श्री बाबा महाराज आर्वीकर (मोरेश्वर)
माचणूरचे संत मोरेश्वर, जणू आळंदीचे हो ज्ञानेश्वर
भक्तियोगाचा त्यांना फुटला पान्हा, अन् स्त्रवले दिव्यामृतधारा
वाचिता वाटे ना ती धारा, तो तर आगळा धबधबा अपार
त्यांत उघडली रहस्ये अपार, साकार ते निराकार
प्रवचनांची त्यांची धार, भक्तिज्ञानाची दिव्यामृतधार
ना केवळ विद्वत्ताप्रचुर, अनुभवांचे ते तो सार
रचिली त्यांनी साधनासंहिता, वर्णिला त्यात योगमार्ग पुरता
बाबांचे तो रुप हे न्यारे, फकीरी वृत्ती अन् अवतारही तो रे
नाथसंप्रदायी सिद्धचि तो रे, यति महेश्वरानंद ओंकारेश्वरी गुरु रे
दृष्टी अखंड उर्ध्व फार, वाटे निवास उन्मनी अनिवार
चंद्रभागेतीरी क्षेत्र माचणूर, बाबांची समाधी अति सुंदर
जाता बाबा हर्षति फार, वर्षति कृपा अपरंपार
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
माचणूरचे बाबा मोरेश्वर, हाचि आमुचा एकचि ईश्वर
अवतारचि तो जणू ज्ञानेश्वर, आला जवळी पंढरपूर
वर्ण सावळा शोभे सुंदर, कांतीवरी तेज अपार
शुभ्र वस्त्रे अंगावर, अन् केस रुळती मानेवर
हास्य विलोभनीय किती ते सुंदर, दृष्टी उर्ध्व उन्मनी अनिवार
नाथपंथीचा श्रेष्ठ गुरुवर, योग ज्ञान भक्ति पूर्णचि अधिकार
वाणीचा त्या ओघ अपार, उलगडला भक्तिमोग सुंदर
धन्य आमुचे क्षेत्र माचणूर, रमले जेथे बाबा निरंतर
मस्तक ठेविता समाधीवर, आशीर्वाद देती सत्वर
बाबा बाबा वदता वाचे, कंठ दाटुनि येता साचे
विरहव्यथे त्या तळमळ होऊनि, नेत्री घळघळ अश्रू निरंतर
माचणूरचा आमुचा गुरुवर, कृपा केली जेणे अपार
कृष्णदासा स्मरण निरंतर, ध्यानी अखंड मूर्ति सुंदर
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
— सर्व रचना © कृष्णदास
Leave a Reply