श्री रामकृष्ण परमहंस
पडता नाम कानांवरी, उठती रोमांच अगांवरी
नृत्य संकीर्तन करु हो लागे, भाव समाधि वरचेवरी
शक्ति उपासक माता काली, अखंड मुखी आई आई
भगवंताची भेट घडण्या, कामिनी कांचन त्यागा गाई
परमहंस तो रामकृष्ण हा, दक्षिणेश्वरी अखंड राही
आशीर्वाद मी हा घेतो, नमुनि भावे त्यांचे पायी
ठाकुरांच्या मुखातील साधक मार्गदर्शक अमोलिक बोधवचने
“पांडित्याद्वारा त्याची प्राप्ति होणे शक्य नाही.”
“कोणाचीही निंदा करू नका – अगदी एखाद्या किडयाचीही नाही.”
“त्यानं कृपा केली नाही तर काही केल्या संशयनिवृत्ति व्हायची नाही.”
“त्यानंच दया करून संशय निरसून टाकले अन् दर्शन दिलं की कसलंच दु:ख नाही.”
“चैतन्याचं चिंतन करून कां कुणी अचैतन्य झाला आहे कधी?”
“ईश्वरावर खूप प्रेम न जडल्यास काहीच होणं शक्य नाही.”
“अनुरागाखेरीज का कधी तो मिळाला आहे?”
“लक्षात ठेवा, ईश्वराला पाहता येतं!”
“चित्त शुद्ध करून भक्तीचा लाभ करून घेतल्यानंतर त्याच्याच कृपेनं त्याचं दर्शन होतं.”
“विश्वास नाही अन् इकडे मारे पूजा, जप, संध्यादि कृत्ये चालली आहेत – अशाने काहीही व्हायचं नाही.”
“अवताराद्वाराच ईश्वरी प्रेमाचा व भक्तीचा आस्वाद घेता येतो.”
“आत्मज्ञान झाल्यावर सुख-दु:ख, जन्म मृत्यू सारं स्वप्नासारखं भासतं. ”
“तोच सर्वत्र ही जाणीव जर राहील तर तो जीवन्मुक्तच होय. पण साऱ्यांचाच असा विश्वास असत नाही.”
“भगवद्दर्शनाचं लक्षणच हे की हळूहळू कर्मत्याग होत जातो.”
“भक्त कुणाला म्हणायचं? जो त्यांच्यात राहतो, ज्याचं मन, प्राण, अंतरात्मा सारं काही तद्वत आहे तोच भक्त.”
“ज्याच्या चैतन्यानं सारं जग चैतन्यमय झालं आहे त्याचं चिंतन करून कुणी अचेतन का होईल?”
“अकिंचनांची, दीनांची भक्ति ईश्वराला अतिशय आवडते.”
“विषयी माणसाचा ईश्वर म्हणजे काय, जाणता? घरात अक्का- आत्यांची धुसफुस कानावरून गेल्यानं लहान पोरं देखील भांडण करताना म्हणतात, जा रे, देव आहे माझा वाली!”
“संसारी व्यक्तिच्या पक्षी मधेमधे साधुसंग फार आवश्यक.”
“ईश्वरावर भक्ति असल्यास माणूस साधुसंग स्वत:हून धुंडाळेल”
“जे शिष्य करीत हिंडतात ते खालच्या पातळीवरचे लोक होत. अन् जे सिद्धाई इच्छितात तेही खालच्या पातळीवरचे होत. ईश्वराठायी शुद्ध भक्ति उपजणे हे या असल्या साऱ्या लोकांच्या पक्षी फार कठीण.”
“मनाने त्याग झाला की झालं. तसे झाले तरीही तो संन्यासी.”
“अनासक्त होऊन संसारात राहून धर्म केल्यास, सर्व मिथ्या हे जाणून ज्ञानानंतर संसारात राहिल्यास बरोबर ईश्वरलाभ होतो.”
“प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे.”
“तो अंतर्यामी आहे.”
“संसारासक्त मनाने ईश्वर मिळविता येत नसतो.”
“जीव ईश्वराचं चिंतन करतो खरा, पण पुन्हा पुन्हा तो त्याला विसरतो आणि संसारात आसक्त होतो.”
“कामना असेपावेतो कितीही साधन करा, सिद्धिलाभ होत नाही.”
“अहंकाराचा त्याग न केल्यास ईश्वराची कृपा होत नाही.”
“जोपर्यंत ईश्वराचा लाभ होत नाही तोपर्यंत वाटत असतं आम्ही स्वाधीन-स्वतंत्र. अन् हा भ्रमही तोच ठेवून देत असतो. नाहीतर पापाची शीग ओलांडून गेली असती. सारं तोच करतो असं समजून लोकांना पाप करण्याचं भय वाटलं नसत. पापाबद्दल शिक्षा राहिली नसती.”
“जशी ज्याची कुवत, त्याप्रमाणेच तो एखाद्या जिनसेची किंमत देतो.”
“सत्य भाषण ही कलियुगातील तपश्चर्या होय.”
“भगवंताचा लाभ करावयाचा असल्यास तीव्र वैराग्य आवश्यक आहे. जे काही ईश्वराच्या मार्गात विरुद्ध असं वाटेल त्याचा तत्क्षणी त्याग केला पाहिजे. पुढे होईल म्हणून लांबणीवर टाकणं उचित नाही. कामिनी कांचन ईश्वराच्या मार्गात विरोधी आहे. त्यामधून मन काढून घेतलं पाहिजे.”
“ज्याने स्त्रीसुख सोडले आहे त्याने खरोखरच साऱ्या जगाचे सुख सोडले आहे. ईश्वर त्याच्या अगदी जवळ असतो.”
“परमेश्वराच्या नामोच्चारानं सारी पापं दग्ध होतात. काम, क्रोध, शरीसुखाची लिप्सा, सारी पळून जातात.”
“भोगवासना गेल्यावर ईश्वरासाठी पंचप्राण व्याकुळ होतात.”
“आंतरिक विश्वासानेच त्याचा लाभ होऊ शकतो आणि त्याच्या संबधीच्या सार्याच गोष्टींवर विश्वास ठेवू शकल्यास अधिकच शीघ्र प्रगति होते.””परमहंस
“त्याची कृपा झाल्यास आठही पाश एका क्षणात गळून पडू शकतात.”
“संसारी लोक साधुदर्शनाला जातील तरी विषयाच्या भाकडकथाच अधिक बोलतील. ”
“विश्वास हवा. तर्कविकार चूलीत जावो साला! नको तो मला. गुरुवाक्यावर बालकासारखा विश्वास हवा”
“सत्वगुणाचा उद्य झाल्यावर मगच परमेश्वराचा लाभ होऊ शकतो.”
“कामना सोडून देऊन कर्म करणं फार कठीण. निष्काम कर्म म्हणजे तोंडच्या गोष्टी नव्हेत”
तर्कविचार करू नका. तर्कटीपणाने साधकाची अखेर हानी होते
परमेश्वराला आळवताना त्याच्याशी कोणतातरी एखादा संबंध जोडला पाहिजे – मी त्याचा सखा, त्याचा दास किंवा त्याचे संतान असा भाव किंवा वीरभाव.
“संसारातील आसक्ति जितकी कमी होईल तितके त्याचे ज्ञान वाढेल. संसारावरची आसक्ति म्हणजे कामिनी कांचनावरची आसक्ति.”
“मन, प्राण, अंतरात्मा ज्याचा ईश्वराकडेच लागला आहे तोच साधू. साधू नेहमी ईश्वरचिंतनात गुंग असतो, ईश्वरीय गोष्टीखेरीज तो दुसरं काहीच बोलत नाही आणि सर्व भूतांत ईश्वर आहे हे जाणून त्यांची सेवा करतो.”
“जो कामिनीकांचनत्यागी आहे तोच साधू”
“कामिनी-कांचनच माणसाला ईश्वरापासून विमुख करीत असतात. ती माणसाला ईश्वराकडे जाऊ देत नाहीत. हेच बघा ना, सर्वजण आपल्या कुटुंबाची तारीफ करीत असतात. बायको मग चांगली असो की वाईट असो – जर विचाराल की तुमचं कुटुंब कसं काय आहे हो, तर लगेच म्हणतात की खूप चांगली आहे महाराज ती”
“महाभाव, प्रेम लाभल्यास दिसते की ईश्वराखेरीज आणखी काहीही नाही.”
“ह्या काहीजणांना ज्ञान लाभत नसते :- पहिले म्हणजे ज्यांचे मन वाकडे असते, सरळ नसते त्यांना; दुसरे म्हणजे ज्यांना बाह्य शुद्धतेच्या (सोवळ्याओवळ्याच्या) वेडानं पछाडलेले असतं त्यांना; आणि तिसरे म्हणजे जे संशयात्मे असतात त्यांना”
“एकवेळ त्याचा आनंद लाभल्यास तर्कविचार, वादावादी करण्याची इच्छा पळून जाते. मध पिण्याचा आनंद लाभल्यास भुंगा मग गुं गुं करीत नाही.”
“ध्यानाच्या वेळी पहिल्यापहिल्याने इंद्रियांचे सारे विषय समोर येतात. गाढ ध्यानात ते सारे मग येत नाहीत.”
“आरशावर मळ साचलेला असल्यास त्यात चेहरा दिसत नाही. चित्त शुद्धी झाल्याखेरीज स्व-स्वरूपाचे दर्शन होत नाही.”
“वेदान्तात सांगितले आहे की बुद्धि शुद्ध झाल्याखेरीज ईश्वराला जाणण्याची इच्छा उपजत नाही. शेवटचा जन्म असल्याखेरीज वा खूप तपश्चर्या असल्याखेरीज माणूस उदार सरळ होत नाही.”
“साधनेच्या अवस्थेत थोडे कष्ट करायला हवेत, त्यानंतर सरळ रस्ता लागतो. नदीतील वळणे ओलांडून अनुकूल वाऱ्यात नाव सोडून द्या.”
“अगदी मनापासून ईश्वराला जो जाणू इच्छिल त्याचंच होईल. होईलच होईल. जो व्याकुळ आहे, ईश्वराव्यतिरिक्त आणखी काही इच्छित नाही त्याचंच होईल.”
“भक्तिचं बीज एकवार पडल्यास अगदी अमोघ असतं – ते कदापि वाया जायचं नाही. हळुहळू झाड, फळं फुलं दिसू लागतील.”
“तुम्ही हे जाणून ठेवा की शेकडो हजारो उपदेश दिलेत तरी वेळ आल्याखेरीज फळ येणार नाही. एक लहान पोर निजताना आईला म्हणाले, ‘आई, मला हागू लागेल तेव्हा उठवून दे हं.’ आई त्याला म्हणाली ‘बाबा, हागूच तुला उठवील, त्यासाठी तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही!’. तद्वतच, भगवंतासाठी व्याकुळता योग्य वेळ आली म्हणजेच उत्पन्न होत असते.”
“साधुसंग सर्वदाच आवश्यक. साधू ईश्वराची ओळख करून देत असतात.”
“त्याची कृपा त्याच्या अडाणी, पंडित, सर्वच मुलांवर सारखी असते. जो त्याच्यासाठी व्याकुळ होतो त्यावर त्याची कृपा होते. मग तो कुणीही आणि कसाही असो. बापाचे प्रेम आपल्या सर्वच मुलांवर समान असते.”
“शुद्धहृदयाच्या भक्तांमध्ये त्याचा (ईश्वराचा) प्रकाश आणखी जास्त असतो.”
“‘मी आणि माझं’ यांनीच सत्याला झाकून टाकलं आहे. समजू देत नाहीत.”
“निराकाराची साधना जमणार नाही कां म्हणून? पण एकूणच कठीण मार्ग. कामिनीकांचन पुरतेपणी सोडल्याखेरीज नाही जमायचं! पुरता त्याग व्हायला पाहिजे. अंतर्बाह्य दोन्ही तऱ्हेचा. एवढीशीदेखील विषयबुद्धि असून चालायचं नाही.”
“तपस्या हवी तरच वस्तुलाभ होईल. शास्त्राचे श्लोक तोंडपाठ करूनही काही व्हायचे नाही. ‘भांग, भांग’ असे नुसते तोंडाने म्हणून नशा यायची नाही त्यासाठी भांग प्यायला हवी.”
“साधारण बुद्धीने आत्मतत्व कळू शकत नाही. त्यासाठी साधुसंग केला पाहिजे. वैद्याबरोबर रोग्यांकडे जात राहिल्याने नाडी पाहणे शिकता येते.”
“ईश्वरलाभ करून घ्यावयाचा असल्यास कोणतातरी एक मार्ग पक्का पकडून चालायला हवे. इतर सर्व मतांनाही एक एक मार्ग असे समजावे. माझाच मार्ग काय तो बरोबर आणि बाकी सगळ्यांचे चुकीचे, अशी जाणीव कधी बाळगू नये. कुणाविषयीही विद्वेषाची भावना नसावी.”
“संसार म्हणजे दूध व पाणी यांचे मिश्रण. चिदानंदरस आणि विषयरस यांचे मिश्रण! हंसाप्रमाणे केवळ दूध पिऊन पाणी टाकून द्या.”
“पाकाल माशाप्रमाणे संसारात राहा. तो मासा चिखलात राहातो पण त्याचे अंग बघा, नेहमी स्वच्छ अन् उजळ असते.”
“व्याकुळ ह्रदयानं त्याची प्रार्थना करा की जेणेकरून त्याच्या नामसंकीर्तनात गोडी वाटेल. तो तुमची मनोवांच्छा पूर्ण करील.”
“संसारात मुंगीप्रमाणे राहा. हा संसार नित्य अनित्य यांचे मिश्रण आहे. साखर आणि वाळू यांचे मिश्रण. मुंगी बनून फक्त साखर तेवढी घ्या.”
“जोवर भोगवासना रसरसते आहे तोवर प्राण ईश्वरासाठी व्याकुळ कधीच होणार नाहीत.”
“तुम्ही लोक उठल्यासुटल्या ‘प्रेम प्रेम’ म्हणत असता पण प्रेम म्हणजे काय परसातली भाजी रे?. प्रेमाची लक्षणं दोन. पहिलं म्हणे जगाचा, भोगाचा पूर्ण विसर पडायला हवा. ईश्वराठायी असं प्रेम व्हायला हवं की जग आहे की नाही! प्रेमाचं दुसरं लक्षण म्हटलं म्हणजे, आपला स्वत:चा देह एवढी प्रिय वस्तू ना, पण त्यावरही ममता नाही. देहात्मबोध समूळ नाहीसा होतो. ज्याच्या ठायी ईश्वरानुरागाची दैवी संपदा प्रकट झाली आहे त्याला ईश्वरलाभ व्हायला उशीर नाही.”
“ज्याला विचारावे तो म्हणतो की ‘होय महाराज, माझी बायको चांगली आहे.’
एकाचीसुद्धा बायको वाईट नसते!!” (हशां)
“पिलू पुरेसं वाढेपर्यंत पक्षीण अंड टोचत नसते. योग्य वेळ आल्यानंतर मगच ती ते फोडते.”
“फार खात जाऊ नका अन् शुद्धाशुद्धतेचं वेड सोडून द्या. असल्या कर्मठांना ज्ञान होत नसतं कधी. बाह्याचार जरूर तेवढाच पाळावा. उगीच स्तोम माजवू नये त्याचं”
“आणखी एखाद्या गोष्टीकडे खूप मन जाऊ लागल्यावर ईश्वराकडे ते तितकंसं लागतं नसतं.”
“एक गोष्ट ध्यानात ठेवा. बाह्य शुचि वगैरे आचारांचं उगाच फाजील स्तोम कधीच माजवू नका. एका साधूला एकदा खूप तहान लागली. रस्त्यानं एक भिस्ती पाणी घेऊन चाललेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यानं प्यालाभर पाणी त्या साधूपुढं केलं. साधुबुवा विचारतात, ‘पण तुझी ही पखाल स्वच्छ आहे ना?’ भिस्त्यानं उत्तर दिलं. ‘महाराज, माझी पखाल खूप स्वच्छ आहे. गलिच्छ आहे आपलीच!’ तिच्यात मलमूत्र वगैरे नाना प्रकारचा मळ साचून आहे. म्हणून म्हणतो की आपण बिनदिक्कत या माझ्या पखालीतलं पाणी प्या, त्याला इतकी देखील हरकत नाही.’ तुमची पखाल, म्हणजे देह, ‘तुमचं पोट!'”
“भाराभार शास्त्रं वाचण्याची वास्तविक काही जरूर नाही. जर विवेक नसेल तर नुसत्या पांडित्याला काय जाळायचं आहे? षट्शास्त्रं कोळून प्यायल्यानंसुद्धा काही म्हणता काही व्हायला बसलं नाही. निर्जन गुप्त जागी एकांतात रडत रडता त्याला आळवा. तोच सारंकाही करून देईल.”
“सच्चिदानंदच गुरुरूपानं येत असतात. मानवगुरुजवळून दीक्षा घेऊन त्याला जर शिष्य माणूसच समजत राहिल तर काहीच होणार नाही. गुरूकडे साक्षात परमेश्वरबुद्धीनं बघितलं पाहिजे.”
“सत्याला चिकटून रहा, मग ईश्वरदर्शन झालेच पाहिजे.”
“त्याचं दर्शन घडायला साधना करायला हवी. मला खूप कठोर साधना करावी लागली. बेलाच्या झाडाखाली किती प्रकारची साधना करून चुकलो आहे मी. झाडाखालीच पडला राही, ‘मा, दर्शन दे’ म्हणत. डोळ्यातल्या पाण्यानं शरीर चिंब होऊन जाई!”
“सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हटली म्हणजे विश्वास. भाव तसा लाभ अन सार्याचं मूळ विश्वास. एकदाचा विश्वास उत्पन्न झाल्यावर मग कशाचंही भय नाही.”
“खरा भक्त ओळखण्याचे काही ठोकताळे आहेत. खर्या भक्तात धारणाशक्ति खूप असते. नुसत्या काचेवर चित्र उमटत नाही, पण तिलाच काळं लुकण लावल्यास चित्र उठतं, फोटो घेताना होतं तसं. भक्ति म्हणजे काळं लुकण”
“खरा भक्त ओळखण्याचे काही ठोकताळे आहेत. गुरूचा उपदेश ऐकून तो स्थिर होऊन जातो, जणू गारुड्याच्या पुंगीसमोरचा नाग”
“काही काहींत चैतन्य जागृत झालं असतं. पण त्याची काही लक्षणं असतात. ईश्वरीय कथा सोडून इतर काहीच ऐकणं आवडत नाही. आणि ईश्वरीय कथा सोडून इतर काही बोलणंही आवडत नाही. पाहा ना, सात समुद्र, गंगा, यमुना, नद-नदी सगळयात पाणी तुडुंब भरलेलं आहे, पण चातकाला पाहिजे पावसाचंच पाणी. प्राण तहानेनं व्याकुळ झालेले, गळा सुकून गेलेला, पण दुसरं पाणी मात्र पिणार नाही हा त्याचा बाणा.”
“वाघ जसा कचाकचा लचके तोडून जनावर पार फस्त करून टाकतो तसाच ‘अनुरागवाघ’ काम, क्रोध वगैरे रिपूंचा फडशा पाडून टाकतो. एकवार ईश्वरावर प्रेम उत्पन्न झाल्यास कामक्रोध वगैरे उरत नाहीत. गोपींची अशीच अवस्था झाली होती, कारण कृष्णावरील प्रेम”
“खूप करारीपणा हवा, तर कुठं साधना होईल. दृढप्रतिज्ञ झालं पाहिजे”
“मन नेहमी ईश्वराकडे लावा. प्रथम थोडं झटावं लागेल. पण मग पेन्शन उपभोगायला मिळेल”
“ज्याला ईश्वर भेटला आहे त्याचा भाव कसा असतो माहीत आहे? मी यंत्र तू यंत्री. जसं चालवशील तसं चालेन. जसं बोलवशील तसं बोलेन”
“भोगलिप्सेची शांति न झाल्यास वैराग्य होणार नाही”
“संसारी लोकांचा ईश्वरावरील अनुराग क्षणिक असतो. जसा तव्यावरील पाण्याचा शिंतोडा”
“हृदय शुद्ध झाल्याखेरीज ईश्वर आहे असा विश्वासच व्हायचा नाही”
“संसार अन् मुक्ति, दोन्ही ईश्वराच्या हाती. त्यानंच आम्हाला संसारात जखडून ठेवलं आहे. आणि मनात येऊन तो परत बोलावेल तेव्हाच मुक्ति मिळेल. मूळ खेळायला गेलं आहे, जेवायची वेळ झाली कि आई त्याला बोलावून घेते. एखाद्याला मुक्ति द्यायची वेळ आली की ईश्वर स्वत:च त्याला साधूचा संग घडवून देतो. अन् ईश्वरलाभास्तव व्याकुळताही उत्पन्न करतो त्याच्यात. नोकरी गेल्यावर कारकुनाची जशी व्याकुळता असते, तशी. तो मग रोज कचेरी-कचेरीतून वणवण फिरतो अन् विचारतो – ‘काय हो, एखादी जागा आहे का रिकामी?’ व्याकुळता आल्यावर साधक एकसारखा तळमळतो, एकच ध्यास – काय केल्यानं ईश्वराचं दर्शन होईल?”
“आत्मदर्शनाचा उपाय आहे व्याकुळता”
“अनुराग उत्पन्न झाल्यावर ईश्वरलाभ होतो. पराकाष्ठेची व्याकुळता हवी. खूप व्याकुळता असल्यास सगळं मन त्याच्याठायी लागतं”
“तुम्हाला ईश्वराला आळविण्यासाठी वेळ नाही? तुम्ही त्याला आममुखत्यारी द्या, त्याच्यावर सर्व भार टाका. पण लक्षात ठेवा की त्याचा लाभ झाला नाही तर सारेच व्यर्थ होय”
“विषयासक्ति जसजशी कमी होत जाईल, ईश्वरावरील रुचि तसतशी वाढत जाईल”
“शेवाळल्या तलावातील शेवाळ दूर सारून दिले तरी लगेच परत जमते, तद्वतच मायेला घालवून दिले तरी ती परत दत्त म्हणून येऊन उभी राहते. तथापि शेवाळ दूर सारून मध्ये बांबू आडवा बांधून टाकला तर त्याला हटवून शेवाळ परत येऊ शकणार नाही. मायेला घालवून दिल्यावर ज्ञानभक्तिचे कुंपण उभे करता आले तर माया आत शिरू शकणार नाही, केवळ सच्चिदानंदाचाच प्रकाश राहील.” – श्री रामकृष्ण परमहंस
“सहनशीलतेपरीस आणखी श्रेष्ठ गुण नाही. जो सहन करतो तोच टिकतो, जो सहन करीत नाही तो नाश पावतो. सार्या बाराखाड्यात ‘स’ च तीन वेळा येतो – श ष स; सहन करा, सहन करा, सहन करा.”
“विषयभोग, स्त्री-पुत्र किंवा मानमरातब यांची कामना उराशी बाळगून ईश्वराची आराधना करू नका. केवळ सच्चिदानंदाच्या लाभासाठीच जो त्याची प्रार्थना करतो त्याला ईश्वरलाभ होतोच होतो.”
“मन नि मुख एक करणेच यथार्थ साधना. एरव्ही मुखाने म्हणायचे, ‘हे भगवन्! तूच माझं सर्वस्व आहेस’, अन् मनात मात्र विषयालाच सारसर्वस्व समजून बसायचं. अशा प्रकारच्या लोकांची सारी साधना विफल होते.”
“सुताचा पीळ जाऊन थोडा जरी तंतू निघाला असेल तरी ते सुईत जात नाही. तद्वतच जोपर्यंत लेशमात्र वासना शिल्लक आहे तोपर्यंत भगवंताचा लाभ होणे शक्य नाही. वासनारहित होऊन मन जेव्हा शुद्ध होईल तेव्हाच सच्चिदानंदाचा लाभ होईल.”
“चकमकीचा दगड शंभर वर्षे पाण्यात पडून राहिला तरी त्यातला अग्नी नष्ट होत नाही, बाहेर काढून लोखंडाने प्रहार करताच ठिणगी तयार. खरा विश्वासी भक्त वाटेल तेवढया कुसंगतीत राहिला तरी त्याची श्रद्धा भक्ती ढळत नाही. भगवत्कथा ऐकताच तो परत ईश्वरप्रेमाने उन्मत्त होऊन जातो.”
“त्याग बाणल्याखेरीज ईश्वराचा लाभ कसा बरे होणार? समजा, एकादी वस्तू दुसर्या वस्तूवर ठेवली आहे. पहिली दूर केल्याखेरीज ती दुसरी वस्तू कशी काय हस्तगत होणार?”
पूर्वजन्मीची तपश्चर्या असल्याखेरीज सरलता अंगी येत नसते
“कपट, वक्रता, हिशेबखोरपणा, नागमोडी स्वभाव इत्यादि असल्यास ईश्वराचा लाभ होत नाही.”
“नारदांच्या स्तवाने प्रसन्न होऊन राम म्हणाले की ‘नारदा, तुम्ही वर मागा’. नारदांनी मागितली शुद्धा भक्ति. आणि म्हणाले की, हे रामा, मी जेणेकरून तुझ्या भुवनमोहिनी मायेनं मोहित होणार नाही असे कर.”
“शुद्ध भक्तीच सार, बाकी सर्व मिथ्या”
“वैराग्य पुष्कळ प्रकारचे असते. एक प्रकार आहे मर्कट वैराग्य – संसाराच्या जंजाळाने जेरीस आल्याने येणारे वैराग्य! हे वैराग्य फार दिवस टिकत नाही. अन् खरेखरे वैराग्य म्हणजे – सर्वकाही आहे, कशाचाच अभाव नाही, आणि तरीही सारे मिथ्या वाटू लागणे. वैराग्य एकाएकी उपजत नसते. वेळ आल्याखेरीज होत नाही.”
“ज्ञानप्राप्तीचे अधिकारी फारच थोडे असतात. गीतेत म्हटले आहे – हजार हजार लोकांपैकी एखादा भगवंताला जाणण्याची इच्छा धरतो. परत, ज्यांना अशी भगवंताला जाणण्याची इच्छा आहे असल्या हजार लोकांतील एखादा त्याला जाणू शकतो”
“सदसत् विचाराचा उदय झाल्यावरच ईश्वराला धुंडाळण्याची इच्छा होत असते.”
“ईश्वरापाशी भोगाची इच्छा धरल्यास माणूस शेवटी गोत्यात येतो. मनात कितीतरी कामना वासना उठत असतात, सगळ्याच कामनांनी माणसाचे मंगल होत नसते. ईश्वर कल्पतरू आहे, त्याच्याजवळ जी कामना धरून कुणी जे मागेल ते येऊन पडेल.”
“पैशाचा कधी गर्व धरू नये. तुम्ही जर म्हणाल की मी धनिक आहे तर तुमच्यापेक्षाही वरचढ श्रीमंत आहेच. अन् त्याहीपेक्षा, त्याहीपेक्षा… हे कधीच संपणार नाही. तिन्हीसांजानंतर जेव्हा काजवे चमकू लागतात तेव्हा त्यांना वाटतं की आम्ही जगाला प्रकाश देत आहो. पण तार उगवताक्षणीच त्यांचं गर्वाचं घर खाली होतं. मग तारे समजू लागतात की आम्हीच जगाला प्रकाश देत आहो!. थोडया वेळानंतर चंद्र निघतो तेव्हा तारे लज्जेनं मलिन होऊन जातात. आता चंद्राची पाळी! त्याला वाटतं की माझ्याच चांदण्यानं दुनिया हसते आहे, मी जगाला उजेड देत आहे! पाहता पाहता अरुणोदय होतो नि सूर्य आपल्या प्रभेनं तळपू लागतो. चंद्र धूसर होतो – थोडया वेळेनंतर दिसेनासादेखील होतो! धनिक लोक जर असा विचार करतील तर त्यांना धनाच्या अहंकाराची बाधा होणार नाही.”
“लोक साधना करतात, पण मन कामिनी-कांचनात घुटमळत असते. मन भोगाकडे वळलेले असते म्हणूनच त्यांची साधना नीट होत नाही, तिला फळ येत नाही.”
“ज्ञानाची दोन लक्षणे आहेत. पहिले लक्षण म्हणजे अविचल बुद्धि – हजारो दु:खे, कष्ट, संकटे , विघ्ने येवोत – ज्ञानी निर्विकार असतो. जशी लोहाराची ऐरण – तुच्यावर घणाचे कितीही घाव बसोत, काही परिणाम होत नाही. अन् दुसरे लक्षण म्हणजे जिद्द. काम क्रोध माझे अनिष्ट करतात काय?- ठीक आहे, हा केला त्यांचा अजिबात त्याग! कासवाने जर आपले हातपाय आत ओढून घेतले तर तुम्ही त्याला कापून चार तुकडे केलेत तरी तो ते फिरून बाहेर काढणार नाही.”
“नाना शास्त्रे जाणून काय होणार? भवनदी पार कशी करायची हे जाणणेच आवश्यक. ईश्वराच वस्तू, बाकी सर्व अवस्तू.
लक्ष्य वेधण्याच्या वेळी द्रोणाचार्यांनी अर्जुनाला विचारले की ‘तुला काय काय दिसत आहे? हे राजे तुला दिसतात काय?’ अर्जुनाने उत्तर दिले , ‘नाही.’ ‘मी दिसतो काय?’ ‘नाही.’ झाड दिसते काय?’ ‘नाही.’ ‘झाडावरचा पक्षी दिसतो काय?’ ‘नाही.’ मग काय दिसत आहे? ‘फक्त पक्षाचा डोळा’
ज्याला फक्त पक्षाचा डोळाच दिसतो तोच लक्ष्य वेधू शकतो. केवळ ईश्वराच वस्तू आणि बाकी सर्व अवस्तू असे ज्याला दिसते तोच हुशार बाकी काही जाणण्याची मला काय गरज? हनुमान म्हणाला होता की मी तिथी, नक्षत्र वगैरे काही जाणत नाही. मी आपला केवळ रामाचे चिंतन करतो.”
“ईश्वराकडे मन कसे लागले पाहिजे? जसे सतीचे पतीकडे, कृपणाचे धनाकडे किंवा विषयी माणसाचे विषयाकडे असते तसे. ईश्वरासंबधी ज्या वेळी असला ओढा उत्पन्न होईल त्या वेळी ईश्वराचा लाभ होईल.”
“अहेतुकी भक्ति जर साधली तर फार चांगले होईल. ‘मुक्ति मान पैसा रोग बरा होणं मला हे काहीही नको, केवळ तू हवास’ याचं नाव आहे अहेतुकी भक्ति”
“मुळे खाल्ले म्हणजे ढेकरांना मुळ्याचाच वास येतो. तसेच मनुष्याच्या मनात जो भाव असतो तो त्याच्या बोलण्याचालण्यातून प्रकट होतो.”परमहंस
“परमेश्वराच्या नामात खूप शक्ति असते. अविद्येचा पार फडशा पाडील. बीज इतकं कोमल, अंकुर इतका कोवळा असतो ना? पण टणक जमिनीला भेदून बाहेर पडतो, जमीन दुभंगून जाते त्याच्यापुढं.”
“कर्म सोडणे शक्य नाही. मी चिंतन करतो, मी ध्यान करतो हे देखील कर्मच होय. भक्तीचा लाभ झाल्यास विषय कर्म आपोआपच कमी होऊन हाते. ते मग आवडेनासे होते. खडीसाखरेचे सरबत मिळाल्यावर मातकट गुळवणी कोण पिऊ इच्छील?”
“सुरवातीस एखाद्या निर्जन जागी बसून ध्यानाचा अभ्यास करावा लागतो. त्यानंतर ध्यानाची चांगली सवय झाली की मग वाटेल तिकडे ध्यान होऊ शकते. रोप जोवर लहान असते तोवर त्याला कुंपण वगैरे घालून त्याची काळजीपूर्वक जोपासना करावी लागते, नाहीतर गाईबकर्या त्याला खाऊन टाकतात. उलट तेच वाढून मोठे झाड झाल्यावर मग त्याला दहाबारा गाई अन बकर्या बांधल्या तरी काही बिघडणार नाही.”
“शास्त्रं नुसतं वाचून भागत नाही. कामिनीकांचनात घुटमळल्यानं शास्त्रांचं मर्म काही केल्या अवगत होत नाही.”
“ईश्वराकडे जास्त मन ठेवून थोडयाश्या मनाने संसाराची कामे करावीत.”
“सगळेजण गुरू होऊ इच्छितात, शिष्य कुणी होऊ इच्छित नाही.”
“तो तर लोहचुंबक लोखंडाला जसे ओढतो, त्याप्रमाणे आपणाला ओढतच असतो. लोखंडाला चिखल माखलेला असल्यास तो चुंबकाला जाऊन चिकटू शकत नाही. ईश्वरासाठी रडता रडता तो चिखल धुऊन जातो तेव्हा माणूस पटकन् ईश्वराला चिकटून जातो!”
“त्याला शरणागत व्हा अन् व्याकुळ होऊन प्रार्थना करा की जेणेकरून अनुकूल वारा वाहो, जेणेकरून शुभयोग होवो. व्याकुळ होऊन आळविल्यास तो ऐकेलच ऐकेल.”
“कां बरं ईश्वराकडे मन जात नाही? ईश्वरापेक्षा तिचा (महामायेचा) जोर जास्त!”
“अज्ञानासाठीच पालक नेमला जात असतो. पोर स्वत: इस्टेटीचं रक्षण करू शकत नाही, म्हणून राजा त्याचा भार घेतो. माणसानं अहंकाराचा त्याग केल्याखेरीज ईश्वर त्याचा भार घेत नाही.”
“फार विचार करीत राहणे ठीक नव्हे, आईच्या पादपद्मी भक्ति असली की मिळविलं. अति विचारानं सारंच बिघडून जातं. इथल्या तळ्यात वरचं वरचं पाणी प्या, चांगलं स्वच्छ पाणी मिळेल. जरा खोल हात घालून थोडी हालवाहालव केल्यास लगेच पाणी गढूळ होऊन जातं.”
“माझं म्हणणं मानतोय कोण? मी सोबती धुंडाळतोय – माझ्या स्वभावाचा, मनोभावाचा कुणी खूप भक्त दिसल्यास वाटू लागतं की हा बहुधा माझा भाव घेऊ शकेल. पण नंतर दिसू लागतं की तो वेगळंच वागू लागतो!.”
“जे संसारात त्याला आळवू शकतात ते वीर भक्त होत. डोक्यावर वीस मणांचे ओझे, पण तरीही ईश्वराला मिळविण्याचे ते यत्न करीत असतात. याचेच नाव वीर भक्त.”
“फार ऐश्वर्य लाभल्यास ईश्वराचा विसर पडून जातो. ऐश्वर्याचा स्वभावच आहे हा.”
“जोडा घातलेला असल्यास माणसाला काटेरी वनात भय नाही. ‘ईश्वर सत्य, बाकी सारं अनित्य’ हा बोध असल्यास कामिनीकांचनात मग भय नाही.”
“आनंदाने भगवंताला धरून रहा. असा प्रयत्न करता करता एक दिवस तो तुला लाभून जाईल.”
“ब्रह्मज्ञानाची अवस्था मनाचा नाश होताच लाभते.”
“ईश्वर बालक स्वभावाचा आहे. जसं, एखादे मूल पदरात रत्न घेऊन बसलं आहे. कितीतरी लोक रस्त्यानं निघून जात आहेत. पुष्कळजण त्याच्याजवळ रत्न मागत आहेत. पण ते धोतरावर हात दाबून तोंड फिरवून म्हणतं, ‘ अं हं, मी देणार नाही’. आणि कदाचित एखाद्यानं मागितलं नसेल, तो आपला असाच चालला आहे, तरी त्याच्या मागेमागे धावत जाऊन आपण होऊन त्याला ते रत्न देऊन टाकील! बालकाचा स्वभाव हा असा असतो.”
” ‘आमचा भ्रम काय जाईल?’, ‘आमचं काय काही होईल?’, ‘आम्ही पापी’ – असल्या साऱ्या कल्पना सोडून द्या अन् असला विश्वास हवा की, ‘मी एकवार रामाचं नाव घेतलं आहे, माझ्यात परत पाप?’ ”
“सगळेच जण त्याला जाणू शकतील. सगळ्यांचाच उद्धार होईल. तथापि कुणाला सकाळी लवकर लवकर जेवायला मिळते, कुणाला दुपारी तर कुणाला संध्याकाळी. पण कुणी उपाशी मात्र रहायचा नाही. सगळेजण आपले स्वरूप जाणू शकतील.”
“स्वत:च्या अंतरंगी स्वत:त मग्न रहा.”
“जीव ईश्वराचं चिंतन करतो खरा, पण त्याचा ईश्वरावर विश्वास नसतो.”
“आचार्याचं काम करणं फार कठीण. त्यानं स्वत:चीच हानी होते. चार लोक मानताहेत बघून लगेच पालखट मारून बसतो नि म्हणतो – ‘मी उपदेश देतो, ऐका सर्वजण!’ असला प्रकार फार वाईट. थोडासा मानसन्मान मिळण्यावरच अशा माणसाचं सारं आटोपतं.”
“जेव्हा भक्तीचा उन्माद उत्पन्न होतो तेव्हा मग माणूस वेदविधी मानीत नाही.”
“ईश्वराच्या विरहाचा अग्नि सामान्य नसतो. मी ह्या अवस्थेत तीन दिवस बेशुद्ध होतो. हालचाल करू शकत नव्हतो. एका जागी पडलो होतो. शुद्धीवर आल्यावर बामनीन मला धरून घेऊन गेली. परंतु हाताने माझ्या अंगाला शिवायची सोय नव्हती. अंग जाडया उपरण्याने झाकले. त्या उपरण्यावरून हातानं मला धरून घेऊन गेली. अंगाला जी सारी माती लागली होती, ती सारी करपून गेली होती!”
“विश्वास जितका वाढेल, तितकंच ज्ञानही वाढेल.”
“जितकं पुढं जाल तितक्या भगवंताच्या उपाधि – त्याचं ऐश्वर्य कमी कमी दिसू लागेल.”
“ईश्वराचा अनुग्रह हवा, तरच त्याच्याकडे माणसाचे संपूर्ण मन जाईल.”
“गुरू, बाबा अन् कर्ता या तीन शब्दांनी माझ्या अंगाला काटे बोचल्यासारखे होते. मला जर कुणी गुरू म्हटलं तर मी त्याला म्हणतो, ‘निघ साल्या, गुरू कसला रे?’ एका सच्चिदानन्दाखेरीज दुसरा गुरू नाही, त्याच्याखेरीज दुसरी गति नाही. केवळ तोच ह्या भवसागरातला नावाडी, तोच भवसागराच्या पैलथडीस पोहोचवून देणारा.”
“बेलातळी मी पुष्कळ साधना केली होती. आणखी एक अवस्था होई, ज्या दिवशी अहंकार करी, त्याच्या दुसऱ्याच दिवशी मी आजारी पडे.”
“विषयरस, भोगासक्ति सुकल्यास ताबडतोब भगवत्-बोध हृदयात उद्दीप्त होईल.”
“जर कुणाच्याठायी शुद्ध सत्वगुण उपजला तर तो केवळ ईश्वराचे चिंतन करू लागतो. मग त्याला आणखी काहीही चांगले लागत नाही. कुणाकुणाला प्रारब्धाकारणे जन्मापासूनच शुद्ध सत्वगुण लाभतो. कामनाशून्य होऊन कर्म करण्याचा प्रयत्न केल्यास अखेर शुद्ध सत्वगुण प्राप्त होतो. रज मिसळलेला सत्वगुण असल्यास नाना दिशांना मन जाते, तेव्हा मग जगाचे भले करीन हा असला अभिमान उद्भवतो. जगाचे हित करू जाणे हे ह्या सामान्य जीवाच्या पक्षी फार कठीण.”
चैतन्याचा लाभ झाल्याखेरीज, आतमधले चैतन्य जागे केल्याखेरीज, चैतन्याला जाणता येत नाही.
“जर पागल व्हायचे आहे तर मग संसारातल्या गोष्टींसाठी पागल काय म्हणून व्हायचे? जरा पागल व्हायचे आहे तर ईश्वरासाठी पागल व्हा.”
“त्याला इंद्रियांच्या वा या मनाच्या द्वारा जाणता यायचं नाही, पण ज्या मनात विषयवासना नाहीत त्या शुद्ध मनानं मात्र त्याला जाणता येईल.”
“सगळ्या वासना कामना टाकून देऊन त्याला आळवायला हवं. तथापि नियमनिष्ठेनं सकाम भक्ती करता करता ती हळूहळू निष्काम होऊन जाते. ध्रुवानं राज्यासाठी तपश्चर्या केली,ेकरून जवळ न राहो. निर्जन साधनेच्या वेळी कल्पना करावी की माझं कुणीदेखील नाही. ईश्वरच माझं सर्वस्व. अन् रडत रडत त्याच्याजवळ ज्ञान-भक्तीसाठी प्रार्थना करावी.”
“काही दिवस निर्जनी साधना करायला हवी. त्यानं भक्ति लाभते, ज्ञान प्राप्त होतं, त्यानंतर मग संसार करा, त्यात दोष नाही. ज्या वेळी निर्जन जागी साधना कराल, त्या वेळी संसारापासून बिलकूल दूर रहा. निदान त्या वेळी तरी स्त्री, पुत्र, कन्या, माता, पिता, भाऊ, बहीण, नातलग कुणीसुद्धा जेणेकरून जवळ न राहो. निर्जन साधनेच्या वेळी कल्पना करावी की माझं कुणीदेखील नाही. ईश्वरच माझं सर्वस्व. अन् रडत रडत त्याच्याजवळ ज्ञान-भक्तीसाठी प्रार्थना करावी.”
“‘मी’ काय आहे ह्याचा धांडोळा घेऊन बघा पाहू. ‘मी’ म्हणजे काय आहे, की मांस, की रक्त, की आतडीबितडी ? ‘मी’ शोधता शोधता ‘तू’ हाती लागतो.”
“बालकासारखा विश्वास असल्याखेरीज ईश्वरप्राप्ति करून घेता येत नाही.”
“हे मायिक जीवजागत पार ओलांडून गेल्यावर मगच त्या नित्य-स्वरूपाची भेट होते”
“भक्ति उपजल्यास सारेकाही जाणता येतं. भक्तिने कुंभक आपोआपच साधतो आणि वायू स्थिर होताच मन एकाग्र होते.”
“प्रेम म्हणजे ईश्वराविषयी अशी रुचि की जिच्यामुळे या जगाचा विसर तर पडेलच, पण इतका प्रिय जो स्वत:चा देह, त्याचासुद्धा विसर पडून जाईल.”
“आपल्या महामायेत त्यानं आम्हाला गुंगवून ठेवलं आहे. तो आम्हाला कधी भानावर आणतो तर कधी बेहोष करून टाकतो. एका क्षणी अज्ञान दूर होतं तर दुसऱ्याच क्षणी पुन्हा येउन वेढतं!”
“अभिमानशून्य होणे मोठं कठीण असते. एकदा लसणाची किंवा कांद्याची चटणी ठेवलेलं भांडे शेकडो वेळा धुतले तरी त्याचा वास जसा जातच नाही, तसाच प्रयत्न करून देखील अभिमानाचा काही लेश राहूनच जातो. ”
“संसारासक्त मनाने ईश्वर मिळविता येत नसतो.”
“देहत्यागाच्या वेळी जेणेकरून ईश्वराचा विचार येईल यासाठी आधीपासूनच उपाय योजायला हवा. तो उपाय म्हणजे – अभ्यासयोग. सतत साधना. ईश्वरचिंतनाची सतत सवय केल्यास अखेरच्या दिवशीही त्याची आठवण येईल.”
“तो विषयबुद्धीला – संसारासक्त मनाला अगोचर आहे.”
“योग्याचं मन नेहमीच ईश्वरावर खिळलेलं असतं – सर्वदाच आत्मस्थ. दृष्टी ‘कुठेतरी’ लागलेली, डोळे बघताच समजून पडतं. मादी जणू अंड उबवत आहे. मन सारं त्या अंड्याकडे. वर नावालाच बघत राहते!”
“तो सर्वांठायीच वसतो आहे. सर्वांच्यात तेच सोनं. एकाद्या ठिकाणी अधिक प्रकटलेलं असतं, इतकंच. संसारी माणसातलं त्याचं अस्तित्व म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेलं सोनं.”
“विषयबुद्धीचा लवलेश जरी असला तरी साधनेत यश मिळायचं नाही. रूप, रस, गंध, स्पर्श वगैरेंचे विषय मनात काडीभर देखील उरायला नकोत. तेव्हा कुठं मन शुद्ध होईल. असलं शुद्ध मन आणि शुद्ध आत्मा एकच.”
“ईश्वर दोनदा हसत असतो. एकदा हसतो, भाऊ भाऊ आपसात जमीन वाटून घेतात त्या वेळी. वाटणी करून खूणेची दोरी घालून म्हणतात. ‘हं, हा इकडचा माझा हिस्सा, अन् तो तिकडचा तुझा!’ ईश्वर हसून आपल्याशीच म्हणतो, ‘छान! सारी दुनिया वास्तविक माझी, त्यातल्याच टीचभर मातीचे तुकडे पाडून हे म्हणतात, इकडचा माझान् तिकडचा तुझा!’
ईश्वर आणखी एकवेळा हसतो. मुलाचं दुखणं विकोपास जाउन आणीबाणीची वेळ आली आहे. आई धाय मोकलून रडते आहे. तिचा आकांत बघवत नाही. अशा वेळी वैद्य येऊन म्हणतात, ‘आई, तुम्ही अगदी भिऊ नका कशा. मी पोराला नक्की बरा करून देतो! वैद्यबुवाच्या गावीही नसतं की ईश्वरच जर मारायला उठला असेल तर पोराला वाचवणं कुणाच्या स्वाधीन आहे!”
“हृदय अगदी विख्यात, अगदी प्रशस्त जागा आहे ध्यानासाठी. हृदयात ध्यान होऊ शकते किंवा सहस्रारात”
“मी रडत रडत जगन्मातेजवळ प्रार्थना करीत असे की आई, माझ्या तर्कबुध्दीवर वज्राघात कर.”
“गाढ अनुराग उत्पन्न होईल तेव्हाच ना चहूकडे सारं ईश्वरमय दिसेल? गाढ कावीळ झाली तरच ना सर्रास सगळं पिवळं दिसणार?”
“कर्म निष्काम भावानं करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं, आणि मग हळुहळू त्याच्या कृपेनं त्याचं दर्शन घडतं. ईश्वराला पाहता येतं, त्याच्याबरोबर बोलता येतं – जसं मी सध्या मी तुमच्याशी बोलतो आहे ना तस्सं!”
“त्याच्या प्राप्तीसाठी खूप व्याकुळ झालं, काकुळतीनं त्याला आळवलं, साधना करीत राहिलं तरच कुठे तो कृपा करत असतो. पोर खूपच धावपळ करतंय पाहून आईला कीव येते. ती लपली होती, पण मग बाहेर पडून समोर येते.”
“त्याला या डोळ्यांनी पाहता यायचं नाही. साधना करता करता एकप्रकारची प्रेममय काया बनते – तिला प्रेमाचेच नेत्र नि प्रेमाचेच कान. त्या डोळ्यांनी त्याला पाहतात, त्याच कानांनी त्याची वाणी ऐकू येते.”
“गुरुवाक्यावर विश्वास. त्यांच्या उपदेशाच्या आसऱ्याने जात राहिल्यास भगवंताचा लाभ होऊ शकतो. दोरीच्या मागानं पुढे पुढे गेल्यास तिच्या दुसऱ्या टोकाला असलेली जिन्नस लाभते, त्याप्रमाणे!”
“मन शुद्ध झाल्यावर आणखी एक गोष्ट अनुभवाला येऊ लागते. साधकाला समजून येतं की ईश्वरच कर्ता आणि मी अकर्ता.”
“घरी असे वागा की घरच्यांना वाटेल की तुम्ही त्यांचे आहात. पण तुम्ही स्वत: मात्र आतल्या आत जाणून असा की तुम्ही त्यांचे नाही आणि ते तुमचे नाहीत.”
भक्तांचा आणखी एक वर्ग असतो. कृपासिद्धांचा. आगा नाही, पिछा नाही, एकाएकी परमेश्वराची कृपा झाली. – लागलीच दर्शन नि ज्ञानलाभ. जणू हजारो वर्षांची अंधारकोठडी, – दिवा घेऊन जाताच क्षणार्धात कानाकोपऱ्यात देखील उजेडच उजेड! अन् सारं कसं तात्काळ, थोडं थोडं नव्हे!
रोज अभ्यास करायला हवा. त्या दिवशी सर्कशीत पाहिलं, घोडा भरधाव पळतो आहे. अन् त्याच्या पाठीवर एक मड्ड्म एका पायावर उभी आहे. हे सारं जमवायला केवढा तरी अभ्यास तिला करावा लागला असेल!
“तुम्ही म्हणाल की इतरांच्या धर्मात अनेक चुका आहेत, अंधविश्वास आहेत. पण मी म्हणतो की असेनात का, चुका नाहीत कोणत्या धर्मात? सगळेच धरून चालतात की माझंच घडयाळ बरोबर चाललंय!. व्याकुळता असली की झालं; त्याच्याविषयी प्रेम, आकर्षण असलं की झालं. तो तर अंतर्यामी आहे, अंतरीचं प्रेम, व्याकुळता तो पाहू शकतो. समजा की एका बापाला अनेक मुलं आहेत. त्यातली जी मोठी असतात ती कुणी बाबा तर कुणी पापा म्हणून स्पष्ट नाव उच्चारून बापाला संबोधतात. पण सगळयात लहान बोबडं पोर फारफार तर ‘बा’ किंवा ‘पा’ उच्चारू शकतं, त्याच्यावर बाप काय रागावतो? बापाला पक्का ठाऊक असतं की हे देखील मलाच हाका मारतं आहे; फक्त चांगला उच्चार करू शकत नाही, एवढंच. बापाला सारीच पोरं सारखी.”
“जिथे देहबुद्धि आहे तिथे विषयबुद्धीही आलीच. रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द हे सारे विषय होत. विषयबुद्धि लोपणे अति कठीण कर्म होय. विषय बुद्धि असल्यास सोहम् भाव साधणे शक्य नाही.”
जर रागाभक्तीचा उदय होईल – अनुराग भक्ति उपजेल – तर मग भगवान स्थिर राहू शकणार नाही. तो भक्तीचा किती भुकेला आहे म्हणून सांगू! गाईला जशी ढेप मिसळलेली सरकी आवडते, समोर पडताच भराभरा तिचा फडशा पाडते, तशीच देवालाही भक्ति आवडते.
“सहाही रिपूंची मोड ईश्वराकडे फिरवून द्या. आत्म्यासह रमण करीन – हाच काम, हीच कामना ठेवावी. जे ईश्वरप्राप्तीच्या मार्गात अडथळा आणतात त्यांच्यावर क्रोध करावा. ईश्वरप्राप्तीचा लोभ धरावा. ‘माझं माझं’ जर करायचं तर त्याच्याविषयी. उदाहरणार्थ ‘माझा कृष्ण’ ‘माझा राम’. अहंकारच जर करायचा असेल तर बिभीषणाप्रमाणं करावा! मी रामाला नमस्कार केला आहे – हे शिर आता अन्य कुणाही पुढे झुकणार नाही.”
“जे त्यागी असतात त्यांच्यात वैषयिक वासना कमी असतात. संसारी गृहस्थ सदान् कदा विषय चिंतनात गढलेला असल्याकारणे त्याच्या दृष्टीने ‘दासोहम्’ भावच योग्य होय.”
“राधिका जितकी जितकी कृष्णाकडे जात गेली, तितका तितका तिला कृष्णाच्या देहाचा सुगंध येत गेला. भगवंताच्या अधिकाधिक निकट गेल्याने त्याच्या ठायी भक्तिभावही वृद्धिंगत होत जातो. नदी जेवढी समुद्राजवळ येते तेवढ्या तिच्यात भरतीच्या लाटा शिरताना दिसतात.”
“अगदी सरळभावानं म्हणा की, ‘हे परमेश्वरा दर्शन दे’ आणि त्याच्यासाठी रडा. म्हणा – ‘देवा, कामिनीकांचनातून माझं मन अजिबात दूर करून दे.’ अन् डुबी द्या, वरवर तरंगून वा पृष्ठभागावरच पोहून का कधी रत्न हाती लागणार आहेत? बुडी मारली पाहिजे.”
“अभ्यासयोगाच्या जोरावर कामिनी-कांचन आसक्ति नाहीशी करता येते. अभ्यासामुळे मनात असामान्य शक्ति उत्पन्न होते. त्यानंतर मग इंद्रियसंयम करणे – कामक्रोधांना कह्यात राखणे – त्रासदायक होत नाही, कठीण पडत नाही.”
“संसार आहे कर्मक्षेत्र. कर्म आचरता आचरता कुठं ज्ञान होतं. कर्म करता करता मनातील मळ साफ धुऊन निघतो.”
“अति शास्त्र शास्त्र केल्यानं चांगल्यापेक्षा वाईटच पदरात पडतं, शास्त्राचं सार समजून घेणंच महत्वाचं; त्यानंतर पुस्तकांची काय जरूर? सार मात्र जाणून डुबी दिली पाहिजे – ईश्वरलाभास्तव.”
“द्रौपदीचे ज्या वेळी वस्त्रहरण करीत होते, त्यावेळी तिचे व्याकुळ क्रंदन ऐकून भगवंतानी तिला दर्शन दिले आणि म्हटले ‘तू जर कुणाला कधीतरी वस्त्र दान दिले असेल तर आठवून बघ – म्हणजे तुझी लाज राखली जाईल.’ द्रौपदी म्हणाली – ‘हं, आठवलं. एक ऋषि स्नान करीत होते, त्यांची कौपीन वाहून गेली होती. मी स्वत:चा कपडा अर्धा फाडून त्यांना दिला होता.’ भगवंत म्हणाले, ‘तर मग तुला आणखी काही भय नाही.'”
“नुसतं माहीत असून चालणार नाही. धारणा व्हायला पाहिजे. विषयचिंतन मनाला समाधिमग्न होऊ देत नाही. विषयबुद्धि पूर्णपणे नाहीशी झाल्यावरच मन समाधीत प्रतिष्ठीत होतं.”
“मुळात एकाखेरीज दोन तर नाहीत ना? म्हणून कुणी कोणत्याही नावानं त्याला आळवो, तो जर मनोभावाने आळवील तर त्याच्याजवळ नक्कीच जाऊन पोहोचेल. व्याकुळतेतच सारंकाही आलं”
“पुस्तकांत – शास्त्रांत साखर वाळूची भेसळ असते. साधु साखर घेऊन वाळू फेकून देतो. साधु सार ग्रहण करत असतो.”
“अलौकिक शक्ति घेऊन काय करायचं? तिच्या साहाय्यानं ईश्वरलाभ का व्हायला? ईश्वराचा जर लाभ होणार नसेल तर सर्वच मिथ्या होय, व्यर्थ होय!”
“एकेका उपाधीमुळं जीवाचा स्वभाव भिन्न भिन्न प्रकारे बदलत जातो. काळ्या किनारीचं धोतर एखादयाला नेसू द्या, की बघा, स्वारी तोंडानं लागलीच निधूबाबूंची प्रेमगीतं गुणगुणायला लागलीच समजा! नंतर मग पत्ते खेळणं, फिरायला निघताना हातात छडी, हे सारं आलंच. पाप्याचा पितर का असेना, बूटमोजे पायात चढविण्याचाच उशीर, लागलीच शीळ घालीत हिंडू लागेल, पायऱ्या चढताना साहेबासारखा उडया मारतच जाईल, एक ना दोन, किती सोंगं! एखादया माणसाच्या कातात कलम पडूच दया की राजेश्री हाती पडेल त्या कागदावर मोठ्या दिमाखानं फर फर करत रेघोटया ओढतील; असला प्रभाव त्या लेखणीचा! पैसा देखील एक अजब उपाधि आहे, पैसा मिळाला रे मिळाला की मनुष्य अगदी निराळाच बनून जातो., मग तो आधीचा मनुष्य राहत नाही.”
“भक्ति कशाने लाभते? त्यासाठी प्रथम साधुसंग करायला हवा. साधुसंग केल्याने ईश्वराविषयी श्रद्धा निर्माण होते. श्रद्धेनंतर निष्ठा. तेव्हा मग ईश्वरासंबंधी सोडून आणखी कोणतीही गोष्ट ऐकायची इच्छा होत नाही; त्याचेच काम करण्याची इच्छा होते.”
पवित्र झाल्याखेरीज पावित्र्य ओळखता यायचं नाही.
“स्वत:वर चिदानंदाचा आरोप करा, तुम्हालाही तो आनंद प्राप्त होईल. आनंद तर मूळचाच आहे, केवळ आवरण व विक्षेप शक्तींनी झाकला गेला आहे.”
“ज्याच्यात ईश्वराठायी खरीखरी भक्ती आहे तो शरीर, पैसा ह्या साऱ्यांची कधीच पर्वा करीत नसतो. तो म्हणतो, ‘देहसुखासाठी, लोकमान्यतेसाठी किंवा पैशासाठी अन् जपतप! हे तर सारे अनित्य, दोन दिवसांचे आहे’.”
“अगदी मनापासून प्रार्थना केल्यास स्वस्वरूपाचं दर्शन होऊ शकतं, लक्षात असू द्या. मात्र ज्या प्रमाणात विषयभोगाची वासना असेल त्या प्रमाणात दृष्टी झाकाळून जात असते.”
“रात्रंदिवस त्याचंच चिंतन केल्यानं चारी दिशांना तोच दिसू लागतो. दिव्याच्या ज्योतीकडे एकसारखं टक लावून बघितल्यास थोडया वेळानं सगळीकडे ज्योतीच ज्योती दिसतील.”
लज्जा, घृणा व भय ही तीन बाळगल्यास धर्मात प्रगति होत नाही.
“कर्म करीत नाही कोण? भगवंताचं नामगुणसंकीर्तन हे सुद्धा कर्मच होय. सोsहंवाद्यांचं ‘मीच तो’ हे चिंतन देखील कर्मच. नि:श्वास टाकणेही कर्मच नव्हे का? सुटलंय कुणाला कर्म! म्हणून म्हणतो कर्म करावं, पण फळ ईश्वराला अर्पण करावं.”
“अनुरागखेरीज का तो मिळाला आहे? त्या प्रेमाकरिता मोठमोठे योगी जन्मोजन्म कठोर योगाचरण करीत असतात. एकदा त्या प्रेमाचा उदय झाला की मग भगवान एखादया लोहचुंबकाप्रमाणे त्या भक्ताला आकर्षून घेतात.”
“ब्राह्ममुहूर्ती आणि सूर्योदयाच्या वेळी ध्यान करणं चांगलं आणि प्रत्यही “संध्यासमयानंतर.”
“‘मी मुक्त’ असा अभिमान असणं गैर नाही. ‘मी मुक्त’ असंच सदोदित घोकत राहिल्यानं माणूस खरोखरच मुक्त होऊन जातो. उलट ‘मी बद्ध’ ‘मी बद्ध’ असाच जप करीत राहिल्यास ती व्यक्ति बंधनातच गुरफटून पडते.”
“भगवान अंतर्यामी आहे. सरळ मनाने, शुद्ध मनाने त्याच्याजवळ प्रार्थना करा, तो सगळं समजावून देईल.”
“भक्ताभक्तांचा देखील दर्जा असतो. – काही उत्तम भक्त, काही मध्यम तर काही अधम भक्त असतात. अधम भक्त म्हणतो, – ईश्वर आहे, त्या तिथं आकाशात दूर दूर . मध्यम भक्त म्हणतो, – ईश्वर सर्वांभूती चैतन्यरुपानं – प्राणरूपानं भरला आहे. उत्तम भक्त म्हणतो – ईश्वरच या साऱ्या रूपांनी नटला आहे, जे म्हणून दिसतं ते त्या ईश्वराचंच एकेक रूप आहे. तोच माया, जीव जगात सारं काही बनला आहे. त्याच्या खेरीज मुळी आणखी काही नाहीच.”
“संसारी जीवाचे मन गढूळ पाणी होऊन बसले आहे खरे, तरीपण त्यात निवळण टाकल्यास ते पुन्हा स्वच्छ होऊ शकते. विवेक वैराग्य म्हणजेच ते निवळण.”
“मनात निवृत्ति आल्यानेच विवेक येतो आणि विवेक आल्यानेच तात्विक विचार उठतात. तेव्हा मनाला इच्छा होते कालीकाल्पादृमाखाली फिरायला जाण्याची. त्या झाडाखाली गेल्यास, ईश्वरासामीप गेल्यास चार फळं आपोआपच हाती येतील. चार फळं म्हणजे धर्म, अर्थ, काम, व मोक्ष.”
“ईश्वर सत् आणि बाकी सारं असत् अशा विचारालाच विवेक म्हणतात. सत् म्हणजे नित्य, असत् म्हणजे अनित्य. जो विवेकी आहे तो जाणत असतो की ईश्वरच वस्तू आणि बाकी सर्व अवस्तू. विवेकाचा उदय झाल्याने ईश्वराला जाणण्याची इच्छा होते.”
“आत्मसाक्षात्कार झाल्याखेरीज शंकाकुशंकांचा पिंगा थांबत नसतो.”
“आपल्या मायेनं त्यानं सारं झाकून ठेवलं आहे – कशाचा पत्ता लागू देत नाही! कामिनी-कांचन ही माया होय. या मायेला दूर सारून जो त्याच्या दर्शनाची खटपट करतो, त्यालाच त्याचं दर्शन घडू शकतं.”
“जीवाचा अहंकार – मीपणा – हीच माया. या अहंकारानेच सर्व काही झाकून टाकलं आहे. हा ‘मी’ मेला की कटकट चुकली! देवाच्या दयेन ‘मी अकर्ता’ अशी जाणीव होईल तर ती व्यक्ति जीवनमुक्तच झाली म्हणायची! मग तिला कशाचेही भय नाही. ही माया वा हा अहं जणू एखाद्या मेघासारखा होय. एखाद्या छोट्याश्या ढगामुळे सूर्य झाकला जाऊन दिसेनासा होतो. मेघ दूर सरताच पुन्हा सूर्य दृष्टीस पडतो. गुरूच्या कृपेनं ‘मी’ पण जर का एकदा नाहीसं झालं, तर तात्काळ ईश्वराचं दर्शन घडतं.”
“कर्मयोग फार कठीण. म्हणूनच प्रार्थना केली पाहिजे की, ‘हे ईश्वरा, माझं कर्म कमी करून दे आणि जेवढं कर्म तू ठेवलंस तेवढं जेणेकरून तुझ्या कृपेनं अनासक्त होऊन करू शकेन असं कर आणि जेणेकरून जास्त कर्मांत गुंतण्याची मला इच्छा न होवो.'”
“कामिनीकांचनाच्या सानिध्यात राहल्यानं मन मोठं परवश होऊन जातं. खूप सावधगिरी बाळगली पाहिजे.”
“शुद्ध मन, शुद्ध बुद्धि आणि शुद्ध आत्मा – एकच गोष्ट”
“त्याच्या प्रेमाचा एक बिंदू जरी कुणाला लाभेल तर त्याला कामिनीकांचन अति तुच्छ वाटू लागतील. खडीसाखरेचं सरबत ज्यानं चाखलं आहे त्याला काकवी काय गोड लागणार? व्याकुळ होऊन त्याची प्रार्थना केल्यास, सर्वदा त्याचं नामगुण गायिल्यास, त्याच्या ठायी असला अनुराग जन्मतो”
“कसेतरी करून ईश्वराची मनाचा योग साधणे. जेणेकरून एकदासुद्धा त्याचा विसर न पडो. जशी तेलाची धार. तिच्यात खंड नसतो.”
“विषयासक्ति गेल्याखेरीज माणूस उदार, सरळ होत नसतो.”
“तुम्ही साकार मानीत नाही. काही हरकत नाही; समजा की मूर्ति तुमच्यासाठी नाहीच मुळी. सगुण उपासनेतील प्रेमाची ओढ फक्त तुम्ही आत्मसात करा; जशी कृष्णाकरता राधेची ओढ, प्रेम. साकारवादी भक्त कालीमाता, दुर्गामाता इत्यादि देवतांची पूजा करत ‘आई आई’ म्हणून किती आळवितात, किती प्रेम करतात हेच फक्त तुम्ही घ्या. मूर्ति नाही मानली, त्यात काय मोठंसं.”
“भगवंताच्या नामानं माणूस पवित्र होऊन जातो. म्हणूनच नामसंकीर्तनाची सवय करायला पाहिजे.”
“ईश्वराला जाणून, एक हात त्याच्या पादपद्मी ठेवून दुसऱ्या हातानं संसाराचं काम करा.”
“कामिनी-कांचनाचा त्याग केल्याखेरीज धर्मामार्गावर मुळीही प्रगति होणे शक्य नाही. मी तीन गोष्टींचा त्याग केला होता – जमीन स्त्री पैसा.”
“ईश्वराला संतुष्ट करा, त्याने सगळेच संतुष्ट होतील. ‘तस्मिन् तुष्टे जगत् तुष्टम्'”
“एखाद्या दगडाला किंवा विटेलाही जरी ईश्वर समजून भक्तिभावाने पूजा कराल तर त्यानेही ईश्वराच्या कृपेने त्याचे दर्शन होऊ शकते.”
“‘सत्य बोलणे, सदा ईश्वराला अधीन असणे आणि परस्त्री मातेसमान मानणे’, हे ईश्वरलाभाचे उपाय होत.”
“इतकी तीर्थ करतात, एवढा जप करतात तरीपण काही म्हटल्या काही होत नाही , हे कसं? व्याकुळता नाही, आणखी काय. व्याकुळ भावानं त्याची प्रार्थना केल्यास तो दर्शन देतोच देतो.”
“साधना केल्याखेरीज शास्त्राचा अर्थ समजत नाही.”
“एकदा त्याची कृपा झाली की मग कसलंच भय नाही.”
“ज्याचा जो कर्मभोग आहे, त्याला तो भोगलाच पाहिजे.”
“जीव तर वास्तविक पाहाता साक्षात सच्चिदानंदस्वरूप. पण या मायेमुळे, या अहंकारामुळे त्यांना नाना उपाधि जडून गेल्या आहेत. आणि त्यामुळे ते स्वत:चे मूळ स्वरूप विसरून गेले आहेत.”
“शुद्ध सत्वगुण उपजला की ईश्वराचा लाभ व त्याची कृपा होते.”
“ते भक्तवत्सल आहेत. गाय जशी वासराकडे धाव घेते, तसेच ते देखील भक्तांकडे धाव घेतात.”
“कामिनी-कांचनाच्या आसक्तीचा लवलेशही असल्यास तो मिळू शकत नाही.”
“त्याची कृपा झाल्यास आठही पाश एका क्षणात गळून पडू शकतात.”
“कच्च्या मातीतून वाटेल ते घडविता येतं. एकदा ती भाजली गेली की मग मात्र ते अशक्यच. ज्यांचं हृदय विषयबुद्धीच्या भट्टीत भाजून निघून कठीण होऊन गेलेले आहे, त्याच्यावर मग पारमार्थिक भाव ठसविणे नितांत असंभव.”
“बापाचा हात धरून चालला तर मुलगा एकवेळ पडू शकेल, पण मुलाचाच हात जर बाप धरील, तर मग मात्र भीती नाही.”
“साधना करताना हा संसार ‘मयसभा’ वाटतो, पण एकदाचा ज्ञान लाभ झाल्यानंतर, त्याचं दर्शन घडल्यावर तोच संसार ‘आनंदधाम’ होऊन जातो.”
“निर्जन जागी त्याचं नामस्मरण करायला हवं याचं कारण काय? बारा महिने तेरा काळ संसाराच्या रामरगाडयातच घुटमळत राहिल्यानं काळजीचा, अशांतीचा ससेमिरा मागे लागून माणसाला सळो की पळो होऊन जातं.”
“भक्तीची पक्व अवस्था म्हणजे भाव. भाव प्राप्त झाल्यास सच्चिदानंदाच्या विचाराने माणूस निर्वाक् होऊन जातो. भावाची पक्व अवस्था म्हणजे महाभाव – प्रेम. जसा कच्चा आंबा आणि पिकला आंबा”
“साधूचे मन ईश्वराकडे बारा आणे आणि इतर कामांकडे चार आणे असायला पाहिजे. साधूने ईश्वराच्या बाबतीत खूप हुषार, खूप सावध असले पाहिजे. सापाची शेपटी फार हळवी असते. तिच्यावर पाय पडल्यास त्याचे सारे शरीर कळवते. त्याचप्रमाणे साधूच्या आध्यात्मिकतेला धक्का लागताच त्याचे सारे जीवन दुखावते.”
“संसारात पाणकोंबडीप्रमाणे राहा. तिच्या अंगाला पाणी लागते पण ती ते झटकून टाकते.”
“सच्चे संन्यासी सदा आपलं मन ईश्वराच्या चरणी ठेवू शकतात, एखाद्या मधमाशीसारखे ते फक्त फुलांवरच बसतात. संसारात कामिनी-कांचनात जे राहतात त्यांचंही मन ईश्वराकडे लागू शकतं, नाही असं नाही; आणखी पुन्हा कधी कधी कामिनी-कांचनाकडेही धावतं. जशी साधी माशी. पेढ्यांवरही बसते, सडक्या जखमेवरही बसते, विष्ठेवरही बसते.”
“देवाच्या दुनियेत सगळंच शक्य आहे एवढा विश्वास असला तरी पुरे. ‘मी’ समजतो तेच खरं, बाकी साऱ्यांच खोटं’ अशा कल्पनेला बिलकुल थारा देऊ नका. त्यानंतर खरंखोटं तोच सारं समजावून देईल.”
“सांसारिक सुखं भोगणं संपल्यावर प्राण ईश्वरासाठी तळमळू लागतो. काय केल्यानं तो मिळेल हा एकाच ध्यास त्या वेळी लागतो. जो कुणी काही सांगेल ते तो ऐकतो.”
“भोग आणि कर्मे संपल्याखेरीज व्याकुळता येत नाही.”
प्रश्न:- कोणत्या उपायाने ईश्वराची प्राप्ति होऊ शकते?
“त्याच्यावरच प्रेम करायला हवे आणि सदासर्वदा हा विचारच करायला हवा की ईश्वरच सत्य आणि जग अनित्य आहे”
“मुख्य गोष्ट हीच की त्याच्याठायी भक्ति जन्मली पाहिजे, त्याच्यावर प्रेम जडलं पाहिजे.”
“गुरू जे नाम देतील, विश्वास धरून त्या नामानं साधना केली पाहिजे.”
“साधनाकालात ‘नेति नेति’ करत जाऊन त्याग करावा लागतो. परमेश्वराचा लाभ झाल्यानंतर कळून येतं की तोच सारंकाही बनला आहे.”
“कामिनीकांचनाचे आवरण दूर होताच चिदानंदाचा लाभ होतो.”
“समजा तुम्हाला ईश्वराचे दर्शन झाले. त्याच्याजवळ मग काय ही प्रार्थना करणार कां “भगवंता, माझ्या हातून काही रस्ते, तलाव, घाट, दवाखाने, इस्पितळे होवोत असा मला वर द्या”? त्याचे दर्शन झाल्यावर ह्या सगळ्या वासना एकीकडे पडून रहातात.”
Leave a Reply