श्री योगी अरविंद

अरविंद घोष नव्या युगाचे, होती योगी अरविंद
क्रांतिकारकातील क्रांतिमय बदल तो, कारण भेटला गोविंद
मानसातुनी अतिमानसी, माणसातुनि दिव्यत्वी
प्रवास त्यांचा कळतो, वाचिताची सावित्री
उपनिषदावरी भाष्य अन् विविध लेखन उद्बोधक अति
वाचकांसी न कळे ती तो, बुद्धीची त्या किती मिती
लेल्यांसम हा गुरु भेटला अन् माताजी शिष्या गुणी भली
पॉंडिचेरीच्या समाधिस्थ योग्या, नमस्कार माझा शतोगुणी

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा

******

॥ मौन विसावले ॥

(श्रीअरविंद यांच्या महासमाधीस समर्पित काव्यांजलि)

शब्दप्रभू योगी । श्रीअरविंद जगी । प्रज्ञा होय जागी । ‘अतिमानसी’ ॥१॥
जीवांची उत्क्रांति । दिव्यत्व प्रचिती । हेतू हाचि चित्ती । धरिलासे ॥२॥
एकांती मौनात । साधना करीत । साधावया हित । विश्‍वाचे गा ॥३॥
चेतनेचा स्तर । झेपावला वर । स्पर्शला सत्वर । ‘सुप्रा-मानसी’ ॥४॥
यत्न अविरत । सिद्धीस तो जात । ‘अवतरण’ होत । कृष्णप्रभू ॥५॥
‘सिद्धि-दिन’ ख्यात । भक्त आश्रमात । साजरा करीत । उत्साहात ॥६॥
मौनातून आले । ‘सावित्री’ते ल्याले । दिव्य प्रकटले । शब्दब्रह्म ॥७॥
दिव्य ईश्‍वरीय । हिरण्मय काय । होण्यासी उपाय । विशद तो ॥८॥
दिव्य हो जीवन । ‘पूर्णयोगे’ पूर्ण । जगत्‌-कल्याण । शुभेच्छा ती ॥९॥
मौन शब्दावले । ज्यांनी अभ्यासिले । शब्द मौनावले । तयांचे गा ॥१०॥
ऐसा क्रांतिसूर्य । थोर ऋषिवर्य । असे गुरुवर्य । साधकांसी ॥११॥
कार्य ते जाहले । ‘मौन विसावले’ । युग अस्तवले । कालातीत ॥१२॥
नीरव प्रगाढ । विद्युन्मय काय । स्थिरावली माय । अंती ती गा ॥१३॥
चिरंतन ध्यान । चिरंतन मौन । केले चिरस्थान । पाँडिचेरी ॥१४॥
निगूढ गंभीर । असे परिसर । मन होय स्थिर । क्षणामाजी ॥१५॥
स्पंद हो नि:स्पंद । उसळे आनंद । करीतसे धुंद । आगतांसी ॥१६॥
ऐसें क्रियाशील । समाधीचे स्थल । अस्तित्व जाज्वल । भारती या ॥१७॥
ऐसें श्रीअरविंद । स्मृति ती सुखद । महत्ता विशद । कैसी होय ॥१८॥
होता ते स्मरण । स्थानी जाय मन । समीप आसन । निवांतलो ॥१९॥
शब्द पांगुळले । मन ते विराले । मौनेचि वंदिले । योगीवरा ॥२०॥
‘मौन विसावले’ । ‘मौन विसावले’ । वंदितो पाऊले । कृष्णदास ॥२१॥

******


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *