शिष्य-परंपरा

कै. कृष्णा लाड, कै. वासुदेव दळवी, कै. रामदासबुवा , कै. रामभाऊ फारिक, कै. म्हादबा, कै. वेणीमाधव (रांगोळी महाराज), कै. व्यास, कै. बाळकृष्ण राशीवडेकर, कै. महादेवभट, कै. नामदेव महाराज, कै. अनंत आळतेकर हे स्वामीजींच्या काळातील अंतरंग शिष्यांपैकी होत. सांप्रतच्या काळात प. पू. श्री माधवराव टिकेकर, देवनार, मुंबई यांनी श्री स्वामी आज्ञेने अनेकांना या संप्रदायाची दीक्षा दिली.

प. पू. श्री माधवराव टिकेकर महाराज
(१३ जून, इ.स. १९२९ – ४ मे, इ.स. २००१)

appa1

appa2

appa3

appa2


परमपूज्य अप्पांनी ना कधी प्रवचन दिले की काही लिहिले की साधकांकडे काही खुलासा केला. त्यांचे सांगणे एकच असे की बैठक वाढवा व आपापला अनुभव घ्या.

परंतु श्री भाऊ देशपांडे, नाशिक यांनी श्रीकृष्ण सरस्वती स्वामींचे गद्य चरित्र प्रकाशित केले व त्यास परमपूज्य अप्पांनी आशीर्वादस्वरूप प्रस्तावना दिली. त्यात त्यांना साधकांस काय सांगावयाचे आहे याचा अंदाज येतो. ती प्रस्तावना पुढीलप्रमाणे आहे:

ज्ञात व प्रकट असलेल्या आजच्या युगातील पाच दत्त अवतारांपैकी देह धारणा होण्यापासून देहत्याग करेपर्यंत संपूर्ण चरित्र फक्त श्रीगुरुराज श्रीकृष्णसरस्वती  स्वामींचेच  उपलब्ध आहे. असे असूनही शंभर वर्षापूर्वी ओवीबद्ध प्रसिद्ध झालेले चरित्र सोडून इतर त्यांच्याबद्दल लिहिण्याचे प्रयत्न जवळ जवळ झाले नाहीत. ही उणीव डॉ. दिनकर दामोदर देशपांडे (आ. भाऊ देशपांडे)  यांनी गद्यात चरित्र लिहून भरून काढली आहे. हे चरित्र जसजसे लिहिले गेले तसतसे गेले २ वर्षे पंचवटीतील  (नाशिक) दत्तमंदिरात ते लिहिले जात असे व ते साधक, भक्त व भाविक यांना आवडले.  तसे चरित्र लिहिल्याबद्दल श्री भाऊ कौतुकास  निश्चितच पात्र आहेत.

स्वामी अत्यंत कमी बोलणारे पण अखंड भक्तांसाठी झटणारे असल्याने त्यांच्याबद्दल घडलेल्या हकिकतीपलिकडे फारसे लिहिणे कठीण होते. माणूस जेव्हा संकटात सापडतो त्यावेळी एकतर दु:खातच बुडून आपले आयुष्य व्यतीत करतो अगर ते संकट म्हणजे एक आव्हान समजून पुन्हा जोराने जीवन जगण्यास सिद्ध होतो. असे आव्हान स्वीकारण्याचे धाडस, आपल्या पाठीशी स्वामींसारखे जगत् चालक असतील तरच शक्य होते. बाकीचे परिस्थितीला शरण जातात. स्वामी ज्यांचे पाठीशी असतात त्यांना मग नवा जोम व पुनर्जन्म झाल्याचा आनंद मिळतो.

आशीर्वादाने आयुष्याला हा जो नवा हेतु लाभतो त्याला बहुतेक चमत्कार म्हणतात व या चमत्काराची विद्या जाणण्याची इच्छा आपणास निर्माण होते. पण ही इच्छा फारच थोडयांची पूर्ण  होते. याचे कारण कठोपनिषदामध्ये यमराजांनी नचिकेताला फार सुंदररित्या सांगितले आहे.

प्राचीन भारतीय विद्यापरंपरेत सर्व विद्यांचे रहस्य असलेले मूलतत्वांचे पावित्र्य अबाधित रहावे यासाठी अशा रहस्यांचे मंत्ररूपाने प्रदान करताना ही गुप्त गोपनीय विद्या जपून ठेवा. वापरा. उधळपट्टी करू नका. विद्वान जाणकार यांचे हातीच ही विद्या सुरक्षित राहू शकते.

या कारणाने शिष्य निवडताना व त्याला विद्याप्रदान करताना  अखंड वरदहस्त योग्यांची गंगोत्री श्री दत्तराज हात आखडता का घेतात याचे तरी रहस्य कळू शकेल.

श्री भाऊंची  ही चरित्र कथा सर्वांना आवडो हीच इच्छा व आशीर्वाद.

— माधव


परमपूज्य अप्पांच्या जन्मदिनी (१३ जून २०१६ रोजी) वरील काहीशा गूढ मनोगतावर चिंतन करून त्याचा शोध  घ्यावा असे वाटले व त्यातून उमगलेले बोधविचार – PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा.


श्री सद्गुरु स्मृति :-

शुभ्र कांती दैवी वर्ण, दृष्टी ओथंबली अति करुण
मुखी हास्य असे अनिवार, वाणी मंजुळ अन् मित फार
चालणे ताठ अति हळुवार, जिन्यावर ये जा वारंवार
शरीराचा पाहता आकार, वाटे जणू बाबाजी साकार
न भाळी टिळा न गळा हार, साधेपणाचा सर्व आचार
हे तर अमुचे अप्पा गुरुवर, त्यांचा आम्हा सर्वां आधार
घालुनिया सर्व हा भार, आम्ही करितो आनंद अपार!


श्री सद्गुरु स्मृति :-
हे कोण उभे माडीवरी, शुभ्र लुंगी अंगावरी
नजर प्रेमळ ती भारी, वाटे पाहता नवलचि भारी
ही तर अमुचि अप्पामाई, भाव हा माझा तिचे पायी
सुहास्य-वदन तेजे आगळा, दत्तचि केवळ वेश आगळा
करवीरीची हे गुरुमाई, भक्त उद्धरावया आली मुंबई
वर्णू माझे भाग्य मी काई, न कळेची माझी पूर्वपुण्यार्ई
हास्यकटाक्ष एके क्षणीचा, होई मी वाटे धन्यचि मनीचा
बोलणे नच परि हुंकार तो साचा, दर्शवि जाणती भाव मन्मनीचा
कृपादृष्टीने मला न्याहाळी, प्रारब्धाची गति हो जाळी
प्रकटली कृपेची नवलाई, दत्त दिसे ठायी ठायी
आत्त्मरुपाची नित नवलाई, वर्णू किती ते सुख मी बाई
चरण मी सोडुनि आणिक ना जाई, चरण मी सोडुनि आणिक ना जाई!!


साधना :-
गुरुवर्य अप्पांच्या घरी, पौर्णिमा अमावस्या वारी
लोक येती संख्या भारी, असे ‘साधने’ची ती वारी
खाली दिवाणखाना प्रशस्त, स्वामींची भव्य तसबीर
उभे असती अप्पा समोर, शिष्य नमिती चरणांवर
मग ते नेती माडीवर, स्वामींची खोली सुंदर
वर अजान, औदुंबर, जणू आळंदी अन् औदुंबर
तेचि असे हो ध्यान मंदिर, स्वामींच्या पादुका अति सुंदर
सर्व घालिती हार सुंदर, सुवासिक उदबत्त्या अपार
दरवळे सुगंध थोर, प्रसाद अर्पिती मधुर
मग नमन करुनी चरणांवर, सर्व बसती ध्यानी ताठ
काही बसती शांत निवांत, काहींच्या क्रियांचा थयथयाट
तेथे येती साधु संत, सूक्ष्म रुपात हो अनंत
क्वचितची कोणा दिसती, जो असे भाग्यवंत
अप्पा उभे असती समोर, पाहती नीट न्याहाळून
अडल्या नाडया सोडवून, प्रगतीस करीत मदत
होता ध्यानी हळूहळू धुंद, अप्पा हसती मंद मंद
सोबत उदबत्ती सुगंध, आनंदी सर्व हो धुंद
हेचि केवळ साधायासी, अप्पांची कळवळ हो साची
करिती खटपट साधनेची, दर पंधरा या दिसांची
त्यांनी लाविली सर्वा गोडी, ध्यानाची सर्वा थोडी थोडी
सवय लागता ती कां मोडी, जाणुनी मनाची खोडी
मग उपजे ती आवडी, ध्यानी सर्वा थोडी थोडी
मग बसे ध्यानाची घडी, हरघडी, नेत्र जरी उद्यडी
अशी वर्णिली मी ही वारी, ‘साधने’ची वारी
ती चाखिता आज मी गोडी, आठवे मनी पूर्व कहाणी
अप्पांची कणव अन् वाणी, जाणुनि मज नेत्रा येई पाणी
सद्गदित अंत:करणी, मी सद्गदित अंत:करणी!!


साधना :-
डोळे मिटुनी बसायाचे, साधन वाटे सर्वां खोटे
बोलणे हे वृथाचि ऐकुनि, मज मनी हा विस्मय दाटे
थोर थोर ते सारे संत, गेले परि ते ह्याच वाटे
जल दे सरिता जेवी सहजी, पय दे माता जेवी सहजी
तेवि दासा लेववि रमवि, आत्मानंदी सहजासहजी
आहे हे किती नेटके, सोपे, सरळ, सुलभ नि गोमटे
नाही कोऽहं चा विचार, नाही सोऽहं अनिवार
येथे काहीच ना करायाचे, नाही काही पाहायाचे
अलक्षासी सुद्धा काही, नाही नाही लक्षायाचे
मग बुवा कसे काय, पाहिजे ते साधायाचे?
ऐका आता तुम्ही सर्व, बोलणे माझे जे गमतीचे
स्वामींवरी भार घालुनि, दासा निश्‍चिंत राहायाचे
साधनांचे नानाविध, सार ते मी सांगतो की
बालकाचे जेवि कोड, माय पुरविते गोड
तेवि रिती दासाचेही, गुरुमाई पुरवि कोड
एकभावे शरणतेची, मात्र आधी द्यावी जोड
शरणतेची मोठी खोडी, येत असे ही थोडी थोडी
येता येता हळु हळु, जीवपणा मोडी मोडी
देहातील शिवपण, हळु हळु थोडे उघडी
जीवपण जैसे जाई, शिवपण उघडे होई
जैसे ज्याचे जितुके उघडी, तितुके शरण तो तो गडी
शरणतेची होता सीमा, स्वामी प्रकटे तत्कालसा
साही चक्रांचे पदर फोडी, कैवल्या नेई तो गडी
हे तो घडे अति तातडी, कारण की हीच प्राप्त घडी
ज्या वेळी प्रकटे, दास्यत्वाची परम घडी
पुरुषार्थाचे नाही काम, हे स्वामींचे कृपा दान
आता समजले ना साधन महान
डोळे मिटुनी बसायाचे, साधन आहे अति महान
अवधूताचे हे तो दान, वाटे मीच भाग्यवान्, वाटे मीच भाग्यवान्!!


साधना :-
सर्वदा सांगत अप्पा, मारु नका तुम्ही गप्पा
मग स्वामी होतील हो खप्पा, मग बोल नाही आम्हा बाप्पा
साधन सहज सुंदर, न मिळे हे वारंवार
मग का करता हो उशीर, आत्म्यावरी देहाचा भार
करे जो साधन अपरंपार, त्यावरी स्वामी हर्षति अपार
वर्षति कृपा अपरंपार, होता सहज होई भवपार!

अखंड उल्हास, देई साधकास ।
बळ साधनेस, निरंतर ॥१॥
अनुभवावीण, साधना हो क्षीण ।
मन होई खिन्न, क्षणोक्षणी ॥२॥
सद्गुरू स्मरावे, तत्क्षणीच भावे ।
मना गोंजारावे, हळुवार ॥३॥
तेणे ये उभारी, विश्‍वास अंतरी ।
साधना भरारी, घेतसे गा ॥४॥
मार्ग दीर्घ जरी, चाला येणे परी ।
नेई पैलतीरी, गुरुराज ॥५॥
साधनेचे गुज, ध्यानी घ्यावे आज ।
सांगतो सहज, कृष्णदास ॥६॥

श्री सद्गुरु विरह :-

गुरुरायाच्या आठवणीने येतो कंठ दाटुनिया
ये रे ये रे गुरुराया तू कोठे असशी धावुनिया
देव जाणण्या पूर्वसुकृते आली भेट तव घडुनिया
कृपाळूपणे अंगिकारीले तू भाव मनींचा जाणुनिया
स्वरुप तव ते अगाध अपार थकले वेदही वर्णुनिया
अवताराची महति परी तव नच दिधली तू जाणवुनिया
प्रेमळ मातेपरी चालविले तू अलगद साधनपथावरुनिया
प्रारब्धाचे फटके पडता, सावरिले मज न कळुनिया
चरणांची तव सेवा घडली नच मज ती हातुनिया
स्वरुप तव ते अज्ञालागुनि नच दिधले आकळुनिया
सदेह मूर्ती असता दिेधले नच ते प्रेमतव कळुनिया
अज्ञ बालका ज्ञान बोल तव आले नच कधी उमजुनिया
द्वादश वर्षे सहवासाच्या येती आठवणी मनी दाटुनिया
कृष्णदास हा वेडापिसा गमतो घळघळ रडुनिया!


श्री सद्गुरु महति :-

गुरुंसी सोडू नका सख्यांनो, गुरुंसी सोडू नका
जन्म जाईल फुका, सख्यांनो जन्मजाईल फुका
भवबंधातून सोडविण्यासी आला भूवरी सखा
दिले तुम्हासी साधन करण्या, तुम्ही ते चुकू नका
सच्चिदानंद स्वरुपाचा अनुभव देईल तुम्हा ते निका
मीपणाचा सुटेल बंध, वासनांचा विरेल कंद, सहजी मग तो सुखा
कृष्णदास म्हणे कळकळीचे बोलणे मज हे ऐका
शरण जाता परतीरा हो पावाल सुखा सुखा, पावाल सहजी फुका!!


गुरुबाजी :-

गुरु म्हणुनि मिरविती जगी सारे विविध संप्रदायातुनि
जाणिला आहे का खरेच देव त्यांनी स्वत: निजअंतरातुनि?
गुरुआज्ञे म्हणती करिती कार्य जनोद्धारालागुनि
उद्धार ना केला स्वत:चा काय अर्थ या बोलण्यालागुनि?
गुरु इच्छितो का कधी घात स्वशिष्यालागुनि
सांगेल मग का हे कार्य जे कारण होय पतना स्वशिष्यालागुनि
स्वत:वरील पुटे ना काढिली जी सूक्ष्मअतिसूक्ष्मातुनि
का करीता उपदेश जनांसी, वेळ मग तुम्हा केव्हा स्वत:लागुनि?
गुरुंचा देतो संदेश, गुरुआज्ञेचि, जगता केवळ या भ्रमातुनि
गुरु ना केव्हाही सहाय तुम्हा या कार्या घ्या ध्यानातुनि
ना तरलात, येत ना तरता, कशासी पडता या फंदातुनि
घात स्वत:चा अन शिष्यांचा, ना वाचाल या पातकातुनि
मी नसता कोण तारेल अज्ञ सार्‍या जनांलागुनि,
तळमळ ही केवळ भ्रामक, ना अन्य, लोकेषणेवाचुनि
कृपाळूपणे सद्गुरुंने तुम्हासी उपदेशिले अंगिकारुनि
फेडा पांग त्यांचे तुम्ही प्रथम स्वत: देवासी त्या जाणुनि
कोण कोणाचा, मार्ग कोणता, न कळेल तुम्हालागुनि
जववरी न पावाल ज्ञानासी स्वत: आत्मसाक्षात्कारालागुनि
उपदेशितो मी केवळ परी जबाबदारी सारी गुरुलागुनि
अरे! गुरु ना मिंधा कुणाचा, का सांगा करील या कार्यालागुनि?
संधी अमोल दवडिता सुटण्या जन्ममृत्यूच्या चक्रातुनि
पुढल्या अनंत जन्मांची पेरणीच केवळ निष्पन्न या गुरुबाजीतुनि
गेले गुरु, जाणार मी ही, आता चालविल कोण या संप्रदायालागुनि
विचार हा केवळ जाणा उठतो केवळ, अज्ञ त्या बुद्धीतुनि
देह त्यागिला जरी गुरुने, आत्मरुपी अमर तो, ना गेला कधी या जगतातुनि
संप्रदाय चालविण्या पेलण्या सामर्थ्य असे सारे तो बाळगुनि
जाणा व्हा अनन्य शरण त्यासी, झटा केवळ आत्मोध्दारालागुनि
कृष्णदास म्हणे नातरी उरेल अंती, दुजे ना असीम त्या नैराश्यावाचुनि!!


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *