प. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी – श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे
श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे यांनी प. पू. योगिनी सुमनताई ताडे, पुणे यांच्याकडे रविवार दि. २३ फेब्रुवारी २०१४ रोजी सांगितलेल्या प. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी:
श्री. विश्वनाथ नारायण गोलिवडेकर उर्फ विसूभाऊ हे चित्रकार ज्यांनी अभंग ज्ञानेश्वरीतील सर्व चित्रे काढली आहेत. ते माझ्या थोरल्या भावाचे मित्र. त्यामुळे त्यांची माझी चांगली ओळख. ते पुण्यात माझ्या घरी रहात व चित्रे काढत. (मी कामाला जात असल्याने ते मला माहीतच नसे) व चित्रे पूर्ण झाल्यावर ते पावसला जाऊन स्वामींना दाखवित. स्वामींनी त्यांना अट घातली होती चित्र पूर्ण झाले की मला दाखवायचे व पसंत पडले तर ठेवायचे नाहीतर त्यात सांगितल्याप्रमांणे बदल करायचे. सर्व चित्रांचे मिळून एक हजार रुपये देण्याचे ठरले. विसूभाऊ चित्रपट दिग्दर्शकही होते व ‘पंढरीचा पाटील’ हा चित्रपट त्यांना करायचा होता. सर्व चित्रांचे काम पूर्ण झाले व अभंग ज्ञानेश्वरीचे प्रकाशन झाले. त्या सोहळ्यास विसूभाऊ हजर होते. दुसर्या दिवशी स्वामींनी विसूभाऊंना दर्शनास बोलाविले. म्हणाले ‘विसूभाऊ, तुमच्यामुळे पुस्तक छान झाले! काय सुरेख चित्र काढली आहेत तुम्ही!! असे कौतुक केले. त्यांना आपल्या अंगावरील शाल दिली. एक हजार एक रुपये दिले. म्हणाले ‘फार छान पुस्तक झाले. तुमच्यामुळे.’ विसूभाऊ कोल्हापूरचे. कोल्हापुरी भाषेत म्हणाले, ‘पायताणाने हाणा आम्हाला. अहोे पुस्तक लिहिले तुम्ही. आमचे कसलं कौतुक करताय. आम्ही फक्त चित्रे काढली, ती पण पैसे घेऊन!!’ नंतर काही वेळाने स्वामींनी विचारले ‘स्नान झाले का विसूभाऊ?’ विसूभाऊ ‘हो’ म्हणाले. तर स्वामी म्हणाले ‘बसा मग मांडी घालून.’
विसूभाऊ म्हणाले ‘स्वामी, ते तुमचा अनुग्रह वगैरे आम्हाला काही चालणार नाही. आम्ही चित्रपट व्यवसायातील माणसे. दारू पितो, मटण खातो. आम्हाला ते काही जमणार नाही. अनुग्रह वगैरे.’
स्वामी म्हणाले ‘मटण खूप लोक खातात ना? जगातले खूप लोक मटण खातात.’ ‘हो तर‘ विसूभाऊ म्हणाले. ‘मटणात तुम्हाला विशेष काय प्रकार आवडतो?’ स्वामींनी विचारले.
विसूभाऊ म्हणाले ‘कोंबडी आवडते’. स्वामी म्हणाले, ‘अरे वा छान!’.
‘कोंबडी कोण खातो?’
विसूभाऊ म्हणाले ‘अहो, मी खातो’
तेव्हा स्वामींनी विसूभाऊंकडे पाहिले व विचारले ‘हा मी कोण?’
‘हा मी कोण??’ विसूभाऊ म्हणाले, माझी बोलतीच बंद झाली!
तेवढयात स्वामी माझ्याकडे बघायला लागले व त्यांनी मला कुठे नेले कळलेच नाही. जवळजवळ अर्धा तास मला मी कुठे आहे काहीच कळलेच नाही. मेल्यासारखीच अवस्था झाली. स्वामी निवांत पडून राहिले. अर्ध्या-पाऊण तासाने मी भानावर आलो. तेव्हा स्वामी उठले. मला खडीसाखर दिली. म्हणाले ‘छान झाले. आता पिठलंभात खाऊन जा’
जाताना विसूभाऊंना काय वाटले कुणास ठाऊक की आपण स्वामींचा एक फोटो सोबत घ्यावा. पहा, न बोलता स्वामींनी कशी प्रेरणा दिली. अनुग्रहाची प्रोसेस सुरुच झाली होती. विसूभाऊंनी फोटो घेतला. जाताना कोल्हापूरला तो फ्रेम करुन घेतला. नंतर मुंबईस आले.
विसूभाऊ दुसऱ्या दिवशी जागृति स्टुडिओत गेले. सेट वगैरे सर्व तयारी झाली होती. नंतर दुसऱ्या दिवशी शूटिंग सुरु झाले. दुपारी जेवायच्या वेळेस विसूभाऊंच्या आवडीचे कोंबडीचे मटण होते. विसूभाऊ जेवायला बसले. पुढ्यात कोंबडीचे मटण ठेवलेले. खायला हात घातला तर त्यात अप्पाच दिसायला लागले. ‘कोंबडी कोण खातो!!’ ‘कोंबडी कोण खातो!!’ बापरे! खायचा विचारच बंद झाला!!! त्यानंतर जेव्हा जेव्हा कोंबडी खाण्याचा विचार करे व खायला बसे तेव्हा त्यात अप्पा दिसत व खाण्याचा विचारच नष्ट होई!!
विसूभाऊ म्हणाले अशा रितीने तेव्हापासून माझे अभक्ष्य भक्षण आपोआप गेले!!
असे सामर्थ्य!!
मी पुण्यात रहायला आल्यावर माधवनाथांच्या (बाळासाहेब वाकडे) प्रवचनांस नियमित जात असे. तेथे सत्यदेवानंदांची भेट झाली. ते स्वामी स्वरूपानंदांचे अनुग्रहित. ते बाळासाहेबांना नेहमी सांगत, बाळासाहेब एकदा जाऊन या की स्वामींच्या दर्शनास. बाळासाहेब म्हणायचे मला संतांची लक्षणे माहीत आहेत. असा संत पहावयास मिळणे अवघड आहे. होय नाही करता करता दोन वर्षे गेली. अडुसष्ट साली त्यांनी स्वामींना पत्र लिहिले व नंतर दर्शनास गेले. संध्याकाळी पावसला पोहोचले. देसाईंच्या घरात माडीवर त्यांची रहाण्याची सोय केली होती. बाळासाहेब रोज सकाळी साडेपाच वाजता ध्यानास बसत. कधीही त्यांनी ती वेळ चुकविली नाही. दुसर्या दिवशी ध्यान झाल्यावर भाऊराव देसाई वर आले म्हणाले ‘बाळासाहेब, हे घ्या निरसं दूध’. बाळासाहेब म्हणाले ‘अहो, मला निरसं दूध आवडतं हे कुणी सांगितलं तुम्हाला?’ भाऊराव म्हणाले ‘कालच अप्पांनी स्वत: सांगितले. बाळासाहेब वाकड्यांना निरसं दूध आवडत ते द्या सकाळी.’
आमच्या कोल्हापूरी भाषेत सांगायचे तर पहिलाच झटका दिला स्वामींनी!
मग दर्शनाला गेल्यावर बाळासाहेबांना स्वामींचा अनुग्रह मिळाला. मला त्यावेळी कामामुळे बाळासाहेबांबरोबर पावसला जाता आले नाही व आर्थिक परिस्थिती सुद्धा तेवढी चांगली नव्हती. जेमतेम सव्वाशे रुपये पगार होता. १९६९ साली मी सात दिवसांचे गुरुचरित्र पारायण केले. शेवटच्या दिवशी भटजींना बोलाविले व नैवेद्य प्रसाद केला. म्हटलं तो भटजींना द्यावा. तेवढ्यात मागच्या बाजूस दरवाज्यावर खटखट आवाज आला. म्हणून दरवाजा उघडला तो एक कुत्रं आलं. मी म्हटलं महाराज आलेत. ते ताट त्याला दिले. त्या कुत्र्याने मीठ वगळता सर्व काही खाल्ले. मला इतका आनंद झाला. म्हटलं ‘महाराज आले, आमचे महाराज आले आज!’ माझे डोळे भरून आले. म्हटलं ‘माझे पारायण पूर्ण झाले आज’. रात्री मी झोपलो व सकाळी उठलो तो शब्द ऐकू आले. ‘पावसला जा!’ मी बायकोला म्हटलं ‘पावसला जा अशी ऑर्डर आली आहे. मजजवळ जाण्यापुरतेच पैसे आहेत. येण्याचे नाहीत’. ती म्हणाली ‘मी साठविलेले आहेत ते देते.’
मी पावसला गेलो. मी एकटाच होतो. हातपाय धुऊन नऊ वाजता दर्शनास गेलो. स्वामींनी विचारले ’काय नाव?’ मी सांगितले. ‘अनंत रघुनाथ करंदीकर.’ ‘काय करता?’ ‘मी कॉर्पोरेशन मध्ये सॅनिटरी इन्पेक्टर आहे. पुणे महानगर पालिकेत’. ‘अरे वा! वा!. छान आहे तुमची नोकरी, फार छान आहे!’ स्वामींनी मला स्वच्छतेबद्दल पाच मिनिटे व्याख्यान दिले. कशी स्वच्छता असते, कसा आनंद होतो लोकांना. तुम्ही ते करून घेत आहात लोकांकडून. अशा रितीने माझी नोकरी कशी चांगली आहे ते स्वामींनी मला पटवून दिले.
मग म्हणाले ‘यातलं (परमार्थसाधना) काही करता का?’
‘मी गुरुचरित्र रोज पन्नास ओव्या वाचतो अन् मग कामाला जातो. आणि बाळासाहेव वाकडे यांच्यांकडे प्रवचनास जातो ज्ञानेश्वरीवरील.’
‘काय म्हणता? बाळासाहेबांच्या प्रवचनास जाता ? रोज वाचता ज्ञानेश्वरी?’
‘बसा मांडी घालून. तुम्हाला अनुग्रहच देतो.’ अन् स्वामींनी मला अनुग्रहच दिला. अशा रितीने श्रीदत्त महाराजांच्या दृष्टांताप्रमाणे मी गुरुकृपांकित झालो!!
सत्तर साली पत्नी व सासरे (रहाणार सांगली) दोघांना घेऊन पावसला गेलो. तिला स्वामींनी सांगितले, ‘स्त्रियांचा प्रपंच हाच परमार्थ. तो तुम्ही करताय. नवऱ्याच्या पगारात भागवायचं, मुलांचे संगोपन करायचं. आल्या-गेल्याचं स्वागत करायचं. आणी नाम घेता ना तुम्ही?’ पत्नी म्हणाली ‘हो नाम घेते’.
‘मग तेच करायच. तेव्हढंच करायचं’
‘कोणतं नाम घेता?’
‘ॐ नम: शिवाय’
स्वामी म्हणाले ‘मी सांगतो तसं पाच वेळा म्हणा’ अशा प्रकारे स्वामींनी स्वत: ते नाम उच्चारीत पत्नीकडून उच्चारून घेतलं. बाहेर आल्यावर पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू! म्हणाली ‘मला जे पाहिजे तेच दिले’. नंतर माझ्या चिकित्सक स्वभावाप्रमाणे मी पत्नीला विचारले ‘तुला काय सांगितले?’ प्रथम ती काहीच सांगेना. पण परत परत विचारल्यावर सांगितले की मला स्वामींनी ॐ नम शिवाय हा मंत्र दिला.
पाच वाजता मी दर्शनास गेलो तेव्हा स्वामींना म्हटले, ‘स्वामी तुम्ही आमच्या बायकोस अनुग्रह का दिला नाही?’
स्वामी शांतपणे म्हणाले ‘आपल्या संप्रदायाचे प्रमुख कोण? आदिनाथ. त्यांचे नाव घ्यायचे हाच अनुग्रह!’ असे स्वामी होते!!
सासऱ्यांना म्हणाले ‘तुम्हाला अनुग्रह प्राप्त झालेला आहे. एका बाईंनी अनुग्रह दिला आहे बरोबर ना?’
‘हो’
‘आणि नाम पण दिले आहे’
‘होय’
‘ते तुम्ही रोज तुम्ही करत जा. खडीसाखर दिली.’
मी मूळचा कोल्हापूरचा. आमचे भाग्य!! अक्कलकोट स्वामी श्री कृष्ण सरस्वतींना म्हणाले, तू व मी एकच आहोत. तू कोल्हापूरला जाऊन कार्य कर. लोकांना नामस्मरणाला लाव.
श्री कृष्ण सरस्वती महाराजांची गोष्ट सांगतो. आम्ही लहान होतो. माझी आई खूप आजारी होती. उत्तरेश्वरला पाध्ये वैद्यांच्या घरी रहात होतो. दुसर्या मजल्यावर आईला ठेवलं होते. आमची आजी येऊन राहिली होती. सारखे नातेवाईक यायचे व रडायचे. आई खूप अत्यवस्थ होती. मी व (जाधव?) आम्ही दोघं रोज संध्याकाळी श्री कृष्ण सरस्वती महाराजांच्या मठात आरतीला जायचो. अगदी रोज न चुकता आरतीला जायचो. आरतीला जाताना मी एकभांडं घेतले व मठात तीर्थ ठेवलेले असायचं ते म्हटलं आईला पाजावं. अगदीच बालबुद्धी! शाळेतला. अर्ध्या चड्डीत. गेलो. आरती झाल्यावर मी महाराजांच्या समाधीसमोर उभा राहून मी महाराजांना म्हटले ‘महाराज आमच्या आईला बरं करा की हो. कित्ती हो आजारी आहे ती. आमची फार पंचाईत होते हो’ नंतर घरी जाऊन आईला तीर्थ पाजलं. दुसर्या दिवशी रात्री पाध्ये वैद्य आले. तिसर्या दिवशी सकाळी परत आले. वर जाऊन आईला तपासलं व खाली आले. म्हणाले ‘चहा करा! पेशंट जाग्यावर आला!! अठ्ठ्याण्णव ताप आला. आता बरा होणार पेशंट. चला चहा करा.’ नंतर आमची आई बरी झाली.
सत्तर साली एकदा मी पावसला असताना स्वामी व मी दोघेच होतो. इतर कुणी नव्हते. स्वामी मला म्हणाले ‘आपण सोऽहं भजन करुया’. मी स्वामींसमोर बसलो. अचानक स्वर्गीय सुगंधाचा घमघमाट सुटला व स्वामींच्या जागी मला कोल्हापूरचे श्री कृष्ण सरस्वती दत्त महाराज (कुंभार स्वामी) साक्षात् दिसले. मी बघतच बसलो. सोऽहं भजन राहिले बाजूला! माझे डोळे भरून आले. दहा मिनिटांनी स्वामी म्हणाले ‘भजन केलं नाही?’ मी म्हटले ‘पुण्यात नेहमी मिटतो की डोळे’ ‘आता महाराज तुम्हाला डोळे भरून पहात होतो!!’ स्वामी हसले. हसले स्वामी. बचकभर खडीसाखर दिली व म्हणाले ‘आशीर्वाद! आशीर्वाद!!’
मी माधवनाथांना (बाळासाहेब वाकडे) एकदा श्री कृष्ण सरस्वती महाराजांच्या दर्शनास कोल्हापूरला मठात घेऊन गेलो. माधवनाथ जे बसले ध्यानाला ते बसलेच. उठल्यावर म्हणाले वा!! अनंतराव तुम्ही मला कुठं घेऊन आला आहात!! कुठं घेऊन आला आहात!!! फार छान!! त्यावेळी शिर्के आजी हयात होत्या.
एक उपस्थित भक्त: रानडे काका म्हणून मूळ कोल्हापूरचे. पुण्यात भेटले होते. आता गेले साधारण वर्षापूर्वी. त्यांचे चहाचे दुकान होते कोल्हापूरला. नित्यनेमे, अगदी न चुकता, श्री कृष्ण सरस्वतींच्या समाधी मठीत दर्शनास जात असत. काही दिवस त्यांना कामामुळे मठात जाता आले नाही. सात-आठ दिवसांनी श्री कृष्ण सरस्वती महाराज स्वप्नात आले. बोलू लागले ‘आता येत नाही. आता येत नाही.’. (कृष्ण सरस्वती महाराज नित्य बालभावात असत व अत्यंत मोजकेच बोलत). तेव्हापासून रानडे परत महाराजांच्या दर्शनास नित्य जाऊ लागले.
करंदीकर: मी रोज, रोज मठात दर्शनाला जात असे. अगदी रोज. माझ्याकडे महाराजांचा फोटो आहे. मी कृष्ण सरस्वती महाराजांचाच ना. कृष्ण सरस्वती महाराजांची आणखी एक गोष्ट सांगतो. आमच्या आत्याबाई कोल्हापूरला रहात. शेवडे त्यांचे नाव. त्यांचे यजमान व दीर दोघेही एल्.एल्.बी. परिक्षेस बसले. रोज श्री कृष्ण सरस्वती महाराजांच्या दर्शनास जात. परिक्षेचा निकाल होता. दोघेही महाराजांच्या दर्शनाला गेले शिर्केच्या घरी. गेल्यावर महाराज म्हणाले, यजमानांना बोलले इकडे ये. स्वत:च्या डोक्यावरील पगडी काढली त्यांच्या डोक्यावर घातली व त्याला म्हणाले जा तुझे काम झाले. दीराला बोलले, तुझा काही उपयोग नाही. जा, तुला पुन्हा यावे लागेल. निकाल लागला तेव्हा यजमान पास झाले व दीर नापास झाले.
स्वामी स्वरूपानंद तरुणपणी पुण्यात रहात असत. चळवळीचे कार्य करीत असताना. पुण्यात त्यावेळी एक ताई म्हणून रहात असत. त्यांच नाव (हरोलीकर?). ऐंशी वर्षे वय होतं माझी भेट झाली तेव्हा. मी स्वामींकडे जातो कळल्यावर मला जवळ बोलावून घरी घेऊन गेल्या. त्यावेळी सांगितलेली गोष्ट. म्हणाल्या त्यावेळी आम्ही त्यांना राम म्हणायचो. मी त्याला महिन्याला दहा रुपये द्यायची. मग तो आमची सगळी कॉंग्रेसची कामे करायचा. तो नंतर बरीच वर्षे झाली भेटलाच नाही. बरीच वर्षे झाली. भेट नाही. मग एस्. एम्. जोशींना निरोप पाठविला. ते आले. मी विचारले, ‘अरे आपला राम कुठे आहे?’ एस्. एम्. जोशी म्हणाले ‘अरे, तो आता राम नाही राहिला. स्वामी स्वरूपानंद झाला आहे. पावसला असतो.’ ‘हो का. मग मला त्याचा पत्ता दे.’ एस्. एम्. जोशींनी पत्ता दिला. त्यांना मी एक पत्र लिहिले. स्वामींचे उत्तर आले तेव्हा भेटीस निघाले. पुण्याहून कोल्हापूरला गेले व तेथून मुलाने गाडी ठरविली पावसला जायला. पत्र मिळाल्यावर स्वामींनी पावसला सर्वांना सांगितले, आई येणार आहे. तिची चार दिवस रहायची व्यवस्था करा. तिच्या आवडीचे अमुक अमुक असे पदार्थ आहेत, ते करायचे. दुसर्या दिवशी एक गृहस्थ जीप घेऊन आले. म्हणाले, ‘हरोलीकर आपले आडनाव का? ताई आपणच ना?’ ‘हो.’ तर म्हणाले ‘स्वामींनी मला पाठविले आहे. स्वामी म्हणाले, ‘ताई येणार आहे व त्यांची गाडी वाटेतच बंद पडणार आहे. तेव्हा जा व ताईंना घेऊन या.’ अन् खरेच आमची मोटार बंद पडली होती. तिची दुरुस्ती चालली होती, तितक्यात ते गृहस्थ जीप घेऊन आले होते. मी गेल्यावर स्वामींना इतका आनंद झाला. म्हणाले ‘ताई, मी तुझी वाट पाहात होतो. तुझ्यासाठी मी एक गोष्ट ठेवली आहे.’ ‘कुठली गोष्ट?’ ‘अभंग ज्ञानेश्वरी.’ अभंग ज्ञानेश्वरीची प्रत स्वामींनी ताईंचे नाव घालून तयार ठेवली होती. या ताई गांधींच्या अनुयायी. गांधीवादी. त्यांनी कुष्ठ निवारण केंद्र काढले होते. पण कुणी येईनात. तर त्या बाईंनी कुष्ठ्याशी लग्न केले. पहा काय ताकद आहे!! मग त्या सगळ्यांना सांगत, ‘पहा मी असे लग्न केले आहे. मग तुम्हाला यायला काय हरकत आहे?’ मग लोक येऊ लागले. गांधीजी ताईंना म्हणत, ‘ताई तू माझ्यापेक्षा मोठी आहेस.’ बाबा देसाईंना स्वामी म्हणाले, ‘ताईला काहीतरी अडचण आहे. तेव्हा तुम्ही तिला विचारा व असे विचारा की मी करु का निवारण?’. बाबा म्हणाले, ‘स्वामी, तुम्हीच विेचारा की. तुमच्या ओळखीचीच आहे ना ताई.’ स्वामी म्हणाले, ‘मी विचारलं तर तिला राग येईल. तू विचार.’ बाबांनी विचारले, ‘ताई तुला काही अडचण आहे काय?’
‘छे रे, काही नाही.’ ‘आहे, आहे. अप्पा खोटं बोलायचा नाही.’
ताई म्हणाल्या ‘बापरे! असे म्हटला तो?’
मग दर्शनाला खोलीत गेले. स्वामी म्हणाले ‘ताई, मुलगा लग्न करीत नाही ना तुझा?’ ‘हो हो, अगदी बरोबर.’
‘तुलाच सर्व करावं लागतं ना? वय झालं ना आता?’
‘असे कर, मुलाला बोलाव.’
मुलगा आत आल्यावर स्वामींनी विचारलं, ‘का लग्न करीत नाहीस?’
मग त्याला लग्न करणे कसे आवश्यक आहे ते सांगितले. आई थकली आहे वगैरे वगैरे… तिने खूप कष्ट केलेले आहेत. तेव्हा तू लग्न कर.
मुलगा तयार झाला. लग्न करीन म्हणाला
स्वामी म्हणाले, ‘ताई मुलगा लग्न करायला तयार झाला बरं कां?’ म्हणाले, ‘पंधरा दिवसांनी एक मनुष्य येईल. त्याची मुलगी कर.’
पंधरा दिवसांनी एक मनुष्य विचारत आला, ‘हरोलीकर इथेच रहातात का?’
‘हो.’ तर म्हणाला, ‘मी वाडीचा पुजारी आहे. माझी मुलगी लग्नाची आहे. मला दृष्टांत झाला की मुलगी हरोलीकरांना द्यायची. म्हणून आलो आहे.’
मुलाचे तिच्याशी लग्न झाले. सुलोचना तिचे नाव. त्यांना एक मुलगी आहे.
ताईंनी सुनेला बोलाविले व सांगितले, हे अप्पांकडे जातात बरं का. यांना नमस्कार कर. बाळासाहेबांस (करंदीकर) म्हणाल्या, ‘ही सूनबाई बर कां. अप्पांनी पाठविलेली. वाडीच्या पुजाऱ्यांची मुलगी’
असे स्वामी होते. कुणाला कुठे जोडतील सांगता येत नाही. माधवनाथांनी बत्तीस वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचने केली. दहा वर्षे झाल्यावर मी दत्त मंदिरामध्ये एक समारंभ केला. तिथे काही पत्रकार आले. त्यातल्या एकाने प्रश्न केला, ‘कां हो वाकडे, तुम्ही इतकी वर्षे प्रवचने केलीत ज्ञानेश्वरीवर, तुम्हाला काही अनुभव दृष्टांत वगैरे काही? स्वामींचा काही अनुभव वगैरे?
आम्ही लक्ष देऊन ऐकू लागलो. माधवनाथ काय सांगतात त्याकडे. माधवनाथ म्हणाले ‘दहा वर्षे मला आजारी पाडलं नाही, पडसं नाही, खोकला नाही, ताप नाही, काही नाही. हा चमत्कारच आहे कि नाही माऊलीचा?’
अहो, त्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या पत्रकारानी. माधवनाथ रोज रात्री सव्वानऊ ते दहा या वेळेत ज्ञानेश्वरीवर प्रवचन करायचे. बत्तीस वर्षे मी त्यांची प्रवचने ऐकली.
माधवनाथांच्या मनात एकदा एक शंका आली की आपण इतकी वर्षे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करतो. ही सेवा माऊलीस पोहोचते की नाही? त्यावेळी मधुकर जोशी पत्रकार, अनंतराव आठवले, छगनराव असे सगळे, अनंतराव आठवलेंचे पुस्तक माऊलीला अर्पण करायला आळंदीस गेले होते. मधुकर जोशी अत्यंत चिकित्सक मनुष्य. पत्रकार. कुणावरही एकदम विश्वास ठेवणार नाही. पूजा झाली पुस्तक समाधीस अर्पण केले. मधुकर जोशींनी माऊलीच्या समाधीवर मस्तक टेकल्यावर आतून आवाज आला. ‘हे बाळासाहेबांना द्या.’ ते म्हणाले, माझ्या लक्षात येईना, कोणते बाळासाहेब, कारण माझ्या ओळखीचे तीन-चार बाळासाहेब होते. कुठल्या बाळासाहेबांना द्यायचे? परत नमस्कार केला. ‘बाळासाहेब वाकडे!‘ परत आवाज आला! ‘तुम्हाला जे मिळेल ते बाळासाहेबांस द्या.’
ही सगळी मंडळी त्या रात्री अकरा वाजता माधवनाथांच्याकडे आली. माधवनाथ म्हणाले तुम्ही सगळे या वेळी इथे कसे? ते म्हणाले, ‘आम्ही नाही आलो. माऊलीनी पाठविले आहे.’
माधवनाथांचा सर्वांनी समाधीची शाल वगैरे देऊन सत्कार केला. माधवनाथ म्हणाले तेव्हापासून कानाला खडा की शंका घ्यायची नाही!!
स्वरूपाश्रम काढला तेव्हा प्रत्येकास जेवणानंतर ताक प्यायला देत असत. कधी पाच माणसे येत, कधी पन्नास येत, कधी एक-दोनच येत. कारण फार लोकांना त्यावेळी स्वामींबद्दल माहीत नव्हते. स्वामी सत्पुरुष आहेत हे तेव्हा माहीत नव्हते जास्त लोकांना. तेव्हा मंडळाची सभा होती. भिडे, पटवर्धन वगैरे त्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला न जाता सभेस आले. त्या सभेत ठरले की आता ताक बंद करायचे. परवडत नाही. परत कोकणात कुणी ताक पीत नाहीत. उद्या रत्नागिरीहून दूध येईल. तेव्हा उद्या देऊ आणी परवापासून बंद करायचं. ठरलं. मग चहा झाला. गप्पा झाल्या. तेवढ्यात निरोप आला अप्पांनी जाताना भेटून जायला सांगितले आहे. तेव्हा भिडेंच्या लक्षात आले अरेच्चा! आपण दर्शन न करता मिटींगला आलो. अरे चला चला, दर्शनाला जाऊ. भिडे व पटवर्धन दोघे पाय धूवून स्वामींच्या दर्शनाला खोलीत गेले. अप्पांनी भिडेंची चौकशी केली. तब्येत कशी आहे. मुलगा काय करतो, नात काय करते… सर्व विचारले. पटवर्धनांनाही विचारले. मग काय म्हणाले, ‘ताक पचनास चांगले असते. तर ताक बंद करू नका. ताकाचे पैसे मी देईन. अन् मागे हात घालून पैसे काढले!! म्हणाले, ‘हे घ्या. कमी पडले तर माझ्याकडे मागा बरं कां.’
भिडेंनी कानाला हात लावला. तेव्हापासून समजलं हे आम्ही चालवत नाही. ही ‘त्यांची’ ताकद आहे. आम्ही कोण ठरविणार द्यायचं की नाही. ते ठरवितात. कोण काय काय पाठवितं. एवढी लोक रोज जेवतात. कसं काय घडतं. भाऊराव पण तसेच होते. तीस लाखाचा आम्ही संकल्प सोडला. अभंग ज्ञानेश्वरी ग्रंथ चौदा रुपयात द्यायचा. त्यासाठी निधी. एकोणतीस लाख रुपये जमले. मी बसलो होतो पावती फाडायला. मी म्हटले, ‘भाऊ, एकोणतीस लाख जमले बर कां. आता फक्त एक लाख जमले की आपले उद्दिष्ट पूर्ण होणार!’ भाऊ त्वरित म्हणाले, ‘करंदीकर चार पावत्या फाड. पंचवीस पंचवीस हजाराच्या.’ त्यांनी खिशातून एक लाख रुपये काढले व मला दिले. म्हणाले, माझे, माझ्या बायकोचे, वसंताचे आणी त्याच्या बायकोचे नावाने पावती कर. म्हणाले, झाले की नाही तीस लाख!! असे होते भाऊ! भाऊ ते भाऊच!! तन-मन-धन दिलं त्यांनी. समाधी मंदिर बांधू नये म्हणून किती विरोध झाला. पण बांधलं कि नाही भाऊंनी!
सुमनताई: एक गंमत सांगते मी पावसला असतानाची. तेव्हा तिथे एक पेटी ठेवलेली असे. असेच एकदा पेटी उघडल्यावर तीनशे रुपये निघाले.जेवणाचे लोक झाले होते पाचशे. भिडे, मालवणकर व देवळेकर असे होते त्या मिटींगमध्ये. ते सर्व म्हणाले इथे माणसं जास्त येतात व पेटीत पैसे कमी पडतात. तेव्हा प्रत्येकाकडून पाच पाच रुपये तीन दिवसाचे घ्यायचे. असे ठरले व ठरल्यानंतर भाऊ आत गेले स्वामींच्या खोलीत. स्वामी म्हणाले, ‘काय आहे. हे हॉटेल नाही. हा आश्रम आहे. एखादा मनुष्य पाच रुपये टाकतो त्यात चार माणसं जेवून होतात की!!’
करंदीकर: स्वामी काय होते. वेगळंच होत. आता असे संत होणे नाही. साधू दिसती वेगळाले | परी ते स्वरूपी मिळाले | अवघे मिळोनी एकचि जाले | देहातीत वस्तू ॥
आमचे स्वामी असे होते. काही साधू काळे, काही गोरे. पण देहातीत असतात. देहाच्या पलिकडे असतात. त्यामुळे ते एकरूप असतात. मामासाहेब दांडेकर म्हणायचे संत वेगळे आणि महाराज वेगळे. संत ज्ञानेश्वर महाराज संत. तुकाराम महाराज संत. संतांचे लक्षण सांगतो. मामासाहेब म्हणायचे, रंगावर जाऊ नका, भगव्या कपड्यावर जाऊ नका, केस किती वाढविले आहेत यावर जाऊ नका. तो संत आहे की नाही ते बघा. तो सकाळी बघा, दुपारी बघा, संध्याकाळी बघा, रात्री बघा. आपल्या बोधापासून ढळत नाही ना, ते बघा. विचारात काही फरक पडत नाही ना. बाई पाठविल्यावर काही फरक पडत नाही ना. ते बघा.
मामांची प्रवचने मी कधी चुकविली नाहीत. हडपसर पर्यंत जात असे मी सायकलवर प्रवचने ऐकायला. मामा फार सुरेख बोलायचे. अतिशय हुशार. मामांची गोष्ट सांगतो एक स्वामी स्वरूपानंदांबद्दल. त्यांच्या घरी काही मंडळी ज्ञानेश्वरी ऐकायला आली. स्थितप्रज्ञाची लक्षणे मामांनी पंधरा दिवस सांगितली. तेव्हा त्यात एक सौंदलगेकर होते त्यांनी मामांना विचारले, मामा, ही जी लक्षणे तुम्ही पंधरा दिवस सांगितली असा मिळणे अवघड आहे नाही का? असा कुणी मिळेल का? मामांनी विचारले तुला खरंच बघायचा आहे कां? तुला स्थितप्रज्ञ बघायचा आहे? मग रत्नागिरीजवळ एक खेडेगाव आहे पावस. तिथे स्वामी स्वरूपानंद आहेत त्यांना पहा. ते संत आहेत.
सुमनताई : बाबामहाराज आर्वीकरांच्या (श्रीक्षेत्र माचणूर, जिल्हा सोलापूर) एका पत्रात मी वाचलं. त्यांनी लिहिलं होतं की माझं सत्वगुणात्मक रूप पहायचं असेल तर तुम्ही पावसला जा. करंदीकर: ते कशाला, मातेचि गा पावसी | हे माझी भाक ॥
माझा मित्र शरद रेगे म्हणून क्रिकेटर रणजी ट्रॉॅफी खेळायचा बघा. टेस्ट पण खेळायचा. स्वामी स्वरूपानंदांचा अनुग्रहित. तर त्यानी एक पुस्तक क्रिकेटवर लिहिलं. ते अप्पांना नेऊन दिलं. ‘अरे वा वा! चांगलं पुस्तक आहे. वाचतो हं मी.’ आणि ते पुस्तक चाळलं त्यांनी. आणी त्यांनी विचारले, ‘का हो रेगे, विकेटकीपर किती आहेत भारतात?’ ‘एक नाव राहिलं. राजेंद्रसिंहजी.’ रेगे म्हणाले, मी गप्प बसलो. मी पुस्तक लिहिलं आणि यांनी सांगितलं मला राजेंद्रसिंह राहिले म्हणून. असे स्वामी होते!!
सुमनताई: मुंबईचे चांदोरकर होते न कडक बुंदीवाले. त्यांना अकरा मुले होती. ते स्वामींकडे जात असत. जाताना स्वामी प्रत्येक मुलाच्या नावाने खडीसाखर बांधून देत. चांदोरकर म्हणत, मला स्वत:ला मुलांची नाव लक्षात रहात नसत. पण स्वामींच्या बरोबर लक्षात!!
करंदीकर: संत तेचि संत. संत होऊनिया संतांसी पहावे | तरीच तरावे तुका म्हणे ॥
संतांची लक्षणे काही कळत नाहीत. देहातीत असतात ते. देह म्हणजे मी नाहीच… आपण, देह म्हणजे मी आहे. हा मी जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. हे वाक्य आहे. हा मी मेल्याशिवाय देव भेटत नाही व मी काही माणसाचा मरत नाही. तोपर्यंत देव भेटणार नाही. ज्याचा मी मेला त्याला देव भेटला. आता कुठनं मी मरायचा आपला!
अजून मी.. मी.. माझं… माझं…!!!
बराय, येऊ कां?
******
— शब्दांकन – कृष्णदास
PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
Leave a Reply