अमृतधारेतील अमृत-तरंग

(पावसनिवासी परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘अमृतधारा’ भावविलासावरील संपादन)

अमृताचिया सागरीं | जे लाभे सामर्थ्याची थोरी | ते चि दे अमृत लहरी | चुळी घेतलेया ॥ (ज्ञा.अ. १२/२६)

श्रीस्वामींच्या अमृतमय अंत:करणरूपी परमगहन संतृप्त सागरात भावांदोलन झाल्यावर पृष्ठभागावर जे दृश्य स्वरूपात तरंग उमटले व त्यामुळे जे अमृतबिन्दू ओसंडले त्यांनी धारण केलेले शब्द वा काव्य स्वरूप म्हणजे या अमृतधारा होत. या अमृतधारेचा बारकाईने अभ्यास केला तर ‘मुमुक्षु’ ते ‘मुक्त’ या संपूर्ण साधकीय जीवनप्रवासाचे वर्णन त्यांत आढळेल. त्या अनुषंगाने अमृतधारेतील एकूण १६२ साक्यांपैकी या केवळ ८४ साक्या मूळ क्रम बदलून गुंफल्या आहेत. दुर्बोध भाषेतील कुठलेही संदर्भ वा पाल्हाळ न लावता परमार्थसाधनेतील साररूप चिंतन या साकीसूत्रांत आढळते. अमृतधारेतील साक्यांवर आपल्या मतीने भाष्य करण्यापेक्षा वाचक-साधकाच्या भावानुसार,त्याच्या साधनेतील अवस्थेनुसार त्याची गहनता, महत्त्व साधकांस जाणवेल आणि त्याच्या अंतस्थास स्पर्शांन्दोलित करून पुढील मार्गक्रमणास दिशा अन् बळ देईल व अंती अमृतत्त्वाचा अनुभव देईल.

अमृत हे स्वयंसिद्ध आहे,ते कुठलेही मिश्रणाने तयार करता येत नाही तसेच त्याच्या प्रत्येक बिन्दूत तेच संपूर्ण सामर्थ्य बाळगून असते. अमृतधारेच्या उगमात, धारेत व त्या धारेचा शेवटचा बिन्दू हे प्रत्येक शुद्ध अमृतच नव्हे काय!

श्रीसद्गुरु कृपांकितांस याच्या भावपूर्ण मननात अमृत-तरंगांवर क्रीडा केल्याचा आनंद खचितच मिळेल!

— सुदेश (१६ एप्रिल २०१६)

असतो मा सद्गमय | तमसो मा ज्योतिर्गमय | मृत्योर्माऽमृतं गमय |

‘असतो मा सद्गमय’ उपनिषद्वाणी दर्शवि ऋषिची
निज-उन्नतिची स्वाभाविक जी वृत्ति जींवमात्राची ॥

‘सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म’ प्रत्यय ऋषिवर्यांचा
उपनिषद्मिषें करि दुंदुभिरव शाश्वत आत्मसुखाचा ॥

निजानन्दानिर्भरा मुनीची वृत्ति साक्ष दे अजुनी
जरी उपनिषत्कालिं रंगली ‘हाऽऽउ हाऽऽउ’ म्हणुनी॥

ॐ तत् सत् साम्राज्य आपुलें तीन पाउलें प्रांत
क्षणींतयांनी परी व्यापिले लोक-त्रय-निभ्रांत ॥

पुण्य-पत्तनीं श्रीसद्गुरूनीं पथ-दर्शी होऊन
‘ॐ तत्त्वं सोऽहं स:’ श्रुतिची दाखविली मज खूण॥

आदिनाथ मत्स्येंद्र गोरख श्रीगहिनी निवृत्ति
ज्ञानदेव देवचूडामणी गुण्डाख्यादि महंतीं॥

अनुभवली सद्विद्या ही गुरू-परंपरा सांगितली
शतानुशतक प्रत्यक्ष जशी पुढतीं चालतआली॥

म्हणति आणि ते ‘कोण कुणाचा करी येथ उद्धार
स्वयें कष्टल्यावीण का होतो कोठें आत्मोद्धार’॥

त्याच खुणेनें तन्मयतेनें आक्रमितां सत्पंथ
प्रमाण अंत:करण, तत्त्वतां लागे प्रांत अनन्त!॥

पाहिं सर्वथा श्रद्धाहीना नाहीं येथें सोय
काय चंद्रिका बका दीपिका वा जात्यंधा होय!॥

ध्येय असावें सुदूर कीं जें कधीं न हातीं यावें
जीवेंभावें मात्र तयाच्या प्रकाशांत चालावें॥

प्रकाशांत चालतां चालतां चालणे चि विसरावें
भावातीत स्वभावसहज ध्येयीं तन्मय व्हावें॥

तन्मय होतां कुठली बोली ती द्वैताद्वैताची
स्वानुभवाविण कोण जाणता स्व-संवेद्यता त्याची॥

आठव नाठव नुरे स्वभावें स्फुरे एकलें एक
किंबहुना ही पुरे वर्णना स्व-स्थ होईं नावेक!॥

प्रसन्नमन सहजासन सु-वसन अर्धोन्मीलित नेत्र
स्व-स्थ अन्तरीं तत्पद-चिंतन कोण करी दिन-रात्र॥

मायिक नश्वर विषयसुखास्तव माजविले बडिवारें
आत्म-देव अव्हेरुनि आम्ही देहाचे देव्हारे॥

‘न जातु काम: शाम्यति कामानामुपभोगेन’ इति
नृपति-ययाति-प्रचीत कथिते दशसहस्त्रवर्षान्तीं॥

काम: क्रोधस्तथा लोभ हे नरकद्वार त्रि-विध
सार्थ वचन गीतेत सांगतो पार्थसखा गोविंद॥

असो, सकळ जन तो काळाच्या पडतो भक्ष्य-स्थानीं
मात्र एकला अमर जाहला जगांत आत्म-ज्ञानी!॥

ऐक मात ही सदैव पाहीं मी दिक्कालातीत
आज ना उद्यां जरि नश्‍वर हा देह मिळे मातींत ॥

विनाश म्हणजे पुनर्जन्म अन् जन्मासंगें नाश
असा चक्रनेमिक्रम चालें जोंवरि माया-पाश ॥

मृत्यु पावणें पुन: जन्मणे हा मायेस्तव भास
असें व्यापुनी अणुअणूंतुनी मींच अखिल जगतास ॥

स्वानुभवाविण वेदान्ताची पोपटपंची वायां
स्वप्नी अमृता पिउनि कुणाची अमर जाहली काया॥

परोपदेशे पांडित्याचा प्रकर्ष बहु दाखविती
स्वयें आचरूं जातां बसते धारण पांचावरतीं॥

वेदान्ताच्या थोतांडाची पाठीवरतीं झूल
घालुनी तदा होतों सजलों तुंदिल नंदीबैल॥

गळ्यांत खुळखुळ वाजत होते विषयांचे घुंगूर
पिटुनि ढोलकी ‘हलिव मुंडकी’ म्हणे मीपणा थोर॥

ढुम् ढुम् ढुम् शब्दाच्या नादें ढोंग-ढोलकीसंगे
सांगे तैशीं टाकित होतों पाउलें पुढें-मागें॥

ढोल फोडिला झूल-घुंगुरां दिलें झुगारूनि दूर
‘सोहं-भावें’ उडी घेतली अनन्तांत चौखूर॥

सदैव मातें जागवितें निज-जीवन तत्त्वज्ञान
न कां स्वभावें त्यास्तव व्हावें सर्वस्वाचें दान ॥

हवें कराया जीवेंभावें सर्वस्वाचें दान
तन-मन-धन-गृह-सुत-दारादिक आणिक पंच-प्राण॥

उघडा नेत्रे पहा चरित्रे इतिहासहि तो वाचा
संभवला का विनाश कोणा प्रामाणिक जीवाचा॥

कोड जिवाचें परमात्म्याचें नित्य दिसावे पाय
अनन्य होणें ह्याविण नेणें भलता सुलभ उपाय॥

अनन्यभावें कड्यावरुनी जैं उडी घेतली खालीं
भक्त-वत्सला माउली मला फुलासारखी झेली ॥

सद्भक्ताची सदा वाहणें भगवंतानें चिंता
तो चि तयाचा पथ-दर्शि तथा रक्षिता समुद्धर्ता॥

असे सहज परी सोऽहंभावें करीं सतत अभ्यास
हीच साधना जोंवरी न तो झाला मोह-निरास॥

यावत् सावध तावत् सोऽहं-स्मरण अखंडित जाण
अढळ भाव सर्वथा असो मग जावो राहो प्राण!॥

अखंड अभ्यासाविण साध्य न ती समता चित्ताची
असे सुकर का समशेरीच्या कसरत धारेवरची॥

समता सुटतां श्रद्धापूर्वक सत्वर करूणा
भाक जगन्माउली एकली भली देईल तुला हाक॥

राखील जवें तो करुणेचा कानीं पडतां बोल
येउनी स्वये ती सुनिश्चयें तव चित्ताचा तोल॥

सदा अबाधित सिद्धान्त असा असो पुण्य वा पाप
पुरेपूर तें पदरीं पडतें कर्म-फलाचें माप॥

यदृच्छेविना हालत नाही वृक्षाचेंही पान
उगाच कां वाहसी मानवा वाउगाच अभिमान ॥

परिस्थितीशीं झुंज खेळतां खर्चीं पडले प्राण
तरी न तुजविण अन्य स्थलिं मन-बुद्धी ठेवूं गहाण!॥

सदैव साक्षात् तीं जगदम्बा असतां मज सांवरिती
होत अवनति तरी मागुतीं निश्चित येइन वरतीं॥

धांव घेइं तत्क्षणीं ठेवुनी भाव पावनीं चरणीं
कां विलंब लावील अंबिका भाविकासि उद्धरणीं ॥

वार चोरटे करूं पाहती षड्रिपु वारंवार
परी तीक्ष्णतर माझ्या सोऽहं-तलवारीची धार॥

सावधान मन करि रात्रं-दिन सोऽहं-मंत्रजपातें
अवन करी तें अखंड फिरतें तलवारीचें पातें॥

सावधमनसा अखंड परिसा हें सोऽहं-संगीत
जागृतचित्तें सुखेनैव जा गान-सुधा सेवीत॥

स्वरूपानुसंधान सर्वदा धर्म जगाचा एक
हवा कळाया तरी पहावा नित्यानित्य-विवेक॥

कोमल अन्त:करण आमुचें जणूं फुलाहुनि फूल
परि वज्राहुनि कठिण लागतां मोहाची चाहूल ॥

निज-मातेसारिखी लेखितों सदा पर-स्त्री देखा
असो कुणी सुंदरा अप्सरा किंवा ते शूर्पणखा ॥

‘मी मी’ म्हणसी परी जाणसी काय खरा ‘मी’ कोण
असें ‘काय’ मी ‘मन’ ‘बुद्धी’ वा ‘प्राण’? पहा निरखोन॥

प्राण बुद्धि मन काया माझीं परि मी त्यांचा नाहीं
तींहि नव्हती माझीं कैंसे लीला-कौतुक पाहीं!॥

मी-माझे भ्रांतीचे ओझें उतर खालतीं आधीं
तरिच तत्वतां क्षणांत हाता येते सहज-समाधि॥

सहज-समाधि संतत साधीं न लगे साधन अन्य
सुटुनी आधि-व्याधि-उपाधि होतें जीवन धन्य॥

भलें दिलें निज-पद जगदंबे मज अक्षय अविभाज्य
मी आत्म-बलें आज जिंकिलें लोकत्रय-साम्राज्य!॥

निधान संन्निध परि घोर तमीं इतस्तत: भ्रमलों मी
ज्ञान-किरण-दर्शनें अतां सत्प्रकाश अन्तर्यामीं॥

हा तोंअनुभव मायोद्भव सुख-दु:ख-दन्द्व अनित्य
मात्र एकला सर्वव्यापी आत्मा शाश्वत सत्य॥

सुमन-तति द्रुम-लता डोलती ध्याती सोऽहं सोऽहम्
मी हि तयांसंगतीं नाचतों गातों सोऽहं सोऽहम्॥

संतत संगे सोऽहं जिवलग सांगे मज गुज गोष्टी
चिर-सुखद असा सखा न दुसरा जरी धुंडिली सृष्टी ॥

औटपीठीं करि चम्‌चम् सोऽहं-तारा तेज:पुंज
तेजें सहजें जाण लोपला माया-ममता-फ़ुंज॥

प्रसन्न होतां माता हाता चढलें सोऽहं-सार
हवा कशाला मला अतां हा वृथा शास्त्र-संभार!॥

अन्तरांतुनी सहज-ध्वनि तो निघतो सोऽहं-सोऽहम्
विनाश्रवण ऐकतां तोषतो माझा आत्माराम॥

राम हमारा जप करता है सोऽहं सोऽहं ॐ
पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचा होम!॥

विनावैखरी होत अंतरी सोऽहं शब्दोच्चार
सहज-भजन-अभ्यसन जंव नसे अद्वैती व्यापार॥

गूढ न कांहीं येथ सर्वथा उघड अर्थ वाक्याचा
जाण चराचरिं भरुनि राहिलों मीच एकला साचा॥

संकल्पास्तव तो संभवतो भूतांचा आभास
नि:संकल्पीं मीच मी स्वयें सांगे विश्व-निवास॥

चित्-शक्तीचा गभीर सागर जगत्-रूप हा फेन
मी स्वानुभवें सत्य नित्य ह्या तत्वज्ञानिं जगेन॥

आला अनुभव देव तूं तसा भक्त हि तूं स्वयमेव
लीला-लाघव हें अपूर्व तव पाहे तो चि स-दैव॥

मी-तूंपण अस्तवलें आलें साधनेस पूर्णत्व
कणकणांत कोंदलें एकलें एक नित्य सत्तत्त्व॥

आत्मतृप्त जीं ऐशा रीती होती निस्त्रैगुण्य
असोत नारी-नर अक्षरश: संसारी तीं धन्य॥

सुहास्य-वदन प्रसन्नदर्शन निर्मल अन्
त:करण मित मधु भाषण शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण ॥

एवं षड्‌विध सज्जन-लक्षण अंगिं बाणतां पूर्ण
होतो वश परमेश वाहतों जगदंबेची आण ॥

सदैव मार्गीं चालत असतां मजला देतो हात
उठतां बसतां उभा पाठीशीं त्रैलोक्याचा नाथ॥

अखंड-जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा
हवा कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा ॥

वृत्ति अचुंबित जघीं रंगली जगदंबेच्या नामीं
पुण्य-पाप-संबंध संपुनी नित्य पुनीत तदा मी॥

नसानसांतुनि तें संतांचे नाचे अस्सल रक्त
जाण साजणी आजपासुनि आम्ही जीवन्मुक्त॥

मजसी ह्या जगद्-रंगभूमीवर जसें दिलें त्वां सोंग
करीन संपादणी तशी मी राहुनिया नि:संग॥

चाड भुक्तिची नाहिं जीवाला मुक्तिचें हि ना कोड
जगन्माउली दे अखंड तव भक्ति-सुखाची जोड॥

निढळावरतीं नीट लाउनि आत्म-स्मृतिची तीट
भक्ति-सुखाचा मुखीं घालिते साखरघांस अवीट॥

अगाध अनुपम अगम्य महिमा माझ्या जगदंबेचा
अनुभवितां मति-गति हि कुंठिता काय पाड शब्दांचा॥

माते, त्वद्गुण-गानीं वाणी श्रुती कीर्तन-श्रवणीं
रूपीं लोचन सहितबुद्धिमन चित्त गुंतलें ध्यानीं॥

जगीं जन्मुनि जगदंबेचे दास होउनी राहूं
विश्व-बांधवासहित सर्वदा भक्ति-सुधा-रस सेवूं॥

स्थैर्य प्रज्ञेप्रति त्वत्कृपें पूर्ण तपस्या झाली
त्वदाज्ञेस अनुसरून आतां ठेवुं लेखनी खालीं ॥

जगन्माउली, आज्ञा होतां, ती पुनरपिं उचलूंच |
भक्त होउनी त्वद्-यशोध्वजा, जगीं उभारूं उंच! ॥

*****

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

(PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा)


संतसाहित्य म्हणजे प्रतिभेच्या स्त्रोतातून प्रकट झालेला स्वानुभव!  त्याच्या वाचनाचे अंतिम पर्यवसान वाचकांस अनुभूति होण्यात जर झाले तर ते साहित्य वा ते वाचन-मनन यशस्वी ठरेल अन् तशी ताकद त्यात निश्चितच असते.

अनुभव —> भावावस्था + प्रतिभा —> शब्द वा काव्य —> वाचन + मनन —> भावनिर्मिती —> अनुभव

म्हणजेच भावाची अभिव्यक्ति शब्दरूपाने काव्यात होते आणि त्यामुळे ते काव्य त्या भावविश्वात प्रवेश करण्याचे द्वार आहे. संजीवनी गाथेत श्रीस्वामीजी एका अभंगात म्हणतात “भाव-बळे आम्हां हरिचें दर्शन”.  भाव हे भक्ताचे बळ आहे किंवा भाव हा इतका बलशाली आहे की तो हरीचे दर्शन करून देऊ शकतो.

याच अनुषंगाने आपण श्रीस्वामीजींच्या “अमृतधारा” या स्फुट काव्यरचनेचा भावाधारे मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून आपण श्रीस्वामीजींच्या त्या काळातील भावावास्थेशी अल्पसे तरी तादात्म्य पावू शकू व त्या अनुभवाचा अल्पांश तरी प्राप्त करू शकू.

श्रीस्वामींसारखे मितभाषी संत जेव्हा लिहितात तेव्हा त्याचा अर्थगाभा अत्यंत सखोल व विशाल असतो.  अमृतधारेचे वैशिष्ट्य म्हणजे

१. जीवनमरणाच्या उंबरठ्यावर असताना काव्यस्फूर्ति होणे अशी उदाहरणे विरळाच असावीत.

२. स्वत:च्या प्रकृती अस्वास्थ्याचे वर्णन जरी अमृतधारेत असले तरीही त्याबद्दल तक्रार मात्र नाही. यातून शरणागति प्रतित होते.

अमृतधारेच्या सुरवातीच्या काही साक्या वाचल्या तर त्या प्रत्येकात स्वानुभव व अनुभव हा शब्द आलेला दिसतो व स्वानुभव-सुधा म्हणजे स्वानुभवाचे अमृत शिंपून भूतलावरील सर्वांना स्वानुभवी बनवीन अशी श्रीस्वामीजींची सदिच्छा त्यांत दिसून येते.

श्रीस्वामीजींनी तरुणपणी जरी गीता, उपनिषदे, ज्ञानेश्वरी व इतर अनेक संत साहित्याचा सखोल अभ्यास केलेला होता तरीही अमृतधारा पाहिल्यास या काळात केवळ सोहम् साधनेखेरीज दुसरा आधार त्यांनी घेतलेला नाही हे दिसून येते व केवळ तोच त्यांना आत्मदर्शन करवून देण्यास कारणीभूत झाला हेसुद्धा पुढील साक्यांत सिद्ध होते. पुस्तकी विद्या वा पोपटपंची दूर सारून त्या अनंताच्या प्रांतात श्रीस्वामीजींनी सोहम् साधनेद्वारा अक्षरश: उडी घेतली. शेवटच्या साक्यात अद्वैत तत्वज्ञानाच्या सर्वोच्च अनुभूतीचे वर्णन आढळते, ज्यामुळे श्रीस्वामीजी आत्मतृप्त झाले व पुढील काळात ते आपल्या पत्रव्यवहारात “आत्मतृप्त स्वरूपानंद” असे लिहित असत. यावरून अध्यात्मसाधनेत गुरुप्रणित साधनेचे महत्त्व विशद होते. पण हे लक्षात न घेता सर्वसाधारणपणे बहुतांश साधक आध्यात्मिक वाचनाच्याच जास्त आहारी जातात व त्यातच साधनेपेक्षा जास्त काळ व्यतीत करतात व त्यामुळे अनुभूतीस मुकतात असे दिसून येते. दुसरे असे की प्रकृती अस्वास्थ्य असताना पुस्तकी विद्येचा विशेष आठव होत नाही वा ती विशेष उपयोगीसुद्धा पडत नाही तर अंतरंग साधनाच सहायक ठरते असे कळून येईल.

अमृतधारेतील साधकांस उपयुक्त ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:-  ध्येयनिश्चिती व ध्येयवेड, जीवनाची स्पष्ट संकल्पना, निश्चय वा करारीपणा, वैराग्य, अलिप्तता, अखंड साधनाभ्यासाचे महत्व, ईश्वरनिर्भरता, शरणागति, स्वानुभूति

श्रीस्वामीजीच्या संजीवनी गाथेतील अभंगांचा अभ्यास करताना शेवटचा चरण आधी वाचला तर त्यांना काय म्हणायचे आहे ते स्पष्टपणे कळते व मग सुरवातीपासूनचे चरण वाचल्यावर ते त्या पुष्ट्यर्थ आहेत हे ध्यानात येते. अमृतधारेतसुद्धा याप्रमाणे शेवटच्या काही साक्या वाचल्या तर हे लागू पडते असे ध्यानात येईल.

श्रीस्वामीजीनी भगवतीची उपासना केलेली नसताना अमृतधारेत असलेले जगदंबा, जगन्माता, माताजी असे उल्लेख मात्र प्रज्ञ अभ्यासकांस निश्चितच विचारप्रवृत्त करतील!!

श्रीस्वामीजी अन् जगन्माता जगदंबा:-

श्री बाबूराव पंचविशे (मास्तर), मालाड – मुंबई, ज्यांनी श्री गोंदवलेकर महाराज यांचे शिष्य पूज्य बाबा बेलसरे यांची श्रीज्ञानेश्वरीवरील निरुपणे लिहून काढली व आज ती आपणांस पुस्तकरूपाने उपलब्ध होत आहेत, ते पंचविशे मास्तर, श्रीस्वामीजींचे अनुग्रहित शिष्य आहेत. चित्रकार कै. अनंत सालकर व मास्तर हे घनिष्ठ मित्र.  सालकर हे श्रीस्वामींचे अनुग्रहित त्यामुळे त्यांना वाटायचे की आपल्या परममित्राने म्हणजेच बाबूरावांनीसुद्धा श्रीस्वामीजींचा अनुग्रह घ्यावा. त्यानुसार मास्तरांना घेऊन ते पावसला गेले. कै. मधुभाऊ पटवर्धन व सालकर हे पण मित्र. मधुभाऊसुद्धा सोबत होते. मधुभाऊंनी  श्रीस्वामीजींस विनंती केली की आपण बाबुरावांना अनुग्रह देऊन आपले कृपांकित करावे.

त्यानुसार मास्तर श्रीस्वामीजींच्या खोलीत दर्शनास गेले असता श्रीस्वामीजींनी मास्तरांना श्रीरामकृष्ण परमहंसांचे एक पुस्तक हाती दिले व कुठलेही पान काढून वाचा असे सांगितले. ते उघडल्यावर अध्याय ४२(?) मधील राखाल, राम, केदार, तारक, एम. इत्यादी ठाकुरांच्या दर्शनाला जातात त्या प्रसंगाचे वर्णन आले. केदार ठाकुरांची कृपा प्राप्त होण्यासाठी ठाकुरांचे अंगठे धरून बसत असे. ठाकूर आईला (कालीमातेला) सांगत आहेत की याचे (केदारचे) पैशावरील प्रेम नष्ट होत नाही, बाईवरील प्रेम नष्ट होत नाही, आई याला माझ्यापासून दूर कर.  मास्तर तर अनुग्रहाच्या इच्छेने श्रीस्वामीजींपाशी आले होते आणि आली तर ही अशी गोष्ट!  मास्तरांच्या डोळ्यातून घळघळा अश्रूधारा वाहू लागल्या. तितक्यात श्रीस्वामीजी म्हणाले, “असू दे, असू दे, या आपल्या त्या काळच्या  आठवणी”.  दोनदा हेच म्हणाले.  त्यानंतर आपणास दुपारी बोलावितो असे सांगून निरोप दिला. दुपारी मग मास्तरांना श्रीस्वामीजींचा अनुग्रह प्राप्त झाला.

या घटनेमुळे मास्तराचे असे मत आहे की गेल्या जन्मी श्रीस्वामीजी व आपण स्वत:  बंगालमध्ये होतो व श्रीस्वामीजींची जगन्मातेची उपासना असावी.  तोच धागा पुढे आल्यामुळे जगन्मातेचा उल्ल्लेख अमृतधारेत आला असावा. तसेच श्री स्वामीजींच्या पत्रव्यवहारात  सुरवातीस “जय माताजी” असे लिहिलेले असे.

जगन्माता म्हणजे ब्रह्म’ असाही उल्लेख श्रीठाकुरांच्या मुखातून आलेला आहे.

याबाबत कै. श्री. म.  दा.  भट यांनी श्रीस्वामीजींस एकदा प्रश्न केला होता की, स्वामीजी आपण पत्राच्या सुरवातीस “जय माताजी” असे कां लिहिता?.
तेव्हा श्री स्वामीजींनी उत्तर दिले की भिलवडीजवळील भुवनेश्वरी देवी ही श्रीदत्तगुरुंची (श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची) देवी  होय. पण आणखी काही खुलासा केला नाही.
सर्वांस माहित आहेच की श्री दत्तगुरुंच्या आशीर्वादानेच श्रीस्वामींचा जन्म झालेला आहे!

— सुदेश (१२ एप्रिल २०१६)

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *