श्री दादा गावंड
दादाजींचा संवाद येई अंतरातून,
मनाविरहित अशा शुद्ध जाणिवेतून
परमेशचि बोले त्यांच्या मुखातून,
बोल उमटती ते प्रतिभेच्या स्त्रोतातून
साध्या सुंदर सुलभ रसाळ भाषेतून,
नाश करा मनाचा सार उपदेशातून
अंतरीच वसे परमेश पाहा डोकावून,
कालातीत शाश्वत अवस्था घ्या रे सर्व जाणून
तेचि विश्व नित्यनूतन दिसेल तुम्हालागून,
अंतरीच स्वानंदाचा अनुभव येईल फुलुन
करा करा अभ्यास ही खूण ओळखून,
कृष्णदास म्हणे जीवन सार्थक परमेश्वरी कृपेतून
परमपूज्य दादाजी,
शिरसाष्टांग नमस्कार वि. वि.
दिनांक ९ मे २०१० रोजी ग्रंथ प्रकाशनाच्या निमित्ताने परत आपल्या दर्शनाचा सुयोग आला. अतिशय आनंद झाला.
आयुष्यात विविध आध्यात्मिक ग्रथांचे वाचन झाले परंतु मला सांगावेसे वाटते की ‘Towards The Unknown’ आणि ‘Beyond The Mind’ या पुस्तकांनी ज्या रितीने मनाच्या व्यवहारावर प्रकाश टाकला आहे तसे प्रभावशाली वाड़मय माझ्या वाचनात आलेले नाही. आत्मस्वरूप जाणू इच्छिणार्या प्रत्येक साधकाला या खट्याळ व बलवान मनापासून मुक्ती देण्यास आणि खर्या अर्थाने त्याची आध्यात्मिक वाटचाल सुरू होण्याला ही पुस्तके अत्यंत सहाय्यक आहेत याबद्दल शंकाच नाही. आपली माहिती व पुस्तके मला यापूर्वीच मिळावयास पाहिजे होती असे मला प्रकर्षाने वाटते. असो.
ग्रंथ प्रकाशनाचा कार्येक्रमअत्यंत सुंदर झाला. सर्व वक्ते अतिशय मूद्देसूद, रसाळ व भावपूर्ण बोलले. सर्व आयोजकांना मनापासून धन्यवाद!
श्री. राजू सावंत यांच्याशी दि. १४ रोजी रात्री फोनवर बोलणे झाले. त्यानंतर अचानक उत्स्फुर्तपणे व्यक्त झालेल्या भावना पुढीलप्रमाणे:
का निरोप घेता दादाजी, का ऐसे मना आले आजी
दर्शन भेटी जमलो असता, होतो आनंद डोहामाजी
निरोपाचे शब्द ऐकता, आघात झाला ह्रदयामाजी
अवचित तरणी फुटता होय, जैसे अथांग सागरामाजी
मार्गदर्शक तुम्ही न भेटी जाणुनि, झालो हतबल मनामाजी
असीमत्याग अन् वैराग्याचा, आदर्श आपुला जगामाजी
साधनेच्या खडतरतेचा, दीपस्तंभ भवसागरामाजी
निजचरित अन् संवाद होय, पथदर्शक आम्हा आजी
द्या आशीर्वाद आज आपुला, निजध्येय आम्हा गाठण्या जी
आत्मरुप तेे जाणुनि घेण्या, जीवन कृतार्थतेचा अनुभव सहजी
कृष्णदास ह्रदयातुनि प्रार्थितो, द्या आशीर्वाद आम्हा दादाजी,
द्या आशीर्वाद आम्हा दादाजी
तेथे जमलेल्या प्रत्येकाच्या मनात उमटलेल्या भावना नक्कीच यापेक्षा वेगळ्या नसणार याची मला खात्री आहे.
या मार्गावर वाटचाल करताना आपला कृपाशिर्वाद अखंड सोबत असावा ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना!
आपला कृपाभिलाषि
–कृष्णदास (१९ मे २०१०)
Leave a Reply