श्री साईबाबा

द्वारकामाई बैसला साई, ती तो भक्तांची हो आई
वर्णन त्यांचे करु मी काई, भरुनि राहिला ठाई ठाई
फकीराचा तो वेश आगळा, नाहीच अन्य परि दत्त सावळा
‘श्रद्धा सबुरी’ मंत्र आगळा, जीवन करी हा सुखमय सगळा
समोरची ती अखंड धुनी, येणार्‍यांची कर्मे जाळुनि
वैराग्याचे भस्म लावुनि, पाठवी भक्ता करुनि मोकळा
शुभ्र कफनी, वरी मुंडासे, हाती असे तो चिमटा सटका
एकचि त्याचा खाता फटका, षड्‌रिपु म्हणती सटका सटका
लक्ष्मी पायी अखंड दासी, असुनि मागतो भिक्षा साची
जणू दर्शवतो जगा सगळ्या, अल्ला मालिक असे केवळा
लेंडी बागे नंदनवन फुलवी, घालुनि नित्य स्वहस्ते पाणी
कष्टाचे महत्व सर्वा जाणवि, थोर सुखाचा मंत्र तो जाणी
प्रेमळ हो त्यांची किती ते वाणी, वेधे ठाव अंत:करणी
करुणाई अन् प्रेम ते पाहुनि, चट्‌दिशी डोळ्या आणी पाणी
हंडीची त्या काय कहाणी, स्वये साई हात घालुनी
शिजविती पदार्थ रुचकर झणी, प्रसाद देवही वांच्छिती मनी
चावडीवरची नित्य ती वारी, भक्त बरोबरी छत्र वरी धरी
जाऊनि तेथे ती स्वारी, आत्मानंदी रमते न्यारी
वर्णू मी काय फळीचे त्या भाग्य, ज्या वरी साई निजती नित्य
उशाखालची वीट हो सत्य, वाटे पुंडलिकाची भेट
श्रीरामाचे प्रेम अन् लळा, म्हणुनी करिती रामनवमी सोहळा
गुरुस्थानीचा भाव आगळा, शिकविती सर्वा गुरुचि केवळा
नवविध भक्तिची नव नाणी, अखेर भक्ता जाती देऊनि
लौकिकदृष्टया जरी तो लुप्त, ठाई ठाई असे तो गुप्त
वर्णुनि त्याचे धन्य चरित मी, त्याचे पायी शरण मी नित्य,
त्याचे पायी शरण मी नित्य!
******

Image फाईल डाऊनलोड करण्यास इथे टिचकी मारा


बोला ॐ साई
करा घाई घाई बोला ॐ साई
शिरडीस जाऊनि सत्वरी ठेवा पायी डोई
शिरडीची ती विठाई संतोषोनि बाई
गाईल प्रेमे तुजसी सोऽहं अंगाई
नाथाघरची उलटी खूण की ही बाई
नीज त्याने जाई अन् जाग त्याने येई
अन् भेटेल दिवसराती, अखंड ती विठाई, तुझ्याचि हृदयी
अखंड आत्मरुप ती बाई
पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
पहा आली साईंची स्वारी, भिक्षा मागण्या आपुल्या दारी
उभे असती द्वारी, म्हणती भिक्षा वाढ माई
चला उघडा मनाचे द्वार, त्यासी करुनिया पार
अमनाच्या उंबरठयावरुनि, अहं भिक्षा अर्पू त्यांसी
त्याने भरेल त्यांची झोळी, साई संतोषेल सत्वरी
मग तो त्रैलोक्याचा हरि, जीवभाव सत्वर हरी
आशीर्वाद अर्पी सत्वरी, अन् आत्मभाव पूर्ण भरी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साईंना चिलीम अति प्यारी, पिण्या आली त्यांना लहरी
चला करु त्वरा सारी, भरु चिलीम ती न्यारी
भरा जीवभाव तमाखू, ठेवा गुरुबोध ठिणगी वरी
फुंका सोऽहंभावे त्यावरी, दिसता धूर जीवभावा
द्यावी साईसी सत्वरी, एका दमातचि करिती पहा, जीवभावाची राख सारी
पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साई चालले लेंडी बागे, फुलविण्या आत्मफुले
कष्टती मेहनत घेती करे, दर्शविती साधनेचे कष्ट घ्या रे, त्याविना उद्धार ना रे
रोविती रोपे नित्य नवी, जणू गुरुकृपाबीज रोवी
त्यांसी सिंचन आत्मभावी, बोधामृत पाणी पाजी
मग भक्ति योग बहरु, त्यांसी येई वरचेवरु
पूर्ण वाढ होता त्यांसी, आत्मरुप ती फळे धरु
त्याचे सेवन आपण करु, आत्मतृप्त आपण होऊ
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
पहा साईची ती हंडी, टाकिती भक्तांलागी
आत, पोळिती त्रिविधतापे अमाप
आधार घालुनि देती हात, दाबुनि पाहती किती जीवभावात
जीवभाव तो पूर्ण जाता, आत्मभाव केवळ रहाता
स्वाद मधुर ब्रह्मानंदाचा, अन् सुगंध आत्मरुपाचा, येता हंडी पहा तयारी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
आली महाशिवरात्र पर्वणी, अज्ञानाच्या या मध्यरात्री
चला साईच्या दर्शनी, शिरडीस्थित शिवाच्या पूजनी
स्नान करु शुद्ध भावानी, वैराग्य पितांबर लेवुनि
पदीपदी नाम गाऊनी, प्रवेशु साईच्या मंदिरी, आपुल्या हृदयाच्या मंदिरी
भक्ति ज्ञान वैराग्य त्रिदल, वाहू साईच्या शिरकमली
प्रेमळ पाहुनि साई मूर्ती, अश्रू धार लागे नयनी
अभिषेका हेचि जल घेऊनि, अभिषेक करा हो त्याचे शिरी
संतोषोनि शिवस्वरूप साई, ठेवी कृपाकर मस्तकी
फिटुनि अध:कार अज्ञानी, उजळे पहाट ज्ञान अंत:करणी
मग ही साधली की पर्वणी, वाटे धन्यता किती मज मनी,
अंत:करण येई तो हे भरुनि
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साई साई साई, नित्य मुखी जो गाई
साई आशीर्वाद लाभुनि, धन्य तिही लोकी होई
नामाची महति त्या तो, वर्णू कशी मी बाई
ऐकताचि साई आई, उचलुनि कडे घेई
ते देखताचि भिऊनि, माया पळुनि जाई
मग ऐकत साई अंगाई, आत्मरुपी निज ही येई
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
ॐ साई ॐ साई, काम करता मुखी गाई
साई नाम ऐकताचि, काम त्याचे होऊनि जाई
जन्मोजन्मी अपुरे असे जे, देहबुद्धीचे ठाण असे जे
वासनांचे जाळे असे जे, तोडुनि फाडुनि त्वरितचि जाई
अशी ही अपुली साई आई, नाथपंथी गुरुमाई
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
प्रवेशिताचि त्या पवित्र शिरडी, धाय मोकलुनि माया रडी
पळता भुई तिज होई थोडी, मारुनि बसे तत्क्षणी ती दडी
बैसला तेथे साई गारुडी, उघडुनि अपुली नाथ पोतडी
सोऽहं पुंगी वाजवी हरघडी, माया भुलवुनि हाती पकडी
पकडुनि तिसी घाली पोतडी, तिच्या तडाख्या जीवा सोडवी
मग ब्रह्मरस अनुभव घडीघडी, जो जीवा भारी आवडी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
शिरडीस आहे द्वारकमाई, कृष्ण द्वारकेचा बैसला तेथे
भक्तांची होऊनिया आई, दर्शना करा घाई
त्रिभुवनाचा राजा बाई, मागता त्या लाजू नका काही
झोळीत हात घालुनि साई, इच्छिले जे तो वाटीतसे बाई
गोष्ट त्याची अति हो न्यारी, जे जे मागे ते ते देई
पण काहीच न मागे जो त्यासी तो, आपुलिये सर्वस्व देई
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
चित्ती धरा साईनाथ, नवविध भक्तिचा हा नाथ
प्रसन्न होता त्वरितचि देई, नवविधा भक्ति करी सनाथ
अंतरी फुलता भक्तिकमळ ते, शक्तिचे हो उर्ध्वगमन ते
रोमांचित अन् अश्रू नयन ते, भक्तिसुखाचा अनुभव देते
मन त्वरितचि हे उन्मन होते, अन् देहभान त्वरितचि जाते
कृपा केलिया साईनाथे, भक्ता अशी प्रचित येते
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साई बैसला सिंहासनी, भक्त हृदयाच्या आसनी
तेणे भक्त होय तो गुणी, दुर्गुणा न जागा झणी
जगी वर्ते पवित्र गुणी, धरी कर्म ते दिव्यगुणी
होय पवित्र अंत:करणी, अंती साक्षात्कार निर्गुणी
वाटे शांति साकार गुणी, ही तो साईची त्या करणी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साईराम साईराम, गाता मुखी भक्तां आराम
त्वरितचि शमे त्यांचा काम, गाठी शांतिचे निजधाम
ब्रह्मानंदी करी विश्राम, हे तो साईचे त्या काम
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
दर्शना जाता भक्त, साई भडकला तापला
कठोर शब्द अन् शिव्यांचा, भडिमार तो त्या केला
पाहुनिया ते दृष्य, भक्त गर्भगळित मनी झाला
क्षमायाचना करिता, साईचा पारा अधिकचि चढला
देखोनिया भक्त, केविलवाणा तो हा झाला
काही न सुचे त्याला, अन् आधार न तो उरला
लोटांगण घालुनि, चरणी शरण त्वरितचि आला
देखोनि साई हसला, उचलोनि त्यासी घट्ट पोटाशी धरिला
अहंभाव गेल्यावरी, साई कृपास्पर्श तो होता,
त्वरितचि समरस तो झाला, केवळ साईरुप तो उरला
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
घेऊ साईची पालखी, नाचू गाऊ नाम मुखी
हर्ष मनी झाला अति, पायी चालती मंदगती
सवे वादये अति गर्जति, बेभान भक्त संगति
नरनारी पुढे येती, ओवाळीती साईसी आरती
डोई चरणी ते ठेविती, साईचा कृपार्शिवाद लाभती
देहभाव पूर्ण विसरती, अन् आत्मानंदी रमती
ही तो साईची त्या कृति
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साई किमयागार, करितो किमया अतिशय न्यारी
येता भक्त त्या गाभारी, दृष्टी रोखतो त्यावरी
निरखुनि पाहतो अंतरी, भक्तांच्या हृदयांतरी
दुर्गुण षड्रिपु तेथोनि, हाकलोनि प्रवेशितो अंतरी
बैसतो ठाण तिथे मांडुनि, अनुभव त्याचा भक्तां येता
जाई साईरुप होवोनि, स्वये साईरुप होवोनि, दिसे ब्रह्मांडा व्यापुनि
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
पहा धुनी अखंड, वसे द्वारकामाई
वाट पाहे तेथे साई, अर्पी कोण त्या काई
जाता भक्त दर्शनी, ज्वाळा उठतसे अंबरी
अहंकार ज्याचा जितुका थोर, वाढे ज्वाळा तितुकी थोर
अहंकार राक्षस थोर, लागता जीवाला घोर
धावा तुम्ही द्वारकामाई, टाका त्यासी त्वरित धुनीत
त्याने सत्वर तुम्ही पुनित, साई दिसे अतिशय खुशीत
मग घेऊनि त्याला कुशीत, गोंजारितो बाळही खुशीत
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
साई माझा मस्त फकीर, नाही त्याला स्वत:ची फिकीर
भक्तां करिता अंगिकार, करी त्याची अखंड फिकीर
मग कशासाठी किरकिर, थांबवा सत्वर तुमची पिरपिर
नका करु काही कुरबुर, धरा श्रद्धा अन् सबूर
मिळता त्याचे ते हो फळ, होई आशा अति निर्बळ
फकीराचे जाणता बाळ, पळे दूर अति तो काळ
पहा साईची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
चला साईसी नमुया सत्वरी, जोडोनिया दोन्ही करी
लक्ष श्रीमुखावरी, जो हासतसे अंतरी
देखताचि उर माझा भरी, नि:शब्द अंतरी
रोमांच अंगावरी, गलबले हृदयांतरी
भान विसरुनिया मी, कोसळलो चरणांवरी
साई दर्शनाची कथा सारी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
या साईचि ती माया, न तुळे आईच्या त्या माया
प्रेम अन् शिकवणी त्या या, करिती धन्य जीवा या
सारुनि दुर्घट माया, भेटवी देव ठाया ठाया,
साईकृपेची गत ही सारी
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******
आले जसे ते लिहीले, जणू साईचि सर्व ते वदले
उणे ते माझे गमले, विनवितो वाचा तुम्ही सर्व हो भले
वाचिता भाव अंतरी, प्रेम वाढे साईचरणी
तेणे प्रसन्न साई सगुणी, हे आशीर्वच हो साईचे
द्वारकेतल्या त्या माईचे
वाचोनिया सत्वर अनुभवा, बोल हे त्या साईचे
पहा साईंची किमया न्यारी, बोला ॐ साई, बोला ॐ साई
******

साई साई साई, आरती मी गाई
उभा द्वारकामाई, दिसे सामोरी साई
सुवर्णतबक हाती, त्यात निरांजन ज्योती
भृकुटी प्रकट ज्योती, नाद कर्णी घणघणती
रोमांचित काया थरथरती, वायू चिदाकाशी स्पर्शिती
ओवाळीता आरती, मी तू पण लोपती
वाटे धन्य मी किती किती, ओवाळीली श्री साईसी आरती
मज भाग्या नाही मिती, शरण साई चरणी मिठी


शिरडीच्या साईनाथा मी नित्य पूजितो
प्रेमळ बोल अन् करुणा त्यांची नित आठवतो
तो साई मजसी अंतरी नित्य जागवितो
कृष्णदास मनोभावे साईचे दर्शन नित्य घेतो


शिरडीचा हा फकीर, हरतो सर्वांची फिकीर
दिसता तयारी फकीरीची, त्यासी करतो फकीर
सर्वस्व त्याला अर्पुनि, कृष्णदास झाला फकीर


शिरडीच्या साईसी मी ढाळीतो हळुवार चवरी
तेणे तो घालितो हळुवार फूंक मनावरी
तेणे होय शीतलता मनाची सत्वरी
सांभाळण्या ती अखंड, कृष्णदास ढाळीतो अखंड चवरी


ॐ साई ॐ साई ॐ साईराम,
जपा मंत्र नित्य निशिदिनी करता कामधाम
पुरेल तेणे मनीचा तो सर्व काही काम
गाठाल मग त्वरितचि तुम्ही शांतीचे निजधाम
शांती लाभता अनुभवाल मग जो म्हणती आत्माराम
कृष्णदास म्हणे रमता त्यात झाले तुमचे काम


नित्य निशिदिनी वसती बाबा द्वारकामाई, बाबा द्वारकामाई
चरणांवरती भावे, चरणांवरती भावे ठेवा जाऊनिया डोई
भयचिंतादि काळजी सारी मनातुनि जाई सारी मनातुनि जाई
सर्वतोपरी वाही काळजी साईनाथ आई, अपुलि साईनाथ आई
शिळेवरी त्या बसुनि सांगती धरा श्रध्दा अन् सबूर
मिळे तुम्हा जे मनी इच्छिले धरा अल्प धीर
चरणी त्याच्या करा करा हो करा मन स्थिर
इच्छा शमवुनि नेईल तुम्हा सुखे पैलतीर
चला जाऊया शिर्डीग्रामी द्वारकामाईसी सत्वर
कृष्णदास म्हणे भावे नमुया साईनाथ फकीर


साईनाथ गुरु माझेऽऽ, साईनाथ गुरु माझेऽऽ
शिर्डीसी फकीर रुप साजेऽऽ, शिर्डीसी फकीर रुप साजेऽऽ
निंबातळी विराजत सद्गुरुराजे, शिळेवरी साईनाथ विराजेऽऽ
नित्यजयाच्या मुखी अविरत, ‘अल्ला मालिक’घोष गाजे
द्वारकामाई वसतिस्थान भक्तांचे जणू माहेरचि साजे
अखंड धुनीची उदी येतसे भक्तांच्या काजे
कृष्णदासा लळा लाविला या नाथपंथी योगिराजे


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *