तपस्याभूमी श्रीक्षेत्र माचणूर

संतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र  – डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


श्रीक्षेत्र माचणूर येथील ‘श्रीगुरुदेव कुटीर’ जिर्णोद्धार  व श्री संत बाबामहाराज आर्वीकर आश्रम विकास व सुशोभिकरण निधीस सढळ हस्ते मदत करा.

अधिक माहितीसाठी कृपया या पृष्ठाच्या शेवटी पहा.

****************************

तपस्याभूमी श्रीक्षेत्र माचणूर परिचय

श्रीगोरक्षनाथ, श्रीस्वामी समर्थ व श्री शंकर महाराज यांचे वास्तव्याने पावनतपस्याभूमी श्रीक्षेत्र माचणूर

                अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ महाराज जेव्हा मंगळवेढा व आसपासच्या परिसरात वावरत असत, त्याकाळी त्यांचे वास्तव्य जेथे काही काळ झाले होते असे मंगळवेढ्याजवळील श्रीक्षेत्र माचणूर! भगवान श्रीसिद्धेश्वर महादेव, पंढरपूर येथीलश्रीविठ्ठलाच्या पदस्पर्शाने पुनित होऊन माचणूरच्या दिशेने प्रवाहितहोणारी भीमा नदी व नाथपंथी सिद्धांचे ठाणे असलेल्या या रमणीय स्थानी श्रीस्वामी समर्थ रमले यात नवल ते काय! धनकवडीचे श्रीशंकर महाराजांचे बालपणीचा काळसुद्धा याच क्षेत्री गेल्याचा उल्लेख प्रत्यक्ष श्रीशंकर महाराजांनी त्यांचे अंतरंग शिष्य श्री अप्पा धनेश्वर यांना स्वमुखाने सांगितलेल्या गोष्टीत केला आहे. ‘माझे आडनाव उपासनी असून सुमारे १८०० साली  माझा जन्म मंगळवेढ्याजवळ झाला. बालपणी मी फार व्रात्य होतो. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षी एकदा एका हरिणाचा पाठलाग करत असताना ते माचणूर येथील चंद्रभागेतीराजवळील जंगलात शिरले. मी तेथे गेलो तेव्हा एका शिवमंदिराजवळ गेलो. तेथून त्या हरिणास बाण मारणार तोच तेथे एक संन्यासी आला. त्याने त्या हरिणास आपल्या हातात उचलले व मला म्हटले, ‘‘बेटा, निरपराध प्राण्यास का मारतोस? शिकार करायची तर जंगली प्राण्यांची कर.’’ पण मी त्याच्याकडे लक्ष न देता हरिणास बाण मारला. पण तो त्याला लागताच बोथट होऊन खाली पडला. परत एकदा बाण मारला असता तसेच घडले. मी गोंधळलो. तेव्हा तो संन्यासी हसला, त्याने त्या हरिणास खाली सोडले व महाराजांस जवळ घेऊन कुरवाळले. तो संन्यासी म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून प्रत्यक्ष श्रीस्वामी समर्थमहाराजहोते.’ नंतर श्रीस्वामी समर्थमहाराज शंकर महाराजांस घेऊन तेथे सहा महिने राहिले, त्यांचेकडून साधना करून घेतली. त्यानंतर श्री स्वामींनी श्री शंकर महाराजांस तपस्येकरिता हिमालयात पाठविले. हिमालयातील काही कालाच्या तपस्येनंतर श्रीशंकर महाराज नगर जिल्ह्यातील वृद्धेश्वर येथे आले.’ असे हे श्रीक्षेत्र माचणूर!

                परमेश्वराचे, साधुसंतांचे एक निमिषभर वास्तव्य झाले तरीही ती भूमी पावन होते, येथे तर या अशा महासिद्धांचा दीर्घकाळ वास झालेला आहे. मग अशा स्थळाचे माहात्म्य काय वर्णावे! श्रीस्वामी समर्थ, श्रीशंकर महाराज, नाथसंप्रदायी, शिवभक्त, वैष्णव, निर्गुणोपासक अशा कुठल्याही भक्ताने, साधकाने दर्शन घ्यावे, वास्तव्य करावे, साधना करावी असे हे एक पावन तपस्याक्षेत्र आहे. म्हणूनच अलिकडच्या काळात श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांना त्यांच्या पंधरा वर्षांच्या दीर्घ तपस्येअंती ते जेव्हा अक्कलकोट क्षेत्री आले तेव्हा श्रीस्वामी समर्थांनी त्यांना आदेश दिला की, ‘मंगळवेढा येथील  माचणूर, येथे श्रीसिद्धेश्वर मंदिराजवळ तुझी कर्मभूमी आहे तेथे जा व कार्य सुरु कर!’.असा आदेश देऊन जणू काळाच्या ओघात लपलेल्या श्रीक्षेत्र माचणूर या तपस्यास्थानास साधकजनांसाठी पुन:प्रकाशात आणण्याची श्रीस्वामी समर्थांची योजना होती जणू! श्रीक्षेत्र माचणूर येथील अक्कलकोट स्वामींच्या वास्तव्याची खूण मुंबई येथील कै. सौ. विमलाबाई पुरोहित उर्फ काकू मॉं यांस कशी मिळाली त्याची कथा पुढे पाहूच. श्रीक्षेत्र माचणूर येथील वास्तव्यात श्रीबाबांनी मोक्षधाम आश्रमाची स्थापना केली व संतधर्म प्रसाराची मुहुर्तमेढ रोवून श्रीबाबा महाराज १९७१ साली सूक्ष्मात विलीन झाले. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढातालुक्यात मंगळवेढ्यापासून आठ मैलांवर भीमा नदीच्या तीरावरील ‘श्रीक्षेत्रमाचणूर’ हे छोटेसे खेडेगाव. येथून वाहणारी भीमा नदी, तिच्या प्रवाहाच्या चंद्रकोराकृति दर्शनामुळे चंद्रभागा नावाने ओळखली जाते. या चंद्रभागेच्या नाभीमध्यावर व भूगर्भरेषेवरश्रीक्षेत्र माचणूर हे पवित्र क्षेत्र वसले आहे. त्याकारणाने तपस्येसाठी हे स्थान फार महत्वाचे आहे व अशी स्थाने फारच दुर्मिळ आहेत. हा परिसर इतका निवांत व रमणीय आहे की इथे कुठेही बसल्यास साधकाची वृत्ति सहजीच अंतर्मुख होऊन जाते व भान कूटस्थाकडे केंद्रित होते. नीरानरसिंगपूरपासून पंढरपूरपर्यंत पसरलेला भीमेकाठचा परिसर ‘हरिक्षेत्र’ आणि पंढरपूरपासून सरकोली, माचणूर, सिद्धापूर हा भाग ‘हरक्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध आहे.अशा प्रकारे हरिहरांच्या मंगल मिलनाचे वरदान लाभल्याने हा भाग ‘हरिहर’ क्षेत्र म्हणून ओळखला जातो. श्रीगुरुचरित्र ग्रंथात श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराज आपल्या शिष्यांस तीर्थयात्रेस जाण्याची आज्ञा देतात व विविध क्षेत्रांची माहिती देतात त्यात माचणूर क्षेत्राचा उल्लेख आहे. (अध्याय १५. ओवी ५१. हरिहरक्षेत्र महाख्याती | समस्त दोष परिहरती | तैसीच असे भीमरथी | दहा गावे तटाकयात्रा ॥५१॥) माचणूरला श्रीसिद्धेश्वरांचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरासमोर नदीला सुंदर विस्तीर्ण घाट आहे. तो दानशूर राणी अहिल्यादेवीने बांधला असे म्हणतात. यावरूनच त्या काळी हे तीर्थक्षेत्र फार प्रसिद्ध असले पाहिजे हे ध्यानात येईल. पात्रात श्रीजटाशंकराचे देवालय असून वर वेशीकडील एका बाजूला श्रीमल्लिकार्जुन मंदिर आहे.दुसर्‍या बाजूला मोक्षधाम आश्रमात काशीहून आलेले शिवभक्त संन्यासी परमहंस श्रीकाशिनाथ महाराज, ज्यांनी येथे तपाचरणकेले व शके १५४५च्या ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला ब्रह्मलीन झाले, त्यांचीसमाधि आहे. तेथेच श्रीसंत बाबामहाराज आर्वीकर यांचेही समाधि मंदिर आहे वतो भागमोक्षधाम आश्रम म्हणून प्रसिद्ध आहे.बेगमपूर येथे चौदापंधरा वर्षे वयाचे परमहंस सिद्धपुरुष होते.त्यांची समाधि नदीतीरावर आहे.

श्रीक्षेत्र माचणूर ही प्राचीनतपस्याभूमी असून ‘नाथांचे ठाणे’ म्हणून ओळखले जाते. चंद्रभागेच्या नाभीमध्य असलेल्या या क्षेत्रात श्रीगोरक्षनाथ यांनीएकवीस दिवसांचे तपानुष्ठान करून एका गुप्तलिंगाची स्थापना केली होती असे श्रीबाबा महाराज सांगत असत. अधर्माचा नाशकरून धर्मस्थापना करण्यास्तव यति श्रीसिद्धरामांचे आगमन झाले होते. श्रीसंत बाबामहाराजांनी आपल्या एका काव्यात यासंबंधी पुढीलप्रमाणे उल्लेख केलेलाआहे.

भूमीभार सारुनी ज्ञानदीप्ती पाजळी |धर्मवीर प्रसवले सिद्धराम ये स्थळी॥

यापुढील संपूर्ण काव्याचा सारांश पुढीलप्रमाणे आहे:
दुष्टता व अधर्म वाढून मंदिरे भ्रष्ट झाली, कुणी कुणाला विचारीनासे झाले. भक्ति विकळ झाली, धैर्यवान धीर सोडून थरथर कापू लागले. सृष्टीरूपद्रौपदीचे हे दैन्य दूर करण्यास तिला कुणीही त्राता उरला नाही, अशा वेळी श्रीसिद्धराम या स्थळी प्रवेशले. त्यावेळी विमल जलवाहिनी, कोरीव कड्यातून वाहणार्‍या चंद्रकोराकृति भीमेच्या कांठी दक्षिण दिशेस घोर वनराजी असलेल्या स्थानी पूजा केलेले एक शिवलिंग श्रीसिद्धरामांच्या द्दष्टीस पडले.हिंस्त्र श्वापदांची भीती न बाळगता, देहप्रीति दूर करून या निबिड अरण्यात कोणता भक्त शिवपूजेस येऊ शकेल असे वाटून पूजकाच्या दर्शनाकरिता श्रीसिद्धराम आतुर झाले. मावळत्या सूर्यास वंदन करून रात्रीच्या अंधाराचे भय न बाळगता श्रीसिद्धराम, तो दिव्यपुरूष ध्यानावस्थेत शिवाच्या पूजकाला शोधू लागला आणि जगन्माता अंबिकेला पूजा करताना पाहून ‘अंब अंब’ म्हणून तिचे पदी लीन झाला. अत्यानंदाने सिद्धरामांचे देहभान हरपले. विश्वजननीने प्रेमाने त्या पुत्रास स्वहस्ताने धरून जागविले आणि हर्षोत्फुल्लतेने शिवलिंगाची कथा सांगितली. त्रैलोक्यात वंद्य असणारे, गौरविले जाणारे ऋषिकुळातील तेजस्वी, ज्ञानी, शिवस्वरूप, हेतुरहित भ्रमण करीत असलेले श्रीवामदेव एक दिवस मावळतीच्या सुमारास येथे आले. चंद्रभागेत स्नान केले. रात्रीचा काळोख पसरू लागला होता, अशा वेळी त्यांना जळावर लिंग तरंगताना दिसले. हर्षित चित्ताने त्यांनी ते पाण्यातून काढून जमिनीवर ठेवले. वेदोक्त वाणीने त्या लिंगाची स्थापना करण्यास्तव त्यांनी शौनकादि ब्रह्मनिष्ठ, भारद्वाज मुनि, कौशिकादि सांख्यमति, शुकदेवांसारखे आत्मनिष्ठ, जपी, तपी, योगी, धर्मवीर, भक्तवृंद, सान, थोर, तत्वदर्शीयांना निमंत्रणे केली. विमल मनाचे हे सारे धर्मधुरीण या स्थळी आले. पुरोहितांची योजना करून यज्ञकर्म आरंभिले आणि या मातृलिंगाची स्थापनाकेली. देवांनाही अचंबा वाटावा असा हा सोहळा संपन्न झाला. ते हे माचणूर-ग्रामदैवत श्रीसिद्धेश्वर!
श्रीसिद्धेश्वर मंदिराचा सर्व परिसर अत्यंत सुंदर असून सर्व बांधकाम पाषाणाचे आहे. दगडी प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यावर दोन्हीबाजूला सुंदर देवड्या आहेत. डावीकडे श्रीमल्लिकार्जुन मंदिर लागते. पुढे प्रशस्त पायर्‍या उतरल्यावर द्वितिय प्रवेशद्वार आहे. श्रीसिद्धेश्वराच्या मंदिराभोवती दगडी तटबंदी आहे. श्रीसिद्धेश्वर मंदिरात प्रवेशद्वारापाशी तीन फूट उंचीचा भव्य नंदी आहे. आत उजवीकडे श्रीगजानन आहेत. गाभार्‍यात जाण्यासाठी पहिला दरवाजा पाच फूट तर दुसरा अडीच फूट उंचीचा असे दोन दरवाजे ओलांडून जावे लागते. मंदिर परिसरात मोठ्या ओवर्‍या, दीपमाळी व खोल्या आहेत. गाभार्‍यात श्रीसिद्धेश्वर महादेवांचे भव्य शिवलिंग आहे. चांदीचा भव्य मुखवटाही आहे. मंदिराच्या आवारात उजवीकडे श्रीस्वामी समर्थांनी स्थापन केलेल्या लहानशा पाषाण दत्तपादुकाआहेत. तेथून मंदिराच्या तटाला लागून साधारण पन्नास पायर्‍या खाली उतरल्यावर भीमानदीच्या किनारी बांधलेला प्रशस्तघाट नजरेत भरतो. नदीपात्रात मध्यभागी श्रीजटाशंकराचे छोटेसे परंतु सुबक व देखणे मंदिर आहे. नदीच्या पाण्याची पातळी कमी असल्यास मंदिरापर्यंत पाण्यातून चालत अन्यथा बोटीने जाता येते. मंदिराच्या गाभार्‍यात श्रीजटाशंकराचे सानिद्ध्यात ध्यानास बसल्यास एक गूढ अन विलक्षण शांतीचा अनुभव येतो. भीमानदीला १९५६ साली आलेल्या पुरात पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले होते. पूर इतका प्रचंड होता की पाणी सिद्धेश्वराच्या मंदिरात आले होते. त्या पुरात श्रीजटाशंकर मंदिराचा कळस वाहून गेला. महाशिवरात्रीला येथे श्रीसिद्धेश्वर महादेवांची फार मोठी यात्रा भरते व मोठा उत्सव साजरा केला जातो. लाखो भाविक श्रीसिद्धेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी येतात. श्रावण महिन्यात सोमवारीसुद्धा येथे बरेच भाविक दर्शनास येतात.

नाथपंथी सिद्ध श्रीगोरक्षनाथ,परमहंस श्री काशिनाथ महाराज, अक्कलकोटनिवासी श्रीस्वामी समर्थ,धनकवडी येथील समाधिस्थ सत्पुरुष श्रीशंकर महाराजव अलिकडच्या काळात (इ.स. १९५४ ते १९७१) नाथपंथी संत श्रीबाबा महाराज आर्वीकरया सर्व महात्म्यांच्या वास्तव्यामुळे आध्यात्मिकतेने स्पंदित असलेले हे श्रीक्षेत्र माचणूर सर्व पंथाच्या साधकांसाठी उत्तम साधनाक्षेत्र आहे. श्रीबाबामहाराजांनी मोक्षधाम आश्रमाची स्थापना केली होती. आता तेथे श्रीबाबांचे समाधि मंदिर आहे. मोक्षधाम आश्रमाचा परिसर अत्यंत रमणीय तसेच पवित्र व शांत आहे. इथल्याइतकी निवांतता व एकांत क्वचित ठिकाणी सापडेल. येथे येणारा साधक, मग तो कुठल्याही संप्रदायाचा असो, त्याला येथून मार्गदर्शन मिळेल असे स्वत: श्रीबाबामहाराज सांगत असत. सिद्ध सारणा संघ या श्रीबाबांनी स्थापन केलेल्या संस्थेद्वारे मोक्षधाम आश्रमाची व्यवस्था पाहिली जाते. साधकांसाठी आश्रमात निवासाची सोय आहे व पूर्वकल्पना दिल्यास संस्थेद्वारे भोजनप्रसादाची व्यवस्थासुद्धा केली जाते. एकांतप्रिय साधकांनी जप-तप-ध्यान-पारायण-चिंतन करून लाभ घ्यावा असे हे महाराष्ट्रातील एक विरळा तपस्यास्थान आहे.

——————————

धन्यसिद्ध ग्राम …
धन्यसिद्ध ग्राम | सिद्धांचा हा गांव |
सिद्धेश्वरदेव| नांदे तेथें ॥
वाहे चंद्रभागा | चरणापासोन |
तीर्थराज पावन | भक्तजनां ॥
संतमुनि तेथें | इच्छिले पावती |
सहज भाव भक्ति | आवडे देवा ॥
मूळ गणपति | सेवेमाजीं रत |
फणिधर डुल्लत| नाचे पुढें ॥
मोरेश्वर म्हणे | तयाच्या दर्शने |
पळताती विघ्ने | दशदिशां ॥
–संत मोरेश्वर (प. पू. संत श्रीबाबामहाराज आर्वीकर)


कै. विमलाबाई पुरोहित यांना झालेला श्रीस्वामी समर्थ यांचा श्रीक्षेत्र माचणूर व श्रीबाबा महाराज आर्वीकर यांचा दृष्टांत

इ.स.१९५४ दरम्यान मुंबईत श्री रं. स. उर्फ काका गोडबोले यांचेकडे श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचा सत्संग होऊ लागला. गिरगावात सौ. विमलाबाई पुरोहित रहात होत्या. श्रीसाईबाबा व श्रीस्वामी समर्थ यांच्या भक्त. संसारात कन्येचे अल्पवयात निधन झाल्याने त्यांचे मन सैरभैर झाले होते. सौ. विमलाबाईंच्या घरच्यांनी, त्यांना खूप आग्रह केला की तिने एकदा श्रीबाबांचे दर्शन घ्यावे, जेणेकरून दु:खी मनाला दिलासा मिळेल. परंतु बराच काळ गेला तरी ते काही घडले नाही.
एके दिवशी पहाटेच्या सुमारास स्वामीभक्त सौ. विमलास स्वप्नात माचणूर दिसले. श्री काशिनाथ महाराजांच्या समाधीस्थानातील मधल्या पडक्या ओवरीत श्रीस्वामी पहुडले होते.
ते सौ. विमलला म्हणाले, ‘अगं सडा घालतेस नां!’ आज्ञेचे पालन म्हणून स्वामींच्या पुढील भागात सौ. विमलने सडासंमार्जनास सुरुवात केली. काही क्षणातच सध्याच्या आश्रमाच्या दरवाज्यातून लुंगी-कफनी परिधान केलेला, तेजस्वी चेहरा, भेदक डोळे, जटा-दाढी असलेला, उंचापुरा तापसी तरुण लगबगीने आत येत होता. त्याला पाहून सौ, विमलची बोबडी वळली. हातातला तांब्या तेथेच टाकून ती खाटेवर स्वामींचे चरण जोरजोराने चेपू लागली. चेहरा गोरामोरा झाला होता. स्वामी म्हणाले, ‘काय झालं! अशी घाबरलेली कां?’ तिने केवळ आत येणार्‍या त्या व्यक्तीकडे अंगुली-निर्देश केला. पाठीवरून हात फिरवीत स्वामी म्हणाले, ‘घाबरू नकोस! अग, हा तर आपला मोरू! मोरू ये. बैस येथे’. स्वामींनी स्मित केले आणि सौ. विमलचा हात मोरेश्वराच्या हातात दिला आणि म्हणाले, यापुढे आता हा तुझा सांभाळ करील! स्वप्न संपले व सौ. विमलला जाग आली. दुसरे दिवशी विमल श्री गोडबोले यांचेकडे जाण्यासाठी निघाली. नियमित साई-लीला वाचणार्‍या सौ. विमलने साईबाबांना म्हटले तुमच्या पोथीतला एखाद्या प्रसंगाची अनुभूति आली तरच नतमस्तक होईन. हरीची लीला हरी जाणे. झाले. इकडे सीताराम प्रासादात श्रीबाबा सौ. गोडबोलेताईंना डोक्याला गुंडाळण्यासाठी पांढरे फडके मागत होते. सौ. ताईंना समजेना की पूर्वी कधी डोक्याला काही न गुंडाळणारे श्रीबाबा त्यांचेकडे फडक्याचा आग्रह कां धरीत होते. फडके मिळताच श्रीसाईबाबांसारखे डोक्याला फडके गुंडाळून श्रीबाबा बसले. तेवढ्यात सौ. विमल आली. श्रीबाबांना पाहून साईबाबांचेच दर्शन झाल्याचा आनंद तिला झाला. दुसर्‍याच क्षणी पहाटे पडलेल्या स्वप्नातील विभूति ती हीच असे म्हणून ती श्रीबाबांकडे टक लावून पाहू लागली. श्रीबाबा प्रसन्नपणे म्हणाले, ‘काय पटली कां ओळख?’त्याबरोबर सौ. विमलच्या डोळ्यांतून अश्रुगंगा वाहू लागली, श्रीबाबांचे स्पर्शांने नंतर ती थांबली. अशी ही त्यांची प्रथम भेट!

काकू मॉं काही काळाने दादर येथील ‘भिकोबा निवास’ या इमारतीत राहावयास आल्या. १९५८ पासून त्या वास्तूत श्रीबाबांचे खूप वास्तव्य झाले. श्रीबाबांच्या परिवारात सर्वजण त्यांना काकू मॉं असेच संबोधत असत. श्रीबाबांवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते. आजही माचणूर येथील श्रीकाशिनाथ महाराजांच्या समाधि मंदिरातील मधल्या ओवरीतील देवघरात श्रीस्वामी समर्थांची तसबीर पहावयास मिळते.

एका पत्रात श्रीबाबा लिहितात, ‘मला माणूस समजून फसू नकोस. माणसाच्या आकारातून कुणी वेगळाच विहरत आहे हे लक्षात ठेव!’


अक्कलकोट संस्थानचे खजिनदार श्री नामदेवराव कासेगावकर हे श्रीबाबांस (१९५४) भेटले. त्यांनी सांगितलेली हकिगत

 ‘‘स्वामी समर्थांच्या मठात मी रोज दर्शनास जात असे. त्यावेळी महाराज (श्रीबाबा) पारावर बसले होते.त्यांची दृष्टी उर्ध्व लागलेली होती. एक-दोन दिवस ते पारावरच बसलेले होते. चौथे दिवशी उत्सुकता म्हणून जवळ गेलो. नमस्कार केला. ‘महाराज, आपण कोठले? कोण गाव?’ म्हणून विचारले मात्र! तोंच ‘तुम्ही काय सोयरीक जमवायला आलात की काय?’ असे महाराज रागावून म्हणाले. ‘वेळ असेल तर बसा नाहीतर चालू लागा.’ असे ऐकल्यावर मी तेथेच बसलो. थोडा वेळ बोलल्यानंतर लक्षात आले की हा महात्मा आहे. नंतर भीतभीतच विचारले, ‘महाराज आपण प्रवचन कराल का?’ त्यांनी माझ्याकडे एकटक पाहिले व नंतर म्हणाले,’करू की’. अशी आमची पहिली भेट!’’

पहिले दिवशी प्रवचन सुरु होण्यापूर्वी मी त्यांना विषय सांगितला ‘सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज’. परंतु महाराज म्हणाले की, ‘मी फक्त भक्तियोगावरच प्रवचन करीन. दुसरा विषय हवा असल्यास मी प्रवचन करणार नाही.’ ६ दिवस सुंदर प्रवचने झाली. पहिले दिवशी प्रवचनानंतर ताट फिरविले. लोकांनी त्यात पैसे टाकले. मग ते ताट महाराजांपुढे ठेवले. महाराज एकदम रागावले. ‘हे कुणी सांगितले?’ असे विचारले, ‘मी एकही पैसा घेणार नाही’. एका गृहस्थाने धीर करून विचारले की, ‘मग हे पैसे पेटीत टाकू?’ महाराज म्हणाले, ‘ते मी कसे सांगू? पैसे पेटीत टाका हे सांगण्याचा अधिकार मला नाही’. त्या पैशांचे काय करावे हा पेच पडला. तेव्हा महाराजच म्हणाले, ‘हे ताट तेथे ठेवा. ज्यांनी पैसे टाकले ते त्यांनी परत न्यावेत’. प्रत्येकाने आपापले पैसे परत उचलून घेतले व ताट रिकामे झाले. महाराज तेथील दर्ग्यात रोज जायचे पण एकटेच. ते काय करीत ते कुणासच माहित नाही. ते त्यांचा ठावठिकाणा कोणासच समजू देत नसत. माझ्या घरी येऊन जात पण कधी वस्तीला राहिले नाहीत. श्रीबाबांचे वास्तव्य अक्कलकोटास व्हावे म्हणून आम्ही जागा पाहिल्या पण त्यांना पसंद पडल्या नाहीत. ब्रह्मपुरीतील महामुनी ही माझे आजोळ. श्रीबाबांना तेथे घेऊन गेलो असता, बाजूचे माचणूर येथील श्री काशीनाथ महाराजांची समाधि हे स्थान त्यांना आवडले. अशा रितीने अक्कलकोट स्वामींचा माचणूर येथे रहाण्याचा आदेश सहजच पूर्ण झाला. त्यावेळी माचणूरचे वयोवृद्ध सधन शेतकरी श्री तात्या भवाळकर यांनी श्रीबाबांचे भोजनाची जबाबदारी स्वीकारली. हळुहळु गावतील बरीच तरुण मंडळी जमू लागली. श्रीमती तुकामाई डोके यांनी बाबांना आपली शेतजमीन दान केली. त्यांचे नातू श्री नानासाहेब डोके, हे सिद्ध सारणा संघाचे विद्यमान अध्यक्ष होते त्यांनीही आपली माळजमीन सिद्ध सारणा संघास दान दिली. सोलापूरचे सोन्याचांदीचे व्यापारी होनप्पा गायकवाड यांनीही आपली दोन एकर जमीन आश्रमास दान दिली.


श्रीक्षेत्र माचणूर जवळील पवित्र पंचक्षेत्रे:-

अर्धनारी – अर्धनारीनटेश्‍वराचे मंदिर आहे.
उचिठाण (उच्चस्थान)- येथील टेकडीवर अनेक यज्ञ झाले आहेत. य यज्ञभूमीतील भस्म श्रीसिद्धेश्वरांच्या पूजेसाठी आणले जाते.
बठाण (अवस्थान) – हे उचिठाणच्या खाली वसलेले गाव. यज्ञसमयी या गावातसिद्धांचा निवास असे.
बेगमपूर (घोडेश्वर) – प्राचीन काळी परमहंसस्वामी नावाचे सत्पुरुष चंद्रभागेच्या प्रवाहावर घोंगडे टाकून त्यावरआसनस्थ होऊन श्रीसिद्धेश्वराच्या दर्शनास येत असत. त्यांची समाधि बेगमपूर येथे नदीकाठी आहे.
सिद्धापूर -येथे चंद्रभागेच्या प्रवाहात गणपति आहे. मकर संक्रांतीचे दुसर्‍या दिवशी त्या मूर्तीचे दर्शन होते व तेथे मोठी यात्रा भरते.

ऐतिहासिक महत्त्व:- दक्षिण जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांच्या हल्ल्यांनी त्रस्त झाला होता व त्यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी औरंगजेबाने मंगळवेढ्याजवळील ब्रह्मपुरी गावाजवळ भीमा नदीच्या काठी इ.स. १६९५च्या आसपास किल्ला बांधला. औरंगजेबाचे येथे बरीच वर्षे वास्तव्य होते. या काळात किल्ल्यात मोगल सैन्याची मोठी छावणी होती. या भागाचे नाव माचणूर कसे पडले याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. औरंगजेबाने हा प्रदेश जिंकल्यावर आपल्या सैनिकांना श्रीसिद्धेश्वराचे शिवलिंग फोडण्याची आज्ञा केली. पण त्यासाठी गेलेल्या सैनिकांवर भुंग्यांच्या थव्याने हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना परत फिरावे लागले. या प्रकाराने संतापलेल्या औरंगजेबाने श्रीशंकरांचा उपमर्द करण्यासाठी नैवेद्य म्हणून मांसाचा नैवेद्य पाठवला, पण श्रीसिद्धेश्वराचे पुढ्यात ठेवलेल्या नैवेद्याचे ताटावरील वस्त्र बाजूला केल्यावर मांसाच्या जागी पांढरी फुले दिसली. मांसाचा नूर पालटला त्यामुळे या ठिकाणाला मासनूर असे म्हटले जाऊ लागले. पुढे याचाच अपभ्रंश होऊन गावाचे नाव माचणूर झाले. या सर्व प्रकारामुळे खजिल झालेल्या औरंगजेबाने सिद्धेश्वर मंदिराला ४०० रुपये व ६ रुपये अशी दोन वर्षासने चालू केली. आजही महाराष्ट्र सरकारकडून मंदिराला ४८० रुपये वर्षासन मिळते. माचणूर पासून एक मैल अंतरावर बेगमपूर गाव आहे. तेथे बादशहाच्या बेगमची कबर आहे. या परिसरात अनेक ठिकाणी टेहाळणी बुरुज चांगल्या भक्कम अवस्थेत आजही उभे असलेले दिसतात. या बुरुजावर जाण्यासाठी त्यांना आतून जिने केलेले आहेत. बुरुजावर उभे राहून शत्रूंच्या आगमनाची चाहूल घेण्यासाठी केलेली त्यावेळची व्यवस्था होय. येथे राहणार्‍या लोकांनी औरंगजेबाच्या काळी जमिनीत पुरुन ठेवलेल्या संपत्तीची साक्ष अजूनही मिळते. येथे काही शेतकर्‍यांना जमीन नांगरताना जुनी नाणी, नरनिराळ्या आकाराचे व रंगाचे मणी, अंगठीत वापरण्याचे रंगीबेरंगी खडे व मोहरा वगैरे सापडल्या आहेत. अनेक इतिहासप्रेमी व संशोधक माचणूरला येत असतात.

श्रीक्षेत्र माचणूर येथे कसे जावे?

श्रीक्षेत्र माचणूर सोलापूर-मंगळवेढा मार्गावर सोलापूरपासून सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर आहे. पंढरपूर बाजूने आल्यास अंतर साधारण ३७ किलोमीटर आहे. सोलापूर, मंगळवेढा व पंढरपूर येथून एसटी बसेस मिळतात. मुख्य मार्गा वरील बसथांब्यावर उतरल्यावर तेथून श्रीसिद्धेश्वर मंदिर व मोक्षधाम आश्रम केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर आहे. साधकांसाठी आश्रमात निवासाची सोय आहे व पूर्वकल्पना दिल्यास संस्थेद्वारे भोजनप्रसादाची व्यवस्थासुद्धा केली जाते. जास्तीतजास्त साधकांनी येथे येऊन जप-तप-ध्यान-पारायण-चिंतन करून या श्रीक्षेत्राचा लाभ घ्यावा.


संत श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचा अल्प परिचय

SantBabaMaharajPainting

जन्म: श्रावण शुद्ध चतुर्दशी शके १८४७ – दि.३ ऑगस्ट १९२५
महानिर्वाण: मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ – दि. २ डिसेंबर १९७१

श्रीबाबामहाराजांनी त्यांच्या कुठल्याही ग्रंथात त्यांचे चरित्र देण्यास मनाई केली होती. तसेच त्यांचे स्वत:चे वाङ्‌मय जरी सद्गुरुभक्तीने ओतप्रोत ओथंबलेले असले तरीही आपल्या सद्गुरुंबद्दलसुद्धा त्यांनी कधी वाच्यता केली नाही. तरीही बाबांचे शिष्य श्री. रंगनाथ स. उर्फ काका गोडबोले यांनी श्रीबाबांच्या दिव्यामृतधाराग्रंथात दिलेला परिचय पुढीलप्रमाणे आहे:
वर्धा जिल्हयातील आर्वी गावच्या एका धर्मशील व प्रतिष्ठित जोशी घराण्यात श्रीबाबांचा जन्म झाला. अत्यंत निस्पृह, सात्विक व निस्सीम दत्तभक्त प्रभाकरपंत हे श्रीबाबांचे वडील आर्वीला शिक्षक होते. श्रीबाबांच्या आध्यात्मिक जीवनास सुरुवात त्यांच्या वडिलांमुळेच झाली होती. श्रीबाबांच्या वडिलांनी त्यांच्याकडून अनेक आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास करून घेतला होता व त्यामुळे श्रीबाबांची आध्यात्मिक जडणघडण वडिलांद्वारे झाली होती. श्रीबाबांच्या वयाच्या पंधराव्या वर्षी प्रभाकरपंतांना देवाज्ञा झाली. नंतर केवळ दोनच वर्षांनी श्रीबाबांनी गृहत्याग केला व गावातील दत्तमंदीरात वास्तव्य केले. त्याकाळात ते भिक्षान्नावर रहात असत. त्यानंतर काही महिन्यातच श्रीबाबांनी आर्वी सोडले व भ्रमंती सुरु केली. नाशिक श्रीक्षेत्री श्रीशंकराचार्यांच्या मठात वास्तव्य केले. त्याकाळात गोदातीरी स्नानानिमित्त येणार्‍या विविध पंथाच्या व आखाड्याच्या अनेक साधुसंतांचे दर्शन श्रीबाबांस झाले. तेथून श्रीबाबा पंढरपूरास गेले. तेथील काही काळ वास्तव्यानंतर त्यांनी उत्तरेस नर्मदाकिनारी ओंकारेश्‍वर गाठले. तेथे श्रीबाबांची भेट श्रीसद्गुरुंशी झाली असे त्यांच्या साधनासंहिता ग्रंथावरून दिसते. त्यानंतर श्रीबाबांनी वृंदावन गाठले व तेथे सुमारे अडीच वर्षांचा दीर्घ काळ व्यतीत केला. वृंदावन-मथुरा येथील वास्तव्यानंतर श्रीबाबा गंगाकिनारी हृषीकेशला गेले. तेथे स्वर्गाश्रमासमोरील एका कुटीत वर्ष दीडवर्ष राहिले. त्यानंतर काही काळ उत्तरकाशीस राहिले. हरिद्वार, हृषिकेश, रुद्रप्रयाग, उत्तरकाशी, बद्रिनाथ, केदारनाथ अशी स्थाने पहात त्यानंतर श्रीबाबा नेपाळला गेले. तेथून पश्‍चिम बंगाल येथील श्रीरामकृष्ण परमहंसांचे दक्षिणेश्‍वर, कालीका माता या ठिकाणी निवास करून श्रीबाबा जगन्नाथपुरीस गेले. अशी अनेक तीर्थक्षेत्रे करीत नंतर श्रीबाबा महाराष्ट्रात परत आले. सप्टेंबर १९५४ साली साली श्रीअक्कलकोट स्वामींच्या वटवृक्ष मंदिरात श्रीबाबांचे प्रथम प्रवचन झाले आणि त्यांची प्रसिद्धी अक्कलकोटला झाली. पुढे त्यांच्या प्रवचनामुळे सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढे आदि भागातील मंडळी श्रीबाबांना जोशीमहाराज म्हणून ओळखू लागली. त्यानंतर श्रीबाबा श्रीक्षेत्र माचणूर येथील सिद्धेश्‍वर मंदीराच्या जवळील श्री  काशिनाथ महाराजांच्या समाधीजवळील पडक्या जुनाट ओवरीत रहात असत. नोव्हेंबर १९५५ च्या श्रीक्षेत्र माचणूर येथील चातुर्मास्यसमाप्ति महोत्सवाने त्यांची कीर्ति संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात पसरली, इतका तो महोत्सव भव्योदात्त झाला. १९५६ साली श्रीबाबांचा चातुर्मास श्रीक्षेत्र आळंदी येथे झाला. तेथेच वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी त्यांनी ‘साधनासंहिता’ हा आत्मानुभवाचा अमोल ग्रंथ लिहिला. १९५७ साली मुंबईतील लक्ष्मीनारायण बागेत साधनासप्ताह महोत्सवाने मुंबईतील लोकांना श्रीबाबांचा परिचय झाला. मुंबईत असताना दादर भागातील भिकोबा निवास येथील श्रीमती पुरोहित यांचे घरी श्रीबाबांचा निवास असे. सौ. पुरोहित काकूंस श्रीबाबांनी मातेप्रमाणे मानले होते व त्यांना ते काकू मॉं असे संबोधित असत. श्रीज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायावर श्रीबाबांनी दिव्यामृतधारा हा बृहत्‌ग्रंथ लिहिला. श्रीज्ञानदेवांना अभिप्रेत असलेले भक्ति, ज्ञान व योगाचे स्वानुभवान्त:स्फुर्त अपूर्व असे अंतरंग दर्शन या ग्रंथात आहे. साधकांना अत्यंत मार्गदर्शक असा हा ग्रंथ आहे. या ग्रंथाखेरीज श्रीबाबांचे बरेच अन्य वाङ्‌मय  आहे व त्याची सूची पुढे दिलेली आहे. देहत्याग करेपर्यंत श्रीबाबांचे वास्तव्य श्रीक्षेत्र माचणूर येथेच होते. मार्गशीर्ष पौर्णिमा शके १८९३ (दि. २ डिसेंबर १९७१) रोजी श्रीबाबांनी माचणूर येथे देहत्याग केला.

श्रीबाबांनी स्वत: लौकिकार्थाने शिष्यपरंपरा निर्माण केली नाही परंतु त्यांची श्रीगुरुदेवांची कल्पना फार भव्य होती. आपल्या प्रार्थनेत श्रीगुरुदेवांस नमन करताना श्रीबाबाम्हणतात,

॥ ॐ स्वानंदस्वरूपस्थिताय, परब्रह्मणे, सर्वात्मक गुरुदेवाय नमो नम: ॥
॥ जगन्मूर्तिने, निजात्मने, प्राणधारिणे, व्यक्ताव्यक्तस्थिताय गुरुदेवाय नमोऽस्तु ते ॥

श्रीबाबांची प्रवचने व वाङ्‌मय हे त्यांचे साधकांस मार्गदर्शन आहे. श्रीबाबा सांगत की एकवेळ मला विसरलात तरी हरकत नाही परंतु माचणूरला विसरू नका. येथे राहून साधकांनी उपासना करावी व त्यांना आवश्यक ते सर्व मार्गदर्शन, मग तो साधक कुठल्याही संप्रदायाचा असो, येथून मिळेल. हा सर्वच परिसर इतका निवांत व रमणीय आहे की इथे कुठेही बसल्यास साधकाची वृत्ति सहजीच अंतर्मुख होऊन जाते व भान कूटस्थाकडे केंद्रित होते.


श्रीबाबा महाराजांनी स्वत: लिहिलेले त्यांचे जीवन त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे आहे.

(श्री. बाबामहाराजांनी स्वत: लिहिलेले त्यांचे साधनाकालीन वर्णन)

सारेची देखिले वैभव सुखाचे | भोगिल्या आशेचे अनुभवे ॥१॥
उत्तम वाहनी हिंडलो स्वैर | भरविला दरबार वैभवाचा ॥२॥
वस्त्र मूल्यवान पायतळी माझ्या | वैभवाचा राजा अनुभविला ॥३॥
श्रीमंती नुरली जगामाजी कोठे | राजेपण दिठे मज पाहता ॥४॥
गज अश्वरथ झुलविले दारी | साक्ष हरिद्वारी अजुनी आहे ॥५॥
सेवकांचे तांडे चाले मागेपुढे | पाही चहुकडे वैभवासी ॥६॥
जेथे जावे तेथे मानची मिळे हो | विजय पताका फडके माझी ॥७॥
दरिद्रीही आम्ही सुखविले फार | नदीनाले डोंगर अनवाणी ॥८॥
उघड्या अंगाने फिरलो सर्वत्र | वैभवाला परत पाठविले ॥९॥
गिरीकंदराशी शिरलो भुयारी | घोर वनांतरी फिरलो आम्ही ॥१०॥
मैत्रीश्वापदांची प्रेमे आम्ही केली | एकांती देखिली माझी मूर्ती ॥११॥
भिक्षा दारोदार कराया हिंडलो | स्वानंदे भरलो माझ्या अंगे ॥१२॥
नाही भीती आम्हा सुख सामग्रीची | ठेव समाधानाची बापे दिली ॥१३॥
साता दिवसांचे पडले उपवास | तरी ना सायास घडले काही ॥१४॥
तीन दिवसांची शिळी भाकरी ती | आनंदा भरती आणावया ॥१५॥
लंगोटीही आम्हा नव्हती एकदा | हर्षानी सदा झाके अंग ॥१६॥
दारिद्रयाचा राजा वैभवाचा स्वामी | अहर्निश स्वामी भरलो ऐसा ॥१७॥
एकटा चाललो महापुरांतरी | शिवालयांतरी ओमकारीच्या ॥१८॥
रत्नांचा मुकुट महंत म्हणोनी | घातला वृंदावनी सार्‍या संती ॥१९॥
तैसेची सुखाने पादत्राण डोई | ठेविले मी पाही जनार्दन ॥२०॥
पायी तुडविला बर्फाचा डोंगर | धनाचे ढिगार ठायी ठायी ॥२१॥
ऐसी बादशाही भोगिली मी सुखे | आणिक ती दु:खे आनंदाने ॥२२॥
किती सांगू बापा हाल या देहाचे | बंध ते चोरीचे भोगले मी ॥२३॥
वेडा म्हणोनिया मार तो साहिला | कथा खांडव्याला झाली ऐसी ॥२४॥
वाहिले मी ओझे हमालाच्या परी | हीच मुंबापुरी साक्ष आहे ॥२५॥
भांडी घासायासी तीन दिस होतो | हॉटेली चहा तो ग्राहकांसी ॥२६॥
बंदरी राहिलो कोळसा फेकाया | धन्य वाटे माया मज सारी ॥२७॥
तैसाचि फिरलो राजभवनात | राहिलो सुखात तीन ठायी ॥२८॥
हजारो कोसांची पायपीट केली | बिहारी बंगाली मंत्र विद्ये ॥२९॥
परी आता झालो गोसावी मुळाचा | वीट वैभवाचा मज आला ॥३०॥
सोळा वरूषांचा निघालो आडरानी | पंढरी वाटेनी म्हणत विठ्ठल ॥३१॥
कुठेही पाहावे काहीही करावे | देई तेचि खावे भगवंत ॥३२॥
जरीचे अंबारी देह सजविला | गजावरी मिरवला नेपाळात ॥३३॥
परी गोड नाही वाटे माझ्या जीवा | म्हणोनिया देवापाशी आलो ॥३४॥
उणेपणा काही उरलाच नाही | सुखे सर्वव्यापी प्राप्त झाली ॥३५॥
चिंध्या पांघुरल्या उतार वस्त्र्यांच्या | विंध्याद्री गिरीच्या कडेलागी ॥३६॥
ऐसे बहु आहे चरित्र विटाळ | अज्ञानाचा मूळ ऐसा सारा ॥३७॥
हे काय सांगावे जगापुढे आम्ही | सदाचे निकामी वैभव हे ॥३८॥
याहुनी थोर हरिभक्त झाले | शरीर विटंबिले बहू कष्टे ॥३९॥
आम्ही काय केले व्हायचे ते झाले | हरिने ठेविले तैसे वागू ॥४०॥
सारेची जाणावे मृगजळी व्याप | वृथा हे विलाप आलापाचे ॥४१॥
बहू ऐसे आहे चरित्र आमुचे | परी ते वाणीचे वृथा शीण ॥४२॥
******


श्रीबाबांचे वाङ्‌मय

१.दिव्यामृतधारा – श्रीज्ञानेश्‍वरी बारावा अध्याय प्रगत दर्शन
२.साधना सहिंता
३.मनोपदेश
४.प्रार्थना प्रभात
५.प्रभात पाठ
६.गुरुगीता
७.हरिपाठ
८.आचार संहिता
९.स्तोत्रपंचक
१०.स्वधर्म चेतना
११.वैकुठ चतुर्दशी व मानव गीता
१२.गीता प्रबोध
१३.ब्रह्मनिनाद
१४.माचणूरचे हृद्गत
१५.साधक विहार सूत्रे
१६.देवाचिये द्वारी (ज्ञानदेव हरिपाठ विवरण)
१७.संतधर्म: जीवन दर्शन
१८. The Message of Machnoor
१९.ब्रह्मवाणी (ईशावास्योपदेशक भाष्य)
२०.नवविधा भक्तियोग
२१.ब्रह्मानंद लहरी (भजनांजली)
२२.श्रीदत्तोपासना
२३.पत्रोत्सव (पूज्य श्रीबाबांची विविध पत्रे)

ग्रंथसंपदा मिळण्याचे स्थळ 

प्रकाशक: मोक्षधाम प्रकाशन मंडळ
द्वारा श्रीनिवास केसकर
२०६, अमृतकुंभ सोसायटी, चितळे पथ, दादर मुंबई ४०००२८
दूरध्वनि: ०२२-२४२२३७३७


संतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र  – डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.


श्रीबाबामहाराजांच्या काही मुद्रा

image002

image003

image004

image005

image006

image048


श्रीक्षेत्र माचणूर
श्री बाबामहाराज आश्रमाचा परिसर

समोरील बाजू

image007

image008

रामवृक्ष मंदिर (आता वृक्ष अस्तित्त्वात नाही)

image009

श्रीबाबांनी स्थापन केलेला मारुति. उजव्या बाजूस दिसणार्‍या खोलीचे नूतनीकरण करून तिचे रुपांतर आता सुंदर साधना कुटीत केले गेले आहे.

image010

श्री बाबामहाराज समाधि मंदिर

image011

image012

श्रीबाबांनी स्थापन केलेला मारुति

image013

प्रार्थना सभागृह- येथे नित्य सायंकालीन प्रार्थना होते

image014

image015

image016

image017

प्राचीन बुरुज

image018

श्री गुरुदेव कुटीर

(परमहंस  काशिनाथ महाराज समाधि मंदिर) आत एक ओवरी ब त्यापुढे समाधि आहे. त्यावर शिवलिंग स्थापन केलेले आहे. प्रवेशद्वारापाशी खाली उतरण्यास पायर्‍या आहेत व भूमिगत तपस्या खोली आहे. ती सध्या वापरात नाही. या वास्तूचा जिर्णोद्धार करणे आहे.

image019

आतील ओवरी जेथे श्रीबाबा १९५४ मध्ये रहात असत. आता तेथे लाकडी मंदिर असून श्रीबाबांनी वृंदावनहून आणलेली श्रीकृष्ण भगवानांची मूर्ति आहे व अक्कलकोट स्वामींचे छायाचित्र आहे व यांची नित्यपूजा होते व सायंकालीन आरती केली जाते.

image020

आतील समाधिस्थान.
(ही छायाचित्रे २००९ सालातील आहेत आता वरील घुमटास व भिंतीस मोठे तडे गेले आहेत)

image021

image022

gk1

gk2

gk3

gk5

gk6

gk7

gk8

gk9

gk10

gk11

gk12

gk13

gk16

gk15

gk14

साधना कुटी (ध्यानमंदिर)

image023

आत श्रीबाबांची सुंदर छायाचित्रे व साधनासंहिता ग्रंथातील साधकोपयोगी मार्गदर्शक अवतरणे आहेत.  साधारण सात-आठ साधक साधनेस बसू शकतात अशी आसनव्यवस्था आहे.

image024

image025

image026

समाधि मंदिराच्या उजवीकडून दिसणारी चंद्रकोरीप्रमाणे वाहणारी भीमा नदी

image027

आश्रमातून प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिराकडे जाणारे द्वार

image028

आश्रमाच्या डावीकडे प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे.

image029

पायर्‍या उतरून पुढे प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिर आहे.

image030

प्राचीन सिद्धेश्‍वर मंदिर

image031

image032

image033

सिद्धेश्‍वर मंदिरातील श्रीगणपति

image034

सिद्धेश्‍वर मंदिरातील नंदी

image035

श्री सिद्धेश्‍वर महादेव

image036

ओवर्‍या व दीपमाळ

image037

image038

खोल्या

image039

नदीकडील भाग

image040

image041

मागून वर दिसणारी श्री गुरुदेव कुटीर वास्तू

image042

image043

image044

नदीपात्रातील छोटेसे जटाशंकर मंदिर

image045

सिद्धेश्‍वर मंदिर व श्रीबाबांच्या आश्रमाचा परिसर पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित आहे. या जिर्णोद्धार कार्यासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व खात्याची परवानगी संस्थेस मिळालेली आहे.

image046



॥  ॐ श्रीगुरुदेव ॥

नम्र निवेदन

विषय:  श्रीक्षेत्र माचणूर येथील ‘श्रीगुरुदेव कुटीर’ जिर्णोद्धार  व श्री संत बाबामहाराज आर्वीकर आश्रम विकास व सुशोभिकरण निधि

सप्रेम नमस्कार,

नाथपंथीय संत श्री बाबामहाराज आर्वीकर यांच्या श्रीक्षेत्र माचणूर आश्रमातील ‘श्री गुरुदेव कुटीर’ ही परमहंस श्री काशिनाथ महाराज समाधि मंदिर ही प्राचीन वास्तू अत्यंत जीर्ण झालेली असून भग्नावस्थेत आहे व त्याची तातडीने संपूर्णपणे नव्याने पुनर्बांधणी होणे अत्यावश्यक आहे. आश्रमाचा सर्व परिसर सिद्ध सारणा संघ या श्रीबाबांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या अखत्यारीत आहे.सिद्ध सारणा संघ संस्था महाराष्ट्र शासनाच्या धर्मादाय आयुक्त सोलापूर यांचेकडे नोंदणीकृत (नोंदणी क्रं. अ/६९८/सो/२५-२-१९७२) आहे. या जिर्णोद्धारासाठी आवश्यक असलेली पुरातत्त्व खात्याची परवानगीसुद्धा संस्थेद्वारे मिळविण्यात आलेली आहे. प्रथम मंदिराच्या मागील नदीच्या बाजूने खूप खालील पातळीपासून दगडी सरंक्षक भिंत (retaining wall) बांधावी लागेल  व त्यानंतरच मंदिराचे काम करता येईल. त्याकारणाने या कार्यासाठी खूप मोठा निधि आवश्यक आहे.

त्याचप्रमाणे संस्थेस आश्रमात येणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा व आश्रमाचे सुशोभिकरण करण्यासाठी काही निधि लागणार आहे.

या दोन्ही योजनांसाठी मिळून खूप मोठा निधि, अदमासे एक करोड रुपये, इतका आवश्यक आहे.  मदत रोख, धनादेश वा Online, NEFT/RTGS द्वारे करता येईल.

तरी या कार्यासाठी आपण सर्वांनी सढळ हस्ते मदत करावी व जमल्यास आपापल्या परिचितांद्वारेसुद्धा निधि उपलब्ध करून द्यावा जेणेकरून हे कार्य त्वरित करता येईल. मदत रोख, धनादेश याद्वारे करता येईल. संस्थेच्या बँक खात्याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

Account name: SIDDHA SARANA SANGH
Account Number: 11558469498
IFSC Code: SBIN0004746
Bank: State Bank of India
Branch: GHODESHWAR
District: SOLAPUR
State: MAHARASHTRA

आपल्या अमूल्य वेळेबद्दल धन्यवाद!

आपणाकडून या पवित्र कार्यास भरघोस अर्थसहाय्य मिळावे अशी नम्र विनंतिआहे.

— अध्यक्ष
अध्यक्ष/मुख्य विश्वस्त
(सिद्ध सारणा संघ)
श्रीक्षेत्र माचणूर, ता. मंगळवेढा, जि. सोलापूर ४१३३०५

मुंबई संपर्क: श्रीनिवास केसकर, मोबाईल क्रं. ९८६९४२३७३७  दूरध्वनी क्रं. ०२२-२४२२३७३७

अधिक माहितीसाठी ई-मेल संपर्क : gurudevkuteer@gmail.com

सूचना: आपली देणगी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावर कृपया आपले नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व देणगीची रक्कम श्री केसकर यांस कळवावी व ही माहिती वरील इमेल वर पाठवावी म्हणजे आपणांस पावती पाठविता येईल व संस्थेस या कार्याची माहिती देता येईल.


PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


संतधर्माचा दीपस्तंभ – प. पू. श्रीबाबामहाराज आर्वीकर यांचे चरित्र  – डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *