श्री नरसिंह सरस्वती यति आळंदी

NarasimhaSaraswati_Alandi

आळंदीसी नरसिंह सरस्वती यति, कांति जशी नवबालक अति
विलोभनीय हास्य मुखावरी, आजानुबाहु असे ती मूर्ती
नौली धौती क्रिया जाणती, योगाभ्यासी पारंगत अति
कुणासी नाही ठावठिकाणा, कोठून अवतरले ये क्षिती
अलंकापुरी आले वसति, जाणूनिया माऊलीची महति
जरी अस्खलित संकृत वाणी, समर्थ आदेशी प्राकृत बोलती
माऊलीवरी भाव तो अचाट, दर्शना जाता मुर्च्छित होती
माऊलीवरी प्रेम ते आगळे, यात्रेत रथ ते स्वत: ओढीती
दत्त संप्रदायी असे हे यति, कार्य त्यांचे अति गूढ, कुणीही न जाणती
इंद्रायणीतीरी त्यांची असे समाधी, दर्शना जातां भक्त कृपा अनुभवती

******

आळंदीचे स्वामी यति, मूर्ति असे नामी अति
बाल हास्ये मुखी शोभती, श्री विठ्ठल मुखी गाती
योगी तरीही भक्त अति, माऊलीप्रति प्रेम किती
चमत्कारांना नाही गणती, कृष्णदास दर्शन इच्छिती

******
आळंदीचे स्वामी गाती श्री विठ्ठल
भक्तांसी उपदेश मंत्र श्री विठ्ठल
नाम ऐकता दंग होई श्री विठ्ठल
कृष्णदास नामी रंगे श्री विठ्ठल
******
श्री विठ्ठल श्री विठ्ठल,फाडी अज्ञानपटल
आळंदीचे स्वामी, उपदेशिती श्री विठ्ठल
योगाचे ते ज्ञान, देई श्री विठ्ठल
भक्तिप्रेमसुुखही, देई श्री विठ्ठल
भक्तियोगयुत मंत्र, आहे श्री विठ्ठल
कृष्णदास गाता, नाचे श्री विठ्ठल
******
गाता श्री विठ्ठल, तो अचाट लक्ष्मीनारायण
श्री नाम ते लक्ष्मी, अन् विठ्ठल नारायण
दोहोसहित असे, नाम श्री विठ्ठल
शिवशक्ति बीज, नाम श्री विठ्ठल
अगाध सामर्थ्य वसे, नामे श्री विठ्ठल
कृष्णदास सांगे, देई भुक्तिमुक्ति सहज
******
स्वामी नरसिंव्ह सरस्वती, मुखी हास्य सांगो किती
पाहताती प्रसन्न चित्ती, देखिताची धन्य अति
पवित्र शांत गूढ अति, मठ भरला भावतो अति
कृष्णदास अर्पितो भावे अति, स्वामी मिरविती हार गळयाप्रति
पाहोनिया वाटे सांगो किती, धन्य धन्य डोळयांप्रति
******
आळंदीचे स्वामी, मूर्ति आजानुबाहू
प्रसन्न नेत्र मुखकमली, हास्य किती हे पाहू
कांति मृदु अति कोमल, बालक जणू की पाहू
भोजना बैसता घालिती, राघू बोक्या जेवू
उच्च कोटीचे योगी परि, महति किती हो पाहू
तुळसी माळ त्या कंठी, शोभे अति हे पाहू
टोपी कफनी लुंगी, रुप मनोहर पाहू
कृष्णदास म्हणे, स्वामीचरणी नत या होऊ
******

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *