गुरुबाजी

गुरु म्हणुनि मिरविती जगी सारे विविध संप्रदायातुनि
जाणिला आहे का खरेच देव त्यांनी स्वत: निजअंतरातुनि? ||
गुरुआज्ञे म्हणती करिती कार्य जनोद्धारालागुनि
उद्धार ना केला स्वत:चा काय अर्थ या बोलण्यालागुनि? ||
गुरु इच्छितो का कधी घात स्वशिष्यालागुनि
सांगेल मग का हे कार्य जे कारण होय पतना स्वशिष्यालागुनि ||
स्वत:वरील पुटे ना काढिली जी सूक्ष्म अतिसूक्ष्मातुनि
का करीता उपदेश जनांसी, वेळ मग तुम्हा केव्हा स्वत:लागुनि? ||
गुरुंचा देतो संदेश, गुरुआज्ञेचि, जगता केवळ या भ्रमातुनि
गुरु ना केव्हाही सहाय तुम्हा या कार्या घ्या ध्यानातुनि ||
ना तरलात, येत ना तरता, कशासी पडता या फंदातुनि
घात स्वत:चा अन शिष्यांचा, ना वाचाल या पातकातुनि ||
मी नसता कोण तारेल अज्ञ साऱ्या जनांलागुनि
तळमळ ही केवळ भ्रामक, ना अन्य, लोकेषणेवाचुनि ||
कृपाळूपणे सद्गुरुंने तुम्हासी उपदेशिले अंगिकारुनि
फेडा पांग त्यांचे तुम्ही प्रथम स्वत: देवासी त्या जाणुनि ||
कोण कोणाचा, मार्ग कोणता, न कळेल तुम्हालागुनि
जववरी न पावाल ज्ञानासी स्वत: आत्मसाक्षात्कारालागुनि ||
उपदेशितो मी केवळ परी जबाबदारी सारी गुरुलागुनि
अरे! गुरु ना मिंधा कुणाचा, का सांगा करील या कार्यालागुनि ||
संधी अमोल दवडिता सुटण्या जन्ममृत्यूच्या चक्रातुनि
पुढल्या अनंत जन्मांची पेरणीच केवळ निष्पन्न या गुरुबाजीतुनि ||
गेले गुरु, जाणार मी ही, आता चालविल कोण या संप्रदायालागुनि
विचार हा केवळ जाणा उठतो केवळ, अज्ञ त्या बुद्धीतुनि ||
देह त्यागिला जरी गुरुने, आत्मरुपी अमर तो, ना गेला कधी या जगतातुनि
संप्रदाय चालविण्या पेलण्या सामर्थ्य असे सारे तो बाळगुनि ||
जाणा व्हा अनन्य शरण त्यासी, झटा केवळ आत्मोध्दारालागुनि
कृष्णदास म्हणे नातरी उरेल अंती, दुजे ना असीम त्या नैराश्यावाचुनि!! ||


 

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *