स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद, नाम घेताचि मनी आनंद
परमशिष्य तो परमहंसाचा, दक्षिणेश्वरीच्या रामकृष्णांचा
पूजक तो निराकाराचा, सप्तर्षीतील अवतार एकाचा
तीव्र प्रज्ञा वरदानाचा, अन् विलक्षण स्मरणशक्तिचा
उघड पुतळा वैराग्याचा, अन् अस्खलित ब्रह्मचर्याचा
गुरुप्रेमा अन् गुरुनिष्ठेचा, आदर्श गुणी संन्याश्यांचा
बालवयातचि दिसला त्यांना, वीट नश्वर संसाराचा
प्रथमभेटी त्या रामकृष्णांच्या, विश्वास उमटला भगवत् दर्शनाचा
खरे उतरता परीक्षा चिकित्सा, गुरु म्हणुनि स्वीकारला साचा
अनुभव देता अद्वैताचा, गुरुपायी शरण तो साचा
कठोर केली तपश्‍चर्या, अन् रात्रंदिन ध्यानाभ्यास नित्याचा
ध्यानी सहजी रमता शोभे, शिवशंकर जसा स्मशानीचा
असे अभ्यास गीता वेद उपनिषदांचा, अन् पाश्यात्त्य तत्वज्ञानांचा
गुरु बंधूसी हरवी सहजी, वाद विवाद होता गमतीचा
स्तोत्रे गातसे मधुर विविध ती, नियम नित्य असे भजनाचा
गुरुदेवांच्या आजारपणात, प्रतिक शोभला गुरुप्रेमाचा
कठीण अशा त्या प्रसंगी, दीपस्तंभ दर्शला गुरुनिष्ठेचा
देह ठेविता परमहंस गुरुने, मार्गदर्शक बनला गुरुबंधूंचा
संन्यासधर्म स्वीकारुनी, भारतभरी परिव्राजकी भ्रमला
कन्याकुमारी खडकावरी, तीन दिवस ध्यानी रमला
अभिनव भारतभूचे तेथे, चित्र निजमनी कल्पिला
सारदामांच्या आशीर्वादे, सर्वधर्म परिषदी गेला
‘अमेरिकेतील भगिनी बंधूनो’ उद्गारताचि, टाळ्यांचा कडकडाट गर्जला
अंगी साठले साधनेचे, सभेत त्या जणू तेज प्रकटला
मंत्रमुग्ध त्यां श्रोत्यांना करुनी, वेदांताचे ज्ञान उपदेशिला
आजही जे वाचता येई, तरुणांचे रक्त स्फुर्तिला
परदेशी अनेक अनुसरता, भगिनी निवेदितांचा गुरु बनला
मायभूमीसी मग परतता, निस्तेज त्या पाहुनि मनी कळवळला
जागृत करण्या तेज परत ते, कर्मयोगाचा मार्ग उपदेशिला
भारतभर त्या कार्या करण्या, रामकृष्ण संघ स्थापिला
बीज जे रोविले त्याचा जगाने, असे विशाल वटवृक्ष देखिला
‘आत्म्याचा मोक्ष साधुनी, जगताचे हित साधण्या’
अखंड अविरत झटण्याच्या बोधाचा उपदेश केला
अविरत अखंड कार्याने तो, देह त्यांचा अतिशय थकला
अल्पावधीतची ह्या जगाचा, निरोप त्याने अखेर घेतला
भारतभूच्या महान सुपुत्राचा जीवन प्रवास मी हा वदला
कर्मयोगी ज्ञानी गुरुभक्ताच्या, पवित्र पावन चरणकमलांवर,
सद्गदित मी मज माथा ठेविला!
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


स्वामी विवेकानंदांचा ११३ वा निर्वाणदिन

आज ४ जुलै. ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत’ या कठोपनिषदातील श्लोकाची पुनर्गर्जना करणाऱ्या स्वामी विवेकानंदांचा आज ११३ वा निर्वाणदिन. १२ जानेवारी १८६३ रोजी जन्मलेल्या या महापुरुषाचे संपूर्ण जीवन म्हणजे या भूतलावरील सर्वांसाठी अतिशय आदर्श आहे. प्रखर विद्वत्ता, धगधगीत वैराग्य, अजोड गुरुभक्ति, अत्यंत प्रबल आत्मविश्वास, मातृभूमीबद्दल अपार प्रेम, दीनदु:खी जीवांबद्दल अपार करुणा या सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे स्वामी विवेकानंद. वयाच्या अठराव्या वर्षी स्वामीजींची श्रीरामकृष्ण परमहंस यांच्याशी भेट झाली. दक्षिणेश्वर येथील कालीमंदिरातील या साधारणशा दिसणाऱ्या पुजाऱ्याने प्रथम भेटीतच परमेश्वराच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या तरुण नरेंद्रचे मन वेधून घेतले ते कायमचेच. नरेंद्रनाथास १८८१ ते १८८६ अशी अवघी साडेपाच वर्षे सद्गुरुंचा सहवास लाभला पण या गुरुशिष्यांतील नाते, प्रेमबंध अपूर्व ठरला. अत्यंत चिकित्सक असलेल्या नरेन्द्रनाथांच्या परमार्थातील शंकांचे श्रीरामकृष्णांनी आपल्या ईश्वरीय अनुभूतिमुळे लाधलेल्या बुद्धीद्वारे अत्यंत सोप्या शब्दांत निराकरण केले. त्या अनुभूतिची झलकही त्यांनी नरेंद्रास दिली व सांगितले की आता चावी माझ्याकडे आहे. तुझे कार्य पूर्ण होईस्तोवर ती अनुभूति परत येणार नाही. पितृनिधनाच्या आकस्मिक दु:खाने कोसळलेल्या अत्यंत बिकट परिस्थितीतही नरेंद्राने कालीमातेकडे भक्ति, ज्ञान व वैराग्य याखेरीज काही मागितले नाही हे विशेष होय. श्रीरामकृष्णांच्या देहत्यागानंतर त्यांच्या सर्व शिष्यांचे नेतृत्त्व नरेंद्राने केले. १८८६ ते १८९२ अशी सहा वर्षे स्वामीजी परिव्राजक अवस्थेत संपूर्ण भारतभर हिंडले. १८९० च्या सुमारास गाझीपूर येथे स्वामीजींचा परिचय पवहारी बाबा या योग्याशी झाला. पवहारी बाबा एक सिद्ध योगी असून वायूभक्षण करून जमिनीखाली एका भुयारात रहात असत. परमहंसांनी दिलेली अनुभूति परत मिळावी व त्यातच मग्न रहावे अशी मनिषा बाळगणाऱ्या स्वामीजींनी पवहारी बाबांकडे जाण्याचा निश्चय केला. पण त्या रात्री त्यांच्याकडे जाण्यासाठी निघताना श्रीरामकृष्णांची असीम कृपा, त्यांचे अगाध प्रेम आठवून स्वामीजींचे हृदय व्याकुळ झाले, नेत्र भरून आले. तितक्यात श्रीरामकृष्णांची दिव्य मूर्ति त्यांच्यापुढे प्रकट झाली. नेत्रांत स्नेह, करुणा, व्यथा अन निर्भत्सना मिश्रित भाव असलेली ती मूर्ति बराच काळ स्वामीजींच्या पुढे उभी होती. जणू काही ते स्वामीजींना दर्शवित होते कि त्या क्षुद्र समाधिसुखाच्या पायी तू इतक्या स्वार्थी क्षुद्र बुद्धीचा कसा बनतोस. स्वामीजी संपूर्ण प्रहर तसेच निश्चल बसून राहिले. दुसऱ्या दिवशी आपल्याला झालेले दर्शन मनाचा खेळ असेल असे ठरवून स्वामीजींनी त्या रात्री परत पवहारी बाबांकडे जाण्याचा निश्चय केला. तो काय! त्या रात्रीही श्रीरामकृष्ण परत त्यांच्यासमोर अविर्भूत झाले. सतत एकवीस दिवस याच प्रकारे पुनरावृत्ति झाली. अंती स्वामीजींनी श्रीरामकृष्णांची मनोमन क्षमा मागितली व म्हणाले की ‘प्रभो, तुम्हीच माझे एकमेव आराध्य. मी आता यापुढे इतर कुणाकडेही जाणार नाही. मला या अपराधाची क्षमा करावी’. त्यानंतर स्वामीजींनी जे अफाट, अजोड कार्य केले ते सर्वांस ठाऊक आहेच. सद्गुरूंची दिव्यदृष्टी व दूरदृष्टी अशी असते!  असो. १८९३ साली स्वामीजी शिकागो येथील सर्वधर्म परिषदेस गेले. ११ सप्टेंबर रोजी त्यांचे ते जगप्रसिद्ध व्याख्यान झाले. १८९६ पर्यंत ते आचार्य भूमिकेत वावरले व या काळात त्यांनी परदेशात विविध ठिकाणी विविध विषयावर व्याख्याने दिली. ती आज पुस्तक रूपाने उपलब्ध आहेत. १८९७ साली भारतात परत आल्यावर त्यांनी अखिल मानवजातीच्या कल्याणार्थ ‘रामकृष्ण मिशन’ या संस्थेची स्थापना केली. या लहानश्या रोपाचे आज विशाल वटवृक्षात रुपांतर झालॆले दिसत आहे. आज ‘रामकृष्ण मिशन’च्या शाखा सर्वत्र पसरलेल्या दिसत आहेत. श्रीरामकृष्णांच्या उपदेशाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एक बंगाली नियतकालिक सुरु करावे या हेतूने स्वामीजींनी पुढाकार घेऊन १४ जानेवारी १८९७ रोजी ‘उद्बोधन’ हा अंक सुरु केला. परिव्राजक काळातील हालअपेष्टांनी  व त्यानंतरच्या अविरत कष्टांनी स्वामीजींचा देह अतिशय थकला व मायदेशी परतल्यावर त्याना मधुमेह, दमा इत्यादि विविध व्याधींनी घेरले. त्यातही त्यांचे कार्य चालूच होते. अखेरीस ४ जुलै १९०२ रोजी रात्रौ ९ वाजता त्यांनी बेलूर मठात देह ठेवला.
अद्भुत स्मरणशक्ति हा स्वामीजींचा गुण विशेष होता. कोणत्याही विषयावरील कितीही मोठे पुस्तक ते काही तासातच वाचून काढीत व त्यातील कुठल्याही पानावरील मजकूर ते शब्दश: सांगू शकत! स्वामीजी सांगत की वाचताना संपूर्ण पान ते एका दृष्टीक्षेपात वाचू शकत असत. स्वामीजीना गायन-वादन कलाही चांगलीच अवगत होती. या गायनकलॆपायीच सुरेंद्रनाथ मिश्रांच्या घरी स्वामीजींची श्रीरामकृष्णांशी प्रथम भेट झाली होती.
अशा या महापुरुषाचे स्मरण करून त्यांच्या चरणी नतमस्तक व्हावे असे प्रत्येकास वाटावे यात नवल ते काय!!  –कृष्णदास (४ जुलै २०१५)


 

— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *