स्वरूप पुतळा, प्रकटला पावसी
।। स्वरूप पुतळा, प्रकटला पावसी ।।
(श्री स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी २०१४ निमित्त एक छोटासा लेख)
व्हिडीओ पाहाण्यास खालील लिंकवर क्लिक करावे
https://youtu.be/2JnaJeK55s0
ॐ राम कृष्ण हरि. ॐ राम कृष्ण हरि. . ॐ राम कृष्ण हरि. . .
ॐ राम कृष्ण हरि. ॐ राम कृष्ण हरि. . ॐ राम कृष्ण हरि. . .
ॐ राम कृष्ण हरि. ॐ राम कृष्ण हरि. . ॐ राम कृष्ण हरि. . .
आजचा तिसरा दिवस. . . मंद आवाजात अखंड जप चालू आहे. अनंत निवासाच्या खोलीत श्रीस्वामी देहभानविरहित अवस्थेत मंचकावर निजून आहेत. सर्व वातावरणात नित्याची पवित्रता व शांतता यांजबरोबर गेले तीन दिवस एक नि:शब्द गंभीरता व्यापून आहे. त्या पवित्र खोलीत गेली चाळीस वर्षे घुमणारा सोऽहं ध्वनि आज स: भावावर कायमचा स्थिर होऊ पहात आहे. जीवांचा उद्धार करण्यास भूतलावर अवतरलेले श्रीस्वामी आता देहाची खोळ सोडून अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर आहेत. गेली कित्येक वर्षे श्रीस्वामी केवळ दर्शनार्थींसाठी वा देहाच्या नित्यकर्मास देहभानावर येत असत अन्यथा समाधीमग्नच असत, परंतु आता त्या देहबंधनाच्या मर्यादांचा कायमस्वरूपी त्याग करून सूक्ष्म अदृश्य स्वरूपात राहून आता श्रीस्वामींनी पुढील कार्य करावे असा जो ईश्वरी संकेत श्रीस्वामींस मिळाला होता, त्यानुसार आता पुढील वाटचाल सुरु झाली आहे. नित्य ब्रह्मचिंतनात अथवा समाधीत मग्न असलेले प्राचीन ऋषि-मुनिंचे वर्णन केवळ ग्रंथांतच वाचायचे, या काळात असे ऋषि-मुनि पहायला मिळणे दुर्लभच, पण कोकणातील पावसच्या अनंत-निवासाच्या त्या लहानशा खोलीत अशा या ऋषितुल्य महात्म्याच्या दर्शनास येऊन न जाणो कितीकजणांनी आपले जीवन धन्य केले! असे जीव खरोखरच अत्यंत भाग्यवान!! ईश्वरदर्शनाच्या मार्गात सद्गुरुप्रणित साधनावरील अढळ निष्ठेद्वारे व त्याच्या अखंड अविरत चिंतनाने, निदिध्यासाने ब्रह्मपदप्राप्ति कशी होऊ शकते याचा आदर्श श्रीस्वामींनी साधकांपुढे घालून दिला. श्रीकृष्ण परमात्म्याने सांगितलेली श्रीमत् भगवद्गीता व त्यावरील श्री ज्ञानेश्वर महाराजकृत टीका म्हणजेच श्री भावार्थदीपिका हे केवळ पारायणाचे ग्रंथ नव्हेत तर त्यांत ईश्वरोपासनेचे विशद शास्त्र व ईश्वरानुुभूतिचे वर्णन आहे हे श्रीस्वामींनी जगास आपल्या आदर्श साधकीय जीवनाने व त्याद्वारे आलेल्या स्वानुभूतिद्वारे दाखवून दिले. आत्मदर्शनाच्या परमशुद्ध परमार्थमार्गात कोणत्याही बाह्य साधनाच्या आलंबनाची गरज नाही व देहात स्वाभाविकपणे चालणार्या सोऽहं ध्वनिच्या अनुसंधानाने मन, बुद्धि, चित्त, अहंकार, देह यांची शुद्धता होत होत, त्या परमतत्त्वाची केवळ अनुभूतिच नव्हे तर त्या अखंड अभ्यासाने त्या आत्मतत्त्वाशी, परमात्म स्वरूपाशी अखंड एकरूप रहाण्याची कला श्रीस्वामींस साध्य झाली. प्रथम निर्गुण साक्षात्कार व तद्नंतर भक्त-भावाच्या आत्यंतिक तळमळीने साकार झालेले भगवान श्रीविष्णूंचे साक्षात् सगुण दर्शन. श्रीसद्गुरुकृपेने आलेल्या या दोन्ही अनुभूतिंद्वारे श्रीस्वामींचे जीवन कृतार्थ झाले. अगदीच तोळामासा प्रकृति, पण परंपरेने आलेली नाथसंप्रदायी विद्या व तिच्या अभ्यासाने आलेली अनुभूति सामान्य संसारी जीवांस लाभावी या परमेश्वरी हेतूने, श्रीस्वामींकडून, त्या इच्छेने दर्शनास आलेल्या जीवांस ही विद्या सहजपणे प्रदान होत असे, कुणीही विन्मुख जात नसे. नवरत्नहार, अमृतधारा, श्रीमत् संजीवनी गाथा, श्रीमत् भावार्थ गीता, श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी, श्रीमत् अभंग अमृतानुभव, चांगदेवपासष्टी व स्वरूप-पत्रमंजूषा (भक्तांस लिहिलेली मार्गदर्शनपर पत्रे) हे श्रीस्वामींचे साहित्य म्हणजे केवळ कल्पनाविलास वा अनुवाद नसून त्यात श्रीस्वामींचे प्रत्यक्ष स्वानुभूतिचे बोल आहेत, साधनमार्गातील अनुभवाच्या खुणा आहेत हे सत्साधकांस निश्चितच जाणवेल. सर्वसाधारण जीवांस वेळेअभावी संपूर्ण ग्रंथ वाचन जमत नाही, त्यादृष्टीने सुलभ होण्यास, तसेच त्यांच्या साधनमार्गाचा पाया तयार व्हावा या हेतूने श्रीस्वामींद्वारे ज्ञानेश्वरीतील एकशे नऊ निवडक ओव्या असलेल्या ज्ञानेश्वरी नित्यपाठाची निर्मिती झाली. हा ज्ञानेश्वरी नित्यपाठ वाचताना ओव्यांची ती एक सलग रचना आहे असेच वाटते व विशेष म्हणजे हा नित्यपाठ साधनेतील क्रममार्ग उद्धृत करतो. श्रीज्ञानेश्वरीतील नऊ हजार ओव्यांमधील या एकशे नऊ ओव्यांची ही निवड व क्रम म्हणजे एक चमत्कार आहे म्हणा, पण श्रीस्वामींनी पूर्ववयात केलेल्या श्रीज्ञानेश्वरीच्या अध्ययनपूर्वक पारायणांचे ते फलित आहे. श्रीस्वामींच्या साहित्यात कुठेही अवघड, दुर्बोध वा पांडित्यपूर्ण भाषा नाही. परमार्थ सुलभ सुलभ तो आणखी काय करायचा बाकी ठेवला श्रीस्वामींनी!! प्राचीन ऋषि-मुनि तसेच आदि शंकराचार्यांपासून ते ज्ञानेश्वरांपर्यंत व त्यानंतर अगदी नजिकच्या काळातील श्री रामकृष्ण परमहंस, श्री रमण महर्षिंपर्यंत सर्व महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाची व साक्षात् दर्शनाची अनुभूति श्रीस्वामीरुपे दर्शनार्थींस मिळत होती. निर्विकल्प, निराकार, चिदानंद सर्वव्यापी आत्मस्वरूप म्हणजेच जणू श्रीस्वामी. दर्शनार्थीच्या भावाची साकार मूर्त परिणति म्हणजे श्रीस्वामी दर्शन. पवित्र प्रसन्नतेने ओसंडणारे मुखकमल, प्राजक्त-पुष्पासारखी कांति, शुद्ध कापुराप्रमाणे देहातून प्रस्फुटित होणारे तेज, करुणा व प्रेम यांनी ओथंबलेले वेधक नेत्र, कोमल वाणी आणि आशीर्वादपर हस्तमुद्रा. हे पावन दर्शन घेणार्याचे व्यक्तित्त्व क्षणभर विस्मृत न झाले तरच नवल! समोर आलेल्याच्या कूटस्थ चैतन्यास स्पर्श करून त्या जीवास ‘त्या’ची क्षणभर अनुभूति श्रीस्वामींच्या प्रथमदर्शनीच सहजपणे होत असे. परमार्थमार्गातील सर्वोच्च अनुभूति लाभूनही श्रीस्वामींनी त्याचे कुठल्याही प्रकारे स्तोम वा अवडंबर माजविले नाही, ना त्याचा परिणाम स्वत:च्या बाह्य वेष अथवा वागण्यावर होऊ दिला. त्यामुळेच श्रीस्वामींचे दर्शन घेण्यार्या जीवांवर होणारे परिणाम क्षणिक न ठरता कायमस्वरूपी व क्रांतिकारी ठरले. त्या दर्शन क्षणानंतर प्रत्येकाचे जीवन आमूलाग्र बदलूनच गेले. अशा प्रकारे अनंत-निवासातील या छोट्याश्या खोलीत राहून गेली चाळीस वर्षे श्रीस्वामी विश्वकल्याणाचे कार्य करीत आहेत. आज श्रीस्वामींची या भूतलावरील स्थूल देहाद्वारे होणार्या अवतारकार्य समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे. श्री ज्ञानेश्वरांदिक सिद्ध-सत्पुरुषांची सदेह संजीवन समाधि हा कुतूहलाचा विषय आहे पण श्रीस्वामींनी त्याप्रकारे समाधिस्थितित रहाण्याचा अभ्यास सिद्ध केला आहे. त्यामुळे श्रीस्वामी देहत्याग करणार हे केवळ लौकिकदृष्ट्या पण या समाधिस्थ देहात राहून श्रीस्वामींचे विश्वकल्याणाचे कार्य अखंड अविरत चालूच रहाणार आहे. आदिनाथापासून ते मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ व अनेक सिद्धपुरुष, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताबाई इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष देव पांडुरंग अनंत-निवासी आज उपस्थित झालेले आहेत. आपल्या लाडक्या भक्ताचा संजीवन समाधिसोहळा पहाण्यास. . . श्रीस्वामींस निजधामी नेण्यास. . .
१५ ऑगष्ट १९७४, श्रावण वद्य द्वादशी, शके १८९६, आनंदनाम संवत्सर, गुरुपुष्य योग, सकाळी आठ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी श्रीस्वामी संजीवन समाधिस्थ झाले. श्रीक्षेत्र पावस येथील समाधि मंदिरात श्रीस्वामींचा देह शास्त्रशुद्धरितीने समाधिस्थ केला गेला.
श्रीस्वामी स्वरूपानंद! हा स्वरूपसूर्य मावळला कां? अजिबात नाही!! तो चिरंतन आहे. पावस येथील संजीवन समाधीत जागृत. . .अनंत-निवासातील खोलीत स्पंदरूपाने. . . त्यांच्या सर्व साहित्यात मार्गदर्शन व अनुभूति यांच्या शब्दबद्ध रूपाने. . . आणि सर्व भक्तांच्या हृदयात स्मरणरूपाने. . .
या पुण्यतिथीदिनी आपण सर्वजण श्रीस्वामीचरणी अनंत प्रणाम करून कृतज्ञता व्यक्त करुया व त्यांच्या कृपेचे छत्र आपल्यावर अखंड राहो अशी प्रार्थना करुया!!
त्या दयाळूसी स्मरा रे ऽऽ, त्या दयाळूसी स्मरा ऽऽ ॥धृ.॥
पावसी वसुनि उभवितसे जो, निजकृपाकरा ऽऽ |
अगणित दोष ना गणुनि जीवाचे, करी अंगिकारा ऽऽ |
त्या दयाळूसी स्मरा रे ऽऽ, त्या दयाळूसी स्मरा ऽऽ ॥धृ.॥
मायेतुनि या सोडवि बलाढ्य, एकचि समर्थ खरा ऽऽ |
सोऽहं बोधे मिटवी अहम्, जगत खेळ सारा ऽऽ |
त्या दयाळूसी स्मरा रे ऽऽ, त्या दयाळूसी स्मरा ऽऽ ॥धृ.॥
कृतार्थतेच्या बिकट पथी या, मार्गदर्शक गुरूवरा ऽऽ |
मूलाधारस्थित जीवा अलगद जो, नेई सहस्रारा ऽऽ |
त्या दयाळूसी स्मरा रे ऽऽ, त्या दयाळूसी स्मरा ऽऽ ॥धृ.॥
कृष्णदास नित कृतज्ञतेने , स्मरतो योगीवरा ऽऽ |
विनवितो ऽऽ , तुम्हां ऽऽ
त्या दयाळूसी स्मरा रे ऽऽ, त्या दयाळूसी स्मरा ऽऽ ॥धृ.॥
* * * * * *
— कृष्णदास (२२.०८.२०१४)
PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
व्हिडीओ पाहाण्यास खालील लिंकवर क्लिक करावे
Leave a Reply