अनाम साधक व सिद्ध महात्मे

गिरीकंदरी कडेकपारी ध्याना जे रमले, ईश्‍वरी प्रेमा जे रमले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले? त्यांचे शब्द कुणी ऐकले?
अंतरीची हाक ऐकुनि, संग सोडुनि विश्वाचा, ध्यास घेऊनि ईशाचा, मोह त्यागुनि मायेचा, जीवन कुरवंडिले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
नाव गाव ते विसरुनि सारे, आप्तजनांसी सोडुनि दुरे, एकलेचि चालले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
धुनि लावुनि वैराग्याची, धगधगीत त्या ज्वाळेमध्ये, आशा, तृष्णा, वासनांची, आहुति जे दिधले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
परतत्वाचा स्पर्श घेवुनि, ईशकृपेने, भान जे विसरले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
समाधीत जे लीन होऊनि, नित्यमग्न राहिले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
भानावरी ते येता कधी जरी, भाव स्फुरण आले, ते प्रकट ना झाले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
विश्वसंग सोडुनि चालता, ईशसंग जोडता एकटे, जे अर्ध्यावरी निमाले, जे वाटेवरी निमाले,
त्यांचे शब्द कुणी ऐकले?
विचार येता त्या जीवांचा, खडतरतेचा, त्यागवृत्तीचा, मन:पटला विचार हे उमटले,
त्यांचे जीवन कुणी जाणिले?
आज अचानक या महात्म्यांचा, आठव येता कृष्णदासा, हृदय भरुनि आले, अन् अश्रू नयनी आले,
त्याचे हृदय कुणी जाणिले??
शब्द असे जे, कधिचि ना, उच्चारले गेले, ते आसमंती विरले, जगाच्या कानी ना आले, ते आज इथे उमटले!
भावविगलित या शब्दे त्यांसी, कृष्णदासे मनोमनी नमिले,
सर्वांसी मनोमनी नमिले!!
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *