परमहंस श्री स्वामी स्वरूपानंद, पावस

जन्म: मार्गशीर्ष वद्य द्वादशी शके १८२५ (१२ डिसेंबर १९०३)
समाधी: श्रावण वद्य द्वादशी शके १८९६ (१५ ऑगस्ट १९७४ )


स्वरूप-चरित्रामृत (स्वामी स्वरूपानंद पद्य चरित्र)  PDF फाईल डाऊनलोड करण्यास वर टिचकी मारा
Please download and save to your computer and then open in Adobe Reader to see Marathi text properly.


।। स्वरूप पुतळा, प्रकटला पावसी ।। श्री स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी २०१४ निमित्त एक छोटासा लेख


|| स्वरूप सोपान सोऽहम् || श्री स्वामी स्वरूपानंद पुण्यतिथी २०१५ निमित्त एक छोटासा लेख


|| श्री स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव सोहळा || श्री स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सव २०१९ निमित्त एक छोटासा लेख


|| श्रीस्वामींचे सोsहम् बोधामृत संकलन || इ. स. २०१९ या मावळत्या वर्षास निरोप देताना व इ. स. २०२० हा नवीन वर्षारंभ करण्यापूर्वीचे सोsहम् चिंतन!


श्री बाळासाहेब उर्फ अनंत रघुनाथ करंदीकर, पुणे, यांनी प. पू. योगिनी सुमनताई ताडे, पुणे यांच्याकडे रविवार दि. २३ फेब्रुवारी २०१४ रोजी सांगितलेल्या प. पू, स्वामी स्वरूपानंद यांच्या काही आठवणी:

(PDF फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा)


** अमृतधारेतील अमृत-तरंग **

(पावसनिवासी परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या ‘अमृतधारा’ भावविलासावरील संपादन)


स्वरूप -लहरी –  परमपूज्य श्री स्वामी स्वरूपानंद यांच्या पावन स्मरणाने अंत:करणात उसळलेला प्रेमलहरींचा कल्लोळ


** श्रीस्वामींवरील काव्य **

आत्म्यातचि रमुनि नित्य, मिरविला जो आत्मतृप्त
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
सोऽहं प्रणव दीर्घ घोष, हृदयी ज्या गर्जे नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
पद्मासनी बसुनी नित्य, लक्षी चिदाकाशी नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
आत्मारामी रमुनि नित्य, जगद्भान शून्य नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
नाथपंथी योगी भक्त, हरिरुपा अभिन्न नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
गणेशनाथ गुरुकृपे, गमे जीवन कृतार्थ नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
देहाकार गमला जरी, विश्वाकार भान नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
संजीवनी समाधी गुप्त, प्रगट भक्त हृदयी नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
कोहं उठता सोऽहं बोधी, जागृत करी नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
शरण जाता कृपाहस्त, उभावुनि सांभाळी नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
स्वरूपानंदी रमुनि नित्य, भक्तां रमवी त्यात नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
ध्यानी त्या रमता नित्य, तोषोनि स्वामी अमित
कृपाबळे रमवितसे, हृदयी स्वरूपानंदी नित्य
पावसीचा स्वरूपानंद, मनी असे मी ध्यात नित्य
उपकार जाणुनिया, भावे हृदय भरुनि नित्य
पावसीचा स्वरूपानंद, कृष्णदास मनी ध्यात!
पावसीचा स्वरूपानंद, कृष्णदास मनी ध्यात!


आमचे पावस कसे सुंदर,  स्वामींचे तेथे कौलारु घर
स्वामी असती पलंगावर,  अखंड त्यांचा सोऽहं गजर
दृष्टी प्रेमळ रुप सुंदर,  कांति गुलाबी पाकळ्या सुंदर
उपदेशाचे बोल मित मधुर,  ऐकता समाधाने भरते अंतर
नसती कधिचि देहभानावर,  परमात्म्याचाचि देहात वावर
कृष्णदास म्हणे नमिता चरणांवर,  आशीर्वादरुपी देती खडीसाखर
वाटे जावे वरचेवर,  जणू आमुचे दुसरे घर!


नमस्कार महाराज स्वामी स्वरूपानंद
नाथपंथी योगिराज स्वामी स्वरूपानंद
गणेशनाथ कृपांकित स्वामी स्वरूपानंद
ज्ञानेश्वर अवतार स्वामी स्वरूपानंद
सोऽहं पूर्णबोध स्वामी स्वरूपानंद
ज्ञानभक्ति योगारुढ स्वामी स्वरूपानंद
भक्तरक्षक कृपासिंधू स्वामी स्वरूपानंद
पतितोद्धारक पावनकारक स्वामी स्वरूपानंद
सोऽहं बोध दीक्षादायक स्वामी स्वरूपानंद
तिमिरांधनाशक आत्मप्रकाशक स्वामी स्वरूपानंद
कृपांकित कृष्णदास नमितो चरणा स्वामी स्वरूपानंद


संजीवन समाधीत, बैसले ज्ञानदेव,
पावसी तेचि परि, स्वरूपानंद स्वामीराव
स्वरूपस्थितीचाही, पुसलासे तेथ ठाव,
जाणीव नेणीव लोपुनि, विश्‍वाकार झाला भाव
प्राण ठेला सहस्त्रारी, पिंड मिळाला ब्रम्हांडी,
परि विश्‍वकल्याणाची, अंतरी असे हाव
कृष्णदास म्हणे घेई, जो जो दर्शनासी धाव,
फळतसे तेथे त्वरित, मनीचा त्याचा भाव


पावसी भक्त निवास, भक्तांचा तेथ निवास
आले असती दर्शनास, स्वामी रमले अनंत निवास
करिता तेथे वास, लागे स्वामींचाचि ध्यास
कधि देखे मुखकमलास, अन् पावन पदकमलांस
भक्ता हृदयीची आस, उमटे स्वामी हृदयी खास
शिरता अनंत निवास, स्वामी दर्शन पलंगी खास
हुंगिता स्वगिर्र्य सुगंधास, पाहता प्रेमळ नेत्रकमलांस
नमिता स्वामी चरणकमलांस, भक्त विसरती जगद्भास
असे पावसी अनंत निवास, होतसे भेटी स्वरूपानंदास
कृपा भरलीसे खास, कृष्णदास अनुभवी जाता दर्शनास


स्वामी स्वरूपानंदांचा, स्वरूपानंदांचा, करा जयजयकार
पावसग्रामी हा, पावसग्रामी हा, प्रगटला अवतार
अलंकापुरीचे, अलंकापुरीचे, आले ज्ञानेश्वर
सोऽहं सोऽहं चा, सोऽहं सोऽहं चा, आकार साकार
गुलाबपुष्पाची, गुलाबपुष्पाची, कांति ही सुंदर
प्रेम करुणेची, प्रेम करुणेची, वेधक नजर
निरागस हास्याची, प्रफुल्लित हास्याची, छटा मुखावर
पलंगी बैसली, पलंगी बैसली, मूर्ति ही सुंदर
उपदेश सोऽहं चा, उपदेश नामाचा, अन् मधुर साखर
जन्ममरणाची, जन्ममरणाची, चुकेल येरझार
चला चला हो, चला चला हो, नमू चरणांवर
स्वामी भेटीसी, स्वामी भेटीसी, कृष्णदास अधीर!


भक्तांचा भाव पावसी साकार
घेतलासे तेणे स्वरूपानंद आकार
देहात त्या नित्य सोऽहं सोऽहं गजर
मुखे ॐ रामकृष्णहरि नाम उच्चार
प्रेमरुप मूर्ति दिसे पलंगावर
कृष्णदास म्हणे चला नमू चरणांवर


निराकार भगवंत झाला सगुण साकार
श्रीकृष्ण ज्ञानेश्वर तोचि स्वरूपानंद अवतार
गीता ज्ञानेश्वरी पुढे अभंग रुपांतर
सोऽहं सोऽहं केवळ परी अभ्यासाचे सार
विवेकरुपे निवाडा करा सार अन् असार
कृष्णदास म्हणे हेचि नित्य भगवंताचे उद्गार!


पावसच्या स्वामींच्या आठवणीने हृदय कालवते
मन अनंत निवासातील दृश्या आठविते
पलंगी बैसलेल्या स्वामींची छबी नजरेपुढे येते
खोलीतील पवित्र नि:स्तब्धता जागीच अनुभवते
दयाळू स्वामीकृपा आठवुनी हृदय गलबलते
भाव अनावर होउनि कृष्णदासा दाटुनिया येते


पावसी स्वामींच्या मंदिरी, शोभते कमळ समाधीवरी
उमलले पूर्ण जे अंतरी, दर्शवि जणू ब्रह्मकमळ सहस्रारी
शोभे नीलरुपी वर्णी, प्रकाश आत्मरुपाची खूणी
शिरता मी भ्रमररुपी गुणगुणी, परिमळ हुंगिता लुब्धपणी
सेविता मकरंद अधीरपणी, लाधलो स्वरूपानंद तृप्तपणी
मिटता पाकळ्या सायंसमयी, वाटे मज अडकलो ना परि
स्वरूपी निजलो मी बाळ, स्वरूपानंद कोमल हृत्कमली
रात्रभर रमता स्वरूपानंदी, सूर्योदयी मुक्त उडे मी अंबरी
परि राहतो अखंड अनंत, रमतो स्वरूपानंद हृत्कमली,
अन् स्वामी स्वरूपानंद मम हृत्कमली
अशी ही प्रेमभक्तिची खूणी, मी स्वामीभक्त वर्णी
देव भक्तांच्या अंतरी अन् भक्त देवाच्या अंतरी
दोही राहती अभेदपणी, ही स्वरूपानंद भेटीची खूणी
मी स्वामीभक्त वर्णी, मी कृष्णदास वर्णी


अमृतधारा
भूतलावरील मर्त्य लोका, कधीही न मिळे अमृतधारा
जाणुनिया स्वरूपानंदे, रचिलिसे अमृतधारा
साधकावस्थेतील साकी एकेक, बोधितसे गोष्टी अनेकानेक
वाचिता वाटे अंगावरती, उडती प्रेमतुषार अनेक
अमृताच्या वाटेवरची, प्रवासवर्णनाची धारा
सवे त्याच्या वाहत जाता, सहजी नेई निराकारा
अशी ही प्रिय मज अमृतधारा


संजीवनी गाथा
नामदेवे रचिली गाथा, तुकारामांचीही गाथा
एकनाथांची अभिनव गाथा, स्वरूपानंदे संजीवनी गाथा
साधकांची नवसंजीवनी ती, अभंग न केवळ पथदर्शक ती
निराकारातुनी साकारली ती, ज्ञानभक्तियोग आकारली ती
भाव मनींचा फुलवितसे ती, प्रेमभक्तिचा बोध करी ती
भेटे स्वरूपानंद वाचिता, म्हणुनि मी ती नित्य वाचिता
तेणे स्वरूपानंद तोषिता, स्वरूपानंद मज झाला अर्पिता


अभंग ज्ञानेश्‍वरी
ज्ञानेश्वरे रचिली ज्ञानेश्वरी, भगवद्गीतेवरी टीका न्यारी
वाचिता लोका आनंद न सरी, घडली ही कथा साडेसातशे वर्षांपुरी
मग त्यांना वाटले गावे ज्ञानेश्वरी,  तेणे अवतरला तो पावसी स्वरूपानंदापरी !
भाषा केली सुलभ अन् रसाळ, भावार्थ तोचि परी
परमार्थ सोपान गोड केला येणे परी
वाचिता आज ती लोका आनंद न सरी, पोटी आनंद न सरी

अभंग ज्ञानेश्‍वरी
धन्य स्वामीराव । जाणे भक्त भाव । करी तो उपाव । उद्धारासी ॥१॥
बैसोनि पावसी । पावतो भक्तासी । साधन मार्गासी । दावितसे ॥२॥
ज्ञानोबारायाने । कथिली साधने । भाषा आकळणे । दुर्बोध ती ॥३॥
तोचि बोधप्रद । सर्व अनुवाद । रसाळ वरद । साधकांसी ॥४॥
शब्द अर्थपूर्ण । भावभक्तिपूर्ण । रसस्वाद पूर्ण । आपेआप ॥५॥
शब्दांचा आकार । स्वामी हळूवार । स्वरूप साकार । आकारिले ॥६॥
शब्द सेविताची । गोडी अमृताची । लाभ आयताचि । भक्तां घडे ॥७॥
नाही गाभा साल । काय ते टाकाल? । संपूर्ण केवल । ज्ञानरूप ॥८॥
*कर्ण नेत्र तृप्त । रसने करीत । इंद्रिये समस्त । सुखावती ॥९॥
स्थान-काल-स्थिती । देहाची विस्मृति । सुखद ती प्राप्ति । अनायासे ॥१०॥
सुखडोहा याचि । नित्य डुंबतचि । रहावे हे याचि । कृष्णदास ॥११॥
(*ऐकताना वाचताना) – ५-८-२०१८


अभंग अमृतानुभव
आत्मानुभवाचे अमृत, पाझरले अमृतानुभवी
ज्ञानेशाच्या त्या अनुभवी, स्वरूपानंदे अभंग अमृतानुभवी
प्रचलित मराठीत, भरिला कुंभ त्या अमृती
लाभता त्यातील अमृतबिंदू, चवी येते स्वरूपानंदू


चांगदेव पासष्टी
ज्ञानदेवे केला बोध चांगदेवा,
ओव्यात केवळ पासष्टी
चौदाशेच्या वडील योग्या उपदेशिले,
शोध घ्यावा स्वरूपाचा द्वारे सोऽहं दृष्टी
‘नामरुपाविण’ चांगदेव जो का,
शोध घेई ‘त्याचा’ सत्वर निका
अनुभव घेई ‘त्या’ सच्चिद्रुपा,
स्वानंदी त्याच्या हो परिपूर्ण मुका
स्वसंवेद्य स्वयंसिद्ध आत्मवस्तू जी का,
आशीर्वाद अर्पिला येण्या त्याचा अनुभव निका
स्वरूपानंदे केला अनुवाद अभंगी,
अद्वैताच्या दुर्बोधी सुलभ,
वाचिता येई अनुभव आत्मरुपी अभंगी


ह्या स्वरूपानंदांचे मजवरी किती हो ते उपकार,
मजवरी किती हो ते उपकार ॥
पावसग्रामी तो हा राही, सोऽहं सोऽहं अखंड गाई
समाधी त्यांची संजीवनी बाई, ती तर भक्तांसाठी आई
सोऽहंची ती नित नवलाई, प्रकटली भक्तांसी साचार,
त्यांचे वर्णू किती हो उपकार ॥
निवृत्तिची ती नीर् वृत्ती, ज्ञानेशाची अभिनव भक्ति,
मुक्ताईची करुणा साची, वाटे एकवटली साचार,
पावसी स्वामींचा आकार ॥
बैसला जरी मांडुनि ठाणी, गमन हो त्यांचे ब्रह्मांडातुनी
भक्त संकटी पडला पाहुनि, क्षणात घेई उडी हो झणी
वरदहस्त तो अखंड मजवर, वाटे कायमचा मी ऋणी ॥
दर्शन होता त्यांचे भावे, डोळ्यां आसवे दाटली झणी,
वाटे कायमचा मी ऋणी, कृष्णदास कायमचा हो ऋणी!


आनंदकंद माझा स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद
पावसी रमला गोविंद, माझा स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद
गणेशनाथे खूण दाविता, घेतला सोऽहं चा छंद,
माझा स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद
कृष्णदासा स्मरणी हृदयी, आनंदीआनंद,
माझा स्वरूपानंद, स्वामी स्वरूपानंद!!


श्री स्वरूपानंद स्वामी, आलो शरण तुम्हा आम्ही
राहसी पावसी ग्रामी, भक्तां हृदयी विश्रामी
सोऽहं गर्जसी घोष नामी, अहम् नाशिसी नुरविसी मी मी
कृष्णदासा प्रिय अति स्वामी, होता झाले अति हे नामी
प्रसन्न होऊनिया श्री स्वामी, आशीर्वाद अर्पिला नामी


पावस में बैठा नाथ स्वरूप,
चिन्मय है उसका रुप
अंतर में चलत सोऽहं ध्वनी,
दशदिशाओंमे गर्जे वो ध्वनी
कृष्णदास जब ध्यान दिया,
क्षण में हो गया अमनी


चला काकडयासी जाऊ, सोऽहं काकडा लावू
अहं तेजे त्या जाळू, सोऽहं बोधे ओवाळू
स्वामींसी जागवू, स्वरूप नवनीत देऊ
प्रसाद त्याचा तो हा घेता, स्वरूप गोडी की हो चाखू
तेणे तृप्त होता होता, अखंड स्वरूपीच राहू,  अखंड स्वरूपीच राहू


पावसच्या मंदिरी, घोष राम कृष्ण हरि
तेणे तुष्टतो हरि, वास नित्य तेथ करी
भक्त येती वरचेवरी, सोऽहं ध्यान मंदिरी
स्वामी लीला करिती न्यारी, स्वरूप अनुभववति अंतरी
त्याचसाठी तो कैवारी, ज्याची स्वरूपावरती स्वारी
करुनी सोऽहं हुंकारी, भक्तां बोधितो सत्वरी
कृष्णदास शरणागत तत्परी,
त्या स्वरूपानंदांवरी,  स्वामी स्वरूपानंदांवरी


जाऊया स्वामींच्या पावसीऽऽ, जाऊया स्वामींच्या पावसीऽऽ
ऐकुया मंजुळ वाणीसी, दर्शनी धन्य नयनांसी
ऐकुया सोऽहं घोषासी, अनुभवुया तोचि अंतरासी
भेटूया स्वरुप निजस्थितीसी, विसरुया देहभावासी
कृपांकित कृष्णदासासी, ओढ नित्यचि पावसी


नेले स्वरूपाने मजसी, अचानक दर्शना पावसी
रंगपंचमी उत्सवासी, लाभ समाधी पूजनासी
तेणे हरखलो मानसी, स्वरूपानंदी कृपेसी
झाल्या अल्पबुद्धी मजसी, बोबडया काव्यस्फुर्तीसी
तोषले स्वामी हो मजसी, येई विचार मज मानसी
स्मरता शुद्ध भावेसी, देव तोषतसे तत्परतेसी
ही प्रचित त्याची मजसी, मी धन्य धन्य मानसी
पावसी कृपाछत्र मजसी, लाभ स्वरूपानंद मजसी
मी धन्य धन्य मानसी, शरणांगत स्वरूपानंद स्वामींसी


माता बाळा देई खाऊ, बाळ माते अर्पी खाऊ
कृतीस शुद्ध पाहुनि, तोष मातेस किती पाहू
तेचि परी झाले मजला, स्वामी मजवरी तोषला
काव्यप्रसाद मजसी दिधला, तो खाऊ मजसी गमला
काव्यरुपे परत मी दिधला, शुद्ध भावे जो सजला
लेवुनि स्वामी अति तोषला, स्वरूपानंदी गोड अति हसला
सोहळा रंगपंचमी शोभला, कृपेने स्वरूपानंदी मी असे हा रमला


शुद्ध भाव मज मनी उमटले, पावसी स्वामी अति गहिवरले
बोलावुनि पावसी, निजकुशीत मज घेतले
कोमल कृपाकरा फिरवुनि, सर्वांगे पावन केले
उबदार स्पर्श मायेचा, होता मी गहिवरलो
घेऊनि कृपा परतता, मी स्वरूपानंदी नाचलो!


वाटे उडुनिया सत्वर शिरावे माऊलीच्या कुशीत
ऐसीच असे संताच्या प्रेमाची रीत
घेती करुनिया आपुलेसे पहिल्याच भेटीत
लळा लाविती जीवा ऐसा वाटे भेटावे वारंवार मनात
खातापिता उठता बसता, नयन उघडिता अन्‌ ते मिटता, जागृति स्वप्न सुषुप्तीत
ध्यानी मनी अखंड मूर्ती दिसे क्षणाक्षणात
विरहभाव तो मनी दाटुनिया अश्रू नयनी येत
आवरिता हो कैसे त्यासी येईल, सांगा कुणी त्वरित!
कळवळा पोटीचा उपदेशितसे अखंड ते हित
संसाराच्या मायेतुनि सुटुनिया जीवे रमावे ब्रह्मात
नमस्कारिता अनन्यभावे शिरी पडे आशीर्वाद हात
कृपाकटाक्षे क्षणात होतो सहजी शक्तिपात
जीव नव्हे मी ब्रह्मचि होय उठे जाणीव हृदयात
संतरुपे ईश्‍वरचि केवळ कार्य असे हे करीत
स्थल काल अन् जाई जीवाचा स्व: ही विस्मृतीत
हीच हीच ती संत भेटीची किमया अन गंमत!
स्वरूपानंदरुपे पावसग्रामी ब्रह्मचि ते नांदत
अनन्यभावे भेटुनिया धन्य कृष्णदास कृपांकित!!


स्वरूप माऊली माझी उदार प्रेमळ
बाळ अंतरीची जाणे तळमळ
आस त्याची पुरवाया पोटी कळकळ
बाळमुखी भरवीतसे प्रेमभरे कवळ
कृष्णदास माऊलीचा बाळ लडिवाळ
प्रेम आठवोनि होई अंतरी घायाळ


स्वामी स्वरूपानंदांचा, स्वरूपानंदांचा, करा जयजयकार
पावसग्रामी हा, पावसग्रामी हा, प्रगटला अवतार
अलंकापुरीचे, अलंकापुरीचे, आले ज्ञानेश्वर
सोऽहं सोऽहं चा, सोऽहं सोऽहं चा, आकार साकार
गुलाबपुष्पाची, गुलाबपुष्पाची, कांति ही सुंदर
प्रेम करुणेची, प्रेम करुणेची, वेधक नजर
निरागस हास्याची, प्रफुल्लित हास्याची, छटा मुखावर
पलंगी बैसली, पलंगी बैसली, मूर्ति ही सुंदर
उपदेश सोऽहं चा, उपदेश नामाचा, अन् मधुर साखर
जन्ममरणाची, जन्ममरणाची, चुकेल येरझार
चला चला हो, चला चला हो, नमू चरणांवर
स्वामी भेटीसी, स्वामी भेटीसी, कृष्णदास अधीर!


पावसच्या दिंडीत मुखे वारकर्‍यांचा गजर
स्वरूपानंद स्वामींचा करती जयजयकार
दिंडया पताका टाळ थाप मृदुंगावर
वाजत गाजत नाचत वारकरी हो अपार
ॐ रामकृष्णहरि सवे होय गजर
ध्यानी मनी स्वामी हृदयी आनंद अपार
नाचत उधळत गुलाले भरले अंबर
भक्तिभावे न्हाले भक्तांचे अंतर
समाधीत स्वामींसी भाव अनावर
उठोनिया पालखीत होती ते साकार
हालत डोलत पालखी घेऊनि खांदयावर
कृष्णदास भोई तेथ चाले हळुवार!


नववर्षाच्या स्वागतासी चला पावसी जाऊ |
स्वरूपानंद स्वामीराया नमन भावे करु ॥
सुहास्य सुंदर रुप स्वामींचे पलंगावरी पाहू |
चरणकमली नत होऊनिया धन्य चला या होऊ ॥
सोऽहं गजर ध्वनी ऐकुनि श्रवणी तृप्त होऊ |
सहस्त्रारी स्थित करुनिया उन्मन त्वरित होऊ ॥
स्वामीसंगे या या सारे ब्रह्मानंदी डोलू |
अखंड अविरत सदा सेवाया चला स्वामींसी प्रार्थू ॥
नववर्षाच्या प्रथमदिनी या कृपाशीर्वादे न्हाऊ |
स्मरणी कृपेच्या स्वामीगुण हो निशिदिनी क्षणक्षण गाऊ ॥
देहाने ना शक्य जरी अजि मनानेच या जाऊ |
कृष्णदास आसनस्थ हृदयी स्वरूपानंद ठावू ॥


स्वरूपानंद स्वरूपानंद माय माझी स्वरूपानंद
भेटिताचि होई मजला, क्षणात किती तो परमानंद
स्वरूपासी मुकलो जो मी, विषयातचि झालो धुंद
सोडवितो जो दृष्टीक्षेपे, भेटवितो जो स्वरूपानंद
परदेशी झालो पहा, मुकलो मी स्वरूपानंद
कोऽहं कोऽहं रडता जो मी, अर्पी सोऽहं बोधानंद
कृष्णदास तान्हुला हा, माय त्याची स्वरूपानंद
पावसग्रामी जातो नित्य, भेटीसी त्या स्वरूपानंद


आम्ही निरंजनीचे रहिवासी, आम्ही निरंजनीचे रहिवासी
ध्यातो पावसीच्या स्वामींसी, ध्यातो पावसीच्या स्वामींसी
गर्जितो सोऽहं मंत्रासी, लक्षितो नित्य अलक्षासी
श्री गुरुदत्त जय अलख निरंजन, मंत्र गुणगुणतो मानसी,
नित्य गुणगुणतो मानसी
स्वरूपानंदी दत्तकृपेच्या रमतो छायेसी, कृष्णदास रमतो छायेसी


निराकार भगवंत झाला सगुण साकार
श्रीकृष्ण ज्ञानेश्वर तोचि स्वरूपानंद अवतार
गीता ज्ञानेश्वरी पुढे अभंग रुपांतर
सोऽहं सोऽहं केवळ परी अभ्यासाचे सार
विवेकरुपे निवाडा करा सार अन् असार
कृष्णदास म्हणे हेचि नित्य भगवंताचे उद्गार!


स्वामीसंगे सोहम् रंगे रंगुनिया जाऊ
स्वरूपानंदी रंगुनिया स्वरूपानंद गाऊ ॥
‘मी’पणाचा ठाव नि:शेष हा जाळू
स्वामी नाम ज्योत सर्वांगी ती उजळू ॥
स्वामी बोध प्रकाशात वाट सारे चालू
स्वामी पुढे वाटाड्या, मागे हळू हळू चालू ॥
ऋद्धि सिद्धि प्रसिद्धीचे फाटे, त्यासी ना ते भूलू
ध्येय लक्ष्य अचूक, त्याची वाट ना ती सोडू ॥
कृपासागरू स्वामी माझा, त्यासी ना ते विसरू
कृष्णदासा अढळ विश्वास, स्वामी पावविती, सुखे पैलपारू ॥


स्वरूपाचा छंदऽऽ, ना होवो कधी मंद
स्वामीचरणी मागणेऽऽ, मागू हे अखंड ॥
विरुनिया जावोऽऽ, ‘मी’पणाचा बंध
वृत्तींचा होवोऽऽ, प्रवाह तो बंद ॥
जळोनिया जावो विषयऽऽ, वासनांचा कंद
अभावी त्या स्वरूपानंदऽऽ, ना प्रवाह हो मंद ॥
क्षणोक्षणी होऊऽऽ, आनंदा त्या धुंद
धुंदीत त्या नाम गाऊऽऽ, ‘स्वामी स्वरूपानंद’! ॥


स्वामी समाधि स्मरण
भूतलावरील ध्रुव तारा आज अचानक निखळला,
हृदयी अश्रूपाट वाहिला …
अज्ञान साम्राज्य पाहुनि जणू ज्ञानसूर्य प्रकटला, तो लुप्त आज जाहला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
कोहम् रुदन ऐकुनि सोहम् अंगाई नित गाईला, ध्वनि श्रवणी, येईना जाहला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
हास्यभरित मुखकमला भक्त आज दर्शनासी मुकला, अभावी हृदयी कोमेजला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
आशीर्वाद हस्त जेणे अखंड असे उभविला, तो दिसेना जाहला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
विगलित काया दु:ख साहुनि जन उद्धारा झटला, करुणेचा सागर जणू आटला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
दु:खी जीवा, सत्साधका आधार आज हरपला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
देवचि जणू हा मानवरुपे पावसी विहरला, तो गुप्त आज जाहला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
ज्ञानेशचि स्वामीरूपे भूतळी अवतरला, तो आज समाधिस्थ जाहला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
खोळ सांडुनि देहाचि जरी विश्वाकार जाहला, सगुण रुपा जन सारा मुकला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
पलंगी नित्य मूर्ती पाहता मनी जो तोषला, रित्या खोलीत आज, प्रवेशाया ना धजला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
‘स्वामीऽऽ स्वामीऽऽ’ मूक वाचे भक्तवृंद विव्हळला, हृदयी अश्रूपाट वाहिला …
स्वामी स्मरणी वियोगाचे दोनच अश्रू, कृष्णदास नयनी ओघळला, जरी हृदयी अश्रूपाट वाहिला, जरी हृदयी अश्रूपूर लोटला …


संतांच्या चमत्कारांकडे सहजीच लक्ष जात
परि त्यांची ‘अतिमानवता’ ना येतसे सहजी ध्यानात ॥
साधेपणा विनय विनम्रता करुणा प्रेम गुरुभक्ति
ब्रह्मपद तदाकारता सर्वकाळ, सदा निरहंकार वृत्ती ॥
प्रसन्नता काय वर्णावी निरंतर, अन् समता व्यापिली जी चित्ती
तळमळ जन कल्याणाची अखंड, परि अनाग्रही वृत्ती ॥
ऋद्धि सिद्धि फिकी ज्यापुढे ऐसी ही दैवी गुणसंपत्ति
एकेक गुण आंगवाया जन्मोजन्म जाती! ॥
गुरुभक्ति – साधनेचा संत निरंतर उपदेश करिती
ज्यामुळे लाधलीसे त्यांसी, ही दैवी गुण संपत्ति ॥
संतांच्या वसतिस्थानी, स्पंदने त्यांची, अजूनही फिरती
पावसी जाता कृष्णदास ‘नित्यचि’ अनुभवति! ॥


ऐसा स्वामी होणे नाही युगायुगातुनि
ढळली नाही वृत्ती ज्याची ब्रह्मपदावरुनि ॥
सोऽहम् भजुनि कोऽहम् त्यजुनि तेही उल्लंघुनि
विश्वोऽहम् च्या विराट स्थितिते राही अनुभवुनि ॥
जाता जाता फिरे मागुता करुणा किति ती मनी
नाथपंथीचा गोरक्षचि जणू, आला हा अवनी,
आला आला पावसवनी ॥
ईश्‍वरी संपत्ति गुणविशेषणे घ्या सर्वचि ती ध्यानी
लावुनि पाहता कुठेचि तेथे गमे ना रे उणी ॥
कलियुगातही स्वामीपदाला सार्थ सार्थ भूषवुनि
अल्लख निरंजन घोष गर्जुनि, वसला नित्य निरंजनी ॥
चिमुकल्या खोलीत वास परि असे विश्व व्यापुनि
समाधीत जरी वास आज परि असे ती संजीवनी ॥
भेट ना परि येई जरी तो एकवार स्मरणी
क्षणीच झाला जीव तो झणी कृपावंत तत्क्षणी! ॥
पहा खूण ती, घ्या नयन घ्या, क्षणभरी ते मिटुनि
स्वामी करितसे नित्य वृष्टी कशी दिसते ना अमृतदृष्टीतुनि ॥
भक्त-अभक्ता मनी तरंग सहजीच जाणुनि
कृपावंत तो देत असे रे, घ्या, झोळी अपुली उघडुनि ॥
पावसीचा हा स्वामी माझा, स्वरूपानंद मुनि
कृष्णदास हृदय स्मरणी, प्रेमे नित्य येत भरुनि,
गर्वे नित्य येत फुलुनि ॥
बाळ वंदना स्वामीराया घेई स्वीकारुनि,
छत्र कृपेचे रहा असे रे आम्हावरी उभवुनि,
नित्य आम्हावरी उभवुनि ॥


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *