श्री रामानंद बीडकर महाराज
अत्तराचे व्यापारी, झाले संत अधिकारी
कथा बीडकर महाराजांची, ऐका सारे तुम्ही न्यारी
रामानंद नाव त्यांचे, विषयानंदी रमले साचे
छंद नाना असती त्यांचे, नाच गाणे इत्यादींचे
एकदा त्यांना कुणीतरी टोचे, अंतर दुखता मनी बोचे
स्वाभिमान तो उफाळुनी, निश्चय मनी झाला त्यांचे
प्रयत्नांती परमेश्वर, मनी त्यांचे बाणली खूण
निरसुनि टाकी सर्व अवगुण, शोधुया गुरु आपण
अक्कलकोटी तो सापडला, स्वामी समर्थे हाती धरला
दृष्टीक्षेपे शक्तिपात करुनी, ध्यानमार्गाची दीक्षा लाधला
रात्रंदिन तो शेंडी बांधुनी, कठोर ध्यानाभ्यास केला
पूर्ण होता अंतरी तो, समर्थ कृपे फळा आला
विषयानंदी रामानंद, ब्रह्मानंदी डोलू लागला
गुरुदर्शना जाता मग गुरुने, अंतिम फास सोडविला
गुरुदक्षिणा म्हणुनी बाधक, किमयेचा त्याग करविला
पावन करण्या अनंत जनांसी, नर्मदा परिक्रमाही करविली
पुण्यनगरीतील पुण्यपुरुषाची, मी ही अशी कथा वर्णिली
रामभक्त तुलसीदासासम, मज त्यांची ही कथा गमली
समर्थ गुरुने हाती धरता, घडली ही किमया वर्णिली
रामानंदी चरणांवर त्या, आत्मानंदी मी डोई ठेविली
******
Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा
Leave a Reply