महावतार बाबाजी

।। ॐ श्री चैतन्य योगीराज  महावताराय नम: ।।

Babaji

मानवी जीवन व्यतीत करताना, भगवत्‌कृपेने जीवास, जीव-जगत्-ईश्‍वर यांचे स्वरूप जाणण्याची इच्छा निर्माण होते. आपले शिवस्वरूप जाणण्याची इच्छा जीवात निर्माण होणे हेच कृपेचे पहिले लक्षण आहे. शाश्‍वत सुख व आनंद याबद्दल जिज्ञासा निर्माण होऊन ते अनुभवण्याची धडपड जीव करु लागतो. त्यासाठी मार्ग कोणता, साधना काय, असे प्रश्‍न उत्पन्न होतात.

हिमालयनिवासी जगत्‌व्यापी स्मर्तृगामी शिवस्वरुप परमगुरु महावतार बाबाजी या जीवांना दिशा व मार्ग दाखविण्याचे कार्य अखंड अविरत करीत आहेत. या कार्याची त्यांची पद्धत मानवी बुद्धिस अनाकलनीय आहे परंतु प्रत्येक जीवास आवश्यक त्या साधनामार्गाचे मार्गदर्शन ते निरपेक्षपणे करीत असतात. ते काय पहातात? तर केवळ जीवाची तळमळ व अंतरीचा भाव!

सर्वसाक्षी असल्याने त्यांना अज्ञात असे या सृष्टीत काहीही नाही व स्मर्तृगामी असल्याने स्मरण करताच त्या त्या स्थळी ते तत्क्षणी अवतीर्ण होतात. जशी बाळाची हाक ऐकून माता त्वरित धाव घेते, तशी आपण सर्वजण बाबाजींना प्रेमाने साद घालूया. स्मर्तृगामी बाबाजी नक्कीच उपस्थित होतील व आपणास बाबाजींच्या कृपादृष्टीच्या अमृतसिंचनाचा लाभ होईलच होईल. चला, आपण सर्वजण अंतरीची आत्मज्योत उजळविण्याचा प्रयत्न करुया.

अज्ञान अंध:कारातून ज्ञानप्रकाशाकडे वाटचाल करु इच्छिणार्‍या सर्वांना शुभेच्छा!
— कृष्णदास


|| महावतार बाबाजी प्रेमोत्सव संकल्पना ||

या विश्वातील समस्त अणूरेणूंना व्यापून असलेले जे चैतन्यस्वरुप आहे, जे नैसर्गिकरित्या सुसंवादी आहे, त्याच्याशी समरसता साधणे ही काळाची शाश्‍वत गरज राहिली आहे. वास्तविकरित्या तेच चैतन्य आपले मूळ स्वरूप आहे. सुसंवाद हाच निसर्ग-नैसर्गिकता व विसंवाद ही कृत्रिमता आहे. म्हणून जे नैसर्गिक ते शाश्‍वत व कृत्रिम ते अशाश्‍वत आहे. त्या शाश्‍वताशी आपल्याला संवाद साधावयाचा आहे. समान गुणधर्म असलेले अणूरेणू जसे प्रत्येक विशिष्ट प्रकारच्या वस्तूत व्यापून/सामावून आहेत, त्याचप्रकारे त्यातील मूळ अस्तित्व, जे शुद्ध चैतन्य, तेच आपले स्वरूप आहे ही जाणीव घेणे हे मानव जन्माचे साध्य आहे. त्या जाणीवेचे भान घेऊन त्या अवस्थेत कायम रहाणे, स्थित होणे हे श्री महावतार बाबाजींच्या कृपेचे फलित आहे. त्या अवस्थेत विश्वातील यच्चयावत घटकांत साहजिकच सुसंवाद वा प्रेमभावना सहजस्थित आहे. अशा अवस्थेत जीवनाचा प्रत्येक क्षण हा प्रेमोत्सवाचा क्षण आहे व जीवांचा सकल विहार हा प्रेमविहारच ठरेल. हाच प्रेमयोग! त्याची जाणीव करुन देणे यासाठी या प्रेमोत्सवाची प्रेरणा श्री महावतार, प्रेमावतार बाबाजींनी दिलेली आहे. या जाणीवेचे भान आल्यावर जीवनाची दृष्टीच पूर्णपणे बदलून या सृष्टीतील सर्व विहार एक आनंदाचा विहार, आनंदाची क्रीडा ठरेल. परमेश्‍वराचे शाश्‍वत असलेले हे जे स्वरूप आहे, या शाश्‍वताकडे पोहोचण्यासाठी अथपासून इतिपर्यंत आवश्यक ती सर्व व्यवस्था श्रीमहावतार बाबाजी या प्रेमोत्सवात सहभाग घेणार्‍या सर्वांसाठी करतील व ते त्यांचे अभिवचन आहे.
— कृष्णदास


हिमालयाच्या उंच शिखरांत, वसति करती हे बाबाजी
जन्मचि त्यांचा साधकां काजी, मार्गदर्शना अखंड राजी
देह त्यांचा अति सुकुमार, ऊर्ध्व दृष्टी अन् केशसंभार
दिसती जसे नवयुवकचि ते, सिंह कटि छाती भरदार
प्रेेम स्मरता भक्त तत्क्षणी, अवतीर्ण होती ते साकार
रुप वेश ते धरती नाना, ओळखू न ये तरी कृपा अपार
परीक्षा कठोर, जरी स्वभाव अति प्रेळ,
प्रसन्न होता कृपाचि केवळ
जाणुनिया हे, या, करुया भावे त्यांचे संकीर्तन
ॐ बाबाजी, जय बाबाजी, ॐ बाबाजी, जय बाबाजी
ऐकुनि कीर्तन प्रकट ते होता, अद्भुतचि ते दर्शन होता
होऊनिया बेभान, करुया अखंड नाम गान
ॐ बाबाजी, जय बाबाजी, ॐ बाबाजी, जय बाबाजी
कृपाकर तो मस्तकी पडता, तन मन सारे निवेल आता
मग वाटे आराम, मग होऊनिया निवांत,
करुया अखंड नामगान
ॐ बाबाजी, जय बाबाजी, ॐ बाबाजी, जय बाबाजी
******
हे करुणाकर बाबाजी, भक्तवत्सल बाबाजी,
प्रेमावतार बाबाजी, मायाभंजक बाबाजी
कसे आळवू तुम्हा बाबाजी, कोठे लपला न कळे आजी
बहू ऐकिलि तुझी मी कीर्ति, वाटे दिसावी तुझी ती मूर्ती
रात्रंदिन घेऊनी हा ध्यास, जीवन जगतो असे उदास
करुणा तरी ती तुज कां न ये रे, उदार दयाळा भक्तवत्सला
धाव धाव रे सत्वर आता, दर्शन देऊनी सुखवी ताता
ॐ बाबाजी, जय बाबाजी, ॐ बाबाजी, जय बाबाजी
******
बाबाजी अन् लक्ष्मी माता, वाटे मजसी पिता माता
सर्व माझ्या चिंता हरता, वर्ते सर्व सुख मज आता
अदृश्य परि सर्वत्र वसता, अखंडचि मज सांभाळता
मग मी हा निश्‍चिंत पुरता, त्यांना मनी अखंड ध्याता
ॐ बाबाजी लक्ष्मी माता, ॐ बाबाजी लक्ष्मी माता
******
आज बुद्ध पौर्णिमा, चंद्र प्रकाश पसरला हिमालयात दूरदूर
बाबाजींची स्वारी निघाली पाहण्या साधु यति, विखुरले जे हिमालयी अति दूरदूर
साधाया बसले अनंत काळ, ध्येय असे जे सुदूर
बाबाजींच्या आशीर्वादाने, असती जे ध्यानात चूर
पौर्णिेच्या चांदण्यात भरती येऊन, मनी प्रेमाचा लोटे पूर
बाबाजींच्या आठवणीने त्यांचा जीव व्याकुळ अन् नेत्री अश्रूंचा लोटे पूर
भक्तांची त्या तगमग पाहुनि, बाबाजींना न निघे धीर
पौर्णिेच्या समयी त्या निघती, सूक्ष्म रुपे सत्वर
अशाच एका गुहेमाजी, बैसलो मी ध्यानामाजी
बाबाजी मज मनामाजी, कधी दिसती नेत्रां आजी
विचार हा प्रबळ होता, अवतीर्ण झाले बाबाजी
कमलनयनी दिसती सुंदर, केश रुळती मानेवर
भगवा शेला अंगावर, सुगंधाने भरले अंबर
पाहती मज मंजुळ वाणी, आठवण केली कशा आजी
सर्व दिसते कुशल नामी, साधनेत प्रगति नामी
विसरलो तुला ना मी, मग अश्रू कशा आजी
म्हटले मी ध्यानामाजी, बैसतो नियमी मी रोजी
दिसते आजी पौर्णिमा जी, येते भरती समुद्रामाजी
हृदयसमुद्र उचंबळुनि आजी, पूर लोटला नेत्रांमाजी
जाणिले तुम्ही हर्ष मज मनी, दर्शन होता सुखलो मनी
उठुनि धरिले चरणा त्यां मी, शिरसाष्टांग नमस्कारिले मी
कृपाशीर्वाद घेउनि त्यांचा, परत बैसलो ध्यानामाजी
अंतर्धान सत्वर बाबाजी, पाहण्या इतर साधका आजी
अन् मी माझ्या ध्यानामाजी, निगूढ त्या वातावरणामाजी
बाबाजी माझ्या हृदयामाजी, बाबाजी माझ्या हृदयामाजी
******
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, भक्तांच्या अखंड ध्यानी मनी
आनंदती त्याने बाबाजी मनामाजी, भक्तांना दर्शन देती ध्यानामाजी
तेजाकार आकार सगुण साकार, भ्रूमध्यी प्रकट दिसे तो जी
पाहता पाहता भान विसरुनि, भक्त होती त्यासी तदाकार जी
वर्णने ऐसी ऐकिली बहुत, प्रार्थितो मी त्यासी दिसो मला आजी
मिटुनिया डोळे बैसता ध्यानी, ध्यातो मनी मी
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
******
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, विनवितो बाळ तुम्हा मी आजी
धरुनिया मज न्यावे गुहेमाजी, बसले जेथे महायोगी ध्यानामाजी
त्यांच्या संगती वाटे बसावे मजही, बुडुनिया जावे खोल ध्यानामाजी,
विसरोनि जावे ह्या देहभावा आजी, अन् बुडावे त्या आत्मानंदामाजी
विरोनिया पिंडब्रह्मांड भेद आजि, स्थिति अशी जी जेथे काहीच ना जी
बाबाजी तुम्हा मी हे विनवितो आजि, सत्वर कृपादान द्यावे मज आजि
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
******
ॐ बाबाजी ॐ बाबाजी, हिमालयात सर्व गर्जे घोष आजी
बाबाजींचा उत्सव गुहेमाजी, जमले थोर थोर साधू त्यामाजी,
बसले सभोवार गोलाकारामाजी, मध्यभागी दिसती सुंदर बाबाजी
मग्न असती निगूढ ध्यानामाजी, तेज अपरिमित दिसे मुखामाजी,
स्वर्गिय सुगंध दरवळे गुहेमाजी,
सभोवती सर्व वाट पाहताती आजि, कधी ते कमलनयन उघडती आजि,
अन् कृपादृष्टी पडे आपणामाजी
बाबाजी मनी पाहती प्रत्येका जी, अभ्यास प्रत्येकाचा किती झाला असे ते जी,
जाणोनिया प्रसन्न मनी अति झाले जी
भक्तांची तळमळ अति वाढे जी, नयन उघडण्या धीर निघे ना जी
मग आरंभती भजन सुंदर जी,
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
आलो सर्व तुझ्या दर्शनी आजि, सुहास्य तुझे पाहण्या आजि
पुढील तो मार्ग मिळण्या आजि, जाणता हे तुम्ही मनामाजी
मग उघडाया नयन विलंब का आजी, दर्शनासी जीव तळमळतो पहा जी
आता नका अंत पाहू आणी आजि,
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
भजन करिता सर्व, ना कोणी भानामाजी,
तल्लीन ते होता हाक, पोहोचली हृदयामाजी,
उघडती नयन सत्वर बाबाजी,
पाहताची ते सर्व उठोनिया मोठयाने गर्जति अन् जयजयकारती
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
देहभान विसरुनि सर्व उडया ते मारिती, रोमांचित होउनि भान ते हारपती,
अनावर भावे काही शुद्ध हारपती अन् कोसळती,
स्वर्गीचे सुरवर अनुपम तो सोहळा पाहण्या धावती,
आनंद वर्ते सर्व भक्तांमांजी,
बाबाजी प्रत्येका निरखून पाहती जी, नजर अति प्रेळ करुणे भरली जी,
पडताचि दिसे आश्वासन त्यामाजी,
‘मी तुम्हासाठी अखंड जागा जी, न द्या तुम्ही थारा काळजीला जी,
तुम्हा उद्धरण्या मी बैसलो गुहेमाजी,
भक्तिभावे जेव्हा जेव्हा नाम माझे घेता जी, उभा असे समोर त्याच क्षणामाजी,
साधनेची तुमच्या नेहमी वाहतो सर्व काळजी,
अडले दिसता तेथून सोडवितो क्षणामाजी,
घाबरु नका काही, असे आमुचा पूर्ण आधार तुम्हा जी’
उभावुनि कृपाकरे सांगितले बाबाजी,
मितमधुर मंजुळ ती आशीर्वादाची वाणी, ऐकता हर्षित झाले भक्त,
पावती ते सर्व धन्य मनामाजी अन् गर्जती
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
पाहता पाहता होती अंतर्धान बाबाजी
अन् भक्त साधुयति उठोनिया निघती, जावया आपापल्या गुहेमाजी
सवे त्यांच्या असती आशीर्वादरुपी बाबाजी अन् मनी त्यांच्या घोष
बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी, बाबाजी बाबाजी ॐ बाबाजी
******
राणीखेती गुहेमाजी वाट पाहती बाबाजी
जाऊनिया दर्शन घ्यावे विचार सर्वांच्या मनामाजी
पण ही धावपळ काहीच उपयोगा ना जी
जोवरी तो बाबाजींचा संदेश उमटे ना मनामाजी
कृष्णदास सांगे सर्वांना आजी, संदेश तो मिळण्या जी
घरीच रमा ध्यानामाजी, बाबाजींच्या स्मरणामाजी
तोष त्यांना होता देखा, हाक येईल गुहेमाजी
******
आज अचानक बर्‍याच दिवसांनी आली बाबाजींची आठवण मनी
घेऊ लागलो कानोसा त्यांची चाहूल लागते का पाहुनि
बैसलो असता ध्यानी अवचित विचार उठला मनी
मिटल्या डोळ्या पाहु लागलो, ते दिसतात का मज ध्यानी
एकाग्र केले चित्त अन् लक्ष केंद्रित हृदयस्थानी
मनी म्हटले पाहू बाबाजी उठुनि येतात का गुहेतुनि
स्तब्ध बैसता ऐशापरी कळले ना काळ गेला किती तो उलटुनि
रमलो असा पूर्ण वेळ मी लक्षिता बाबाजींना मनी
सदेह दर्शन ना झाले तरी खूण बांधली मनी
रमता ध्यानी होता अमनी, जाणली कृपेची फेक गुहेतुनि
भानावरी मग मी येता दाटलो हृदयातुनि
अश्रू नयनी अन् उमटले बोल हृदयातुनि
ॐ बाबाजी जय बाबाजी ॐ बाबाजी जय बाबाजी
******
बाबाजी बाबाजी नाम मुखी येते
सुकुमार मूर्ति मन:चक्षूसमोर उभी रहाते
प्रत्यक्ष कधी होणार मन अखंड विचार करते
कधीतरी होणार या विेशासे रहाते
बाबाजी नामे हृदयवीणा झंकारत रहाते
झंकारी त्या देहाचे भान विरत जाते
कृष्णदासा बाबाजींसी एकरुपता येते
******
नाम गाऊया बाबाजींचे, ध्यान करुया बाबाजींचे
खाता पिता उठता बैसता, स्मरण अखंड बाबाजींचे
नाम न उरते काळजीचे, संसाराच्या व्यर्थ चिंतेचे
प्रारब्धाच्या त्या भोगांचे, देहदु:खांच्या वेदनांचे
वेड लागता त्या नामाचे, हिमालयीन यति बाबाजींचे
नयन मनोहर त्या मूर्तीचे, करुणासागर बाबाजींचे
कमलनयन त्या बाबाजींचे, उर्ध्वदृष्टी त्या बाबाजींचे
केशसंभारित बाबाजींचे, स्मर्तृगामी बाबाजींचे
डेरानिवासी बाबाजींचे, डंडाधारी बाबाजींचे
गर्जा नाम बाबाजींचे, धरा ध्यान बाबाजींचे
नामी ध्यानी तल्लीन होता, दर्शन मिळे बाबाजींचे
आशीर्वादामृत ते लाभून, धन्य होईल या जीवनाचे,
वरदान मिळे अमरत्वाचे,
उशीर का करता, गाऊया आता, सत्वर नाम बाबाजींचे
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
******
बाबाजी परमगुरु ध्यान नित्य करु
परम पावन नाम ते वाचे नित्य स्मरु
परमसुंदर रुप ते नयनी नित्य धरु
संतोषे आनंदे अपुले हृदय नित्य भरु
कृष्णदास स्मरे नित्य हृदयी परमगुरु
बाबाजींचा शिरी त्याच्या नित्य कृपाकरु
******
वद वद नाम बाबाजींचे, यतिरुप त्या परमगुरुंचे
स्मरणी हृदय हे हर्षते साचे, भाव अनावर हो मन्मनीचे
रो रो हे गाते साचे, पावन नाम बाबाजींचे
कृष्णदास स्मरणी परमगुरुंचे, विसरे भान निजदेहाचे
******
हिमालयातील गुहेमाजी, का बैसता बाबाजी
हृदयगुंफा या देहाची, अर्पिलिसे तुम्हा आजी
बाळा हृदयी माता जेवि, तेवि मजसी तुम्ही बाबाजी
निवसा मम या हृदयामाजी, वियोग मग तो कधिच ना जी
कृष्णदास हा बाळ आजी, प्रार्थितो माते बाबाजी
******
दिवस असे कोजागिरीचा, पूर्णचंद्र तो दिसे नभीचा
चला गडयांनो नाच करु, बाबाजींसी फेर धरु
बाबाजी श्रीकृष्ण गुरु, राधेचा मनी भाव धरु
नितांतसुंदर रुप निरखिता, देहाचे हो भान दुरु
अनुहताचा नाद टिपरीचा, नामघोष बाबाजींचा
प्रेभाव तो दिसेल साचा, हृदयवेधक पदन्यासाचा
धरिता फेर घेता गिरकी, भास चहूकडे बाबाजींचा
कृष्णदासा खेळ गरब्याचा, अनुभव देई स्वानंदाचा
******
बाबाजी असती प्रत्येक साधकाचा नाथ
शिरी प्रत्येकाच्या असे त्यांच्या कृपेचा हात
संकटकाळी मिळे प्रत्येका समर्थ आधार अन् साथ
कृष्णदासा असे स्मरण नित्य निजहृदयात
******
बाबाजींचे मार्गदर्शन लाभते निजहृदयात
तरलता मनाची लागे परंतु संदेश ओळखण्यात
ॐ बाबाजी ॐ बाबाजी नाम जपा अंतरात
कृष्णदास म्हणे तल्लीन होता खूण कळे हृदयात
******
बाबाजींसम महायोग्याचे व्हावे वाटते दर्शन
सदिच्छा ही करते प्रत्येक साधकाचे मन
ध्यास लागता रात्रंदिन नुरते जगाचे भान
कृष्णदास म्हणे अवस्था येता घडेल सहज दर्शन
******
बाबाजी रमले हिमालयात, आम्ही रमलो संसारात
इच्छा वासनांने केला हा घात,
कृष्णदास मग गुहेतुन थेट आला संसारात!
******
प्रेस्वरूप बाबाजींचे ना कळेचि आम्हा स्वरूप
अज्ञ आमुच्या बुद्धीसी कैसे आकळावे ते रुप
विेश्वाकार चैतन्य असे ते भरले विेशरुप
कृष्णदास म्हणे मग पहा का ना प्रत्येक जीव बाबाजीरुप
******
प्रेमस्वरूप बाबाजी देती प्रेमाचा संदेश
दीन दुबळ्या दु:खिता जाणा जणू बाबाजींचा वेश
भूतदया क्षमेचा हृदयी घ्या आवेश
कृष्णदास म्हणे तेणे तोषेल बाबाजीरुपी परमेश
******
प्रेम जडे जेथे, दोष न दिसे तेथे
प्रेमाच्या या सामर्थ्ये, ध्यानी घ्या त्वरिते
अनुसरता प्रेमवृत्ती, येई आनंदाचे भरते
अंगिकारता प्रेमदृष्टी, सुखमय सकल सृष्टी
प्रेमस्वरूप बाबाजींसी, कृष्णदास याचितो प्रेदृष्टी
******
संस्कारित मनाच्या विविध उर्मी,
उडविण्या लागे निग्रहाची गुर्मी
गुण उपयोगी वर्तता संसारी नित्यकर्मी,
अन् साधना नित्यधर्मी
प्रिय गुण बाबाजींसी,
कृष्णदास याचितो नित्य स्मरणी
******
आंतरिक वैराग्याचे निखारे,
भस्मसात करती जन्मजन्मींच्या संस्कारे
कृष्णदास म्हणे बाबाजींसी, दान मागुनि सर्व आज घ्या रे
******
नम्रता अतिप्रिय बाबाजींसी, येण्या एक उपाय
मी नाही मी नाही, तोच भरला सर्वा ठाय
लोपता मी माझे, लोपते तू तुझे
कृष्णदास म्हणे नम्रतेचे, दान नाश अहंतेचे
सर्वाठायी दिसे मग, रुप भरले परमेशाचे
******
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
नऊ अक्षरी दडले असे जे, सामर्थ्य तुम्ही जाणा आजी
ॐ इति एकाक्षर ते ब्रह्म, महावतार ते बाबाजी
जय नामे जयजय करिता, प्रसन्न होईल तुम्हा आजी
कृष्णदास म्हणे मोक्ष सोपा, जपता नाम हृदयामाजी
******
प्रेमाने करिता निजआप्त स्मरण आठवण,
स्मृती उमटते निजमनी त्वरित तक्षण
कैसे घडते कळण्या जरी अजाण जाण,
प्रेमचि असे केवळ त्या कारण
कृष्णदास करतो क्षणोक्षण,
प्रेमावतार बाबाजींचे स्मरण
विेश्वरुप मन झाले असे ज्यांचे,
त्या बाबाजींसी खचितचि कृष्णदासाचे स्मरण
******
आनंदले आज बाबाजी, प्रेमोत्सवी स्मरण झाले लोकांमाजी
देखिले ना ज्या देवा कधिही, तरीही भजती हृदयामाजी
भाव कैसा येतो नकळे, स्फुरण उगम कोठे
संबध हा गतजन्मींचा, स्मरणे कंठ दाटे
हृदयाहृदयी जडली तार, दोहींकडे झाला आठव
भक्ताहृदयी प्रेमोत्सवी, प्रेमाचा झाला वर्षाव
प्रेमभावी विस्मरण, देवभक्ता एकपण
आनंदाची उघडे खाण, बाबाजींची कृपा खूण
कृष्णदासा मनी जाणवे, प्रेमोत्सवाचे सफलपण
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
******

हे बाबाजीऽऽ कृपाळू ताता
तव चरणी ठेवू दे मज माथाऽऽ, आता तव चरणी ठेवू दे मज माथाऽऽ
दर्शनासी नको उशीर गा आता, तव नाम धरियेले दृढ चित्ता
दृष्टी वळवी तू मजवरी आता, कृपाकटाक्षे निरखि मज त्वरिता
कृष्णदास घालुनि दंडवता, तव कृपा याचितो ताता
******

कुणी न जाणिती जन्म आपुला, अजन्मा तू भूवरी अवतरला
बाबाजी हो जय बाबाजी , नमन महा अवताराला
चैतन्यरूप तू स्मर्तुगामी तू, नमन माझे तव पदाला
हिमालयाच्या गिरीकंदरी, वास करसी गिरिशिखरी
शिष्यमेळा सवे घेऊनि, विहार करसी त्रिभुवनाला
तेजोमय अति रूप तुझे ते, दृष्टी अखंड स्थिर भृकुटीला
पद्मासनी स्थित चरणकमल ते, नित्य मी धरितो निजहृदयाला
तृषार्त मज दो नयन हे, दर्शन करण्या तव रुपाला
ऐकू दे तव मंजुळ वाणी, पुरवि रे मज श्रवणांची धणी
हस्त कृपेचा शिरी पडू दे, निश्‍चिंत मजसी आज गमू दे
संजीवन तव कृपादृष्टीच्या, कृपाकिरणी मज न्हाऊ दे
चैतन्याचा स्पर्श होऊनि, आत्मज्योत अंतरी उजळू दे
शुद्ध भाव मज जाणुनिया तू, आशीर्वच मज सत्वर दे दे
बाबाजी हो जय बाबाजी, स्मरण तुझे रे नित घडू दे
प्रेमभाव तो जागृत करुनि, होवो भजनी रसाळ वाणी
अखंड अविरत गुण गाण्यासी, स्फुर्ती नव ती नित घडू दे
सर्वसाक्षी तू भाव मनीचा, जाणिलासी ही साक्ष पटू दे
बाबाजी हो जय बाबाजी, तव कृपेचा अनुभव दे दे
कृष्णदास करी प्रार्थना ही, मान्य करुनिया प्रचित दे दे
******

|| स्वागत गीत ||

डेरा दंडा उठवा बाबाजी, दर्शनासी आम्ही तृषार्त आजी
प्रेमाने तुज साद घालितो, आगमनाची तव वाट पहातो
रांगोळी ही नाना रंगी, शोभतसे कशी पहा अंगणी
द्वारी सुंदर तोरणे ही, पहा सजविली स्वागत करण्या
शुद्ध भाव पायघडी ही, अंथरली तव पद ठेवाया
अष्टभाव दरवळे सुगंध, मनी प्रत्येका अति आनंद
नामगर्जना नौबत झडते, आनंदे अंतर धडधडते
उच्चासन हे तुम्हा मांडिले, सुगंधित पुष्पे सजविले
आसनस्थ तव मूर्ती पहाया, नयन सारे आजी भुकेले
या या या या या बाबाजी, दर्शनासी नको उशीर आजी
प्रेमोत्सव हा पहा मांडिला, तव भक्तांचा मेळा जमला
बाबाजी अमुचे बाबाजी, दिसती कधी हो नयना आजी
इच्छा मनी दृढ धरुनिया, पुण्यनगरी मेळा सहजी
कृष्णदास मनी स्वागत करण्या, शब्द उमटले हृदयामाजी
अंत:र्साक्षी तुम्ही बाबाजी, भाव जाणुनि सत्वर या जी
या या या या या बाबाजी, आशीर्वाद आम्हा सर्वा द्या जी
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
ॐ बाबाजी जय बाबाजी, ॐ बाबाजी जय बाबाजी
******

|| आरती ||
महावतार बाबाजींसी करुया आरती, स्वामींसी करुया आरती
करुणा, प्रेम मूर्तरुप जे साकारले धरती, बाबाजी अवतरले धरती ||धृ||
निजहृदयरुपी सुवर्णतबकी उजळुनि, नेत्रांच्या ज्योती, उजळुनि नेत्रांच्या ज्योती,
किणकिण अनुहत घंटेसंगे, रोम रोम गाती ||१||
शुद्धभाव कमलपुष्प अर्पुनि श्रीचरणांवरती, स्वामींच्या श्रीचरणांवरती
ऐक्यत्वाची करु भावना, सहस्त्रदळावरति ||२||
साधक सकल निश्‍चिंत गमती, समर्थ तव हाती, बाबाजी समर्थ तव हाती
कूर्मदृष्टी पोषिसी रमविसी साधनापथावरती ||३||
उर्ध्वदृष्टी भृकुटीमध्ये पाहसी सकल या जगती, पाहसी सकल या जगती
ध्यानमग्नते मनी लक्षिसी भक्ता अंतर्जगती ||४||
स्मरणी करसी कृपा तत्क्षणी करुणेची रिती, स्वामी तव करुणेची रिती
जन्मोजन्मी रक्षिसी निशिदिनी, ही तव प्रेरीती ||५||
रुप तुझे राहो दृष्टी, स्मरण अंतराती, बाबाजी स्मरण अंतराती
देहभाव विस्मरणी येवो एकरुप स्थिती, येवो आत्मरुप स्थिती ||६||
चैतन्यस्वरूप आपुले आम्ही ध्यातो नित चित्ती, बाबाजी ध्यातो आम्ही चित्ती,
स्मरणी सहजी विलीन होती, सकल चित्त वृत्ती ||७||
स्मरणी येते निजहृदया या प्रेाची भरती, हृदयी भावाची भरती
कृष्णदास याचितो कृपेसी, शरणी दंडवती ||८||
******

|| प्रार्थना ||
हे प्रभु महावतार बाबाजी, हम करते है आपको शतश: प्रणाम
स्वामी है आप हम दास आपके, दयालु कृपालु आप है महान
हम अज्ञानी हित ना जाने, समर्थ हो प्रभु आप हमारे
दिल चाहे हम आपसे, आज मॉंगे कुछ वरदान
जीवन की कठिनाईयोें, देहदु:ख की परिसीमा मे
धैर्य और श्रद्धा के, अविचलता का देना वरदान
पवित्र हृदय, विशाल दृष्टी, अहं नाशकर नम्रता का देना दान
निसदिन पल पल हरपल मन की, प्रसन्नता का देना वरदान
अंतर्याी प्रभु प्रे जगाओ, मोक्षपथपे हमे ले जाओ
मोक्ष के साधनापथपर, अखंड साथ और सफलता का, देना आज हमे वरदान
स्वरूप आपका हम ना जाने, खुद कर देना आपकी पहचान
अज्ञानी शरण हमे स्वीकार कर ज्ञान का आज देना कृपादान
******

आरती व प्रार्थना  PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *