीची आस मिटवा
स्वामी तू मी दास तुझाचि मज दासभावे विनटवा ॥
समर्थ स्वामी शरणागत या दासावरी करी तव किमया
साच दासभाव हा येण्या निभण्या दे सामर्थ्य जीवा ॥
शरीर त्यागिलेसी जरि तू विश्वाकार देवा
भक्त हृदयी निवास अखंडित कार्या तव न विसावा ॥
कृपाळू तू स्वामी जाणुनि दास मागतो मी जोगवा
करी बा जैसे मनी तव तैसे दासा काही न ठावा ॥
कृष्णदास हा करी विनवणी, अंगिकारा गुरुदेवा
ध्यास तुझा मज लागो निशिदिनी, द्या अंती चरणी विसावा ॥
******
भजूनिया अवधूतासी, जाणूया अवधूताला
कृपाशीर्वादे त्याच्या, जाणू अवधूत स्थितीला
लाधू तीव्र वैराग्याला, अंतरीच्या अवधूत स्थितीला
अनुभव त्याचा कृपे घेऊ, जाणू आत्मस्थितीला
कृपाळू तो दत्त अवधूत, वसतसे करवीराला
कृष्ण सरस्वती नामे, जाणती त्या दत्त यतीला
शरण जाउनि भजता भावे, उपदेश करी कृष्णदासाला ॥
******
कृष्ण सरस्वती कृष्ण सरस्वती घोष नामी अति
जपता निशिदिन प्रसन्न होतो अवधूत दत्त यति
होता ऐसे उरे न त्याच्या भाग्या काही मिति
कल्पवृक्षातळी बैसता मग काय चिंता भीती
जपता नाम रुप कसे ते दडेल कुठे क्षिति
खचितची होती प्रकट सामोरी तत्क्षणी दत्त यति
रुप मनोहर दर्शन होता भूल पडे चित्ती
अंतर्बाह्य तन मन बुद्धि व्यापुनि राही दत्त यति
दत्ताचा अवतार करवीरी श्रीकृष्ण सरस्वती यति
कृष्णदास हा हृदयी वास त्या करतो दत्त यति ॥
******
नित्यसाक्षी असे जो का, नमन माझे तयाला
तिमिरनाशक ज्ञानप्रकाशक, त्या सद्गुरू स्वरूपाला
गुरुरुपे उपदेशितो जो, शिष्यरुपे क्रीडतसे जो
अद्वैतात राहुनिया करितसे, द्वैतातल्या लीलेला
‘मी’पणा उठताचि लपतो, लोपता ‘मी’ प्रकटतो जो
नेति नेति शब्द उठती, वर्णिता ज्या रुपाला
दर्शन होता स्वरूपाचे त्या, काय येई अनुभवाला
‘द्रष्टा दृश्य दर्शन’ त्रिपुटी, लोपतसे त्या क्षणाला
जगत् केवळ भास जेथे, काळही ना उरे तेथे
नित्य सत्य शिव सुंदर, केवलानंद विभु रुपाला
अवस्था ही काय आहे, द्यावी मजसी अनुभवाला
कृष्णदास प्रार्थितो आज, श्री कृष्ण सरस्वती गुरुरायाला ॥
******
स्वामी माझा करवीरीचा, अति सुंदर सुंदर, अति सुंदर सुंदर
गळा माळ रत्नहार, शिरी टोपी ती सुंदर ॥
शुभ्र वस्त्र अंगरखा, घेई टोपी त्यावरीता
असा शोभे हा माझा, अवधूत दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥
हास्य सुहास्य मधुर, जेणे भुलले नारीनर
असा हा जो यतिवर, गुरुराज दिगंबर, स्वामीराज दिगंबर ॥
बालवत् क्रीडा करी, सोंगे घेई नाना परी, प्रकटला परि खास
अवधूत दिगंबर, अवधूत दिगंबर ॥
भक्त रक्षायासी खास, हनुमंताचा अवतार
ताराआईच्या गृहासी, राहिला हा जीवनभर
तो हा दत्त दिगंबर, गुरुदत्त दिगंबर ॥
वाचे गाऊ नाम त्याचे, ध्याऊ चरण हृदयात
कृपा होता त्याची साची, सांभाळेल निरंतर, सांभाळेल निरंतर
स्वामी दत्त दिगंबर, स्वामी दत्त दिगंबर ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्ता, ध्यातो तुजला निशिदिनी चित्ता ॥
शरणागत या दीन आर्ता, का रे बा नुद्धरीसी त्वरिता ॥
बटूमर्ती परी अगाध सत्ता, जननीहुनि तू तारक भक्ता ॥
अल्पही न धरी मी चित्ती चिंता, त्रयमूर्ती तू तारक दत्ता ॥
विश्वी एक तुझीच सत्ता, जाणुनि हा तुज शरण मी दत्ता ॥
भावभक्तियुत होऊनि आर्ता, तरलो संसाराची गर्ता ॥
काम क्रोधे व्यापियेलि सत्ता, निजदासा तू तारक दत्ता ॥
निशिदिनी आठव देई चित्ता, स्मरणचि मोडी भवभय वार्ता ॥
कार्यकारणाचा तुचि एक ज्ञाता, शरण तुज जाता न दुख:वार्ता ॥
मोक्षपदाचा करी अधिकारी, दत्ता तुज हे नच नवलाई ॥
हास्य मधुर तव लोभवी चित्त, भुलुनि जाहलो तव पद भृत्य ॥
करवीर क्षेत्री अप्रकटचि राही, निजभक्ता परी जवळची घेई ॥
नमन करीत अमन मी होई, कोण मी कोठील सरली वार्ता ॥
सहजचि सुखद अवस्था येई, दत्त ही बाप अन् दत्त ही आई ॥
सोऽहं सोऽहं गाई अंगाई, ऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥
ऐकत जीव शिवस्वरूपचि होई ॥
******
गुरुराज माझा कृष्ण सरस्वती, सिंहासनीस्थित शिष्य सभोवती
कृष्णा लाड वासुदेव द्वाड, म्हादबासी ना देहाची चाड
गाणगग्रामीचा बोवा रामदास, दत्ताने त्यास पाठविले खास
वेणीमाधवा दुजा न ध्यास, निजबोधमठीचा कर्ता व्यास
तात्यांनी पाठविले महादेव भटास, विष्णुअण्णा लिहिती स्वामी इतिहास
नामदेव हा आगळाची दास, प्रपंची असे सर्वदा उदास
हरीभाऊ, रामभाऊ, गणपती, बाळकू, अनंत, करवीरी गणती न त्यास
मुजुमदारांच्या चरित्रास आशीर्वच हे खास, वाचिता होई मायेचा निरास
ताराआईच्या पुण्या न गणती, बांधीला हनुमंत वैराग्यमठी
मनोभावे माझा नमस्कार खास, अवधूतास आणले करवीरक्षेत्रास
******
गोकुळी कृष्ण गोपाळ, करवीरी कृष्ण दयाळ
गळा मौक्तिक माळ, दोहोंच्याही
एक पांडवा रक्षित, दुजा भक्त हित लक्षित
वेणू वाजवोनि मोही, दुजा सोऽहं ध्वनि गाई
एक प्रेमाची नवाई, दुजी भक्तांसाठी आई
एक द्वारकेचा राजा, दुजा भक्तांचिया काजा
मारी कंस नी कौरव, दुजा मारी षड्रिपु थोर
वर्ते आनंद हा थोर, नाही त्याला अंतपार
म्हणुनि भजा हो तत्पर, दत्ताचा हा अवतार
गर्जा वारंवार, नाम त्याचे हळुवार
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
******
गुरु लाभले यति कृष्ण सरस्वती
भेटताची निर्मल मति अति
वाटे मज दत्त संगति
चुकली प्रारब्धाची गति
रोमरंध्रेही नाम ते गाती
कृष्ण सरस्वती, कृष्ण सरस्वती ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर, लाभे आम्हा थोर गुरुवर
चरण मी नमितो वारंवार, सर्व सुखाचे जे का आगर
अवधूताचा हा बाजार, खेळणी सर्वां विविधचि फार
सोऽहं डमरु वाजे थोर, अनुहताचा करीत गजर
ऐकोनि माया होई पसार, मग वर्तले सुख हे अपार
चरण मी नमितो वारंवार, चरण मी नमितो वारंवार ॥
******
एकनाथांचा जो का नाथ, करवीरी हा तोचि नाथ
जेणे केले आम्हा सनाथ, नवनाथांचाही तो हा नाथ
त्याची असता आम्हा साथ, का हो समजू आम्ही अनाथ
अवधूतवेशे तो हा सजला, उपदेशिले त्याने मजला
सोऽहं शब्दे तोचि गर्जला, जीवभाव तत्क्षणीच हरपला!
******
स्वामींचा मी बाळ, अति लडिवाळ, कापे आम्हा पुढे काळ, मी निश्चिंत सर्वकाळ ॥
स्वामी अति प्रेमळ, असे की कृपाळ, जणू तो गोपाळ, रक्षाया गोपगोपी, जाणुनिया सद्भाव, करवीरी अवतरला ॥
जरी असे दत्त साक्षात, ज्यासी काळही तो भीत, लोकामाजी वेडापिसा, तो हा गमला ॥
जे भक्त, चरण त्याचे ध्यात, मनी दिन रात, त्यासी कल्पवृक्ष तो गमला ॥
म्हणुनि मी नित्य, रमवी वाचा हे सत्य, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
मार्ग सुखाचा हो सत्य, भावे नमू चरण हे नित्य, तेणे तुष्टतो अत्यंत, होईल कृपावंत, भाग्या नाही अंत, करु नका हो खंत ॥
म्हणुनि सुजन हो ऐका, विनवितो, कळवळुनि अत्यंत, गा हो गा हो, ध्या हो ध्या हो
श्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
तेणे सत्वर तुष्टत, त्वरे हृदयी प्रकटत, सोऽहं भाव थाट, प्रबळ अति अचाट, अवधूताची ही वाट, जरी अति बिकट, कृपा होता त्याची खास, मार्गामधे नीट, सांभाळी तो नीट ॥
असा गुरु दत्त, असता जो साक्षात, का हो तुम्ही भीत? ॥
मायेचा थयथयाट?
चला घेऊ तिचा घोट, तेणे स्वामी तो तुष्टत, नेई अवधूत मळ्यात, सोऽहं भाव तळ्यात, सवे हो क्रीडत, हीच परमार्थाची वाट, सुजन हो ऐका, मनामध्ये नीट ॥
बसा आसनी हो ताठ, डोळे मिटा हो ते घट्ट, हृदयी ठेवा ही गोठ, मनी बांधा खूण गाठ, दत्त हा साक्षात, उभा समोर तिष्ठत,
आशीर्वाद द्याया, आशीर्वाद द्याया ॥
कृपा आशीर्वाद होता, फिटे संसाराची व्यथा, सोऽहं भाव संगीता,
रमाल हो नित्य, रमाल हो नित्य ॥
या कारणे हो सत्य, सांगतो अमित, ध्यावे चरण नित्य,
श्री कृष्ण सरस्वती दत्त, श्री कृष्ण सरस्वती दत्त ॥
******
करुणाकर श्री कृष्ण यतिवर, अक्कलकोटीचा तू गुरुवर,
निवासक्षेत्र हो करवीर, अवधूताचा तू अवतार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
कामक्रोधे छळियेले फार, न दिसे काही उपाव सत्वर,
ऐकोनि कीर्ति तू करुणाकर, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
चित्त ही ना स्थिर निमिषभर, नाम ही न ये तुझे मुखावर,
संसारी या गांजियेले फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
ध्यानी बैसता विविध विचार, मना गांजिति वारंवार,
आयु: ही सरते अति भरभर, जाणुनि मना बेचैनि फार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
परमार्थ करता शीणलो फार, मनी अखंड हाचि विचार, कधी दिसती मज चरण सुकुमार, घेउनिया त्यांचा आधार, तरीन मी हा दुर्घट संसार, प्रार्थी मी तुजसी वारंवार ॥
******
॥ गुढीपाडवा नमन ॥
चैत्र प्रतिपदा गुढीपाडवा, नववर्षाच्या प्रथमदिनी
श्री सद्गुरूंसी नमन भावे, मज अंतकरणातुनी
पोषितो रक्षितो जो मजसी, प्रेमे निजकृपेनी
आत्मशोधाच्या मार्गा मजसी सहाय होण्या, प्रार्थितो आज हृदयातुनी
चालता धडपडता जो अखंड, न्याहाळीतो कृपादृष्टीनी
पडता रडता विनविता, हात दे सबळ कृपाकरांनी
दासभावे शरण जाता, चालवितो कृपाछत्र उभावुनी
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, घोष उमटे हृदयातुनी
घोष तो ऐकता अखंड, नादे त्याच्या तोषुनी
वाटे या वर्षी मजसी, घेईल कडेवरी उचलुनी
विश्वासे त्या काळजी सर्व, गेली मज मनातुनी
आशीर्वादे सहज ध्येय, होईन कृतार्थ मम जीवनी
******
॥ विजयादशमी ॥
आज विजयादशमी, सिमोल्लंघनाचा दिवस
विवेक वैराग्य शस्त्रे परजुनिया, होऊया सज्ज आत्मसाधनेस
ओलांडुया सीमा जीवभावाची, अन् करुया पदार्पण ब्रह्मभावास
ब्रह्मआपटा सोने लुटुनी, भान त्याचे घेऊ अंतरास
श्री कृष्ण सरस्वतींसी करुनी प्रार्थना, करे साजरी विजयादशमी कृष्णदास
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त
अवतार ताराया जन जे भ्रमित
करवीरी केल्या लीला अमित
वेश बावळा दावुनी लपला नित्य
शरण भावे जाता उद्धरिले त्वरित
कृपाळूपणे जन हे अनंत
आजही अदृश्य कार्या नाही अंत
दासभावे मी प्रार्थितो नित्य
स्वीकारले मजसी उद्धराया त्वरित
प्रेमात भान विसरतो मी नित्य
असा गुरु माझा कृपाळू दत्त , श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृष्णासम वेधितो चित्त
ठाव न उरतो चित्ता अनित्य, स्वरूप दर्शनी गुंतवी नित्य
माया हतबल पहातसेे फक्त, कृष्णदासा स्पर्शावया न धजत
स्वामींच्या या सामर्थ्या अमित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा मज घोष हा नित्य
नाद ऐकता माया पळत, स्वरूप अनुभवी मी नाचतसे नित्य
भाग्य वर्णाया शब्दही थकत, उचंबळतसे प्रेमभाव हृदयात
कंठ सद्गदित, नेत्र जलभरित, कृष्णदास लोटांगणी नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हनुमंतचि हा करवीरी वसत
पुच्छ दावुनी खूण पटवत, हनुमंतासम औदुंबरी उडत
रामायणीच्या लीला अमित, सप्तसागर सामर्थ्ये लंघित
भवसागर मग तुच्छ तो गमत, कृष्णदास सहजी तो तरत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अभिनव त्या दीक्षेची रीत
अप्रकटरित्या चालवी मार्गात, तेणे न उठे दंभ किंचित
अहंकारापासून रक्षितो नित्य, पतनाचे जेणे भय न किंचित
साधनापथ हा सहज चालत, कृष्णदासाचा स्वामी हा दत्त ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरण उमटले हृद्पद्मात
ध्याता गणी न दिन अन् रात, गुंतविले अवघे मतिसहित
उमलले हृद्पद्म अमित, मधुर संवेदन जाणवे तेथ
दर्शनी लुब्ध अखंड मनात, कृष्णदास गुंजारवी नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हास्य मुखासी रमे बालभावात
तेज अमित परि सारे लपवत, शरणागतासी कृपा अमित
काही न मागे, मीपणा परि न खपत, कृष्णदास ‘मी’पण अर्पित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, धरले मजसी निजकृपाकरात
गोंजारितो मज बाळ मी खेळतो करांत, मातेपरी सांभाळितो अखंडित
तोचि लक्षितो साधनी हित, कृष्णदास बाळ लडिवाळपणे खेळत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, आठव मनी क्षणाक्षणात
विसर क्षणभरीही न होत, वाटे लाधलो कृपा अनंत
कृपाळू दत्त नच विसंबत, कृष्णदासा स्मरण त्याचे नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड लक्षितो मम हित
साधनी मज नित्य जागवत, बेसावध क्षणी सावध करी नित्य
साधनेची वाही काळजी अशी नित्य, कृष्णदास होई निर्भर चित्त ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पतितपावन सद्गुरू दत्त
कृपा लाधता पावन त्वरित, कृष्णदास कृपे पावन सत्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचे सामर्थ्य अमित
उद्धरिले अखंड अगणित, शरण जाता कृपा त्वरित
कृपाळू दत्त लक्षितो हित, कृष्णदास शरणी त्वरित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, हृदयभावा बहर अमित
भावतीर्थी डुंबतसे नित्य, स्नान करता काया पुनित
ध्यान करता अंतरी पुनित, कृष्णदास सर्वांगे पुनित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, मोतियांची माळ गळयात
मुखी हास्य तेज गगनात, मूर्ति बटू परि व्यापुनि ब्रह्मांडात
चरण धरुनी कोंडिली हृदयात, कृष्णदास पुलकित हृदयात ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, गुरु मज हा जन्मजन्मांतरित
अखंड सोबत हृदयांतरित, विस्मृतीची कशास बात
निशिदिनी मजसी जागृति नित्य, कृष्णदास चरणीचा भृत्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिरी शोभे टोपी हरित
पापताप जो अखंड हरीत, जन्म मृत्यूचा पाश हरीत
आत्मभावाचा बोध करीत, कृष्णदास आत्मभावे नमित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कौपीनधारी जणू हनुमंत
अंशावतारी करवीरी प्रगट, कामापासुनी दासा रक्षित
दासभावे श्रीरामा नमित, कृष्णदासही त्यासी नमित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, दास नेई हळुहळु उन्मनीत
मनाचा करितसे अंत, जीवभावाचा हो अंत
कृपा करितसे अशी अनंत, कृष्णदासा चित्ती अनंत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अक्कलकोटे धाडिला करवीरात
त्यासी ध्यातो मी मनात, व्यापुनि बैसला मम चित्तात
तेणे अखंड ध्यान मनात, कृष्णदासा निज कृपा वर्षित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अहंकाराचा वारा न खपत
ताडण्याची अभिनव पद्धत, अंतरीच दासा जाणवत
कृपेनेच असे खूण कळवत, कृष्णदास निजमनी जाणत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाचा उगम हृदयात
अखंड झरा असे स्फुरत, प्रेमलहरी सर्वांगी पुलकित
स्मरणी शरीर रोमांचित, कृष्णदास नित्य अनुभवत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, वसतसे अवधूत करवीरात
फेरी करी त्रिभुवनात, भक्त रक्षिण्या त्रिजगतात
विविधरुपे दर्शन देत, कृष्णदास दर्शना इच्छित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सिंहासनी बैसती शिष्यांसहित
छत्र धरिती अन् चवर्या ढाळीत, स्वामींच्या त्या लीला पहात
दर्शना समोर भक्त अनंत, कृष्णदास चरण चुरीत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, प्रभाती उठताचि नमन नित्य
तेणे जागवितो विवेक मनात, विचार सारासार नित्य अनित्य
अनित्य टाकोनी लक्षितो नित्य, कृष्णदासा न अहित दिनभरात ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, जेंव्हा कधीही आठव करीत
उठे अंतरातुनी प्रतिध्वनि त्वरित, काळजी नको मी आहे जागृत
विवेकरुपे तोचि लक्षित, कृष्णदासाचे हित नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, सद्गुरूंचा मी कृपांकित
आठव पूर्वी भेट करवीरात, ते वेळी मज केले सनाथ
सांभाळितो तैपासुनि नित्य, कृष्णदास शरणी नित्य ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, स्वामी असता दास कां भीत
पाठी उभा त्रैलोक्याचा नाथ, स्पर्शवाया काळही तो भीत
मायेचा न लागे पाडाव तेथ, कृष्णदास गमतो सनाथ ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, पालखी निघाली चला त्वरित
स्वामी झुलती आनंदात, भक्तही डोलती आनंदात
ताल मृदुंग चिपळया गर्जत, दत्त नामाचा गजर होत
आनंदाला उधाण येत, कृष्णदास भोई तेथ! ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चला दर्शना कृष्णतारा गृहात
समाधी बैसला दत्त, जागृत प्राण सहस्त्रारात
माथा टेकिता अनुभव येत, कृष्णदास होई रोमांचित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, शिष्ये स्थापिला निजबोध मठीत
दर्शना मूर्ति संगमरवरीत, दिसतो सिंहासनी स्थित
दर्शन करुनी भावे नमिता, कृष्णदास निजबोधी सद्गदित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, बीज रोविले अंतरात
वाढत वाढत असे देखत, रुपांतरले वटवृक्षात
वटवृक्ष स्वामींची परंपरा, कृष्णदास हा असे अनुभवत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, कृपा केली मजवरी अमित
न अनुभवता जव खिन्न मनात, स्वामी येउनी मजसी पुसत
कार्य माझे न कां मी जाणत, कृष्णदास ऐकता निश्चिंत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अखंड वास वैराग्यमठीत
विवेक वैराग्य प्रसाद तेथ, जाता नमिता लाभे त्वरित
कृपा दर्शनी होई अनंत, कृष्णदास ही भाग्यवंत ॥
******
हा कृष्णदास संसारी उदास, जे जे घडते ते पाहतो सावकाश
प्रतिक्रिया उठते परि सावध मनास, अखंड त्यासी श्री कृष्ण सरस्वतींचाची ध्यास
दत्तगुरुंचा कृपाशीर्वाद लाधलासे खास, तनमनधन अर्पुनि शोभितसे कृष्णदास ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, अंतरात ज्योत उदित
नामघोष चाले सतत, रमतो तेथ नित्य
मार्ग क्रमितो प्रकाशात, चालता देई हात
कृष्णदास चरणी त्या, शरणी तो सांभाळत ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, चरणी जडली मज मति
भवसागराची मजप्रति, उरलीसेे ना ती भीती
केली असे अखंड वसति, गुरुराये हृदयाप्रति
कृष्णदास शरण यति, श्री गुरु कृष्ण सरस्वती ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती दत्त, नामाच्या लहरी उठत
हृदय समुद्र उचंबळत, सत्रावी कलंडवत
अमृते होई काया पुनित, कृष्णदास कृपे पुनित ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
देई निर्मल दृष्टी मम कार्या
होई नश्वरतेचा बोध जगती या
दिसेल दृष्टी ईश्वर जगती या
अज्ञानांधकारी ज्ञानप्रकाश पहाया
मृत्यूकडूनी अमरत्वा न्याया या
अज्ञानाने दूषित मम दृष्टी या
कृष्णदास प्रार्थितो निर्मळ कराया
दिसेल दृष्टी मग तू अखंड गुरुराया ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
जाऊ चला वैराग्यमठीसी दर्शन घेऊया
सावळी सुंदर बटूमूर्ती गुरुराया
दर्शन करुनि नयनांचे पारणे फेडूया
चरणांवर पावन त्या माथा टेकुया
हस्तस्पर्शे पावन काया निववुया
आशीर्वादे करु धन्य जीवना या
कृष्णदास प्रार्थितो सकला दर्शना एकदा तरी या
अवधूत दिगंबर तेथे सिंहासनी गुरुराया ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
शोभसी सिंहासनी नृपवर्या
मौक्तिकमाळा शोभिती गळा या
हास्य अनुपम विलसे मुखा या
कृपादृष्टी ओसंडे प्रेमळ नयना या
दिव्यत्वाचा भास पाहता सुवर्णकांती या
कृष्णदासे अनुभवले दर्शनि या
भाव एकवट अविचल दृष्टी स्थिती या
वर्णू काय औदार्या नृपवर्या, वर्णू काय औदार्या गुरुवर्या
हरुनि मीपण घेतले गुरुवर्या
निजहृदय सिंहासनी बैसविले मज या
स्वानंद राज्य सिंहासनी अधिपती केले या
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
कृष्णदासे वर्णिली निजस्थिती दर्शनि या ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
राहो अबाधित समता चित्ता या
राहो अखंड विवेक जागृत अंतरी या
जेणे उठे न क्षोभ मम चित्ता या
कृष्णदास प्रार्थितो यतिवर्या
राहो अखंड अविचल मनाची स्थिती या
जेणे अखंड राहील स्मरण तुझे गुरुराया
आशीर्वाद हा देई नमिता तव पाया
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
कथिती शात्रपुराणे ग्रंथी या
आत्मा एकचि सर्वाभूती असे या
कारण काय मग होते द्वेषमत्सरा या
उगम असे कोठे तो सर्वा या
नाश कसा अन् होई सांगा या
कृष्णदास प्रार्थितो यतिवर्या
सर्वाभूती आत्मा मज दावाया ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
कळेना मजसी करावे काय कलियुगी या
कलहरुपे शिरला कली प्रत्येका हृदया या
विसंवाद दावी प्रत्येका मता या
बिघडवितो हा शांति समाजी अन् गृही या
कृष्णदास विनवितो गुरुराया
स्थापी सुसंवाद प्रत्येकी हृदयी या
प्रगटे जेणे शांति अखंड समाजी या
विश्वप्रेमा होय उदय जेणे समाजी या
तेणे रमेल अखंड जीव भगवत्प्रेमी या ॥
******
गुण अवगुण ज्याचे त्याचे, राहो त्यांच्यापाशी
स्पर्श न होऊ देऊ देवा, त्यांचा तो मजसी
सुमति दुर्मति ज्याची त्याची, राहो त्यांच्या पाशी
मति मज ही कधि न बिघडो, जाता त्यांच्या संगतीसी
मतमतांतरे प्रवाह नाना, असती या जगतासी
कधी मजसी पडू न देई, त्या प्रवाहांसी
अहंकाराच्या ठासुनी भरल्या दिसती, मूर्ति जगतासी
लेशमात्रही स्पर्श न व्हावा, त्यांचा कधि मजसी
आत्मरुपी मी आत्मरुपी जग, दाखवी गा मजसी
कृष्णदास ही करी प्रार्थना, श्री कृष्णसरस्वती गुरुंसी ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती यतिवर्या
दु:खी दीन असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी दु:ख त्यांचे हराया
असहाय असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी त्यांसी सहाय कराया
उपेक्षित असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी त्यांसी प्रेम अर्पाया
निराधार असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी त्यांसी आधार द्याया
तळमळत असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी त्यांसी त्यांची तळमळ हराया
पीडित असती जीव जगी या
दे सामर्थ्य मजसी त्यांची पीडा हराया
कृष्णदास म्हणे अज्ञानी असती जीव जगी या
दे ज्ञान मजसी त्यांचे अज्ञान हराया ॥
******
श्री गुरु कृष्ण सरस्वती, दान मागतो सर्वांप्रति
देई सर्वां निर्मळ मति, द्वेष मत्सरा सुटका करी ती
दे मधुर वाचा अति, हास्य फुलू दे मुखावरती
प्रसन्नता अखंड चित्ती, कपटा न द्या थारा चित्ती
आलस्य न हो देहाप्रति, मोह वासना न उठो चित्ती
करुनिया बुद्धीची चंचलता परती, करी सर्वां स्थिर मति
नाम जडो जिव्हेप्रति, ध्यानी जडो स्थिर मति
दिसेल त्या त्या दृश्याप्रति, दर्शन होवो कृष्ण सरस्वती
हेतु मनींचा कळविता तुजप्रति, कृष्णदास झाला निश्चिंत अति
******
संगात राहुनिया नि:संग राहण्यासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
दशेंद्रिया विषय तो श्रीगुरुचि सर्व होण्यासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
अतूट तैलधारेवत् होण्या स्मरण अंतरासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
नित्य कर्मे करुनियाही येण्या अलिप्ततेसी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
षड्रिपु सकलही ते निर्मूल होण्यासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
द्वैत सांडुनिया अद्वैती रमण्यासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
मुक्तिवरील भक्ति सहजी साधण्यासी
या चला या करुया प्रार्थना श्रीगुरुंसी
या चला जाऊया सारे श्री क्षेत्र करवीरासी
कृष्णदास म्हणे प्रार्थुया श्री कृष्ण सरस्वती गुरुंसी ॥
******
अपूर्ण – आणिक रचना लवकरच …
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply