पंढरीची वारी

पंढरीची वारी 2012 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी मारा

पंढरीची वारी 2013 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी मारा

पंढरीची वारी 2021 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी मारा


॥ पंढरीची वारी २०१२ ॥

Pandharichi Vari 2012

हृदयी भाव अपार, हृदयी भाव अपार
दाता सुखसागर, दाता सुखसागर
वसे भीमातीर, वसे भीमातीर
चला चला पंढरपूर, रूप देखण्या सत्वर
उभा विटेवर, तो हा उभा विटेवर
रखुमाईचा वर, रखुमाईचा वर
कर दोन्ही कटिवर, गळा वैजयंती हार
कानी कुंडले मकर, शिव शोभे शिरावर
शांत भाव नेत्रांवर, मंद हास्य मुखावर
तेज लावण्य सुंदर, प्रभा नील सभोवार
राजस सावळे, ध्यान दिसे सुकुमार
मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
उठे भाव मनी अपार, लोटे नयनी अश्रूधार
देहभान विसर, होतो देहभान विसर
सुखराशी हो अपार, तो हा विठ्ठल सुंदर
पताका खांदयावर, संगे वारकरी अपार
कृष्णदास भरभर, चाले वाट पंढरपूर,
चाले वारी पंढरपूर
मुखे विठ्ठल गजर, मुखे विठ्ठल गजर
चाले वारी पंढरपूर, चाले वारी पंढरपूर
*-*-*
पायी घेतलीसे वीट, म्हणे घ्या संसाराचा वीट
कटिवर दोही हात, दावी अकर्त्याची खूणगाठ
नेत्र मिटुनिया घट्ट, दावी लक्षा अंतरी निकट
शिरी देवराणा, दावी सहस्त्रारी शिव भेट
कृष्णदास म्हणे विठू, दावी परमार्थाची वाट
*-*-*
आषाढीची वर्षे धार, भक्तिभावा येई बहर
आनंदाची उठे लहर, दिंडी चाले पंढरपुर
भावभक्तिची हो धार, सोऽहं उर्ध्व अहं विसर
रंध्री घेई ब्रह्म भान, सत्रावीचे उलटे नीर
ब्रह्मांडी ती जलधार, पिंडी सत्रावीचे नीर
आरंभ तो मूलाधार, विठू असे सहस्त्रार
कृष्णदासा होय नित्य, वारी ही च अनावर
*-*-*
आली आषाढीची वारी, आली आषाढीची वारी
विेठू उभा विटेवरी, विेठू उभा विटेवरी
वाट पाहतो गाभारी, वाट पाहतो गाभारी
पायी चाले वारकरी, पायी चाले वारकरी
मुखे राम कृष्ण हरि, मुखे राम कृष्ण हरि
दिंड्या पताका अंबरी, दिंड्या पताका अंबरी
दिंडी चाले पंढरपुरी, दिंडी चाले पंढरपुरी
होय आनंद अंतरी, होय आनंद अंतरी
विठू अंतरी बाहेरी, विठू दिसे जगदाकारी
मी पणा नासे त्वरी, देहभाना हो विसरी
कृष्णदास म्हणे वारी, तुटे जन्ममरण फेरी
*-*-*
दिंडी चालली चालली, दिंडी चालली चालली
मनी विठाई माऊली, मंद चालती पाऊली
पुढे चाले वीणाधारी, मागे मागे वारकरी
मुखी राम कृष्ण हरि, मुखी राम कृष्ण हरि
टाळ मृदुंग तो करि, मुखे नामघोष करी
लक्ष कळसाचे वरी, विठू लक्षितो अंतरी
कृष्णदास पंढरपुरी, चाले आषाढीची वारी
*-*-*
ठेविले कर कटी, अचल भीमातटी
अचल श्रद्धा वीटी, उभा असे जगजेठी
कृष्णदासाची हाकाटी, धावा पंढरपुरी थेटी
*-*-*

vitthal_8

धरिले कटिवरी हात, उभा विटेवरी ताठ
झाला विठू प्रगट, चंद्रभागे तट
पर्वणी एकादशीत, जाऊ आषाढात
सोडी कटिवरील हात, भक्ता अलिंगन देत
कृष्णदास जाता वारीत, झाला सर्वांगे पुनित
*-*-*
गाठा भीमातीर, गाठा हो सत्वर
उभा विटेवर, हरि निरंतर
संसाराचे तीर, जीव हा जर्जर
प्रेमाचे दो शब्द, न ये कानांवर
प्रेमासाठी जीव, आसुसला पार
संसारी ना दिसे, कुठे कणभर
जीवलग सारे, स्वार्थाचा बाजार
लोभ मत्सराचे, झंझावात वार
प्रेमाचा निर्झर, अमृत सागर
सावळा हा हरि, असे विटेवर
बोलेना जो तरी, सुखावतो फार
नाटकी लाघवी, असे किमयागार
अमृतदृष्टी, निरखिता करुणाकर
घाव सारे येती, भरुनि सत्वर
पाहताचि रुप, पाडितो विसर
दर्शनाक्षणीच, नयनांसी नीर
विठ्ठल विठ्ठल, वाचेसी उच्चार
अंतरी उमाळा, येतसे बाहेर
रोमांचित तनू, विगलित फार
देहभाव तोही, होई तो विसर
अंतरी येऊन, भाव गहिवर
कृष्णदास माथा, टक विटेवर
*-*-*
विठ्ठल विठ्ठल गर्जती टाळ,
वारकरी भक्त झाले घायाळ
मनी दर्शनाची आस केवळ,
फास तुटला विषयव्याळ
आषाढाचे दाटले आभाळ,
भाव नेत्री अश्रू घळघळ
कृष्णदास म्हणे जाणती हे,
विठूरायाचे भक्तचि केवळ
*-*-*
भीमातीरी नाचे, भीमातीरी नाचे
थवे वैष्णवांचे, थवे वैष्णवांचे
बोल मृदुंगांचे, टाळ गर्जे साचे
हरि हरि वाचे, भान ना देहाचे
सावळया विठूचे, वेध सगुणाचे
वेध या जीवांचे, विठू दर्शनाचे
वेड हे भक्तिचे, वेड सावळयाचे
कृष्णदास म्हणे, काय वर्णू वाचे
*-*-*

vitthal_1

काय वर्णू वाचे, रुप सावळयाचे
विठू माऊलीचे, सुंदर ते साचे
भाव हे मनीचे, फुलती रोमांचे
नीर नयनांचे, ओघळते साचे
कल्लोळ टाळांचे, बोल मृदुंगाचे
भक्तजन नाचे, दृश्य भीवरेचे
दृश्य हे वारीचे, येता आषाढाचे
कृष्णदास वाचे, वर्णितो हे साचे
*-*-*
संत चालले पंढरी, मुखी राम कृष्ण हरि
ध्वजा पताका अंबरी, विठू राहे हृदयांतरी
टाळ कल्लोळ बाहेरी, भाव कल्लोळ अंतरी
आली आषाढीची वारी, कृष्णदासा इच्छा भारी
*-*-*
राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि
दिंडी चालली पंढरी, दिंडी चालली पंढरी
दिंड्या पताका हो करी, पुढे चाले वीणाधारी
टाळ दुमदुमती अंबरी, मृदुंग नाद सभोवारी
तुळसी डोईवरी, माता चालती भरभरी
भाव ओसंडी अपारी, वेध पंढरी पंढरी
आली पंढरीची वारी, कृष्णदास त्वरा करी
*-*-*
चला जाऊ पंढरपुरी, पाहू सावळा श्रीहरि
संगे घेऊ वारकरी, हर्ष अंतरी बाहेरी
नाम गर्जे मुखावरी, चित्ता व्यापितो श्रीहरि
करु पापासी बोहरी, पुण्य राशी हो अपारी
चला वारीसी पंढरी, कृष्णदासा झेंडा करी
*-*-*

vitthal_64

चला चला भीमातीरी, वाट पाहतो श्रीहरि
ज्याचे कर कटीवरी, उभा असे विटेवरी
नाम येता मुखावरी, मूर्ती साक्षात सामोरी
कृष्णदासा नयनांतरी, अश्रू ओघळताती सरी
*-*-*
आली पंढरीची वारी, तिची कथा असे न्यारी
देव दर्शनासी भक्त, शिणताती परोपरी
परि पंढरीच्या वारी, वाट पाहतो श्रीहरि
दर्शनासी कोण कोण, येते पाहू पंढरपुरी
विठूराजा भक्त प्रजा, वारी प्रजा होते राजा
कृष्णदास पाही मजा, विठू हृदयीचा राजा
*-*-*
विठ्ठल विठ्ठल, टाळ गर्जती मृदुंग
नाद येता कानावरी, पुलकित अंग अंग
भक्त झाले पहा वारी, विठू नामात हे दंग
कृष्णदास घेई संग, गाई विठ्ठल सर्वांग
*-*-*
भक्त झाले नामी दंग, विठ्ठल नामाचा हा संग
तन मन झाले धुंद, भक्ति चढे अंगा रंग
होवोनिया भव भंग, भक्त झालासे नि:संग
कृष्णदासावरी चढे, वारीचा हा भक्ति रंग
*-*-*
भक्त दंग विठू नामी, विठू भक्तांच्या हो ध्यानी
देवभक्ता मनोमनी, एकमेका धरती ध्यानी
विठू रुप भक्ता मनी, भक्त रुप विठू मनी
कृष्णदास वारीची ही, वर्णितो कहाणी
*-*-*
चालती अनवाणी, विठ्ठल गर्जतसे वाणी
पंढरीसी विठू उभा, पहा देव चक्रपाणी
माता मुखी दंग, त्याच्या गुण कथा गानी
कृष्णदासा वाटे नवल, देवा विसर रुक्मिणी!
*-*-*
पुंडलिके भीमेतटी, आणिलासे चक्रपाणी
मातापिता सेवे तोषे, देव झाला पहा ऋणी
रुप सुंदर सावळे, विटे पहा हो नयनी
दर्शन घेता भावे, पुरे नयनांची धणी
दर्शनासी या विठूच्या, झाली वारीची आखणी
पुण्य पदोपदी वाढे, कोण करील मोजणी
संत मांदियाळी संगे, रंगे विठू नामरंगे
चाले आषाढी वारीसी, कृष्णदास विटे दंगे
*-*-*

vitthal_7

विटे उभा चक्रपाणी, सवे नाही हो रुक्मिणी
देव भक्ताचा तो ऋणी, काय सांगू ती कहाणी
विसरले मायापाश, भक्त विठूच्या या ध्यानी
परि विठू झाला दंग, भक्तांच्याही मनी ध्यानी
विसरला भक्त सारे, विठ्ठलाच्या दंग ध्यानी
कृष्णदासा भारी नवल, विठू विसरे रुक्मिणी
*-*-*
विसरला वारी भक्त, संसाराच्या सार्‍या व्यथा
चालताना गाती मुखी, विठूच्या रे गुण गाथा
‘विठ्ठल विठ्ठल हरि’,‘राम कृष्ण हरि’
सवे ‘ज्ञानोबा माऊली’,‘ग्यानबा तुकाराम’ बोली
टाळ मृदुंगाच्या संगे, भक्त भक्ति रंगी डोली
कृष्णदास मुखी गातो, विठ्ठल विठ्ठल ही बोली
*-*-*
विठ्ठल विठ्ठल ही बोली, काय असे त्याची खोली
हृदयात उतरता, नाम रस गोडी सोडी
सेविता सेविता रस, आवडी आवडी
तोडी विषयरस गोडी, वाटे विठ्ठल नाम गोडी
पदोपदी वाढी वाढी, विठू नामाची ही गोडी
कृष्णदास विठू वारी, विठ्ठल नाम गोडी
*-*-*
विठ्ठल नाम गोडी, छंद जीवासी आवडी
सेविता त्याची गोडी, माया पाश सहजी तोडी
भागवत धर्मे दिली, हाती पंढरपुर गुढी
कृष्णदास हाती धरी, नेई पुढे ती आवडी
*-*-*
आषाढीच्या विठू वारी, हाती पंढरपुर गुढी
उभवुनि उंच वरी, नेती विठ्ठल सौंगडी
गाती नाचती आनंदे, सवे घालिती फुगडी
एकमेका हृदयाची, हृदयी बैसे सहजी घडी
जातपात भेद सारे, कसे क्षणातची दवडी
कृष्णदासा विठू वारी, जीवा भारी हो आवडी
*-*-*
विठू नाम मुखावरी, विठू ध्यान हो अंतरी
विठू नाम ध्यानी दंग, झाले वारकरी
विठ्ठल विठ्ठल, नामऽऽ पावन गजरी
टाळ मृदुंग ते करी, वाट चालती पंढरी
दिंड्या पताका उंचवरी, स्पर्शो पाहती अंबरी
कृष्णदास सांगे असे, भक्तिभावाची ती थोरी
*-*-*
भावभक्तिची ती थोरी, पंढरीची असे वारी
देवा भेटायासी भक्त, चाले पंढरीची वारी
जप राम कृष्ण हरि, गर्जें उच्चार वैखरी
सबाह्य अभ्यंतरी भक्त, व्यापुनिया राही हरि
विसर होतो सहजी अन्य, देहभाव तोही हरी
कृष्णदास सांगतसे, हीच वारीची हो थोरी
*-*-*
वारीची हो थोरी, वर्णाया मति हो अपुरी
भक्त धावती पंढरी, देव पहाया श्रीहरि
पुंडलिके ऋणी करुनि, उभा केला भीमातीरी
कटीवरी ठेले हात, रुप दिसे विटेवरी
भक्तिभावा आसुसला मनी, देव तोषतो अंतरी
दर्शनासी माझ्या पहा, भक्त चालताती वारी
दर्शनासी येता द्वारी, देऊ काय चिंता भारी
भक्त माझे भोळे भारी, ना भुलायाचे सहजी परि
कृष्णदास सांगतसे, विठू देवाची हो थोरी
मागतो जो ‘मी’पणा, त्यासीच विठू हरी!
हीच वारीची हो थोरी, हीच वारीची हो थोरी
अनुभवाया सत्वरी हो, चाला पंढरीची वारी,
चाला पंढरीची वारी
*-*-*
विठ्ठलाच्या ध्यानी, झाले जन दंग
विटेवरी उभा, दिसे पाडुरंग
सावळया विठूचा, निळा निळा रंग
भुलवितो जना, घडताचि संग
चढवितो मना, कैसा भक्तिरंग
कृष्णदास रंगुनिया गातो, विठूचे अभंग
*-*-*

vitthal_9

मनी विठू भक्तिचा, चढलासे रंग
जनसागर वारीसी, दिसे हा अथांग
संगे गर्जे टाळ, बोलतो मृदुंग
नाद रमवितो, करी जना धुंद
अचल विटेसी कटी, हस्त अभंग
नाचवितो भक्तां, कैसा पाडुरंग
मनी झाले सर्व, विठू ध्यानी दंग
कृष्णदासा चढे, विठू भक्ति रंग
*-*-*

vitthal_65

विठ्ठल विठ्ठल, गर्जती टाळ
विटेवरी विठू मनी, हसतो खट्याळ
खट्याळ अति परी, असे लडिवाळ
विठू स्मरणी भक्त, हृदयी घायाळ
स्मरणी सहजी सुटती, विषयव्याळ
कृष्णदास म्हणे घडे येता, वारीची वेळ
*-*-*
वारीची वेळ झाली, चला उठा जन
विठूसी लक्षिता, नाही थार्‍यावर मन
टाळरंगे मन डोले, नाही देहभान
मृदुंगाच्या थापे येई, आनंदा उधाण
लगबग लगबग, चाले वारकरी जन
कृष्णदास चालता, विठूकडे मन
*-*-*
विठूकडे मन, चालता ना भान
शुद्धीवर नाही तन, आनंदा उधाण
भक्तिच्या वाटे, चालता बेभान
कृष्णदास म्हणे जन, सहजी उन्मन
*-*-*
सहजी उन्मन, गाई तन मन
पंढरीची वाट चाले, वारकरी जन
जप ध्यानी बैसता जे, नावरिते मन
टाळ मृदुंगाच्या संगे, त्याचे विस्मरण
विठूच्या भक्तिची, असे भक्ता देण
कृष्णदास सांगे त्याचे, भक्ति हे कारण
*-*-*
भक्ति हे कारण, वारी धावे जन
विठूचे लक्षिती, विटेवरी चरण
सावळया विठूचे, गाती गुणगान
विठू ध्यानी दंग, तन अन् मन
योगमार्ग प्राप्ति, सहजीच जाण
कृष्णदास वारकरी, अनुभवी खूण
*-*-*
अनुभवी खूण, नाही संशया कारण
वीटेसी लक्षिता, मनासी उन्मन
सावळया विठूचे, अचल चरण
अचपल मनासी, घालिते वेसण
भागवत धर्मे, दिली आम्हा देण
कृष्णदास चाले वारी, संशया ना ठाण
*-*-*
संशया ना ठाण, मनासी विश्राम
सावळा विठूचि, असे सुखधाम
पंढरीसी मांडिले असे, विटेवरी ठाण
वारीसी ध्यानीमनी, तोचि प्रतिक्षण
व्यापुनिया घेतो, नकळत तनमन
कृष्णदास हृदय, झाले सुखधाम
*-*-*
झाले सुखधाम, चित्तासी आराम
वारकरी विठू ध्याता, रंगले ध्यान
निश्‍चळ मन, निवांत तन
संसाराची नुरे, काही आठवण
भक्तिसुखाची, उघडली खाण
कृष्णदास लुटतो, सर्वां पाचारण
*-*-*
सर्वां पाचारण, विठूच्या पंढरी
भक्ति नवनीत, आयतेच करी
मंथनाचे कष्ट, निरविले हरी
घ्या हो लुटुनिया, चव त्याची न्यारी
चला चला चला, जन हो पंढरी
कृष्णदास सार्‍या, जनांसी हाकारी
*-*-*
जनांसी हाकारी, लुटा लुटा पेठ
पंढरीसी विठूने, भरविला हाट
भक्तिसुख पेठ, काय वर्णू थाट
सेविता सेविता, अपुरेचि पोट
दामाची तेथ, नाही कटकट
शुद्ध भाव केवळ, मूल्य ते चोखट
विटेवरील सावळयाचा, ना येई कधी वीट
कृष्णदास पाचारितो, करितो बोभाट
*-*-*
करितो बोभाट, धरा सावळयाची वाट
भीवरेच्या तीरी, उभा जो निकट
चरणांसी धरली, अचल ती वीट
चालवितो भक्ता, परमार्थाची वाट
श्रम ना चालण्याचे, शीण ना फुकट
भक्तिसुख लोणी, आयतेच ताट
सेवा मेवा नका दवडू, संधी ही फुकट
कृष्णदास सांगे धरा, वारीची वाट
*-*-*
वारीची वाट, सोपी पायवाट
क्षणोक्षणी विठूचे, स्मरण दाट
विसरवी भक्तां, संसाराचा रखरखाट
वर्षितसे भक्तिधारा, प्रेमसुख ते अवीट
प्रेमसुख गोडी, सेविता चोखट
घडे पहा कैसे, नवल अचाट
देहासह विेशाचा, घेवुनिया घोट
कृष्णदास म्हणे विठू, वीटेसी ताठ
*-*-*
वीटेसी ताठ, विठू पंढरी निकट
घेण्या त्याची गाठ नाही, कुणा हो अटक
सावळयाची घेता, भक्तिभावे भेट
मायापाश सारे, तुटती तटातट
मुक्त होतो वारकरी, मग आनंद अवीट
सावळयाची पंढरी, मुक्तिची पेठ
या रे या रे पाचारितो, करुनि बोभाट
सावळ्या विठूचा, कृष्णदास भाट
*-*-*
सावळया विठूचा, संग किती बरा
घेईल जो कुणी, विसरे घरदारा
सावळ्या विठूचा, लागता भक्ति वारा
उडवितो पाचोळयागत, मायेचा पसारा
सावळ्या विठूचे, ध्यान करील जो खरा
सहजीच जाईल, सुखे सहस्त्रारा
कृष्णदास सावळया विठूचा भक्त खरा
नित्य त्याच्या कृपे रमे सहस्त्रारा!
*-*-*
सावळया विठूची, काय सांगू मात
विेश्वावरी त्याच्या, कृपेचा असे हात
कृपा होता कोण अडके, मायापाशात
भक्तजन घेती, अनुभव साक्षात्
उभा असे पंढरी, विटे गाभार्‍यात
व्यापुनिया राही, अखिल भक्त हृदयात
असता कृपा हस्त, अन् निरंतर साथ
कृष्णदास म्हणे काय, दु:खाची मात
*-*-*
दु:खाची मात नुरे, जाता पंढरीत
कृपाछत्र उभवुनि असे, पंढरीचा नाथ
संसाराची नुरे वार्ता, भावाचे आर्त
भक्त मनीचे पुरवितो, सारेचि अर्थ
चला चला वारी वाटे, करा जीवनाचे सार्थ
कृष्णदास म्हणे नातरी, जीवन हे व्यर्थ
*-*-*
जीवन हे व्यर्थ, ना साधे परमार्थ
विठूभेटी ना होई, जीव जरी आर्त
भक्ताचे आर्त देव, प्रकटला पंढरीत
दर्शनासी तेथ, काही नाही हो वेचत
वत्साचे मिसे, दुभते घरात
पुंडलिकाचे मिसे, परब्रह्म पंढरीत
भक्तभेटीसी विटेवरी, सर्वकाळ तिष्ठत
कृष्णदास सांगे भेटीसी, चला पंढरीत
*-*-*
चला पंढरीत, देव असे हो तिष्ठत
भेटीलागी जाता तेथ, असे सर्व हित
डोळे मिटून विटे उभा, सोंगाडया अनंत
लक्ष ठेवुनि सारे असे, नीट त्रिभुवनात
दूर जरी फार तरी, हाकेच्या अंतरात
कृष्णदास म्हणे भेटे, पोहोचता हाक हृदयात
*-*-*
हाक हृदयात, अन् विठू हृदयात
उठता घुमते, विठूच्या कानात
विठू तोषतसे, मनातल्या मनात
भक्तालागी माझे स्मरण, होते हृदयात
तोषता विठू, तोष भक्त हृदयात
कृष्णदासा शिरी असे, सावळयाचा हात
*-*-*
सावळयाचा हात, असे कटीवरी
समचरण ताठ, दिसे विटेवरी
देवराणा शिव, असे शिरावरी
रुप कैसे शोभे, शोभे विटेवरी
रखुमाई नाही, नाही बरोबरी
मिटल्या नेत्रांनी, पाहे अंतरी
मूकपणे उभा, समाधान मुखावरी
सांगतसे काय, ध्यानी घ्या हो परोपरी?
राहुनिया अचल जो, माये पाठ करी
उफराटी दृष्टी, जाय अंतरी
वामसव्य वारा, समसमान जरी
सुषुम्नेतुनि चाले, पंढरीची वारी
पोहोचता मग, तुम्ही सहस्त्रारी
मी-तू पणा तेथ, नाही तिळभरी
डुंबाल तुम्ही, मग सुखसागरी
हीच हीच हीच, पंढरीची वारी
हेचि दाखवाया उभा, भीवरेच्या तीरी
कृष्णदास सखा, सावळा श्रीहरी
*-*-*

vitthal_6

सावळा श्रीहरी, असे करुणाकरी
भक्तिसी आसुसला, वाट पाहे भीवरेतीरी
कृपावर्षावाची त्याच्या, वर्णू काय थोरी
नेदी भक्ता बुडु, संसारसागरी
वारीसी चालता मुखे, राम कृष्ण हरि
कृष्णदास म्हणे डोले, विटेवरी हरी
*-*-*
विटेवरी हरी, अन् मनामध्ये हरी
दंग होता मनावरील, आघात निवारी
दु:ख भार उतरता, येई शीतलता सारी
कृष्णदास म्हणे सुख, देतसे वारी
*-*-*
देतसे वारी, सुख परोपरी
भक्तकाज पुरवितो, सावळा श्रीहरि
हरि हरि म्हणता, भवदु:ख ते हरी
कृष्णदास लक्षी त्यासी, चातकापरी
*-*-*
चातकापरी, लक्षी मेघ अंबरी
विठूभक्त वारकरी, चाले पंढरी
भक्तिसुखा आसुसला, भक्त अंतरी
भक्तिप्रेमा आसुसला, सावळा श्रीहरि
हरि हरि हरि नाम, होतो गजरी
आषाढीचे मेघ, दाटती अंबरी
शीतल मन होता, वर्षताती सरी
कृष्णदास चिंब होत, भावलहरी
*-*-*
भावलहरी अन् सुखलहरी
पायघड्या पंढरीच्या वाटेवरी
विठू नाम शीतल, वारा सभोवरी
विठू ध्यान मंद, सुगंध धुंद करी
आवरिता नावरे भाव, हृदयकुहरी
कृष्णदास पाऊले, चाले पंढरी
*-*-*
चाले पंढरी, लक्षी सावळा श्रीहरि
आषाढात वारकरी, विठू गजरी
डोलते तन, थाप मृदुंगावरी
डोलते मन, हरि नाम गजरी
देवसुरगण दाटी, झाली अंबरी
सुख स्वर्गी नाही त्यांना, जे हे भूवरी
सावळा खट्याळ कसा, लबाड हरि
अचल वीटे परी, बोलावी पंढरी
मूकपणे खेचितो, लावुनि दोरी
कृष्णदास म्हणे, भक्तां ओढी पंढरी
*-*-*
ओढी पंढरी, जरी कर कटीवरी
अकर्त्याची खूणगाठ, दावितो बरी
आषाढाचा मास येता, चमत्कार घरोघरी
हरि दिसे जनी मनी अन् सभोवारी
नकळत चाले पाय, वाट पंढरी
भक्ता ध्याय विठू राहुनि, उभा विटेवरी
मी नाही मी नाही, बोलाविले पंढरी
लबाड अति खट्याळ, सावळा श्रीहरि
तान्हुल्याची माय, जैसी क्रीडा करी
कृष्णदास माय, तान्हुला श्रीहरि
*-*-*
तान्हुला श्रीहरि, नांदे नंदाघरी
क्रीडा करी बाळ गोपाळ, घेऊनि बरोबरी
द्वापारीच्या खेळा, लाचावला जो हरि
कलियुगी आला पहा, भीवरेच्या तीरी
बाळगोपाळ अवतरले सारे, झाले वारकरी
कृष्णदास जुना, सखा श्रीहरि
*-*-*
सखा श्रीहरि, झाली दु:खा बोहरी
पंढरीच्या वाटे, उल्हास अंतरी
मागण्यासी नाही नाही, आज तुझ्या दारी
गर्जताती वैष्णवांचे, वीर भीमातीरी
घेणे-देणे जरि असे, विठू तुझ्या करी
भक्तिसुखे बांघला, वश केला प्रेमभरी
हरि हरि हरि, कानी ऐकता गजरी
प्रेममुग्ध पहा झाला, डोलतो हरि
कृष्णदास म्हणे आश्चर्य, भक्तिची ती थोरी
नकळत कटी कर, गेला पहा वरी!
*-*-*
नकळत कटी कर, गेला पहा वर
देव नव्हे देव नव्हे, भक्तचि थोर
भीमातीरी विटेवरी, सावळा सुंदर
तोचि विठू पूजा घेतो, पहा घरोघर
भोळ्या भावा भुललासे रखुमाईचा वर
विसरला भार्येसी रखुमाई जी सुंदर
वैजयंती माळा गळा, जरी ती सुंदर
भक्त भृगू लाथ, मिरवितो बरोबर
शिव जपे हरि हरि, त्यासी वाही शिरावर
दावितो भक्त माझा, मी वाही डोईवर
कृष्णदास भक्त ठेवी, माथा विटेवर
पहा पहा विठू राजा, घेई डोईवर
*-*-*
चहूकडे गर्जे घोष राम कृष्ण हरि
टाळ मृदुंग गजरात नाचती ते वारकरी
देहाचे ना भान कुणासी रंगले अंतरी
विठूरायाच्या दिंडीत कृष्णदासाची, पताका उंच वरी
*-*-*
कटिवरी हात अन् पाय विटेवरी
मिटले ते नेत्र परि हास्य मुखावरी
कृष्णवर्णी कृष्ण तो उभा गाभारी
नीलवर्ण प्रभा दिसे पसरली सभोवरी
राम कृष्ण हरि म्हणता जीवभाव हरी
कृष्णदास म्हणे विठू दर्शनाची कथा न्यारी
*-*-*
विठूमय झाले सर्व वारकरी दिंडीत
वैष्णवांचे भार आज उतरले पंढरीत
राम कृष्ण हरि मंत्र सर्वामुखी गर्जत
टाळ मृदुंगाने अवघी पंढरी दुमदुमत
राउळात विठूराय हसतो खुशीत
भक्त पहा आले माझे भेटण्यासी धावत
भक्त हृदयी तडफड, विठू हृदयी धडधड
दर्शनासी राउळात अतोनात गडबड
गाभारी ते येता भक्त अंतरी ते सद्गदित
देहभान विरुनिया आत्मभाव उचंबळत
विठूपायी देता मिठी, जीवभावा होय तूटी
कृष्णदास म्हणे ती चि, भक्तांसी विठूची भेटी
*-*-*
लाल लाल अंगरखा, पितांबर भरजरी
रेशमाचा मुलायम, शेला शोभे त्यावरी
सुवर्ण मौक्तिक माळा, गळा भरल्या अपारी
अनुपम वैजयंती, विलसे माळ त्यावरी
कुंडले मकर, शोभती कानावरी
कौस्तुभ मणी असे, विराजित कंठावरी
चंदनाचा तिलक उर्ध्व, शोभतसे भाळावरी
रत्नजडित सुवर्णमुगुट, झळाळतो शिरावरी
पहा पहा कसा माझा, विठूराय नृपापरी
कृष्णदास म्हणे पहा, शोभतसे विटेवरी
*-*-*
विठूरायाच्या दिंडीत नामघोष गर्जतो
टाळमृदुंगाच्या तालावरी वारकरी नाचतो
दिंड्यापताका कळप अंबरी झेपावतो
देवसमूह नभींचा जलधारा वर्षवितो
भावभक्तिचा भक्तिचा कल्लोळ उसळतो
विठू सावळा सावळा हृदयी सुखावतो
मेळा भक्तांचा दर्शना राऊळी दाटतो
विठूपायी तो प्रेमाने मिठी घालतो
माथा टेकिता टेकिता भान हरपतो
कृष्णदास हा दिंडीचा अनुभव वर्णितो
*-*-*
सुंदर ते भीमातीर, चंद्रभागेची ती कोर
तीरी वसे पंढरपुर, विटे विठाई सुंदर
कर दोही कटिवर, समचरण विटेवर
भावभक्तिचा आकार, झाला सगुण साकार
कृष्णदास भेट घेता, अनुभव निराकार
*-*-*
विठूराय पहा कसा हसतो डोळे मिटुनि
अंत:करणाचा ठाव कसा घेतो सहजी वेधुनि
भेटताचि टाकितो भान कसे हरपुनि
कृष्णदास म्हणे घ्या अनुभव, वारीसी एकदा जाऊनि
*-*-*
विठू उभा ताठ, कटि ठेवोनिया हात
म्हणे भरलासे हाट, जेवा भरोनिया पोट
विषयांचा घ्या हो वीट, मग आनंद अवीट
कृष्णदास हा चोखट, सेवी अमृताचा घट
*-*-*
पायाखाली धरली वीट, परि काय वर्णावा तो थाट
धरी कटिवरी हात, परि कर्ता तो एकट
गिळिले असे त्याने, सारे ब्रह्मांडासकट
कृष्णदास हा फुकट, कर्ता विठूचि चोखट
*-*-*
उघडी नेत्र विठूराया. जमले भक्त राऊळा या
करु नको वारी वाया, भाव घेई जाणुनिया
वाजविता सोऽहं टाळी, गेला पण तुझा वाया
कृष्णदासे साधुनि संधी, विठूसी लाविले लक्षाया!
*-*-*
ध्यान धरिती बसुनि सारे, परि विठू उभा भीमातीरे
ध्यान धरिले उभ्या उभी, बैसोनिया राहू नका रे
कृष्णदास उघडुनि कपाट, ब्रह्मरंध्री विठू अवीट!
*-*-*
मी तो ठेविले हात कटि, माया चालवि जगरहाटी
बोल नको माझ्यापाठी, मी तो उभा सुखे विटी
कृष्णदासे पायी मिठी, संसारासी झाली तूटी
*-*-*
पंढरीसी पांडुरंग, विटेवरी उभा दंग
निर्गुण तो भावे केला, भक्ते सगुण श्रीरंग ॥
एकादशी आषाढीची, वारी पोहोचली पंढरी
दर्शनासी राउळासी, अतोनात आज रांग ॥
विठ्ठलाच्या नामघोषा, टाळमृदुंगाचा संग
सवे डोलता नाचता, भक्तिभावा चढे रंग ॥
भाव मनी दाटुनिया, पुलकित अंग अंग
दर्शनाने फिटे पांग, भवदु:खा होई भंग ॥
सावळीच मूर्ती परि, नीलवर्ण दिसे रंग
कृष्णदास मनी आज, विठ्ठलाच्या ध्यानी दंग ॥
*-*-*
डोळे मिटून उभा ठेवून कटीवरी हात
विटेवरी उभा दिसे पंढरीचा नाथ ॥
छान वैजयंती माळा रुळते गळयात
परि छातीवरी मिरवितो भृगूची लाथ ॥
नाम घेतो भक्तांचे मिटल्या ओठात
वाट पाही भक्तांची मिटल्या डोळ्यात ॥
क्षेम द्याया उतावीळ परी कटीवरी हात
विटेवरी उभा परी फिरे त्रिभुवनात ॥
मिटले डोळे तरी हसे कसा गालातल्या गालात
निर्गुण केला सगुण ही भक्तिची मात ॥
लबाडाला ओळखितो पूरेपूर मनात
कृष्णदास धरितो त्याचे चरण हृदयात ॥
*-*-*
रुसलासी काय विठूराया रखुमाईवर
रागावुनि ठेविले दोही हात कटिवर
चालायाचे नाही म्हणुनि पाय विटेवर
पाहायाचे नाही म्हणुनि नेत्र मिटुनिया वर
परी फसलासी देवा, हास्य दिसे मुखावर
कृष्णदास म्हणे हा राग, लटिकाचि तर!
*-*-*
वेशीवरी आला, वारकरी मेळा
विटेवरी सुखावला, विठ्ठल सावळा
भक्ते ना केला कधी, वारीसी कंटाळा
भाव विटेवरी, दाटला गोपाळा
कृष्णदास म्हणे पहा, भक्तिची कळा
विटेवरी विठू आज, रडे घळा घळा!
*-*-*
हरि विठ्ठल हरि विठ्ठल, छंद घेई नामाचाऽऽ
डोल येई, डोल येई, पहा हृदयाचाऽऽ
सेविताऽऽ गोडीऽऽ, अनावर वाचाऽऽ
छंद घेई मनऽऽ, विठू सावळयाचाऽऽ
कृष्णदासा छंदऽऽ, लागला नामाचाऽऽ
विटेवरी डोलतोऽऽ, विठू पंढरीचाऽऽ
*-*-*
वेशीवरी आला, वारकरी मेळा
भाव मनी फुलला, अता आगळा
लवकरी पाहीन मी, विठू सावळा
उमलवि हळू हळू, हृदय कमळा
वार्‍यासवे गेला गाभारी, गंध परिमळा
हुंगितो जो अखंड, भाव परिमळा
भावलुब्ध भ्रमर, पहा तात्काळा
कृष्णदास हृदय रुंजी, विठू सावळा!
*-*-*
विठूचे विटेवरी का हो बंद डोळे?
अंतरी निरखितो कुणा काय कळे?
भक्ताचे रुपवेश त्यासी, कधी ना कळे
आकळितो मी केवळ, केवळ भक्तिबळे
हुंगितो नासिके भाव परिमळे
ऐकितो श्रवणी नामघोष तळमळे
कृष्णदास म्हणे जरी संदेश आकळे
विठू विठू विठू भेटे, त्यासी तात्काळे
*-*-*
विठूचेऽऽ हात, का हो कटीवरी?
जाणवले कधी का, कोणा अंतरी?
विठू पहा विटेवरी, देई ललकारी
चला चला भक्तहो, या हो लवकरी
म्हणतो पहा मी, पहा भीमातीरी
जखडले हात भक्ता, येई लवकरी
बद्ध झाला स्वये तो, ना उपेग भेटीवरी
विचार करी जो असा, फसविलाचि खरी
बालक गोजिरे सामोरी, ठेवुनि कर कटीवरी
पाहताचि काय घडे तुम्हा अंतरी?
धाव घेई उचलाया शिवताती ना करी?
परि पहा काय घडे घडे भीमातीरी
नाटकी नाटकी नाटकी श्रीहरि
काय करी लीला पहा पहा विटेवरी
कृष्णदास विठू भेटी शिरता गाभारी
उचलले कर पहा घेई डोईवरी
*-*-*
विठूने ठेविले कटीवरी करा
विटेवरी उभा पहा उभा भीमातीरा
तुम्हासाठी सगुण झालो रे साकारा
भेटीसाठी ये रे ये रे, ये रे भीमातीरा
करशील जे जे तू, पूजा उपचारा
करीन ते ते मी, भावे स्वीकारा
कृष्णदास उभा पुढे, भक्तिविभोरा
नमितो विठ्ठला केवळ, जोडुनि दो करा
*-*-*
विठूचे चरण का हो विटेवरी?
नित्य जो पहुडे क्षीरसागरी
भक्त जरी जाई बुडाया, भवसागरी
धाव घेवुनिया पहा, आला विटेवरी
कृष्णदास म्हणे ज्याचा, माथा विटेवरी
तारी तारी तारी, त्यास स्वये श्रीहरी
*-*-*
भक्त होउनि वारीकर, आला दर्शना भीमातीर
ठेवुनि कटी कर, निरखितो रखुमाईवर
विठू उभा विटेवर, पाहू काय करतो बरं
भाव माझा जाणितो का, विटेवरील सावळा सुंदर
भक्ता परिक्षितो नित्य, करुनि अंगा वारावार
परीक्षीता आज भक्तवर, धडधडले विठू अंतर
कृष्णदास म्हणे पहा आज, वीट करी थरथर!
*-*-*
भक्त मेळा वेशीवर, आनंदला रखुमाईवर
पाचारी रखुमाईसी, ये ग ये ग लवकर
पहा माझा बडिवार, व्यापियेले भीमातीर
पोहोचते ना नजर, आहे ना मी खराच थोर?
रखुमाई बोले विठ्ठला, अससी तू लबाड चतुर
पाय ठेवुनि विेटेवरी, राहिलासी तू स्थिर
परि चालत चालत आले, वारकरी भीमातीर
कृष्णदास म्हणे सांगे विठूसी, नव्हे नव्हे तू, भक्तचि थोर!
*-*-*
लेकरूऽऽ थोर, मायेसीऽऽ, बडिवार
भक्तऽऽ थोर, विठूसीऽऽ, बडिवार
रखुमाई घेई भक्त कैवार, विठूसी झाला गर्व थोर
उभा ताठ दिसे विटेसी, ठेवोनिया कर कटीसी
भक्त आला दर्शनासी, बोलेना विठू त्यासी
मिठी देण्या त्यासी भक्त, घाली हात कमरेसी
विठू मनी गुदगुल्या, गुदगुल्या पोटासी
कृष्णदास म्हणे हसे देव, खदखदा विटेसी
*-*-*
विठू हसला, भक्त तोषला, लेकरा पाहता, तोष अंतरा
लेकरु हासे, तोष मातेला, तेविचि आज, पंढरीला
नवल पहा, भीमातीराला, विठू लेकरु, माय वारकरी
कृष्णदासे पाहिले आज, विठूसी भक्ता कटीवरी!
*-*-*
पाऊस आला, पाऊस आला,
वारकरी, भक्तित न्हाला
विटेवरी जो, दावी पाउला, मनी ध्याती, त्या विठ्ठला
पितांबर भरजरी शेला, गळा वैजयंती माला
पंढरपुरी, मेळा जमला, वाळवंटी, घोष गर्जला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
विटेवरी, विठू तोषला, भक्तिभाव, प्रसाद दिला
सेविता बहर, भक्तिभावाला, भजन उधाण, हृदयाला
गाता गाता, हरि विठ्ठला, कृष्णदास, भक्तित न्हाला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
*-*-*
हरि विठ्ठला, भजा विठ्ठला, सावळा सुंदर, उभा विटेला
संगे घ्या, बाळ गोपाळा, पंढरी आज, वैष्णव मेळा
पहा पहा, सुखसोहळा, हर्ष नाऽऽ, मावे आभाळा
विकसित हृदयकमळा, भक्तिगंध सेवी परिमळा
कृष्णदास, भक्तभ्रमरा, नयना अश्रू, घळा घळा
*-*-*
घळा घळा, घळा घळा, अश्रू भक्ता, नेत्रकमळा
विठू वास, हृदयकमळा, विकसित पूर्ण, एकादशीला
भक्तभ्रमर, अधीर भक्तिला, हुंगितसे, भाव परिमला
गुण गुण, हरि विठ्ठला, कृष्णदास रुंजी, पदकमला
*-*-*
पदकमला, समचरणा, विटेवरी, भक्त राणा
भावभक्तिच्या, दावितो खुणा, पाचारितो, मोक्ष राणा
चला पंढरी, सत्वरी चला, सावळया सुंदरा, भेटायाला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, गजर घुमतो, अंबराला
ऐकता गजर, हरि विठ्ठला, विठू लागला, डोलायाला
दृष्य पहा, भीमातीराला, देव उधळी, भक्ति गुलाला
डोलतो देव, डोलतो भक्त, उधाण पहा, दोही हृदयाला
देव चिंब, भक्तही चिंब, शब्द ना, सोहळा वर्णायाला
न्हाउनिया, विठू गुलाला, कृष्णदास चिंब, भीमातीराला
*-*-*
भीमातीराला, चला चला, विठू सावळया, भेटायाला
समचरण, विटेवरी, माथा त्यावरी, टेकायाला
व्हा रे भ्रमर, पदकमला, भक्ति सुगंध, हुंगायाला
अवसर हा, आषाढाला, नको नको पहा, चुकायाला
भक्त येतो, विठू भेटीला, विठूही पाही, वाट विटेला
ठेविले कर, जरी कटीला, उतावीळ तो, आलिंगनाला
देवे क्षेम, देता पहा, भक्त नाही, देहभानाला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, देवभक्ता, मनी घुमला
देव भान, भक्त भान, दोहीं पहा, विलयाला
कृष्णदास, चमत्कार, पाहतसे, भीमातीराला
*-*-*
भीमातीराला, गाभार्‍याला,
पहा लावण्य, सावळया सुंदरा
दर्शनासी, अधीरता, स्वर्गीच्याही, सुरवरा
मिटुनिया, नेत्रकमला, लक्षितो परि, भक्तवरा
टाळमृदुंग, गजरात, वारकरी चाले, पंढरपुरा
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, मनी लक्षिती, सावळयाला
विसरले, घरादाराला, कोण विचारी, तहानभूकेला
भक्ति पाहुनि, मनी नवल, वाटे पहा रखुमाईला
भोळा भोळा, माझा दादुला, भुलेल यांच्या, भक्तिभावाला
सोडील जरी वैकुंठाला, भय भारी रखुमाईला
सामोरी येऊनि विचारी कुशला, मनी हवे ते देते तुजला
परी सोडा, माझा दादुला, रखुमाई करी, विनवणीला
भीती पाहुनि, मनी नवल, म्हणती काय सांगू तिजला
कृष्णदास म्हणे ना माहीत, आधीच कोंडीला हृदयाला
*-*-*
कोंडीला, हृदयाला, सावळया विठूला
वाट ना बाहेर, उरली जायाला
भाव भक्ति वीट पहा, अचल अढळ, हृदयाला
उभा केला वरी नीट, सावळया विठूला
पांडुरंग, विठ्ठला, गजर घुमला
अचल विठूला, वाव ना नाचाला
हृदय गाभारा, भाव त्यात, उफाळिता
कृष्णदास भक्त आज, नाचे भीमातीराला!
*-*-*
नाचे भीमातीराला, उधाण हृदयाला
वैकुंठीचा देव आज, वाट पाहे, भीमातीराला
चालत चालत, भक्त आले पंढरीला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
वीणा बोले झंकारत, पांडुरंग हरि विठ्ठला
मृदंगऽऽ, बोले बोला, पांडुरंग हरि विठ्ठला
टाळ संगे खणखणे, पांडुरंग हरि विठ्ठला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
वाळवंटी नामघोष, जिथे तिथे हरि विठ्ठला
डुलला डुलला, विटे विठू डुलला
भजनी ऽऽ, विठू गुंगला
ध्यानी विठूच्या, भक्त गुंगला
देखिला देखिला, कळस देखिला
कळस देखिता, शीण भाग उतरला
गाभारी ना जरी तो, भक्त आत शिरला
कृष्णदासा अंतरी, सावळा प्रकटला!
*-*-*
प्रकटला प्रकटला, सावळा प्रकटला
विटेवरी पहा आज, विठू कसा नटला
भरजरी पितांबर, शेला भरजरी
सुवर्ण माळा, रुळती गळयावरी
मकर कुंडले, शोभती कर्णावरी
कौस्तुभ मणी पहा, विराजितो कंठावरी
केशर चंदन, उटी दिसे भाळावरी
रत्नजडित सुवर्णमुकुट, झळाळतो माथ्यावरी
नटला नटला, विठू कसा नटला
विटेवरी ताठ, नटुनि उभा ठेला
आरसा ना पुढे त्याच्या, डोळेही मिटेले
रुप कैसे न्याहाळितो, पहा कसे आगळे
भक्तराजा पुढे उभा, विठूराजा दर्शना
अंतरी निज रुप, न्याहाळी सावळा
कृष्णदास आगळा, हृदयी त्या सावळा
प्रकटला प्रकटला, सावळा प्रकटला
*-*-*
भक्त हृदयी सावळा, सावळा प्रकटला
पंढरीसी नामघोष, अंबरी दुमदुमला
वारकरी दर्शना, वाळवंटी थडकला
भक्त-महासागर पाहुनि, सावळा आनंदला
परि भेटी कल्पनेने, विठू हृदयी धडधडला
स्वागत ते कसे करु, विचार करी मनाला
भक्तमेळा वाळवंटी, नामघोषा गुंगला
थकला वारी चालता, क्षणभरी विसावला
चंदन सुगंध मंद, अवचिता दरवळला
कृष्णदास भेटीसी, विठू जवळी आला!
*-*-*
विठू जवळी आला, भक्त मनी थरारला
पहा पहा देव कसा, भक्तिसी लाचावला
भक्त माझा दिवसरात्र, चालुनिया थकला
शोध घेण्या भक्ता पहा, देव जवळी आला
परिमळ सुगंध मंद, पितांबर सळसळला
अनुभवी त्या कृष्णदासा, शीण भाग गेला
*-*-*
शीणऽऽ, भाग गेला, भक्त पंढरी, पोहोचला
विठू उभा विटेला, भक्त गाभारी भेटीला
सावळया विठूसी, कडकडूनि भेटला
विठूऽऽ, ना सोडी, हात कटीवरीचे
अपुरे ना धाये मन, भक्त सुखभेटीचे
भक्त करी विनवणी, सोडी रे अबोला
वियोग तुझा, पहा पहा, किती मज जाहला
युगायुगे चालतो परि, ना पोचलो पदाला
चालुनिया तव भेटीसी, शीण पहा जाहला
उघडी उघडी, अता नेत्रकमला
कानी घेई, कानी घेई, घेई भक्त बोला
हरि विठ्ठला हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
भक्त आर्जवे ऐकुनि, विठू मनी सुखावला
म्हणे हा मायेसी, आता खरा विटला
मजसाठी याच्या हृदयी, भाव खरा दाटला
उघडू चला चला, चला हृदयपटला
हाचि मनी विचार, सावळया विठ्ठला
उघडिता पटल, आत दिसे विठ्ठल
सावळा सुंदर, उभा जो विटेवर
दर्शन होता, निज हृदयी, भक्त धरी अबोला
विठू करी विनवणी, का रे हा अबोला
इच्छा मज दर्शनाची, पूर्ण अता झाली ना
भक्त बोले सावळया, लबाडा गोपाला
हृदयीच जरी का, असे तू लपला
वारीसी व्यर्थ म्या, व्यर्थ मजसी श्रमविला
विठू हसुनि गालात, सोडी कटीवरील हात
प्रेमे जवळी घेवुनि, भक्ता कुरवाळीला
बोलतसे काय बोला, ऐका रे ऐका या हो लोका
पंढरीसी जो दिसे, विटे मी उभा असे
तोचि मी असे रे, नित्य तव हृदया
परी वाटे चला जरा, खेळ जरा खेळूया
भक्तिसुख अनुभव, माझ्या भक्ता देऊया
वारी नाऽऽ गेली तुझी, गेली नाऽऽ फुकट
विटे असे सुख जे, पहा कसे अवीट
निर्मिले माझ्या भक्ता, असे जो चोखट
ऐकुनिया विठ्ठल बोला, भक्त मनी संतोषला
भक्ताचे प्रेमापोटी, विठू असे लाचावला
विठूचे प्रेमापोटी, भक्तही लाचावला
विठू दिसे भक्त हृदया, भक्ता हृदयी विठू दिसला
पंढरीच्या गाभार्‍यासी, खेळ हा दिसे विटेला
कृष्णदास पाहुनिया, भजनरंगी गाई विठ्ठला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग हरि विठ्ठला
*-*-*
वारीचीऽऽ, इथे संपली, इथे संपली, भजनमाला
भावपुष्पे, गुंफुनिया, केली सुंदर, पुष्पमाला
अर्पिली, भक्तिभावे, विठू सावळया, सुंदराला
शोभते, पहा कशी, मूर्ती साजिरी, विटेला
चला चला, चला गाभारी, माथा टेकूया, विटेला
तोष होईल, विठ्ठलाला, घेईल तुम्हा, कडेला
तोष आज, कृष्णदासाला, वर्णिताऽऽ, पंढरी वारीला
आषाढी, एकादशी आज, चला करु, गजराला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
हरि विठ्ठला, हरि विठ्ठला, पांडुरंग, हरि विठ्ठला
*-*-*

vitthal_5

आषाढी एकादशीचा आला सुदिन
विठूने केले आज पहाटेच स्नान
भरजरी पितांबर निळा अंगरखा
शेला भरजरी दिसे अतिशय छान
रत्नजडित अलंकार, डोईवरी मुगुट
सजला अति तत्पर, दिसे लावण्यवान
अत्तराचा घमघमाट, माथा गोपीचंदन
उभा आज विटेवरी द्याया भक्ता दर्शन
विठ्ठल विठ्ठल, गजर चहूकडे
ऐकतो पहा कसा, देउनिया कान
उभा राहे विटेवरी, मिटुनि नयन
परि सारे केंद्रित, भक्तावर मन
विठू सावळयासी देउनिया मान
भावे घेता दर्शन, कृष्णदास विसरला भान!
*-*-*

vitthal_63

भक्त भाव जाणुनि, घेतली पंढरीसी धाव
विटेवरी घ्याया दर्शन आज, पंढरी धावाधाव
नटला आज देव, जणू नवरदेव
वेधितो भक्तजन, मनाचा ठाव
ठेविता डोई विटेवरी, कृष्णदासा भाव
विठू सावळया, भक्त प्रार्थनेसी पाव
*-*-*
गाभारी पुजार्‍यांची आज कूजबूज
विठूच्या चरणांसी आली पहा सूज!
विचार करती मानसी काय असे काज
विठू पहा तयांसी बोले काय गूज
काल झाली एकादशी, भक्तांची अतोनात, दाटी
दर्शनासी
दर्शन करता प्रत्येकी, माथा टेकिले चरणांसी
कोमल माझे चरण, कल्पना ना तयांसी
परि भाव पाहुनि मनीचा, बोलिलो ना तयांसी
चालले पहा वारीसी, श्रमले दुखविले निजचरणांसी
त्रास होता भक्तांसी, घेणे पडे देवासी
ब्रीद माझे राखितो मी, आली पहा सूज मज चरणांसी
परि सांगू नका रखुमाईसी, विनवितो तुम्हांसी
भाव पाहुनि विठूचा, कृष्णदास मनी हासी!
*-*-*
विठूसी आज, ना जेवायाचे भान
उभ्या उभ्या करी, मनी चिंतन
भक्त वारीकर काल, घेउनि गेले दर्शन
मजपासी प्रत्येकी उघडिले मन
नानाविध भक्तांचे, नानाविध प्रश्‍न
त्याची आज होते, मज आठवण
प्रश्‍न आज मज, मनी गहन
कसे करु त्यांचे, दु:ख मी हरण
विठू अंतरीची करुणा जाणून
कृष्णदासाचेही आज, मूक झाले मन!
*-*-*
वारीकर भक्त निघाले परतीच्या वाटे
सुने सुने आज चंद्रभागे तटे
वारी पूर्णतेचे अन् विठू दर्शनाचे
अंतरी आज समाधान
घेउनि भक्तिसुख द्विगुणित धन
अंतरी वारीचे क्षण आठवण
पाय ना उचलती जड झाले मन
हरि विठ्ठल नाम कर्णी गुंजन
दृष्टी माघारी जाय कळसाकडे
जणू कन्या निघाली सासुराकडे
कृष्णदास म्हणे विटेवरी, पहा काय स्थिती
विठूच्या डोळयात आज आसवे ओघळती!
*-*-*
॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥
==================================॥ पंढरीची वारी २०१३ ॥
vitthal_3
टाळघोषासंगे भजनात दंग |
वाळवंटी जनसागर अथांग |
विठू भक्तिचे मनी अपार तरंग |
विठ्ठल विठ्ठल टाळ बोलतो मृदंग |
सावळ्याच्या भक्तिचा मनी चढलासे रंग |
कृष्णदासा मनी आज सावळे तरंग ॥
*-*-*
आला आषाढीचा दिन | धावे पंढरीसी मन ॥
सावळे चरण | जडले रे मन ॥
विठू भेटीसीऽऽ, विठू भेटीसीऽऽ, कासावीस जन ॥
व्याकुळले तन, व्याकुळले मन ॥
कृष्णदासा मनी आज सावळे चरण ॥
*-*-*
अरे, लागले रे ध्यान | जाता, पंढरीसी मन ॥
मनी सावळे चरण | एक ध्येय ध्याता ध्यान ॥
झाले रे उन्मन | गेले गेले मनपण ॥
कृष्णदासा दिन आज | आनंदाचा सण ॥
*-*-*
अरे हसतोसी रे पांडुरंगाऽऽ |
जीवऽऽ जाहला व्याकुळ संगा ॥
ठेविले कटीसी हस्त अभंगा |
करी भक्ताच्या भवभय भंगा ॥
पुंडलिके आणियेले श्रीरंगा |
मन जाहले रे ध्यानी तव दंगा ॥
कृष्णदास घडता या संगा |
मन जडले रे सावळ्या या रंगा ॥
*-*-*
सावळे चरण | आनंद निधान ॥
सावळ्या विठूचे | विटेवरी ध्यान ॥
मन धरी ध्यान | लाभले विश्राम ॥
कृष्णदास म्हणे | हेचि सावळ्याचे दान ॥
*-*-*
ध्याता सावळे चरण | लाचावले मन ॥
मूर्ती लावण्याची खाण | पाहता आनंदा उधाण ॥
हारपले भान | लोपले मी-पण ॥
कृष्णदास म्हणे घडे | येता आषाढीचा सण ॥
*-*-*
सावळे चरण | सावळेचि तन ॥
मिटले नयन | परि हसे मन ॥
सर्वांग सुंदर | चित्त घेतसे लोभून ॥
कृष्णदास मनी आज | सावळ्याचे ध्यान ॥
*-*-*
सावळे चरण | अचल विटेसी ॥
पुंडलिके आणिले | भीवरे तीरासी ॥
मनोहर ध्यान | सुखाचे निधान ॥
कृष्णदास हृदयी | सावळे चरण ॥
*-*-*
सावळे चरण | तेथे धावे मन ॥
पंढरीसी स्थान | वैकुंठ भुवन ॥
हरि जनार्दन | पतित पावन ॥
मिटुनि नयन करी | भक्तांचे ध्यान ॥
भक्तांलागी ओढीसी | तेचि गे कारण ॥
कृष्णदासा निरंतर | सावळ्याचे ध्यान ॥
*-*-*
सावळे चरण नमिता, उर्ध्व जाई भान |
तेचि ते सावळ्या, विठूचे गे स्थान ॥
अचल चरण भेटी अचल गे मन |
अचल मन देई निर्विकल्प भान ॥
सावळ्याच्या भेटी होते स्वरुपाचे ज्ञान |
सावळ्या विटेवरी कृष्णदास मन ॥
*-*-*
सावळे चरण, दावी योग खूण |
विटेवरी तेणे, मांडिले गे ठाण ॥
समत्व चित्ताचे, दावी समचरण |
मिटले नयन, दावी नासाग्री भान ॥
शिव शोभे माथ्यावरी, सहस्रार स्थान |
ध्यानमग्न योगी, विठू सावळा जाण ॥
प्रसन्न हास्यमूर्त, अमूर्ताची मूर्त |
कृष्णदास हृदयासी, सावळ्याचे ठाण ॥
*-*-*
निळा झाला सावळा | आला धावुनि भीमातळा ॥
मिटुनिया दोहीं डोळा | दावी हास्य मुखकमळा ॥
वीटे रोवुनि पदकमळा | भक्त लक्षितो आगळा ॥
चित्तचोर निरंतर | कृष्णदास हृदयकमळा ॥
*-*-*
मुख हे गोजिरे | साजिरे सुंदर ॥
सावळे लोभस | रुप अनिवार ॥
नीलप्रभा फाकली | दिसे सभोवार ॥
कृष्णदास म्हणे झाले | परब्रह्म साकार ॥
*-*-*
परब्रह्म आले | आले रे भूवर ॥
चंद्रभागे तीर | क्षेत्र पंढरपूर ॥
ध्यानी लक्षिती ज्यां | देव सुरवर ॥
ते हे विटे सावळे | रुप मनोहर ॥
कृष्णदासाचे तेणे | व्यापिले अंतर ॥
*-*-*
हरि रे, हरि हरि रे |
आला भूवरी रे, आला भूवरी रे ॥
पंढरपूरीऽऽ, भीवरे तीरीऽऽ |
आलाऽऽ, मुरारी रे ॥
रुप मनोहरी | सावळे सुंदरी | दिसे विटेवरी रे ॥
चरण ध्याता, भक्तवर तो, गेला पैलतीरी रे ॥
कृष्णदास मनी, निशिदिनी व्यापुनि,
सावळा मुरारी रे ॥
*-*-*
महाद्वारी भक्त करिती गजर |
पांडुरंग नामी गर्जले अंबर ॥
गाभार्‍यात सावळे रुप विटेवर |
भक्तमन व्यापुनि राही निरंतर ॥
कटी कर चरण अचल विटेवर |
मंदस्मित लोभस दिसे मुखावर ॥
शरणांगताचाऽऽ, घेई जो कैवार |
कृष्णदास लक्षी त्यासी विटेवर ॥
*-*-*
ॐकारचि मूळ असे या विटेचे |
रुप ते सगुण निर्गुण ब्रह्माचे ॥
उभे भीमातटीचे, रुप सावळ्याचे |
वेधिते लावण्य, चित्त गे भक्तांचे ॥
नामरुपातीत परब्रह्म अमूर्त |
मनोहर सावळे गे जाहले ते मूर्त ॥
निराकार ॐकार सावळा साकार |
कृष्णदास म्हणे तो भक्तिचा आकार ॥
*-*-*
चरण सावळे, श्रीमुख सावळे |
तनही सावळे, परि तेज आगळे ॥
लावण्याची प्रभा, भोवती झळाळे |
दिव्य ऐसे रुप, पंढरी केवळे ॥
पुंडलिके उभविले, भावभक्ति बळे |
भक्तआज्ञे तिष्ठत, मिटुनिया डोळे ॥
ऐसे श्रीहरी रुप, गोजिरे सावळे |
कृष्णदास लक्षितो. ध्यानाचिया बळे ॥
*-*-*
पांडुरंगा तुझे, करतो मी ध्यान |
तुझे पायी माझे, जडले रे मन ॥
मागणे ते तुजपाशी, नाही काही आन |
रुपे तुझ्या माझे, वेधले गे मन ॥
श्रीगुरुने दिली मज, तव प्रेम खूण |
दिली तव रुपा, मज ओळखण ॥
विटे जरी तू गे, मांडियेले ठाण |
कृष्णदास हृदया तू, विटेसहित जाण ॥
*-*-*
सावळ्या चरणांचे सापडे ना वर्म |
निश्‍चल त्या स्थितिचे काय असे मर्म ॥
सावळ्या भक्तिचे कोण दावी वर्म |
कोण त्यासी कैसा आचरावा धर्म ॥
सम ना होय जरी पाप-पुण्य कर्म |
कृष्णदास म्हणे हाती सापडेना वर्म ॥
*-*-*
सावळ्या चरणांची प्रीत |
जडो मज मनी गे नीत ॥
चरणी त्या असे सर्व हित |
तेथे मन लागो मज हे नीट ॥
भावभक्तिची पंढरीसी पेठ |
तेथे उभा असे सावळा ताठ ॥
होई वैराग्ये जो अति धीट |
त्यासी लाभे ती गोडी गे अवीट ॥
कृष्णदास लुटावया पेठ |
चाले पंढरीची सत्वर गे वाट ॥
*-*-*
सावळ्याची पेठ, तेथे मोठा थाट |
भक्तिचे वैकुंठ, भावाची गे वीट ॥
जाता लाभे तेथ, आनंद अवीट |
परि वैराग्याची गाठ, तरी घडे ॥
परब्रह स्वरुपऽऽ, तेथ विटे उघडे |
परि सद्गुरुंची गाठ, तरी घडे ॥
कृष्णदास माथा, सद्गुरुंचा हात |
लाभ गे जोडिला, पंढरी पेठेत ॥
*-*-*
पंढरी पेठेत, सावळा विटे ताठ |
जाउनिया न्याहाळा, रुप ते नीट ॥
विटे समचरण, कटीवरी हात |
स्मितहास्य श्रीमुखी, भाव काय नयनांत ॥
भेटी देता येतो, सावळा खुशीत |
भक्त भाव प्रतिबिंब, सावळ्या मूर्तीत ॥
कृष्णदासा होता, सावळ्याची भेटी |
भान हारपविले, सावळ्या जगजेठी ॥
*-*-*
सावळ्या चरणांची, मजलागी प्रीत |
समचरण जे, वीटे उभे नीट ॥
वैकुंठीचा नाथ, पंढरी ग्रामात |
लक्ष माझे एक, सावळ्या मूर्तीत ॥
सावळ्या या रुपे, मन माझे मोहित |
सावळ्या भक्तिरंगे, कृष्णदास रंगत ॥
*-*-*
भावाचिया बळे, पाहू रुप सावळे |
पंढरीच्या विटेवरी, रुप आगळे ॥
शामसुंदराचे रुप गे निळे |
विटेवरी उभे मिटुनि नेत्रकमळे ॥
सावळ्या विटेवरी, रुप सावळे |
कृष्णदास हृदयी चरणकमळे ॥
*-*-*
साजिरे सावळे रुप विटेवरी |
देखण्यासी आज भक्त हो पंढरी ॥
शिरता गाभारी रुप देखिता सामोरी |
खिळुनिया राही दृष्टी श्रीमुखावरी ॥
प्रसन्न प्रफुल्लित होउनि अंतरी |
भक्त समाधान पावतो अंतरी ॥
डोळे मिटुनिया जाता मनोवेगे |
मनापुढे उभा सावळा तत्परी ॥
अंतर्दृष्टी निरखिता सावळ्या सत्वरी |
कृष्णदास सफल पंढरीची वारी ॥
*-*-*
॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥ विठ्ठल ॥
(आषाढी एकादशी १९ जुलै २०१३)

॥ पंढरीची वारी २०१९ ॥

सावळयाचा घेई ध्यास |
ध्यानी मनी त्याची आस ||१||
कधी दिसेल नयनांस |
जरी ना शिणलो वारीस ||२||
बैसोनिया आसनास |
शिरोनिया गाभाऱ्यास ||३||
पाहोनिया सावळ्यास |
डुल्लतसे कृष्णदास ||४||

*-*-*

अधीर जै हो मानस |
सावळ्याच्या दर्शनास ||१||
लागोनिया त्याची आस |
विसरे ते जगतास ||२||
निरास ऐसा आसनास |
निस्तब्ध त्या मानसास ||३||
सावळ्याची मूर्ती खास |
प्रकटे सांगे कृष्णदास ||४||

*-*-*

गगनात विहरे श्वास |
तेथ सावळ्याचा वास ||१||
गाभारा तो सावळ्यास |
चढा तेथ सावकाश ||२||
विकल्पा ना द्या अवकाश |
अधोमुखी जो राक्षस ||३||
ध्यानी घ्या खूण खास |
सांगतसे कृष्णदास ||४||

*-*-*

सावळा गाभाऱ्यास |
निश्चल उभा खास ||१||
पाचारितो भक्तांस |
येई येई दर्शनास ||२||
गुरू दावितो मार्गास |
ध्यानी घ्या वाट खास ||३||
लाधुनिया गुरुकृपेस |
मेख जाणे कृष्णदास ||४||

*-*-*

सोहं सोहं सावकाश |
वरी वरी चढे श्वास ||१||
स्पर्शता गगनास |
मानस ते विलयास ||२||
चालेना तो अट्टाहास |
गुरुची ही कृपा खास ||३||
संगे सावळ्या गृहास |
खेळ खेळे कृष्णदास ||४||

*-*-*

आषाढाचा आला मास |
सावळ्याचा लागे ध्यास ||१||
चला जाऊ पंढरीस |
भेटू तेथ सावळ्यास ||२||
सर्वा मनी हीच आस |
परी ठावे ना मार्गास ||३||
जा हो शरण गुरूस |
हासतसे कृष्णदास ||४||

*-*-*

घनदाट घनदाट |
चैतन्याचा दिसे थाट ||१||
गाभाऱ्यासी विठू ताठ |
लावण्याची जणू पेठ ||२||
सावळा जरी वर्ण होत |
नीलवर्ण झळाळत ||३||
सावळ्याचा निळा होत |
कृष्णदास ना चकित ||४||

*-*-*
विठूरंगी मन रंगे |
तन धुंद टाळांसंगे ||१||
सावळ्या या विठूसंगे |
त्रितापाचे भय भंगे ||२||
पांडुरंगे पांडुरंगे |
वेड कैसे लाविले गे ||३||
सावळ्याच्या प्रेमरंगे |
चिंब कृष्णदास अंगे ||४||

*-*-*

सावळेची अंग विठ्ठल श्रीरंग |
विटेचा हा संग विठ्ठला अभंग ||१||
वारकरी भक्त भजनात दंग |
टाळकरी संगे बोलतो मृदंग ||२||
विश्वी दाटले गे सावळे तरंग |
कळस दर्शनी मन झाले गुंग ||३||
कृष्णदास आसनी स्मरणात दंग |
वीट सोडोनिया धावला श्रीरंग ||४||

*-*-*

पंढरिये उभा कटीवर कर |
अनादि श्रीधर तिष्ठतसे ||१||
रंगले भक्तीसी जन पंढरपूर |
पाहोनिया पूर हासतसे ||२||
नामध्यानी दंग देहाचा विसर |
आनंदासी पूर दाटलासे ||३||
विठ्ठल विठ्ठल चहू तो गजर |
कृष्णदास स्वर ऐकतसे ||४||

*-*-*

॥ पंढरीची वारी कार्तिकी २०२0 ॥

श्रीमुख सुंदर, सावळा सुंदर ।
सर्वांगी सुंदर, विटेवर ॥१॥
भावाचा भुकेला, विटेवरी ठेला ।
मौनेचि गा भला, जाणी गा तो ॥२॥
कस्तुरीचा टिळा, भाळी गा रेखिला ।
अंगुष्ठे स्पर्शिला, भ्रूमध्यात ॥३॥
सद्गुरूची मात, विठ्ठल हृदयात ।
दर्शनी तोषत, कृष्णदास ॥४॥

*-*-*

का रे पांडुरंगा, बांधलें रे मुख ।
दर्शनाचे सुख, हिरावले ॥१॥
वाळवंटी दाटी, जाहलीसे तुटी ।
वैष्णवांसी भेटी, कैंची घडे ॥२॥
सावळ्या मुखासी, सावळ्या सुखासी ।
पंढरी भक्तांसी, रीघ नाही ॥३॥
सावळ्याचा सखा, मारितसे हाका ।
कृष्णदास मुखा, हरि हरि ॥४॥

*-*-*

हरि हरि हरि, संकट निवारी ।
भक्तांचा कैवारी, तूंचि होसी ॥१॥
पंढरीचे सुख, नाही नाही देख ।
त्रिभुवनी एक, सुखदायी ॥२॥
वीटेच्या सुखासी, लालसा मानसी ।
जाती पंढरीसी, वेळो वेळा ॥३॥
विठूराये लळा, लाविला प्रेमळा ।
कृष्णदास कळा, जाणतसे ॥४॥

*-*-*

जाणतसे कळा, भक्तचि आगळा ।
वैष्णवांच्या डोळा, एक ध्यान ॥१॥
नेत्रांतरी विठू, हृदयांतरी विठू ।
विटेवरी विठू, सर्वव्यापी ॥२॥
व्यापुनि सकळा, अलिप्त आगळा ।
श्रीहरि सावळा, विटेवरी ॥३॥
ऐसा हा सावळा, प्रेमळ आगळा ।
कृष्णदासा लळा, सावळ्याचा ॥४॥

*-*-*

सावळ्याचा लळा, भक्त तो आगळा ।
नाम वेळोवेळा, विठ्ठल हे ॥१॥
विठ्ठल विठ्ठल, हाती गर्जे टाळ ।
वीणा सर्वकाळ, विठ्ठल गे ॥२॥
तन आणि मन, विठूमय जाण ।
ध्येय ध्याता ध्यान, विठू एक ॥३॥
बोध एकत्वाचा, अनुभव साचा ।
कृष्णदास वाचा, विठ्ठल गा ॥४॥

*-*-*

गावा गा विठ्ठल, ध्यावा हा विठ्ठल ।
छंद सर्वकाळ, विठ्ठलाचा ॥१॥
विठ्ठलाचे नाम, मना दे आराम ।
इंद्रिया विश्राम, स्व-स्वरूपी ॥२॥
स्वरूपाचा गाभा, विटेवरी उभा ।
नीलवर्ण प्रभा, राऊळासी ॥३॥
नीलवर्ण डोही, बुडोनिया जाई ।
कृष्णदास नाही, उरलासे ॥४॥

*-*-*

॥ पंढरीची वारी आषाढी २०२१ ॥

भिवरेचे ठाण, भक्तीसी उधाण ।
ध्यानी मनी जाण, पांडुरंग ॥१॥
भक्तीचे तरंग, आभाळी ते रंग ।
सर्वत्र श्रीरंग, दाटोनिया ॥२॥
विठ्ठलाचा संग, विस्मृत ते दंग ।
गाताती अभंग, वारकरी ॥३॥
पंढरीची वारी, मना दे उभारी ।
पर्वणी ती न्यारी, कृष्णदासा ॥४॥
*-*-*
साजिरे गोजिरे, ब्रह्म ते वीटे रे ।
भिवरेचे तीरे, निश्‍चल गा ॥१॥
लावण्य पुतळा, जरी हो सावळा ।
हृदयासी सकळा, व्यापितसे ॥२॥
भक्तभावासी हा, आसुसला पहा ।
देव पंढरी हा, विठ्ठल गा ॥३॥
विठ्ठल विठ्ठल, मृदुंग नी टाळ ।
मंद मंद चाल, भक्तमेळा ॥४॥
सावळयासी हास्य, मंद ते मुखास ।
चाले सावकाश, कृष्णदास ॥५॥
*-*-*
विठ्ठल विठ्ठल, गाऊया विठ्ठल
नाचूया विठ्ठल, गर्जूया विठ्ठल ॥१॥
गर्जतसे टाळ, विठ्ठल विठ्ठल ।
संगे बोले बोल, वीणा ही विठ्ठल ॥२॥
प्रेमाचे केवळ, बोल हे विठ्ठल ।
विटेसी विठ्ठल, त्याला येई डोल ॥३॥
भक्तीचा सखोल, होतसे हा खेळ ।
वाजवीतो टाळ, कृष्णदास ॥४॥
*-*-*
अनादि अनंत, विटेवरी शांत ।
पंढरी तिष्ठत, भक्तांलागी ॥१॥
निर्गुण अक्रिय, दृग्गोचर होय ।
उतावीळ हृदय, भक्तभेटी ॥२॥
कटीवरी हात, विटेवरी ताठ ।
अक्रिय दावित, असे मी गा ॥३॥
ताराया आवडी, उडी घे तातडी ।
ऐसी तया गोडी, भक्तकाजा ॥४॥
द्वारकेचा राजा, करीतसे ये जा ।
पंढरीसी मजा, कृष्णदासा ॥५॥
*-*-*
पंढरीचा लळा, भक्तांसी आगळा ।
विठू हा सावळा, पहायासी ॥१॥
पंढरीसी दाटी, जाहली अलोटी ।
विठ्ठलाचे भेटी, भक्तमेळा ॥२॥
राम कृष्ण हरी, जयजयकारी ।
दुमली पंढरी, भिवरेसी ॥३॥
सावळयाचे वर्म, भावभक्ति मर्म ।
भागवत धर्म, महाराष्ट्री ॥४॥
वाळवंटी गाता, उभवी पताका ।
हर्ष होय निका, सावळयासी ॥५॥
मेघ हे सावळे, रूप ते सावळे ।
कृष्णदास डोळे, पाणावले ॥६॥
*-*-*
आला भक्तमेळा, हर्षला सावळा ।
विटेवरी काळा, सद्गदित ॥१॥
वर्षाकाठी नित्य, भेटीसी हा येत ।
नाही चुकवीत, वारीसी या ॥२॥
मागणे ते नाही, पाही रखुमाई ।
उतावीळ बाही, क्षेम द्याया ॥३॥
ऐसिया भक्तांसी, उभा मी विटेसी ।
शीण ना मजसी, युगायुगी ॥४॥
पहा गा तू उगी, राहुनिया जागी ।
सोहळा हा जगी, अनुपम ॥५॥
विटेवरी दिठी, देवभक्तां मिठी ।
मावळली सृष्टी, कृष्णदासा ॥६॥
*-*-*
सद्गुरूची दृष्टि, कृपेची हो वृष्टि ।
विठ्ठलाची भेटी, भाग्यवंता ॥१॥
संतांचा हो संग, विठू नामी दंग ।
मनी प्रेमरंग, दुणावत ॥२॥
विठू खुणावत, यावे पंढरीत ।
बाहू हे स्फुरत, क्षेमालागी ॥३॥
विठूपायी मिठी, जीवभावा तुटी ।
पावला संतुष्टी, कृष्णदास ॥४॥
*-*-*
सावळा ध्यानात, सावळा मनात ।
सावळा चित्तात, व्यापोनिया ॥१॥
सावळ्याची ओढ, प्रेम ते अजोड ।
पंढरीचे वेड, भक्तांलागी ॥२॥
सावळे श्रीमुख, पाहताचि सुख ।
लगबग देख, राऊळासी ॥३॥
सावळा कवेत, कवटाळी तेथ ।
होय आनंदित, कृष्णदास ॥४॥
*-*-*
टाळघोष मंद, भक्तीचा सुगंध ।
पंढरी हो धुंद, आज दिनी ॥१॥
भक्ति चंद्रभागा, दुथडी वाहे गा ।
भिजवी भक्तांगा, अंतर्बाह्य ॥२॥
भावाचा तो गंध, दाटलासे मंद ।
गाभारी हो धुंद, भक्तदेव ॥३॥
विठू हासे मंद, कैसे केले धुंद ।
लाविलासे छंद, कृष्णदासा ॥४॥
*-*-*
आनंद परीस, विठू पंढरीस ।
स्पर्शिता तो खास, आनंद गा ॥१॥
आनंदाची मूर्ती, असे ती गा क्षिती ।
खूण ही निश्‍चिती, मनी धरी ॥२॥
विठ्ठलाचा संग, आनंद अभंग ।
आनंदी हो दंग, भक्त सारे ॥३॥
ऐसा आनंदाचा, हाट भरे साचा ।
दिन आषाढीचा, एकादशी ॥४॥
वृष्टि आषाढीची, वृष्टि आनंदाची ।
न्हातसे नित्यचि, कृष्णदास ॥५॥
*-*-*
अदृश्‍य हा भाव, दृश्‍य करी देव ।
विटेवरी ठेव, भक्तांची ती ॥१॥
निर्गुण सगुण, साकार होऊन ।
पंढरीये जाण, उभा ठेला ॥२॥
दर्शनी विव्हळ, हृदयकमळ ।
विरह प्रबळ, टाहो फोडी ॥३॥
आसवांच्या धारा, विटेच्या गाभारा ।
रुक्मिणीच्या वरा, पाहताचि ॥४॥
देव भक्त लोप, झाले एकरूप ।
पांडुरंग बाप, कृष्णदास ॥५॥
*-*-*


दिसे घनीभूत, रूप गाभाऱ्यात |
सावळा अनंत, नीलवर्ण ||१||
ब्रह्मकाय घन, चैतन्य ते घन |
थबके तत्क्षण, तन मन ||२||
स्वानंद पाझरे, देखिता गोजिरे |
लावण्य न सरे, दृष्टीपुढे ||३||
देव उभा मूक, भक्त झाला मूक |
कृपेची ती फेक, कृष्णदासा ||४||
*-*-*

॥ पंढरीची वारी कार्तिकी २०२१ ॥


नमो स्वामीराजा, नमो भक्तराजा |
पंढरीच्या राजा, विठूराया ||१||
तूंचि मायबाप, हरतोसी ताप |
बोळवोनि पाप, शुद्ध करी ||२||
शुद्ध करी मन, शुद्ध करी तन |
भावभक्ती धन, समृद्ध ते ||३||
असीम उदार, विठ्ठल उद्गार |
जपे नाम सार, कृष्णदास ||४||
*-*-*
विठ्ठल उद्गार, वाचे निरंतर |
तयासी विसर, देहभाव ||१||
पंढरीये पुरी, देहभाव नुरी |
कृपेची त्या सरी, कुणा न ये ||२||
विठ्ठल गजरी, झंकार अंबरी |
एकादशी वारी, पातलीसे ||३||
विठूराज द्वारी, आनंदाची वारी |
ध्वज उंच करी, कृष्णदास ||४||
*-*-*
आनंदाची वारी, असे या भूवरी |
पंढरीये पुरी, भूवैकुंठ ||१||
श्रीधर सुंदर, उभा विटेवर |
स्वर्गसुख द्वार, पंढरी ही ||२||
नको नामजप, नको ध्यानतप |
सौख्य हे अमूप, दर्शनाचे ||३||
दर्शन ते होता, विटेवरी माथा |
होय रोमांचिता, कृष्णदास ||४||
*-*-*
विटेवरी माथा, नुरे भवचिंता |
सर्वसुख दाता, विठ्ठल गा ||१||
पंढरीसी जावे, विठ्ठला भेटावे |
चरण नमावे, एकभावें ||२||
चैतन्य सघन, गाभारा भरून |
भक्तांसी व्यापून, टाकीतसे ||३||
ब्रह्म अनुनाद, विठ्ठल वरद |
घेतसे तो स्वाद, कृष्णदास ||४||
*-*-*
विठ्ठल वरद, विटेवरी पद |
रूप ते सुखद, पंढरीये ||१||
ये रे पंढरीसी, पाचारी भक्तांसी |
सौख्य आनंदासी, पावसील ||२||
कटीवरी हात, देखसील तेथ |
परी मी निश्चित, चतुर्भुज ||३||
उतावीळ बाह्या, क्षेम तुज द्याया |
निववी गा काया, आलिंगनी ||४||
ऐक्य देवभक्त, नुरे कुणी तेथ |
ऐसें पंढरीत, नवल ते ||५||
ऐसा हो महिमा, शब्द न ये कामा |
पावला विश्रामा, कृष्णदास ||६||
*-*-*
शब्द न ये कामा, महिमा या धामा |
पंढरीच्या श्यामा, भुले जन ||१||
चालताचि वाट, देह हो विस्मृत |
भवबंध गाठ, सैल होय ||२||
शीतल आपाप, मन घेई झेप |
पदोपदी रूप, खुणावते ||३||
चढे श्यामरंग, भक्त होई दंग |
धुंदीचे तरंग, कृष्णदासा ||४||
*-*-*
भक्त होई दंग, मनी श्याम संग |
गातसे अभंग, सावळ्याचे ||१||
रूप वर्णनाचे, विठू महिम्याचे |
चालताना वाचे, स्फुरण ये ||२||
ऐसें चिंतनाचे, क्षण ते मोलाचे |
क्षण आनंदाचे, अविरत ||३||
विरत मीपण, कृपेची ती खूण |
धन्यतेचा क्षण, कृष्णदासा ||४||
*-*-*

॥ पंढरीची वारी आषाढी २०२३ ॥

दाटले आभाळ, चालले गोपाळ |
पंढरीची वाट, दाटलीसे ||१||
मेघ ते संतृप्त, भाव ही संतृप्त |
बरसण्या मुक्त, वेळा आली ||२||
पंढरीची वारी, विश्वात ती न्यारी |
पर्वणीच न्यारी, देव-भक्तां ||३||
नयनरम्य तो, सोहळा पाहतो |
मनेचि लक्षितो, कृष्णदास ||४||
*-*-*
तन आंदोलित, मन आंदोलित |
वीट आंदोलित, पंढरीसी ||१||
भाव तो अपार, ओसंडितो फार |
विटेसी थरार, कंप आला ||२||
उत्कंठीत मन, लगबग तन |
लक्षिती नयन, वधू वर ||३||
वियोग अपार, धरवेना धीर |
पदी वीटेवर, चुळबुळ ||४||
देवभक्त दोहीं, वरितील पाही |
घटिका ही येई, समीप ती ||५||
पाहण्या नवाई, सर्वांसी हो घाई |
गाभाऱ्यासी जाई, कृष्णदास ||६||
*-*-*


पंढरीची वारी 2012 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी मारा

पंढरीची वारी 2013 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी मारा

पंढरीची वारी 2021 – PDF फाईल डाऊनलोड करण्यास डावीकडे टिचकी माराLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *