श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

येहेळगावींच्या तुकाईंचा दूत आला गोंदवले ग्रामी
त्रयोदशाक्षरी संदेश त्यासवे धाडिला नामी
कलियुगी वाढलासे उन्माद बलाढय षड्रिपुंचा हरामी
नामापरता उपाय ना सुलभ सज्जना तारील या कामी
नाम नसे हो शब्दचि केवळ भरलेसे चैतन्य अनामी
सगुण निर्गुण दोन्ही असे हो दडले या नामी
परावाणी ध्वनी श्रवण करा मग होईल अति नामी
नामे नामी तल्लीन होता नुरे काहीच विरामी
नाम नामी हो एकरुपता हा अभ्यास असे नामी
नामाच्या नौके या बैसता पैलतीर सुखे आरामी
संदेश गुरुंचा देउनि ब्रह्मचैतन्य जरी आज गेले निजधामी
आकार विरता निराकार ते भरले ओतप्रोत नामी
सृष्टीचे जे मूळ दुजे ना असे एक नामी
अखंड अविरत जपा सर्वहो मनी धरा संदेश हा नामी
ब्रह्मचैतन्य स्वामींच्या पुण्यतिथिदिनी आज स्मरण होय नामी
कृष्णदास नत स्वामीचरणी सहाय प्रार्थितो या नामी


ब्रह्मातील चैतन्य साकारले, अवतरले ग्रामी गोंदवले
रामनाम रोमरोमी भिनले, अजपाजपी रमले
तुकाईंचा आशीर्वाद लाधले, पूर्णब्रह्म साक्षात्कारी जाहले
रामनामजप जना बोधिले, नामजपे जना तारियेले
कृष्णदासे स्वामींसी नमिले, नामप्रेम येण्या प्रार्थियेले


गोंदवल्यासी ब्रह्मचैतन्य, असेचि तो नामावतार केवळ
येहेळगावच्या तुकाईंचा, असे तो परमशिष्य केवळ
हनुमंताचा अंशावतार, समर्थांचा तो अवतार
रामनामाचे महत्व पटविण्या, जन्मलासे तो या भूवर
मूर्ती चपळ बलदंड शरीर, प्रवास केला भारतभर
तुकाई गुरु भेटल्यावर, गोंदवल्यासी झाले स्थिर
मुखी नाम हाती काम, हा सर्वां उपदेश सुंदर
प्रापंचिक शिष्य त्यामुळे, झाले असती त्यांचे अपार
अन्नदानाची आवड फार, नाम मुखी वारंवार
सद्भक्त असा भगवंतासी, सांगती ते आवडे फार
हृदयी रामरायाचे प्रेम अपार, सोडुनी जाता अश्रूंची धार
निर्गुण नामाचा सगुण चमत्कार, गोंदवल्यासी भक्त पाहती अपार
श्रीराम जय राम जय जय राम, गोंदवल्यासी भरला बाजार
या बाजारी मी तो जाता, नाम मुखावर सहजी स्फुरता
गेलो जरी मी शरीर टाकुनी, नामाकारे जग मी व्यापुनी
महाराजांच्या या बोलाचा, येतो भक्तां अनुभव फार
म्हणुनी कृष्णदास सांगे, जाऊया, बसू मंदिरी, करु गजर
श्रीराम जय राम जय जय राम!
श्रीराम जय राम जय जय राम!!


ब्रह्म आकारले स्थिति, चैतन्याची ही मूर्ती
देखिली गोंदवल्यासी, ब्रह्मचैतन्य मूर्ती
रामनामाची महती, पटविली सारे जगती
मारुतीचाची होय, अवतार हा क्षिति
सांगायाचे जे होय, म्हणती सांगा मारुतीचे कानाप्रति
कृष्णदास सांगे कानी, मज दिसो ती ही मूर्ती
आशीर्वादे त्यांच्या येवो, मज प्रेम नामाप्रती


निर्गुण नामातील गुप्त चैतन्य, प्रगटले नामी ब्रह्मचैतन्य
निर्गुण नाम कारण सगुण, तेणेचि सगुण ब्रह्मचैतन्य
विश्वी भरले जे अणूरेणूतून, तेचि साकार हे ब्रह्मचैतन्य
चैतन्याचा त्या होण्या साक्षात्कार, कृष्णदास प्रार्थी ब्रह्मचैतन्य


ब्रह्मचैतन्यांनी केला उपदेश नामी, गुंतवा अखंड जिव्हा या नामी
जरी असा व्यग्र अखंड कामी, चालू द्या अविरत धारा या नामी
धारेत त्या रमता नामी, वाढे हळुहळु प्रवाह नामी
होय तेव्हा तो अमनी नामी, कृष्णदासा गमला उपदेश नामी
रमतो अखंड ब्रह्मचैतन्य नामी


गोंदवले ग्रामी ब्रह्मचैतन्य स्वामी,
रंगले जे नामी निवसती विश्रामी
उपदेश तुकाईंचा घेऊनिया मनी,
उपदेश भक्तांसी करीताती नामी
नाम आणि नामी एकवटले नामी,
जपता नामी व्हाल उन्मनी
उन्मनीत देखाल ब्रह्मचैतन्य स्वामी,
स्वत: तुम्ही स्वामी अन् जगही स्वामी
येणे रिती होता होईल नामी,
कृष्णदासे धरिला उपदेश नामी


राम राम राम, श्री राम राम राम
उपदेश अति सुलभ सुंदर धरा मनी, करता करता काम
नित्य निरंतर मुखी गाता होईल, सुलभ सर्वही काम
भवदु:खाची वार्ता सरुनि कराल, आत्मरुपी विश्राम
कृष्णदास जन्माचे सार्थक, गाता मनी श्रीराम
नामे हृदयी तोषोनिया ब्रह्मचैतन्य, करताती विश्राम


स्वामी तुकाईंचा संदेश देती जनी ब्रह्मचैतन्य नामी
लोकहो रमा त्या अखंड नामी श्रीरामी
कळवळुनिया मम गुरुंचा संदेश सांगतो निशिदिनी
नका हो करु या कुचराई कामी
परब्रह्म तो गुरु हा माझा जरी दिसतो वेड्यावाणी
संदेश त्यांचा अतिअनमोल अंती पडेल तो कामी
कृष्णदास उपदेश धरिता कृपे रमला त्या नामी


ब्रम्हचैतन्य, ब्रम्हचैतन्य, स्वामींसी शरण जाऊया
रामनाम, रामनाम, अखंड गाऊया
रामा पायी, रामा पायी, काळजी वाहुया
रामनामे, रामनामे, आनंदी राहुया
स्वामी तोचि, स्वामी तोचि, दास ते होऊया
कृष्णदास म्हणे, कृष्णदास म्हणे, सार्थक करूया


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *