अभ्यास
*अनुग्रहक्षणीसुद्धा ‘तो’ अनुभव येतो*. श्री रामकृष्ण परमहंस म्हणत, ‘गुरूचा उपदेश ऐकून खरा भक्त एकदम स्थिर होउन जातो जसा की गारुड्याच्या पुंगीसमोरील नाग!’. अर्थातच् हे साधकाच्या पूर्वतयारीवर अवलंबून असते. असो.
अभ्यासाच्या संदर्भात थोडेसे:-
म्हणतात ना की ‘जानके करो’. अनुसंधान आणि अवलोकन ही आत्मशोधाच्या अभ्यासाची दोन अनिवार्य अंगे आहेत. अवलोकनात दोन अंगे येतात: एक म्हणजे लौकिक जगात वावरताना ‘आत्मपरीक्षण’ म्हणजे विविध प्रसंगी आत उठणार्या वृत्ति तपासणे व दुसरे अंग म्हणजे शरीरांतर्गत होणार्या क्रियांकडे, श्वासक्रियेकडे लक्ष देणे. साधेच लक्षात घ्या की नवीन ठिकाणाच्या प्रवासात असताना आपण बाहेर लक्ष ठेवून असतो व आजूबाजूचा परिसर, काय काय स्थाने येत आहेत हे पहात असतो, पण आतला प्रवास करताना ‘आत’ अवलोकन करण्याचे कुणासही लक्षात मात्र येत नाही. विशेषत: सोऽहम् साधनेत तर हे आवश्यकच आहे. सोऽहम् साधनेसंबधी बरेचदा असे म्हटले जाते की, सोऽहम् हा भाव आहे. सोऽहम् साधनेत सोऽहम् भाव असावा पण हा भाव अनुभूति असल्याशिवाय सार्थ होणे शक्य नाही. नाहीतर ते एक प्रकारे कल्पनारंजन वा वंचनाच ठरेल. सोऽहम् भान येणे आवश्यक आहे, मग सोऽहम् भाव आपसूकच येईल, हे बरोबर नां? म्हणूनच म्हटले आहे की ‘प्रकटता सोऽहम् भाव’. सोऽहम् साधकांना तर माहितच आहे की दीक्षासमयी श्रीस्वामीजी ती श्वासप्रक्रिया समजावून सांगत असत व नंतर स्वस्थपणे त्याचे अवलोकन करावे हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे हे कुणीतरी ‘गंभीरतेने’ ध्यानात घेतले आहे काय? तसेच ‘स्फुरण’ हा शब्द किती समर्पक आहे! स्फुरते ते स्फुरण. स्फुरणाचा उगम शोधायचा आहे. ते सोऽहम् स्फुरण प्रत्ययास आले की झालेच काम! या अभ्यासाच्या संदर्भात आताच्या शास्त्रीय युगात, शास्त्रीय परिभाषेत समजावून सांगायचे झाले तर पुढीलप्रमाणे सांगता येईल:-
जड असे अधोगामी, सूक्ष्म असे उर्ध्वगामी
सृष्टी चाले या नियमी, कधी ना विचार करितो आम्ही ॥
अहम् घेता खाली जाये, स: होता उर्ध्व जाये
पृथ्थकरण ह्या क्रियेचे, करितो का कधी हो आम्ही? ॥
अहम् अधो कारण जड, स: उर्ध्व कारण सूक्ष्म
विचार करुनी या सोऽहंचा, करितो का कधी अभ्यास आम्ही? ॥
जीव ‘जड’ म्हणे ‘अहम्’, शिव ‘सूक्ष्म’ म्हणे ‘स:’
म्हणुनी देही चाले अखंड, ‘सोऽहं सोऽहं’ चा हा ध्वनि ॥
शिव जीवाचे मूळ रुप, म्हणुनी ‘स्वाभाविक’ स: होय
अहंकारे झाला बाधित, म्हणुनी अहमी खाली जाय ॥
अहम् होता विरल हळुहळु, स: ‘अवधि’ वाढत जाय
अभ्यास करीता ह्या विचारे, स: ‘प्रतीति’ दृढ होय ॥
काहीच ना अवघड येथे, सोडुनिया द्या अहमाते
जीवरूपी धरिल्या भासाते, सोडुनि शिवरूप अनुभव होय ॥
कृष्णदास सांगे किती हे सोपे, ध्यानी घेता तरुनि जाय!
श्रीस्वामीजी (वा कोणतेही सद्गुरू) म्हणत, ‘अभ्यास! अभ्यास!! अभ्यास!!!’
तो अभ्यास कसा तर,
सोऽहं बोधावरुनी जरी हटे क्षणभरी
अहम् वृत्ति त्वरित जागृत होई अंतरी ॥
होऊनिया सावध त्या क्षणाभीतरी
पुन्हा चढा त्या सोऽहं बोधावरी ॥
अभ्यास नित्य करीता ऐशा परी
कृष्णदास सांगे बोध मुरे अंतरी ॥
श्री स्वामीजींचे साधनाकाळातील त्यांनी पाणी भरतेवेळी केलेल्या सोऽहं अनुसंधानाच्या आत्मपरीक्षणाचे उदाहरण आपणा सर्वांना ठाऊकच आहे.
श्रीस्वामीजी म्हणत, ‘घडीभर, घटका अर्धघटकातरी स्वस्थ बसून अभ्यास करावा’. साधनेत आसनाचे सुद्धा फार महत्त्व आहे. जिज्ञासूंनी श्रीमत् भावार्थ गीतेचा अध्याय सहावा जरूर अभ्यासावा. फारच बहारीचे वर्णन आहे. जणू सोन्याला सुगंध!! साकी ३६ ते ४३. श्रीस्वामीजींचे या आसनातील छायाचित्रसुद्धा आहे. ‘स्वस्थ’ बसण्यास महत्त्व का? तर,
ईश्वरासी जाणायाचे?? मग काय करायाचे??
काही नाही करायाचे! काहीच नाही करायाचे!!
पंचज्ञानेंद्रियांसी,विषय नाही पुरवायाचे ॥
तेणे काय साधायाचे, तेणे काय साधायाचे?
चित्तचतुष्ट्यासी नुरे काही चघळायाचे ॥
जळावरील तरंग जणू असे रे थांबवायाचे
निश्चल स्थितीत त्या हळुहळु रमायाचे ॥
स्वसंवेद्य आत्मरूप स्वत:शीच अनुभवायचे ॥
अनुभवतो ‘तो’ कोण?,अन् जाणितो ‘त्या’सी कोण
‘तोच तो मी’ ‘नव्हे आणिक’, हेच केवळ जाणायाचे ॥
काळ ठरे कल्पना, दुजे ना शांतिविना
हेच रे हेच केवळ, हेचि असे रे अनुभवायाचे ॥
स्थितिते या पार करता काय तेथे उरायाचे
शब्द पांगुळती जेथे, ते कसे रे वर्णायाचे ॥
विश्व सारे कल्पनाचि, नुरे काही तेथ बा रे
कृष्णदासे गुरुकृपे, सांगितले मर्म सारे! ॥
असा अभ्यास करून एकदा का ती गोडी, ती चटक लागली की मग साधनाच साधकाचा ताबा घेते. परंतु तोपर्यंत चिकाटीने अभ्यास करणे हे आहे साधकीय कर्तव्य!!
— कृष्णदास (२९-०९-२०१५)
Leave a Reply