श्री दत्त चिले महाराज, कोल्हापूर

दत्तगुरुंची वाडी पैजार, चिले महाराज तेथ अवलिया थोर
शिवपिंडीचा सुंदर आकार, समाधी आत बैसले गुरुवर
कूर्मपृष्ठाचे तेथ अंबर, कृपाछत्र असे उभविले थोर
कवच टणक अति अपार, प्रारब्धाचा त्यावरी न चले जोर
घ्या आसरा अन आधार, कापेल काळही जणू थरथर
पोशितसे कासवाची नजर, जाता शरण पदकमलांवर
चला चला हो वाडीसी सत्वर, घ्या हो घ्या हो दर्शन सत्वर
कोट टोपी पायी विजार, अवधूतचि हा झाला साकार
दत्तगुरुंची असे किमया थोर, आशीर्वाद तुम्हा त्वरित अपार
कृष्णदास गाठी वाडी पैजार, प्रारब्धा ना उरला थार
महाराजांची कृपा अपार, आनंदा ना पारावार!!


आले आले महाराज चिले, पैजारवाडीसी दर्शन दिले
कोट टोपी पायजमा शोभले, चरणांगुष्ठांसी मी स्पर्शिले
‘असू दे, असू दे’ मृदु बोलिले, मागील द्वारी निघुनि गेले
अस्तित्वाची प्रचित दाविले, घडता आनंदे मन भरले
कृष्णदासे महाराजा प्रार्थिले, तात्काळ दर्शन असे घडले


ॐ दत्त चिले, ॐ दत्त चिले,
मंत्र हा अखंड, जपा तुम्ही भले
नामात प्रेम, वाढेल कले कले,
स्मरणेचि भरतील, नेत्र अश्रुजले
सद्गदित कंठे त्या, स्मरता श्री चिले,
प्रसन्न होऊनी प्रगटतील तुम्हा, सामोरी ते भले
अनन्य भावासी केवळ, असती भुकेले,
सेवाया तोचि घेतला, अवतार धरातले
नयनी ही मूर्ती, ध्या तुम्ही भले,
मुखी हास्य हृदय नेत्र, करुणे ओथंबले
जे जे जीव हृदयी हा, मंत्र गर्जले,
मंत्र न केवळ ठरली ती, कवच कुंडले
इहपर सौख्य सर्व, त्यासी लाधले,
प्रसन्न झाले त्यावरी, महाराज श्री चिले
कृष्णदास जपतो नित्य, ॐ दत्त चिले,
तोषोनि अनंत आशीर्वाद देती, महाराज श्री चिले


ॐ दत्त चिले मंत्र पंचाक्षरी
दुजा कुणा मंत्रा नाही याची सरी
सामर्थ्ये भरला असे अपारी
अनुभव त्याचा घ्या आपुल्या अंतरी
म्हणा मंत्र हा तुम्ही वैखरी
इडा पिडा टळती सर्व क्षणाभीतरी
ॐ असे आदि बीज, दत्त तो मोक्षकारी
प्रगटला श्री चिले रुपे, अंबेच्या कोल्हापुरी
जपा नाम जववरि न, उठे रोमरोमावरी
होता ऐसे पहाल मूर्ती, उभी सामोरी
कृपा असे महाराजांची, कल्पवृक्षापरी
लाभेल ज्या, भाग्या त्याच्या, नाही हो सरी
कृष्णदास जपे नाम, नित्य हृदयांतरी
प्रगटले महाराज अन् कृपा, केली अपारी


म्हणा ॐ दत्त चिले, एकभावे भले
महाराज करतील तुमचे, सर्वचि भले
नाम घेता अंतरी, जे का कळवळले
प्रारब्ध भोग त्यांचे, सर्वचि टळले
नाम मुखी ज्यांच्या, सदा हे रंगले
वाटे जणू त्यांचे, पुण्यचि फळले
महाराज त्यावरी अपार, कृपा हो वर्षले
आत्मानंदे त्यांचे, हृदय हो भरले
कृष्णदास जपतो नित्य ॐ दत्त चिले
म्हणा सवे तुम्ही सर्व ॐ दत्त चिले


भक्तजना अंतरी, दत्तप्रेम दाटले
करवीरी तेचि, प्रेमरुपे प्रगटले
अवतारे अवलिया, रुप घेतले
अवधूत प्रगटले, नामे श्री चिले
उन्मनीत जे, अखंडचि हो रमले
अकल्पित कृपा त्यांची, किती हो लाधले
बाह्यांगे जमदग्नि, रुप जरी धरिले
करुणा अन् प्रेम, अंतरी असे भरले
करुणेने हृदय, जेव्हा जेव्हा ते द्रवले
कृपे त्या अनंत, संकटी हो तरले
ॐ दत्त चिले म्हणता, क्षणातचि तुष्टले
स्मर्तुगामी दत्तासी, कृष्णदासे पाहिले!


आरती
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
रुप अवधूत दत्त चिले, करवीरी दत्तचि अवतरले ॥१॥
प्रेम अंतरी स्मरता रुप, पुढे उभे ठाकले
भाव भक्तिची प्रेमळ मूर्ती, हास्य मुखी शोभले ॥२॥
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
नाम कृपाळू स्मरता दत्ताचे, अंतरी प्रेम उदित झाले
रुप पावन दर्शन घडता, देहभान हरपले ॥३॥
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
दत्ताची ही किमया न्यारी, मी तू पण नेले
एकभावे प्रणाम करता, एकरुप केले ॥४॥
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
गाता भक्त, दाता दत्त, मज चरणी ठेवा प्रार्थिले
कृपेसी उणे नच गमले, त्वरितचि आशीर्वच दिधले ॥५॥
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥
कृष्णदास प्रार्थिता बालके, प्रसन्न, झाले दत्त चिले
सदेह अवधूत दर्शन घडता, चरणकमल नमिले ॥६॥
करुया आरती दत्त चिले, करुया आरती दत्त चिले ॥धृ॥


ॐ दत्त चिले जय दत्त चिले,
भजनी मनुजा रमा भले
दत्तगुरु अवतार चिले,
शरण जाता त्यांसी भले
धरिले जरी तुज विषयव्याळे,
क्षणात सुटका करिती चिले
बद्ध जिवाला मोक्ष अर्पिण्या,
अवतरले श्री दत्त चिले
नित स्वानंदी उन्मनी रमले,
रमवितील ही तुम्हा भले
आनंदा त्या नित्य रंगुनि,
करा भजन हे तुम्ही भले
ॐ दत्त चिले जय दत्त चिले,
कृष्णदास भजनी रमले


गुरुंच्या नामात व्हा धुंद, चिलेंच्या नामात व्हा धुंद
मिळेल तुम्हा अपार आनंद, मिळेल अखंड स्वानंद
चाखा की हो नित्य तो मकरंद, विरेल मग वासनाकंद
घेता तुम्ही हाचि एक छंद, अंती तुम्हा भेटेल गोविंद
कृष्णदासा लागला हा छंद, झाला चिले नामी धुंद!


चला जाऊ पैजारवाडी, चला जाऊ पैजारवाडी
चला चला करा तुम्ही तातडी, घ्या सवे सारे सवंगडी
भवसागर जरी दुस्तर गमला, सहजी पावाल पैलथडी
सागर खोली पाहुनी भ्या ना, घ्या तुम्ही निश्चिंतपणे उडी
सद्गुरू सोइरा बैसला तेथे, महाराज श्री दत्त चिले नावाडी
नाव गुरुंची अतिशय तगडी, छत्र कृपेचे त्यावरी उघडी
अनंत संकटे वादळे घडीघडी, तरी काहीच ना ते बिघडी
दयाळू प्रेमळ कुशल नावाडी, सर्वचि चिंता तुमची दवडी
योगक्षेम काळजी तुम्हा, ना स्पर्शेल कदापि घडी
दत्त चिले पावन नामाची, चाखा तुम्ही ही गोडी
नामाच्या स्वानंदी रमता, सरेल आनंदे प्रत्येक घडी
नामाचा त्या करिता धावा, अंगिकार करील तेचि घडी
अंगिकार दत्ताने करिता, प्रवास सुखमय जीवन घडी
कृष्णदास गडी श्रीदत्ताचा, म्हणे चुकवू नका ही घडी


आली श्री दत्त चिलेंची स्वारी, आली श्री दत्त चिलेंची स्वारी
कोट पायजमा टोपी शिरी, महाराज अखंड उन्मनीवरी
दृष्टी कृपाळु अति भारी, शोभले हास्य श्रीमुखावरी
नमिता पावन चरणांवरी, अर्पिती आशीर्वाद सत्वरी
वाचा प्रेमळ मधुर अपारी, हर्ष फुलला अति अंतरी
पैजारवाडीची, झाली सफल ती वारी, कृष्णदासे देखिली श्रींची स्वारी


भजा अवधूत अवधूत, चिले महाराज दत्त
कृपा त्यांची हो अमित, कृपाळू साक्षात दत्त
हृदयी ध्याती जे भक्त, भाग्या नाही त्या अंत
कृष्णदास भजे श्रीचिले संत, लाभला कृपा अनंत


वाडी पैजार कृपा अपार, बैसले तेथे चिले गुरुवर
कोट पायजमा टोपी शिरावर, अवधूताचा सुंदर अवतार
ब्रह्मांडनायक शक्ति अपार, सत्ता गाजते त्रिभुवनावर
अनंत जन्मींचा सखा गुरुवर, करील तुमचा अंगिकार
भाव एकचि पूजेचा आधार, अन्य ना तेथे काहीच प्रकार
धावा धावा तुम्ही वाडी पैजार, शरण झडकरी जा चरणांवर
कृष्णदास म्हणे ऐका एक वार, जन्ममरणाचा चुकेल फेर


गाठा वाडी पैजार, करा नामाचा गजर
ॐ दत्त चिले जय दत्त चिले, ॐ दत्त चिले जय दत्त चिले
अवधूताचा अवतार, वसे तेथे श्री शंकर
कासवाची त्यांची नजर, पोशेल तुम्हा जन्मभर
जन्माअंती गुरुवर, देईल मोक्ष सत्वर
नाही चिंता तिळभर, जाता वाडी पैजार
कृष्णदासाची हाक अपार, ऐकोनिया तुम्ही घ्या सत्वर


दत्त चिले नामाची, काय वर्णू मी गोडी त्याची
रसना थकेचि ना घेताचि, पुलकित स्थिति होते हृदयाची
लोपली जाणीव निशिदिनीची, अखंड माळ फिरे जपाची
ही कृपाच दत्त चिलेंची, माधुरी दाविली मज नामाची
कृष्णदासे चाखिली साची, असे अनुपम चवी हो त्याची
म्हणे घ्या अनुभव एकदाचि, मग रमाल त्यात नित्यचि


करा करा नामाचा घोष, होइल श्री दत्तांसी तोष
धरिला त्याने मनुष्यवेष, राहिला पैजारवाडीस
स्वानंद भान नित्य ज्यास, ना कधी देहभानास
नामे त्वरित तुष्टतो खास, नामजपे तोषवा तुम्ही त्यास
ॐ दत्त चिले खास, मंत्र जपतो कृष्णदास


घडता स्मरण श्री दत्त चिले, होती नयन मम हे ओले
प्रेमस्वरूप श्री दत्त चिले, माता हृदयचि जणू कोमले
दु:खिता पाहुनी कळवळले, अमाप करुणे जे भरले
निजकृपा अखंड वर्षले, जरी ते उन्मनीत रमले
आज कुठे असे ते लपले, नयन शोधुनिया हो थकले
आम्हासी जरी अंगिकारिले, प्रेम अवचित कां आटले
सांगा अमुचे काय चुकले, रुप सगुण तुम्ही लपविले
बाळ अपराधी चुकले, माता हृदय कधी कोपले
जगणे उदासवाणे झाले, न दिसता तव पाऊले
मृतींचे मेघ मनी दाटले, मनीचे भाव अनावर झाले
कृष्णदास हृदय आक्रंदले, चरणी वाहिली अश्रूफुले


गुरुराया मज दावा तव पाऊले, गुरुराया मज दावा तव पाऊले
स्वर्गलोकींच्या सुरवरा वंद्य जी, पावन चरणकमले
हरिद्राकुंकुम वाहुनिया वरी, अगणित भक्ते जे पुजिले
मस्तक ठेवुनी नमिता त्यावरी, कितिक ते उद्धरिले
भक्तांसाठी फिरता निशिदिनी, ना थकली जी पाऊले
कृष्णदास तुज करी प्रार्थना, ऐका देवा, महाराज श्री दत्त चिले


कोण जाणे करुणा गुरुरायाची, येते मज आठवण चिले महाराजांची
अवतार मूर्ति अवधूताची, कधी कधी दाविली नृसिंहाची
हरिद्राकुंकुम चर्चित चरणांची,  फुले सजविल्या कर्णांची
हास्यभरित मुखकमलाची, अन् क्षमापूरित नयनांची
दर्शना सामोरी जाताचि, वदति वाणी आशीर्वादाची
कोमल प्रेमळ मधु शब्दांची, कर्णी गुंजते वाणी त्यांची
स्मृतीत मूर्ति ही गुरुंची, निशिदिनी देते आठवण साची
पैजारवाडी रमले निवांतचि, कृष्णदास आठव नित्यचि


चिले माझा दत्ताचा अवतार, चिले माझा दत्ताचा अवतार
मजवरी त्यांची कृपा अपार, मजवरी त्यांची कृपा अपार
भावाचा भुकेला गुरुवर, नलगे अन्य तो उपचार
ॐ दत्त चिले नाम, त्याचा करा तुम्ही गजर
दु:खी दीनांचा ऐकुनि धावा, संकटी घेई उडी सत्वर
करवीरी केल्या लीला अपार, अंती रमला वाडी पैजार
अवधूत दयाळु कृपाळु अपार, कृष्णदासा लाभली कृपा अपार


ॐ दत्त चिले सोंऽहं, नाम जपना तुम ये हरदम
कृपा उसकी पाओगे जब, भूल जाओगे अपना अहम्
अवधूत का अवतार वो, आपके खातिर लिया जनम
नाम जपे जो उसका निशिदिन, चलेंगे साथ कदम कदम
जीवन की सब दु:खमय घडी, मिटा देंगे तुम्हारी सनम
खुशियोंं की बौछार होगी, शरण जाओगे जब सनम
असीम कृपा बरसाएंगे, साथ न छोडेंगे जनम जनम
ॐ दत्त चिले सोऽहं, कृष्णदास जपे हरदम


निशिदिनी उन्मनीत रमले, महाराज चिलेंसी मी नमिले
दयेची मूर्ति जे शोभले, महाराज चिलेंसी मी नमिले
भक्त संकटी जे धावले, महाराज चिलेंसी मी नमिले
भक्त कल्याणा निशिदिनी जे फिरले, महाराज चिलेंसी मी नमिले
कृपा आशीर्वाद नित वर्षले, महाराज चिलेंसी मी नमिले
भक्तां प्रेमरुपचि गमले, महाराज चिलेंसी मी नमिले
दर्शनी भक्त हृदय वेधले, महाराज चिलेंसी मी नमिले
अवतार दत्तचि कि हो भले, महाराज चिलेंसी मी नमिले
पावन चरणकमल नमिले, जीवन धन्यचि हो गमले


ॐ दत्त चिले सोऽहं, अंतरात उठे नाम
घेता त्याचे नित्य भान, अन्य विचारा त्वरित विश्राम
दशेंद्रिया विषय ना आन, दत्तपिसे लागेल जाण
सगुणात अखंड रमाल जाण, अंती गाठाल निर्गुण धाम
अतिसुलभ उपाय अन्य ना आन, कृष्णदास वाहतो आण


गुरुदेव दत्तपायी, माझे मन रमले
येवोनिया सामोरी, श्री दत्त चिले ठाकले
समाधिस्थ जरी झाले, सदेह ते दिसले
अहो भाग्य माझे, मी चरणांवरी नमिले
आशीर्वाद मजसी, न कळे काय दिधले
आनंदे त्या माझे, मन की हो भरले
अकल्पितचि हे, पहा कसे घडले
जाता पैजार वाडी, दर्शन असे घडले
अवधूतासी काही, अशक्य ना कळले
कृष्णदासे तुम्हांसी, वृत्त असे कथिले


ध्या रे दत्तासी ध्या रे, त्याचे कृपादान घ्या रे
अनित्य नश्वर जगती या, नच इतर मागा रे
भुलवेल तुम्ही अनित्य विभवा, सावधान व्हा रे
वैराग्याची खरी शिदोरी, प्राप्त करुनी घ्या रे
ज्ञानभक्तिचा अमोल ठेवा, कृपे सहजी मिळे रे
वाट पाहतो तुमची जा जा, पैजारवाडीसी रे
दत्त चिले महाराज तुमची, वाट पाहती रे
जाऊनिया तेथे एकवार तरी, अनुभव तुम्ही घ्या रे
मायदत्ताच्या कुशीत शिरुनि, निश्चिंत व्हा रे
कृष्णदास तेथ अनुभव लाभुनि, निश्चिंत झाला रे!


ॐ दत्त चिलेंसी या, कधिचि ना देहभान
सदासर्वदा राहिला, उन्मनीत रममाण
खाणेपिणे सभोवतीची, कधिचि ना शुद्ध जाण
परमात्माचि देहात त्या, वस्ती करुनी राहिला जाण
दृष्टी त्याची पडताचि, जन्म सफल झाला जाण
चिले रुपे भगवंताने, धाडिली गे तुम्हा खाण
श्री क्षेत्र पैजारवाडीसी, मांडिलेसे त्याने ठाण
कृष्णदास सांगे धावा उठा, जाऊनिया व्हा शरण


चिले माझा दयाळू राणा, न दुजा परि अवधूताची जाणा
विनवा त्यासी वैराग्य अर्पिण्या, व्हाल लायक मग ज्ञान भक्ति चाखण्या
मागा त्यासी त्या ज्ञानभक्तिच्या खुणा, कृपेसी नाहीच तो की उणा
साधनेच्या तुम्हा दाविल खाणाखुणा, पार करेल तुम्हा त्रिगुणा
ॐ दत्त चिले सोऽहं, जपा तुम्ही कृपा त्यांची लाभण्या
मंत्र जरी दिसे सगुणा, अंती भेटविल निर्गुणा
सगुण भक्ति आनंद लुटण्या, निर्गुण आत्मानंद लुटण्या
करा त्वरा श्री दत्त चिले तोषविण्या, जा तुम्ही पावन चरणी शरणा
कृष्णदासे उघड केलिया खुणा, आनंदे हसतो मोक्षराणा


ॐ दत्त चिलें सोऽहं, नामाची शक्ति अपार
जाऊनिया अहम् भान, सोऽहं भान नित्य अपार
दीक्षा त्याची होतसे, श्री क्षेत्र वाडी पैजार
उगमी त्या जा एकवार, भावे करा नमस्कार
कृपादृष्टी पाहता गुरुवर, उठेल अंतरी नामाची धार
कृष्णदास म्हणे न्हाता धारेत, आत्मानंदी रमाल अपार


श्रद्धा भक्ति धन अमोलिक, घेऊनिया अंतरातऽऽ,
भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
श्रद्धेने त्या भक्तिचे फल, कृपादृष्टी दिनरातऽऽ,
भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
भक्तिने त्या अवधूत दत्त, होईल हो साक्षातऽऽ,
भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
अंतरी दत्त समोर दत्त,ध्यानी मनी निशिदिनी दत्त,
कृपा वर्षत अखंड अविरत
पूजन करुनि दत्त कृपेचा, घ्या अनुभव दिनरातऽऽ,
भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ
कृष्णदास म्हणे दत्त कृपेने, जीवन आनंदातऽऽ,
भजा हो चिलेदेव हृदयातऽऽ


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *