विराट
का होता येत नाही आपणाला विराट
त्या विराटाचे अंश असताना…
कुणी अडवली आहे ती महत् जाणीव?
कोष केला आहे. आपणच… आपणाभोवती…
इवलेसे जगत्, इवलेसे ज्ञान, आखूड कल्पना
त्याच्या मर्यादा आखल्या आहेत आपणच आपणाभोवती
अहंकाराचा फुगा. मिसळून देत नाही विराट आकाशात, आतील हवेला…
सामावण्यासाठी तयार आहे ते विराट, पण हा फुगा फोडायचा कुणी?
कोषाच्या बाहेर नाही कुणी तयार जाण्यासाठी
विसरण्यासाठी नाही कुणी तयार, स्वत:ला…
आपणच ठरविले आपणास श्रेष्ठ. इतरांपेक्षा…
भीती वाटते स्वत:ला विसरुन टाकण्याची…
मी असा…, मी तसा…
पण त्याग त्याचा कराल तर… मी कसा? …
तर विराट, सर्व विश्वच माझ्या पोटात…
माझीच सर्व रुपे, नटलेली विविध रुपात…
नाही द्वेष, नाही मत्सर
आनंदाची अविरत लहर
मीच भरुन राहिलो, सर्वचि चराचर
अनंत आहे हा प्रांत…. अनंताचा
अनंत काळ अनंत ऋषी-मुनी बैसले आहेत या शोधात
अनंत जन्मांच्या अनंत संस्कारांच्या गाठी सोडवत
चेतना जी व्याप्त आहे देहभर… देहच मी समजत…
तिला वळवायचे आहे आत आत … केंद्राकडे
जो दडला नाही केवळ आत
तर… तोच केंद्र व्यापून आहे चराचरात
पिंडी ते ब्रह्मांडी…
हीच आहे विराटाच्या प्रवासाची नांदी!
श्वास जातो विरत… केवळ जाणीव उरत…
नाही भान काळाचे… नाही उरत अस्तित्वाचे…
आणी काय त्यापुढे???
केंद्रच जाणतो केंद्राला !
या विराट विश्वात आहेत अनंत जीव, अनंत आशा प्रत्येकाच्या मनात…
काही जन्मत:च, काही नैसर्गिक तर काही इतरांचे पाहून उमललेल्या
काही साध्य, काही अंशत:, पण बर्याचश्या असाध्य
साध्य ठेवून जातात ठसा मनावर, सुरु करत शृंखला नव्या नव्या…
असाध्य सुरु करतात असमाधानाचे व्रण, चिघळणारे मधुमेहीसारखे…
आसक्ती अन् मत्सर यांची निर्मिती करुन
दोन्ही नेतात दूर दूर… केंद्रापासून, विखुरलेल्या मनास
अशुद्ध करत जाणीव, जी होती शुद्ध, निर्मितीच्या वेळेस
आकळू शकत नाही ती आज स्वत:च स्वत:ला…
गुलाम झाली आहे देहभोगाला, आनंदाचा स्त्रोत समजून
जाणवू देत नाही आनंदस्वरूप, स्वत:चे स्वत:ला
बद्ध अन् मर्यादित केले आहे स्वत:च्या स्वरूपाला
अनभिज्ञ झाली आहे स्वत:च्या विराट रुपाला
मग… काय करावे…
निरखा प्रत्येक उर्मीला, तटस्थपणे,.. केन्द्रापासून न ढळता
अवधी होईल कमी कमी, केंद्रापासून ढळणारा, जो नेतो स्वरूपापासून दूर
मग व्हाल क्षणोक्षणी आनंदात चूर!
विरेल सारी अशुद्धता, उरेल पूर्ण शुद्धता, जाणीवेची, जी आहे विराट!!!
विराटाला नाही, कोठे येणे जाणे…
सदा सर्वकाळ, सर्वत्र व्यापुनि असणे.
विराटाला नाही जाण, मी तू पणे…
मी तू पणा अभावी, नाही काही उणे.
काही नाही उणेे, सदा सर्वदा परिपूर्णे…
तेणे नाही त्याला, कदा दु:खाचे स्पर्शणे.
सदासर्वकाळ लेवला असे, स्वानंदाचे लेणे…
आपण त्याचे अंश, एकदाच भान घेणे.
परिघातही केंद्र, क्षेत्रातही केंद्र, त्याला नाही कोठे नसणे…
केंद्र न जाणे स्वत:ला, हे तो लाजिरवाणे!!
PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply