स्वरूप-सोपान-सोऽहम्

॥ स्वरूप-सोपान-सोऽहम् ॥

(श्री स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी २०१५ निमित्त एक छोटासा लेख)

दिनांक १५ ऑगस्ट १९७४ रोजी श्रीस्वरूपानंद स्वामीजी संजीवन समाधिस्थ झाले. तत्पूर्वी ३० जुलै रोजी श्रीस्वामीजींनी सत्यदेवानंद सरस्वतींना खोलीत बोलावून घेतले. त्याकाळात श्रीस्वामींनी डोळ्यांवर पट्टी ठेवली होती. ती काढून श्रीस्वामीजींनी सत्यदेवानंदांकडे कृपादृष्टीने पाहिले. सेवेकर्‍याकडून खडीसाखर प्रसाद घेऊन नित्याप्रमाणे सत्यदेवानंद मागल्या पावली (श्रीस्वामीजींकडे पाठ न फिरविता) खोलीतून बाहेर आहे. हळूहळू देहभान लोप पावत आहे अशी जाणीव सत्यदेवानंदांना झाली व ते बाहेर ओटीवर आसन घालून बसले. कानात श्रीस्वामीजींचे शब्द उमटले ‘आपण भजन करावे, पुष्कळ भजन करावे. तेच आपले जीवन आहे’. श्रीस्वामीजी सोऽहम् अनुसंधानास ‘भजन’ म्हणत असत हे तर सर्वज्ञातच आहे. म्हणूनच वरप्रार्थनेत श्रीस्वामीजी म्हणतात ‘उदारा जगदाधारा देई मज असा वर | स्व-स्वरूपसंधानी रमो चित्त निरंतर ॥

गुरुकृपांकिताने नेहमी स्मरणात ठेवावे की,

१.सद्गुरु नित्य आहेत.

२.सद्गुरुंनी दिलेला बोध हा परंपरेने आलेला व स्वानुभवसिद्ध असतो, त्यामुळेच तो शिष्यांस प्रदान केला जातो.

३.साक्षात् आत्मानुभवी सद्गुरूमुखांतून आल्यामुळे तो शक्तियुक्त असून त्यास सत्संकल्पाचे व परंपरेचे बळ असते.

४.आत्मानुभवाच्या साधनपथावर त्या बोधाव्यतिरिक्त/ त्या साधनेव्यतिरिक्त इतर कसलीही वा जोडसाधनेची आवश्यकता नसते.

५.जेव्हा पारंपारिक पद्धतीने अनुग्रह देऊन सद्गुरु शिष्याचा स्वीकार करतात तेव्हा ‘एकनिष्ठ’ शिष्याची संपूर्णत: जबाबदारी सद्गुरुंनी घेतलेली असते. व्यावहारिक रीतीने त्याचा वाणीद्वारे उच्चार करुन ते सांगण्याची त्यांना आवश्यकता नसते.

६.कर्मसिद्धान्त अटळ व अबाधित असल्याने शिष्य जीवनात संत/सद्गुरु सहसा ढवळाढवळ करीत नाहीत, अन्यथा ते शिष्याच्या मोक्षमार्गाआड येते.

७.आत्मदर्शन वा आत्मानुभव म्हणजे आणखी काहीही नसून जीवास स्वत:चे म्हणजे स्व-स्वरूपाचे जे विस्मरण झालेले आहे त्याचा पुन: बोध होणे.

८. अंती ‘माझे मजपाशी सापडले धन | आनंदले मन आत्मरंगी ॥

ही सर्व अकृत्रिम, सहजपणे, पण क्रमश: अन् बहुतांश जीवांच्या बाबतीत हळूहळू घडणारी प्रक्रिया आहे. फारच थोडे भाग्यवान् जीव सद्गुरु बोध कानी पडताच तत्क्षणीच ज्ञानी होतात. आध्यात्मिक साधनेचे विविध प्रकार वा मार्ग आढळतात, नाना संप्रदाय व व्यक्ति तितक्या प्रकृति. त्यामुळे ज्याला जो मार्ग रुचेल तो त्याने स्वीकारावा. पण ज्या साधनमार्गात इतर कुठल्याही आलंबनाची आवश्यकता नाही, जी साधना नैसर्गिक, सहज आहे, जी देश-काल-परिस्थितीवर अवलंबून नाही अशी साधनाच श्रेष्ठ व सोयीस्कर आहे यांबद्दल वाद वा दुमत नसावे. अशा निसर्गदत्त साधनेने परमोच्च अवस्था साध्य होऊ शकते हे नाथसंप्रदायाने दाखवून दिले. नाथसंप्रदायातील नाथांच्या साधनमार्गाच्या, कठोर तपाचरणाच्या व चमत्कारांच्या कथा फार पुरातन काळातल्या आहेत, आज ते सर्व शक्य नाही असा भ्रम असणार्‍यांसाठी आताच्या काळातील श्री स्वामी स्वरूपानंदांचे उदाहरण मार्गदर्शक ठरेल. श्रीगुरूप्रणित सोऽहम् साधनेद्वारे केवळ, श्रीस्वामींनी ती परमोच्च स्थिति, ते परमोच्च पद हस्तगत केले. हा आदर्श सर्व साधकांनी ध्यानी घेण्याजोगा आहे. श्रीमद्भगवद्गीता आणि श्रीज्ञानेश्‍वरी यांची मानवी मूर्ति म्हणजे श्रीस्वामी स्वरूपानंद! स्वधर्म-परायणता व स्वकर्म-दक्षता, सोळाव्या अध्यायातील दैवी गुणसंपदा वा सहाव्या अध्यायातील योगीलक्षणे व सिद्धि, बाराव्या अध्यायातील भक्त लक्षणे या सर्वांची मूर्तिमंत परिणति म्हणजे श्री स्वामी स्वरूपानंद दर्शन! श्रीस्वामीजींचे जीवनचरित्र, भक्तस्मृतिप्रसंग व लीलाप्रसंग वाचताना हे सहज ध्यानी येईल. थोडासा जरी विचार केला तरी यांतील एकेक गुण अंगी बाणवायचा म्हणजे किती सायासकर आहे याची कुणासही कल्पना येईल. एखादेवेळी तंत्रमंत्र अनुष्ठानाद्वारे सिद्धिप्राप्ति सहज होईल पण हे गुण अंगी बाणवणे महत्कठीण! रामचंद्र विष्णू गोडबोले ते स्वामी स्वरूपानंद हा जीवनप्रवास आज सर्वांसमोर उपलब्ध आहे, त्यात काहीही गुप्त नाही. अन् या स्थित्यंतराचा सोपान म्हणजे केवळ गुरुपदिष्ट सोऽहम्!

याच सोऽहम् साधनेचे मार्गदर्शन श्रीस्वामींनी आपल्याकडे आलेल्या प्रत्येक जिज्ञासूला केले व अव्यक्तातून आजही करीत आहेत. आज आपण जगाच्या पाठीवर कुठेही असू, पण श्रीक्षेत्र पावस येथील श्रीस्वामीजींच्या खोलीतील पवित्रता, गंभीरता, प्रसन्नता, नि:शब्दता स्मरणक्षणीच अनुभवू शकतो हे खरे आहे नां? हेच श्रीस्वामींचे सामर्थ्य, सर्वव्यापकता व अमरत्व आहे. बोधप्रदान करतेसमयीची त्यांची तळमळ आपण अल्पांशानेसुद्धा जाणू शकत नाही. श्री रामकृष्ण परहंस म्हणत की ‘माझं म्हणणं मानतोय कोण ? मी सोबती धुंडाळतोय -माझ्या स्वभावाचा, मनोभावाचा. कुणी खूप भक्त दिसल्यास वाटू लागतं की हा बहुधा माझा भाव घेऊ शकेल. पण नंतर दिसू लागतं की तो वेगळंच वागू लागतो!. ’ नीट विचार केल्यास कळेल की सर्वच गुरूंच्या मनी आज हीच खंत असेल, नाही का? प्रत्यक्ष ब्रह्मसाम्राज्याचा सोपान असलेला हा सोऽहम्, पण एखाद्या अजाण बालकाच्या हाती एखादे बहुमोल रत्न दिले तर त्यांस जसे त्याचे मोल कळत नाही तशी तर आज आपली स्थिति होत नाही नां?

या सोऽहम् बोधाचे मर्म सर्व जिज्ञासू साधकांस अवगत व्हावे अशी आज श्रीस्वामी पुण्यतिथिदिनी श्रीस्वामीचरणी प्रार्थना करुया.

— कृष्णदास (१५.०८.२०१५)

PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *