माता कुंडलिनी
जय अंबे कुलकुंडलिनी शक्ति, मूलाधारी तुझी वस्ती
विश्व उत्पत्ति स्थिति लय कर्ती, योगीजनांची माता चित्ती
सर्परुपी ही तुझी आकृति, रक्तोत्पल असे तुझी कांति
अखंड निद्रिस्त राहे भगवति, गुरुकृपेने उर्ध्व उठे ती
उठता उर्ध्व भेदी चक्रां, हळुहळु उमलवि सार्या त्या कमळा
वर्ण नाद ते वेगवेगळे
मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत
आज्ञा भेदुनि सहस्त्रारी धक्का, धक्क्याने सत्रावी उलथवी
चंद्रामृते त्या देहा पोसवी, पिंड ब्रह्मांड ऐक्य घडवी
जीवा शिवाचे मीलन घडवी, ब्रह्मानंदी अखंड बुडवी
नाथाघरची उलटी खूण ही, गुरुकृपांकित सहजी अनुभवी
द्वैताच्या त्या चालता वाटे, अद्वैतात सहजी पोहोचवी, अद्वैतात सहजी पोहोचवी!
ब्रह्मरंध्रातुनि प्रवेश करुनि शक्ति मूलाधारी निजली
देहभावात रमणाऱ्या जीवा मग भूल तियेची पडली
विषयानंदी रमता रमता अधोमुखी ती घसरली
आत्मरुपापासुुनि जीवाला अत्यंत ती दुरावली
करुणावंत सद्गुरूला दया जीवाची आली
कृपाकटाक्षे क्षणात उर्ध्वमुखी तिज केली
सर्पाकार सरपटत उर्ध्व चढू ती लागली
चक्रभेद करीत हळुहळु ब्रह्मरंध्री पोहोचली
नाभीपासोेनि ब्रह्मरंध्रात सोऽहंरुपे खेळली
ब्रह्मरंध्री ते भान शिवाचे, एरव्ही जीवभावा ती रमली
नादप्रकाश दर्शनि श्रवणी जीवा अत्यंत भावली
साधनी रमता साधक मग ही खेळासम त्या गमली
नाथाघरची उलटी खूण ही कृष्णदासे गुरुकृपे जाणिली
ध्याना बैसता आले मना आजि म्हणुनि अशी ही वर्णिली!
भगवंत निराकार | स्थानी वसे सहस्त्रार
भेटण्यासी देहात | सुषुम्नेचे महाद्वार
गुरुकृपे उघडे ते | प्रवासाचेराजद्वार
मूलाधार सहस्त्रार | श्वास उठे वारंवार
ध्यानी तो घेताचि | एकाग्रे एकवार
साक्षित्व घडे त्याचे | सहजीच वारंवार
उलटवोनि हुंकार | खेचिताचि सकार
सरसरसर चढे वायू | ब्रह्मरंध्री सहस्त्रार
निरालंब निराधार | भान तेथ महदाकार
स्थल काल ना विकार | नुरे तेथ अन्यविचार
कृष्णदास तेचि स्थळी | जाहला तदाकार!
Leave a Reply