स्वरूपसुकन्या पू. यमुताई कुलकर्णी, कोल्हापूर

Yamutai


‘संतमेळी’ भरतसे भक्तिप्रेमाचा मेळा
वसतसे तेथे यमुताई प्रेमळा
अंतरी अति निर्मळा, भाव असे सोज्वळा
मनी भक्तिचा जिव्हाळा, अंतरी प्रेमाचा कळवळा
सुकन्या जी स्वरूपाची, प्रतिती सोऽहं बोधाची
लुटविण्या पेठ आत्मप्रचितीची, संतमेळी वसतसे
आर्तासी योग्य मार्गदर्शन, त्वरितचि शंका समाधान
प्रेमभाव खूण देवोन, भक्तिपंथा लावितसे
स्वरूप संप्रदायाची पताका, मिरवितसे त्रिलोका
ऐसे करुनियाही भाव निका, स्वामी एक कर्ता
प्रेमळ दृष्टी सुहास्य वदन, सोऽहं भावी नित्य रममाण
आत्मबोधे परिपूर्ण, स्वामीपदी निष्ठा पूर्ण
दर्शनी होय अति समाधान, प्रेमभावे कृष्णदास करितसे नमन

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा

******
पुत्र प्रिय मातेसी, पित्यासी असे सुकन्या
श्री स्वरूपानंद स्वामींसी, तैसीची ही सुकन्या ॥
कन्येसी पित्याचा लळा, गुण चिंतन वेळोवेळा
चिंतने अखंड भ्रमरीवत्, प्रकृतिही जणू जाहली तोळा ॥
सरळ लाघवी स्वभाव, अकृत्रिम निर्व्याज प्रेम
नाही मनी आप-पर, सारखाचि प्रेमाचा स्वर ॥
सहज बोलणे उपदेशाचे, ओथंबले शब्द गुरुप्रेमाचे
हितप्रद बोल बोधाचे, नावलेशही ना गर्वाचे ॥
नाही पांडित्य-वेदांत चर्चा, ना अवडंबर पूजा-अर्चा
सोऽहं भाव गुरुशरणतेचा, अनुसरती उपदेशिती मार्ग ॥
अंतरी एक बाह्य दुजे, ऐसा विचार मनी नुपजे
जो जो जाई दर्शनासी, होई तो आपुलासा सहजे ॥
चरणी नमिता नम्र भावे, नमस्कार पोहोचविती स्वामींकडे
आशीर्वादा हस्त ना अडे, मुखा व्यापिते मंदस्मितकडे ॥
भावविेशी रमलेल्या, स्वरूपसुकन्या यमुताईंचे
कृष्णदासे रेखाटले, भावचित्र साचे ॥

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा

YamutaiBhavChitra

******
स्वामींच्या गाभाऱ्यात यमुताई, भेट त्यांची ही अवचित बाई
बर्‍याच काळचा त्यांचा मानस, गाठावे सत्वर पावस
समाधीस हळूवार स्पर्श करुन, करावा रात्रभर निवास
आज तो योग येई, तेणे प्रसन्न यमुताई,
मंदिरी शिरता त्यांसी, प्रेमाचे भरते येई
स्वामी दर्शनी आश्चर्य सर्वां,
यमुनेच्या डोळ्यात यमुनेच्या धारा!

Swarupsukanya Yamutai1
*****
यमुताईंचे बोलणे, मधुर कुणा न खुपणे
दृष्टी प्रेमळ किती, माया सर्वांवरी करणे
दोष कुणाचे ना पाहता, तयासी अंगिकारणे
गुरुभक्तित सर्वांसी, पहा कसे रमविणे
स्वरूपातचि अखंड, तल्लीन होऊनि रहाणे
लक्षणे अंगी बाणता, कृष्णदास म्हणे सफल जिणे

Swarupsukanya Yamutai2

******
आत्मविस्मृतीत जगतो आम्ही, स्मृती ‘मी’ पणा न विरे काही
जन्मजन्मींच्या संस्काराने, ‘देहचि मी’ अनुभवितो आम्ही ॥
व्यवहारी वर्तता मात्र, ‘माझा देह’ म्हणतो आम्ही!!
काय असे हे अन् कोण म्हणे हे, विचार करता का हो तुम्ही? ॥
अंतरी हे जे ‘कोण’ वदवितो, समजुनिया घ्या हो ‘त्यासी’ तुम्ही ॥
सर्वांतरी ‘तो’चि वसतो, सोऽहं श्‍वास ‘तो’चि उठवितो
स्वस्थ बसुनिया निश्चल चित्ते, लक्षा त्यासी नित्य तुम्ही हो ॥
एकतानता त्यासी होता, विचार वृत्ती मुरे स्वरूपी
विषयांची जी पडली गुंती, बंध उकलुनिया विरेल भ्रांती
विश्‍व आभास, तोही मावळे, अनुभव कथिला अवघ्या संती ॥
गुरुमाऊली यमूताईंच्या, जन्मदिनीच्या सोहळ्यासी
अनुभव हाचि घेण्या येथे, जमलो सारे तुम्ही आम्ही ॥
डोळे मिटुनि स्वस्थ आसनी, गुरुमाऊली नमुनि मनी
गुरोपदिष्ट सोऽहं स्मरुनि, रमुनिया समूहध्यानी,
स्वरूपचरणी करू विनवणी, स्वरूपाचा स्पर्श द्या ना
साष्टांग नमुनि विनम्र भावे, कृष्णदास ही करी प्रार्थना ॥

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा

Swarupsukanya Yamutai 88

******
सर्वचि ब्रह्म ही ज्ञानाची खूण
तसे आचरण हे भाग्याचे लक्षण ॥
अंतरीच्या अवस्थेचे बाह्य होते प्रकटन्
भेटताचि त्वरित जाणवते खूण ॥
वात्सल्य प्रेम करुणा यांची मूर्त जी
विनय मार्दव यांची परिसीमा जाण ॥
मित रसाळ प्रेमपूर्ण संभाषण
चालणे बोलणे वागणे साधकांसी आदर्श जाण ॥
गुरुप्रेमात रंगलेली स्वरूपाची सुकन्या
वर्णू किती किती अंगीचे त्यांचे गुण!!
गुरुमाऊली यमूताईंच्या एकोणनव्वदाव्या जन्मदिवशी
करुनि त्यांचे स्मरण,
कृष्णदास प्रार्थितो, इच्छितो आशीर्वाद
आमुच्या अंगी सत्वरी बाणो, हे सर्वचि सद्गुण!

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा

Swarupsukanya Yamutai 89

******


|| स्वरूपसुकन्या स्वरूपी मिळाली ||

(पू. यमुताई कुलकर्णी यांना वाहिलेली श्रद्धांजली)

असे म्हणतात की पित्याचे गुण कन्येत तर श्रीसद्गुरुंचे सच्छिष्यात दिसतात. श्रीसद्गुरुंस ज्यांनी पिता मानले त्या शिष्यकन्येस म्हणजेच प. पू. श्री स्वामी स्वरूपानंद कृपांकित प. पू. श्री यमुताई कुळकर्णी यांस वाहिलेली ही सश्रद्ध आदरांजलि.

करवीरातील संतमेळा असो, वांगीबोळ असो, बेलबाग असो की पुण्यनगरी असो, चित्त सदा पावसी | श्रीस्वामी निजध्यासी | एकचि विषय चिंतनासी | नित्य गुरुमंत्र मुखासी॥.  दर्शनार्थी समोर आल्यावर अगत्यपूर्वक विचारपूस करून ‘हे कोण बरे?’‘असे कां!फार छान!!’. सविस्तर चौकशी करून त्यानंतर त्याने केलेला प्रणाम श्रीस्वामींकडे पोहोचविणे अन् श्रीस्वामीस्मरणपूर्वक आशीर्वाद त्या व्यक्तीस सूपूर्द करणे. अन् स्वत: अलिप्त!!  त्या व्यक्तिस घेऊन आलेली व्यक्ति परत जेव्हा केव्हा दर्शनास येई, तेव्हा तेव्हा आठवणीने पूर्वी बरोबर आलेल्या त्या व्यक्तीची विचारपूस होई.  प्रत्येक घटनेत ‘काय स्वामींंची लीला आहे’ असे उद्गार! लहानग्यांची जणू आज्जी व मोठ्यांची आई. हल्ली जरी त्यांस गुरुमाऊली म्हणण्याचा काहींचा आग्रह असे तरी जसे श्रीस्वामींस निकटवर्तीय अत्यंत प्रेमाने ‘अप्पा’ असे संबोधत त्याचप्रकारे अंतरंग अनुग्रहितांसाठी त्या नित्य ‘यमुताई’च होत्या.

सामान्य संसारी स्त्रियांना नित्यनैमित्तिक जीवन ही तारेवरची कसरत असते. हे सर्व सांभाळून परमार्थ जोपासायचा हे महत्कठीणच! परंतु प. पू. यमुताईंनी ते साध्य केलं. ‘सारदामाता अशाच असतील कां?’ तर उत्तर असेल ‘हो तर. नक्कीच!!’

प. पू. यमुताई म्हणजे अत्यंत भावप्रधान व्यक्तिमत्त्व. ते भाव वेळोवेळी त्यांच्या रचनांमधून अभिव्यक्त झालेले आहेत. अत्यंत प्रासादिक अन् त्याजबरोबर भाव-भक्ति व शरणागतिपूर्ण असे या सर्व रचनांचे वैशिष्ट्य आहे.प. पू. यमुताईंचीश्रीसद्गुरुंशी असलेली आत्यंतिक लीनतासुद्धा या रचनांमधून प्रतीत होते.

किरकोळ शरीरयष्टी,प्रदीर्घ आयुर्मानपणबेताचेच शरीरस्वास्थ्य.  अंथरूणात असतानाही कुणी दर्शनास आल्यास लगेच उठून बसत व आलेल्याचे समाधान करताना त्यांना एक वेगळेच आत्मबल प्राप्त होत असे. जणू सारे दुखणे वा आजार त्या उशाशी ठेवत. पांडित्यपूर्ण वेदांत चर्चा नाही तर साध्या सरळ सोप्या भाषेत परमार्थ उलगडून सांगणे. नंतर ती व्यक्ति गेल्यावर परत अंथरूणावर आडव्या!! ‘असं असं घडलं. मी विचारलं बरं का स्वामींना, कां बरं असे? काय इच्छा असेल बरं स्वामींची? असो, सर्व स्वामींची इच्छा! मान्य आहे’. पलिकडील इमारतीत ऐकू जाईल इतकी जोराची उचकी नित्याचीच. पाहणार्‍याच्या काळजाचा ठोका चुके. पण त्यांनी विनातक्रार आयुष्यभर सहन केले. ‘यमुताई, आम्ही आपल्या प्रकृतीस्वास्थ्यासाठी काही अनुष्ठान करू का?’. शिष्यांनी असे विचारल्यावर ‘अजिबात नको. सर्व भोगून इथंच संपवायचं. ते सोयीस्कररित्या भोगायला लावतात ही स्वामींची कृपाच नाही कां?’ असे उद्गार!

सद्गुरुंकडेही काही मागणे नाही. ‘तोचि जाणे माझे हित’. मग आपल्या अज्ञ बुद्धिद्वारे कां बरे मागावे? ‘स्वामी, मला काही कळत नाही. आपणच योग्य ते ठरवा.’ हा शुद्ध भाव!

संसार व परमार्थाची अति सहजतेने यशस्वी सांगड घालून साधकजनांसमोर घालून दिलेला आदर्श, तन व मननिवविणारे कोेमल मृदू रसाळ शब्द, भावपूर्ण नेत्रांतील करुणा, साधेपणा, आत्यंतिक अनाग्रही स्वभाव. सद्गुरु श्रीस्वामींचे आध्यात्मिक गुण घेताना त्याचप्रमाणे त्यांचे बाह्य लौलिक गुण सफलतेने अंगी बाणविले आहेत अशा सच्छिष्या म्हणजे प. पू. यमुताई असे म्हणावे लागेल. श्रीस्वामीजींकडून प्राप्त झालेला आध्यात्मिक वारसा प. पू. यमुताईंनी अनेकांना मुक्तहस्ते वाटला, पण त्याचवेळी त्यांनी वरवर अतिशय सामान्य वाटणारे पण आत्यंतिक दैवी असे गुणविशेष, उदाहरणार्थ- विनय, मार्दव, विनम्रता, अगर्वता, अनासक्ती, अनाग्रह, प्रेमळता, वात्सल्य, करुणा, अकृत्रिमता, दातृत्त्व, आप-पर भावविरहित प्रेम, पूर्णत: असूयारहित स्वभाव इत्यादि जे अंगी बाणविले, ते गुण हेरून वा लक्षात घेऊन त्याप्रकारे आपल्या अंगी बाणविणारे वा तसा प्रयत्न करणारे अनुयायी त्यांना मिळाले नाहीत. प्रत्येक घटनेमागे ‘श्रीस्वामींची इच्छा काय असेल बरे?’ असा विचार करणार्‍या प. पू. यमुताई, पण त्यांच्या शिष्यगणांत, आपल्या गुरुमाऊलीचे मनोगत, त्यांची इच्छा काय असावी हे जाणून त्याप्रमाणे वागण्याचा अट्टाहास करणाऱ्यांचा अभाव होता ही खंत त्यांना नक्कीच वाटत असेल. असो!

खरोखर कोणताही अभिनिवेश न बाळगता ज्यांनी गुरुपद समर्थपणे निभावले अशा अतिदुर्मिळांपैकी प. पू. यमुताई होत्या. ‘कथिते जीवनकथा’ हे त्यांचे सुबोध परंतु आदर्श जीवनचरित्र. साऱ्यां शिष्यगणांनी प्रथम स्वत: त्याची पारायणे करून प. पू. गुरुमाऊलींचे सर्व गुण लक्षात घेऊन ते अंगी बाणविण्याचा आटोकाट प्रयत्न करावयास हवा. पावसला (वा समाजात इतरत्र) वावरणारा मनुष्य त्याच्या वागण्यावरून लोकांच्या लक्षात यावयास हवा की ‘अरे, तो पहा! तो तर यमुताईंचा शिष्य दिसतो आहे बहुतेक!!’ अशा प्रकारे आपल्या वागणुकीद्वारे आपल्या गुरुंचा आदर्श समाजात मांडता आला तरच ती प. पू. यमुताईंस खरी श्रद्धांजलि ठरेल. कारण हाच परमार्थाचा भक्कम पाया आहे व त्यापुढेच खरे अध्यात्म सुरु होते.

आज दिनांक २८ ऑक्टोबर २०१४. सकाळी ६ वाजून २० मिनिटांनी ज्ञानपंचमीच्या शुभयोगावर प. पू. यमुताईंनी देह ठेवला व त्या आकाशस्थ स्वरूपमंडलात प्रवेश करित्या जाहल्या. श्रीस्वामींबरोबर पुन: कधीतरी अवतीर्ण होण्यासाठी…

ऐसी प्रेमळ गुरुमाऊली | बहुजनांसी आश्रय जाहली |
स्वरूपकार्या काया वाहिली | स्वरूपचिंतनी स्वरूपी मिळाली |
स्वरूपसुकन्या स्वरूपी मिळाली ॥

प. पू. यमुताईं!! यापुढे ते हास्य, ते मधुर शब्द, ते कारुण्यपूर्ण नेत्र, आठवणींच्या विश्वात अनुभवता येईल फक्त! त्यांच्या कोमल चरणांस मस्तक टेकवून प्रणाम करताना, पाठीस झालेला तो मृदू हस्त-स्पर्श… तोही आठवणींच्या विश्वात अनुभवता येईल फक्त! पण… पण त्यांचा लाभलेला तो कल्याणकारी कृपाशीर्वाद… तो मात्र आहे नित्यच! आपल्याबरोबर असलेले ते हेच श्रीसद्गुरुंचे नित्यत्व. आपल्या जीवनपथावरील, आपल्या साधनपथावरील वाटचालीतील नित्य मार्गदर्शक, नित्य प्रेरणादायी, नित्य आधारप्रद शुभ अस्तित्त्व. तो आशीर्वाद सार्थ ठरविणे हे मात्र आहे आपल्या प्रत्येकाच्या हाती!!

बोला,

॥ स्वरूपसुकन्या प. पू. यमुनामाता की जय ॥
॥ श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ॥

॥ हरि ॐ तत्सत् ॥
* * * *

— कृष्णदास
— ज्ञानपंचमी (पांडवपंचमी) शके १९३६
(२८ ऑक्टोबर २०१४)

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी माराLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *