श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट

ss8

अक्कलकोटी स्वामी समर्थ, देखिला ना दुजा समर्थ
दत्ताचा तो अवतारचि केवळ, योगिराज श्री स्वामी समर्थ
गाणगापुरीचा नृसिंहमुनी, म्हणुनि नाव नृसिंहभान
कधीही ना कुणी पाहिले, असता यांना देहभान
वटवृक्षातळी बैठक त्यांची, भक्त दर्शना जाती फार
प्रत्येकासी दाखविती ते, वेगवेगळे चमत्कार
बाह्य कठोर वर्तन दर्शविती, परि अंतर त्यांचे प्रेमळ फार
भक्तां उद्धरण्या सदैव लक्षिती, हित हो त्यांचे वारंवार
कृपाशीर्वाद लाभता होते, जीवन नौका सहजी पार
पवित्र चरणांवर त्यां मी नमितो, करुनी शिरसाष्टांग नमस्कार


स्वामी समर्था तुझे लेकरु, मग मी कां ती फिकीर करु
समर्थ नामी तव या रमता, संसाराची काळजी करु
तव कृपेचा वारा सुटता, भयचिंतादी वार्ता दुरु
कृपेच्या तव अमृत प्राशनी, आत्मरुपी या अमर रमू
आत्मरुपाच्या आनंदात, कृष्णदास निजे लेकरु


प्रज्ञापूर निवासी, नमन भावे स्वामींसी
बैसलासे अखंड, वटवृक्षातळीसी
दर्शनार्थी भक्तांचे, मनोगत जाणिसी
कृपाळूपणे तू, हेत त्यांचे पुरविसी
अखंड स्वानंद, स्थितिते तू रमसी
सत्शिष्या कृपे ते, दान तेचि देसी
दु:खी जीवांसी, कृपादृष्टी पाहसी
दयाळूपणे तू, दु:खे त्यांची हरसी
कृष्णदास स्वामींच्या, जाता दर्शनासी
कमंडलूसी त्या, दान ते मागसी
मीपण त्यात,समर्पिले सत्वरसी
समर्थे तोषोनि, ओपिले कृपेसी
स्वानंद भान, करि झेलितासी
नमन करुनी, स्वामी चरणांसी
नमनी अमनी, स्वानंदी कृष्णदासी


स्वामी समर्थ स्वामी समर्थ, चला रमूया नामी समर्थ
गाता ध्याता नामी रमता, प्रगटतील श्री स्वामी समर्थ
माता पिता सखा भ्राता, सर्वची मजसी स्वामी समर्थ
एक्या भावे त्यांसी भजता, उद्धरतील श्री स्वामी समर्थ
रात्रंदिन या नामी रमला, कृष्णदास श्री स्वामी समर्थ


वटवृक्षातळी, बैसले स्वामी
भक्त सामोरी, गर्जती नामी
स्वामी समर्थ, समर्थ स्वामी
दर्शना आलो, मायबाप तुम्ही
कनवाळूपण, जाणोनी मनी
पापताप आमुचे, शमवी या क्षणी
कोमल पाडसा, धेनु तू स्वामी
अंत न पाहता, येई पान्हावुनी
प्रार्थुनि ऐसी, करी विनवणी
सद्गदित अंतरी, अश्रु ते नयनी
भाव हो जागृत, हृदय हेलावुनी
करुणेचा पाझर, फुटलासे स्वामी
कृष्णदास चरणी, जाई लोटांगणी
कृपामृत प्राशनी, स्वानंद भानी
शरण स्वामींसी, नमितो चरणी


ध्यानी मनी श्री स्वामी, गुरुराय समर्थ स्वामी
नित्य त्यांसी मी नमी, आजानुबाहू श्री स्वामी
मूर्ती अत्यंत साजिरी, दृष्टी वेधक अंतरी
कृपामृत वर्षा करी, कृष्णदास चरणी शरणी


स्वामी समर्था ध्यानी कल्पिले, अवचित समोर उभे राहिले
प्रेमळ स्वामी मूर्ति पाहता, नयनातुनी मम अश्रू वाहिले
स्मरणेचि ते प्रगट होता, स्मर्तृगामी हे दत्तचि गमले
स्वामी समर्थ स्वामी समर्थ, कृष्णदास त्या नामी रमले


स्वामी आले, मन हे धाले, दर्शन करता, तृप्त निवाले
बाहु जानूसम, सुवर्ण कांति, कमल नयनांतून प्रेम वर्षिले
शिरसाष्टांगी नमस्कारिता, कृपा स्पर्शे मी पुनित जाहले
आशीर्वाद त्या मंजुळ वाणी, ऐकुनी कर्णी तृप्त जाहले
स्वामी समर्थे दर्शन देता, कृष्णदास धन्य जाहले


भावबळे मी तुम्हा आळवितो, स्वामी समर्था तुम्हां ध्यातो
कृपाछाया तुमची मिळण्या, कुशीत शिरण्या मी धडपडतो
अज्ञ लेकरु तुझे वासरु, कामधेनूपरी तुम्हां पाहतो
कृपामृत पय पान्हा सोडण्या, वारंवार मी तुम्हां प्रार्थितो
अमृतासम ते पय हो पिऊनि, कृष्णदास स्वानंदी रमतो


भाव नाही अंतरी, कोरडा पाषाणापरी
स्वामी समर्था तुजसी, प्रार्थू कैशापरी
तव नामाचे प्रेम, नाही मम अंतरी
काम क्रोध मोहे, मी विटाळल्यापरी
रुप तुझे पाहू ऐसी, न निर्मलता दृष्टीपरी
कृपा तुझी पावू, नाही सद्गुण एकही परी
मग कैशा परी आळवू, तुम्हां समर्था तरी
स्वामी कथितो तुम्हां परी, दयाळू तव कृपेची ना सरी
कृष्णदास शरणी जाण, स्वामी उभवी कृपाकरी


प्रज्ञापूरीचे, स्वामी समर्थ
वर्णाया सामर्थ्य, मति असमर्थ
भाव मनींचा, अन् शुद्ध हेत
उमटतसे थेट, स्वामी हृदयात
कारण तो होई, कृपामृता स्त्रोत
प्रचंड अपार, त्याचा असे लोट
वाहुनी जाई माया, जीवभाव थेट
जीवाची करतसे, आत्म्याशी भेट
शरणागतासी, उद्धरी त्वरित
कृष्णदास शरणी, उद्धरला तेथ


स्वामी समर्थ, जपे नाम नित्य, कळिकाळा ठाव, नुरतसे तेथ
स्वये स्वामीराय, रक्षितो भक्तांस, वारितो कृपेने, भक्त संकटास
कृष्णदास जपे, स्वामी नाम नित्य, तोषोनि झाला, स्वामी कृपावंत


कृपाळू स्वामीनाथ, दे साधकांसी हात
काम क्रोध गर्तेत, बुडता त्वरित देई हात
मोहमाया गुंत्यात, फसता सोडवी त्वरित
नाम तुझे राहो, अखंड मम जिव्हेत
रुप तुझे राहो, अविरत मम हृदयात
स्फुरण तुझे राहो, अखंड मम हृदयात
कृपाछत्र राहो, अखंड शिरी ठेवी हात
देहभाव जावो, राहो अखंड आत्मरुपात
तव पुण्यतिथीसी उठे, प्रार्थना ही हृदयात
कृष्णदास प्रार्थी तात, स्वामी आशीर्वादाचा हात


श्री समर्थ स्वामीराया, प्रगटलासी वारुळी का या?
निर्विकल्प समाधीसी, त्यागिलेसी कर्दळीवनासी
कारण ते जाणितो मी, भक्तांची कणव तुजसी
परतलासे तू अनंत, भोळे भक्त उद्धरण्यासी
प्रार्थिता बाळ तुजसी, आता कां रे लपतोसी
कृष्णदास विनवितो, प्रगट हो हृदयासी
वास तेथ करी अखंड, निर्विकल्प समाधीसी


अक्कलकोटी स्वामीराया, नमन माझे तुझिया पाया
अवधूत दिगंबर, अवतार रुपे तुझिया
कामक्रोध अनिवार, दवडिसी निमिषभराया
रुप तुझे मनोहर, पुष्प वर्ण गौर काया
दर्शन दे त्वरित, निववी नेत्र लवकरी या
कर्ण आसुसले आता, वाणी मंजुळ ऐकावया
आजानुबाहू देह, उभवी थोर कृपा कराया
पुरवि माझी आस त्वरित, दर्शना ये धावुनिया
शब्द मुखासी न उमटे, गळा येता दाटुनिया
कृष्णदास विनवितो, देहभान विसरुनिया
कृपा करा कृपा करा, श्री समर्थ स्वामीराया
नको पाहु अंत असा, जाण भावा मनाचिया
येरे येरे धावुनिया, श्री समर्थ स्वामीराया!
येरे येरे धावुनिया, श्री समर्थ स्वामीराया!!


कृपाळू स्वामीराया, दयाळू स्वामीराया
कामधेनु होऊनि तू, पोशितसे भक्तां या
भक्ततृषा हरवितसे, सत्रावीच्या देऊनी पया
निजानंदी निजविसी, स्वानंदभान देवोनिया
कृष्णदास स्वामी कुशी, बाळ माथा स्वामी अंकी
पहुडलासे निजानंदी, निजतसे स्वानंदी


चला चला अक्कलकोटासी, स्वामीराय दर्शनासी
दर्शन घेऊ चला, वटवृक्षातळीसी
विशाल वटवृक्ष, शीतळ छायेसी
त्रिविधताप भानूचे, भय न छायेसी
होऊ श्रांत मनी तेथ, विसावा घेताचि
दु:ख आपुले कथुनि होऊ, मोकळे मानसी
चरणांवरी शरण जाऊनी, वाहू भार स्वामींसी
कृष्णदास होई शरण, वटवृक्षस्वामींसी
स्वामी समर्थ स्वामी समर्थ, नाम त्याचे मुखासी


श्री समर्थ स्वामीराया, पाचारितो तुजसी या या
हृदयसिंहानावरी, विराजित सत्वरी व्हा या
आसन मम हृदयाचे, सुशोभित सुंदरसे
मखमली गादीवरी, भाव फुली सजविलीसे
तुमच्याची नामाचा, शीतल वारा अखंड
घालिता कृष्णदास, हृदयी शीतल प्रचंड


श्री समर्थ स्वामीराया, योगिराज गुरुराया
निर्विकल्प समाधीसी, शिष्या देसी अनुभवाया
काही न मागतोसी, शुद्ध भाव पाहतोसी
कृपाकरे स्पर्श करोनि, निर्विकल्पी बुडवतोसी
सर्वज्ञ तू जाणतोसी, शुद्ध भाव अंतरीसी
कृष्णदास इच्छा करी, स्वामी भेटी निर्विकल्पीसी


श्री समर्थ स्वामीराया, नामघोष करु या या
वटवृक्षातळी जमुनि, चला नाचू गाऊ या या
शुद्ध भावे स्वामींसी, आणू देहभानी या या
कमलनयन उघडताचि, कृपादृष्टी न्हाऊ या या
अमृतकिरणी न्हाताची, पवित्र होई काया या
पवित्र ते देह सुमन, स्वामी चरणी वाहू या या
कृष्णदास पवित्र सुमन, स्वामी चरणी पडता या
तोषोनि प्रसन्नचित्त, कृपाकरे स्पर्शिता काया
विकल गात्र सद्गदित, देहभान विसरुनिया
अंग अंग रोमांचित, गाती अखंड स्वामीराया


श्री समर्थ स्वामीराया, लपविलीसे तू काया
बोल परी एक माझे, लावीन तुजसी प्रगट व्हाया
नामघोष भावबळे, गमशील निरुपाया
स्वामी दर्शनी कृष्णदास, स्वामी समर्थ ठाया ठाया


श्री समर्थ स्वामीराया, श्री समर्थ स्वामीराया
कृपा असो मजवरी, नाम अखंड तुझे गाया
नाम घोषी अखंड तुजसी, पाहीन निज हृदया या
कृष्णदास हृदयीच, वास अखंड स्वामीराया


श्री समर्थ स्वामीराया, नृसिंहभान स्वामीराया
करवीरी धाडिले तू, कृष्ण सरस्वती गुरुराया
प्रज्ञापूरी उग्र रुप, करवीरी बाल भावा
कृष्णदास प्रर्थितो, रुपे दोन्ही मजसी दावा


तू स्वामी मी दास, स्वामी समर्थांचा मी दास
दास नव्हे हा ऐसा तैसा, असे मी कृष्णदास
ज्याच्या हृदयी असे नित्य, स्वामींचाची वास!


श्री समर्थ स्वामीराया, प्रगटलासी भूलोका या
त्रिविधताप वैशाख वणवा, पोळील भक्त जन आघवा
तापातुनी रक्षायासी, चैत्र शुद्ध द्वितियेसी
अवतार दिगंबर, नृसिंहभान नामासी
युगायुगी अवतरसी, कृष्णदासा उद्धरसी
कलियुगी भक्तांसी, दर्शन वटवृक्षातळीसी


स्वामीराया स्वामीराया, श्री स्वामी समर्थ
भवसागर तरण्यासी, नौका नामी समर्थ
बुडण्याचे भय तिजसी, असे ना किंचित
सुकर्णधार तूचि असता, भरकटण्याची काय बात
वादळी तुफानीही, समर्थ अविचल हात
नामगानी तल्लीन होता, काळाचेही भान न उरत
नाम घोषी आनंद होता, प्रवासही होई मजेत
कृष्णदास पोहोचला, नौकेतुनि परतीरात!


श्री समर्थ स्वामीराया, पंढरीच्या विठूराया
सव्य हस्त सोडिलासी, निज भक्तां कृपा कराया
समचरण पादुकांवरी, जो शोभिती विटेवरी
रुद्राक्षांची माळ गळा, शोभितसे वैजयंती परी
शिरावरील टोपी सुंदर, जणू की त्या मुकुटापरी
गौरवर्णी तनू सुंदर, कृष्णवर्णी सावळा सुंदर
दर्शनी निवती नेत्र, जसे की विठूराया
कृष्णदास हरपे भान, दर्शनी दोन्ही मूर्ति सुंदर
प्रज्ञापुरी पंढरपुर, पंढरपुरी प्रज्ञापुर
स्वामीराय विठूराय, अभेद ते अवतार!!


श्री समर्थ स्वामीराया, देई दर्शन त्वरित बाळा या
त्रिविधताप पोळीतसे, होई दाह मज काया
दृश्यातील नश्य सारे, नेत्रा शीण पाहता या
दर्शनी शमतील नेत्र, स्पर्शनी हो शीतल काया
कृष्णदास भाकितसे, स्वामींसी करुणा या
या या हो सत्वर या, दर्शन द्या स्वामीराया
श्री समर्थ स्वामीराया, श्री समर्थ स्वामीराया


श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
स्वामी समर्थांचा असे, महान हा मंत्र
दशेंद्रिये अन् चंचल अकरावे ते मन
लगाम त्यांना घालण्यासी, सुगम याचे तंत्र
मनोजय साधण्यासी, जपा अहोरात्र
कृष्णदास अखंड अविरत, जपतो दिव्य मंत्र


शुद्ध भाव विडा स्वामींसी अर्पिला
चघळीता तोषे रंग मुखासी आला
तोषोनिया स्वामींनी आशीर्वाद दिधला
कृपाआशीर्वादे कृष्णदास आत्मरंगी रंगला


विडयानंतर स्वामी मागताती दान
दासासी न कळे कैसे ठेवावा तो मान
स्वामींसी ना देहभान, दासा न कळे काय द्यावे दान
देहभावाचे ते अंती देता दान, कृष्णदासापाशी उरे आत्मभान


स्वामींसी गाऊ शेजारती, सुखे स्वामी निद्रा करती
निद्रा कैसी अखंड जागृति, शेजारती ही उपचार रिती
मिटल्या नेत्री स्वामी अंतरी लक्षिती
कृष्णदासा अर्पिती आत्मभान जागृति


आरती करितो स्वामी समर्था
नमितो तव अगणित सामर्थ्या
करुनी जीवपणाचा अंत
रमवी आत्मस्वरूपी आर्ता
संसाराच्या टाळी अनर्था
आत्मरुपाच्या जाणवी अर्था
पावन नाम तव मधुर पदार्था
रसना अविरत सेवी अधीरता
नामाची तव चवी चाखता
भान विसरवी स्वामी सत्ता
दासा तारक समर्थ सत्ता
कृष्णदास नमितो तव दत्ता


स्वामी समर्था तुला प्रार्थितो मी,
कुठे येऊ घ्याया तुझ्या दर्शना मी
ना येथे ना तेथे ना दिसे तू कुठे ते,
धावधाव करिता अति शीण होतो
इच्छा मनीची तू न का रे जाणतो,
तरी दर्शना विलंब कशासी तू करितो
विडा तू मजसी कशाकारणे मागतो,
मनीचा तव हेतू मजसी ना कळतो
कृष्णदास बाळ समर्था तुला रे प्रार्थितो,
विडा देऊनि दर्शनासी इच्छितो


स्वीकारुनि विडा स्वामी टाळा इडापिडा,
षड्रिपु असुरांसी धरुनिया ताडा
कृपे सारा सत्वरी देहभावाची पिडा,
कृष्णदास रंगी रंगे चघळिता आत्मरुपी विडा


चला चला करण्या स्वामींचा धावा
विनवुया स्वामी लवकरी पावा
प्रेमळ वेधक मूर्ति प्रत्यक्ष मजसी दावा
कृपाहस्त मस्तकी लवकरी तव ठेवा
अनुभवीन मग अनुहाती ध्वनी कृष्णपावा
रमवी त्यात मजसी मग मी वारीन देहभावा
मी तू पण त्वरित तेणे मिटे तो दुरावा
कृष्णदास इच्छितो दास, तुजसी एकरुप व्हावा


स्वामी तूचि एक आधार, जगता तूचि एक आधार
वटवृक्षातळी बैससी परि, जगा सूत्रधार, तूचि जगा सूत्रधार
शरणागतासी अखंड वर्षे, तव कृपेची नितधार, स्वामी तव कृपेची नितधार
कृष्णदास प्रार्थितो तुजसी करु नको, दर्शना विलंब फार, स्वामी दर्शना विलंब फार


स्वामी गातो तव गाणे, ऐकवितो मनीचे तराणे
पवित्र सुमधुर तव नामी त्या अखंड इच्छितो रमणे
रमता नामी रमता ध्यानी, स्वामी त्वरित दर्शन मज देणे,
कृष्णदासा त्वरित दर्शन देणे


स्वामी कृपावंत, बाळ भाग्यवंत
लेकरु असमर्थ, परि माता समर्थ
अज्ञानी दास, परि ज्ञानी समर्थ
श्री स्वामी कृपांकित, कृष्णदास समर्थ


देवगुरु मातापिता प्रेम एकी सामावले
श्री स्वामी समर्थ रुपे आकारले
शरणागती कृपेचे कवच उभारिले
कृपेने त्या लक्षावधी उद्धरिले
कृष्णदासही त्यात उद्धरुनि गेले!


स्वामी समर्था तुला आदरे स्मरु,
आम्ही सर्व बाळे तुझे लेकरु
संसारचिंतेने हा जीव घाबरु,
मोहव्याळी डसता अति कळवळू
तुजविण दुजा कुणा हाक मारु,
टाहो फोडिते हे ऐक लेकरु
कृष्णदास विनवितो धाव लवकरु,
कडे उचलुनि पाववी परतीरु


भिऊ नको षड्रिपुंसी, मी आहे तुझ्या पाठीशी
अक्कलकोटीचा समर्थ गुरु हा साधकांसी उपदेशी
बलाढ्य शत्रू नामोहरम ते क्षणात मज कृपादृष्टीसी
कृपादृष्टी लाभे तुजसी, शरण जेव्हा तू मजसी
श्री स्वामी समर्थांच्या ऐकुनिया अभिवचनासी
कृष्णदास चरणी शरणी जाऊनिया रत साधनेसी


चैत्र शुद्ध द्वितियेसी कर्दळीवनी प्रकटले
निर्विकल्प स्थिति त्यागुनि भक्तोद्धारा खाली आले
बहुत क्षेत्रे संचारुनि प्रज्ञापुरी निवसले
अनंत भक्तजन वटवृक्षातळी आले
आशीर्वादे समर्थांच्या जीवनी धन्य झाले
समर्थ स्वामी म्हणुनि जगी जे नावाजले
समर्थ स्वामींसी या कृष्णदासे भावे नमिले


घेई धाव स्वामीराया, बाळ तव करितो धावा
पाणावल्या नेत्रां दोही, रूप तव दाखवि राया
सर्वज्ञ तू स्मर्तृगामी त्रिभुवनी संचारसी
धाव धाव आळविता आता कां न त्वरे येसी
भाव मनींचा हा माझ्या, जरी असे उणापुरा
भक्तवत्सल नामे तुझा गवगवा प्रज्ञापुरा
भक्त तुझा कृष्णदास, झाला पहा आज उदास
चैत्र शुद्ध द्वितीयेस, आळवितो समर्थास
स्वामी स्वामी स्वामी स्वामी नामजपे हृदयास
प्रकटदिनी तव या प्रकट व्हावे हाचि ध्यास


नाम गाऊ नाम गाऊ स्वामी समर्थांसी ध्याऊ
कृपा आशीर्वाद पावू तेणे जगी धन्य होऊ
स्वामी माता बाळ आम्ही स्वानंदाचा खाऊ खाऊ
कृष्णदास म्हणे त्वरे, चला प्रज्ञापुरी जाऊ
स्वामी स्वामी स्वामी स्वामी, वाटे त्यांचे नामगाऊ


चला लगबग करा लगबग
वटवृक्षातळी माय स्वामी ते बघ, माझे स्वामी ते बघ
दर्शनासी त्यांच्या माझी होई तगमग, जीवा होई तगमग
धीर किती धरु मज कळेना बघ, मज कळेना बघ
माता असे दूर देशी, बाळ झाले परदेशी
बाळाची ती विरहव्यथा, जाणवे ना का मातेसी
माय स्वामी समर्थासी, कृष्णदास परदेशी
धावे धावे भेटण्यासी, लगबग लगबग…


वटवृक्षातळी स्वामी माझे, वटवृक्षातळी स्वामी माझे
दत्त दिगंबर रुप साजे, दत्त दिगंबर रुप साजे
चैतन्याची मूर्ती, भानावरी ना जे,
देहाकार जरी दिसे विश्वाकार परि जे
कंठी तुळसी माळ कर्णी कुंडले, भाळी गंध असे रेखिले जे
आजानुबाहू अन् लंबोदर, उग्र दृष्टी परि करुणाकर जे
चला चला प्रज्ञापुरी, शुद्ध भाव घ्या सवे
भक्तिभावा भुकेला जो, दत्तदेव नाही दुजे
कृपेचे धन पावू, शरणागता उद्धरी जे
कृष्णदास म्हणे भावे, नमू चरण पावन जे


चला नमूया स्वामी समर्था, संसाराच्या टाळू अनर्था
परमार्थाच्या साधू अर्था, आत्महिताच्या साधू स्वार्था
सर्व दु:खांचा तोचि हर्ता, सर्व सुखाचा तोचि कर्ता
सांडुनि साऱ्या तर्कवितर्का, भजा भजा हो स्वामी समर्था
हृदयी भाव पुलकित आर्ता, स्मरणे नेत्रा अश्रूपूरिता
कृष्णदास हा सद्गद भावे, नमितो योगी स्वामी समर्था


निशिदिनी रमतो स्वामी नामी, प्रज्ञापूर धामी
समर्थ सद्गुरु स्मरतो प्रेमे, अक्कलकोट स्वामी
आनंदात विसरतो नित्य, स्वामी मूर्ती ध्यानी मनी
वटवृक्षातळी मूर्ती बैसली अखंड, स्थितित ही अमनी
दत्तात्रयगुरु श्रीपादश्रीवल्लभ पुढे रुप श्री नृसिंहमुनि
तेचि श्रृंखला अवतरली रुपे अक्कलकोट स्वामी
चैत्र शुद्ध द्वितियेसी प्रगटली जी जगदुद्धारालागुनि
कृष्णदास नमितो नित्य ती भावे हृदयातुनि


— सर्व रचना © कृष्णदास


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *